योगशिबीरातले दिवस २: योगाभ्यास- A man is as old as his spine is flexible

आर्या१२३'s picture
आर्या१२३ in जनातलं, मनातलं
21 Nov 2016 - 3:58 pm

मागच्या लेखात शिबीराची ओळख, दिनचर्या सांगितली . या लेखात शिबीरात काय काय शिकलो हे थोडक्यात सांगत आहे. अर्थात शेवटी, केंद्रातले व्यासंगी, प्रगल्भ वक्ते हे सगळे अतिशय प्रभावीपणे अगदी सहजगत्या उलगडुन सांगतात. तिथले प्रदुषणमुक्त वातावरण, आहार-विहार आणी मुख्यतः सामुहिक साधनेचा खुप फरक पडतो. सकारात्मक स्पंदने मिळतात.
अष्टांग योगात यम नियम वगैरे असतात हे आपण वाचले/ऐकले आहे. पण यम नियम म्हणजे तरी काय, याबद्दल जे आम्हाला सांगितले ते इथे मुद्द्यानिशी मांडतेय . यातही ८ पैकी पहिल्या ५ बहिरंग योगावरच इथे सांगणार आहे.

नुसता प्राणायाम किंवा धारणा, ध्यान, समाधी हे इतके स्वतंत्र , विस्तृत विषय आहेत की ते त्या त्या वक्त्यांकडून ऐकणे हीच एक मोठी पर्वणी ठरेल!
*****

पातंजलयोगसुत्रात- १९५ सुत्रे आहेत.
सुत्र- सुत्र म्हणजे सायंटीफीक फॉर्म्युला. कमित कमी अक्षरात जास्तीत जास्त ज्ञान

अष्टांग योग- या ८ योगाच्या पायर्या नसुन ही योगाची अंगे आहेत.
महर्षी पातांजलीच्या अष्टांग योगातल्या ८ सुत्रांपैकी
१)यम
२)नियम
३) आसन
४) प्राणायाम
५) प्रत्याहार
हा बहिरंग योग आहे. जो अ‍ॅक्शन पार्ट म्हणजे साधना आहे. यातले महत्वाचे अंग म्हणजे प्राणायाम.

६) धारणा
७) ध्यान
८) समाधी
हे ३ अंतरंग योग असुन यातील 'ध्यान' हे महत्वाचे अंग आहे.

बहिरंग योगसाधनेची फलश्रुती अंतरंग योग असे म्हणता येईल.

पहिले ५ यम नियम सामाजिक स्तरावर व्यवहार कसा असावा हे सांगतात. आणि नंतरचे ३ नियम वैयक्तिक स्तरावर काय करावे हे सांगतात. योगसाधना करायची असेल तर यम-नियमांचे महाव्र्ताने पालन केले पाहिजे, अनुव्रताने नाही- असे पातंजल मुनी म्हणतात.
महाव्रत- म्हणजे कोणत्याही परिस्थितीत नियमपालन तंतोतंत करणे.
"जाति देश काल समयावच्छिन्ना, सार्वभौम महाव्रतम | "
उदाहरणादाखल आपण हिंसा हा विषय घेतला तर
जाति- मनुष्याला मारणार नाही पण प्राण्यांना मारेन ,अशी हिंसा नसावी
देश- माझ्या देशातल्या माणसांना मारणार नाही पण परदेशातल्या लोकांना मारेन अशी हिंसा नसावी
काल- चातुर्मासापुरते अभक्ष्य भक्षण करणार नाही. पण इतर वेळी करेन अशी हिंसा
समय- सकाळी सकाळी खोटे बोलणार नाही, दिवेलागणीला खोटे बोलणार नाही. असा प्रकार नसावा.

जो अस जाती, देश, काल, समयाला अनुसरुन महाव्रताच पालन करतो तो खरा योगी होउ शकतो.

