याआधी: ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१७
गाक्कोउ - शाळा जपानी !
आम्ही राहत होतो तेथे २ गल्ल्या सोडून एका कोपर्यावर एक मोठी इमारत होती आणि त्या इमारतीच्या आवारात नेहमी १२, १४ वर्षांची मुले दिसत त्यावरुन ती शाळा असावी असा कयास बांधला आणि एके दिवशी त्यातल्याच एका टोळक्याला पकडून संवाद साधायचा प्रयत्न केला. त्यांचे इंग्लिश आणि आमचे जपानी यांची झटापट होऊन ती शाळाच असल्याचे समजले. त्यांच्या इंग्लिशच्या मास्तरांना भेटता येईल का? असे विचारल्यावर त्यातलीच दोघं पळाली की शाळेच्या दिशेने आणि एक मध्यमवयीन सद् गृहस्थ आमच्या दिशेने येताना दिसल्यावर उरलेली टाळकीही पांगली. मी आणि सुप्रिया तिथेच आपल्या उभ्या! ते आमच्याकडेच आले आणि इंग्रजीत वदते झाले, " आमच्या मुलांनी तुम्हाला काही त्रास दिला का? मी मात्सुदा, ह्या शाळेचा उपमुख्याध्यापक," आता समजले मुले का पांगली ते.. शाळेच्या मुख्यांपैकीच एक जण तिथे आल्यावर त्यांच्या वार्याला उभे राहण्याचा वेडेपणा कोण करेल? आणि मास्तर पण जगभर सारखेच की.. आपल्या मुलांनीच काहीतरी दंगा केला असेल, ह्या नवख्या, परक्या बाईंना त्रास दिला असेल या समजुतीने ते विचारत होते.
"मुलांनी काही नाही हो त्रास दिला,मला जपानी तितकीशी येत नाही आणि मुलांना इंग्रजी! संवाद करता येईना म्हणून इंग्रजीचे गुरुजी आहेत का? विचारत होते. आम्ही इथेच २ गल्ल्या पलिकडे राहतो. तुमची शाळा बघायची इच्छा होती, परवानगी मिळेल का?" मी मुलांशी बोलण्याचं कारण सांगितल्यावर गुरुजींचा चेहरा हुश्श झालेला जाणवला मला, मला हळूच म्हणाले द्वाड आहेत हो आमची पोरं, त्यातून टीनएजर सगळे.. १४, १५ वर्षांच वय ना..टवाळ्या करत असतात म्हणून वाटलं तुम्हाला काही त्रास दिला की काय? परत एकदा घाईघाईने मुलांनी मला काहीही त्रास दिला नसून मलाच शाळा बघायची उत्सुकता असल्याने मी त्यांच्याशी गप्पा मारायला आल्याचे सांगत असतानाच एक तरुणी आमच्या दिशेने आली. ह्या योशिदासान, आमच्या इंग्रजीच्या बाई. गुरुजींनी ओळख करुन दिली आणि त्यांच्या मागोमाग येण्याची खूण केली. योशिदासानबरोबर मी त्यांच्या कचेरीत पोहोचले. दुसर्या दिवशीपासून १५ दिवस कसलीशी सुटी होती म्हणून त्यानंतरच्या एके दिवशी मला शाळा बघायला येण्याचे रीतसर आमंत्रणच त्यांनी दिले. एवढेच नाही तर मुख्याध्यापक दाइचीसानशी ओळख करुन दिली. योशिदासान आणि मी एकमेकींना फोन नं दिले आणि संपर्कात रहायचे ठरवले.
