सिंहलव्दीपाची सहल : १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
26 Dec 2015 - 1:00 am

==================================================================

सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...   ०२ : औकानाची बुद्धमूर्ती...
    ०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी...   ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...
    ०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी...    ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...
   
०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान...                                       ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...
    ०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)...       १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...
    ११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी...   १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...
    १३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड...                              १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...
    १५ : याला राष्ट्रीय उद्यान...                                           १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...
    १७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो...                            १८ : कोलंबो... (समाप्त)

==================================================================
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================

हॉटेलवर पोहोचून गरम गरम शॉवर घेऊन, जेवण करून, बिछान्यावर पडलो तेव्हा सहलीच्या चवथ्या दिवसात बघायचे पिन्नावाला येथील हत्तींचे अनाथालय आणि लिट्ल इंग्लंड म्हणून ओळखले जाणारे नुवारा एलिया कसे असेल असा विचार करत झोपी गेलो.

सकाळी जाग आल्यावर माझ्या नेहमीच्या सवयीने खिडकीचा पडदा दूर करून बाहेर डोकावलो. मागच्या हॉटेलप्रमाणे या हॉटेलचा परिसरही सुंदर असल्याचे दिसले. श्रीलंकेच्या सर्वात मोठ्या महावेली नदीच्या काठी आणि विषुववृत्तीय पर्जन्यारण्याच्या हिरवाईत गुरफटलेला मनोहारी परिसर दिसला. मग काय, भराभर आवरून आणि भरपेट न्याहारी करून कॅमेरा घेऊन शिकारीवर निघालो.

तेव्हा टिपलेली ही काही सावजे...


महावेली नदीचा परिसर ०१

.


महावेली नदीचा परिसर ०२

.


महावेली नदीचा परिसर ०३

.


महावेली नदीचा परिसर ०४

.


महावेली नदीचा परिसर ०५

सिंहली भाषेमध्ये महावेली नदी म्हणजे वालुकायुक्त महानदी (Great Sandy River). तमीळमध्ये तिला महावली गंगाई म्हणतात. बंगालच्या उपसागराला मिळणारी ही ३३५ किमी लांबीची नदी श्रीलंकेतली सर्वात मोठी नदी आहे. हिचा पाणलोट श्रीलंकेचे २०% श्रेत्रफळाला सुजलाम सुफलाम करतो. या नदीच्या मुख्य प्रवाहावर आणि उपनद्यांवर अनेक धरणे बांधून जलतुटवडा असणार्‍या भागांना पाणीपुरवठा केलेला आहे. त्यातल्या सहा धरणांवर चालणारी जनित्रे श्रीलंकेची ४०% वीज निर्माण करतात.

***************

आजचा, चवथ्या दिवसाचा, कार्यक्रम असा होता...


सिंहलव्दीपाची सहल : चवथा दिवस : कँडी --> पिन्नावाला येथील हत्तींचे अनाथालय --> मध्य श्रीलंकेच्या पहाडांतल्या चहाच्या बागांच्या रमणीय प्रदेशातून प्रवास --> नुवारा एलिया (Little England) (वस्ती) (मूळ नकाशा जालावरून साभार)

***************

मार्गदर्शक गाडी घेऊन आला आणि आम्ही पाचूच्या जंगलातून पिन्नावाला हत्ती अनाथालयाकडे निघालो...


कँडीकडून पिन्नावालाकडे जाताना ०१

.


कँडीकडून पिन्नावालाकडे जाताना ०२

.


कँडीकडून पिन्नावालाकडे जाताना ०३

.


कँडीकडून पिन्नावालाकडे जाताना ०४

.


कँडीकडून पिन्नावालाकडे जाताना ०५

.

निसर्गसौंदर्याने रसरसलेल्या या भागातून प्रवास करताना सव्वा तास कधी संपला आणि पिन्नावाला कधी आले हे कळलेच नाही.

