==================================================================
सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन... ०२ : औकानाची बुद्धमूर्ती...
०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी... ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...
०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी... ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...
०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान... ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...
०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)... १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...
११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी... १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...
१३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड... १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...
१५ : याला राष्ट्रीय उद्यान... १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...
१७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो... १८ : कोलंबो... (समाप्त)
==================================================================
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================
तिवांका प्रतिमागृह हे ठिकाण मूळ आराखड्यात असले तरी त्याच्याबाबत मला फारशी माहिती नव्हती. अचानक समोर आलेला हा कलेचा खजिना सुखद आश्चर्य देऊन गेला. त्यामुळे खूश होऊन, श्रीलंकेचे प्राणीवैभव पाहण्यासाठी कौडुल्ला राष्ट्रीय उद्यानाच्या दिशेने, पुन्हा एकदा हिरवाईने भरलेल्या रस्त्यावरून प्रवास सुरू केला.
इ स २००२ मध्ये उद्घाटन झालेले ६६५६ हेक्टर आकाराचे कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान हे श्रीलंकेतले पंधरावे आणि सर्वात नवीन राष्ट्रीय उद्यान आहे. राजा महासेनाने बांधलेल्या प्राचीन कौडुल्ला तलावाच्या सभोवती पसरलेला हा परिसर राष्ट्रीय उद्यान, वन्यप्राण्यांसाठी अभयारण्य आणि पर्यावरण पर्यटनस्थल आहे. हे विविध सदाहरित वृक्षसंपत्ती व प्राणीसंपत्तीने भरलेले आहे. हरिणे, बिबटे, अस्वल इत्यादी अनेक प्राण्यांचे, पक्षांचे आणि विविध विषवृत्तिय वृक्षवल्लींचे घर असलेले हे अरण्य त्यात विहरणार्या जंगली हत्तींमुळे जगप्रसिद्ध पर्यटक आकर्षण झाले आहे.
या अभयारण्याच्या माहितीपत्रकाप्रमाणे तेथे सस्तन प्राण्यांच्या २४ प्रजाती आहेत, सरपटणार्या प्राण्यांच्या २५ प्रजाती, पक्षांच्या १६० प्रजाती आणि तेथील तलावांत माश्यांच्या २६ प्रजाती आहेत. हे सगळे असले तरी पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण इथले सुमारे २५० हत्ती आणि बिबट्या हेच असते ! येथील हत्ती बघण्यासाठी ऑगस्ट-सप्टेंबर हे सर्वात उत्तम महिने समजले जातात, कारण या कालात इतर कमी पाण्याच्या ठिकाणांहून कौडुल्ला तलावातील पाण्यामुळे हत्ती येथे आकर्षित होतात.
चला तर मग सफारी जीपमध्ये बसून आपल्या मार्गदर्शकासह कौडुल्ला उद्यानाच्या सफरीला...
उद्यानाच्या ऑफिसातून तिकिट काढून आपली सहल सुरू होते. हिरव्यागार जंगलातून जीपचा जवळ जवळ अर्ध्या तासाचा प्रवास झाल्यावर आणि अनेक लहान मोठी तळी गेली तरी हत्ती नजरेस न आल्याने जरासे नाराज व्हायला झाले.
कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान ०१
पण, मार्गदर्शक "उन्ह जरा उतरल्यावरच हत्ती उघड्यावर येतात", "काळजी करू नका, जरा पुढे गेल्यावर हत्तींची हद्द सुरू होईल" अशी सतत समजूत काढत होता. निराशेच्या कड्यावर पोचलो असताना एका मोकळ्या मैदानावर आलो आणि अचानक बाजूच्या झाडीतून एक हत्तींचे छोटेसे कुटुंब बाहेर आले आणि उघड्यावरच्या गवताचा समाचार घेऊ लागले...
कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान ०२
दहा पंधरा मिनिटे तेवढ्यावर गेल्यावर तेवढेच बघायला इथे इतका वेळ आणि पैसा खर्च करून आलो होतो काय हे मनात येत होते. एकदोनदा तसे मार्गदर्शकाला बोलूनही झाले. या सर्व वेळेत आमची जीप कौडुल्ला तळे आणि त्याभोवतीचे जंगल यांच्या मधल्या मोकळ्या रुंद गवताळ पट्टीतून पुढे पुढे जात राहिली. आणि अचानक मार्गदर्शक ओरडला, "टस्कर !". टस्कर म्हणजे मोठे सुळे असलेला पूर्ण वाढीचा नर हत्ती. दूरवर झाडीतून आपल्याच मस्तीत उधळत एक मोठा हत्ती बाहेर पडत होता. इतक्या दुरूनही त्याचे पांढरे सुळे चकाकताना दिसत होते...
कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान ०३ : टस्कर (सुळे असलेला नर हत्ती)
आम्ही त्याच्या जवळ जाईपर्यंत तो टस्कर झाडीच्या पासून बर्यापैकी बाहेर मोकळ्या गवताळ मैदानावर पोहोचला होता. जणू आम्हाला त्याचा फोटो काढायचा आहे हे जाणून तो आमच्या समोर जंगलच्या जनरलसारखी अटेन्शन पोज घेऊन उभा राहिला...
कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान ०४ : टस्कर (सुळे असलेला नर हत्ती)
श्रीलंकन नर हत्तींमध्ये टस्करचे प्रमाण ७% आहे असे म्हटले जाते. पण, २०११ च्या गणनेत ते २% इतके कमी झाले आहे असे आढळले. त्यामुळे, मोठे सुळे असलेल्या पूर्ण वाढीचा जंगली नर हत्ती त्याच्या नैसर्गिक परिसरात बघून तेथे आल्याचे चीज झाले ! जंगली टस्करच्या फार जवळ जाणे धोक्याचे ठरू शकते. कारण त्याचा मूड खराब असला तर तो चाल करून येऊ शकतो व त्याच्या धडकेत जीपला उलटवण्याची ताकद असते. आपल्या पिलांना किंवा कळपाला धोका पोहोचेल असा संशय आल्यास मोठ्या माद्याही हल्ला करू शकतात. सुदैवाने (बहुतेक त्यांना प्रवाशांची सवय झाली असल्याने असावे, पण) टस्करने किंवा इतर कोणत्याही हत्तीने आक्रमक पवित्रा न घेता त्यांचे चरणे चालू ठेवले ! फारतर एखाद्या वेळेला उपटलेले गवत सोंडेने आमच्या दिशेने उडवून स्वागत केले !... किंवा कदाचित हा त्यांचा "हे गवत पडेल त्याच्या पुढे येऊ नका, नाहीतर..." असा इशाराही असेल !
अभयारण्याचा प्रशिक्षित मार्गदर्शक व अनुभवी चालक बरोबर असल्याने आमची गाडी हत्तींपासून नियमाप्रमाणे बसणारे सुरक्षित अंतर राखून होती. शिवाय जर काही धोका वाटला तर पटकन जीप दूरवर नेता येईल अशी तिची दिशा व चाल चालक सतत ठेवत होता. त्यामुळे, जंगली हत्तींना १५-२५ मीटर इतक्या जवळून बघायला मिळण्याचा थरार अनुभवायला मिळाला !
टस्कर बहुदा एकांडे राहतात. हत्तींची कुटुंबव्यवस्था मातृसत्ताक असते. एक मुख्य माता, इतर अनेक माद्या व त्या सगळ्यांची पिले असे कुटुंब असते. पुढे जाता जाता एकामागोमाग एक अनेक हत्ती कुटुंबे जंगलातून गवताळ भागावर बाहेर येताना दिसू लागली...
कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान ०५
.
...
कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान ०६ व ०७
मधून एखादा टस्करही दर्शन देत होता...
कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान ०८
.
थोडे पुढे गेल्यावर कौडुल्ला सरोवराचा मुख्य पाणलोट समोर आला. नवीन सुधारणांमुळे सरोवराच्या पाणसाठ्यात बरीच वाढ झाल्याने व काही वर्षांच्या अतिवृष्टीने शेजारच्या अरण्याचा काही भाग गिळंकृत केला आहे. पाण्याने वेढले गेल्यामुळे मृत झालेल्या वृक्षांच्या खोंडांमुळे सरोवरात नवशिल्पकलेचे प्रदर्शन दिसत होते...
कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान ०९
दूरवर सरोवराच्या एका उथळ भागात प्रवासी पक्षांचे थवे जमा झालेले दिसत होते. तिथला मार्ग चिखलातून जात असल्याने, माझे पक्षांसंबंधीचे ज्ञान "दिव्य" असल्याने आणि वेळेच्या नियोजनामुळे त्यांचे दुरूनच दर्शन घेतले...
कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान १०
.
त्यानंतर आम्ही जंगलात शिरून बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. इथल्या बिबट्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच आहे. त्यामुळे त्याचे दर्शन फार कमी वेळा होते ही सूचना देण्याची सावधगिरी मार्गदर्शकाने अगोदरच दिलेली होती. त्यामुळे फार अपेक्षा नव्हतीच. दोन तीन वेळा इतर जीपमधल्या मार्गदर्शकांच्या सूचनेवरून इकडे तिकडे फेर्या मारल्यावर व अंधार होऊ लागल्यावर उद्यानाच्या बाहेर पडण्याची वेळ जवळ येऊ लागली. अर्थात, परतीच्या वाटेला लागणे भाग पडले.
वाटेत अभयारण्याच्या इतर सभासदांनी दर्शन दिले त्यांचे काही फोटो पुढे देत आहे...
कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान ११ : कोल्हा
.
पाठीवर फारच सुंदर नक्षी असलेल्या या कासवमहाराजांनी आमची वाट अडवली. उद्यानाच्या नियमाप्रमाणे त्याला त्याच्या गतीने रस्ता ओलांडू दिला. त्यानेही आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून, एखाद्या राजासारखी त्याची कासवगती कायम राखून, आरामात रस्ता ओलांडला. तेवढ्या वेळात जीपमधून खाली उतरून त्याचे फोटो काढले. त्यातला हा एक...
कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान १२ : कासव
.
वाटेत हे मारुतरायाचे श्रीलंकेतले काही वंशज दिसले...
कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान १३ : माकडे
.
अभयारण्याच्या सीमेवर तिकिटघराला लागून तेथिल प्राण्यांसंबंधी एक संग्रहालय आहे. परतण्याअगोदर त्याच्यात एक धावती फेरी मारली...
कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान (संग्रहालय) १४ : चितळांची शिंगे व सापाची कात
.
कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान (संग्रहालय) १५ : अभयारण्यातल्या लहान आकाराच्या प्राण्यांचे सांगाडे
.
कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान (संग्रहालय) १६ : फॉर्मॅलिनमध्ये ठेवलेले हत्तीचे नवजात अर्भक
.
कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान (संग्रहालय) १७ : हत्तीची कवटी
.
कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान (संग्रहालय) १८ : प्राण्यांच्या पायांचे ठसे
.
परतीच्या वाटेवर रस्त्याच्या बाजूच्या गवतामध्ये मधूनच एखादा मोर दर्शन देत होता...
कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान १९ : परतिच्या वाटेवर
.
आजूबाजूच्या हिरव्यागार निसर्गामध्ये मधून मधून एखादी छोटीशी वस्ती दिसत होती...
कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान २० : परतिच्या वाटेवर
.
हॉटेलवर पोहोचल्यावर मस्तपैकी शॉवर घेऊन परत ताजातवाना झालो. परतताना मार्गदर्शकाशी वाटाघाटी करून जवळचे एक रेस्तराँ हेरून ठेवले होते. तेथे जाऊन तेथिल शाकाहारी मेन्युवर निवडला. चार भाज्या, एक डाळ आणि भजीसदृश्य पदार्थ आणि भात असा मेन्यु होता. भूक खवळलेली होतीच. चव अत्यंत उत्तम नसली तरी बर्यापैकी होती...
पोलोन्नारुवामधले संध्याकाळचे जेवण
.