प्रत्येक यम-नियमासोबत एक शक्ति जोडली आहे. आणि महाव्रताने ते पालन केले तरच त्या शक्तीचे प्रकटीकरण होते.
योगत्व म्हणजे प्रत्येक जीवामधे ''शिव' आहे. प्रत्येक मनुष्यात सुप्त अध्यात्मिक शक्तीचा स्रोत (पॉवरहाउस्) आहे. योगसाधनेत या शक्तीचे जागरण आहे.
१) यम- सामाजिक स्तरावर पाळावयाची साधना. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य, अपरिग्रह
*अहिंसा- एक विशेष म्हणजे मानसिक स्तरावर केलेली हिंसा जास्त प्रभावी असते. "अहिंसा प्रतिष्ठायां तत् सन्निधौ वैरत्याग: "
जो योगी महाव्रताने अहिंसेचे पालन करतो त्याच्या स्वतःकडून तर हिंसा होणार नाहीच पण त्याच्या तपस्येच्या प्रभावात/ आभामंडलात, त्याच्या संपर्कात जो कोणी येईल तो माणूस असो की प्राणी तोसुद्धा वैरभाव विसरेल . अश्या ठिकाणी कट्टर वैर असणारे प्राणी सुद्धा गुण्यागोविंदाने नांदतात. या बाबतीत भगवान बुद्धांची एक कथा सांगितली जाते.
भगवान बुद्ध जिथे जंगलात तपश्चर्या करत होते, त्याच्या १६ किमी पर्यंतच्या परिसरात त्यांच्या तपस्येचे प्रभावक्षेत्र होते. अंगुलीमाल राक्षस जेव्हा त्यांना मारायला आला, तेव्हा टप्याटप्प्यावर त्याच्या मानसिकतेत बदल होत गेला आणि सर्वात शेवटी बुद्धापर्यंत पोहोचता पोहोचता त्याला उपरती झाली आणि तो भगवान बुद्धाना शरण गेला. (या वर आम्ही स्कीट सादर केले होते)
याबाबतीत मला श्रीवासुदेवानंद सरस्वतींचे ( टेंबे स्वामी) शिष्य नारेश्वर चे रंगावधूत स्वामी (दत्तबावनीकार) यांची कथा आठवली. ते साधनेसाठी जागा शोधात नर्मदातटावर फिरत होते. फिरता फिरता त्यांना एका ठिकाणी साप-मुंगूस, वाघ आणि इतर शाकाहारी प्राणी एकत्र खेळत आहेत असे दिसले. तीच जागा त्यांनी नक्की केली ती जागा म्हणजे नारेश्वर.

* सत्य- सत्याचा महाव्रती म्हणजे उदा. राजा हरिशचंद्र
"सत्यप्रतिष्ठायां क्रियाफलाश्रयत्वम "
असा मनुष्य मृत्यू जरी आला तरी सत्याची कास सोडत नाही. असे महाव्रताने सत्याचे पालन केले तर त्याला वाचासिद्धी प्राप्त होते. तो जे बोलेल ते सत्य होते.
श्री रामकृष्ण परमहंसाची कथा इथे सांगितली होती. की एकदा त्यांचा एक शिष्य अगदी इरेला पेटला की जो योगी नेहमी सत्य बोलतो त्याला वाचासिद्धी प्राप्त होते, तो बोलतो ते सत्य होते, हे खरे आहे का हे समजावून सांगाच गुरुजी! या शिष्याकडे रोज बागेतील फुले गोळा करून, त्यांचे हार करून कालीमातेला अर्पण करायचे काम होते. तो शिष्य तिन्ही त्रिकाळ गुरुजींची पाठ सोडेना. तेव्हा श्री रामकृष्ण म्हणाले, अरे हो बाबा, असे खरेच असते.
तेव्हा त्याने विचारले, की आता जर कुणी एका योग्याने ही इथली अनंताची पांढरीशुभ्र फुले लाल होतील असे म्हटले तर खरंच होतील का?श्रीरामकृष्ण ही वैतागून म्हणाले हो, होतील!
आणि हा शिष्य दुसर्या दिवशी पहाटे अनंताची फुले तोडण्यास गेला ते ओरडतच परत आला की अनंताला लाल फुले आली आहेत.

*अस्तेय - म्हणजे चोरी न करणे. मग ती वाड्मयचौर्य ही असु शकते. दुसर्याचे श्रेय लाटणे ही असु शकते.

* ब्रम्हचर्य- कोणताही इंद्रियोपभोग न घेणे हे ब्रम्हचर्य

*अपरिग्रह- म्हणजे बराच संग्रह न करणे, भेटवस्तूंचा स्विकार न करणे

२) नियम- शौच, संतोष, तपस, स्वाध्याय, ईश्वरप्रणिधान

*शौच- म्हणजे शुद्धता, पवित्रता मग ती शारिरीक, मानसिक दोन्हीही असेल.

