सिंहलव्दीपाची सहल : १८ : कोलंबो (समाप्त)

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
6 Jan 2016 - 3:48 pm

==================================================================

सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...   ०२ : औकानाची बुद्धमूर्ती...
    ०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी...   ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...
    ०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी...    ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...
   
०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान...                                       ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...
    ०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)...       १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...
    ११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी...   १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...
    १३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड...                              १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...
    १५ : याला राष्ट्रीय उद्यान...                                           १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...
    १७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो...                            १८ : कोलंबो... (समाप्त)

==================================================================
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================

हा दोन-अडीच तासांचा रस्ताही निसर्गाचे रूप पाहत पाहत सहज संपला. मोठ्या शहराच्या खाणाखुणा दिसू लागल्या आणि कोलंबोत पोहोचल्याची जाणीव झाली.

कोलंबो

मुख्य शहरात ७.५ लाख व उपनगरे धरून ५६ लाख वस्ती असलेले कोलंबो हे श्रीलंकेतले सर्वात मोठे शहर आहे. हे शहर आधुनिक श्रीलंकेची सद्य राजधानी आहे असा समज असला तरी ते सर्व शहर फक्त १९८२ पर्यंतच राजधानी होते. १९८२ नंतर श्रीलंकेची खरी संवैधानिक राजधानी (लेजिस्लेटिव्ह कॅपिटल) "श्री जयवर्दनेपुरा कोट्टे" (किंवा स्थानिक लोकांत संक्षिप्तपणे, कोट्टे) या कोलंबोच्या एका उपनगरापुरतीच मर्यादित आहे.

या शहराच्या नावाचा उच्चार स्थानिक लोक कलांबो असा करतात, पण तुम्ही कोलंबो म्हणालात तर त्यांचा आक्षेप नसतो. या शहराचे कोलंबो हे नाव सर्वप्रथम पोर्तुगीजांनी १५०५ मध्ये ठेवले. हे नाव का ठेवले गेले याबद्दल अनेक वदंता आहेत. सिंहलीमध्ये कोलन थोटा म्हणजे केलानी नदीवरचे बंदर; सिंहलीमध्येच कोला अंबा थोटा म्हणजे आंब्याची झाडी असलेले बंदर; जुन्या सिंहलामध्ये कोलांबा म्हणजे बंदर; असे अनेक पर्याय आहेत, तुम्हाला हवा तो उचला. पण, पोर्तुगीजांनी कोलंबोसाठी बनवलेल्या राजचिन्हातील (कोट ऑफ आर्म्स) आंब्याच्या झाडामुळे कोलंबो या नावाचा आंब्याशी संबंध असावा असेच वाटते...


कोलंबो ०१ : आंब्याच्या झाडाचे चित्र असलेले पोर्तुगीज कोलंबोचे राजचिन्ह (कोट ऑफ आर्म्स) (जालावरून साभार)

जागतिक पूर्व-पश्चिम जलव्यापारमार्गावर मोक्याच्या ठिकाणचे बंदर असल्यामुळे ही जागा २००० वर्षांपासून आपले महत्त्व राखून आहे. मात्र तिला राजधानीचे स्थान १८१५ मध्ये श्रीलंका ब्रिटिश अमलाखाली गेल्यावरच मिळाले. नंतर श्री जयवर्दनेपुरा कोट्टेला संवैधानिक राजधानी म्हणून जाहीर केल्यावरही या शहराचे "श्रीलंकेची व्यापारी राजधानी (कमर्शियल कॅपिटल)" हे स्थान अबाधित राहिले आहे.

गालं फेस ग्रीन, विहारमहादेवी उद्यान, बैरा सरोवर, कोलंबो रेसकोर्स, तारांगण (प्लॅनेटोरियम), कोलंबो विद्यापीठ, माउंट लाविनिया समुद्रकिनारा, नेलुम पोकुना रंगमंदिर, कोलंबो लोटस टॉवर, हिंदू मंदिरे, बौद्धमंदिरे, इत्यादी बघण्यासारख्या अनेक जागा या शहरात आहेत. आजच्या चार पाच तासांत हे सर्व बघणे शक्य नव्हते. वेळ वाचविण्यासाठी, शहरात शक्य तेवढा फेरफटका मारून मगच हॉटेलवर जायचे असे ठरवले आणि गाडी तशी वळवली. कोलंबोच्या रस्त्यावरून फिरताना काढलेले काही फोटो.