अखेर तो दिवस उगवला, मी शाळेपाशी पोहोचले तर योशिदासान आणि ४,५ मुले फुले घेऊन माझ्या स्वागताला हजरच होती. आम्ही मग शिक्षककक्षात पोहोचलो. तेथे मात्सुदासानसुध्दा सगळे शिक्षक होते. दाइचीसान आल्यावर सगळेजण उभे राहिले.त्यांनी सार्यांना अभिवादन केले आणि आम्हाला बसायला सांगण्यात आले. मग सुबकशा पेल्यातून चहा आला, गव्हाचा रस घातलेला तो हिरवट चहा पाहून, 'मी चहा घेत नाही ' असे योशिदाला हळूच सांगितले तर ती म्हणाली, तू चहा प्यायल्या सुरुवात केल्याशिवाय कोणीही पिणार नाही आणि नाही म्हणालीस तर ते चांगले समजले जात नाही. मग काय? चेहरा चांगला ठेवून तो काढा पिण्याची कसरत करावी लागली. जुजबी बोलून आणि योशिदासानला मला शाळा दाखवायला सांगून दाइचीसान आणि मात्सुदासान आपापल्या कचेर्यात निघून गेले. खोलीत असलेले शिक्षक माझ्याशी बोलायला उत्सुक होते पण झालं काय की सगळ्यांनाच काही इंग्रजी बोलता येत नव्हते त्यामुळे ते झू मधल्या प्राण्याकडे पहावं तसं माझ्याकडे पाहत होते. शेवटी मी योशिदाला विचारलं की शाळा कधी दाखवणार तू मला? तर म्हणाली तू येणार म्हणून मुलांना एक तास उशिरा बोलावलं आहे. हा तासभर शिक्षकांना तुझ्याशी बोलण्यासाठी ठेवला आहे. त्यांच्याशी काहीतरी बोल. सगळ्यांना बर्यापैकी इंग्रजी समजत पण बोलताना पंचाईत असते. मग काय? मीच एक 'भाषान' ठोकलं.. म्हणजे आपल्याकडच्या शाळा, आपल्याकडे काय आणि कसं शिकवतात. १०वी ची परीक्षा कशी महत्त्वाची असते नंतर कसे विज्ञान, कला किवा कॉमर्सला जाता येतं.. इ. इ. जसं आठवेल तसं सांगत गेले आणि मंडळी भक्तिभावाने ऐकत राहिली पण तो माझ्या भाषणाचा प्रभाव नसून भाषेची अडचण आहे हे नंतर त्यांनी योशिदासानमार्फत विचारलेल्या प्रश्नांवरुन समजलं. भारताबद्दल असलेलं कुतुहल त्यांना प्रश्न विचारायला लावत होतं. घंटा होईपर्यंत हा प्रश्नोत्तरांचा तास चालू होता. मग मात्र सगळ्यांनी मला आणि मी त्यांना धन्यवाद देऊन ते आपापल्या वर्गाकडे आणि योशिदासानबरोबर मी शाळा बघायला निघाले.
सगळ्यात आधी लायब्ररीमध्ये गेलो. प्रचंड मोठ्ठी ग्रंथसंपदा पाहताना डोळे विस्फारत होते आणि प्रेमळ चेहर्याचे लायब्ररीयन हारुसान लगबगीने आलेच की खुर्चीतून उठून. स्वत: दालनांतून हिंडून मला त्यांचे पुस्तकालय दाखवत होते. १० वी, १२ वी पर्यंत शिकणार्या मुलांसाठी जगभरातली माहिती ,ज्ञान तिथे उपलब्ध होतं आणि बहुतांश जपानी भाषेत! भारतावरची,बुध्दावरची काही पुस्तकं त्यांनी दाखवली. सगळी जपानी मध्ये असल्याने लहान मुलं जसं पुस्तकातली चित्रं पाहत ना तशी पाहत राहिले. दुसरं काय करणार? तेवढ्यात दालनातल्या एका कोपर्यातल्या प्रचंड मोठ्या मांडणीकडे बोट दाखवून हारुसान म्हणाले इंग्रजीमधली एवढीच पुस्तकं आहेत सध्या, तुम्हाला हवे तर तुम्ही घेऊन जा वाचायला. १५,२० दिवसात परत आणून द्या. मग काय हरखलेच मी. २,३ पुस्तकं घेतलीच मग वाचायला. लगेच त्यांनी एक सुबक वही उघडली. योशिदासानने स्वतःच्या नावावर त्यापुस्तकांची नोंद करुन घेऊन मला दिली. त्यांचे आभार मानून आम्ही पुढे निघालो.
चित्रकलेच्या दालनात कॅलिग्राफीचा वर्ग चालला होता. त्या मास्तरांनी सगळी शाळा पाहून झाली की मग चित्रकलावर्गात यायला सांगितले, तोपर्यंत मुलांची डिझाइन्स पूर्ण होतील आणि मला सावकाशीने पाहता येतील असे सांगितल्यावर माझ्या सात पिढ्या चित्रकारांच्याच अशा थाटात मान डोलावून पुढे गेलो. एव्हाना वर्ग चालू झालेहोते. आम्ही वर्गात गेलो की मुले उठून अभिवादन करायची. बहुतेक मास्तरांनी त्यांना येणार्या पाहुण्यांची कल्पना दिलेली असावी. शाळेत मुली कुठेच दिसेनात. मग समजले की ही फक्त मुलग्यांची ५वी ते १२वी पर्यंतची शाळा आहे. कॉरीडॉरमधून दुसर्या वर्गात जाताना डोळ्याच्या कोपर्यातून आपल्याकडे बरेच डोळे पाहत आहेत हे जाणवत होतं. पुढे एका वर्गात बाई इतिहास शिकवत होत्या. म्हणजे योशिदासान म्हणाली त्या इतिहास शिकवत आहेत म्हणून इतिहास, ती विज्ञान, भूगोल, गणित जे काय सांगेल ते सगळे मला फक्त 'जपानी'च होते. काला अक्षर भैस बराबर!