* संतोष - समाधानीवृत्ती. आहे त्यात समाधान

*तपस- शरीर, मन यांचेसुद्धा तप असते. 'कार्येंद्रिय शुद्धी तपसः" ज्या साधनेने काया, इंद्रियांची शुद्धी होते ते तप.
"प्राणायामः परम तपः" - सर्व तपात प्राणायाम हे उत्कृष्ट तप आहे. कारण यात प्राणवायुचे नियमन आहे.
उपास करणे म्हणजे पोटाचे तप. प्रदक्षिणा घालणे हे पायाचे तप

*स्वाध्याय- मी कोण याचे उत्तर शोधण्याची प्रक्रिया. भगवद्गिता, उपनिषदे यांचा अभ्यास, या प्रकारच्या विषयांची चर्चा, व्याख्यान ऐकणे हा स्वाध्याय

*ईश्वरप्रणिधान- ईश्वराप्रती समर्पणाचा भाव. अर्थार्थी, जिज्ञासु, आर्त, समर्पण. सर्वात मोठे समर्पण हे अहंकाराचे समर्पण. परब्रम्ह व आपल्यात सर्वात मोठी भिंत अहंकाराची आहे. अहंकाराच्या आवरणाखाली 'आतला' इश्वर झाकोळुन गेला आहे.
आवृत्तचक्षु- 'आत' बघण्याचा यत्न
योग्याचा डोळा अंतर्चक्षूं असतो. चेतना अंतर्मुखी करतो.

शारिरीक, मानसिक, बौद्धिक, अध्यात्मिक सर्वच स्तरावर यम-नियम पाळावयाचे असतात.

३)आसन- योगासने
पतंजलीने पतंजलीयोगसूत्रात फक्त ३ सूत्रात 'आसने' हा संपूर्ण विषय संपवला आहे. ज्यात पहिले सूत्र व्याख्या, दुसरे त्याची पद्धती आणि तिसरे त्याचा परिणाम दर्शवते

व्याख्या: 'स्थिरं सुखम् आसनं "
पद्धती: 'प्रयत्नशैथिल्य अनंतसमाप्तिभ्याम"
परिणाम : "ततो द्वंद्वानाभिघात: "

१) व्याख्या- पहिल्या सूत्रात 'आसने म्हणजे काय' ही व्याख्या आहे. आसनात स्थिरता हवी आणि सुखाचा अनुभव आला पाहिजे.
आसनात आणि व्यायामात हा मूलभूत फरक आहे.

*योगासने ही मुख्यत्वे मनोनियंत्रणासाठी प्रक्रिया आहे. ज्यात स्थिरता नाही, दु:ख आहे, बल वापरणे आहे, स्पर्धा आहे, त्याला पतंजली 'आसन' म्हणत नाही.

*योगासने एका वेळी एकदाच करायची असतात.

* अंतिम स्थितीत जास्तीत जास्त वेळ टिकून राहणे याला महत्व आहे.

*व्यायामाचा परिणाम फक्त शरीरासाठी होतो. तर आसनाचा परिणाम शरीरसौष्ठवासाठी आहेच, आणि मनाच्या शांतीसाठी पण आहे.

*शरीराची लवचिकता वाढणे, वजन कमी होणे ही आरोग्याची लक्षणे आहेत.

“Man is as old as his spine”
माणसाचे वय त्याच्या मेरुदंडाच्या लवचिकतेवर अवलंबून असते "असे आजचे मेडिकल सायन्स सांगते.
शारीरिक स्तरावर अस्थिसंस्था, मज्जासंस्था, रक्ताभिसरण संस्था अशा विविध संस्थांना जोडण्याचे, त्यांच्यात सुसंगती घडवून आणण्याचे कार्य योगासने करतात.

२) पद्धती: 'प्रयत्नशैथिल्य अनंतसमाप्तिभ्याम"
शारीरिक स्थितीत प्रयत्नाची शिथिलता हवी. सहजपणे एफर्टलेस आसने करावीत.मानसिक स्तरावर अनंताचे (अनंत आकाश, अनंत सागर ) ध्यान करावे. अंतिम स्थितीत सहजपणा हवा. अवयवांवर कुठल्याही प्रकारचा अवास्तव ताण नको. ज्या स्थित्तीत सुखाची अनुभूती आहे ती आपल्याकरता अंतिम स्थिती आहे.

आसनांच्या अंतिम स्थितीत मन शरीरापासून विलग करून अनंतात विलीन करणे म्हणजे 'आसनसिद्धी' झाली.
एखाद्या आसनात अंतिम, सुखदायी स्थितीत तुम्ही कमीत कमी ४ तास २० मिनिटे राहू शकतात तेव्हा ते असं सिद्ध झाले, असे योगशास्त्रग्रंथात म्हटले आहे.

