नागांव …. माझं सर्वात आवडते ठिकाण

आनंद भातखंडे's picture
आनंद भातखंडे in जनातलं, मनातलं
21 Aug 2012 - 2:26 pm

(जानेवारी २०१२ मध्ये माझ्या नागावातील घराबद्दल लिहिलेला लेख मिपाकरांसाठी देत आहे)

नागांव …. माझं सर्वात आवडते ठिकाण. मुंबई ला जवळ, शनिवार/रविवार प्रचंड गर्दी असलेला one day picnic spot. पण या कारणासाठी नागावची ओढ नाही. तर ओढ आहे ती या मातीची, निसर्गाची … तिथल्या सगळ्याचीच. नागांव चे वास्तव्य म्हणजे मला लागलेलं एक व्यसनच आहे म्हणा हवे तर. दोन महिने तिथे गेलो नाही तर जीव घुटमळत होता. शेवटी १३ जानेवारीच्या रात्री जायचा योग आला …. तसा तो ओढून ताणूनच आणला.
बऱ्याच कामांना टांग दिली आणि गाडी रेमटवत रात्री १२:३० ला बंगल्याच्या आवारात पोचलो. कर्नाळा परीसरापासूनच थंडीची जाणीव तीव्र झाली होती. त्यामुळे गाडीतील खिडक्यांच्या काचा बंद होत्या तरी आतमध्ये सगळे स्वेटर, शाल पांघरून बसले होते. नागावात घरी आल्यावर तर थंडी अधिकच जाणवत होती. कडाक्याची थंडी काय असते याचा अनुभव घेत होतो. गाडीतले समान घरात घेतले आणि सगळी दारे खिडक्या बंद करून निवांत झालो. रात्री १२:३० ला इतक्या थंडीत आणि अंधारात सुद्धा माझ्या बागेत फेरफटका मारायचा मोह मला टाळता आला नाही. कुणीच कंपनी द्यायला तयार नसल्याने शेवटी मीच पायात चपला घालून घरच्या बाहेर पडलो. मस्त थंडी अंगावर काटा आणत होती. दूर वरून येणारा समुद्राच्या लाटांचा लयबद्ध आवाज, पानांची होणारी नाजूक सळसळ रात्रीच्या प्रहरातील कुठल्याश्या रागाशी सांगड घालत सुरांचे आवर्तन पूर्ण करत होती. मस्त एक फेरफटका मारून ताजातवाना झालो. चार पाच जाडजूड पांघरूण घेउन छोटी आर्या आणि तिची आई तर कधीच स्वप्नांच्या दुनियेत रममाण झाली होती. मग मी पण शांतपणे झोपी गेलो.
शनिवारी सकाळी लवकरच म्हणजे ८ वाजता आपोआप जाग आली …. कुठलाही गजर न लावता. …. शनिवारी, म्हणजेच सुट्टीच्या दिवशी ८ वाजता जाग येणं कठीणच. डोंबिवलीत असतो तेंव्हा १० शिवाय उठत नाही आणि ते सुद्धा टाळ मृदुंगांच्या साथीने जेंव्हा बायको गजर करेल तेंव्हाच. पण नागाव मध्ये असताना असं होतं नाही …. निकोप प्रदूषण मुक्त हवेमुळे शरीरातील थकवा लवकर नाहीसा होतो. सकाळी परत बागेला फेरफटका मारणं हेच तेथील नित्यकर्म …… फिरता फिरता सकाळचा पहिल्या धारेचा ऑक्सिजन भरून घ्यायचा आणि मग दिनक्रमाला सुरुवात करायची हाच तेथील शिरस्ता. बागेत फिरायला निघालो आणि तितक्यात माझं पिल्लू पण माझ्या पाठून चपला घालून तयार. बागेचं निरीक्षण आणि आर्याच्या प्रश्नांना उत्तरं देता देता अर्धा पाऊण तास कसा निघून गेला तेच कळलं नाही. बरेचवेळा मला असं वाटत की झाडं माझ्याबरोबर गप्पा मारतात. गेट वरचा पळस म्हणत असेल “बरं झालं तू माझी नीट निगा राखलीस नाहीतर २ वर्षांपूर्वीच मी संपलो असतो”. केळी म्हणत असतील “काय रे शहाण्या एकटाच केळी खातोस म्हणून जाडजूड झाला आहेस … थोडी माझ्या नातीला पण देत जा”. नारळ म्हणत असतील “नंदू शेठ या वेळी शहाळी नाही मिळणार …. पाडेकरी मागल्याच आठवड्यात नारळ घेऊन गेला”. २ महिन्या पूर्वी नवीन लावलेल्या सुपाऱ्या म्हणता असतील “आत्ता वेळ झाला या टवाळ्याला …. दोन महिने साधी दखल पण नाही घेतली आमची …. आम्ही आहोत का मेलोत”. ५-६ वर्षे वयाच्या कलमी आंब्याचा डोळ्यात कारुण्य आणि अपराध्याची भावना होती …. “इतके वर्ष झाली तरी मी यांना साधा एक आंबा पण देऊ शकलो नाही …. या वर्षी पण मोहोर नाही” मी त्याच्या खोडावरून हात फिरवला आणि त्याच्या डोळ्यात समाधान बघितले. हा आमचा संवाद चालू असतानाच …..
कीर्तीने गरमागरम चहाची हाकाटी केली आणि मस्त अंगणात बसून चहाचा आस्वाद घेतला, बरोबर आणलेले चकणा आयटम खाल्ले. आणि मी, कीर्ती, अमित आणि तृप्ती असा गप्पांचा फड रंगात आला. परसातील फुले तोडून आणली …. अंघोळ करून पूजाअर्चा केली. आर्या बरोबर मस्ती आणि टिवल्याबावल्या करण्यात वेळ कसा निघून गेला ते कळलंच नाही.
संध्याकाळी समुद्रावर मस्त धम्माल केली. पाण्यात डुंबलो, वाळूत खेळलो. स्पीड बोटिंगचा थरार अनुभवला. थंडी परत पसरायला लागली आहे याची जाणीव आर्याच्या कडकड आवाज करणाऱ्या दातांनी करून दिली. घरी पोहोचे पर्यंत अंधार झाला होता. रात्रीच्या जेवणाची तजवीज मला आणि अमितला अलिबाग ला जाऊन करायची होती. मस्त पावभाजी घेऊन आलो. आधी विचार होता मस्त अंगणात जेवायला बसायचं पण पांघरूण घेऊन जेवता येत नसल्या मुळे घरातच जेवण उरकलं. शेकोटी करायची म्हणून काही लाकडे आधीच जमवून ठेवली होती …. पण तो बेत सुद्धा बारगळला. थंडी कुठल्या कुठे पळवून लावणारे औषध आणले होते पण त्याचाही काही विशेष फायदा झाला नाही. आणि उद्या परतीच्या प्रवासाला लागायचे त्यामुळे शक्य तितका त्रासिक चेहेरा करून परत पांघरुनांच्या दुलईत झोपी गेलो.
रविवारी सकाळी उठून परत नित्यकर्म चालू … पण आज त्यात कालचा जोश नव्हता. बागेतून फेरफटका मारला पण कुणीच बोलत नव्हतं …. जणू त्यांना माहित होतं की आज मी परत जाणार …. परत भेट केंव्हा ते माहीत नाही. एक म्हातारं नारळाचं झाड म्हणत होतं “तू येऊन गेलास की इथे कुणीच येत नाही …. कुणीतरी येऊन आम्हांला पाणी पाजून जातो इतकंच” मी काहीच बोललो नाही. तितक्यात एक अनाहूत वेल म्हणाली “कशाला जातोस परत ??? काय ठेवलंय त्या शहरात?? तू इथे ये आम्ही सगळं भरभरून तुला देऊ ….” पुढचे शब्द ऐकायला मी थांबू शकलो नाही. जड पावलानी घरात आलो …. कालची जी ENERGY होती ती कुठेच जाणवत नव्हती. शक्तिपात झाल्यासारखे वाटत होते. तीच पानांची सळसळ, तोच समुद्राचा आवाज आणि तेच पक्षांचे गुंजारव पण माझे कान बहिरे झाले होते. कीर्तीला म्हटलं मी समान गाडीत टाकतो तू घर बंद कर …. निघायला हवं नाहीतर “उशीर” होईल ….

