उगवत्या सूर्याचा देश
जपान! उगवत्या सूर्याचा देश! शाळेमध्ये इतिहास,भूगोलाच्या पुस्तकांतून जपानची ओळख झाली,तर पु.लंच्या पूर्वरंग आणि तानाजी एकोंडेंच्या 'उगवत्या सूर्याचा देश' या पुस्तकातून जपानशी ओळख झाली.त्या ओळखीचं कधीतरी एकदम स्नेहात आणि मैत्रीत रुपांतर होईल, असं कधी स्वप्नात सुध्दा वाटलं नव्हतं.
A I 134 , मुंबई- दिल्ली-हाँगकाँग- ओसाका असा आमच्या विमानाचा मार्ग! आपल्याला गाड्या लेट होण्याची सवय,आमचे विमानही लेट झाले,चांगले ३ तास! थोडा कंटाळा प्रवासाच्या सुरुवातीलाच आला,एवढ्या वेळात दिल्लीपर्यंत पोहोचलो असतो असं स्वत:लाच सांगून झालं, पहिल्यांदाच देश सोडणार होते,माझी मायेची माणसं सोडून जाणार म्हणून थोडी हुरहुर मनात होतीच..
एकदाचे आम्ही विमानात बसलो,पट्टे बांधण्याची उद्घोषणा झाली,आणिबाणीच्या काळात वागण्याच्या आवश्यक सूचना देऊन झाल्या,आणि धावपट्टीवर विमान धावू लागले,विमानाबरोबरच माझे मनही धावू लागले, विमान आकाशात झेपावले आणि काही काळाकरता का होईना धरणीशी नाते तुटले.. खिडकीतून खाली मुंबापुरीतल्या दिव्यांचा लखलखाट दिसत होता. हळूहळू सारे मुंगी एवढे दिसू लागले आणि सभोवार चांदण्या दिसू लागल्या,आतमध्ये हवाई सुंदर्यांची लगबग,सरबराई चालू झाली.तासाभरातच दिल्लीच्या "आंतरराष्ट्रीय हवाई अड्ड्यावर " आलो.परत एकदा सिक्युरीटी चेक चे सगळे सोपस्कार झाले. ओसाका जन्मगाव असलेली एक जपानी ललना मला तिथे भेटली आणि मी सुध्दा ओसाकाला जाते आहे हे ऐकून जपानी इंग्रजीत कुतुहुलयुक्त प्रश्नांचा माराच तिने सुरू केला.खिडक्या बंद करून आम्हाला 'गाई गाई' करायला लावून विमानसुंदर्याही झोपल्या.
माझे घड्याळ पहाटेचे साडेचार दाखवत होते,पण बाहेर लख्ख उजाडले होते.सकाळचे ७.१५ इथला लोकल टाईम दाखवत होते.म्हणजे हाँगकाँग आले तर... खिडकीतून बाहेर डोकावले. एकीकडे प्रशांत निळासागर आणि डोंगरातून विमान खाली झेपावत होते,सागराच्या लाटा खुणावत होत्या.समुद्राला लगटूनच हा विमानतळ आहे.परीने ढगांतून अलगद खाली यावं ना,तसं आमचं विमान हाँगकाँगला उतरलं.चढणारे,उतरणारे प्रवासी,सफाईकामगारांची लगबग असा गजबजाट झाला.उरली सुरली झोप कडक कॉफीने उडाली.आता विमानाने परत आकाशात झेप घेतली,ढगांच्याही वर निळ्या निळाईतून जाऊ लागलो आम्ही,उगवत्या सूर्याच्या देशाकडे..
ओसाका कानसाई विमानतळाचे विहंगम दॄश्य फार सुंदर दिसते असे दिनेशने आधीच सांगून ठेवल्याने खिडकीला नाक लावूनच बसले होते आणि ते सारे डोळ्यात साठवत होते.सुंदर्,स्वच्छ रेखीव रस्ते,मुंग्यांची रांग वाटावी अशा पळणार्या गाड्या,जुन्या पध्दतीची घरे अशी रांगोळी पाहताना अंगावर आणि मनातही रोमांच उभे राहत होते.या धरतीवर आता आपण काही महिने राहणार आहोत,जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञानाच्या देशात! हा विचारच इतका उत्तेजक होता की त्या नादात विमानाची चाकं जमिनीला लागली तरी अस्मादिक आकाशातच तरंगत होते.