३) परिणाम : जेव्हा अंतसमाप्तीभ्याम स्थिती येते तेव्हा योग्याचे जीवनातील द्वंद्व नाहीसे होते. द्वंद्वाने मन असंतुलित होते. आसनांच्या सिद्धतेमुळे मनुष्य द्वंद्वातीत होतो. शीत- उष्ण, मान-अपमान ,सुख-दु:ख ही काही द्वंद्वाची उदाहरणे.

||समत्वं योग उच्चते|| या उक्तीप्रमाणे याचा अर्थ कोणत्याची परिस्थतीत मनाचे समत्व टिकले पाहिजे,तर मनुष्य योगी होतो. आणि आसनांनी हे साधते. हिमालयातल्या अतिथन्ड तापमानात अंगावर फक्त लंगोटी लावून काही योगिजन तपसाधना करतात ती योगामुळे शक्य होत असाव.
गीतेत कृष्णाचे एक नाव 'योगेश्वर कृष्ण' असे आहे. त्याच्या चेहर्यावरचे स्मित कधीही ढळले नाही. कुरुक्षेत्रावर अतिशय तणावपूर्ण स्थितीत त्याने अर्जुनाला गीतोपदेश केला.

आसनांमध्ये 'जाणिवेचा विस्तार' कसा करता येईल याचा अभ्यास केला तर ती 'साधना' होईल. जाणिवपुर्वक आसने कशी करावीत हा शिबीरात गुरुच्या मार्गदर्शनाखाली शिकण्याचा प्रकार आहे. यावर सम्पुर्ण २ लेख होउ शकतात इतका हा विषय व्यापक आहे.

१) आसने ही जाणीवपूर्वक करावीत. यांत्रिकी पद्धतीने नाही. म्हणून असणे करतांना डोळे मिटलेले असावेत. आणि शरीरात होणारे बदल जाणीवपूर्वक बघावेत.

आवर्ती ध्यानात आम्ही उभ्याने ३, बसून ३ आणि पोटावर झोपून आसने करायचो.सर्वात शेवटी शवासन. ही सगळी आसने करतांना डोळे मिटलेले असायचे. लोक गम्मतीत म्हणतात, शवासन म्हणजे आमचे आवडते आसन! पण शवासन हे सर्वात अवघड आसन. आवर्ती ध्यानात ही शवासनातली ही स्थिती आमच्या ताई इतक्या सुंदर रीतीने सांगायच्या की आईच्या कुशीत आपण झोपलो आहोत असा फील यायचा. खरोखर काही लोकांना झोप ही लागायची.

२) स्नायूंची जाणीव- काही आसनात स्नायू ताणले जातात तर काहींमध्ये आकुंचित होतात ही पहिली जाणीव. जे स्नायू आसनांमध्ये भाग घेत नाही, ज्यांचा आसनांशी संबंध नाही ते स्नायू शिथिल असावेत.

३)पोट आणि छातीमधील दबावाची जाणीव. उदा. शशांकासन

४) रक्ताभिसरणातील बदल- अंतिम स्थितीत स्थिरत्व आणि शांती अनुभवली तर काही आसनात रक्तदाबात बदल होतो हा सूक्ष्म फरक ही लक्षात येतो. पादहस्तासन मध्ये रक्तप्रवाह मेंदूकडून चेहर्याकडे येत असल्याची जाणीव होते. याला स्थूलतेकडून सूक्ष्मतेकडे जाणे म्हणतात.

५) मज्जारज्जूमधील संवेदनांची जाणीव- ही सुद्धा सूक्ष्म जाणीव आहे. पश्चिमोत्तानासनात स्थिरत्व आले तर मेरुदंडातून सूक्ष्म करंट गेल्याची जाणीव होते.

६) ध्वनीस्पंदनांची जाणीव- शवासनात 'अ' 'उ' 'म' कार जप करतांना अनुक्रमे नाभीजवळ, छातीजवळ, आणि मस्तकात स्पंदनाची जाणीव होते. भ्रामरी प्राणायामात टाळूवर हात ठेवला तर स्पंदनांची जाणीव होते.

७) शरीरापासून विलग होणे- शवासन हे सर्वात कठीण आसन मानले जाते. आपल्या शरीरातून विलग होऊन आपणच आपल्या शरीराचे अवलोकन करत आहोत असा अनुभव योग्यांना येतो. याने देहबुद्धी नाहीशी होते. यात आपल्या शरीरात चेतना फिरवावी लागते. संपूर्ण शरीरातले तणाव शोधून ते बाहेर काढावे लागतात.
शरीरात सर्वात जास्त तणाव चेहर्यावर असतात. चेहर्यातही दाताच्या मुळाशी तणाव असतो.

८) अनंतसमापत्ती - आपल्या शरीरारापासून आपण वेगळे झालो की अनंतात विलीन होतो. म्हणजे अनंताशी एकरूप होणे. उदा. अनंत आकाश, अनंत सागराशी एकरूप होणे तीच अनंतसमापत्ती होय. यासाठीच डोळे बंद करून आसने करतात.

