ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. २२

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
1 Jul 2012 - 1:10 pm

याआधी: ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. २१

आमची जॉइंट फ्यामिली!

खरं तर जपानमध्ये जागेची तीव्र टंचाई आणि त्यामुळेच अगदी लहानशी घरकुले, दोन्ही हात पसरुन उभे राहिले की दोन्हीकडच्या भिंतींना हात लागतील अशी .. त्याच एका खोलीत सगळे काही, एक किचन कोपरा तर एका कोपर्‍यात न्हाणीघर असे खुबीने बसवलेले.. पलंगापासून सारे काही फोल्डिंग! अशा घरात राहण्याचे टाळून मोठे घर घ्यायचे तर येनच्या राशी ओतायला हव्यात. पण तिवारीसानमुळे यामाते टॉवर मधले तिसर्‍या मजल्यावरचे हे प्रशस्त घर मिळाले. तीन बेडरुम्स विथ अ‍ॅटॅच्ड बाथरुम्स, तीन बाल्कन्या, मोठा हॉल, किचन आणि डायनिंग हॉल.. एवढ्या मोठ्या घराचे भाडेही तसेच.. पण मग दिनेश आणि त्याचे दोन मित्र मिळून तेथे राहण्याचे ठरले आणि आमचे एकत्र कुटुंब तेथे नांदू लागले.

आम्ही दोघं, अविनाश आणि त्याची बायको सुप्रिया, विनीत, लेखा आणि त्यांची अबोली, अपूर्व असे सगळे आम्ही एकत्र राहू लागलो. सुप्रिया,लेखा आणि मुले फक्त सुटीसाठी महिनाभर आली होती . तर विनितचे आईवडिलही जपान पहायला म्हणून १५ दिवस आले होते. हे तिघे जण डबा घेऊन सकाळी कचेरीत गेले की आम्हा तिघींना दिवस मोकळा असायचा. मग आम्ही कधी दाइ याइ , कधी मोतोमाची, तर कधी कोबेच्या बंदरपर्यंतही भटकायला जायचो. कधी घरातच पत्ते खेळायचो, कधी सिनेमा बघत बसायचो.ब्रजेन आणि निलू आमच्या घरापासून जवळ अगदी १० मिनिटाच्या अंतरावर राहत असत. निलू पण बरेचदा आमच्या टोळीत सामील व्हायची. लेखाचा मस्तीखोर अपूर्व आणि बडबडी अबोली ही आमची दोन खेळणीच झालेली होती.

पण एवढी मंडळी, विशेषतः एका किचन मध्ये जास्त बायका एकत्र आल्या की भांड्याला भांडे लागणारच. त्यात लेखा आणि सुप्रियाचे स्वभाव भिन्न, स्वयंपाकाच्या पध्दती भिन्न, कधीकधी त्या दोघींची नोकझोक होत असे. पण त्याचा जास्त बाऊ न करता त्या दोघींना एकमेकींच्या कामात ढवळाढवळ न करता सर्वांनी एकमेकांना धरुन रहाण्यासाठी त्यांना समजवावे लागे. कारण परदेशात अगदी एकटे राहण्यापेक्षा ही छान सोय होती. आम्हाला एकमेकींची सोबत होती.

त्याकाळी जपानमध्ये इंग्रजीतून संगणक फार कमी असत, लॅपटॉप हा प्रकारही नवीन होता, इंटरनेटचा वापर कमी होता.टीव्हीवरती फक्त जपानी चॅनेले दिसत आणि त्यावेळी डीव्हीडी तर नव्हत्याच पण व्हीसीडीसुध्दा अगदी नवीन होत्या. रेड्डीआंटींकडे हिंदी सिनेमांच्या कॅसेटांचा संग्रह होता. त्यांनी तो आमच्यासाठी खुला केला होता. टीव्हीवर दिसणार्‍या फक्त जपानी चॅनेलांपेक्षा हा बदल आम्हाला कधीकधी बरा वाटे.