छोटीशी शटल ट्रेन घेऊन आम्ही कस्ट्म क्लिअरन्स्,बॅगेज क्लेम कडे आलो.भाषेचा प्रश्न धास्ती करुन होताच पण सुहास्य वदना जपानी ललना आपली ती भीती पळवून लावत असाव्यात.सर्टिफिकेट ऑफ एलिजिबिलिटी देऊन पासपोर्टावर शिक्का मारुन घेऊन सामान घेण्यासाठी पुढे आले,तिथे असलेल्या अटेंडटनेच माझी बॅग र्ट्रॉलीवर घालून दिली आणि 'हाजीमेमास्ते' असे स्वागतात्मक अभिवादन करून पुढे कसे आणि कोठे जायचे हे ही सांगितले.(मंडळी,बेल्ट वरून बॅग काढून द्यायला अटेंडंट; तो ही सुहास्यवदनी मला पुढे कधीही , कोणत्याही विमानतळावर दिसला नाही.)बॅगेत किराणासामान ठासून भरले होते,थोडे आंबेही होते दिनेश साठी.यातलं इथे काय चालतं आणि काय नाही याचा विचार मनात येऊन नर्व्हस झाले होते पण तिथल्या अधिकार्याने पासपोर्ट पाहिला फक्त आणि विचारले,"गोईंग टू मीट युअर हजबंड?" माझ्या 'हो'ला "दिस बे बित युअल लगेज.." असं उत्तर आणि मी चक्क बाहेरच आले की,समोरच दिनेश!
प्रतिक्रिया
21 Sep 2007 - 7:22 am | गुंडोपंत
"परीने ढगांतून अलगद खाली यावं ना,तसं आमचं विमान हाँगकाँगला उतरलं."
वा! अगदी छान!
"विमानाची चाकं जमिनीला लागली तरी अस्मादिक आकाशातच तरंगत होते."
हे पण मस्तच!
"छोटीशी शटल ट्रेन घेऊन " म्हणजे विमानतळावरच रेल्वे? अच्छा मोठाच असणार हा विमान तळ!""सर्टिफिकेट ऑफ एलिजिबिलिटी देऊन पासपोर्टावर शिक्का मारुन "
म्हणजे काय असते बॉ?
"तिथे असलेल्या अटेंडटनेच माझी बॅग र्ट्रॉलीवर घालून दिली "
वा मजा आहे!
आपला
गुंडोपंत
21 Sep 2007 - 7:58 am | सहज
>>ओसाका कानसाई विमानतळाचे विहंगम दॄश्य फार सुंदर दिसते.
अगदी. मधे डीस्कव्हरी का नॅ.जिओ. वर ह्या विमानतळाच्या बांधकामाची सूंदर फिल्म पाहीली होती.
एक झलक म्हणजे पंतांना विमानतळावर ट्रेनचा अंदाज येईल.
बाकी जपान ह्या देशाचे मला नेहमीच कूतूहलमिश्रीत आर्श्चय वाटत आले आहे. तेथेपण मंत्रीमहोदयांच्या भ्रष्टाचाराच्या, भानगडींच्या बातम्या येते असतात पण समाजात काय स्वच्छता,शिस्त व प्रामाणीकपणा आहे. तुमची लॅपटॉप, मोबाइल असलेली बॅग जरी विसरली तरी ति कोणी घेणार नाही, ज्या जागी विसरलात तिथेच लगेच गेलात तर सापडेल किंवा नजीकच्या पोलीस स्थानकात. तुमचे हेल्मेट गाडीवर ठेवून बिनधास्त जा, कोणी घेणार नाही.
बाय द वे स्वातीताई हे जपान नवीन घडामोडी का जर्मनीच्या आधीची गोष्ट? बाकी बघीतले पाहीजे सुभाषबाबूंनंतर जपान, जर्मनीमधे कार्य तुमचेच कि काय? :-)
21 Sep 2007 - 8:12 am | गुंडोपंत
मस्त चित्र आहे हे सहजराव. सहजराव!
नीटच कळलं आता तुम्हाला काय म्हणायचे आहे ते!
वा! काय विमानतळ आहे!
चक्क एक बेटच बांधून काढलंय म्हणाकी!
कसं काय केलं असेल या लोकांनी... अचंबाच वाटतोय मला! जपानी मोठे कल्पक आहेत यात शंका नाही.
शिवाय प्रामाणिक लोकं...
म्हणजे तात्याने जपानी मिसळपाव (बिंतो बिंतो पाव डॉट कॉम? ;)) ) काढले, तर "कुणीही कोणतेही आयडी घेऊन, कुणाचेतरी लेखन त्यावर टाकणार नाही, म्हणता?
वा वा! हे चित्र कुठे मिळालं?
जरा जवळून काढलेले आहे का हो?
