याआधी: ले गई दिल 'दुनिया' जापानकी..३
क्योतो
क्योतो! जपानचे सांस्कृतिक केंद्र,प्रसिध्द क्योतो युनिवर्सिटी आणि जपानची जुनी राजधानी असलेलं एक देखणं शहर अशी ओळख घेऊन आम्ही क्योतोला गेलो.स्टेशनातच शहराच्या देखणेपणाची जाणीव व्हायला सुरूवात होते.क्योतो रेल्वे स्टेशनच मुळी ९ मजली आणि अत्यंत देखणं आहे.भव्य आणि कलात्मक!९व्या मजल्यावर एक ओपन टू स्काय रंगमंच आहे.
समोरच्या जिन्यांच्या पायर्यांवर प्रेक्षक बसतात आणि सरकते जिने आणि लिफ्टचा वापर प्रवासी करतात.तेथे कायमच कोणतेतरी सांस्कृतिक कार्यक्रम विनामूल्य चालू असतात. आम्ही गेलो तेव्हा 'हवाई उत्सव' चालू होता.हवाई कपडे, पानाफुलांच्या,शंखांच्या माळा ल्यालेल्या जपानी ललना लयीत नृत्य सादर करीत होत्या.एक ग्रुप जाऊन दुसरा येत होता.प्रत्येक गटाची वेशभूषा,केशभूषा वेगवेगळी होती , हवाई बेटांवरील वेगवेगळी वैशिष्ठ्ये दाखवणारी होती.मोठ्ठ्या घेराचे ,फुगाबाहीचे घोळदार लांब झगे,डोक्यात,हातात,गळ्यात फुलं आणि पानांच्या कलात्मक माळा! सार्या पन्नाशीच्या पुढच्या ललना! त्यांचं ते हवाई नृत्य पाहत बराच वेळ रमलो.
अतिप्राचीन शहर असलेले क्योतो इस. ७९४ ते १८६८ जपानची राजधानी होती आणि सम्राटाचे आवडते निवासस्थान.नंतर नवीन राजधानी वसविताना क्योतोची अक्षरे उलट करून 'तोक्यो 'हे नाव दिले. अनेक लढायात आणि युध्दात क्योतोवर हल्ले झाले,पडझड झाली. दुसर्या महायुध्दात तर क्योतो आम्लवर्षेचे भक्ष्य होती.क्योतोच्या रस्त्यांवरून चालताना दुकानादुकानातून त्या सुप्रसिध्द जपानी बाहुल्यांचे अनंत प्रकार पहायला मिळतात. किमोनो, युगाता घातलेल्या,वेगवेगळ्या भावछटा असलेल्या, अत्यंत आकर्षक पध्दतीने मांडलेल्या त्या बाहुल्यातील एक तरी आपल्या संग्रहात असाविशी वाटतेच वाटते. जपानमध्ये नऊ प्रमुख कॅसल्स आहेत.क्योतो ज्यू किवा क्योतो कॅसल हा त्यापैकी एक. इतिहासाच्या,गतवैभवाच्या खुणा जपत मोठया दिमाखात उभा असलेला देखणा क्योतो ज्यू जरा घाईतच पाहून आम्ही किंकाकुजी अर्थात गोल्डन पॅवेलियन कडे गेलो.
पूर्णपणे सोन्याच्या पत्र्याने मढवलेले ते रोकुओंजी किवा किंकाकुजी कितायामाच्या डोंगरमालिकेत वसलेले आहे. ते पाहताना अमृतसरच्या सुवर्णंमंदिराची आठवण होणे अपरिहार्यच ! क्योतो हेच मुळी सांस्कृतिक केंद्र आणि देखणे किंकाकुजी हे क्योतोचे सांस्कृतिक केंद्र! तिथे असलेला पक्षांचा किलबिलाट, पानाफुलांनी बहरलेले वृक्ष,समोरच्या पुष्करणीत दिसणारे आणि वार्याच्या झुळुकेने नाजूकपणे थरथरणारे किंकाकुजीचे प्रतिबिंब पाहत कितीतरी वेळ रेंगाळलो.
गिऑन उत्सवासाठी प्रसिध्द असलेल्या ह्या यासाका श्राइनमध्ये नवजात बालकांचे रजिस्ट्रेशन होते,आणि बरेचदा त्यांच्या आज्या आपापले पारंपारिक किमोनो लेवून बाळराजांना घेऊन तिथे येतात.अगदी पारंपारिक पैठण्या लेवून बाळाला पहिल्यांदा देवळात नेणार्या आपल्याकडच्या आज्या आणि या जपानी आज्यांमध्ये फरक तो काय?
