ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१२

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
22 Jul 2008 - 8:44 pm

याआधी: ले गई दिल 'दुनिया' जापानकी..११कोबे

आज हवा मस्त होती . संध्याकाळी फिरायला बाहेर पडलो.सगळीकडे हिरवळ आणि रंगीबेरंगी फुलं!आम्ही ८/१० जणं हसत खिदळत चाललो होतो.वाटेत एक सुंदर चर्च लागलं.उत्सुकतेने डोकावलो तर तिथे एक लग्न लागत होतं.त्या वर्‍हाड्यांच्या घोळक्यात डोकावलो, हिरवळ दिसल्यावर बागडलो,रानफुलांचे गुच्छ करून किती वेळ हातात धरून चालत होतो.आपल्याला इथे ओळखणारं कोणी नाही ह्या जाणिवेनं सगळेच आपापली कायदेशीर वयं,हुद्दे,पत सारे विसरून रोप वे त बसलो. उंच उंच झुल्यातून सगळ्या कोबे शहराचं दर्शन घडलं.वरती हर्ब गार्डनला गेल्यावर तर समोर पसरलेला अथांग सागर आणि त्याच्यावर वसलेली पोर्ट आयलंड आणि रोक्को आयलंड पाहिली.ह्यातल्या पोर्ट आयलंडवर दिनेशची कचेरी होती.तिथे जायला मॅगनेटवरची बिनड्रायवरची गाडी किवा मग सरळ रस्त्याने बस किवा मोटारीने जाता येतं आणि बोटीनेही जाता येतं. र्डोंगर फोडून, त्या मातीदगडांची भर समुद्रात घालून तयार केलेली मानवनिर्मित बेटंच ती ! जागेची कमतरता कमी करण्याचा हा प्रयत्न! मॅनमेड आयलंड वरचं ते मॅन मेड साम्राज्य पाहताना थक्क व्हायला होतं.त्यामागचे अथक परिश्रम,ध्यास जाणवतो.खरंच,जागेची टंचाई,असलेली जमीन रेताड आणि पहाडाची,चोहोबाजूनी सागराने वेढले आहे आणि धरणीमाता कंप पावत कधी धक्के देईल ह्याची शाश्वती नाही ,त्यात भर म्हणून की काय दुसर्‍या महायुध्दातली होरपळ.. सार्‍या सार्‍यावर मात करून,राखेतून भरारी घेणार्‍या फिनिक्सचे वंशज वाटतात हे जपानी! मनातल्या मनात त्यांच्या विजिगिषु वृत्तीला सलाम करून उतरण्यासाठी परत एकदा रोप वेत बसलो.