कोलंबोतील बहुसंख्य इमारती सर्वसाधारणपणे मध्यम उंचीच्या आणि एखाद्या मध्यम आकाराच्या शहराचा अनुभव देणार्‍या आहेत...


कोलंबो ०२

.


कोलंबो ०३

.

मधूनच एखादी ब्रिटिशकालातली इमारत तिच्या वैशिष्ट्यामुळे आणि तिच्या ट्रेडमार्क तांबड्या-पांढर्‍या रंगामुळे उठून दिसत होती...


कोलंबो ०४

एका भागातल्या गगनचुंबी इमारती या पार्श्वभूमीवर उठून दिसत होत्या...


कोलंबो ०५

.

कोलंबोतून फिरताना दोन वैशिष्ट्यपूर्ण इमारतींनी लक्ष वेधून घेतले.

एक होती कोलंबोच्या ब्रिटिशकालाच्या स्थापत्याची झलक दाखवणारी कोलंबो काऊंन्सिल बिल्डिंग...


कोलंबो ०६ : कोलंबो काऊंन्सिल बिल्डिंग

आणि दुसरी आधुनिक स्थापत्याचा आविष्कार दाखवणारी कमळाच्या आकाराचे नेलुम पोकुना (कमलकुंड) रंगमंदिर. आपण काही दिवसांपूर्वी पोलोन्नारुवामध्ये बघितलेल्या कमलकुंडाच्या आकारावरून स्फूर्ती घेऊन या रंगमंदिराचे स्थापत्य केलेले आहे. १२८८ आसने असलेल्या या प्रकल्पाच्या ३०८ कोटी श्रीलंकन रुपयांच्या खर्चापैकी २४३ कोटीचा वाटा चीनने भेटीदाखल उचलला होता. तेथे कार्यक्रम बघायचा योग आला नाही. तेव्हा त्याचे दुरूनच दर्शन घेऊन समाधान मानले...


कोलंबो ०७ : नेलुम पोकुना (कमलकुंड) रंगमंदिर
.

गालं फेस ग्रीन

गालं फेस ग्रीनला धावती भेट दिली. या परिसराची सुरुवात डचांनी पोर्तुगीज आक्रमणापासून बचाव करण्यासाठी किनारासंरक्षक तोफा ठेवण्यास केली. नंतर १८५९ साली ब्रिटिशांनी त्याचा विकास केला. सुरुवातीला हा हिरवळीने भरलेला जमिनीचा पट्टा बराच मोठा होता व तेथे गोल्फ, क्रिकेट, पोलो, फुटबॉल, टेनिस, रग्बी असे अनेक खेळ खेळले जात होते. त्यामधल्या जमिनीचा वेळोवेळी इतर कारणांसाठी उपयोग झाल्याने आता तो पट्टा बराच अरुंद झाला आहे. कोलंबोच्या अर्थ व व्यापार उपनगराला (financial and business district) लागून असलेल्या समुद्रकिनार्‍याजवळ असलेला ५ हेक्टर क्षेत्रफळाचा व अर्धा किमी लांबीचा हिरवळीचा पट्टा असे त्याचे आजचे स्वरूप आहे. त्याचा उपयोग कोलंबोकर चौपाटीसारखा फिरायला जाण्यासाठी व संध्याकाळची हवा खाण्यासाठी करतात. आम्ही गेलो तेव्हा तेथे बरेच कोलंबोकर पतंग उडवताना दिसले.


गालं फेस ग्रीन ०१

.

गालं फेस ग्रीन ०२ (जालावरून साभार)

.

