==================================================================
सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन... ०२ : औकानाची बुद्धमूर्ती...
०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी... ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...
०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी... ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...
०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान... ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...
०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)... १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...
११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी... १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...
१३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड... १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...
१५ : याला राष्ट्रीय उद्यान... १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...
१७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो... १८ : कोलंबो... (समाप्त)
==================================================================
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================
आतापर्यंतचे अनुभव पाहता या अचानक ठरवलेल्या सहलीत पहिल्या अडीच दिवसातच श्रीलंकेने अपेक्षेपेक्षा जास्त आश्चर्य व आनंदाचे धक्के दिले होते. त्यामुळे, गाडी प्रसिद्ध कँडी शहराच्या दिशेने धावू लागली तेव्हा आता अजून कोणता अनुभवांचा खजिना पुढे येईल असाच विचार मनात होता.
मातालेची मसाल्याच्या झाडांची बाग (Matale Spice Garden)
दांबुलाकडून कँडीकडे जाताना एक तासभर (२५ किमी) अगोदर माताले नावाची जागा लागते. नकल्स पर्वतराजीने वेढलेले हे मध्यम आकाराचे शहर मसाल्यांच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. वाटेतच पडणार्या जागेवरच्या एका मसाल्याच्या बागेला भेट दिली. त्यातल्या मूळच्या मध्य व दक्षिण अमेरिकेतल्या जरा वेगळ्या, सहज बघायला न मिळणार्या झाडांचे हे काही फोटो...
ज्या ऑर्किड प्रकारच्या झाडापासून लोकप्रिय व्हॅनिला स्वाद बनविला जातो त्या व्हॅनिलाची वेल (Vanilla planifolia) व शेंगा...
मातालेची मसाल्याच्या झाडांची बाग : ०१ : व्हॅनिलाची वेल व त्याच्या शेंगा
.
ज्याच्या बियांपासून चॉकलेट बनवले जाते ते कोको झाड (Theobroma cacao; cacao tree; cocoa tree) व त्याचे पक्व फळ...
मातालेची मसाल्याच्या झाडांची बाग : ०२ : कोकोच्या झाडाचे खोड व त्यावरची लाल रंगाची फळे
(खोडाभोवती दिसणारी पाने त्या झाडाची नसून व्हॅनिला वेलीची आहेत)
.
ज्याच्यापासून कोकेन हा अमली पदार्थ बनवला जातो ते कोका झाड (Erythroxylaceae family च्या चार प्रजातींपैकी एक)...
मातालेची मसाल्याच्या झाडांची बाग : ०३ : कोका झाड
उगाच काही कल्पनाविलास करू नका, बागेचे रक्षक या झाडांचे उत्तम रक्षण करतात व पर्यटकांना त्याची पाने तोडू देत नाहीत. ;) :)
.
कँडी
मध्य श्रीलंकेत असलेले हे शहर इंग्लिशमध्ये कँडी, तमिळमध्ये कांडी आणि सिंहलामध्ये सेंकादागला सिरिवर्धना महानुवारा (जेथे ऐश्वर्य सतत वर्धिष्णू होते असे सेंकादागलाचे महानगर) या नावांनी ओळखले जाते. वसाहतवादी ब्रिटिश अमलाखाली जाण्याअगोदरच्या काळात हे शहर श्रीलंकेच्या राजांच्या शेवटच्या राजधानीचे ठिकाण होते. सद्या हे श्रीलंकेच्या मध्यप्रदेशाची (सेंट्रल प्रॉव्हिन्स) राजधानी व लोकसंख्येने सद्य राजधानी कोलंबोनंतर दुसर्या क्रमांकाचे शहर आहे. अर्थातच या शहराला राजकीय, धार्मिक व सांकृतिक महत्त्व आहे. हे युनेस्कोप्रणित जागतिक वारसा स्थान आहे.
तिसरा विक्रमबाहू (इ स १३५७ ते १३७४) याने सेंकादागलापुरा या नावाने या शहराची स्थापना केली. सुरुवातीला हे काही छोट्या व मांडलिक राज्यांची राजधानी होते. पोर्तुगीजांनी किनारपट्टीचा भाग काबीज केल्यावर इ स १५९२ मध्ये येथे श्रीलंकेची राजधानी हलवली गेली आणि तेथूनच पोर्तुगीज व डच आक्रमणाचा प्रतिकार केला गेला. इ स १८१५ पर्यंत कँडीच्या नायक घराण्याची सत्ता खिळखिळी झाली होती आणि २ मार्च १८१५ झालेल्या तहान्वये सर्व श्रीलंका (त्या काळाचे सिलोन) ब्रिटिश वसाहतीचा भाग झाली. श्रीलंकेचा शेवटचा राजा श्री विक्रम राजसिंहाला व त्याच्या वंशजांना बंदी करून दक्षिण भारतातील वेल्लोर येथे ठेवले गेले.
