सिंहलव्दीपाची सहल : १७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो...

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
4 Jan 2016 - 6:39 pm

==================================================================

सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...   ०२ : औकानाची बुद्धमूर्ती...
    ०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी...   ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...
    ०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी...    ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...
   
०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान...                                       ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...
    ०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)...       १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...
    ११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी...   १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...
    १३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड...                              १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...
    १५ : याला राष्ट्रीय उद्यान...                                           १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...
    १७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो...                            १८ : कोलंबो... (समाप्त)

==================================================================
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================

मंदिरसंकुलाची भेट संपवून आम्ही समुद्रकिनार्‍याने जाणार्‍या सुंदर रस्त्यावरून गालंमार्गे कोलंबोकडे निघालो.

आज लवकर उठून न्याहारी आटपून सहा वाजताच हॉटेलबाहेर पडलो होतो. त्यामुळे भाविकांची गर्दी होण्याअगोदर कातारगामाचे मंदिरसंकुल पाहून सात-साडेसात पर्यंत परत गाडीत बसून प्रवास सुरू झाला होता. आजच्या दिवसात ३०० किलोमीटरचा आणि साडेपाच-सहा तासांचा प्रवास करून कोलंबोला पोहोचायचे होते. तेव्हा बर्‍यापैकी कंटाळा येणार आणि पर्यायाने झोप घेतली जाणार असेच वाटत होते. मात्र प्रवास सुरू झाला आणि श्रीलंकेच्या निसर्गाने आपले गारूड घालून कंटाळा आणि झोप दोन्हीही येणार नाही याची खबरदारी घेतली ! सुंदर निसर्ग आणि मधून मधून येणार्‍या वस्त्या पाहत पाहत वेळ बर्‍यापैकी मजेत जात होता...


कातारागामा ते गालं रस्त्यावर ०१

हिरव्यागार झाडीच्या पार्श्वभूमीवर मधून मधून दिसणारी सोनेरी रंगाची कापणीला आलेल्या भाताची शेते डोळे सुखावून जात होती...


कातारागामा ते गालं रस्त्यावर ०२

थोड्याच वेळात रस्ता समुद्रकिनार्‍यावरून जाऊ लागला आणि परिसराचे स्वरूप बदलले. आता रस्त्याच्या डावीकडे समुद्राच्या उसळणार्‍या लाटा साथ देत होत्या...


कातारागामा ते गालं ०३

मधून मधून येणार्‍या गावातील कोळ्यांच्या नौका लाटांवर डुलत होत्या...


कातारागामा ते गालं ०४

आणि झाडीचे स्वरूप बदलून त्यांत बहुतांश नारळाच्या उंच झाडांच्या वाड्यांची गर्दी वाढली होती...


कातारागामा ते गालं ०५

.


कातारागामा ते गालं ०६

मधूनच एखादा समुद्रात घुसलेला जमिनीचा चिंचोळा तुकडा, त्यावरची हिरवाई आणि तिच्यातून डोकावणारी घरं लक्ष वेधून घेत होती...


कातारागामा ते गालं ०७

सूर्य तळपत असला तरी पाऊस मधून मधून हजेरी लावून जात होता. अडीच तासांचा रस्ता कसा संपून गालं कधी आलं ते कळलंच नाही !

*********************************

गालं

श्रीलंकेच्या दक्षिण प्रांताची राजधानी असलेले गालं हे शहर लोकसंख्येच्या प्रमाणाने पाचव्या क्रमांकाचे आहे.

मध्यपूर्व आणि श्रीलंकेचे व्यापारी संबंध इ स पूर्व १४०० वर्षापासून सुरू होते. मध्यपूर्वेत हे शहर तार्शिश या नावाने ओळखले जात असे. इझ्रेलचा राजा सॉलोमन (इ स पूर्व ९७० - ९३१) येथून हस्तिदंत, मोर व दालचिनी आयात करत असे. चवदाव्या शतकात इब्न बतुता या अरबी प्रवाशाने याचा काली (Qali) या नावाने उल्लेख केला आहे. सोळाव्या शतकात पोर्तुगीजाचे आगमन होण्यापूर्वी या शहराला गिम्हातिथ्था (Gimhathiththa) या नावाने ओळखले जायचे आणि ते देशातील सर्वात मोठे बंदर होते.

