==================================================================
सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन... ०२ : औकानाची बुद्धमूर्ती...
०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी... ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...
०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी... ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...
०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान... ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...
०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)... १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...
११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी... १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...
१३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड... १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...
१५ : याला राष्ट्रीय उद्यान... १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...
१७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो... १८ : कोलंबो... (समाप्त)
==================================================================
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================
सिगिरिया किंवा सिंहगिरिया (Lion Rock)
(मागील भागावरून पुढे चालू)
..."सिंहप्रस्तराची अर्धीच उंची गाठली आहे आणि अजून बरेच काही पाहायचे बाकी आहे" याची जाणीव मार्गदर्शक करून देतो आणि गुहांतून खाली उतरून आपण दर्पणभित्तिकेच्या संरक्षणात पुढचे मार्गक्रमण सुरू करतो.
दर्पणभित्तिकेतला मार्ग संपला की तो प्रस्तराला वळसा घालून उजवीकडे वळतो. तेथून परत उभ्या चढाच्या पायर्यांचा टप्पा सुरू होतो. हा तुलनेने लहानसा टप्पा आपल्याला प्रस्तराच्या उत्तरकड्यावरील अर्ध्या उंचीवर असलेल्या एका पठारावर घेऊन जातो. या पायर्यांच्या डावीकडे, कड्याच्या अगदी टोकापर्यंत पोहोचलेल्या, एका उतारावरील उद्यानाचे अवशेष दिसतात.
पायर्या संपून या मध्यम आकाराच्या सिंहपठारावर पोहोचल्यावर समोर एक उंच भिंत येते. तिला वळसा घालून पुढे गेल्यावर सिगिरियातिल सर्वात अचाट आकर्षण, सिंहपायर्या... ज्याच्यामुळे या राजधानीला सिगिरिया (सिंहगिरिया) हे नाव पडले आहे ते... अचानक समोर येते...
सिगिरिया : प्रस्तराच्या उत्तरेकडून विहंगम दर्शन : (चित्राच्या मध्यावर उजवीकडे) पठारावर नेणार्या पायर्या, खालच्या उजव्या कोपर्यात उतारावरच्या उद्यानाचे अवशेष, सिंहपठार, सिंहपायर्या, तेथून प्रस्तरमाथ्यावर नेणार्या पायर्या आणि प्रस्तरमाथ्यावरचे आकाशमहालाचे अवशेष.
(श्रीलंकेच्या मध्यवर्ती सांस्कृतिक कोशाच्या प्रकाशनातून साभार)
.
सिंहपायर्या (Lion Staircase)
प्रस्तरमाथ्यावरील राजवाड्याकडे नेणार्या या पायर्यांना सिंहपायर्या म्हणतात कारण पूर्वी त्यांच्याभोवती, बसलेल्या सिंहाचे शीर व शरीराच्या पुढच्या काही भागाचे भव्य शिल्प होते. आताच्या अवशेषांवरून ही मूर्ती ३५ मीटर (हल्लीच्या १२-१३ मजल्यांच्या इमारतीइतकी) उंच, २१ मीटर रुंद व पुढून मागच्या कड्यापर्यंत ११ मीटर लांब होती असा अंदाज आहे. या शिल्पाच्या आत सिंहद्वाराचे व्यवस्थापन व संरक्षण करणारे कार्यालयही होते. सिंहपायर्यांत अनेक फसवी दारे होती व ती वेड्यावाकड्या जिन्यांच्या साहाय्याने मूर्तीतल्या वेगेवेगळ्या खोल्यांकडे व इतर बाह्य दारांकडे घेऊन जात असत. पायर्यांच्या तळाला चंद्रशीला आहे. काश्यपाच्या पराभवानंतर पाचव्या शतकाच्या शेवटी दुरवस्थेत गेलेले हे स्थापत्य नवव्या शतकापर्यंत (३०० वर्षांनंतरही) उत्तम अवस्थेत होते असे दर्पणभित्तिकेवरील एका काव्यात केलेल्या त्याच्या वर्णनावरून समजते.