सीगल हार्बर हे कोबे बंदराच्या तीरावरचं दुमजली दुकान! सायकल,मोटारींचे टायर,घरं सजवण्याचं सामान, गाद्याउशांपासून पलंगांपर्यंत सारे काही घडीचे,फोल्डींग! वेगवेगळ्या प्रकारचे गालिचे,जाजमे, मनमोहक दिव्यांचे प्रकार,सुंदर वॉलपेपर, पडदे, सहलीसाठीचे तंबू,प्रवासाला लागणार्‍या पिशव्या,ट्रंका,पाठीवरच्या पिशव्या,पोटपिशव्या,कमरेचे कसे, प्रसाधनसाहित्य, घड्याळांपासून कॅमेर्‍यापर्यंत आणि रेडिओपासून टेपरेकॉर्डर,टीवीपर्यंत सारे काही तिथे सुखाने नांदत होते.
तळमजल्यावरील एका कोपर्‍यात अनेक प्रकारची झाडंझुडुपं विक्रीला होती तर दुसर्‍या कोपर्‍यात वेगवेगळे प्राणी!जपान्यांमध्ये श्वानप्रेम जरा जास्तच दिसलं. घरे लहान लहान पण माणसांच्या बरोबरीने घरात कुत्र्यांची संख्या! त्या कुत्र्यांच्या पिल्लांचे लाड तर स्वत:च्या पिलाहूनही जास्त करत असावेत.केसाळ कुत्र्यांच्या वेण्या घालून त्यांना रिबिनी काय बांधतील,स्वेटर काय घालतील, इतकेच नव्हे तर त्यांना बूटही घातलेले पाहिले.एका ठिकाणी तर खास कुत्र्यांसाठी उपाहारगृह पाहिले.म्हणजे मालकाने आपल्या टॉम्या नाहीतर खंड्याला घरातली भाकरी,मटण खाऊन कंटाळा आला म्हणून हाटेलात न्यायचे? आणि आवडीचा खाऊ द्यायचा? स्वतः तो कसे खातो आहे हे कौतुकाने पाहत बसायचे आणि नंतर बिल देऊन ,त्याची रपेट करवून घरी यायचे?सगळीच मजा!तर कुत्री,मांजरं,ससे, त्यांची घरकुलं,त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे खाण्याचे पुडे,अनेक प्रकारचे पक्षी ,त्यांचे झोकदार पिंजरे पाहता पाहता एका ठिकाणी आम्ही थबकलोच,आणि थोडे हबकलोही! तिथे चक्क घुबडं विकायला ठेवली होती.छोट्या पिलांपासून पूर्ण वाढलेली,ध्यानस्थ बसलेली घुबडंच घुबडं!चक्क हातावर पोपट घ्यावा तसं घुबडाच पिलू घेऊन किमती विचारणं चालू होतं. पूर्ण वाढलेल्या घुबडाची किंमत ... १६ लाख येन!!!ऐकूनच चक्करायला झालं.इथे घरा,दुकानांच्या बाहेरही बर्‍याच ठिकाणी लाकडाच्या, चिनीमातीच्या घुबडप्रतिमा ठेवलेल्या दिसतात.घुबडाला अत्यंत शुभ मानून आपल्या घर अथवा दुकानाबाहेर,अंगणात घुबडाच्या प्रतिमा ठेवतात ही मंडळी.काय गंमत आहे? आपण ज्याला दिवाभीत,अशुभ मानतो तेच घुबड इथे शुभ मानलं जातं!गंमत वाटली!

कोबे टॉवरच्या पायथ्याशी हार्बरलँडच्या रेलिंगवरुन समुद्र पाहताना काळोख दाटायला लागला होता. पैलतीरावरचे लुकलुकणारे दिवे,पूलावरच्या दीपमाळांचे वार्‍याने हलणारे दीपझुले दिसत होते.मन आणि डोळे भरून ते पाहत असतानाच 'ती' आली.ती आली,आम्ही तिला पाहिलं आणि आम्हाला तिने जिंकलं!तीच ती 'कॉनगार्टो' फेरीबोट! पूर्ण दीपमाळांनी श्रॄंगारलेली ,आपल्या अंगाखांद्यावर सानथोरांना बागडू देणारी कॉनगार्टो समुद्राच्या लाटांशी लडिवाळपणा करत,पाणी कापत समुद्रात जाऊ लागली.२.३० ते ३ तासांची आवाजी बेटांपर्यंतची ही फेरी असते.तिथे असलेला 'सस्पेन्शन ब्रिज' सप्तरंगाची उधळण लक्षलक्ष दिव्यांनी करत असलेला साक्षात दीपमालांमध्ये बसून पाहणं ,खरच एक विलक्षण अनुभव आहे.त्याच मंतरलेल्या अवस्थेत घरी आलो.