आमच्या खालच्या मजल्यावर मीरा नावाची एक दाक्षिणात्य महिला आणि तिचा ८-९ वर्षांचा मुलगा ,अमित राहत होते. मीरा कोबेमधील स्टेट बँकेत मॅनेजर होती. मीरा दाक्षिणात्य असल्याने तिच्याकडे नेहमी इडली, डोसे असत. अमित भारी मस्तीखोर मुलगा होता. त्याला इडल्या खायचा कंटाळा आला की तो चक्क खिडकीतून त्या खाली फेकून देई. मीराला ते समजत नसे पण तिच्या किचनच्या बरोबर वर असलेल्या आमच्या बाल्कतीतून ते बरोबर समजत असे. आम्ही तिघी बायका तेथे काही काळासाठीच गेलो होतो. एरवी तेथे हे तिघे मित्रच राहत होते. एकदा असंच अमितने इडल्या बाहेर टाकलेल्या बघून दिनेश किवा अविनाश म्हणाला, हे लोक आपल्या वरच्या मजल्यावर रहायला हवे होते म्हणजे इडल्या झेलायला एक नेट लावले असते. आमचा बाल्कनीतला हास्यकल्लोळ ऐकून अमित कावराबावरा होऊन वरच्या बाजूला पाहू लागला. थोडक्या काळासाठी आल्यामुळे आमच्याकडे मिक्सर, इडलीस्टँड वगैरे नव्हता. मग कधी ती वाटलेले इडलीचे पीठ द्यायची तर कधी मिक्सर .. तर कधी गप्पा मारायला वर आमच्याकडे येताना इडल्या घेऊन यायची. आणि पहिल्या मजल्यावर शिवानी शेट्टी राहत असे. प्राची साचन तिच्याबरोबरच आसे.त्या दोघीही कधीकधी गप्पा मारायला येत असत. मीरा आणि त्या दोघी कायम एकत्र असत. त्यांचीही एक जॉइंट फॅमिलीच झालेली होती म्हणा ना!

आमचे मालक रेड्डी दांपत्य यामाते टॉवरच्याच ८व्या मजल्यावर राहत असत.यामाते टॉवरच मुळी त्यांच्या मालकीचा होता. हे सुप्रसिध्द गेलॉर्ड रेस्तराँच्या चेन मधील एक पार्टनर,अतिशय विनम्र ! दुसरे महायुध्द संपल्यावर रेड्डीअंकल, त्यावेळी १८-२० वर्षांचा असणारा एक तरुण मुलगा जपानला आला आणि त्याने अथक परिश्रमांनी हे साम्राज्य उभे केले. नंतर ५-६ वर्षांनी लीलाआंटीशी लग्न करुन त्यांना इथे घेऊन आले. आंटीना ना भाषा येत होती, ना इथली काही माहिती होती.. त्यांनीही भाषा शिकून नवर्‍याच्या व्यवसायात हातभार लावायला सुरुवात केली. आम्ही त्यांच्या तिथे रहायला गेल्यावर त्या खूपदा गप्पा मारायला येत नाहीतर आम्हाला त्यांच्याकडे बोलावत.लेखा आणि सुप्रिया भारतात परत गेल्यावर तर रेड्डीआंटी मी एकटी आहे हे जाणून अनेकदा हाक मारत. दुपारी त्याही एकट्याच घरी असत. मग अनेकदा आम्ही दोघी एकत्र जेवत असू, फिरायला जात असू किवा सिनेमाही कधीकधी बघत असू. कधीकधी रेड्डींकडे सगळ्यांची मेहेफिल जमायची. एकत्र जेवण, गाणी, गप्पा व्हायच्या.ते ३५-४० वर्षे तेथे राहत असल्यामुळे जपानबद्दलच्या,जपानी लोकांबद्दलच्या माहितीचा खजिनाच त्यांच्या गप्पांमधून मिळत असे.

प्रवासलेख

प्रतिक्रिया

सहज's picture

1 Jul 2012 - 1:27 pm | सहज

कमालीचा योगायोग हाच आहे की ताटात असलेला प्रत्येक पदार्थ संपवलाच पाहीजे अश्या पारंपारीक शिकवणीचा शिकार असलेल्या मला, जास्त झालेले, न आवडलेले अन्न असेच खिडकी/ बाल्कनीच्या जवळ जाउन फेकून द्यायचे हे मला शिकवणार्‍या माझ्या मित्राचे नाव अमित...

:-)

गणपा's picture

1 Jul 2012 - 1:43 pm | गणपा

ओघवतं लिखाण आवडलं ग स्वातीताई. :)

निवेदिता-ताई's picture

1 Jul 2012 - 3:56 pm | निवेदिता-ताई

स्वाती --- छान लिहिले आहेस....आवडले...:)

मुक्त विहारि's picture

1 Jul 2012 - 4:00 pm | मुक्त विहारि

छान माहिती..

प्रभाकर पेठकर's picture

1 Jul 2012 - 5:19 pm | प्रभाकर पेठकर

सहज, सुंदर गप्पा...

छायाचित्रांखाली नांवे दिली असती तर कथेतील पात्रांचा परिचय झाला असता. तसेच, जापानच्या छायाचित्रांचेही स्वागत होईल.

शुचि's picture

1 Jul 2012 - 10:11 pm | शुचि

छान गप्पा.

सुनील's picture

1 Jul 2012 - 11:18 pm | सुनील

सुरेख. पण हा भाग अगदीच त्रोटक झाला. जरा मोठे भाग येऊदेत.

कुंदन's picture

2 Jul 2012 - 2:08 pm | कुंदन

आता एकदा विकांताला सगळे भाग सुरुवातीपासुन वाचुन काढीन.

मस्त! एकुणच बहुरंगी गोतावळा जमा झाला होता तर

तुम्हि आमच्या सोबत तुमचे अनुभव शेअर करता त्याबद्दल धन्यवाद.