==================================================================
सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन... ०२ : औकानाची बुद्धमूर्ती...
०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी... ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...
०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी... ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...
०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान... ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...
०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)... १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...
११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी... १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...
१३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड... १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...
१५ : याला राष्ट्रीय उद्यान... १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...
१७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो... १८ : कोलंबो... (समाप्त)
==================================================================
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================
संध्याछाया पसरू लागल्यावर उद्यानाच्या नियमांचे पालन करून तेथून बाहेर पडून कातारागामाच्या दिशेने निघणे भाग पडले.
कातारागामातला एक रात्र मुक्काम संपवून सहलीचा सहावा दिवस उजाडला. आजचा कार्यक्रम असा होता...
सिंहलव्दीपाची सहल : सहावा दिवस : कातारागामा --> कातारागामा मंदिरसंकुल --> गालं --> कोलंबो (वस्ती)
(मूळ नकाशा जालावरून साभार)
*********************************
कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल
कातारागामा नावाच्या गावात सिंहलीमध्ये कतारागामाम किंवा तमीळमध्ये कतिरकामन (कार्तिकेयम) याचे मंदिर आहे. सिंहला बौद्ध, श्रीलंकन हिंदू तमीळ, श्रीलंकन मूर (मुस्लिम) आणि श्रीलंकन वेद्दा (आदिवासी) असे विविध धर्म-पंथांचे लोक ज्याना पवित्र स्थान समजतात अश्या श्रीलंकेतल्या मोजक्या देवस्थानात या मंदिरसंकुलाचा समावेश होतो. या संकुलात स्कंद (उर्फ मुरुगन उर्फ कातिरकामन उर्फ कादिरकामन उर्फ सुब्रमण्य उर्फ कंदासामी उर्फ कादिरदेवा उर्फ कातिरदेवा उर्फ कातिरावेल उर्फ कार्तिकेय उर्फ कुमारदेव उर्फ तारकाजित) मंदिर; तेव्यानै (देवयानी उर्फ देवसेना, इंद्राची मुलगी व कार्तिकेयाची पत्नी) मंदिर, शिवमंदिर, कीर्ती विहार नावाचा बौद्ध स्तुप; आणि मस्जिद आहे.
इ स १९४० पर्यंत हे स्थान घनदाट जंगलात होते आणि येथे खडतर पदयात्रा करीत येणारे बहुतांश भाविक श्रीलंकन आणि दक्षिण भारतिय तमीळ होते. त्यानंतर रस्ताची सोय झाल्यावर "कातारागामा देवियो" ला भेट देणार्या भाविकांत सिंहला बौद्धधर्मिय बहुसंख्य झाले आहेत. त्यानंतर या जागेच्या दंतकथांत आणि पुजा-उपासनांत बौद्धधर्माचे वर्चस्व येऊ लागले आहे. अर्थातच तेथे मालकी आणि उपासना यांच्या कारणावरून धर्मसंघर्ष होऊ लागला आहे. १९५० मध्ये श्रीलंकन सरकारने याला अधिकृत देवस्थानाचा दर्जा दिला आहे व सरकारी मदतीने याची देखभाल केली जाते. या मंदिराचे पुजारी "कपुराला" या नावाने ओळखले जातात व ते वेद्दा समाजाचे वंशज असल्याचे मानले जाते.
या जागेवर मुरुगन आणि त्याची पत्नी वल्ली किंवा वल्लीमलै यांची भेट झाली असे समजतात. स्कंद पुराणात या जागेचा उल्लेख आहे असे म्हणतात. उत्तर श्रीलंकेतील जाफनापासून दक्षिणटोकाला असलेल्या कातारागामापर्यंतच्या पदयात्रामार्गावर अनेक मुरुगनमंदिरांची साखळी आहे. १५ व्या शतकात प्रसिद्ध तमीळ कवी आणि मुरुगनभक्त अरुणागिरीनाथर याने ही पदयात्रा केल्यावर कातारागामाची पवित्र तिर्थस्थान म्हणून प्रसिद्धी अधिकच वाढली.