***************

पिन्नावाला हत्ती अनाथालय

महा ओया नदीच्या काठावर नारळाच्या झाडांनी भरलेल्या २५ एकर आवारात श्रीलंका वन्यजीव खात्याने (Sri Lanka Wildlife Department) हे हत्तींचे अनाथालय १९७५ साली सुरू केले. याची सुरुवात मातेचा मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या जंगली हत्तीच्या पिल्लांची काळजी घेण्यासाठी झाली. ब्रिटिशांनी वसाहतवादाच्या कालात शिकारीच्या खेळाच्या नावाखाली हत्तींची अनिर्बध कत्तल केली गेली. या काळाच्या हत्तींची संख्या ३०,००० वरून कमी होऊन ती प्रजाती श्रीलंकेतून नष्ट होण्याच्या उंबर्‍यावर पोहोचली होती. त्याचा एक उपाय म्हणून इ स १९७८ मध्ये या अनाथालयाला राष्ट्रीय प्राणी उद्यान विभागाकडे (National Zoological Gardens) हस्तांतरित करून त्याच्या कामाचे स्वरूप विस्तारित केले गेले व इ स १९८२ मध्ये हत्तींची संख्या वाढविण्यासाठी कृत्रिम संवर्धन प्रकल्प सुरू केला गेला आहे. एकाच ठिकाणी जगातील सर्वात जास्त पाळीव हत्ती असलेली ही जागा आहे असा या संस्थेचा दावा आहे. सद्या श्रीलंकेतील सर्व (जंगली व पाळीव) हत्तींची संख्या ३,००० च्या घरात पोहोचली आहे.

अनाथालयातल्या हत्तींना दिवसातून दोनदा नदीवर पाणी पिण्यासाठी व अंघोळीसाठी नेले जाते. यावेळी मोठ्या हत्तींपासून बाटलीतून दूध पिणार्‍या पिलांपर्यंत हत्तींच्या सर्व वयोगटांचे जवळून दर्शन होते. अर्थातच हा सोहळा एक मोठे पर्यटक आकर्षण आहे.

ही त्या सोहळ्याची काही क्षणचित्रे...


पिन्नावाला हत्ती अनाथालय स्नानसोहळा : ०१

.


पिन्नावाला हत्ती अनाथालय स्नानसोहळा : ०२

.


पिन्नावाला हत्ती अनाथालय स्नानसोहळा : ०३

.


पिन्नावाला हत्ती अनाथालय स्नानसोहळा : ०४

.


पिन्नावाला हत्ती अनाथालय स्नानसोहळा : ०५

.


पिन्नावाला हत्ती अनाथालय स्नानसोहळा : ०६

.

येथून पुढे श्रीलंकेचा सर्वात उंच आणि थंड असलेल्या पिडुरुतालागला (Pidurutalagala) पर्वतराजीत वसलेल्या नुवारा एलिया या सुंदर शहराच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला.

अचानक गाडीने एक वळण घेतले आणि ती एका कपारीत असलेल्या भल्यामोठ्या छिद्रातून (किंवा बालबोगद्यातून) पुढे गेली. मागच्या काचेतून तिकडे बघितल्यावर गाडी ताबडतोप थांबवून कॅमेरा सरसावून बाहेर पडलो...


पिन्नावालाकडून नुवारा एलियाकडे जाताना ०१

इथून पुढे गाडी अधिकाधिक उंचीवर जाऊ लागते आणि हिरवाई वाढू लागते...


पिन्नावालाकडून नुवारा एलियाकडे जाताना ०२

या परिसरातील हवामान चहाच्या मळ्यांकरिता योग्य आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या टेकड्या चहाच्या मळ्यांनी भरलेल्या आहेत.


पिन्नावालाकडून नुवारा एलियाकडे जाताना ०३

.


पिन्नावालाकडून नुवारा एलियाकडे जाताना ०४

.


पिन्नावालाकडून नुवारा एलियाकडे जाताना ०५

.


पिन्नावालाकडून नुवारा एलियाकडे जाताना ०६

***************

चहा फॅक्टरी

वाटेत आम्ही एका चहा फॅक्टरीला भेट दिली. तेथील मॅनेजरने सर्व फॅक्टरीभर फिरवून चहाची तोडलेली पाने फॅक्टरीत आल्यापासून त्यांच्यापासून बाजारात विकण्याजोगी चहा कसा बनवला जातो याची संपूर्ण प्रक्रिया दाखवली.