इ स १५०२ मध्ये लोरेंको द अलमेडाच्या नेतृत्वाखालील पोर्तुगीज जहाजांचा एक छोटा ताफा मालदीव येथे जात असताना वादळात भरकटून गालंच्या किनार्‍याला लागला आणि गालं व पर्यायाने श्रीलंकेचा युरोपियन वसाहतवादाशी संबंध सुरू झाला. या भागातील मसाल्याच्या पदार्थांचे (विशेषतः दालचिनी) उत्पन्न आणि गालं बंदराचे अतीपूर्व-पश्चिम व्यापारी मार्गावरचे मोक्याचे स्थान हेरून पोर्तुगीजांनी प्रथम स्थानिक राजाशी करार करून येथे पाय रोवले. त्यानंतर स्थानिक राजेरजवाड्यांमधिल कलहांचा पुरेपूर फायदा घेत आपली सत्ता स्थापन केली. पोर्तुगिजांनी या शहराभोवती इ स १५८८ मध्ये संरक्षक तटबंदी बांधली. त्यामुळे गालं शहर म्हणजेच गालं (भुईकोट) किल्ला झाला.

इ स १६४० मध्ये पोर्तुगीजांचा पराभव करून डच इस्ट इंडिया कंपनीने हे शहर ताब्यात घेतले व नंतर एक एक करत सर्व श्रीलंकाभर आपले पाय पसरले. गालंभोवतीची तटबंदी डचांनी इ स १६४९ नंतर वारंवार अधिकाधिक बळकट केली. डच वसाहतवादाखाली गालंने १८ व्या शतकात उत्कर्षबिंदू गाठला होता.

या चारशे वर्षांपेक्षा जास्त जुन्या, पोर्तुगीज व स्थानिक स्थापत्यशैलीच्या संगमाने बनलेल्या किल्ल्याला, १६ ते १९ व्या शतकातील दक्षिण व दक्षिणपूर्व आशियातील आता शिल्लक असलेला सर्वोत्तम आविष्कार समजला जातो. या परिसराचे बरेच नुकसान करणारी २००४ सालची त्सुनामी या तटबंदीचे नुकसान करू शकली नाही, हे विशेष ! गालं किल्ल्याला युनेस्कोप्रणित जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केले गेले आहे.

इ स १७९६ मध्ये डचांचा पराभव करून ब्रिटिशांनी कोलंबो आणि जाफना काबीज केले व श्रीलंकेतला ब्रिटिश अंमल सुरू झाला, तो श्रीलंकेला ४ फेब्रुवारी १९४८ रोजी स्वातंत्र्य मिळेपर्यंत चालू होता.

.

दूरूनच डच किल्ल्याच्या घड्याळी मनोर्‍याने आपले डोके वर काढत गालं जवळ आल्याची खबर दिली. थोड्याच वेळात किल्ल्याच्या भरभक्कम रुंद तटबंदीत बनवलेल्या बोगद्यातून आमची गाडी आत शिरली...


गालं ०१ : तटबंदीतले प्रवेशव्दार

तटबंदीच्या आत एक छोटेसे पण मोठ्या मजबूत इमारतींचे गावच वसलेले दिसले. डचांनी बांधलेल्या त्या इमारती आजही बर्‍याच सुस्थितीत आहेत. रस्त्यांची व इमारतींची नावेही न बदलता तशीच कायम ठेवलेली आहेत...


गालं ०२

फक्त त्यापैकी बर्‍याच इमारतींत आता सरकारी कार्यालये आहेत आणि एकीत गालं राष्ट्रीय संग्रहालय आहे...


गालं ०३

किल्ल्यात कुठेही असलात तरी त्याच्या उंचीमुळे घड्याळी मनोरा आपले अस्तित्व सतत दाखवत असतो...


गालं ०४

.


गालं ०५ : गालं किल्ल्याचा घड्याळी मनोरा आणि त्याच्या बाजूची तटबंदी

गालं किल्ल्यातल्या समुद्रकिनार्‍याजवळच्या एका प्रशस्त हवेलीत पहिल्या मजल्यावर एक रेस्तराँ थाटलेले होते. तेथे दुपारचे जेवण घेतले. जेवण आणि सेवा यथातथाच होती, पण स्थान उत्तम होते. खिडकीशेजारील टेबल पकडून हिंदी महासागराचा अथांग परिसर न्याहाळत जेवायला मजा आली...