मातालेच्या बागेतून बाहेर पडून वाटेत जेवण करून कँडीला पोहोचायला दीड एक तास लागला. हे शहर विशाल कँडी सरोवराच्या काठावर, त्याच्या सभोवती असलेल्या टेकड्यांच्या उतारांवर व महावेली नदीच्या काठी असलेल्या हिरव्यागार परिसरात वसलेले आहे. सांस्कृतिक कार्यक्रम तीन वाजता सुरू होणार होता. त्यामुळे गाडी सरळ सरोवराकाठी असलेल्या कँडियन आर्ट असोशिएशनच्या थिएटरकडे वळवली. थिएटरकडे जाताना या सुंदर शहराच्या कँडी सरोवराभोवतीच्या मनोहर परिसराचे झालेले दर्शन...
कँडी : कँडी सरोवराचा परिसर ०१
.
कँडी : कँडी सरोवराचा परिसर ०२
.
कँडी : कँडी सरोवराचा परिसर ०३
.
कँडीचा सांस्कृतिक कार्यक्रम
कोहोंबा कांकरिया (Kohomba kankariya) किंवा कँडीची नृत्यकला मुख्यतः श्रीलंकेच्या मध्यप्रदेशाची (सेंट्रल प्रॉव्हिन्स) स्थानिक कला असली तरी ती सर्व श्रीलंकेत पसरली आहे. एका दंतकथेप्रमाणे, येथील एका राजाला त्याच्या राणीने त्याच्यावर चेटूक केल्याने दु:स्वप्ने पडू लागली. दक्षिण भारतातून आलेल्या तीन देवऋषींनी राजाचा उपाय करण्याच्या कर्मकांडाचा भाग म्हणून हे नृत्य केले. नंतर त्या नृत्याचा स्थानिक धार्मिक लोककलेत समावेश केला गेला. त्याच्या कलाकारांसाठी कँडीतील बुद्धदंतमंदिराशी संबंधित खास वेगळी जात निर्माण करण्यात आली. ब्रिटिश वसाहतीच्या कालखंडात या कलेचा राजाश्रय बंद झाल्याने ती दुर्लक्षित झाली. सद्यकालात पुनर्जीवन करून या कलेला श्रीलंकेच्या सांस्कृतिक व पर्यटन व्यवस्थेत महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे.
आकर्षक रंगीबेरंगी पारंपरिक पोशाख परिधान करून कँडियन आर्ट असोशिएशनच्या कलाकारांनी सादर केलेला हा कार्यक्रम आपल्याला श्रीलंकेच्या नृत्यवादन कलेची व स्थानिक संस्कृतीची सुंदर तोंडओळख करून देतो.
त्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे...
कँडीचा सांस्कृतिक कार्यक्रम ०१
.
कँडीचा सांस्कृतिक कार्यक्रम ०२
.
कँडीचा सांस्कृतिक कार्यक्रम ०३
.
कँडीचा सांस्कृतिक कार्यक्रम ०४
.
कँडीचा सांस्कृतिक कार्यक्रम ०५
.
कँडीचा सांस्कृतिक कार्यक्रम ०६
.
कँडीचा सांस्कृतिक कार्यक्रम ०७
.
कँडीचा सांस्कृतिक कार्यक्रम ०८
.
या कार्यक्रमाचा शेवटचा भाग आगीचे खेळ व निखार्यावरून चालणे हा होता...
कँडीचा सांस्कृतिक कार्यक्रम ०९
.
कँडीचा सांस्कृतिक कार्यक्रम १०
.
कँडीचा सांस्कृतिक कार्यक्रम ११
.
कँडीचे पवित्र दंतावशेषमंदिर
थिएटरमधून बाहेर पडलो होतो तेव्हा बर्यापैकी अंधार पडला होता. कँडीच्या बुद्धदंतावशेषमंदिराला भेट द्यायला हीच उत्तम वेळ आहे कारण या वेळेस संध्याकाळची पुजा पहायला मिळेल असे मार्गदर्शकाने सांगितले.
