ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. २१

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
21 Jun 2012 - 10:13 pm

याआधी: ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. २०

कुसुम होंबा

जपानमध्ये येऊन आठ दहा दिवस झाल्यावर बरोबरचा शिधा संपत आला. आता डाळी, तांदूळ, मसाले, कणिक इ. पदार्थ कुठे मिळणार याची विचारणा कशी आणि कुठे करायची ह्याचा विचार सुरू झाला. निशिवाकीसानने 'इंडियन प्रोव्हिजन स्टोअर'चा पत्ता दिला. शियोयाहून साननोमियाला उतरुन इंडियन प्रोव्हिजन स्टोअर ची इमारत शोधणे काही फार कठिण नव्हते. स्टेशनपासून ५-६ मिनिटाच्या अंतरावर एका मोठ्या श्राइनसमोरच्या इमारतीत पहिल्या मजल्यावरच्या एका भागात हे भारतीय वस्तू भांडार आणि दुसर्‍या भागात आहे कुसुम होंबा म्हणजे तिवारीसानचे उपहारगृह! तर उरलेल्या भागात त्याचे कुटुंब राहते. तिवारीसान, त्याची बायको कुसुम, मुलगा , शुक्लाजी म्हणजे त्याचा मेव्हणा,मेव्हणी आणि त्यांची मुले. सुमारे ५० वर्षांपूर्वी तिवारीसानच्या वडिलांनी जपानमध्ये येऊन भारतीय मसाले आणि इतर पदार्थांचा व्यापार सुरू केला आणि त्यांनी सुरू केलेले हे इंडियन प्रोव्हिजन स्टोअर आजही अग्रगण्य आहे. घरगुती वापरासाठी आणि आजूबाजूच्या भागातील अनेक भारतीय, पाकिस्तानी रेस्तराँ किराणासामानासाठी तिवारीसानवरच अवलंबून असतात. साधारण ३० एक वर्षांपूर्वी तिवारीसानच्या वडिलांना हार्ट अ‍ॅटॅक आला आणि मग सगळा भार ए. के. तिवारीने आपल्या शिरावर घेतला. किराणासामान विकण्याबरोबरच बायकोच्या नावाने खानावळही सुरू केली .स्वतः तिवारीसान, कुसुमभाभी, त्यांची बहिण (तिचे नाव विसरले) व तिचे पती शुक्लाजी असे सगळेच सुगरण बल्लव असल्याने आणि चविष्ट पदार्थ वाजवी दरात विकत असल्याने ह्या घरगुती खानावळीने बघता बघता रुप पालटले आणि कुसुम होंबा आज कोबे परिसरातील एक मान्यवर रेस्तराँ म्हणून नावारुपास आले आहे. मध्यंतरी ऐकले की तिवारीसान अजून एक नवे उपहारगृह काढत आहेत.

इमारतीत आत शिरत असतानाच मसाल्यांचा घमघमाट यायला सुरुवात होते. जिना चढून वर गेले की चोहोबाजूंनी रचलेल्या खोक्यातून आणि पोत्यांतून वाट काढत आत जायचे. आतमध्ये एका प्रशस्त खुर्चीवर साधारण सहा फूट उंचीचा आणि तशाच घेराचा पांढराशुभ्र कुर्ता आणि धोती ल्यालेला तिवारीसान बसलेला असतो, नितिन मुकेशची आठवण यावी असा एकंदर अवतार! त्याच्या समोर टीपॉय, ते टीपॉय झाकणारं त्याचं पोट आणि पोटावर एका घमेल्यात ढोकळा नाहीतर समोसे, भजी असे काहीतरी. हातात एक काठी. त्या काठीचा उपयोग दिवा, पंखा, खिडकी उघडणे, बंद करणे इ. साठी.. आपण विचारले चावल किवा दाल कहाँ है? की त्याचे उत्तर जरा दहिनी बाजूके रॅकमे उप्पर देखो, वही होंगे.. मग आपण काय तांदूळ, डाळ,मसाले, आटा जे हवे असेल ते तेथून काढून घ्यायचे. अगदीच नाही सापडले आपल्याला तर मग तो हाक मारणार, शुक्लाजी.. की बाजूच्या खानावळीतून शुक्लाजी येऊन आपल्याला हवी ती वस्तू देणार. पण ह्या तिवारीसानच्या बोलण्यात मिठास आणि नवीन आलेल्या भारतीयांना मदत करायची तयारीही..