प्रवासलेख

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

22 Jul 2008 - 10:27 pm | यशोधरा

मस्त लेख!! लेख वाचताना तुम्हां सार्‍यांबरोबर जपानची सफर केली मी!! :)

(स्वगत - ह्या स्वातीसान जपानी लोकांप्रमाणेच त्यांच्या बद्दलचे लेखही छोटेच लिहितात की काय? :? )

चतुरंग

वर्षा's picture

23 Jul 2008 - 2:18 am | वर्षा

<<<घुबडाला अत्यंत शुभ मानून आपल्या घर अथवा दुकानाबाहेर,अंगणात घुबडाच्या प्रतिमा ठेवतात ही मंडळी.>>>

इथे अमेरिकेतही बर्‍याच ठिकाणी छपरांवर घुबडाची प्रतिकृती पाहिली. जपान्यांप्रमाणेच अमेरिकन्सही घुबडाला शुभ मानतात काय?

स्वातीसान, बाकी लेख नेहेमीप्रमाणेच सुंदर!
--

-वर्षा

विसोबा खेचर's picture

23 Jul 2008 - 8:28 am | विसोबा खेचर

सचित्र लेखमालिका अतिशय उत्तम होते आहे हे वे सां न ल. आणि जपानला नव्याने/प्रथमच जाऊ इच्छिणार्‍या कुणालाही ही लेखमाला संदर्भ आणि मार्गदर्शक म्हणून उपयोगाची ठरावी..

तिथे चक्क घुबडं विकायला ठेवली होती.छोट्या पिलांपासून पूर्ण वाढलेली,ध्यानस्थ बसलेली घुबडंच घुबडं!चक्क हातावर पोपट घ्यावा तसं घुबडाच पिलू घेऊन किमती विचारणं चालू होतं.

हे मस्तच परंतु स्वाती, तू याचा फोटू काढायला हव होतास आणि इथे द्यायला हव होतास... :)

बाकी, घुबड हा माझा अतिशय आवडता पक्षी! :)

असो,

आपला,
(घुबडप्रेमी) तात्या.

प्रमोद देव's picture

23 Jul 2008 - 9:18 am | प्रमोद देव

नेहमीप्रमाणेच चित्रदर्शी वर्णन आणि त्याला समर्पक अशी छायाचित्रं असा समसमा योग जूळून आलाय.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

II राजे II's picture

23 Jul 2008 - 9:30 am | II राजे II (not verified)

नेहमीप्रमाणेच चित्रदर्शी वर्णन आणि त्याला समर्पक अशी छायाचित्रं असा समसमा योग जूळून आलाय.

हेच म्हणतो !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

नंदन's picture

26 Jul 2008 - 7:32 am | नंदन

आहे, लेख-वर्णन-छायाचित्रे आवडली.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सहज's picture

23 Jul 2008 - 10:15 am | सहज

जिवंत चित्रण करणारा लेख.

फिनिक्सचे वंशज वाटतात हे जपानी!

:-)

लेख आवडला.

अन्जलि's picture

23 Jul 2008 - 5:30 pm | अन्जलि

स्वाति तुझ्या डोळ्यानि आम्हिपण जपान बघतो. खुप छान फोटो आणि तितकाच चान्गला लेख धन्यवाद

प्राजु's picture

23 Jul 2008 - 10:44 pm | प्राजु

नेहमी प्रमाणेच सुंदर चित्रे आणि वर्णन. भाषाही सुंदर..
पण आजकाल बिझी आहेस का? उशिर केलास या भागाला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

धनंजय's picture

23 Jul 2008 - 11:54 pm | धनंजय

येथील प्रवासाचे वर्णन आवडले.

(स्वगत : नाहीतर मला आवड नसलेले विषयांच्या संदर्भातच 'कोबे' आठवे - तिथले बीफ आणि भूकंप. आता ही सुंदर चित्रे त्या नावाशी निगडित होतील.)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jul 2008 - 7:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वातीसान च्या लेखातील प्रकाशचित्र फार सुंदर असतात, पहिल्यांदा सुंदर चित्र पाहत बसतो आणि सेकंड राउंडला लेखन वाचतो :)

केसाळ कुत्र्यांच्या वेण्या घालून त्यांना रिबिनी काय बांधतील,स्वेटर काय घालतील, इतकेच नव्हे तर त्यांना बूटही घातलेले पाहिले.एका ठिकाणी तर खास कुत्र्यांसाठी उपाहारगृह पाहिले.म्हणजे मालकाने आपल्या टॉम्या नाहीतर खंड्याला घरातली भाकरी,मटण खाऊन कंटाळा आला म्हणून हाटेलात न्यायचे?