कँडीच्या या मंदिरात भगवान बुद्धाचा दात जतन केलेला आहे म्हणून याचे श्री दलादा मलिगावा (पवित्र दंतावशेष मंदिर) असे नाव पडले आहे. या अवशेषाला अनन्य धार्मिक-राजकीय महत्त्व असल्याने तो नेहमीच सत्तेवर असलेल्या राजघराण्याच्या ताब्यात राहिला आहे. अर्थातच, सद्याचे त्याचे स्थानही श्रीलंकेच्या शेवटच्या राजघराण्याच्या राजवाड्याच्या आवारातील त्याच्यासाठी खास बनवलेल्या या मंदिरात आहे.
या दंतावशेषाची कथा अशी आहे. हा दात भगवान बुद्धाचे मर्त्य शरीर चितेवर ठेवले असताना काढला गेला. हेमामाली नावाच्या एका भारतिय बौद्ध राजकन्येने तिच्या राज्यावर झालेल्या हिंदू राजाच्या आक्रमणानंतर भारतातून पळून जाताना इ स ३१३ मध्ये हा दात आपल्या केसात लपवून श्रीलंकेत आणला. बौद्ध श्रीलंकेत, अर्थातच, त्याचे मोठ्या भक्तीभावाने स्वागत केले गेले आणि त्याला किमती अवशेषपेटीत ठेवले गेले. प्रथम पोलोन्नरुवाच्या अटदागे या दंतावशेषमंदिरात ठेवलेला हा दात, राजधानी तेथून कँडी येथे हलवली गेल्यावर, नव्या राजधानीच्या जागी आणून खास त्याच्यासाठी बनवलेल्या मंदिरात स्थापन केला गेला. सुरुवातीचे लाकडी मंदिर १८ व्या शतकात पोर्तुगिजांबरोबर व डचांबरोबर झालेल्या युद्धांत नष्ट झाल्यावर, त्याचा नवीन दगडी मंदिर बांधून जिर्णोद्धार केला गेला.
दंतावशेषाची एका दुमजली इमारतीमध्ये असलेल्या गर्भागारात स्थापना केलेली आहे. तो सिंहासनावर ठेवलेल्या रत्नजडीत अवशेषपेटीमध्ये असलेल्या सोन्याच्या कमलात ठेवलेला आहे. या अवशेषाची, सकाळी, दुपारी व संध्याकाळी, अशी दिवसातून तीनदा पूजा केली जाते. बुधवारी त्याचे सुगंधित पाण्याने स्नान करून फुलांनी पूजा केली जाते. गर्भागारात फक्त काही मान्यवर जाऊ शकतात, सर्वसामान्यांना प्रवेश नाही, ते दुरुनच फक्त गर्भागाराच्या दरवाजाचे दर्शन घेऊ शकतात. काही खास समारंभांत या दाताची हत्तीवरून मिरवणूक काढली जाते.
या मंदिरामुळे राजवाड्याचा परिसर जागतिक वारसा स्थान घोषित केला गेला आहे. या मंदिराच्या एका भागात संगहालय आहे.
मंदिरात व संग्रहालयात काढलेले काही फोटो...
कँडीचे पवित्र दंतावशेषमंदिर : ०१ : मंदिराच्या एका बहिर्भागाचे दर्शन
.
कँडीचे पवित्र दंतावशेषमंदिर : ०२ : मंदिराच्या भिंतीवरचे बुद्धजन्माचे चित्र
.
कँडीचे पवित्र दंतावशेषमंदिर : ०३ : गर्भागाराच्या पुढचा मंडप
.
कँडीचे पवित्र दंतावशेषमंदिर : ०४ : गर्भागाराचे द्वार आणि त्यापुढचे मंदिराचे वादक
.
कँडीचे पवित्र दंतावशेषमंदिर : ०५
.
कँडीचे पवित्र दंतावशेषमंदिर : ०६
.
कँडीचे पवित्र दंतावशेषमंदिर : ०७ : एक बुद्धमूर्ती व तिच्याभोवतीची सजावट
.
कँडीचे पवित्र दंतावशेषमंदिर : ०८
.
कँडीचे पवित्र दंतावशेषमंदिर : ०९ : बाहेर पडण्याचा मार्ग
.
कँडीचे पवित्र दंतावशेषमंदिर : १० : बाहेर पडण्याच्या मार्गातील भित्तिचित्र व नक्षी
.
हॉटेलवर पोहोचून गरम गरम शॉवर घेऊन, जेवण करून, बिछान्यावर पडलो तेव्हा सहलिच्या चवथ्या दिवसात बघायचे पिन्नावाला येथिल हत्तींचे अनाथालय आणि लिट्ल इंग्लंड म्हणून ओळखले जाणारे नुवारा एलिया कसे असेल असा विचार करत झोपी गेलो.