आता पहायचे होते कियोमिझु टेंपल अर्थात प्युअर वॉटर टेंपल.इस.६५७ मध्ये दोशो या बौध्द भिक्कुने ते नावारुपाला आणले आणि पुढे इस. ७९८ मध्ये एनचिन या भिक्कुने त्याचे महत्त्व वाढविण्यात पुढाकार घेतला. १३९ पिलर्स आणि ९० क्रॉसबीम्स असलेले अत्यंत प्रशस्त आणि मजबूत दालन आणि व्यासपीठ भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देत उभे आहे.या मोठ्या दालनाच्या खाली असलेल्या तीन झर्यातून येणारे पवित्र पाणी पिण्यासाठी सारे रांगा लावतात.या मंदिराच्या आवारात अनेक श्राईन्स आहेत.जिसु जिन् जा हे त्यातील प्रसिध्द.प्रेम आणि जोडीदाराच्या लाभासाठी बरेच जपानीयेथे येतात.इथे १८ मीटर अंतरावर दोन प्रेमदगड आहेत आणि डोळे बांधून जो प्रेमवीर एका दगडापासून दुसर्या दगडाकडे जाईल त्याला प्रेमात सफलता मिळते असा जपानी समज आहे.
झुइगुडोचे मंदिर हाच एक मोठा अनुभव आहे. दाइ झुइगु ही बुध्दाची माता.(असे जपानी मानतात.तिथे बुध्दाचाही दाइ बुत्सु होतो.)मंदिरात आतमध्ये एक इच्छापूर्ती दगड आहे.त्या दगडावर संस्कृत मध्ये बुध्दमातेचे नाव लिहिले आहे. अतिकाळोखामुळे अर्थातच आपण ते वाचू शकत नाही आणि बॅटरी किवा तत्सम गोष्टी आत न्यायला बंदी आहे.मंदिरात शिरायच्या आधीच सांगितलं जातं अजिबात बोलायचं नाही,अत्यंत शांतता राखा,आत मिट्ट काळोख आहे.डाव्या बाजूला बांधलेला दोर पकडून,मन एकाग्र करून चालत रहा.आत उतरायला पायर्या आहेत.पायर्या संपतासंपता अंधाराला सुरुवात होते.हळूहळू अंधुकही दिसेनासे होते.मिट्ट काळोख फक्त उरतो.डोळ्यात बोट घातले तरी दिसत नाही.मन शांत करत,दोराला धरून पुढे जात रहायचं,सगळे विचार हळूहळू नाहीसे होतात.एका असीम पोकळीत आपण प्रवेश करतो.तो असतो आईच्या गर्भात केलेला प्रवेश.असेच चालत असताना एक अंधूक प्रकाशाची तिरीप दिसते.त्या तिरीपेत एक मोठा दगड दिसतो.तोच तो इच्छापूर्ती दगड! त्याला हात लावून आपली इच्छा व्यक्त करून प्रदक्षिणा पूर्ण केली तर म्हणे ती पूर्ण होते, असाही आणखी एक जपानी समज आहे.पण तिथपर्यंत पोहोचताना आपलं मन इतकं शांत झालेलं असतं,भौतिक जगाचा, तिथल्या सुखाचा, विवंचनांचा सार्यासार्याचाच विसर पडतो.एक असीम निख्खळ आत्मानंद घेऊन आपण परत त्या अंधारातून वाटचाल करीत बाहेर प्रकाशाकडे येतो.तमसो मा ज्योतिर्गमय ! हा संदेशच जणून त्या गर्भात मिळतो.अंधाराकडून प्रकाशाकडे! अज्ञानाकडून ज्ञानाकडे!
प्रतिक्रिया
15 Oct 2007 - 7:35 am | बेसनलाडू
नेहमीइतकाच रंजक झालाय. चित्रेही छान. पुढचे भागही येऊद्यात. वाचत आहोत.
(वाचक)बेसनलाडू
15 Oct 2007 - 7:51 am | प्रमोद देव
मी काल रात्री दिलेली ह्या लेखावरील प्रतिक्रिया उडालेली दिसतेय. हा काय प्रकार असावा ह्याचा पंचायत समितीने शोध घ्यावा अशी विनंती.
ह्या आधी 'राजें'च्या लेखावरचा माझा प्रतिसादही असाच उडाला होता.
कृपा करून "तुम्ही तो सुपूर्द केला नसावा' अशा तर्हेचे छापील उत्तर देऊ नये ही विनंती.
लेख संपादित करताना असा प्रकार घडत असावा असे मला वाटते आहे. कारण माझ्या प्रतिसादानंतर दोन्ही लेख 'अद्ययावत' केल्याचे आढळले. असे जर खरोखरीच होत असेल तर ते नेमके कशामुळे होत आहे हे इथले तज्ञ सांगू शकतील अशी अपेक्षा आहे आणि त्यावर तोडगाही काढू शकतील अशी खात्री आहे.