प्राचीन स्थापत्यकारांनी १५०० वर्षांपूर्वी बनवलेल्या या शिल्पाची त्यानंतर मात्र बरीच हानी झालेली आहे. सद्या त्या सिंहाचे अजस्र पंजे आणि पायर्यांच्या बाजूचे वीटकाम इतकेच अवशेष उरलेले आहेत. असे असले तरी त्या उरलेल्या अवशेषांवरून मूळ मूर्तीच्या भव्यतेचा सहज अंदाज येतो आणि थक्क व्हायला होते...
सिगिरिया : (त्यांच्या भव्यतेची कल्पना येण्यासाठी मानवाकृतींबरोबर) सिंहपायर्या
.
सिगिरिया : (त्यांच्या भव्यतेची कल्पना येण्यासाठी मानवाकृतींबरोबर) सिंहाचा उजवा पंजा
पंजा इतका भव्य आहे तर संपूर्ण शिल्प सुस्थितीत असल्यावर ते किती प्रभावशाली असेल याचा विचार करण्यात काही काळ मती गुंग होते ! अर्थातच या सिंहाला अनेक ग्रंथ आणि काव्यांतील वर्णनांत अभिमानाचे स्थान मिळालेले आहे. सिंहलावंशाचे प्रतीक असलेली ही सिंहमूर्ती जेव्हा पूर्णावस्थेत होती व क्षितिजापर्यंत पसरलेल्या जंगलांवर आपल्या स्वामित्वाचा ठसा उमटवत वैभवाने तळपत होती, तेव्हा ते दृश्य निःसंशयपणे केवळ शत्रूंनाच नव्हे तर मित्रांनाही भयचकित करणारे असणार !!
सिगिरिया : सिंहद्वाराच्या सद्याच्या अवशेषांच्या आधारे बनवलेले कल्पनाचित्र (जालावरून साभार)
.
सिंहपायर्या आपल्याला शेवटच्या, सर्वात मोठ्या आणि सर्वात जास्त तीव्र चढ असलेल्या पायर्यांच्या टप्प्याकडे नेतात. या टप्प्यातील पायर्या बर्याच ठिकाणी तुटलेल्या किंवा झिजलेल्या आहेत व त्यांच्या जागी पर्यटकांच्या सोयीसाठी धातूच्या शिड्या उभारलेल्या आहेत...
सिगिरिया : सिंहप्रस्तरावरची चढाई (जालावरून साभार)
दमछाक होत असली तरी, शिड्यांना असलेल्या संरक्षक कठड्यांमुळे, ही चढाई धोकादायक नाही. आजूबाजूचा परिसर इतका चित्ताकर्षक आहे की मध्ये मध्ये थांबून आपल्याला त्याच्याकडे बघण्याची व फोटो काढायची ऊर्मी आवरत नाही...
सिगिरिया : सिंहप्रस्तरावर चढाई करताना दिसणारे सिंहपठाराचे दृश्य
.
आकाशमहाल (सिंहप्रस्तरमाथ्यावरचा राजवाडा)
सिगिरिया शहराच्या मध्यबिंदूवर असलेल्या सिंहप्रस्तरमाथ्यावर उभे राहण्याचा अनुभव केवळ अवर्णनीय असतो. तिथल्या भन्नाट गार वार्यात उभे राहून आजूबाजूच्या हिरव्यागार परिसरावर नजर फिरवताना जणू हे सगळे आपलेच राज्य आहे असा एखादा विक्षिप्त विचारही मनाला शिवून जातो !
तळापासून २०० मीटर व समुद्रसपाटीपेक्षा ३६० मीटर उंचीवर असलेल्या या राजवाड्याला सार्थपणे आकाशमहाल असेही म्हणतात. आकाशमहालाचे अवशेष जरी मुख्यतः चौथर्यांच्या रूपात असले तरी हे चौथरे अजूनही उत्तम अवस्थेत आहेत व त्यांच्यावरून राजवाड्याच्या इमारतींच्या भव्यतेची व आजूबाजूच्या उद्यानांची कल्पना करता येते. हे श्रीलंकेतील आज शिल्लक असलेल्या प्राचीन राजवाड्यांपैकी सर्वात जुने व सर्वात जास्त चांगल्या अवस्थेत असलेले अवशेष आहेत.