हे स्थान श्रीलंकेतल्या १६ पवित्र बौद्धस्थानांपैकी (सोलोस्मास्थान) एक समजले जाते. राजा दातुगामिनी (इ स १६१ - १३७) च्या काळापासून श्रीलंकेच्या इतिहासात याचा उल्लेख येतो. २३०० वर्षांपूर्वीपूर्वी अनुराधापुरा येथे आणलेल्या बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण करण्यात इथल्या क्षत्रियवंशाच्या लोकांनी हातभार लावल्याचा उल्लेख महावंश या ग्रंथात आहे. या मंदिराच्या परिसरात अनुराधापुराच्या बोधीवृक्षाच्या फांदीपासून वाढवलेला बोधीवृक्ष आहे.
एका बौद्ध दंतकथेप्रमाणे कार्तिकेय श्रीलंकेत आल्यावर त्याने तेथिल तमीळांकडे आश्रय मागितला. तमीळांनी त्याला नकार दिल्याने तो कातारगामातिल सिंहालांकडे राहण्यास आला. यावरून रागावून कार्तिकेयाने तमीळ लोकांना अंगाला टोचून घेणे व निखार्यांवरून चालणे या शिक्षा दिल्या, ज्या आजही इथल्या देवस्थानाच्या वार्षिक समारंभात प्रथेच्या रुपाने पाळल्या जातात. कार्तिकेय श्रीलंकेच्या चार संरक्षक कुलदेवतांपैकी एक मानला जातो.
मंदिरसंकुलात काढलेले काही फोटो...
भाविक कार्तिकेयाला अनेक फळांचा व सुकलेक्या फुलांची भेट देताना दिसले. त्यांची अनेक दुकाने देवस्थानाच्या परिसराच्या सुरुवातीलाच आहेत...
कातारागामा मंदिरसंकुल ०१ : फळांचे दुकान
.
कातारागामा मंदिरसंकुल ०२ : सुकी फुले विकणारी फुलवाली
.
फळांच्या दुकानाशेजारच्या गाडीतळावर फळे विकत घेतल्यासच गाडी उभी करता येईल अशी त्या दुकानदारांची अट होती. त्यामुळे आम्हाला अर्धापाऊण किलोमीटर दूर असलेल्या संकुलाच्या दुसर्या टोकावरच्या गाडीतळावर आमची गाडी उभी करावी लागली. मात्र त्यामुळे आम्हाला अनायासे संकुलाच्या सर्व परिसराचा फेरफटका मारायला मिळाला !...
कातारागामा मंदिरसंकुल ०३ : कार्तिकेयमंदिराचे (डावीकडे) व कीर्तीविहाराचे (समोर) प्रवेश्व्दार
.
या मंदिरसंकुलात बौद्ध धर्माचे प्राबल्य दाखविण्याचा स्पष्ट प्रयत्न दिसून येतो. कार्तिकेयाच्या मंदिरापेक्षा कीर्ती विहाराचा परिसर अनेक पटींनी मोठा आहे. संपूर्ण संकुलात विहारातली बुद्धमूर्ती सोडून इतर कोणतीही मूर्ती दिसली नाही. हिंदू मंदिरांत देवतांच्या मूर्ती ठेवलेल्या नाहीत, फक्त फोटो आहेत...
कातारागामा मंदिरसंकुल ०४ : कार्तिकेय मंदिर
.
कातारागामा मंदिरसंकुल ०५ : गणेशाचा फोटो
.
कातारागामा मंदिरसंकुल ०६ : कीर्तीविहाराकडे जाणारा मार्ग
.
कातारागामा मंदिरसंकुल ०७ : बुद्धमूर्ती
.
कातारागामा मंदिरसंकुल ०८: बोधीवृक्ष
.
कातारागामा मंदिरसंकुल ०९ : कीर्तीविहाराच्या आवारातील कारंजे व त्याच्यामागे दिसणारे काही इमारतींचे कलश
.
मस्जिद असलेला संकुलाच्या भागात एक मस्जिद व काही थडगी सोडून इतर काही नाही असे मार्गदर्शकाकडून कळले. तो भाग निर्मनुष्य दिसत होता व कुंपणाचे दार बंद होते. त्यामुळे मार्गदर्शकाचे म्ह्णणे ऐकून तिथे भेट दिली नाही.