पिल्लायार कोविल

कोलंबोतील तीन मोठ्या हिंदू मंदिरांपैकी (श्रीकैलाशनादार कोविल, पिल्लायार कोविल आणि पोन्नमबालावनेश्वरम कोविल) एक पिल्लायार कोविल किंवा सहल कंपनीच्या माहितीपत्रकाप्रमाणे केवळ "हिंदू टेंपल" याचा आमच्या सफरीत समावेश होता. तमिळमध्ये गणेशाला पिल्लायार म्हणतात, म्हणजे हे गणेशमंदिर आहे. मात्र या मंदिरात अनेक देवदेवतांच्या आणि असुर वाटणार्‍याही अनेक मूर्ती आहेत. मंदिराचे स्थापत्य, मूर्ती व रंगसंगती दक्षिण भारतीय शैलीतली आहे.

या मंदिराचे काही फोटो...


पिल्लायार कोविल ०१ : दर्शनी भाग

.


पिल्लायार कोविल ०२

.


पिल्लायार कोविल ०३

.


पिल्लायार कोविल ०४

.


पिल्लायार कोविल ०५

.


पिल्लायार कोविल ०६

.

स्वातंत्र्य स्मारक (Independence Memorial Hall, Independence Commemoration Hall)

आमचा पुढचा थांबा होता कोलंबोतले स्वातंत्र्य स्मारक. श्रीलंकेला ज्या जागेवर विशेष सभा घेऊन ब्रिटिशांनी स्वातंत्र्य प्रदान केले त्याच जागेवर हे स्मारक उभे केलेले आहे. कँडी येथील ज्या राजसभागृहातील कराराने श्रीलंकेतील ब्रिटिश वसाहतवादाला सुरुवात झाली होती त्याची कँडी स्थापत्यशैली डोळ्यासमोर ठेवून या स्मारकाची बांधणी केलेली आहे. सुंदर कोरीवकाम केलेले खांब असलेल्या या जागेवर श्रीलंकेच्या स्वातंत्र्यदिनाचा समारंभ साजरा केला जातो.

स्वातंत्र्य स्मारकाचे काही फोटो...


स्वातंत्र्य स्मारक ०१

.


स्वातंत्र्य स्मारक ०२

.


स्वातंत्र्य स्मारक ०३

.


स्वातंत्र्य स्मारक ०४ : खांबांवरचे कोरीवकाम

.

गंगारामाया बौद्धमंदिर (Gangaramaya Temple)

हे प्राचीन व आधुनिक श्रीलंकन, भारतीय, थाई, व चिनी स्थापत्याचा संगम असलेले कोलंबोतले सर्वात जुने बौद्धमंदिर आहे. या मंदिराच्या परिसरात विहार, सेतिया (पॅगोडा), सीमा मालका (सभागृह), अवशेषकक्ष, संग्रहालय, ग्रंथालय, वसतिगृह, शाळा, भिक्षाकक्ष अश्या अनेक इमारती आणि एक बोधीवृक्ष आहे. या एकमेकाला लागून असलेल्या इमारतींच्या संकुलातून फिरताना आपण कोठून कोठे जात आहोत याबाबत बर्‍याचदा गोंधळ उडतो. पण इथे बघण्यासारख्या इतक्या गोष्टी खच्चून भरलेल्या आहेत की वस्तू बघताना त्या कोणत्या जागी आहेत हे समजले नाही तरी फारसा फरक पडत नाही.

या परिसरातून फिरताना काढलेले हे फोटो...

मंदिराच्या सुरुवातीलाच एक गणेशमूर्ती होती. पहिल्याच वेळेस हिंदू देवतेची मूर्ती बौद्धमंदिरात पाहून जरासे आश्चर्य वाटले.


गंगारामाया बौद्धमंदिर ०१ : गणेशमूर्ती

.


गंगारामाया बौद्धमंदिर ०२ : मुख्य बुद्धमूर्ती

.


गंगारामाया बौद्धमंदिर ०३ : मुख्य मूर्तीमागील आरास

मंदिरातील संध्याकाळच्या पूजेची वेळ झाली आणि मंदिराचे वादक बाहेर आले. त्यांच्या संगीताचा काही वेळ आनंद घेतला...


गंगारामाया बौद्धमंदिर ०४ : मंदिराचे वादक

.