हे अवशेष असेच दर्शवितात की स्थापत्यकारांनी अंदाजे १.५ हेक्टर (३.७ एकर) क्षेत्रफळापैकी सर्व दिशांनी प्रस्तरमाथ्याचा कड्याच्या टोकापर्यंतचा वापरण्याजोगा प्रत्येक चौरस सेंटिमीटर वापरलेला आहे. (हे पाहून आजच्या आधुनिक शहरी स्थापत्यकारांचीही मान खाली जावी !) खालचे चित्र मी काय म्हणतो आहे याची चांगली कल्पना देईल...
सिगिरिया : प्रस्तराच्या दक्षिणेकडून विहंगम दर्शन : सिंहप्रस्तरमाथ्यावरचे अवशेष
(श्रीलंकेच्या मध्यवर्ती सांस्कृतिक कोशाच्या प्रकाशनातून साभार)
प्रस्तरमाथ्यावरील राजवाड्याच्या व इतर अवशेषांची काही चित्रे...
सिंहप्रस्तरमाथ्यावरचे आकाशमहालाचे अवशेष ०१
.
सिंहप्रस्तरमाथ्यावरचे आकाशमहालाचे अवशेष ०२
.
सिंहप्रस्तरमाथ्यावरचा तलाव (श्रीलंकेच्या मध्यवर्ती सांस्कृतिक कोशाच्या प्रकाशनातून साभार)
.
राजदरबार / धर्मसभागार (Assembly Hall)
सिंहप्रस्तरावरून उतरून खाली आल्यावर त्याच्या उतारावरच कातळात कोरून काढलेली सभागाराची जागा आहे. ही सर्व जागा आणि तेथिल आसन दोन्हीही एकाच कातळात कोरलेले आहे. ही जागा राजा काश्यपाच्या कारकीर्दीत राजदरबारासाठी आणि नंतर धार्मिक सभांसाठी वापरली जात असे. येथे जाण्यासाठी, सिंहप्रस्तराकडून जाणारा राजा व मंत्र्यांकरिता एक आणि इतरांना जाण्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराकडून जाणारा एक, असे दोन मार्ग आहेत. कातळात कोरलेले खड्डे पाहून सभागाराचे छत लाकडी खांबांवर होते हे समजते. सभागाराच्या व आसनाच्या कोरीवकामातील सुबकता, कोरीवकाम करताना काही कोनांना दिलेली गोलाई आणि इतर नक्षीदार कलाकुसर पाहता हे सगळे काम कसबी कलाकारांनी केले असावे हे दिसून येते...
सिगीरिया : सभागार
.
समुपदेशकक्ष / साधनागळ (Discussion Room)
राजदरबाराच्या बाजूलाच कातळात एक छोट्या घळीसारखा भाग कोरलेला आहे. घळीच्या एकसंध कातळात एक दगडी आसन बनवलेले आहे. राजा काश्यप ही जागा राजदरबाराच्या अगोदर अथवा नंतर, मंत्री व इतर वरीष्ठ लोकांशी, खास सल्लामसलत करण्यासाठी वापरत असे. काश्यपाच्या अगोदरच्या व नंतरच्या काळात ती धार्मिक साधनेसाठी वापरली जात असे…
सिगिरिया : साधनाघळ
.
भुजंगफणाघळ (Cobra Hood Rock)
समुपदेशकक्षापासून थोड्याच अंतरावर असलेल्या या प्रस्तररचनेचे हे नाव तिच्या नागाच्या उभारलेल्या फण्यासारख्या आकारामुळे पडले आहे. फण्याच्या कोरीव आकाराचा काही भाग नैसर्गिक आघातांनी तुटून पडला आहे. या फण्याखालच्या भागात एक नैसर्गिक घळ आहे. येथील शिलालेखावरून हे ठिकाण काश्यपकालाच्या अगोदरपासून बौद्धभिक्कूंच्या वापरात होते...
सिगिरिया : भुजंगफणाघळ ०१
.
सिगिरिया : भुजंगफणाघळ ०२
त्या घळीचे एक विशेष म्हणजे तेथे असलेली ५व्या शतकातली भित्तिचित्रे आणि रंगीत नक्षी. अनवस्थेने आणि निसर्गाच्या आघातांनी बहुतेक रंगकामाला मोठी हानी पोहोचलेली असली तरी काही ठिकाणी त्याचे अवशेष दिसतात…
सिगिरिया : भुजंगफणाघळीच्या भिंतीवरची नक्षी
.