आपला
यष्टीष्टँडवाला
गुंडोपंत
21 Sep 2007 - 11:49 am | चित्तरंजन भट
स्वातीताई, छोटेखानी लेख उत्तम झाला आहे. मला एक विचारायचे होते. पुण्यातल्या बादशाही बोर्डिंगची टोक्योत शाखा आहे, असे खात्रीलायक सूत्रांकडून कळते. खरे का? दुसरे, जपानमध्ये 'मी तुला पार्टी देतो' असे कुणी म्हटले म्हणजे 'तू तुझे पैसे भर, मी माझे भरीन' असे त्याला म्हणायचे असते म्हणे. त्यामुळे जपानमध्ये कुणी पार्टी देतो म्हटले की कुणी खुश होऊ नये. पैसे काढण्याची तयारी ठेवावी. खरे का?
21 Sep 2007 - 11:43 am | विसोबा खेचर
खिडकीतून बाहेर डोकावले. एकीकडे प्रशांत निळासागर आणि डोंगरातून विमान खाली झेपावत होते,सागराच्या लाटा खुणावत होत्या.समुद्राला लगटूनच हा विमानतळ आहे.परीने ढगांतून अलगद खाली यावं ना,तसं आमचं विमान हाँगकाँगला उतरलं
वा स्वाती, छान लिहिलं आहेस.. औरभी लिख्खो!
तात्या.
21 Sep 2007 - 1:52 pm | उग्रसेन
आजून लिव्हा ,बाबूरावला आवड्ला जपानाचं वर्णन.
जापानमधी जेवा खावाचं बरं हाये नव्हं. म्हंजी भाकर बाजरीची,ज्येवारीची,चपाती तेच्याबद्दल बी लिव्हा
भायेर लयी हाल होते म्हणते नीट जेवाला नसलं म्हंजी.
21 Sep 2007 - 2:00 pm | प्रमोद देव
जर्मनी काय! जपान काय! मजा आहे बुवा तुमची. पण एक गोष्ट आवडली तुमची की निदान तुम्ही आम्हाला तुमच्या अनुभवात तरी सामावून घेताय! नाहीतर आम्ही हे सगळे नकाशावरच बघणार!
लेख आवडला.पुढचा लेख लवकर टाका.
21 Sep 2007 - 5:15 pm | टीकाकार-१
स्वाती ताई तुम्ही भारतातील किती प्रेक्षणीय स्थळे बघीतलीत?
त्यावर पण एक लेख लिहा.
21 Sep 2007 - 5:22 pm | स्वाती दिनेश
भारतात पाहिलेल्या प्रेक्षणीय स्थळांवर 'एक लेख'?एकच लेख कसा हो पुरेल?
टीकाकार, टीकाही करा पण जरा जपून..
स्वाती
21 Sep 2007 - 5:32 pm | टीकाकार-१
माफ करा हं ...
'किमानं एक' लिहा असं मला म्हणायच होतं.
बरं... मी केलेली सुचना तुम्हाला टीका का बरे वाटली ते सन्गालं का जरा..
वा..वा... सुंदर.. वगैरे शब्द नव्हते म्हणुन?..
21 Sep 2007 - 5:36 pm | आजानुकर्ण
तुमचा प्रत्येक प्रतिसाद ही टीकाच असते असे वाटत असावे.
21 Sep 2007 - 5:41 pm | जुना अभिजित
टीकाकारांच्या प्रतिभेला आमचा सलाम.
अगदी शक्य नाही अशा ठिकाणीसुद्धा पिंक टाकतात.
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
21 Sep 2007 - 5:48 pm | टीकाकार-१
"मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित "
ही ओळ वाचुन तुम्ही बालवाडीत आहात असे वटते. :)
22 Sep 2007 - 4:57 am | गुंडोपंत
अहो अभिजितच काय, आम्ही सगळेच बालवाडीत आहोत!
तुम्ही मोठे झालात की तुम्हालापण येता येईल हं आमच्या वर्गात!
आपला
गुंडोपंत
बालवाडी
मिसळपाव बुद्रुक
21 Sep 2007 - 5:41 pm | टीकाकार-१
अच्छा...अच्छा...
नावावरून निष्कर्ष काढ्णारे महाभाग आहेत तर इथे..
तुम्हीपण सावध रहा..आजानुकर्ण साहेब..
21 Sep 2007 - 5:35 pm | स्वाती दिनेश
कारण 'या' लेखाविषयी बरी वाईट कोणतीच प्रतिक्रिया न देता,तुम्ही मला मी भारतातली कोणती प्रेक्षणीय स्थळे पाहिली ? हे विचारलेत म्हणून मला तसे वाटले.तसे नसेल तर उत्तमच आहे.
स्वाती
21 Sep 2007 - 5:44 pm | जुना अभिजित
जपानला कोबे शहरात(?) नेताजींच्या रक्षा ठेवल्या आहेत.. त्यांच दर्शन घ्यायची मनापासून इच्छा आहे.