ते जाणूनच बहुतेक तिने मला ज्यूडो,कराटे आणि क्योंदो साठीचे वर्ग चालू होते तिथे नेले. तेथे आम्हाला प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. मुले उत्साहाने डावपेच दाखवत होती. ते पाहून कॉरिडॉरमध्ये आलो . पलिकडे पोहोण्याचा तलाव आहे आणि निवडक मुलांना तिथे खास प्रशिक्षण दिले जाते आणि स्पर्धांसाठी तयार केले जाते. हे ऐकून एवढ्याशा देशाला एशियाड आणि ऑलिंपिकमध्ये पदकांच्या माळा कशा मिळतात त्याचे उत्तर मिळाले. पुढे एका मोठ्या दालनात गेलो. तेथे तर चक्क मोठे ओटे बांधले होते. गॅसच्या चुली होत्या. ओव्हनच्या भट्ट्या होत्या. भिंतीतल्या कपाटात वाडगे, बशा आणि हाशी सुबकपणे मांडून ठेवल्या होत्या. येथे कुकिंग शिकवतात. शाळेतून बाहेर पडेपर्यंत प्रत्येकाला स्वतःचे पोट भरता येईल एवढा तरी स्वयंपाक येतोच म्हणजे मग कुठेही गेलं तरी जेवणाचे हाल होत नाहीत. तीच गोष्ट शिवणाची. पलिकडच्याच दालानात असलेली शिवणयंत्रं दाखवत ती म्हणाली , प्रत्येकाला बेसिक शिवणकाम यायलाच हवं, अगदी कपडे शिवू नका तुम्ही घरी पण टिपा मारणं, उसवलेले शिवणे, बटणं लावणं, बारीकसारीक दुरुस्ती स्वतःची स्वतः करता यायला हवी म्हणून शिवणाचा तास असतोच. आता मधले मैदान ओलांडून पलिकडच्या इमारतीत गेलो. तेथील सुसज्ज प्रयोगशाळा पाहिली आणि मग संगणक कक्षात गेलो. शाळेतल्या मुलांसाठीचा संगणक कक्ष आहे की एखाद्या सॉफ्ट वेअर कंपनीचे ट्रेनिंग सेंटर? असा प्रश्न पडावा इतके अद्ययावत संगणक तिथे होते. आश्चर्य व्यक्त करायचं मी एव्हाना सोडून दिलं होतं.
परत मुख्य इमारतीत येताना मैदानात काही मुले येताना दिसली. आम्हाला पाहिल्यावर त्यातले काहीजण आलेच आमच्याजवळ. कोंडाळं करुन उभे राहिले. खेळाचा तास होता त्यांचा. बेसबॉल का क्रिकेट ? काय खेळायचे यावर त्यांचा खल चालला होता. पीटीच्या मास्तरांनी त्यातल्या ४ जणांना खेळाचे सामान आणायला पिटाळले मग त्यांच्यामागोमाग आम्हीही खेळाचे सामान ठेवण्याची खोली पाहायला गेलो.
बेसबॉलची ती दांडकी, चेंडू,फुटबॉल,दोरीच्या उड्या, बास्केटबॉल्साठीचे बॉल्स,ग्लोव्हज्,पॅडस, बॅटी तर होत्याच पण तिथे स्टंप्सचे जवळ जवळ २०/२२ किटस ओळीत लावून ठेवलेले दिसले. हे एवढे कशासाठी? हा प्रश्न तर पडलाच पण असेल कोणता तरी नवा खेळ असं वाटून मी स्टंपकिटकडे बोट दाखवून त्यांना विचारलं हा कोणता खेळ? क्रिकेट माहित नाही तुला भारतीय असून? असा प्रश्न त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट वाचता आला मला पण एवढ्या स्टंपांचे काय करतात हे लोकं? हा प्रश्न माझ्या डोक्यातून जाईना. योशिदासानने मग सांगितलेपलिकडच्या वर्षी मुलांना क्रिकेट शिकवायचे डोक्यात आले. काही भारतीय आणि श्रीलंकन पालक होते त्यांनी शिकवायचे कबूलही केले.किती जण मिळून खेळ खेळतात?एका संघात किती जण असतात?काय काय साहित्य लागते? सगळी चौकशी केली त्याप्रमाणे साहित्य मागवले. पण मागवताना प्रत्येकासाठी एक बॅट, एक बॉल, ग्लोव्ह,पॅड आणि स्टंपकिट!! असे २२ गुणिले ३= ६६ स्टंप्स ४४ बेल्स सहित आणवले की. ते एकून मला यष्टीचित झाल्यासारखेच वाटले.