रोज किती आसने करावीत?
मागच्या बाजुस, पुढील बाजुस, डावीकडे, उजवीकडे मेरुदंड वाकेल अशी कॉम्प्लीमेंटरी आसने करावीत.
मेरुदंडाला पीळ (ट्वीस्ट होईल) तसेच मेरुदंड उलटा होईल असे कमीत कमी एक आसन तरी करावे.

३ प्रकारची योगासने आहेत.
१.ध्यानासन- पद्मासन, सिद्धासन, वज्रासन
२. स्वास्थ्यकर आसन- भुजंगासन, सर्वांगासन, शलभासन
३. आराम आसन- शवासन, मकरासन

पातंजलयोगसूत्रांचा मुख्यतः ध्यानासाठी उपयोग होतो.

४) प्राणायामः
प्राण म्हणजे जीवशक्ती. 'प्राण' आहे म्हणुन 'प्राणी' म्हणतात."प्राणस्य आयामः प्राणायमः" विश्वातल्या जितक्या शक्ती आहेत उदा. विद्युत शक्ती, चुम्बकीय शक्ती, गुरुत्वाकर्षण शक्ती या सर्वांचा स्रोत प्राणशक्ती आहे. आणि या जीवशक्तीचे नियंत्रण करणे हा प्राणायामाचा उद्देश.
शरीरातल्या जेवढ्या क्रिया आहेत, संस्था आहेत, त्यांना प्राणशक्ती लागते. विचारशक्तीचे कार्यही प्राणशक्तीमुळेच चालते. या शक्तीचे संयमन करणे म्हणजे प्राणायाम.
प्राणशक्ती ५ प्रकारे काम करते. प्राण, अपान , उदान, समान, व्यान
प्राण- शरीराच्या वरच्या भागात( उदा. डोळे, कान, नाक) काम करते.
अपान - शरीराच्या खालच्या भागात (उदा. मलोत्सर्जन, ) काम करते
समान - प्राण व अपान मध्ये समन्वयन करते. पचनसंस्थेचे कार्य यांच्यामुळे चालते.
व्यान- स्पर्श, रक्ताभिसरण क्रिया
उदान - हा वायू सुप्त स्थितीत असतो. सर्वसामान्यपणे असं म्हणतात की उदान वायू मृत्यूच्या वेळी स्थूल शरीरापासून मुक्त होऊन सूक्ष्म शरीराला घेऊन हा देह सोडतो.
पूरक - संथ गतीने घेतलेला श्वास
रेचक - त्याहीपेक्षा संथ गतीने सोडलेला प्रश्वास
कुंभक - रोखलेला श्वास
१:४:२ हे श्वासोच्छवासाचे प्रमाण आहे.
शरीरातल्या ९ संस्थानापैकी काही ऐच्छिक तर काही अनैच्छिक असतात.
चालणे, बोलणे, काम करणे - ऐच्छिक संस्था
हृदयाभिसरण, पचनसंस्था- अनैच्छिक संस्था
श्वसनसंस्था ही थोडी वेगळी आहे. ती थोडी ऐच्छिक तर काही प्रमाणात अनैच्छिक आहे. म्हणून प्राणशक्तीचे नियमन करण्यासाठी श्वसनसंस्थेचा आधार घेतला जातो.

प्राणायामाच्या २ शाखा आहेत .
* हठयोग शाखा (हठयोगप्रदीपिका ग्रंथ): पूरक-कुंभक- रेचक, यात नाडीशुद्धी आवश्यक आहे. कुंभकावर जास्त भर दिला आहे.
* वसिष्ठ शाखा (योगावसिष्ठ ग्रंथ) : पूरक-रेचक. इथे 'केवल कुंभका'वर(आपोआप येणारी स्थिती) जास्त भर दिला आहे.
सर्वसामान्यांसाठी वसिष्ठ शाखा जास्त उपयुक्त आहे. खरा प्राणायाम म्हणजे कुंभक. कुंभक अश्या ठिकाणी करावे जिथे शुद्ध हवा आहे, आहार सात्विक आहे, आहार, विहारावर नियंत्रण आहे, तसेच गुरूच्या मार्गदर्शनाखालीच करतात . हे शहरात शक्य नाही. कुंभक करण्यासाठी नाडीशुद्धी झालीच पाहिजे असे हठयोगप्रदीपिकेत वारंवार उल्लेख येतो.