अशा तिवारीसानची पहिली भेट जेव्हा झाली तेव्हा कोण ,कुठले,कुठे काम करता? कुठे राहता? अशी सगळी विचारणा करुन मँगोज्यूस ,समोसे अशी सरबराई केली आणि मग काय मसाले,डाळी हवे आहे ते विचारले. एकीकडे इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या. मध्येच तो एकदम खूष झाला. आता ह्याला काय झाले एकदम? हा चेहर्‍यावरचा भाव वाचल्यासारखा तो दिनेशला मिस्किलपणे उत्तरला, तुझ्या टीशर्टमधून बाहेर डोकावणारे जानवे बघून मी खूष झालो आहे. पुढे चांगली ओळख झाल्यावर तो एकदा म्हणाला की 'कुसुम होंबा' शुध्द शाकाहारी आहे पण त्याला लहर आली की तो कधी कधी चिकन,मटण बनवतो. त्यासाठी त्याची वेगळी भांडी, वेगळा स्टोव्ह आहे आणि तुम्हाला कधी इच्छा झालीच तर फोन करा फक्त,माझ्यातर्फे तुम्हाला पार्टी!

जेव्हा त्याला समजले की आम्ही जागेच्या शोधात आहोत तेव्हा आपणहून त्याने मदतीचा हात पुढे केला एवढेच नव्हे तर यामामातोदोरी भागातल्या यामाते टॉवर मध्ये जागा रिकामी असल्याची बातमीही पुरवली . एवढेच नव्हे तर त्या बिल्डिंगच्या मालकांशी , रेड्डीअंकलशी गाठही घालून दिली आणि हे सगळे पैचीही अपेक्षा न करता वर आम्हालाच समोसे खायला घालून आणि स्वतःकडचे जुने वॉशिंग मशिन आणि फ्रिज देऊ करुन! नुसतेच दिले नाही तर मशिने एक एक करुन बरोबर घेऊन आला. इथे कुठले हमाल? आपणच कुली.. म्हणून स्वतः एका बाजूने हात लावला आणि रस्त्यावरून मशिने, तिवारीसान आणि आमची वरात यामाते टॉवर पर्यंत आली. त्यानेच ती यंत्रे घरात आणून, लावून, व्यवस्थित चालू करुन दिलीकोणतेच काम हलके नसते हे आपले पुस्तकात वाचायला आणि सिनेमात बघायला ठिक आहे पण अशी ओझी घेऊन तो स्वतः मदतीला उतरला.

तिवारीसानच्या दुकानात गेले आणि हव्या त्या वस्तू घेऊन लगेच परत आले असे कधीच झाले नाही. तो हटकून थांबवून गप्पा मारायचा. युपीमध्ये त्याने शाळा काढली होती. फक्त मुलींसाठी हॉस्टेल काढले होते. त्याची वहिनी,काकू ते पाहतात. तिथल्या स्थानिक राजकारणात त्याला भारी रस होता आणि तिकडे काय घडामोडी चालल्या आहेत याकडे त्याचे जपानमधून लक्ष असायचे. जपानला भूकंप नवीन नाही पण १९९५सालचा कोबे परिसरात झालेला भूकंप गंभीर स्वरुपाचा होता. सारे काही जमिनदोस्त झाले. दोन रात्री तिवारीसानही बायकोमुलांसकट रस्त्यावर राहिला होता. सारेच जण रस्त्यावर आले होते. तेथील इतर जपान्यांप्रमाणे तिवारीसाननेही मदतकार्यात भाग घेतला होता. अशा अनेक कथा तिवारीसान ऐकवायचा, त्या ऐकताना समोसा नाहीतर ढोकळा खायला घालायचा म्हणजे त्याच्याकडे जाऊन साधे तांदूळ नाहीतर डाळ आणायची असली तरी तासदोनतास सहज मोडायचे.