.
मंदिरसंकुलाची भेट संपवून आम्ही समुद्रकिनार्याने जाणार्या सुंदर रस्त्यावरून गालंमार्गे कोलंबोकडे निघालो.
.
(क्रमश : )
===================================================================
सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन... ०२ : औकानाची बुद्धमूर्ती...
०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी... ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...
०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी... ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...
०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान... ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...
०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)... १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...
११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी... १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...
१३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड... १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...
१५ : याला राष्ट्रीय उद्यान... १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...
१७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो... १८ : कोलंबो... (समाप्त)
==================================================================
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================
प्रतिक्रिया
2 Jan 2016 - 9:56 pm | रेवती
वाचतिये. सुकी फुले पाहून पाईन कोन्स आठवले. फळांचे दुकान हे आपल्याकडील देवळांच्या बाहेर असलेल्या ओटीची दुकाने असतात तशातले दिसते. रंगीत फोटू आवडला.
2 Jan 2016 - 10:00 pm | यशोधरा
ती सुकलेली फुले मस्त आहेत!
गंपतीबाप्पाही भारी!
3 Jan 2016 - 1:09 am | प्रचेतस
हा भागही आवडला. गर्दी आपल्याकडील तीर्थक्षेत्रांसारखीच दिसते.
3 Jan 2016 - 8:52 am | अजया
हिंदू देवतांना सायडिंगला टाकले आहे तसबिरी लावून!
सुकी फुलं आणि फळं मात्र छान आहेत.
तुम्ही खरेदी करता का सफरीत!!?श्रीलंकेत काय मिळतं अगदी तिथलं?
मी ती फुलं नक्की घेतली असती!
3 Jan 2016 - 1:49 pm | डॉ सुहास म्हात्रे
मी प्रवासात अगदी क्वचित म्हणजे क्वचितच खरेदी करतो. कारण आठवण म्हणून आणलेल्या वस्तू एकदोन महिन्यांचे नाविन्य संपल्यावर नुसत्या अडगळीत पडून राहतात असा पूर्वानुभव आहे. त्यापेक्षा तो पैसा आणि खरेदीसाठी ठेवलेली वेळ मी सहलीत नसलेले एखादे स्थानिक आकर्षण पाहण्यात घालवतो.
याला या सहलीत अपवाद म्हणजे सिगिरियाचे एक सुंदर सचित्र पुस्तक विकत घेतले... आणि चीन मध्ये सम्राटाला रेशमाच्या वस्तू पुरवणार्या कुटुंबाकडून घेतलेले एक रेशमाचे भरतकाम करून बनवलेले चित्र (त्याचे प्रकाशचित्र त्या मालिकेत आहे).
3 Jan 2016 - 10:04 pm | अजया
:)
3 Jan 2016 - 3:02 pm | पद्मावति
मस्तं झालाय हा भागही.
फळांच्या स्टॉल वर फळं किती छान रचून ठेवली आहेत.
सुकी फुलं देवाला वाहण्याची कल्पना वेगळीच वाटते आहे.
13 Dec 2016 - 6:11 pm | मी कोण
खुपच सुंदर , मी जाण्याचा विचार करीत आहे, याचा नक्की फायदा होईल.
13 Dec 2016 - 6:37 pm | मी कोण
आपले सर्व लेख साठावुन ठेवले आहेत. सर्व ठीकाणचा खर्च रुपयात किती झाला आणि जर उतरणायाच्या ठीकाणांचे पत्ता व फोन नंबर दिले तर खुपच मदत होईल. धन्यवाद.
14 Dec 2016 - 1:13 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
माझ्या श्रीलंकेच्या फेरीला पाचपेक्षा जास्त वर्षे झाली आहेत. तेव्हा त्यावेळचे खर्चाचे गणीत खूप बदललेले असणार. मी वापरलेल्या सहल कंपनीबद्दल माझे फारसे चांगले मत नाही. परंतु, जालावर थोडे संशोधन केल्यास काही चांगल्या श्रीलंकन कंपन्या जरूर सापडतील. श्रीलंका तुलनेने स्वस्त देश आहे.