गालं ०६ : रेस्तराँतून दिसणारा हिंदी महासागर आणि समुद्रकिनार्‍यावरची संरक्षक तटबंदी

.


गालं ०७ : रेस्तराँतून दिसणारा हिंदी महासागर ०२

.

गालंमधले अजून काही फोटो...


गालं ०८ : दीपगृह

.


गालं ०९ : बौद्धमंदिर

.


गालं १० : ऑल सेंट्स चर्च

.


गालं ११ : एक चौक

या शहराला २००४ च्या त्सुनामीचा फार मोठा तडाखा बसला होता. त्यामुळे इथल्या नयनरम्य परिसरात असलेल्या क्रिकेट मैदानाची मोठी हानी झाली होती. त्याची डागडुजी करून २००७ च्या डिसेंबरपासून तेथे क्रिकेटचे सामने परत सुरू झाले आहे.


गालं १२ : गालं क्रिकेट मैदान (जालावरून साभार)

.


गालं १३ : किल्ल्याच्या तटबंदीचा एक भाग (जालावरून साभार)

.


गालं १४ : किल्ला व शहराचे विहंगम दृश्य (जालावरून साभार)

.

गालंमध्ये फेरफटका आणि पोटपूजा करून आमची सफर परत समुद्रकिनार्‍यावरून जाणार्‍या मनोहारी मार्गाने सुरू झाली...


गालं ते कोलंबो ०१

.


गालं ते कोलंबो ०२
.


गालं ते कोलंबो ०३

.


गालं ते कोलंबो ०४

.

हा दोन-अडीच तासांचा रस्ताही निसर्गाचे रूप पाहत पाहत सहज संपला. मोठ्या शहराच्या खाणाखुणा दिसू लागल्या आणि कोलंबोत पोहोचल्याची जाणीव झाली...


कोलंबोचे प्रथमदर्शन

.

(क्रमश : )

===================================================================

सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...   ०२ : औकानाची बुद्धमूर्ती...
    ०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी...   ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...

    ०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी...    ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...
   
०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान...                                       ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...
    ०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)...       १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...
    ११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी...   १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...
    १३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड...                              १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...
    १५ : याला राष्ट्रीय उद्यान...                                           १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...
    १७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो...                            १८ : कोलंबो... (समाप्त)

==================================================================
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

4 Jan 2016 - 10:19 pm | प्रचेतस

फारच सुंदर.
गालंचा किल्ला अजस्त्र दिसतोय. किल्लेबांधणीची पद्धत टिपिकल मध्ययुगीन युरोपियन.

पद्मावति's picture

4 Jan 2016 - 11:26 pm | पद्मावति

मस्तं!
श्रीलंकेत इतकं बघण्यासारखं असेल असे कधी वाटलेच नव्हते. खरंतर या लेखमालीकेमुळेच श्रीलंका हा देश माझ्या मस्ट विझीट यादीत आलाय.

अजया's picture

5 Jan 2016 - 7:10 pm | अजया

अगदी हेच म्हणायचे होते!

सगळे फोटू व वर्णन मस्त केलय. भारतातील समुद्रकिनार्‍यानजिक असते तसेच वातावरण, गावे दिसतायत.
लाल कौलांचा गालंचा फोटू चांगला आहे. त्सुनामीने येथेही कहर केलेला दिसतोय. कल्पना करणेही अवघड. काही लोकांची गावे समुद्राजवळ असतात तर काही लोक हौसेनं घरे बांधून समुद्राजवळ रहायला जातात ते अजिबात सुरक्षित वाटत नाही.

अमृत's picture

5 Jan 2016 - 10:26 am | अमृत

कोलंबोविशयी खूप उत्सुकता आहे...

दिपक.कुवेत's picture

5 Jan 2016 - 6:49 pm | दिपक.कुवेत

सुरेख सफर...

सुधीर कांदळकर's picture

6 Jan 2016 - 8:52 am | सुधीर कांदळकर

चित्रे एकाहून दुसरे सरस अशी आहेत. पाहातो तेच सर्वोत्तम असे वाटते आहे.
नेत्रसुखद लेखांक. धन्यवाद.