कसेबसे हसू दाबत आम्ही तेथून निघालो ते परत मुख्य इमारतीत चित्रकलाकक्षात आलो. मी एम एफ हुसेनची पट्टशिष्या असल्याच्या थाटात एकेकाची कॅलिग्राफी पाहत होते. तेवढ्यात त्या सरांनी एक स्वत: केलेले सुंदरसे भेटकार्ड मला दिले. शाळेत अनपेक्षित मिळालेल्या प्रेमाने मी हरखून गेले होते. आता कचेरीत जाऊन मात्सुदासानचा निरोप घ्यायचा होता. त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांच्या कचेरीत गेले तर शाळेतर्फे भेट म्हणून एक सुंदर पेनसेट त्यांनी मला दिला. योशिदासानचा हात स्नेहाने हातात घेऊन तिला निरोप दिला आणि फोन, इमेल द्वारे तिच्या संपर्कात राहण्याचे ठरवले.शाळेच्या फाटकापाशी ती मला सोडायला आली आणि सायोनारा करत तिनेही मला एक सुंदरशी भेट दिली. ह्या स्नेहाने आता मात्र माझे डोळे भरुन आले होते. सांगायला आनंद आहे की आज ७ वर्षांनतरही योशिदासान आणि माझी मैत्री इमेल मधून सुरक्षित आहे.
प्रतिक्रिया
22 Jul 2009 - 5:40 am | वर्षा
छान अनुभव!
22 Jul 2009 - 6:10 am | सहज
>आश्चर्य व्यक्त करायचं मी एव्हाना सोडून दिलं होतं.
प्रत्येक परिच्छेदानंतर लाजवाब, क लिव्हलय क लिव्हलय म्हणायचं मी एव्हाना सोडून दिलं होतं.
अ - प्र - ति - म!
23 Jul 2009 - 7:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>प्रत्येक परिच्छेदानंतर लाजवाब, क लिव्हलय क लिव्हलय म्हणायचं मी एव्हाना सोडून दिलं होतं.
खरं आहे, स्वॉतीमॅमचा लेख आला की, पहिली उत्सूकता चाळवते ती फोटो पाहाण्याची. नंतर लेख वाचायला सुरुवात केली की, डोंगरमाथ्यावर नभ उतरावे तसा लेख हळूवार मनात उतरु लागतो. आता लेखाला किती वेळेस, सुरेख, छान,मस्त, म्हणावे तोही प्रश्न पडायला लागलाय असो.
जापानची शाळा, तेथील मुलांच्यासाठीचे असलेली संगणक व्यवस्था, ग्रंथालय, क्रिकेटचे सामान, गव्हाचा रस घातलेला तो हिरवट चहा, भाषणाचा गोषवारा, आणि तुमची मैत्रीण यशो..., सबकुछ केवळ मस्तच !
और भी आने दो !
-दिलीप बिरुटे
22 Jul 2009 - 6:20 am | रेवती
हा भाग फक्त शाळा पेश्शल दिसतोय!:)
छान जमलाय. क्रिकेटबद्दल ऐकून माझीही विकेट उडाली!
बेसबॉलची दांडकी आणि ती मुले बघून मल्ल असावेत असं वाटलं.
रेवती
22 Jul 2009 - 7:06 am | Nile
वा! सही आहात! एकदम स्वत: जाउन शाळा पहाता येईल का विचारुन वगैरे पाहुन आलात! मस्त! :)
दुनिया जपानकी फिरायला मजा येतेय आम्हाला पण. :)
22 Jul 2009 - 11:27 pm | नंदन
असेच म्हणतो, नेहमीपेक्षा जरा वेगळं असं हे प्रवासवर्णन आवडलं. शाळेत संगणक आणि शिवणकाम जोडीने नांदत असल्याचे पाहून मस्त वाटलं.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
22 Jul 2009 - 8:03 am | ऋषिकेश
आयला ही मुख्याध्यापिका!.. यापेक्षा सरोज खरे बरी... आपली! ;)
एकूणच पोरांची मजा दिसतेय ;)
असो. शाळा असल्याने बालमनावर विपरीत परिणाम होऊ नयेत म्हणून मुख्याध्यापिका पुरण थांबवतो :) लेख तर काय नेहेमीप्रमाणे झक्कास.