चहाची फॅक्टरी ०१ : प्रवेशमार्ग

.


चहाची फॅक्टरी ०२ : फॅक्टरी इमारत

आपण पितो तो चहा म्हणजे, "चहाच्या झाडाची पाने तोडा, ती वाळवून त्यांचा चुरा करा आणि पॅकेटमध्ये भरून विका", यापेक्षा खूपच जास्त गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून जाऊन आपल्यापर्यंत पोहोचतो, हे अमूल्य ज्ञान या चहाच्या फॅक्टरीच्या भेटीत झाले. फॅक्टरीच्या मॅनेजर साहेबांच्या सांगण्यावरून चहाच्या हिरव्या पानाची चव घेतली॑ आणि त्वरित ध्यानात आहे की, "चहाच्या पानांवर प्रक्रिया केली नसती तर चहा पिण्याच्या लायक झाला नसता व त्याचा जगाच्या इतिहासावर जो प्रचंड प्रभाव पडला ते सारे राजकारणच झाले नसते" !

चहाच्या झाडावरच्या पानांपासून आपण पीत असलेला अनेकविध ब्रँडचा व चवींचा चहा खोक्यांत भरून दुकानांत येण्यापूर्वी त्यावर जी प्रक्रिया होते, तिच्यातल्या मुख्य पायर्‍या खालीलप्रमाणे आहेत :

१. तोडणी (Plucking): चहाच्या झाडाच्या (Camellia sinensis) पानाची तोडणी सर्वसाधारणपणे वसंत ऋतूच्या सुरुवातीला व ग्रीष्म ऋतूच्या सुरुवातीला अशी दोनदा करतात. हे काम केवळ हातानेच करावे लागते. कारण, "फांदीच्या टोकाचा पानाचा कोंब आणि त्याखालची दोन पाने" यांनीच उत्तम प्रतीचा चहा बनतो. मशीनने तोडलेल्या चहात इतर पाने आल्यास त्याची प्रत तेवढी वरची राहत नाही.

२. वाळवणी (Withering/ Wilting) : यामधे सपाट पृष्ठभागावर पाने पसरून ठेवली जातात. पानांतल्या एन्झाईम्समुळे त्यांचे ऑक्सिडेशन होऊन ती वेडीवाकडी होतात व बाष्प उडून गेल्याने ती वाळू लागतात. या पायरीत पानातील प्रोटिन्सचे अमायनो अ‍ॅसिड्समध्ये विभाजन होते, तसेच कॅफिनचे प्रमाणही वाढते. या दोन गोष्टींमुळे चहाची चव तयार व्हायला सुरुवात होते. या पायरीच्या शेवटापर्यंत पानांचे २५% तरी वजन कमी झालेले असते.

३. चलनवलन (Disruption) : या पायरीत, यंत्रे वापरून पानांना सतत हालवत ठेवून, वरखाली हालवून, तुकडे करून आणि चुरून ऑक्सिडेशनचे प्रमाण वाढविले जाते. यामुळे चहाची चव अजूनच बदलते.

४. ऑक्सिडेशन व फरमेंटेशन (Oxidation / Fermentation) : पानांचा चुरा हवामान (मुख्यतः तापमान व बाष्प) नियंत्रित केलेल्या खोल्यांत पुढचे ऑक्सिडेशन व फरमेंटेशन होण्यासाठी कोणताही हस्तक्षेप न करता ठेवतात. येथे क्लोरोफिलचे विभाजन होते आणि टॅनिन तयार होते. या पायरीवर नियंत्रण ठेवून (वेगवेगळ्या रंग, चव आणि कडकपणाचे प्रमाण मिळवून) चहाचे वेगवेगळे प्रकार बनवले जातात :
(अ) ५ - ४० % ऑक्सिडेशन : सौम्य (लाइट) चहा.
(आ) ६० - ७०% ऑक्सिडेशन : मध्यम कडक (डार्कर) चहा.
(इ) १००% ऑक्सिडेशन : काळा / कडक (ब्लॅक) चहा.

