=================================================================
सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन... ०२ : औकानाची बुद्धमूर्ती...
०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी... ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...
०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी... ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...
०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान... ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...
०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)... १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...
११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी... १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...
१३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड... १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...
१५ : याला राष्ट्रीय उद्यान... १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...
१७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो... १८ : कोलंबो... (समाप्त)
==================================================================
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================
गाडी दांबुला येथील गुंफामंदिराच्या दिशेने धावू लागली तेव्हा मन एका अनपेक्षित अनवट अनुभवाच्या आनंदाने भरलेले होते.
श्रीलंकेतले हे सर्वात जुने गुंफामंदिर आजही उत्तम अवस्थेत आहे. एका १६० मीटर उंचीच्या कातळात आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात एकूण ८० गुहा आहेत. त्यापैकी, इ स पूर्व तिसर्या-दुसर्या शतकापासून अस्तित्वात असलेले व आजही वापरात असलेले, पाच गुंफांचे संकुल सर्वात महत्त्वाचे आकर्षण आहे. हे संकुल कातळामध्ये नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या एका विशाल गुहेला अधिक खोलवर कोरून बनवलेले आहे. पावसाच्या पाण्याचा परिणाम इथल्या मूर्ती व रंगकामावर होऊ नये व पाण्याचा निचरा नीट व्हावा यासाठी पन्हळी व इतर प्रणाली (katarama) कातळात कोरलेली आहे. एका गुहेत पाझरणारे पावसाचे पाणी साठवून त्याचा धार्मिक कार्यासाठी उपयोग केला जातो.
या संकुलात बुद्धाची १५३, विष्णू व गणेशाची ४ आणि श्रीलंकन राजांची ३ शिल्पे आहेत. सर्व संकुलात असलेल्या भित्तिचित्रांचे एकूण क्षेत्रफळ २१०० चौ मीटर आहे व त्यातली बहुतेक चांगल्या अवस्थेत आहेत. बहुतांश व्दिमितीत काढलेल्या या चित्रांमध्ये सिगिरिया आणि पोलोन्नारुवा शैलींचे कसब दिसत नाही. ही नवीन चित्रशैली दक्षिण भारतातील मुस्लिम राज्यांच्या राजाश्रयाखाली निर्माण झालेल्या चित्रशैलीने प्रभावित आहे असे दिसते. काहींच्या मते मंदिरांचा जीर्णोद्धार करताना मूळ चित्रांवर परत रंगकाम केले गेले आहे. त्यातले शेवटचे काम सतराव्या शतकात झालेले आहे, त्यामुळे चित्रशैलीतला हा फरक आला असावा.
या अगोदर अनुराधापुराच्या वर्णनात तेथिल अभगगिरी दागोबा बांधणार्या वत्तगामानी अभयाची गोष्ट आली आहे. इ स पूर्व १०३ मध्ये दक्षिण भारतातील द्रविड राजांनी पराभव केल्यामुळे त्याला अनुराधापुराहून पलायन करून १४ वर्षे जंगलात परागंदा व्हावे लागले होते. त्या काळात तो या परिसरात राहत होता. सत्ता परत हस्तगत केल्यावर त्याने कृतज्ञता म्हणून त्याने या गुहांचे गुंफामंदिरात रूपांतर केले असे म्हणतात. त्यानंतरच्या अनेक राजांनी या संकुलाचा वेळोवेळी विकास केला. अर्थातच, या जागेला धर्माबरोबरच, ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व देखील प्राप्त झालेले आहे. हे गुंफामंदिर जागतिक वारसा स्थान आहे.
चला तर, मारूया फेरफटका या गुंफामंदिरात...
मंदिराच्या आवारात शिरल्यावर आपल्याला गुंफांसारखे काहीच न दिसून आश्चर्य वाटते. या सर्व गुंफाच्या समोर बांधकाम केलेले आहे आणि ते चाळीसारखे एकमेकाला जोडून असल्याने, आपल्याला गुंफा दिसण्याऐवजी कड्याला जोडलेली एक लांबच लांब इमारत दिसते...
