कर्मयोगी! (भाग पहिला)

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
3 Jul 2009 - 10:32 pm

प्रास्ताविक -
गेल्या महिन्यातल्या एका वीकांताची गोष्ट. संध्याकाळची वेळ, हवा छान होती. बरेच लोक फिरायला बाहेर पडले होते. हळूहळू चालत येऊन एक आजोबा हिरवळीवरल्या बाकावर बसले.
कोण? कुठले? चौकशी झाल्यावर समजले की ते मुंबईहून आलेले आहेत. मी मराठी बोलतोय हे ऐकताच ते उत्साहाने म्हणाले "अहो, तुम्हाला वेळ आहे का? थोड्या गप्पा मारुयात."
मलाही आजोबा आवडले होते गप्पांना सहाजिकच रंग भरला. थोड्याच वेळात त्या आजोबांच्या चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचा अंदाज आल्याशिवाय राहिला नाही.
त्यांची ओळख मिपाकरांनाही व्हावी असं मनात आलं म्हणून हा लेखनप्रपंच.

******************************************************************************************
"पेशवाईचा अस्त झाला त्यासुमारास अकाउंटंट असलेल्या आमच्या पूर्वजांना कोकणातली पंधरा गावे इनाम म्हणून मिळाली, त्या गावांचे आम्ही 'खोत' असं आमचे वडील सांगायचे.
गुहागर तालुक्यातले पाभरा-कुटगिरी हे आमचं वास्तव्याचे गाव", सावरकर आजोबा सांगत होते.
"वडिलांनी सांगितलेलं मला आठवतंय की आम्ही सावरकर हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या घराण्यापैकीच, फक्त ती शाखा नाशिकजवळ भगूरला स्थायिक झाली आणी आम्ही कोकणात आलो.
माझे आजोबा भास्करराव सावरकर हे 'पडशीवाले' होते. ते पडशी घेऊन सतत फिरतीवर असायचे. माझ्या आजोबांनी पार्थिव केले होते. 'पार्थिव' म्हणजे सकाळी जिथे असतील तिथे कोणाकडेही स्नान करायचे,
दुपारी १२ वाजायच्या आधी शाडू मातीचं शिवलिंग करून त्याची पूजा करायची, त्याशिवाय अन्नग्रहण नाही. त्यानंतर मिळालं तर जेवण, नाहीतर तसेच पुढे निघायचे. असं त्यांनी सतत २४ वर्ष केलं.
फार देवदेव करताना घराकडे दुर्लक्ष होत असे. त्यामुळे सगळा संसार आजीलाच बघावा लागला. पण आमची आ़जी होती मोठी खंबीर! वडिलांना ५ भाऊ आणि एक बहीण. ही माझी 'मुक्ती' आत्ते.
दुर्दैवाने तिला फार लहान वयातच वैधव्य आलं. सासरच्या मंडळींनी तिला माहेरी पाठवलं. त्यावेळच्या रीतीप्रमाणे केशवपन अटळ होते.
एकुलत्या एक मुलीचं आयुष्य नासू नये म्हणून हिंमत करुन आदल्याच रात्री आजीने तिला पुण्याला धाडून दिले! तिला नेऊन सोडणार्‍या व्यक्तीचेही मला कौतुक वाटते की त्या माणसाने कोठेही बभ्रा केला नाही.
दुसर्‍या दिवसापासून तिचा पत्ता कोणालाही लागला नाही.
पुढे काही वर्षांनी आमच्या वडिलांनी सांगितले की ते पुण्याला गेले असताना श्री. मराठे ह्यांच्या खानावळीत पोळ्या लाटण्याचे काम करणारी स्त्री त्यांना ओळखीची वाटली, ती 'मुक्ती' होती!
तिने मुद्दाम ओळख दिली नाही पण त्यांनी मात्र बहिणीला ओळखले आणि तिला विश्वास दिला की ते कोणालाही सांगणार नाहीत, तिने निश्चिंत रहावे!".