गंगारामाया बौद्धमंदिर ०५

मंदिरातून निघून संग्रहालयाची फेरी सुरू केली. तेथे मंदिराला जगभरातून मिळालेल्या भेटी, जुने ग्रंथ, जुनी भूर्जपत्रे, मंदिराने वापरलेली जुनी छपाई यंत्रे, मंदिरात वाहिलेल्या अनेक देशाच्या चलनी नोटा, इत्यादी अनेक रोचक गोष्टी पहायला मिळाल्या.


गंगारामाया बौद्धमंदिर ०६ : भेट मिळालेली चिनी मातीची पात्रे

.


गंगारामाया बौद्धमंदिर ०७ : चीनमधून भेट मिळालेल्या मूर्ती ०१

.


गंगारामाया बौद्धमंदिर ०८ : चीनमधून भेट मिळालेली एक खास मूर्ती ०२

.


गंगारामाया बौद्धमंदिर ०९ : पूर्वी मंदिराने वापरलेले छपाईयंत्र

.

 ...
गंगारामाया बौद्धमंदिर १० व ११ : मंदिरात वाहिलेले परदेशी चलन

.

ग्रंथ आणि भूर्जपत्रे एकमेकावर अनास्थेने रचून ठेवलेली दिसली. ते दस्त महत्त्वाचे नसावे अथवा त्यांच्या उत्तम (संगकणीय) प्रती काढून ठेवलेल्या असाव्यात अशी तीव्र सदिच्छा मनात आली...

 ...
गंगारामाया बौद्धमंदिर १२ व १३ : जुने ग्रंथ आणि भूर्जपत्रे

.


गंगारामाया बौद्धमंदिर १४ : मंदिर परिसरात पूजाअर्चा करणारे भाविक

.


गंगारामाया बौद्धमंदिर १५ : मूर्ती, भित्तिचित्रे व भिंतीवरची नक्षी

.

इतका फेरफटका झाला तेव्हा चांगलाच अंधार पडायला लागला होता. दिवसभरता ५५०-६०० किलोमीटरचा प्रवास आणि अनेक आकर्षणांची पदयात्रा यामुळे आता हॉटेलवर जाऊन गरम शॉवर घेऊन पोटोबा करण्याची इच्छा प्रबळ झाली होती. त्याचबरोबर पुढच्या दिवशी पहाटे ४:५० वाजताचे विमान पकडण्यासाठी हॉटेलमधून दोनच्या सुमारास बाहेर पडायचे होते. अर्थातच हॉटेलच्या दिशेने कूच केले.

.

(समाप्त)
===================================================================

सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...   ०२ : औकानाची बुद्धमूर्ती...
    ०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी...   ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...
    ०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी...    ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...
   
०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान...                                       ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...
    ०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)...       १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...
    ११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी...   १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...
    १३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड...                              १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...
    १५ : याला राष्ट्रीय उद्यान...                                           १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...
    १७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो...                            १८ : कोलंबो... (समाप्त)

==================================================================
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================

प्रतिक्रिया

अमृत's picture

6 Jan 2016 - 3:58 pm | अमृत

आंबा आणि कोलंबोमधिल साम्याबद्दल _/\_

अत्रुप्त आत्मा's picture

6 Jan 2016 - 4:34 pm | अत्रुप्त आत्मा

अप्रतिम!

अजया's picture

6 Jan 2016 - 4:43 pm | अजया

संपली सहल:(
असंच होतं कोणतीही सहल संपताना!

पगला गजोधर's picture

6 Jan 2016 - 4:47 pm | पगला गजोधर

मस्त

प्रचेतस's picture

6 Jan 2016 - 4:55 pm | प्रचेतस

हा भागही खूप आवडला.
कोलंबो एकदम टुमदार शहर दिसते.

जगप्रवासी's picture

6 Jan 2016 - 6:29 pm | जगप्रवासी

तुमच्यामुळे घरात बसून विविध देश पाहायला मिळतात याबद्दल खूप खूप आभार. तुमचे प्रवासवर्णन अप्रतिम असते, ज्या जागेला भेट देणार त्या जागेचा संक्षिप्त इतिहास, जागेची विशेषता, तुमच्या दृष्टीकोनातून त्या जागेचं वैशिष्ट्य सर्वच अप्रतिम.