दांबुला गुंफामंदिर : सिंहावलोकन
या संकुलातील गुफांना प्रवेशमार्गापासूनच्या त्यांच्या स्थानाप्रमाणे एक ते पाच असे क्रमांक दिलेले आहेत.
.
(चित्रे व नक्षीच्या रंगकामाला धोका पोहोचू नये यासाठी गुंफांमध्ये इतर कोणताही प्रकाशस्त्रोत (विजेचे दिवे, विजेर्या, इ) वापरायला मनाई आहे. फ्लॅश न वापरण्याच्या अटीवर कॅमेरा न्यायला हरकत नसते. अर्थातच, गुंफांच्या आत त्यांच्या दरवाज्यातून जेवढा सूर्यप्रकाश आत येऊ शकेल तेवढाच प्रकाश असतो. त्यामुळे, इथल्या प्रकाशचित्रांची प्रत मनासारखी नाही.)
.
पहिली गुंफा : देवराजा विहाराया
या गुंफेतील मुख्य शिल्पावर सक्काने (शक्र उर्फ देवांचा राजा इंद्र याने) शेवटचा हात फिरवला अशी दंतकथा असल्याने या गुहेचे नाव देवराजा विहाराया असे पडले आहे. उत्तम अवस्थेत असलेली ही महापरिनिर्वाण (परिनिब्बा) अवस्थेतील मुख्य बुद्धमूर्ती १४.३ मीटर (४७ फूट) लांबीची आहे. ती मागच्या कपारीला जोडून कोरलेली आहे. बुद्धाचा चेहरा भावाविहीन, निस्तेज आणि कलाकुसरीविना कोरलेला आहे. मात्र शरीराचा इतर भाग कसबाने कोरलेला आहे. अंगावरचे वस्त्र घोट्यापर्यंत खाली आहे, पण उजवा खांदा आणि छाती उघडी आहे. वस्त्राच्या चुण्या बारकाईने कोरलेल्या आहेत.
पहिली गुंफा (देवराजा विहाराया) : महापरिनिर्वाण अवस्थेतील बुद्धशिल्प
या गुंफेच्या कोपर्यात पाच मूर्ती आहेत. त्यापैकी दक्षिण कोपर्यातली उभी मूर्ती महापरिनिर्वाणामुळे दु:खी झालेल्या अरहत आनंदाची आहे तर दुसरी उत्तर कोपर्यातली मूर्ती विष्णूची आहे. काहींच्या मते ही दुसरी मूर्ती उपुलवन नावाच्या श्रीलंकेच्या चार कुलदैवतांपैकी एकाची आहे.
भाविकांनी भक्तिभावाने जाळलेल्या धुपांमुळे या गुंफेतील भित्तिचित्रांची व छतावरच्या नक्षीची खूप हानी झाली आहे.
.
दुसरी गुंफा : महाराजा विहाराया
राजा वत्तगामानी अभयने स्वतः या गुंफेच्या कामात मदत केली व त्यावरून हिचे महाराजा विहाराया असे नाव पडले आहे, असे म्हणतात. २२ मीटर लांब व २२.९ मीटर रुंद आकाराची ही संकुलातली सर्वात मोठी गुंफा आहे. छत प्रवेशद्वाराजवळ ६.४ मीटर उंच आहे आणि ते गोलाकाराने खाली येत येत मागच्या कपारीला जाऊन मिळते.
कलाकृतींच्या दृष्टीने ही येथील सर्वोत्तम गुंफा आहे. या गुंफेच्या प्रवेशद्वाराच्या गोलाकार कमानींजवळ दोन्ही बाजूला द्वारपालांच्या मूर्ती आहेत. इथल्या एकूण ५३ मूर्तींमधल्या बहुतांश वेगवेगळ्या मुद्रेतील बुद्धमूर्ती आहेत. त्यांचे आकार वेगवेगळे असले तरी बहुतेक सर्व मूर्ती सर्वसाधारण माणसाच्या आकारापेक्षा मोठ्या आहेत. यातील बहुतेक सर्व मूर्ती मागच्या कड्याच्या पासून थोड्या पुढे एका रांगेत आसनस्थ आहेत. या गुहेच्या भिंती आणि छत गर्द रंगाच्या अनेक प्रकारच्या नक्षीने सुशोभित केलेले आहे.