संगतवार आठवायला आजोबांना थोडा विचार करायला लागत होता. अर्ध्या-एक मिनिटाभरात ते पुन्हा सांगायला लागले -
"माझ्या आत्तेची कहाणी एखाद्या चित्रपटात शोभावी अशी घडली. ती खानावळीत काम करीत असताना तिथे श्री. भावे नावाचे एक गृहस्थ जेवायला येत. त्यांच्याशी तिचा परिचय वाढला. पुढे त्यांनी तिच्याशी विवाह केला.
हे भावे होते खांडव्याचे, तिथे त्यांची बरीच मोठी इस्टेट होती. त्यांची प्रथम पत्नी काही कारणाने त्यांना सोडून गेली होती. अपत्यप्राप्तीच्या ओढीने भाव्यांनी दुसरे लग्न केले ते मुक्तीआत्तेशी. पुढे त्यांना मूल झाले परंतु दुर्दैवाने ते जगले नाही.
ही सगळी कहाणी आम्हाला समजली कशी?..... हाही मोठा आश्चर्यकारक भाग आहे.
माझे मोठे बंधू श्रीराम सावरकर हे मराठा बटालियन मध्ये नोकरी करीत होते. त्यांची बदली सातत्याने आग्रा, ग्वाल्हेर अशा ठिकाणी उत्तर हिंदुस्थानात होत असे. माझ्या वडिलांना मुक्तीआत्तेची खूप आठवण येई.
ते म्हणत असत की ती कुठेतरी आहे, तिला शोधायला हवं, भेटायला हवं. त्यामुळे श्रीरामने ध्यास घेतला की मी तिला शोधून काढीन! दुसरीकडे आत्तेलाही नातेवाईकांची चुणचुण लागलेलीच होती.

"माझे सगळ्यात मोठे काका हे डॉक्टर होते. ते ग्वाल्हेरचे महाराज जिवाजीराव शिंदे यांचेकडे पशुवैद्यकाचे काम करीत असत. (जिवाजीराव शिंदे म्हणजे काँग्रेसचे दिवंगत खासदार कै. माधवराव शिंदे यांचे वडील)
डॉक्टरकाकांची गायकी उत्तम होती ते मैफलीही करीत असत. मोठमोठे गायक, वादक ग्वाल्हेरला येत आणि गाणेबजावणे होत असे. तर सांगायची गोष्ट अशी की, ग्वाल्हेरला असताना ह्या काकांकडे श्रीराम गेला.
तिथे आसपास चौकशी करताना त्याला कुणकुण लागली की खांडव्याला भावे ह्यांचेकडे कोणी सावरकरांच्या नात्यातून आलेले आहे. लगोलग तो तिकडे पोचला. भाव्यांकडे तो गेला तेव्हा आत्ते एकटीच होती, भाव्यांचे निधन होऊन काही काळ गेला होता.
त्याने खात्री करण्यासाठी काही प्रश्न विचारले, तिनेही त्याला काही प्रश्न विचारले. एकमेकांबद्दल दोघांची खात्री पटली आणि त्यांना हर्ष झाला! आत्तेला मुंबईला न्यायचे असे ठरले. श्रीरामच्या नोकरीतून त्याला रजा नसल्याने तिला एकटीलाच गाडीत बसवून दिले.
तिला बघितले नसल्याने ओळखणार कसे म्हणून श्रीरामला तिची बोगी वगैरे सगळ्या गोष्टी विचारुन घेतल्या होत्या. बोरीबंदरला तिला उतरवून घ्यायचे म्हणून मी व माझे मोठे बंधू सदाशिवराव गेलो. लेडीज बोगी शोधत असताना तिनेच मला ओळखले.
"अरे तू गजाननचा मुलगा ना? अगदी त्याच्याचसारखा दिसतोस!" माझ्याशी बोलल्यावर तर तिची खात्रीच पटली "तुझा आवाजही अगदी गजासारखाच आहे!" आम्ही सर्व भावाकडे आलो. पुढे तिला गुहागरला घेऊन जाण्याची जबाबदारी मी घेतली.
वडिलांना भेटायला आम्ही गुहागरला पोचलो. जवळपास २० वर्षांनी बहीण-भावांची भेट होण्याचा प्रसंग होता. वडिलांनी तांब्याच्या घंगाळातल्या पाण्यात तिचे मुखदर्शन केले आणि मग भाऊ-बहीण कडकडून भेटली!
तिथे काही दिवस राहून मग मुंबई आणि परत एकदा खांडवा असा प्रवास तिने केला. तब्बेत बिघडू लागल्यावर मग खांडव्याची प्रॉपर्टी विकायचा निर्णय झाला.
तिथली प्रॉपर्टी विकून जे पैसे आले त्यातले जवळपास रु.५०,०००/- पुणे 'अनाथ विद्यार्थी गृहाला' तिने देणगी म्हणून दिले, साल होतं १९४५! पुढे ती वृद्धापकाळाने गेली.
एखाद्या प्रसंगाने आयुष्याला वळण कसे मिळते हे इथे समजून घेण्यासारखे आहे."