नाडीशुद्धी म्हणजे काय? तर सर्वसाधारणपणे असे मानतात की आपल्या अन्नमयकोषांच्या बाहेरून प्राणमय शरीरकोष आहे. त्यात ७२००० नाडया आहेत ज्यातून आपल्या शरीराला प्राणशक्तीचा पुरवठा होतो. या नाड्या जर कुठे कुंठित झाल्या तर त्या ठिकाणी व्याधी होतात.

नाडीशुद्धी झाली हे कसे ओळखावे?
वपुपुषत्वम - सडपातळ, लवचिक शरीर
वदनेप्रसन्नता- चेहरा नेहमी प्रसन्न
नादेस्फुटत्वम - स्वर मधुर असतो
नयनेसुनिर्मले - डोळ्यात तेज असते
अरोगतम - कुठल्याही प्रकारचा रोग नाही
बिंदूजयम- वीर्यावर नियंत्रण
अग्निदीपम - जठर, पचनसंस्थेवर संपूर्ण नियंत्रण

ही सगळी लक्षणे ज्याच्या शरीरात प्रकट झाली तोच कुंभक करण्यास पात्र आहे असे हठयोगप्रदीपिकेत म्हटले आहे.
कुंभक जर नीट जमलां नाही तर योग साधण्याऐवजी रोग होतो.
त्या रोगाची लक्षणे पुढीलप्रमाणे- उचकी लागणे , धाप लागणे, दम कोंडल्यासारखा वाटणे, डोके दुखणे, कानात दुखणे ही चुकीच्या प्राणायामाची लक्षणे आहेत.

वसिष्ठ शाखेत म्हटलेय की सर्वसामान्य मनुष्याला पूरक रेचक संथ गतीने १:२ या प्रमाणात केले की 'केवल कुंभक' ही स्थिती आपोआप अगदी विनासायास येते. आणि ती सर्वात चांगली स्थिती आहे. जेव्हा शारीरिक मानसिक स्तरावर अतिरिक्त शक्तीची गरज असते, तेव्हा आपोआप श्वास रोखला जातो, म्हणजे 'केवल कुंभक' स्थिती येते.

४) प्रत्याहार- स्वम स्व विषयाप्रमोशे चित्तस्वरूपानुकाराइव इंद्रियाणाम प्रत्याहार:। इंद्रिये जेव्हा आपापल्या विषयातून असंलग्न होऊन चित्तात लीन होतात तेव्हा प्रत्याहाराची स्थिती येते.
पंचेंद्रियांना त्यांच्या विषयांपासून अलग ठेवणे, तोडणे. ते केले की बाह्यविश्वाची अनुभुती येत नाही. व योगी अंतर्विश्वाकडे वळतो.
इंद्रिये तत्व विषय
नाक- पृथ्वी - गंध
जिव्हा - आप - रस
नेत्र - तेज - रूप
त्वचा - वायू - स्पर्श
कान - आकाश - शब्द
आपले मन या पंचेंद्रियांच्या माध्यमातून विषयाशी संपर्क साधत असते.
बाह्यजगताची जाणीव आपल्याला पंचेंद्रियांमुळे होते. या इंद्रियांनी असहकार केला तर ती स्थिती प्रत्याहाराची आहे.
गाढ निद्रा म्हणजे प्रत्याहार नव्हे. कारण त्यात जाणीव नाही. इंद्रिये जाणीवपूर्वक असंलग्न झाली तर ती स्थिती प्रत्याहाराची.
****

संस्कृतीमुक्तकसमाजजीवनमानप्रकटनविचारआस्वादलेखअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

विवेकपटाईत's picture

21 Nov 2016 - 8:28 pm | विवेकपटाईत

लेख आवडला.

यशोधरा's picture

21 Nov 2016 - 9:07 pm | यशोधरा

वाचते आहे आर्या.

आर्या१२३'s picture

22 Nov 2016 - 11:45 am | आर्या१२३

धन्यवाद यशोधरा, विवेकजी! __/\__ :)

सिरुसेरि's picture

22 Nov 2016 - 5:38 pm | सिरुसेरि

उपयुक्त माहिती . महाराष्ट्रात अन्य कुठे अशी शिबिरे आहेत ? एसएसवाय बद्दलहि ऐकले आहे .

अनन्न्या's picture

22 Nov 2016 - 6:07 pm | अनन्न्या

वाचतेय, रोज एक तास नियमित योगासने चालू आहेत पण एवढी माहिती नव्हती.

निनाद's picture

23 Nov 2016 - 9:51 am | निनाद

लेख आवडला, माहिती खुप छान आहे.

खेडूत's picture

23 Nov 2016 - 10:01 am | खेडूत

छान.

(स्वगतः नियमितपणा येईल तेव्हा खरं!)

सुंदर लिखाण, अतिशय महत्वाचे व आरोग्यासाठी उपयोगी.