दुसरी गुंफा (महाराजा विहाराया) ०१
.
दुसरी गुंफा (महाराजा विहाराया) ०२
.
दुसरी गुंफा (महाराजा विहाराया) ०३
.
दुसरी गुंफा (महाराजा विहाराया) ०४
.
गुंफेत प्रवेशद्वाराच्या उजवीकडे एक ५.५ मीटर (१८ फूट) उंच सुबक स्तूप आहे. त्याच्या चौथर्यावर भुजंगासनावर बसलेल्या बुद्धमूर्ती आहेत.
दुसरी गुंफा (महाराजा विहाराया) ०५
.
एका कोपर्यात कलिंग राजघराण्यातील राजा निस्सांक मल्ल (पहिल्या पराक्रमबाहूचा पुतण्या व जावई) याची हात जोडून उभी असलेली मूर्ती आहे.
दुसरी गुंफा (महाराजा विहाराया) ०६
.
तिसरी गुंफा : महा अतुल विहाराया
ही गुंफा दुसर्या क्रमांकाच्या गुंफेपासून विटेच्या भिंतीने विभागलेली आहे आणि १८ व्या शतकापर्यंत भांडार (स्टोअर रूम) म्हणून वापरात होती. राजा कीर्ती श्री राजसिंहाने (इ स १७४७ - १७८२) हिचे विहारात रूपांतर केले. या गुंफेत एकूण ५० बुद्धमूर्ती आहेत.
येथे एक निद्रावस्थेत असलेली ९ मीटर (३० फूट) लांब बुद्धमूर्ती आहे. तिचा चेहरा देखणा आहे व त्यावर शांत भाव आहेत...
दुसरी गुंफा (महाराजा विहाराया) ०१
येथे उभ्या बुद्धाच्या मूर्तींपैकी सात दहा फुटी उंचीच्या आहेत, तर बाकीच्या सर्वसाधारण उंचीच्या आहेत. या गुंफेच्या छतावर बुद्धाची चित्रे व भौमितिक आकारांची नक्षी आहे. इथले रंगकाम कँडी शैलीत आहे...
तिसरी गुंफा (महा अतुल विहाराया) ०२
.
चवथी गुंफा : पश्चिम विहाराया
या गुंफेचे नाव तिच्या पश्चिम दिशेला असण्यामुळे पडले आहे. येथे १० बुद्धमूर्ती आहेत. इथली ध्यानमुद्रेतल्या बुद्धाची मुख्य मूर्ती मोठ्या आकाराची व रेखीव कोरीवकाम केलेली आहे. या गुंफेच्या मध्यभागी एक सोम सेतिया नावाचा स्तूप आहे. इथेही छतावर व भिंतींवर अनेकरंगी बुद्धचित्रे व नक्षी काढलेली आहे.
चौथी गुंफा (पश्चिम विहाराया)
.
पाचवी गुंफा
विसाव्या शतकाच्या दुसर्या दशकात बनवलेल्या या गुंफेला फारसे ऐतिहासिक महत्त्व नाही. तिच्यात खास वैशिष्ट्यपूर्ण असे काही नाही.
.