"त्यानंतरचे माझे क्रमांक दोनचे काका हे नागपूरला स्थायिक झालेले. त्यांचं स्वतःचं हॉटेल होतं. भावंडात माझ्या वडिलांचा क्रमांक तिसरा. शेतीची आवड असल्याने दर वर्षी ऊसाचे भरपूर पीक ते घेत आणि त्यापासून उत्तम प्रतीची काकवी व गूळ बनवीत.
गुहागरात आम्ही 'रसवाले सावरकर' ह्या नावानेच ओळखले जायचो. त्यामानाने माझे धाकटे काका फारसे शिकले नाहीत. ते पाभर्‍यालाच जाऊन रहात असत."

"माझा जन्म २८ ऑगस्ट १९२४ सालचा. गुहागरला आम्हा मुलांच्या शिक्षणासाठी वडील आले तेव्हा 'सच्चिदानंद गजानन सावरकर', म्हणजे मी, दोन महिन्यांचा होतो. त्यावेळी आमच्या वडिलांना आम्ही एकूण सहा अपत्ये होतो," आजोबा सांगत होते.
आता वडिलांना शेती करणे जमत नव्हते. चरितार्थाचे साधन काय? असा प्रश्न वडिलांना पडला नाही. ते बुंदीचे लाडू उत्तम करीत म्हणून त्यांना आसपासच्या गावांमधून कार्याचे लाडू करायला बोलावणे येई. इतर स्वयंपाकही ते चांगला करीत.
घरची परिस्थिती बेताची. सगळ्यात मोठ्या भावाने रस्त्यात पडलेल्या वर्तमानपत्राच्या तुकड्यावर पुण्याच्या 'अनाथ विद्यार्थी गृहाची' जाहिरात बघितली आणि तिथेच जायचा हट्ट धरला. कसेबसे पैसे जमवून आई-वडिलांनी त्याला शिक्षणासाठी पुण्यास धाडले.
तिथे मॅट्रिक झाल्यावर प्रभाकर पाध्यांचे 'लोकमान्य' नावाचे वर्तमानपत्र टाकणे आणि आणखी एक छोटी नोकरी असे तो करीत असे. ह्याचे महिना रु.३५ मिळत. त्यापैकी रु.१५ आई-वडिलांना पाठवावे लागायचे."

"त्याकाळची अजून एक महत्त्वाची आठवण सांगायलाच हवी. गुहागरला वरच्या पाटात आमच्या घराजवळ श्री. नारायण खरे म्हणून वडिलांचे स्नेही होते त्यांचा जमीनजुमला होता. खरे ह्यांचे वास्तव्य मुंबईस असे.
त्यांच्या जमीनजुमल्याची देखभाल केली तर अर्धेली मिळत असे. खर्‍यांनी आम्हाला इस्टेट सांभाळायला देऊ नये म्हणून गावातल्या लोकांनी बराच प्रयत्न केला परंतु वडिलांच्या सचोटीवर विश्वास असल्याने खर्‍यांनी ते मानले नाही.
पुढे १२ वर्षे आम्ही ती प्रॉपर्टी सांभाळली."