५. फिक्सेशन किंवा किल्-ग्रीन किंवा शेकिंग (हा शेवटचा शब्द इंग्लिश नसून चिनी आहे; 殺青) : या पायरीमध्ये ऑक्सिडेशन ठरवलेल्या स्तराला पोचले की मंद उष्णता देऊन ते थांबवले जाते. अंतिम उत्पादनाला हवी ती योग्य चव येण्यासाठी ही प्रक्रिया फार महत्त्वाची आहे. यामध्ये पाने अधिक सुकतात.

६. भाजणे / पीतकरण (Sweltering / Yellowing) : या पायरीत पाने ६ ते ८ तास हलकीशी (साधारण ३७ डिग्री सेंटीग्रेड) भाजल्याने त्यांचा मूळचा हिरवा रंग नाहीसा होऊन ती पिवळी पडतात. या पायरीत पानांतील अमायनो अ‍ॅसिड्स व पॉलिफेनॉल्स यांच्या रासायनिक क्रिया होऊन चहाची चव अधिक सुधारते.

७. लाटणे (Rolling / Shaping) : अर्धवट सुकलेली पाने हलक्या दाबाने लाटल्याने पाने चुरडली जाऊन त्यांच्यातील रस व सुगंधी तेले बाहेर येतात. यामुळे चहाची चव अजून बदलते. या पायरीत वेगवेगळी यंत्रे वापरून चहाच्या पानांचे वेगवेगळ्या आकाराचे गठ्ठे बनवले जातात.

८. वाळवणे (Drying) : ही क्रिया यांत्रिक मदतीने अथवा नैसर्गिक सूर्यप्रकाश वापरून केली जाते. या पायरीतही पानातील अनेक रसायने बाहेर येतात. अर्थातच, चहाला हवी ती चव येण्यासाठी या पायरीवर उत्तम नियंत्रण असणे आवश्यक असते.

९. एजिंग / क्युअरिंग (Aging / Curing) : ही पायरी फक्त काही विशिष्ट प्रकारच्या चहांमध्ये (green tea, puerh, इत्यादी), त्यांची चव सुधारण्यासाठी, वापरतात. या पायरीत, चहावर बाह्य सुगंध व चवींचे फवारे मारून, काही खास चवींचे (Flavoured teas) चहा बनवले जातात.

१०. चव बघणे (Tasting) : फॅक्टरी किंवा कंपनीच्या प्रयोगशाळेत खास कसबी तज्ज्ञ (टेस्टर) चहाची चव तपासून त्याचे वर्गीकरण करतात व त्याची प्रत ठरवतात.

एवढे सगळे झाल्यानंतर चहा आकर्षक पुड्यांत किंवा डिपबॅग्जमध्ये भरून तुमच्या आवडीच्या दुकानात पाठवायला तयार होतो !

चहा फॅक्टरीतील प्रक्रियेच्या काही पायर्‍यांची चित्रे...


चहाची फॅक्टरी ०३ : चहा बनवण्याच्या प्रक्रियेतील काही पायर्‍यांची चित्रे

.

फॅक्टरीची फेरी संपल्यावर तिच्या स्वागतकक्ष व विक्रिगृहात त्यांनी प्रेमाने देऊ केलेल्या चहाचा आस्वाद घेतला. फॅक्टरीच्या सुंदर आवारात काही फोटो काढल्याशिवाय राहवले नाही...


चहाची फॅक्टरी ०४ : फॅक्टरीचे आवार

***************

येथून पुढचा प्रवास सुरू झाल्यावर एकदम वेगळ्याच परिसरात आल्यासारखे वाटू लागले. आतापर्यंत पाहिलेला श्रीलंकेचा सर्वच भाग सुंदर हिरव्यागार जंगलाने भरलेला होता. इथून पुढे त्याच्यावर वरताण करणारे सौंदर्य दिसू लागले. या डोंगराळ भागात, गाडी जसजशी अधिकाधिक उंचीवर जाऊ लागली, तसतशी भोवतालच्या पर्वतराजीचे व त्यावरच्या वृक्षराजीचे स्वरूप बदलू लागले. निसर्गसौंदर्य अधिकाधिक सुंदर होऊ लागले... जणू या भागाला "लिट्ल इंग्लंड" का म्हणतात याचे पुरावे आता निसर्ग देऊ लागला होता ! अर्थातच, या भागातले सर्वात मोठे आणि सर्वात सुंदर नुवारा एलिया हे शहर पहाण्याचे वेध लागले होते.