आमचा एक मित्र ब्रजेनबाबू (हो, तोच तो रबडीवाला..) त्याचा कसलासा उपास होता. बरं , उपासाला ह्याला साधे मीठ चालणार नव्हते, सैंधवच हवे होते. आता उपासाला साधे मीठ का चालणार नव्हते? असा मला पडलेला प्रश्न त्याने ऐकून न ऐकल्यासारखा केला. इथे परदेशात उपास बिपास कसले करतोस? ह्या प्रश्नावर तर मी परग्रहावरुन आल्यासारखा चेहरा केला त्याने. उपास आहे ना तुझा, मग नुसती दूध,फळे खाऊन रहा. हा माझा सल्ला तर त्याने पार धुडकावूनच लावला. शेवटी तिवारीसानला विचारु सैंधव आहे का? असे म्हणून त्याच्याकडे गेलो. तिवारीसान म्हणे सैंधव आहे माझ्याकडे पण मी मीठ विकणार नाही, तुला नुसतेच देतो. ब्रजेन म्हणे मी नुसते नाही घेणार, मी पैसे देणार.. नमकका मामला है! १५-२० मिनिटे दोघे हुज्जत घालत बसले. शेवटी दिनेश म्हणाला तिवारीसान, आप मुझे सैंधव दिजिए, मै ब्रजेनको दूंगा और ब्रजेन तू मुझे पैसे दे दो फिर वो पैसे मै मंदिरमे रख आता हूँ। आणि एकदाचा तो प्रश्न सोडवला.

असे एकेक अनुभव गोळा करत तेथले दिवस मजेत जात होते.

प्रवासलेख

प्रतिक्रिया

हा भाग आवडला. चांगले होते ते तिवारीसान खरच. बाकी कोबे आणि होंबे वगैरे शब्दांचा गोंधळच होईल.

तर्री's picture

21 Jun 2012 - 11:06 pm | तर्री

आवडेश.

jaypal's picture

21 Jun 2012 - 11:16 pm | jaypal

वाचताना ते वाचतो आहे अस कधी वाटलच नाही. अस वाटत की कथा कथनाचा प्रयोग रंगला आहे. सुंदर हा भाग देखिल मस्तच.

खरंच मनावर घेऊन ही लेखमाला पुढे लिहायला सुरवात केल्याबद्दल धन्स. :)

रेवती's picture

21 Jun 2012 - 11:22 pm | रेवती

अगदी छान, घरगुती वातावरण नजरेसमोर आले.
पुढील लेखनाची वाट पहात आहे.
तुझे लेखन म्हणजे मेजवानीच असते.

सर्वसाक्षी's picture

21 Jun 2012 - 11:50 pm | सर्वसाक्षी

आज बर्‍याच दिवसांनी स्वातीचा लेख वाचला. छान.तिवारीसानचा फोटो टाकला असता तर बघायला मिळाले असते.

छान.
थोडक्यात जपानमधले भारतीय सुद्धा लोकांना मदत करण्यात कमी नाहीत.

निसर्ग वगैरेंपेक्षा आजुबाजुच्या नेहमीच्या जागांचे (लोकं असतानाचे) फोटो बघायला मला जास्त आवडतात. असो.

सुनील's picture

21 Jun 2012 - 11:59 pm | सुनील

अरे वा. वर्षभराच्या गॅपनंतर पुन्हा लेखमाला सुरु केल्याबद्दल धन्यवाद. आता पुढील भाग पटपट टाका.

सहज's picture

22 Jun 2012 - 4:36 am | सहज

हेच म्हणतो.

तिवारीसानचे व्यक्तीचित्रण आवडले.

श्रीरंग_जोशी's picture

22 Jun 2012 - 4:43 am | श्रीरंग_जोशी

व्यक्तिचित्रे फारच परिणामकारकरीत्या रंगवली आहेत.

अमेरिकेतही भारतीय व पाकिस्तानी दुकानदारांकडून चांगले अनुभव मिळाले आहेत नेहमीच.

प्रर्दीर्घ विश्रांतीनंतर लेखन तितकंच दमदार!