"एकीकडे आम्हा भावंडांची शिक्षणे सुरु होती. माझ्या वयाच्या १६ व्या वर्षापर्यंत गुहागरात सातवी यत्ता झाली होती. तोपर्यंत मोठ्या भावाने, सदाशिवने, मॅट्रिक केले आणि त्यानंतर जास्त पैसे मिळविण्यासाठी तो भिवंडीला आला.
तिथे एका इलेक्ट्रिक कंपनीत त्याला नोकरीही मिळाली. मलाही पुढे शिकायचे होते. मुंबईला शिक्षणासाठी पाठवायचा खर्च वडिलांना झेपणे शक्यच नव्हते. हो ना करता करता पुढच्या शिक्षणासाठी मला मुंबईला गिरगावात श्री. हर्डीकर ह्यांच्याकडे ठेवले,
ते याच अटीवर की त्यांच्या भावाला सदाशिवने इलेक्ट्रिक कंपनीत नोकरी मिळवून द्यावी. मी हर्डीकर यांचेकडे राहून माझे पुढचे शिक्षण सुरु केले. मुंबईतले वाढते खर्च भागवण्यासाठी मला कोणावर अवलंबून रहाणे पटेना.
काहीतरी नोकरी शोधायलाच हवी असे माझ्या मनाने घेतले. माझ्यासारख्या नवख्या मुलाला कोण नोकरी देणार? लटपटी, खटपटी करुन मी ई.डी. ससून ह्या कापडगिरणीत कामाला लागलो. मला 'कार्डिंग'चे काम मिळाले.
गुहागरचे मावळणकर, हे कापडव्यापारी म्हणून मुंबईत बस्तान बसवून होते; त्यांच्या ओळखीने ई.डी. ससून ह्याच कापडगिरणीत माझ्या मोठ्या भावाला, सदाशिवला त्यांनी आणले. तो तिथे अकाऊंट्स क्लार्क म्हणून लागला.
पुढे त्याने कौशल्याच्या बळावर टेक्स्टाईल एक्स्पर्ट म्हणून मॅनेजरपदापर्यंत बढती मिळवली. हे १९४२ साल होते हे पक्के आठवते कारण त्याच वर्षी मुंबई गोदीत स्फोट झाला होता. ते असो.
गिरण्या सकाळी ८ वाजता सुरु होत. ८ ते संध्याकाळी ६ ह्या वेळेत काम करुन मला लालबाग ते गिरगाव असा पायी प्रवास करुन धावत पळत रात्रशाळा गाठायची असे. बर्‍याचदा माझा पहिला वर्ग बुडे.
गिरगावातले 'हिंद विद्यालय हायस्कूल' जे होते त्याच इमारतीत 'ब्रॅडले नाईट स्कूल' ह्या नावाने रात्रशाळा चालत असे. पुढे नामवंत लेखक, अर्थतज्ञ म्हणून नावारुपाला आलेले कै. गंगाधर गाडगीळ हे त्या शळेत मला शिक्षक म्हणून लाभले.

चतुरंग

संस्कृतीसमाजजीवनमानप्रकटनविचारलेखअनुभवमाहितीप्रतिभा

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

3 Jul 2009 - 11:58 pm | श्रावण मोडक

येऊ द्या. वाचतोय.

विकास's picture

4 Jul 2009 - 12:31 am | विकास

येऊ द्या! वाचतोय...

पिवळा डांबिस's picture

4 Jul 2009 - 8:34 pm | पिवळा डांबिस

येऊ द्या! वाचतोय...

Nile's picture

6 Jul 2009 - 10:25 pm | Nile

येऊ द्या! वाचतोय...

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Jul 2009 - 12:03 am | बिपिन कार्यकर्ते

भन्नाट... विशेषतः त्या आत्याबाईंची कथा तर फारच वेगळी एकदम.

वामनसुतांची आठवण आली. पुढचा भाग वाचायला उत्सुक आहे.

बिपिन कार्यकर्ते

नंदन's picture

4 Jul 2009 - 12:18 am | नंदन

अगदी असेच म्हणतो. पुढच्या भागांची वाट पाहतो आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

शाल्मली's picture

4 Jul 2009 - 1:36 am | शाल्मली

वामनसुतांची आठवण आली.

वाचताना अगदी हेच मनात आले. :)

पुढचेही भाग येऊद्या.. वाचते आहे..

--शाल्मली.

मदनबाण's picture

4 Jul 2009 - 5:02 am | मदनबाण

हेच म्हणतो.

मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka

हरकाम्या's picture

4 Jul 2009 - 2:05 am | हरकाम्या

झकासच पुढचा भाग लवकरच टाका राव

प्रमेय's picture

4 Jul 2009 - 2:09 am | प्रमेय

मस्त वाटते आहे वाचायला!
जुना काळ काही वेगळाच असतो नाही?

धनंजय's picture

4 Jul 2009 - 3:25 am | धनंजय

लेखनबद्ध केला आहे.

भरगच्च आयुष्य आणि आठवणी आहेत आजोबांच्या. वाचतो आहे.

घाटावरचे भट's picture

4 Jul 2009 - 3:42 am | घाटावरचे भट

सुरेख.