सिगिरिया प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय, केवळ त्यासंबंधी वाचून अथवा चित्रे पाहून, ते नक्की किती अत्युच्च प्रतीचे आश्चर्य आहे, हे कळणे कठीण आहे. त्यातही, हे आश्चर्य १५०० पेक्षा जास्त वर्षांपूर्वी, पाचव्या शतकात, उभारले गेले हे आठवले की होणार्या मनाच्या अवस्थेचे वर्णन करायला "आश्चर्याने थक्क होणे" हा वाक्प्रकार अत्यंत थोटा वाटू लागतो !
******
गाडी दांबुला येथिल गुंफामंदिराच्या दिशेने धावू लागली तेव्हा मन एका अनपेक्षित अनवट अनुभवाच्या आनंदाने भरलेले होते.
(क्रमश : )
==================================================================
सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन... ०२ : औकानाची बुद्धमूर्ती...
०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी... ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...
०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी... ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...
०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान... ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...
०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)... १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...
११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी... १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...
१३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड... १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...
१५ : याला राष्ट्रीय उद्यान... १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...
१७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो... १८ : कोलंबो... (समाप्त)
==================================================================
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================
प्रतिक्रिया
18 Dec 2015 - 4:43 pm | पद्मावति
केवळ अद्भुत!
श्रीलंकेची ही सफर संपुच नये असे वाटतेय. पु.भा.प्र.
18 Dec 2015 - 4:59 pm | सस्नेह
निसर्ग आणि मानव यांच्या जॉईंट कलाकृतीचा उत्तुंग अविष्कार पाहून थक्क झाल्या गेले आहे.
18 Dec 2015 - 6:23 pm | प्रचेतस
अफाट आणि अजस्त्र.
सिंहाचा पंजा त्यातील नख्यांसह खूपच जबरदस्त कोरलाय.
18 Dec 2015 - 7:04 pm | रेवती
अविश्वसनीय वाटते आहे. सुंदर फोटू व वर्णन.
18 Dec 2015 - 7:17 pm | देशपांडे विनायक
स्वताचा मूर्खपणा कळायला ५ वर्षे लागली !!
मी २०१० मध्ये श्री लंकेच्या दर्शनास गेलो होतो . या सहलीस १३ प्रवासी होते
त्या १३ पैकी ६ जण माझ्यामुळे आले होते . आम्ही ६ जण नसतो तर ही सहल होणार नव्हती
या सहलीत सिगीरीया दाखवण्यात आले नाही याचे दुःख आता झाले
19 Dec 2015 - 3:07 am | स्रुजा
अवर्णनीय !!
19 Dec 2015 - 9:12 am | अजया
अद्भूत जागा.अप्रतिम.
कधी एकदा जाते बघायला असे झालेय !!
19 Dec 2015 - 2:17 pm | डॉ सुहास म्हात्रे
सर्व प्रतिसादकांसाठी व वाचकांसाठी धन्यवाद !
21 Dec 2015 - 11:09 am | सुमीत भातखंडे
आहे सगळं!
22 Dec 2015 - 6:40 am | सुधीर कांदळकर
कल्पना केली होती त्यपेक्षा फारच भव्य अहे. २०११ साली सोबत्यांची तंदुरुस्ती कमी पडल्यामुळे गेलो नाही. नाही गेलो ते योग्यच झाले. नाहीतर मी एकटा जाऊन येईपर्यंत त्यांना ताटकळत बसावे लागले असते.
मालिका अधिकाधिक अद्भुतरम्य होते आहे. धन्यवाद.
22 Dec 2015 - 7:27 am | अत्रुप्त आत्मा
अद्भुतरम्य
22 Dec 2015 - 7:27 am | अत्रुप्त आत्मा
अद्भुतरम्य
22 Dec 2015 - 10:03 am | खटपट्या
अद्भूत, सुंदर, भव्य, अचाट असे आहे हे सर्व.
22 Dec 2015 - 1:43 pm | जव्हेरगंज
अद्भूत, सुंदर, भव्य, अचाट
जबरदस्त
अफाट आणि अजस्त्र.