हा हा हा मस्तच आहे, आवडले आम्हाला जपानींचे कुत्रे/मांजरीचे प्रेम. कुत्र्यांची वस्तीगृह असतात,इ.इ. माहित आहे, पण स्पेशल हॉटेल वा वा ! मस्त !!! घुबडे विकत मिळतात हे तर फारच छान.

सार्‍या सार्‍यावर मात करून,राखेतून भरारी घेणार्‍या फिनिक्सचे वंशज वाटतात हे जपानी! मनातल्या मनात त्यांच्या विजिगिषु वृत्तीला सलाम...
स्सही !!! क्या बात है.

आपल्या सुरेख वर्णनाने आम्हीच 'कॉनगार्टो' फेरीबोटीत चक्कर टाकून आलो असे वाटले, आपल्या प्रवासवर्णनातून आमचीही जपान सैर होते, सुंदर लेख, सुंदर वर्णन !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वरदा's picture

24 Jul 2008 - 7:12 pm | वरदा

मस्तच आहे हाही भाग
मलाही इथे बर्‍याच घरांवर घुबडं दिसलेयत खरी...काय माहीत जपानी माणसांची घरं असतील कदाचित....

"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

मदनबाण's picture

25 Jul 2008 - 10:31 am | मदनबाण

व्वा .. मजा वाटली वाचुन..

(निशाचर )
मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

शिप्रा's picture

25 Jul 2008 - 10:35 am | शिप्रा

किरेई देसने...:) श्यासिन वा ई ई देस..:)

जिथे कमी तिथे आम्ही ..:)

आसावरी's picture

25 Jul 2008 - 12:17 pm | आसावरी

मस्त लेख... कोबे शहराची नव्याने ओळख झाली...

आसावरी.

गुंडोपंत's picture

25 Jul 2008 - 1:34 pm | गुंडोपंत

वाचून मजा आली. जपान मधे भटकण्याचं समाधान...
बाकी घुबड हा तसा अतिशय चांगला पक्षी वाटतो मला. तो दिवसा काही काम करत नाही आणि बहुदा नाईट ड्युटीवर असतो.
मागे डिस्कव्हरीच्या कृपेने तो रात्री कसे पाहतो आणि जगात कसा राहतो, याचे विवेचन पाहिले होते. तेंव्हा पासून हा पक्षी आवडतो.

जपानला (जर कधी) गेलो तर नक्की जपानी घुबड विकत घेईन...
आपला
गुंडोपंत

स्वाती दिनेश's picture

28 Jul 2008 - 12:35 pm | स्वाती दिनेश

सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद.
स्वाती

ऋषिकेश's picture

2 Aug 2008 - 5:01 pm | ऋषिकेश

टॉम्या नाहीतर खंड्याला घरातली भाकरी,मटण खाऊन कंटाळा आला म्हणून हाटेलात न्यायचे

:)).. हे मस्त :)

बाकी लेखन नेहेमी प्रमाणे चित्रदर्शी. कोबे शहर छान वाटले.. पण इतर भागांसारखे जिवंत नाहि वाटले.. (बहुतेक केवळ शहराचेच वर्णन आले व मला आवडते तसे माणसांचे वर्णन न आल्यामुळे असे वाटत असावे)

शेवटचे प्रकाशचित्र मस्त .. हे मोठ्या आकारत खूप सुंदर दिसेल (मला द्याल काहो माझ्या डेस्कटॉपवर लावायला)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश
*उशीरा प्रतिक्रिया देतो आहे.. पण देर आए... ;)