आजही दिवसभर बरीच धावपळ झाली होती. पण आजचाही दिवस कालच्याप्रमाणेच सहलीचा आनंद वाढविणाराच होता. समाधानाने भरलेल्या मनाने व भरलेल्या पोटाने हॉटेलवर परतलो. ज्याची रसभरीत वर्णने वाचली होती आणि आश्चर्यकारक फोटो बघितले होते ते सिगिरिया प्रत्यक्षात कसे असेल याची कल्पना करत केव्हा झोपेच्या अधीन झालो ते कळलेच नाही.
(क्रमश : )
==================================================================
सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन... ०२ : औकानाची बुद्धमूर्ती...
०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी... ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...
०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी... ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...
०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान... ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...
०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)... १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...
११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी... १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...
१३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड... १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...
१५ : याला राष्ट्रीय उद्यान... १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...
१७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो... १८ : कोलंबो... (समाप्त)
==================================================================
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================
प्रतिक्रिया
9 Dec 2015 - 11:21 pm | रेवती
वाचतिये. हत्तींचे फोटू आवडले. कासव एकदम आखीव रेखीव.
पाणलोटाचा फोटू सहसा अॅनिमल प्लॅनेटच्या चित्रफितीमध्ये असतो त्याप्रकारचा वाटतोय.
9 Dec 2015 - 11:47 pm | अत्रुप्त आत्मा
हत्ती!
हत्ती!
हत्ती!
10 Dec 2015 - 12:17 pm | खटपट्या
कोणाची आठवण येतेय का??
10 Dec 2015 - 12:54 pm | अत्रुप्त आत्मा
ह्या ह्या ह्या!
10 Dec 2015 - 7:45 am | विलासराव
हही भाग आवडला.
10 Dec 2015 - 9:08 am | प्रचेतस
सुंदरच झालाय हा भाग.
10 Dec 2015 - 11:47 am | पिलीयन रायडर
मस्त आहे हा सुद्धा भाग!! लिहीत रहा काका, वाचतेय!
10 Dec 2015 - 12:17 pm | खटपट्या
जबरदस्त सफर आणि फोटो हत्तीउद्यान विशेष आवडले.
10 Dec 2015 - 1:01 pm | बॅटमॅन
सगळेच फटू मस्त, पण ते हत्तीचे फटू विशेष आवडले. गुवाहाटीपासुन जवळच असलेल्या पोबितोरा येथे पाहिलेल्या एकशिंगी गेंड्यांची आठवण झाली.
10 Dec 2015 - 1:19 pm | भानिम
नेहमीप्रमाणेच सुंदर फोटो आणि सुंदर वर्णन! प्रत्येक भागाच्या वाचनागणिक श्रीलंकेला जाण्यासाठी पाय सळसळत आहेत!
10 Dec 2015 - 1:49 pm | अजया
नेहमीप्रमाणेच वाचनीय. पुभाप्र
11 Dec 2015 - 12:49 pm | सस्नेह
उद्यान आणि प्राण्यांचे फोटो सुरेख आहेत.
11 Dec 2015 - 1:45 pm | सुमीत भातखंडे
फोटो मस्त आहेत.
हाही भाग आवडला.
11 Dec 2015 - 2:33 pm | पद्मावति
छानच झालाय हा भागही.
कासव तर घासून पुसून आंघोळ केल्यासारखा स्वच्छ, चकचकीत दिसतोय.
12 Dec 2015 - 1:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
सर्व प्रतिसादकांसाठी व वाचकांसाठी धन्यवाद !
13 Dec 2015 - 9:21 pm | सुधीर कांदळकर
आणि आनंददायक. अपेक्षापूर्ती झालीच. हत्तींची प्रकाशचित्रे खासच. धन्यवाद.
13 Dec 2015 - 10:02 pm | इशा१२३
सगळे फोटो अप्रतिम.पुभाप्र.
13 Dec 2015 - 10:41 pm | अभ्या..
कासव मस्त.
आवडले वर्णन आणि फोटो
15 Dec 2015 - 2:18 pm | कपिलमुनी
प्रवास रोचक चल्ला आहे