सुवर्णमंदिर
गुंफामंदिर संकुलाला अगदी लागूनच त्याच्या पूर्वेकडे अजून एक गुंफामंदिर आहे. साधारण २५० वर्षापूर्वींपासून मूळ गुंफामंदिरातील सोयी कमी पडल्याने तेथील भिक्कू याचा वापर करू लागले. इ स २००१ मध्ये या गुंफामंदिरावर १४.६ मीटर (४८ फूट) उंचीचा धम्मचक्का (धर्मचक्र) मुद्रेत बसलेल्या बुद्धाचा पुतळा स्थापन केला गेला. विटा व काँक्रिटने बांधलेल्या या पुतळ्यावर सोन्याचा मुलामा दिलेला आहे. यावरूनच या मंदिराला सुवर्णमंदिर (Golden Temple) असे नाव पडले जाते.
या गुंफेला लागून, तिच्या समोर उंच चौथर्यावर आकर्षक लाल, पांढर्या व निळ्या रंगात रंगवलेली एक तीन मजली इमारत आहे. या इमारतीत सुवर्णमंदिराचे संग्रहालय आहे. येथे अनेक प्राचीन धार्मिक व सामाजिक महत्त्वाच्या वस्तू पाहायला मिळतात.
दांबुलाचे सुवर्णमंदिर व संग्रहालय : दर्शनी भाग व सुवर्ण बुद्धमूर्ती
.
दांबुलाचे सुवर्णमंदिर व संग्रहालय : प्रवेशद्वार
.
या संग्रहालयात काढलेले काही फोटो...
...
दांबुलाचे सुवर्णमंदिर संग्रहालय ०१ व ०२ : धार्मिक व सामाजिक विषयांवरची चित्रे
.
...
दांबुलाचे सुवर्णमंदिर संग्रहालय ०३ व ०४ : धार्मिक व सामाजिक विषयांवरची चित्रे
.
...
दांबुलाचे सुवर्णमंदिर संग्रहालय ०५ व ०६ : शिल्पे
.
...
दांबुलाचे सुवर्णमंदिर संग्रहालय ०७ व ०८ : शिल्पे
.
...
दांबुलाचे सुवर्णमंदिर संग्रहालय ०९ व १० : मंदिराचे वादक व भूर्जपत्रे
.
आतापर्यंतचे अनुभव पाहता या अचानक ठरवलेल्या सहलीत पहिल्या अडीच दिवसातच श्रीलंकेने अपेक्षेपेक्षा जास्त आश्चर्य व आनंदाचे धक्के दिले होते. त्यामुळे, गाडी प्रसिद्ध कँडी शहराच्या दिशेने धावू लागली तेव्हा आता अजून कोणता अनुभवांचा खजिना पुढे येईल असाच विचार मनात होता.
(क्रमश : )
==================================================================
सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन... ०२ : औकानाची बुद्धमूर्ती...
०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी... ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...
०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी... ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...
०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान... ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...
०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)... १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...
११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी... १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...
१३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड... १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...
१५ : याला राष्ट्रीय उद्यान... १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...
१७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो... १८ : कोलंबो... (समाप्त)
==================================================================
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================
प्रतिक्रिया
20 Dec 2015 - 8:50 pm | यशोधरा
मस्त! बुद्धाचे पुतळे पाहतानाही शांत वाटते!
20 Dec 2015 - 9:23 pm | पद्मावति
+१ खरंय अगदी.
हा ही भाग खूप आवडला.
20 Dec 2015 - 10:05 pm | प्रचेतस
हा भागही खूप सुरेख.
पण एकंदरितच गुहांसमोरचं आधुनिक बांधकाम, आतली रंगरंगोटी खूपच खटकली. आपल्याइथे निदान महत्वाचे प्राचीन अवशेष आहे त्याच स्थितीत जतन केलेले आढळतात ते एक बरेच.
21 Dec 2015 - 3:31 pm | डॉ सुहास म्हात्रे
सहमत. हे मंदिर अनेक शतके सलग वापरात असल्याने त्याचा अनेक वेळा जीर्णोद्धार झाला आहे. हा त्याचाच परिणाम आहे.
24 Dec 2015 - 12:21 pm | सस्नेह
प्रचेतस. आधुनिकीकरणामुळे प्राचीनत्व लोप पावले आहे असे वाटते.