पुनरागमन केल्याबद्दल अभिनंदन आणि आभार. आता चालू ठेवा.

जयंत कुलकर्णी's picture

22 Jun 2012 - 9:04 am | जयंत कुलकर्णी

मस्त !

मृत्युन्जय's picture

22 Jun 2012 - 10:19 am | मृत्युन्जय

हाही भाग मस्तच. स्वतीतैंना मुहुर्त सापडला हे विशेष. बादवे. या प्रचंड लेखमालेवर तुम्हाला पुस्तक काढता येइल यावर तुम्ही विचार केलेला असेलच. नसेल केला तर आता करा. मस्त पुस्तक होइल.

विनीत संखे's picture

22 Jun 2012 - 5:25 pm | विनीत संखे

अगदी अगदी. पुस्तकाच्याच प्रतीक्षेत.

है शाब्बास!
आता कशी गाडी पुना चालु झाली.. हा भाग आवडणार होताच :)
आता पुढल्या भागाला वेळ नको

परिकथेतील राजकुमार's picture

22 Jun 2012 - 12:11 pm | परिकथेतील राजकुमार

स्वातीतै चे लिखाण म्हणजे मेजवानी.

फटूंची उणीव जाणवली.

जिलब्यांच्या आणि हितोपदेशांच्या धाग्यात हा धागा हरवल्याने दिसलाच नव्हता.

योगप्रभू's picture

22 Jun 2012 - 2:31 pm | योगप्रभू

स्वाती,
व्यक्तीचित्र छान खुलवले आहे. माणसे वाचायची नजर आहे तुम्हाला. लिहित्या राहा..

छान वाटला तिवारीसान. पण हे अस नाव का? जापनिज केलय का?

माझ्या माहितीप्रमाणे 'सान' म्हणजे हिंदीतलं 'जी'. त्या तिवारी'जी' चं तिवारी'सान' झालं असावं.

बाकी लेख एकदम आवडेश. पुभाप्र.

पैसा's picture

22 Jun 2012 - 8:08 pm | पैसा

लेखात इतकी गुंग होऊन गेले की कधी संपला कळलंच नाही! फार छान!

नंदन's picture

23 Jun 2012 - 3:14 am | नंदन

लेख आवडला. शेवटची उपवासाबद्दलची प्रश्नोत्तरं आणि मिठाचे पैसे हा भागही रोचक :)
पुढील भागांची वाट पाहतो.

जाई.'s picture

23 Jun 2012 - 7:45 am | जाई.

छान लिहीलय

स्वाती दिनेश's picture

26 Jun 2012 - 10:40 pm | स्वाती दिनेश

सर्वांना धन्यवाद,सोत्रि आणि अशोक कुलकर्णींचे जपानवरचे लेख वाचून ही मालिका पूर्ण करण्याची सुरसुरी आली म्हणून त्या दोघांचे विशेष आभार.
तिवारीसानचा फोटो आत्ता माझ्याकडे उपलब्ध नाही,:( मिळवून येथे देण्याचा प्रयत्न करेन.
जपानीतील 'सान' म्हणजे हिंदीत जसे आदरार्थी 'जी' वापरतात तसेच, जपानी फक्त व्यक्तीच नव्हे तर प्राणी आणि नद्या डोंगरांनाही सान लावतात. उदा- पेंग्विनसान, फुजीसान इ.
पुढचा भाग लवकर लिहिण्याचा प्रयत्न करते.:)
स्वाती

सोत्रि's picture

27 Jun 2012 - 12:05 am | सोत्रि

मस्तच!
मजा आली वाचताना, जपानमधले दिवस आठवले.

- (जपानी) सोकाजी

विलासराव's picture

28 Jun 2012 - 6:10 pm | विलासराव

काल आणी आज संपूर्ण लेखमाला वाचली.
फोटो आणी खास करुन लेखनशैलीमुळे अतिशय आवडली.
घरबसल्या जपान फिरवून आणल्याबद्दल धन्यवाद.
आणी हो वाचनखुणही साठवली आहे.

लैच भारी!!!! वाचनखूण साठवल्या गेली आहे :)