(क्रमश : )
==================================================================
सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन... ०२ : औकानाची बुद्धमूर्ती...
०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी... ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...
०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी... ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...
०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान... ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...
०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)... १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...
११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी... १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...
१३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड... १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...
१५ : याला राष्ट्रीय उद्यान... १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...
१७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो... १८ : कोलंबो... (समाप्त)
==================================================================
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================
प्रतिक्रिया
24 Dec 2015 - 9:14 am | प्रचेतस
हा भागही आवडला.
बुद्धाला वाहिलेल्या फुलांचा वास घेउ नये असा आशय असलेली पाटी काळजाला भिडली.
बुद्धाचा दात काचेच्या पेटीत ठेवलाय किंवा कसे? कारण छायाचित्रात तो दिसत नाहीये. सर्वसामान्यांना त्याचे दर्शन घेता येते का?
24 Dec 2015 - 9:20 am | खटपट्या
+१
24 Dec 2015 - 1:43 pm | डॉ सुहास म्हात्रे
बुद्धाचा दात गर्भागारात एका खास अवशेषपेटीत ठेवलेला आहे. लिखाणाच्या ओघात त्याबद्दलचे काही तपशील राहून गेले होते. आता ते लेखातल्या "कँडीचे पवित्र दंतावशेषमंदिर" या शीर्शकाखाली जोडले आहेत.
या तृटीची आठवण दिल्याबद्दल धन्यवाद !
24 Dec 2015 - 10:30 am | अजया
वाचतेय.पुभाप्र.
24 Dec 2015 - 10:36 am | DEADPOOL
मस्त लिहलेय!
कँडीला काही रावणविषयी शिल्पे का गुहा काहीतरी आहे असे वाचले होते.
नीट आठवत नाहीये.
भिल्ल जातीच्या लोकांनी त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न केला होता म्हणे तिथे!
24 Dec 2015 - 1:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
सिता व रावणासंबंधी मिळालेली/बघितलेली माहिती पुढे येईल.
24 Dec 2015 - 6:24 pm | DEADPOOL
प्रतिक्षेत!
24 Dec 2015 - 1:02 pm | सुमीत भातखंडे
भाग पण मस्त.
प्रचेतस यांनी विचारलेला प्रश्न मलाही पडला.....त्या दाताचं दर्शन होत नाही का?
24 Dec 2015 - 1:59 pm | डॉ सुहास म्हात्रे
दंतावशेषाबद्दल व अजून काही जास्त माहिती "कँडीचे पवित्र दंतावशेषमंदिर" या शीर्शकाखाली जोडली आहे. कृपया, तो भाग परत वाचावा.
24 Dec 2015 - 7:18 pm | पद्मावति
हा भागही सुंदर झाला आहे. वाचतेय.
25 Dec 2015 - 8:30 am | मदनबाण
सुंदर फोटो... :)
मी असे ऐकले आहे की जो एकदा खर्या व्हॅनिला आइस्क्रीमची चव घेतो, त्याला नंतर इतर कुठल्याही इतर चवीचे आइस्क्रीम जास्त पसंतीस उतरत नाही. मला एकदा तरी वरिजनल व्हॅनिला आइस्क्रीम खायची लयं म्हणजी लयं इच्चा हाय बघा ! :)
{डार्क चॉकलेट प्रेमी} ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Come On Girls... ;) :- Anirudh
28 Dec 2015 - 6:54 pm | सुधीर कांदळकर
साडेतीन चार वर्षांपूर्वींच्या माझ्या स्मृतींना उजाळा मिळाला. तळ्यातले कारंजे, तळ्याभोबतालचा झोकदार वळणे घेणारा तो ऐटदार रस्ता, नाच्या कायक्रमाच्या शेवटी जायचे ते टुमदार स्टॅडियम आणि निखार्यावरून धावणे, आपल्याकडच्या काही देवस्थानांच्या यात्रेत असते तसे.
धन्यवाद.
29 Dec 2015 - 1:55 am | रेवती
एकदम रंगीत, संगीत वर्णन.
29 Dec 2015 - 1:07 pm | डॉ सुहास म्हात्रे
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे धन्यवाद !
29 Dec 2015 - 3:16 pm | अत्रुप्त आत्मा
दंतावशेषमंदिर :- जब्बरदस्त!