बोका-ए-आझम's picture

6 Jan 2016 - 6:36 pm | बोका-ए-आझम

फोटो सुंदरच. श्रीलंका शेजारी देश असूनही मराठीत फार कमी प्रवासवर्णनं आहेत त्यावर. पु.लं.च्या ' पूर्वरंग ' मधला श्रीलंकेचा उल्लेख आणि हे प्रवासवर्णन यावरून दिसणारा श्रीलंका देश खरोखर Emerald Isle वाटला.

ता.क. या मालिकेचं पुस्तक प्रकाशित करा ना.

श्रीलंका भेट छान झाली. या भागातील फोटू व वर्णन आवडले. चीनने कमलकुंड रंगमंदिराला मदत केलीये खरी पण ते तेवढेच नसावे असे वाटते. बाकी काही असो पण आता घेतली ना मदत मग त्यांनी भेटीदाखल दिलेल्या मूर्ती संग्रहालयात ठेवणे आले. ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Jan 2016 - 11:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

मंदिरातल्या मूर्ती वगैरे धार्मिक संबंधामुळे मिळालेल्या भेटी आहेत. त्या कम्युनिस्ट राजवट येण्याअगोदरच्या शेकडो वर्षांच्या कालखंडात मिळालेल्या आहेत. कमलकुंड रंगमंदिराला मिळालेली मदत ही अर्थातच "मोत्यांची माळ {String of Pearls (Indian Ocean)} या नावाच्या, भारताला चीनकडे झुकलेल्या देशांनी वेढा घालण्याच्या, चीनच्या रणनीतिचा भाग म्हणून अर्वचीन कालात मिळालेली आहे. त्या दोघांचा अर्थाअर्थी संबंध नाही :)

===============

अवांतर : काही काळापूर्वी बातम्यात असलेल्या दोन चिनी चाली याच "मोत्यांची माळ" रननीतीच्या भाग आहेत/होत्या : (अ) चीनने श्रीलंकेच्या हंबानतोता (Hambantota) बदराचा विकास करणे आणि (आ) अणुशक्तीवर चालणार्‍या चिनी पाणबुड्यांना श्रीलंकन बंदरात थांबण्याची परवानगी. परंतु, गेल्या सार्वत्रिक निवडणूकीत चीनकडे झुकाव असलेले माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्सा यांचा सद्य राष्ट्रपती मैत्रिपाला सिरिसेना यांनी पराभव केल्याने या रणनीतिला श्रीलंकेपुरती तरी खीळ पडली आहे.

पद्मावति's picture

6 Jan 2016 - 10:13 pm | पद्मावति

या सुंदर सहलीबद्दल धन्यवाद.

उत्तम सफर घडवलीत! धन्यवाद.
इतर अनेक देश फिरताना हा शेजारचा देश पहायचा विचारच येत नाही! खरं तर हाच एक शेजारी देश फिरायला सुरक्शित वाटतो. जेंव्हा श्रीलंकेला जाईन तेंव्हा ही लेखमाला मार्गदर्शक ठरेल.

राघवेंद्र's picture

7 Jan 2016 - 3:27 am | राघवेंद्र

धन्यवाद एक्का काका सुंदर मालिकेसाठी. पु. प्र. शु.

ओसु's picture

7 Jan 2016 - 5:53 am | ओसु

धन्यवाद. अजुन एका छान सफारी साठी.
श्रीलंका खरच छान आहे.

सुधीर कांदळकर's picture

7 Jan 2016 - 7:20 am | सुधीर कांदळकर

सुरेख जमले आहेत. सिगिरिया तर माटरपीस - चेरी ऑन केक. मालिका संपल्याची हुरहूर नेहमीप्रमाणे लागलीच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jan 2016 - 7:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व प्रतिसादक आणि वाचकांसाठी धन्यवाद !

रवीराज's picture

10 Mar 2016 - 9:49 pm | रवीराज

या वर्षी बेत जमणार असे दिसतेय. (तुमच्या लिखाणाने प्रेरित होऊन!)

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Mar 2016 - 10:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

उत्तम ! तुमच्या सफरीसाठी अनेक शुभेच्छा !!