प्राजु's picture

4 Jul 2009 - 6:57 am | प्राजु

वामनसुतांच्या लेखांची आठवण झाली.
येऊदे अजून.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सहज's picture

4 Jul 2009 - 7:32 am | सहज

हेच म्हणतो.

वाचतोय.

अवलिया's picture

4 Jul 2009 - 9:05 am | अवलिया

हेच बोल्तो

--अवलिया

विनायक प्रभू's picture

4 Jul 2009 - 8:59 am | विनायक प्रभू

वाटला बोलका इतिहास

प्रकाश घाटपांडे's picture

4 Jul 2009 - 9:11 am | प्रकाश घाटपांडे

वाचताना वामनसुतांची आठवण झाली.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

4 Jul 2009 - 10:44 am | घाशीराम कोतवाल १.२

वामनसुत आजोबांची आठवण आली
खरच
**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

स्वाती दिनेश's picture

4 Jul 2009 - 4:15 pm | स्वाती दिनेश

इतिहासाच्या आठवणी.. आठवणींचा इतिहास येऊ देत अजून,
त्या आजोबांना भरभरुन बोलते करा.. आठवणींचा खजिना सापडेल.
स्वाती

सुनील's picture

4 Jul 2009 - 5:37 pm | सुनील

उत्तम. पुढील भाग वाचण्यास उत्सुक.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

रामदास's picture

4 Jul 2009 - 6:54 pm | रामदास

चतुरंग धन्यवाद.आता पुढचा भाग लवकर लिहा.

स्वाती२'s picture

4 Jul 2009 - 11:36 pm | स्वाती२

पुढील भागाची वाट बघतेय.

लिखाळ's picture

5 Jul 2009 - 1:17 am | लिखाळ

फार सुंदर लेख. आजोबांच्या आठवणी अजून येऊ देत.

वामनसुतांच्या लेखनाची, त्यातल्या संदर्भांची आणि मुख्य म्हणजे अभिनिवेष नसलेल्या कथनाच्या लकबीची आठवण झाली. केशवपन, त्यातून सुटण्यासाठी केलेला प्रयत्न, भावा-बहिणीची अनेक वर्षांनंतरची हृद्य भेट या गोष्टीसुद्धा इतक्या सरळ सांगीतल्या की थक्क व्हायला झाले.

लवकर लिहा. तुमचे विशेष आभार.
--लिखाळ.

सुबक ठेंगणी's picture

5 Jul 2009 - 4:28 am | सुबक ठेंगणी

खरंच आत्याबाईंची स्टोरी फार अदभुत!
बाकी पुढ्च्या भागाच्या प्रतिक्षेत!

डॉ.प्रसाद दाढे's picture

5 Jul 2009 - 8:04 am | डॉ.प्रसाद दाढे

खूप छान चतुरंगराव.. पुढचे लिहा लवकर..
श्री ज जोशींच्या 'वृत्तांत' ची आठवण झाली

अभिज्ञ's picture

5 Jul 2009 - 2:06 pm | अभिज्ञ

लेख आवडला.
अजून आठवणी वाचायला आवडतील.

अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

विसोबा खेचर's picture

5 Jul 2009 - 3:30 pm | विसोबा खेचर

रंगा, सुरेख रे...

तात्या.

अजिंक्य पोतदार's picture

5 Jul 2009 - 7:55 pm | अजिंक्य पोतदार

फरच छान वृतांत आहे. पुढचा भाग वाचायला आवडेल !!

क्रान्ति's picture

6 Jul 2009 - 7:31 am | क्रान्ति

मुक्तीआत्तेची कहाणी खरंच चित्रपटात शोभेल अशीच आहे! सगळ्याच आठवणी "श्यामची आई", वामनसुत आजोबांचे लेख यांची आठवण करून देतात. सुरेख लेख.

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

ऋषिकेश's picture

6 Jul 2009 - 9:43 am | ऋषिकेश

वा वा! ही आजोबा मंडळी असतातच रोचक गोष्टी सांगणारे...
येऊद्या अजून वाचतो आहोत:)
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

बेचवसुमार's picture

6 Jul 2009 - 12:37 pm | बेचवसुमार

एक अंदाज बांधतो..बहुदा पुढे गांधीहत्या आणि त्यानंतर ब्राम्हण कुटुंबांची झालेली परवड ह्याचाही उल्लेख येईल.