बाकी हा भाग विस्तृत माहिती देणारा.
21 Dec 2015 - 7:43 am | कंजूस
चित्रे फारच सुंदर आली आहेत.
द्रविड राजे गेले त्याअगोदर बरेच बिहारचे लोक अशोकाच्या काळात गेले ना?ही सहल केल्यानंतर कोणालाही वाटेल चांगले एक दोन महिने राहायला पाहिजे.
21 Dec 2015 - 1:46 pm | डॉ सुहास म्हात्रे
पहिल्या भागात लिहिलेल्या इतिहासाप्रमाणे,
"पाली भाषेत लिहिलेल्या महावंश या ग्रंथाप्रमाणे श्रीलंकेचे मूलवासी यक्ष व नाग या नावांनी ओळखले जात होते. भारतातील आताच्या बंगालमधील रार प्रदेशातून विजय (सिंह) नावाचा एक राजपुत्र इ स पूर्व ५४३ मध्ये तेथे आठ जहाजांतून ७०० जणांना घेऊन पोहोचला आणि तेथे आपले राज्य (इ स पूर्व ५४३ ते ५०५) स्थापन करून त्याने श्रीलंकेत सिंहला राजांची परंपरा सुरू केली."
बौद्धधर्म तेथे तीन शतके नंतर इ स पूर्व तिसर्या शतकात अशोकपुत्र महिंद्राने नेला.
श्रीलंकेवरची द्रविड राजांची आक्रमणे आणि श्रीलंकेच्या एखाद्या भागावर किंवा संपूर्ण श्रीलंकेवर अधिपत्य असलेली द्रविड राज्ये बौद्धधर्माच्या आगमनाअगोदर व नंतरही होत राहिली.
21 Dec 2015 - 8:18 am | अत्रुप्त आत्मा
अद्भुत, भव्य दिव्य.
21 Dec 2015 - 8:18 am | अत्रुप्त आत्मा
अद्भुत, भव्य दिव्य.
21 Dec 2015 - 11:19 am | सुमीत भातखंडे
हा भाग पण मस्त
21 Dec 2015 - 12:20 pm | कपिलमुनी
पण रावणाच्या प्रतीक्षेत !
21 Dec 2015 - 12:24 pm | कपिलमुनी
पण रावणाच्या प्रतीक्षेत !
21 Dec 2015 - 6:22 pm | रेवती
गुंफा म्हणताना डोळ्यासमोर इमारतीचे चित्र येत नसल्याचे वेगळेच वाटले. छतावरील रंगकाम आवडले. सगळीकडे बुद्धाला वेठीला धरलेले पाहून ;) तेथील भक्तगणांना विनंती कराविशी वाटली पण आपल्याकडेही आपण बिचार्या गणपतीबाप्पाला असाच त्रास देतो हे आठवून गप्प बसते. ;)
21 Dec 2015 - 7:37 pm | अभ्या..
चित्रे मस्त आहेत. स्टाइल इजिप्शियन वाटली. म्हणजे चेहरा व् पाय साइडने पाहिल्यासारखे. धड़ मात्र समोरून पाहिल्यासारखे. रंग मात्र अल्ट्राब्राइट हैत.
24 Dec 2015 - 1:53 am | डॉ सुहास म्हात्रे
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे धन्यवाद !
24 Dec 2015 - 10:27 am | अजया
छान आहेत रंगीत गुंफा.हा भागही मस्त.छोट्याश्या श्रीलंकेच्या पोटात बरंच काही सुंदर दडलंय.
28 Dec 2015 - 6:43 pm | सुधीर कांदळकर
चित्रे प्रकाशस्त्रोताशिवय आहेत तरीही अप्रतिम आलेली आहेत. धन्य ते कॅमेर्याचे तंत्रज्ञान - आपल्या चित्रे घेण्याच्या कौशल्याचीही तारीफ करावी तेवढी कमीच.
लेण्यापुढचे बांधकाम प्रथमच पाहिले - या लेखांकातून.
छान.