कथाप्रवासवावरराहती जागासाहित्यिकजीवनमानराहणीमौजमजाविचारलेखअनुभवमाहितीआस्वादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

आनंद साहेब , फार सुंदर लेख आहे.
माझ आजोळ आहे अलिबाग. त्यामुळे अलिबागला आल की नागावला येण होतच मग पुढे चौल व रामराज ला जाण होत.

नागाव खरच फार सुंदर आहे.
फारच सुंदर लेख

नि३सोलपुरकर's picture

21 Aug 2012 - 3:58 pm | नि३सोलपुरकर

वाह.. नंदू शेठ!
सुंदर लेख आहे.(नागाव ही खरच फार सुंदर आहे)

अवांतर : नंदू शेठ! हेवा वाटतोय तुमचा

चौकटराजा's picture

21 Aug 2012 - 4:02 pm | चौकटराजा

नागाव ला माझे दोन होस्टल मित्र अरूण बर्वे व दिलीप कुंटे लहानाचे मोठे झाले. त्यांचे कडून गावाबद्द्ल ऐकायचो. राहायचा योग मात्र चौल मधे आला. पण एकंदरीत येरिया लई सुंदर ! आपला लेख छान !

चौकटराजा's picture

21 Aug 2012 - 4:02 pm | चौकटराजा

नागाव ला माझे दोन होस्टल मित्र अरूण बर्वे व दिलीप कुंटे लहानाचे मोठे झाले. त्यांचे कडून गावाबद्द्ल ऐकायचो. राहायचा योग मात्र चौल मधे आला. पण एकंदरीत येरिया लई सुंदर ! आपला लेख छान !

रमेश आठवले's picture

22 Aug 2012 - 1:04 pm | रमेश आठवले

-फिरता फिरता सकाळचा पहिल्या धारेचा ऑक्सिजन भरून घ्यायचा-
काय मस्त कल्पना आहे !!
नागाव हे आपले मूळ गाव आहे असे आजोबांनी सांगितले होते. तेथे जाण्याचा योग मात्र आलानाही आणि आता संभवही नाही. हि खंत आपल्या सुरेख वर्णनाने काही अंशी दूर झाली.
धन्यवाद

चिंतामणी's picture

26 Aug 2012 - 10:08 pm | चिंतामणी

असे वाचल्यावर आम्ही पामर फक्त हम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म एव्हढेच म्हणू शकतो.

पैसा's picture

26 Aug 2012 - 10:30 pm | पैसा

लेख आवडला.