15 Oct 2007 - 8:59 am | कोलबेर
>>हा काय प्रकार असावा ह्याचा पंचायत समितीने शोध घ्यावा अशी विनंती.
सदर घटना अज्ञात तांत्रिक बिघाडामू़ळे होत असाव्यात असे मागेही पंचायत समीतीच्या श्री. विकास ह्यांनी स्पष्टीकरण दिले होते. पंचायत समिती ही तांत्रीक बाजू सांभाळण्यासाठी नसल्याने ह्या समस्या सोडवण्यास असमर्थ आहे.
श्री.नीलकांत हे एकटेच ह्या विषायातील जाणकार असून ह्या समस्येवर त्यांनाच उपाय करणे शक्य आहे, पण ह्या संकेतस्थळाची तांत्रीक बाजू सांभाळताना आजवरचे आपले व्याप सांभाळून त्यांनी दिलेले योगदान बघता ह्या समस्येवर त्यांनी वेळ मिळेल तसेच काम करावे असे मला वाटते. त्यांच्यावर अधिक भार टाकण्या पेक्षा ,महत्वाचे काहीही लिखाण इथे सुपुर्त करण्यापूर्वी त्याची एक प्रत काढून ठेवणे मला व्यक्तिशः अधिक तारतम्याचे वाटते.
>>कृपा करून "तुम्ही तो सुपूर्द केला नसावा' अशा तर्हेचे छापील उत्तर देऊ नये ही विनंती.
ह्या विधानामागील आपली भुमिका कळू शकेल का? आपल्याला ह्यापूर्वी कधी असा अनुभव (छापील उत्तर) आला आहे का?
15 Oct 2007 - 9:12 am | सहज
अजून इथे काही नको.
खरड, व्यं नि तिकडे.
15 Oct 2007 - 9:21 am | प्रमोद देव
कृपा करून "तुम्ही तो सुपूर्द केला नसावा' अशा तर्हेचे छापील उत्तर देऊ नये ही विनंती.
ह्या विधानामागील आपली भुमिका कळू शकेल का? आपल्याला ह्यापूर्वी कधी असा अनुभव (छापील उत्तर) आला आहे का?
अशा तर्हेचे उत्तर एका सदस्याला त्याच्या खरडवहीत अशाच एका तक्रारीबाबत दिलेले आढळले आहे म्हणून मुद्दाम तसे लिहिले आहे.ते उत्तर अधिकृत नसेलही पण प्रातिनिधिक जरुर म्हणता येईल.
मी केलेले विधान हे कुणाला दुखावण्यासाठी केलेले नसून त्याची गंभीरपणे दखल घ्यावी आणि अशा तर्हेचे प्रश्न इतरांना पडू नयेत म्हणून मुद्दामहून केलेले आहे ह्याची नोंद घ्यावी.
तांत्रिक अडचण असण्याची शक्यता गृहित धरूनच मी ते विधान केलेले आहे आणि जिथे आणि जसे जमेल तशी त्यात इथल्या तज्ञांनी(नीलकांत आणि जे कुणी असतील त्यांनी) त्याची दखल घेऊन तड लावावी इतकीच माफक अपेक्षा आहे.
बाकी काही तक्रार नाही ,आरोप तर नाहीच नाही . तेव्हा कृपया गैरसमज करून घेऊ नये ही विनंती.
15 Oct 2007 - 8:33 am | सहज
पहील्या ३ झुंझार खेळींनंतर हे एकदम नाबाद शतक बर का.
अतिशय नेटका लेख वाटला. काही जणांना माहीती (छान आहे म्हणून) अजून हवी असे वाटू शकते.
आवडला.
------------------------------------------------------------------------------------------
अवांतर - त्या प्रेमदगड किंवा आसपास वासू-सपना किंवा तत्सम नजरेस न पडल्याने विरस तर नाही ना झाला? :-) (श्लेश)
15 Oct 2007 - 8:46 am | विसोबा खेचर
स्वाती,
हाही भाग सुरेख झाला आहे..
विशेष करून किंकाकुजीचे चित्र क्लासच आहे, संग्रही ठेवावे असे आहे...
साधी, सोपी भाषा. लेख वाचून प्रसन्न वाटले..
तात्या.
15 Oct 2007 - 11:39 am | नंदन
हाही भाग आवडला. खासकरुन शेवटच्या परिच्छेदात केलेलं मन:स्थितीचं वर्णन.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
20 Oct 2007 - 2:24 pm | स्वाती दिनेश
इथे,खरडवहीत लेख आवडल्याचे सांगितलेत,सर्वांना मनापासून धन्यवाद.
स्वाती