श्रीनिवास टिळक's picture

24 Nov 2016 - 4:48 pm | श्रीनिवास टिळक

योग शिबिरातले दिवस भाग १ हा लेख किंवा त्यात दिलेली माहिती कुठे वाचावयास मिळेल? पुण्यात हे शिबीर भरते का?

आर्या१२३'s picture

25 Nov 2016 - 9:11 am | आर्या१२३

धन्यवाद!http://www.misalpav.com/node/38084 हि पहिल्या भागाची लिंक! पुण्यात कोथरुडमध्ये योग सत्र सुरु आहे. डिटेल एड्रेस देते तुम्हाला.

विशुमित's picture

26 Nov 2016 - 5:38 pm | विशुमित

छान आणि उपयुक्त माहिती..!!

मंजूताई's picture

26 Nov 2016 - 6:43 pm | मंजूताई

भारतीय मानसशास्त्र अथवा सविवरण : योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर विद्यानिधी. हा योगावरचा ग्रंथ चाळत होते.... अहिंसा : त्यांच्या पत्निने ग्रंथ वाचून झाल्या वर म्हणाली की ग्रंथ उत्तम झालाय पण पुढची आवृत्ती काढली की सुधारणा कराल ... एके ठिकाणी आपण असे लिहीले की एक वेळचे अन्न दोन वेळांत विभागून घेतल्यावर माझा दुहेरी फायदा झाला. काटकसर झालीच व लेखनास उत्साह वाटू लागला. अशा रीतीने एका दगडाने दोन पक्षी 'मारण्याचे' श्रेय मिळाले. तुम्ही २ पक्ष्यांची हत्त्या कल्पनेत आणली
'अहिंसा' हा तर पहिला यम! दुसर्या आवृत्तीत बदल करुन 'एका घासाने दोन पक्षी जगवल्याचे श्रेय मला मिळाले ' असे लिहीले _/\_

आर्या१२३'s picture

28 Nov 2016 - 12:31 pm | आर्या१२३

मंजूताई , किती छोट्या छोट्या गोष्टीत आपण विचारही करु शकत नाही, अश्या सूक्ष्म रीतीने मानसिक हिंसा प्रवेशते ... हे यावरून समजलं.धन्यवाद!

शशिधर केळकर's picture

27 Nov 2016 - 7:26 pm | शशिधर केळकर

छान माहिती आहे. तुमचा स्वतःचा ही योग या विषयावर चांगला अभ्यास दिसतो. पातंजल योग दर्शन चा उल्लेखही विशेष. एकंदरीत योग या विषयाची व्याप्ती किती विलक्षण आहे हे जाणवते. मजा आली वाचायला. धन्यवाद. आणखी येऊ द्या.

आर्या१२३'s picture

28 Nov 2016 - 12:33 pm | आर्या१२३

नाही शशिधरजी! माझा काहिही अभ्यास नाही.
हे सगळ शिबिरात शिकवलेलेच इथे मान्डले आहे. यापुर्वी फक्त आसने वै. यावर थोडेफार वाचले होते. पण 'योग' या विषयाची व्याप्ती शिबिरात कळली.

लेखन-विषय आणि मांडणी चांगली आहे.
काही त्रुटी जाणवल्या.

जाति देश काल समयावच्छिन्ना, सार्वभौम महाव्रतम | "
जो अस जाती, देश, काल, समयाला अनुसरुन महाव्रताच पालन करतो तो खरा योगी होउ शकतो.

इथे प्रत्यक्षात (पातंजल योगदर्शनामध्ये )
जातिदेशकालसमया: अनवच्छिन्नाः
असे आहे. त्याचा अर्थही वर लेखिकेने दिला तसा 'समयाला अनुसरुन' असा नसून ‘जे व्रत जातीभेद, स्थळ, काल किंवा वेळ यांच्यातील बदलानंतरही अखंड अभंग (अनवच्छिन्नाः ) राहते, ते सार्वभौम महाव्रत ‘ असा आहे.

अस्तेय - म्हणजे चोरी न करणे. मग ती वाड्मयचौर्य ही असु शकते. दुसर्याचे श्रेय लाटणे ही असु शकते.

‘अस्तेय ‘ याचा अचूक अर्थ ‘चोरी न करणे’ असा नसून जी वस्तू आपली नाही, ती कदापि न घेणे, तिची कामनाही न करणे असा आहे. उदा. रस्त्यावर पडलेली वस्तू घेतली तर त्याला चोरी म्हणता येणार नाही. पण तीही न घेणे हे अस्तेय.