बाकी शिक्षकांनी काय प्रश्न विचारले ते ही ऐकायला आवडेल. कुठल्या मुलांशी बोलणं झालं का? इथे सकाळी प्रार्थना होते का? शाळा किती वेळ असते? लोकं डबा आणतात का त्या सामुहिक किचनमधेच बनवून घ्यायच? ;) इत्यादी अनेक प्रश्न मनात डोकावले
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
22 Jul 2009 - 8:47 am | क्रान्ति
अनुभव. संगणक कक्ष खरंच शाळेतला नाही वाटत!
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी
22 Jul 2009 - 4:50 pm | शाल्मली
नेहमीप्रमाणेच वाचनीय लेख!!
शाळा काय सुंदर आहे.. आणि तुझ्या वर्णनशैलीमुळे मीही तुझ्याचबरोबर फिरत होते की काय असं वाटत आहे.
क्रिकेट, संगणक कक्ष वगैरे एकदम मस्तच..
--शाल्मली.
22 Jul 2009 - 4:54 pm | दशानन
:)
छान ! फोटो व लेख !
+++++++++++++++++++++++++++++
23 Jul 2009 - 9:57 am | सुबक ठेंगणी
मी आत्ता अशाच शाळेत बसून हे लिहित्येय! त्यामुळे वेगळंच मस्त वाट्टंय!
माझ्या आजुबाजूचे शिक्षक फोटो बघून "हे कुणी लिहिलंय?" असं विचारत आहेत.
आता त्यांना त्यांच्याच शाळेविषयी लिहिलेलं जपानीत सांगत्येय! :)
23 Jul 2009 - 12:00 pm | यशोधरा
मस्त लिहिलं आहेस स्वातीताई! :) तुझ्याबरोबर शाळेत फिरत सगळे अनुभवत आहे असेच वाटले!
23 Jul 2009 - 1:45 pm | सुनील
शाळा आणि लेख दोन्ही मस्त!
जपानमधील मराठी शाळेचे नाव काय? याशिका (या शिका)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
24 Jul 2009 - 3:58 pm | मदनबाण
हा.हा..हा किरकीट च सामान लॉट है सेल है असं विचार करुन आणलेल वाटल. :D
लेख नेहमी प्रमाणेच झक्कास्स्स्स्स्... :)
मदनबाण.....
Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa
24 Jul 2009 - 2:15 am | केशवसुमार
स्वतीताई,
जर्मनीमध्ये बसून जपानी शाळेचा मस्त दौरा झाला..
संगणक कक्ष खरच एखाद्या सॉफ्ट वेअर कंपनीच्या ट्रेनिंग सेंटर सारखा वाटतो आहे..
२२ गुणिले ३= ६६ स्टंप्स ४४ बेल्स.. हा हा.. प्रत्येक खेळाडू स्वःताचे स्टंप्स घेऊन खेळायला जातो आणि आउट झाला की स्वःताचे स्टंप्स घेउन परत मैदाना बाहेर जायचे..अस काही तरी चित्र ( विचित्र) डोळ्यापुढे आले..
(२२*३)केशवसुमार
24 Jul 2009 - 3:16 pm | सुधीर कांदळकर
आमचे जपानी यांची झटापट होऊन ती शाळाच असल्याचे समजले.
इथपासून अगदीं ६६ स्टंप्सपर्यंत एकदम झकास. मस्त.
सुधीर कांदळकर.
24 Jul 2009 - 9:20 pm | बिपिन कार्यकर्ते
जबरदस्त!!! तू अगदी डोळ्यापुढे उभं करतेस हां सगळं चित्र. म्हणून तुझे लेख निवांतपणे वाचण्यासारखे असतात. मस्त वाटतं. बाकी ते ६६ स्टंपस आणि ४४ बेल्स माझीही विकेट घेऊन गेले. :)
बिपिन कार्यकर्ते
27 Jul 2009 - 4:38 pm | स्वाती दिनेश
सर्वांना मनापासून धन्यवाद,
स्वाती
27 Jul 2009 - 11:49 pm | मृदुला
लेख आवडला. स्वत: पुढाकार घेऊन ओळख करून घेतल्याचे कौतुक वाटले.
28 Jul 2009 - 6:50 am | वैशाली हसमनीस
मास्तर सगळीकडचे सारखेच,ह्या विधानाशी सहमत.
लेख आवडला,शाळेवर असल्यामुळे खास आवडीने वाचला.आपल्या शाळेची आठवण झाली.