.

(क्रमश : )

==================================================================

सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...   ०२ : औकानाची बुद्धमूर्ती...
    ०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी...   ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...
    ०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी...    ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...
   
०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान...                                       ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...
    ०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)...       १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...
    ११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी...   १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...
    १३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड...                              १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...
    १५ : याला राष्ट्रीय उद्यान...                                           १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...
    १७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो...                            १८ : कोलंबो... (समाप्त)

==================================================================
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================

प्रतिक्रिया

भरपूर हिरवाई पाहून छान वाटले. हत्तींचे अनाथालय आवडले. षौक म्हणून हत्तींची शिकार करणार्‍यांनी केली पण त्यांची संख्या सुधारायला किती वर्षे जातायत हे पाहून वाईट वाटते. असो. आता अनाथालयामुळे का होईना त्यांना संरक्षण मिळतेय.

यशोधरा's picture

26 Dec 2015 - 7:49 am | यशोधरा

ह्या भागाची वाट बघत होते, हत्तींचं अभयारण्य बघायला गेला होतात का, ते विचारणारच होते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Dec 2015 - 12:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे हत्तींचे अनाथालय आहे. हत्तींचे अभयारण्याचे वर्णन व फोटो कौडुल्ला राष्ट्रीय उद्यानच्या सहलीत आले आहेत आणि पुन्हा याला राष्ट्रीय उद्यानाच्या सहलीतही येतील.

हां, अनाथालय म्हणायला मला नको वाटलं.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Dec 2015 - 4:01 pm | अत्रुप्त आत्मा

अभयारण्यातले हत्ती पाहिल्यावर मी केलेला हत्तीजप..हा खरा इथे हे हत्तीस्नान पाहिल्यावर पूर्ण झाला. ;) केव्हढे आहेत स्गळे ..मज्जा मज्जा वाट्टिये बघायला.. (हत्ती..हत्ती..हत्ती..हत्ती..हत्ती..! - ह्या ह्या ह्या! )

चहावारी सुद्धा अत्यंत आवडली आहे,हे.वे.सां.न.ल. :)

पद्मावति's picture

26 Dec 2015 - 6:39 pm | पद्मावति

मस्तं वर्णन. ती हत्तीची पिल्ले केव्हडी क्यूट आहेत, पुन्हा पुन्हा फोटो बघावेसे वाटताहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Dec 2015 - 6:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉक्टरसाहेब वाचतोय हं. छायाचित्र एक नंबर.

-दिलीप बिरुटे

नेत्रसुखद भाग! प्रचंड सुंदर..!

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Dec 2015 - 11:37 am | डॉ सुहास म्हात्रे

सर्व वाचकांसाठी आणि प्रतिसादकांसाठी धन्यवाद !

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Dec 2015 - 3:32 pm | ज्ञानोबाचे पैजार

मस्त..... मजा येते आहे लेखमाला वाचताना आणि नयनरम्य फोटो पहाताना.
पुभाप्र

पैजारबुवा

विलासराव's picture

27 Dec 2015 - 9:36 pm | विलासराव

वाचतोय.
अर्थातच सफर तुमच्याबरोबर आम्हीही फिरतोय असे वाटण्याईतके फोटो प्रभावी आलेत.

सुधीर कांदळकर's picture

28 Dec 2015 - 6:59 pm | सुधीर कांदळकर

मी न पाहिलेली ठिकाणे तुमच्या चष्म्यातून पाहणे एक सुखद नेत्रसोहळा आहे. एक अपूर्व अनुभव. हत्तींची चित्रे पाहून बालपण जागे झाले.

धन्यवाद.