पतंजलीने पतंजलीयोगसूत्रात फक्त ३ सूत्रात 'आसने' हा संपूर्ण विषय संपवला आहे. ज्यात पहिले सूत्र व्याख्या, दुसरे त्याची पद्धती आणि तिसरे त्याचा परिणाम दर्शवते
व्याख्या: 'स्थिरं सुखम् आसनं "
आसनात स्थिरता हवी आणि सुखाचा अनुभव आला पाहिजे.
आसनात आणि व्यायामात हा मूलभूत फरक आहे.

>>>>> ‘स्थिरसुखम् आसनम्॥‘ याचा अर्थ शरीराला जी स्थिती सुखद वाटेल ते आसन असावे. इथे आसन म्हणजे हठ्योगातील आसन नव्हे, तर शरीरस्थितीला आसन म्हटले आहे. यात ‘सुखाचा अनुभव' असा काही भाग नाही.

पद्धती: 'प्रयत्नशैथिल्य अनंतसमाप्तिभ्याम"
शारीरिक स्थितीत प्रयत्नाची शिथिलता हवी.

>>>>> ‘अनंतसमापत्ती’ मध्ये शारीरिक स्थिती अथवा शारीरिक प्रयत्नांचा काही संबंध नसून ती मनाची अवस्था आहे. सर्व तऱ्हेचे मानसिक प्रयत्न थांबले की मन अनंतात ‘कोसळू’ लागते, असा अनुभव येतो. याला ‘अनंतसमापत्ती’ म्हटले आहे. (अनंतसमाप्ती’ नव्हे.)

परिणाम : "ततो द्वंद्वानाभिघात: "
>>>> जेव्हा अंतसमाप्तीभ्याम स्थिती येते तेव्हा योग्याचे जीवनातील द्वंद्व नाहीसे होते.

‘ततो द्वंद्व अनभिघात:’ याचा अर्थ ‘तिथे / तेव्हा विकारांची सर्व द्वंद्वे मनाच्या अवस्थेवर काही आघात, काही परिणाम करू शकत नाहीत’ असा आहे. योगी या अवस्थेतून बाहेर आल्यावर जीवनातील द्वंद्वे आणि इतर सर्व गोष्टी अजुनी शिल्लक असतातच.

*योगासने एका वेळी एकदाच करायची असतात.

>>>>> माझ्या माहिती प्रमाणे योगासनांचीही आवर्तने असतात. उदा. भुजंगासन करून विराम स्थितीत गेल्यानंतर पुन्हा दोनतीन वेळा आवर्तने करतात.

वजन कमी होणे ही आरोग्याची लक्षणे आहेत.

>>>>>> नॉर्मलपेक्षा कमी वजन असणाऱ्यांना हे लागू पडेल ?

वरील लेखातून योगासने हा पातंजल योगदर्शनाचा भाग आहे असे ध्वनित होते आहे.
तथापि योगासने हा संपूर्णपणे हठ्योगाचा विषय असून ‘पातंजल योगदर्शन’ या शास्त्रात त्यांचा कुठेही उल्लेख आढळत नाही अथवा त्यांना महत्व दिलेले दिसत नाही.

स्थितप्रज्ञ's picture

28 Nov 2016 - 4:27 pm | स्थितप्रज्ञ

बापरे, इतके ज्ञान एका धाग्यात! अतिशय इन्फॉर्मटिव्ह लेख. एकावेळी वाचून सोडून देण्यासारखा खचितच नाही.
रोज एक एक कन्सेप्ट आत्मसात करिन म्हणतो...
इतकी महत्वपूर्ण माहिती share केल्याबद्दल शतशः धन्यवाद!!!

धन्यवाद स्नेहांकिता! आणखी बारकाव्यानिशी सान्गितल्याबद्दल!
खरे तर विषयाची व्याप्ती खुप मोठी आहे. १५ दिवसात इतर कार्यक्रमासोबत योगाच्या सेशन्स मधे जेवढी माहिती मिळाली. ती मी पॉईन्टवाईज लिहुन घेतली असल्याने सगळे मुद्दे आले नसावेत.
अस्तेय बद्दल अजुन डीटेलः
astey1

astey

सस्नेह's picture

29 Nov 2016 - 11:45 am | सस्नेह

खरं आहे :)
इंद्रियांचे सम्यक प्रमाणात सेवन हेच योगाचे सूत्र आहे. इच्छा मारायची नाही आणि पोसायचीही नाही. जितकी गरज आहे, तितकेच घेणे, हा योग.
'पातंजल योगदर्शन' एक अचूक शब्द्योजनेने रचलेले अप्रतिम शास्त्र आहे. अतिशय इंटरेस्टिंग !