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
21 Sep 2007 - 5:53 pm | राज जैन (not verified)
जपानला कोबे शहरात(?) नेताजींच्या रक्षा ठेवल्या आहेत.. त्यांच दर्शन घ्यायची मनापासून इच्छा आहे..
जाणे शक्य नाही आहे मला तरी पण एक ईच्छा आहे जर साध्या झालेच तर एक छायाचित्र जरुर येथे चिटकवावे !
ही मनपुर्वक विनंती.
राज जैन
(ज्या महामानवा विषयी वाचले आहे त्याला पाहण्याची जबरदस्त ईच्छा मनात आहे)
21 Sep 2007 - 6:34 pm | विकास
स्वाती,
जपानवर्णनाची सुरवात आवाडलीे. पण अजून पुढे ऐकायची उत्सुकता आहे. मुख्य म्हणजे खाण्याच्या बाबतीत! असे ऐकून आहे की भारतीयांचे बर्यापैकी हाल होऊ शकतात... सुशी खाल्ल्यावर कसे वाटले? अजून पण काही प्रश्न विचारीन, विशेष करून तिथल्या माणसांचे अनुभव वगैरे... पण दुसरा लेख येऊदेत!
22 Sep 2007 - 4:59 am | गुंडोपंत
"सुशी खाल्ल्यावर कसे वाटले?"
म्हण्जे ???? सु आणी शी ? असाच शब्द आहे? बापरे!
आपला
गुंडोपंत
21 Sep 2007 - 11:50 pm | सर्किट (not verified)
पुढच्या भागांची उत्सुकता आहे.
- सर्किट
22 Sep 2007 - 12:59 am | चित्रा
जपानमधल्या जुन्या डायर्या बाहेर काढलेल्या दिसतायत! प्रवासाचे वर्णन आवडले. अजून लिही.
चित्रा
अवांतर - मगाशी वर कुठेतरी "चित्तर" लिहीलेले पाहिले - चुकून चित्रा वाचले :-)
22 Sep 2007 - 7:56 pm | लिखाळ
स्वातीताई,
छोटेखानी लेख मस्त आहे. पुढचे भाग वाचायची उत्सूकता आहे.
-- लिखाळ.
तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)
23 Sep 2007 - 5:10 am | वर्षा
मस्तं लिहिलंय. जपानविषयी वाचायला खूप आवडतं. ( मी तिथे काही काळ घालवल्याने जास्तच जिव्हाळ्याचा विषय आहे!!)
पुढील भाग लवकर येऊ दे.
-वर्षा
24 Sep 2007 - 12:09 pm | स्वाती दिनेश
मंडळी,
सर्वांच्या प्रतिसादांबद्द्ल मनापासून धन्यवाद.
सहज,
कानसाईचे चित्र इथे दिल्याबद्दल धन्यवाद्,त्यामुळे पंतच नव्हे तर सर्वांनाच त्याचा आनंद घेता आला.
प्रमोदकाका,
अहो,आमची काय गाड्यांबरोबर नळ्यांची यात्रा,त्या यात्रेत तुम्हा सर्वांना सामील करुन घेता येत आहे,त्याचा मलाही आनंदच आहे.
चित्रा,
हो ग्,जपानच्या डायर्या आवराआवरीत सापडल्या,म्हटलं,चला आता इथे त्यातले वर्णन लिहू या.
विकास,
सुशी आणि इतरही कितीतरी अनुभव आहेत्,लिहिणार आहे या मालिकेत.
बाबूराव,
जपानची भाकर लई वेगळी आस्ते हो,लिवते हाये त्याबद्दल फुडे..
अभिजित,राज
कोबे मध्ये सुभाष बाबूंचे खूप मोठे असे स्मारक काही मला आढळले नाही.त्यामुळे थोडी निराशाच झाली.सुभाषबाबूंच्या अस्थी रेंकोजी टेंपल्-टोकियो येथे आहेत.
पुढचा भाग लवकरच टाकते,
तात्या,लिखाळ,गुंडोपंत,सर्किट,चित्तर,कर्ण,वर्षा ,टीकाकार सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद
पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.
26 Mar 2010 - 12:37 am | अम्रुताविश्वेश
मी जपान ला जाऊन जवळ जवळ १२ वर्ष झाली. पुन्हा एकदा जाऊन आल्यासारख वाटल.
खूपच छान केल आहे वर्णन. मी जपान च्या नरीटा विमानतळावर उतरले होते.
टोक्यो आणि योकोहामा फिरले. पण ओसाका ला जाण्याची सन्धी मिलाली नाही. :)
31 Mar 2010 - 8:55 pm | शुचि
>>समुद्राला लगटूनच हा विमानतळ आहे>>
मस्तच!!! मजाच मग तर.
लेख आवडला.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे