सिंहलव्दीपाची सहल : ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
14 Dec 2015 - 2:37 pm

==================================================================

सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...   ०२ : औकानाची बुद्धमूर्ती...
    ०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी...   ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...
    ०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी...    ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...
    ०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान...                                       ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...
    ०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)...       १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...
    ११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी...   १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...
   
१३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड...                              १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...
    १५ : याला राष्ट्रीय उद्यान...                                           १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...
    १७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो...                            १८ : कोलंबो... (समाप्त)

==================================================================
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================

आजही दिवसभर बरीच धावपळ झाली होती. पण आजचाही दिवस कालच्याप्रमाणेच सहलीचा आनंद वाढविणाराच होता. समाधानाने भरलेल्या मनाने व भरलेल्या पोटाने हॉटेलवर परतलो. ज्याची रसभरीत वर्णने वाचली होती आणि आश्चर्यकारक फोटो बघितले होते ते सिगिरिया प्रत्यक्षात कसे असेल याची कल्पना करत केव्हा झोपेच्या अधीन झालो ते कळलेच नाही.

आजचा तिसरा दिवस जरा जास्तच उत्सुकतेने उजाडला. आज सिगिरियाला भेट द्यायची होती. मी जे काही वाचले होते व जी चित्रे पाहिली होती त्यावरून माझ्या दृष्टीने, सिगिरिया हे निसर्ग व मानवी स्थापत्याच्या सहकार्याने बनलेले श्रीलंकेतील सर्वात मोठे आश्चर्य आहे. अर्थातच, आज उत्सुकता प्रचंड ताणली गेली होती. त्यामुळे न्याहारी वगैरे करून ठरलेल्या वेळेच्या पंधरावीस मिनिटे अगोदरच तयार होऊन गाडीची वाट पाहत बसलो होतो.

तिसर्‍या दिवसाचा कार्यक्रम असा होता...


सिंहलव्दीपाची सहल : तिसरा दिवस : पोलोन्नारुवा --> सिगिरिया --> माताले येथील मसाल्यांच्या झाडांची बाग
--> कँडी (वस्ती) (मूळ नकाशा जालावरून साभार)

*********************************

आम्ही निघालो आणि पंधरा मिनिटातच गाडी थांबवून आमचा गाईड-कम-ड्रायव्हर म्हणाला, "उतरा". आजूबाजूला तर एक छोटे गाव दिसत होते आणि सिगिरियाच्या चित्रांत पाहिले त्यासारखे काहीच दूरान्वयानेही काहीच दिसत नव्हते. साहजिकच मी विचारले, "अरे इतक्यात सिगिरिया आले ? कुठे आहे ?"

"सर, तुम्ही हत्तीची सफारी बुक केलीय. ती इथे करून मग सिगिरियाला जायचे आहे. सिगिरियाहून इथे परत यायला उलटे पडेल."

सिगिरियाच्या स्वप्नांत काल रात्रीपासून गुंगून गेल्यामुळे ही गजराज सफारी मी पूर्णपणे विसरून गेलो होतो ! हबाराना नावाच्या त्या गावात गाडीतून उतरून पाच एक मिनिटे चालून गेल्यावर आमची वाट पाहणारे राजेशाही वाहन राजेशाही थंडपणाने त्याच्यासमोर पडलेला पाला खाताना दिसले. गजराजाच्या मालकाने मार्गदर्शकाशी थोडेसे खलबत केल्यावर, गजराजावर आसन बांधून, त्याला आमच्या मानमराबताला साजेसे सजवायला सुरुवात केली...


आमचे वाहन सजवून तयार होताना

पंधरा मिनिटांचा सजावटीचा सोपस्कार झाल्यावर, गजराजावर स्वार होऊन, आम्ही एक तासभर रपेट मारून गावाशेजारच्या जंगलाचे अवलोकन केले...


गजसफारी

अश्या तर्‍हेने राजाला साजेसे स्वागत झाल्यावर आम्ही प्राचीन श्रीलंकेतील राजाच्या राजधानीला आणि त्यातल्या जगप्रसिद्ध अनवट राजवाड्याला भेट देण्यासाठी निघालो.

*********************************

सिगिरिया किंवा सिंहगिरिया (Lion Rock)

कुलवंश नावाच्या ग्रंथाप्रमाणे पाचव्या शतकात राजा काश्यप (इ स ४७७ ते ४९५) याने वसवलेली ही राजधानी निसर्ग व मानवी स्थापत्याचा एक अद्भुत आविष्कार आहे. चारी बाजूंनी खडे कडे असलेला एक २०० मीटर (६६० फूट) उंचीचा व माथ्यावर विशाल सपाटी असलेला हा प्रस्तर या राजधानीचा मर्मबिंदू आहे. प्रस्तरमाथ्यावर असलेला भव्य राजवाडा, तेथे नेणार्‍या सिंहपायर्‍या आणि वर जायला प्रस्तराच्या कड्यांत खोदलेला भित्तिचित्रांनी सुशोभित केलेला मार्ग; या सगळ्यात मानवी कल्पकतेची, धैर्याची, चिकाटीची आणि स्थापत्यशास्त्राची परिसीमा गाठलेली आहे यात संशय नाही. येथील भव्य सिंहद्वारामुळे या परिसराला सिगिरिया (सिंहगिरिया) हे नाव पडले आहे.

सिगिरिया युनेस्कोप्रणित जागतिक वारसा स्थान आहे. ते प्राचीन शहररचनेचे चांगल्या अवस्थेत असलेले उदाहरण म्हणूनही जगप्रसिद्ध आहे.

या परिसरात पाच हजार वर्षांपासून मानववस्ती असल्याचे पुरावे सापडले आहेत. येथील मानवी हस्तक्षेपाने विकसित केलेल्या गुहांत इ स पूर्व तिसर्‍या शतकापासून बौद्ध भिक्कूंची वस्ती असल्याचे शिलालेखीय पुरावे आहेत. इ स ४७७ मध्ये राजा धातुसेनाच्या सामान्य कूलातील पल्लववंशिय दासीपासून झालेल्या मुलाने, काश्यपाने, बंडाळी करून राजसत्ता बळकावली व राजाला भिंतीत चिणून त्याचा वध केला. यात त्याला राजाचा पुतणा असलेल्या सेनापतीने मदत केली. राजगादीचा खरा वारसदार, युवराज मुगलन, दक्षिण भारतात पळून गेला. दक्षिण भारतातील राजांच्या मदतीने मुगलन आपल्यावर हल्ला करेल या भितीने काश्यपने राजधानीचे ठिकाण अनुराधापुराहून सिगिरियाला हलवले. त्याच्या राज्यकालात त्याने हा जंगली भाग विकसित करून सिंहप्रस्तरावर व त्याच्या भोवती अनेक प्रासाद, बागा,निवासी जागा आणि संरक्षक बांधकामे करून एका आदर्श नगराची रचना केली.

पित्याचा वध केल्यामुळे काश्यप धर्मगुरुंच्या व जनतेच्या मनातून उतरला होता. त्याने राजधानी अनुराधापूराहून दुसरीकडे हलवण्याचे हे सुद्धा एका कारण होते. सिगीरीया स्थापत्य व सौंदर्याचा एका उत्तम आविष्कार बनविण्यामागे जनतेच्या मनात परत स्थान मिळवणे हा उद्येश होता असे मानले जाते. काश्यपने हे शहर बनवण्याची प्रेरणा "अलकनंदा" या कुबेराची राजधानी असलेल्या पौराणिक शहरावरून घेतली होती. थोडक्यात त्याला "पृथ्वीवरचा स्वर्ग" निर्माण करायचा होता. अर्थातच त्याची नवीन राजधानी सर्व प्रकारे अतुलनीय बनवण्यात त्याने कोणती कसर सोडली नाही. जागेची निवड करण्यात वापरलेल्या कल्पनाशक्तीमुळे हे शहर अतुलनीय होण्यात महत्त्वाची मदत झाली आहे (इंग्लिशमध्ये म्हणतातच ना की, "लोकेशन, लोकेशन, लोकेशन !") …


सिगिरियाच्या स्थानाचे दुरून केलेले सिंहावलोकन (जालावरून साभार)

इतके आव्हानात्मक व अनवट स्थान निवडल्यावर तेथे नगर वसवायला राजा व त्याच्या स्थापत्यकारांना जेवढी स्फुर्ती मिळाली असेल त्याच्या शंभर पट जास्त कल्पनाशक्ती व श्रम खर्च करायला लागेल असणार... "१% इन्स्पिरेशन अँड ९९% परस्पिरेशन" चे हे अगदी चपखल उदाहरण आहे !

मुगलनने आपली सेना जमा करून इ स ४९५ मध्ये काश्यपवर हल्ला केला व त्याचा पराभव करून सत्ता मिळवली, सिगिरियाचे बौद्ध मठात रूपांतर केले व राजधानी परत अनुराधापुराला हालवली. येथील मठ १४व्या शतकात बंद होऊन ही जागा ओसाड झाली. अनवस्थेत गेलेली आणि घनदाट जंगलाने वेढलेली ही जागा इ स १८३१ मध्ये एका ब्रिटिश अधिकार्‍याच्या नजरेस पडली व त्यानंतर येथे मधून मधून छोट्या प्रमाणावर काम केले गेले. १९८२ पासून श्रीलंकेच्या सरकारने या जागेच्या विकासात व जीर्णोद्धारात मोठ्या प्रमाणात रस घेतला आहे.

ड्युरान ड्युरान याने १९८२ मध्ये चित्रित केलेल्या "सेव अ प्रेयर" हा व्हिडिओ सिगिरिया येथे चित्रित केला आहे. "फाऊंटन ऑफ पॅराडाईज" या आर्थर क्लार्कने लिहिलेल्या कादंबरीतले अनेक प्रसंग सिगिरिया (कादंबरीतले या जागेचे नाव डेमन रॉक असे आहे) येथे घडतात.

******

चला तर, इतकी पार्श्वभूमी माहीत करून घेतल्यावर, आता आपण सिगिरियाची सहल सुरू करूया...

या शहराच्या सद्याच्या अवशेषांचे विहंगम दृश्य आणि आराखडा पाहिला तरी त्याच्या प्राचीन सौंदर्याची चांगली झलक दिसते. ही दोन चित्रे आपल्याला शहराचा फेरफटका मारताना व तेथील आकर्षणांची स्थाने समजावून घ्यायला खूपच उपयोगी पडतील...


सिगिरिया : अवशेषांचे विहंगम दृश्य (श्रीलंकेच्या मध्यवर्ती सांस्कृतिक कोशाच्या प्रकाशनातून साभार)
खालून वर: खंदकाकडे जाणारा मुख्य रस्ता व त्याच्या बाजूचे बाह्यशहराचे अवशेष, आजही पाण्याने भरलेला पश्चिमेकडील बाह्यखंदक, खंदकाच्या आत मध्यरस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली जलोद्याने व सिंहप्रस्तर

.


सिगिरिया : अवशेषांचा आराखडा (श्रीलंकेच्या मध्यवर्ती सांस्कृतिक कोशाच्या प्रकाशनातून साभार)
१. बाहेरील संरक्षक खंदक आणि रस्ता (आकृतीच्या तळाशी दिसत असलेला खंदक सिंहप्रस्तराच्या पश्चिमेला आहे),
२. प्राचीन दगडी गढी (मापगला), ३. संरक्षक भिंतींच्या बाहेरील शहर, ४. आतील संरक्षक खंदक आणि रस्ता, ५. प्रवेशद्वारे,
६. जलोद्याने, ७. शिलोद्याने, ८. उतारावरील (टेरेस) उद्याने, ९. दर्पणभित्तिका व भित्तिचित्रे, १०. सिंहमंच,
११. प्रस्तरमाथ्यावरचा राजवाडा व १२. संरक्षक भिंतींच्या आतील शहर

******

संरक्षक बाह्यखंदक

काश्यपची राज्यावर येण्याची पार्श्वभूमी पाहिली असता या शहराला प्रबळ संरक्षण व्यवस्थेची गरज होती. हे शहर सर्व बाजूंनी उत्तम खंदकांनी वेढलेले होते हे पंधराशे वर्षांनंतर खंदकांच्या आजही उरलेल्या भागांच्या अवस्थेवरून सहज ध्यानात येते...


सिगिरिया : पाण्याने भरलेला बाह्यखंदक

******

उद्याने

इथल्या उद्यानांची रचना आणि अवशेष त्यांच्या वयाच्या मानाने खूपच चांगल्या अवस्थेत राहिलेले आहेत. ही जगातली सर्वात जुनी भूव्यवस्था (लँडस्केपिंग) केलेली उद्याने आहेत असे मानले जाते. अर्थातच, ही उद्याने इथल्या मुख्य आकर्षणांमध्ये गणली जातात.

येथील उद्यानांचे मुख्यतः चार प्रकार आहेत :
१. जलोद्यान (वॉटर गार्डन),
२. शिलोद्यान (बुल्डर गार्डन),
३. उतारावरील उद्यान (टेरेस गार्डन) आणि
४. लेण्याच्या बाजूला असलेले उद्यान (केव्ह गार्डन).

१. जलोद्यान (वॉटर गार्डन)

हे सिगिरियाचे एक महत्त्वाचे पर्यटक व स्थापत्यशास्त्रीय आकर्षण आहे. पश्चिमेकडील खंदक ओलांडून शहरात शिरल्यावर आपल्याला मध्यमार्गाच्या दोन्ही बाजूस असलेली जलोद्याने दिसतात. जलोद्यानांना शहराभोवतीच्या खंदकातून उघड्या प्रवाहांनी व भूमीगत नलिकांनी पाणीपुरवठा होतो. उद्यानांच्या सभोवती व आत पाण्याचे लहान-मोठे प्रवाह फिरवलेले आहेत. या प्रवाहांची रचना उद्यान सुशोभित करत असतानाच फुलझाडांच्या वाफ्यांना, जलकुंडांना व कारंज्यांना पाण्याचा सतत पुरवठा होईल अशी बनवलेली आहे. ..


सिगिरिया : मुख्य जलोद्यानांचा आराखडा (श्रीलंकेच्या मध्यवर्ती सांस्कृतिक कोशाच्या प्रकाशनातून साभार)

येथील चौकोनी रचना असलेले जलप्रवाह, कुंडे व फुलझाडांच्या वाफ्यांची "चारबाग" नावाची बाग, अश्या प्रकारच्या बागेचे जगातील सर्वात जुने प्रारूप (मॉडेल) समजले जाते.

एका ९० मी X ३० मी आकाराच्या जलोद्यानाचे बर्‍याच चांगल्या अवस्थेत उत्खनन केले गेले आहे. या बागेच्या रचनेत भौमितिक आकारांचा उपयोग केलेला आहे. येथे संगमरवराच्या फरशीने व गुळगुळीत दगडी गोट्यांनी बनवलेल्या पायवाटा, पाणी संथगतीने वाहावे अश्या तर्‍हेने बनवलेले ओहोळ, फुलझाडांचे आखीव वाफे, इत्यादींची मोठी कलापूर्ण रचना असलेले अवशेष दिसतात...


सिगिरियातील एका छोट्या जलोद्यानातील पाण्याच्या कुंडांची, फुलझाडांच्या वाफ्यांची व संगमरवरी फारशांची आखीवरेखीव भौमितिक रचना

चारबागेच्या थोडे पुढे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाण्याचे मोठे तलाव आहेत. या तलावांच्या मध्यभागी असलेल्या मानवनिर्मित बेटांवर पूर्वी उन्हाळ्यात राहण्यासाठी बनवलेले प्रासाद (सिंहाला भाषेमध्ये, शीतल मलिगा) बांधलेले होते.

अनेक तलावांच्या भिंतींचे अजून शाबूत असलेले ताशीव दगड त्यांच्या पूर्वसौंदर्याची ग्वाही देतात...


सिगिरिया जलोद्यान : एक मोठा बांधीव तलाव

जलोद्यानांतली काही कारंजी आजही, विशेषतः पावसाळ्यात, काम करतात !...


सिगिरिया जलोद्यान : चालू अवस्थेतले एक कारंजे (श्रीलंकेच्या मध्यवर्ती सांस्कृतिक कोशाच्या प्रकाशनातून साभार)

.

२. शिलोद्यान (बुल्डर/बोल्डर गार्डन)

अनेक लहानमोठ्या शिलांभोवती केलेले बगीचे व पायवाटा अशी या उद्यानांची रचना आहे. ही उद्याने मुख्यतः सिंहप्रस्तराच्या उतारावर आहेत. यातील काही मोठ्या शीळांवर छोटे प्रासाद किंवा बसून परिसर न्याहाळता येतील अश्या छत्र्या (पॅव्हिलियन्स) बनवलेल्या होत्या. मोठे दगड खाली ढकलून त्यांचा शत्रूवर मारा करण्यासाठीही या शीळांचा उपयोग केला जात असे...

 ...
सिगिरिया : शिलोद्याने (जालावरून साभार)

.

३. पायर्‍यापायर्‍यांचे / खाचरांचे उद्यान (टेरेस गार्डन)

ही उद्याने मुख्यतः सिंहप्रस्तराच्या पायथ्यावरील उताराचा उपयोग करून बनवलेल्या पायर्‍या-पायर्‍यांच्या जमिनीवर बनवलेली आहेत. ही रचना डोळ्यांना सुंदर तर दिसतेच, पण त्याबरोबर उपलब्ध असलेल्या नैसर्गिक परिसराचा उत्तम उपयोग (लँडस्केपिंग) करणारी आहे. पायर्‍यांची रचना मजबूत व्हावी यासाठी त्यांमध्ये विटांच्या बांधकामाचा उपयोग केलेला आहे. बागेत फिरण्यासाठी दगडी वाटा व पायर्‍या आहेत...


सिगिरिया : पायर्‍यापायर्‍यांचे उद्यान

.

४. लेण्याच्या बाजूला असलेले उद्यान (केव्ह गार्डन)

सिंहप्रस्तराच्या आजूबाजूच्या परिसरात अनेक छोट्यामोठ्या गुहा आहेत. त्यांच्या बाजूला जेथे जागा मिळेल तेथे ती बागेने सुशोभित केलेली होती.

थोडक्यात या सर्व परिसरातील अशी एकही मोकळी जागा सोडलेली नव्हती की जिथे पाणी पोहोचवून तिला बागेने सुशोभित केले गेले नव्हते ! या बागांतली अनेक घटकतत्वे "एक हजार वर्षे नंतर बनवलेल्या" युरोपियन रेनेसाँ बागांत दिसतात ! सिंहगिरियावर चढाई करताना वाटेत येणार्‍या अजून काही बागा आपण पाहूच.

******

खंदकापासून निघून, बागांच्या मधून असलेल्या मध्यमार्गावरून चालत असताना सिंहप्रस्तराचा पायथ्याजवळ येऊ लागल्यावरच आपल्याला त्या २०० मीटर उंचीच्या प्रस्तराच्या भव्यपणाची खरी जाणीव होऊ लागते...


सिगिरिया : सिंहप्रस्तराचे १००-१५० मीटर दूरवरून दर्शन

******

शीळांच्या नैसर्गिक रचनेने बनलेले प्रवेशद्वार (Boulder Garden / Boulder Gate)

सिंहप्रस्तराच्या जवळ आल्यावर त्याच्यावर चढाई सुरू करण्या अगोदर एका नैसर्गिक रचनेचा खुबीने केलेला वापर दिसतो. एकमेकावर रेललेल्या दोन मोठ्या शीळांच्या मध्ये असलेल्या चिंचोळ्या त्रिकोणी फटीतून सिंहप्रस्तरावर जाण्याची वाट आहे...


सिगिरिया : शीळांच्या नैसर्गिक रचनेने बनलेला आकर्षक मार्ग : बाहेरून दर्शन

.


सिगिरिया : शीळांच्या नैसर्गिक रचनेने बनलेला आकर्षक मार्ग : आतून दर्शन

हा मार्ग शत्रूपासून सिंहप्रस्तराचे संरक्षण करण्यात किती उपयोगी आहे हे सांगायला नकोच. पण नैसर्गिक अवस्थेतल्या या शिलांचा हा कल्पक उपयोग एक आश्चर्यसुंदर स्थापत्यही उभे करतो ! याच्या आजूबाजूलाही बाग असल्याने बर्‍याचदा या शिलांच्या रचनेला शिलोद्यानात गनले जाते.

******

हे नैसर्गिक द्वार ओलांडून पुढे आलो की सिंहप्रस्तरावरच्या खर्‍या चढाईला सुरुवात होते. उभ्या कड्याच्या बाजूने कोरलेल्या पायर्‍या प्रस्तराच्या एका बाजूला फेरी मारत आपल्याला प्रस्तराच्या दुसर्‍या बाजूच्या मध्यावर असलेल्या एका मोठ्या पठारावर पोहोचवतात. तेथे असलेल्या सिंहप्रवेशद्वारातून आत गेल्यावर परत एकदा तीव्र चढांच्या पायर्‍या चढून आपण प्रस्तरमाथ्यावर पोहोचतो. मात्र हे सर्व वाटते तितके सहजपणे होत नाही. कारण हा एकूण २०० मीटर उंचीचा चढ सिंहप्रस्तराभोवती फेरी मारत वर जातो. त्यामुळे, चालायला लागणारे एकूण अंतर बरेच जास्त होते. या प्रवासात अनेक टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यावर एक किंवा अनेक आकर्षणे आहेत. ती पाहत पाहत आपण पुढे जातो. ही वैचित्र्यपूर्ण आकर्षणे आनंद तर देतातच, पण त्याच बरोबरच चढाईचा वेग कमी होत असल्याने, त्याचा पर्यटकांना जरासा दम घ्यायलाही उपयोग होतो !

चला तर आपण चढाईला सुरुवात करूया आणि आपल्या वाटेत येणार्‍या आकर्षणांचा आस्वाद घेत प्रस्तरमाथा गाठूया. ही चढाई नीट समजून घ्यायला खालील चित्राची बरीच मदत होईल...


सिंहप्रस्तरावरच्या चढाईचा मार्ग (मूळ चित्र श्रीलंकेच्या मध्यवर्ती सांस्कृतिक कोशाच्या प्रकाशनातून साभार) :
शीलांनी बनलेले नैसर्गिक द्वार --> पश्चिम कड्यावरचा उभ्या चढाचा दगडी पायर्‍यांचा पहिला टप्पा
--> दर्पणभित्तिका व भित्तिचित्रे असलेला पश्चिम कड्यावरचा कमी तीव्रतेचा चढ असलेला पायऱ्यांचा दुसरा टप्पा
--> उत्तर कड्यावरचा उभ्या चढाच्या पायर्‍यांचा तिसरा टप्पा --> मध्ये उंचीवरचे सिंहपठार --> सिंहपायर्‍या
--> १००+ मीटर उंचीचा उत्तर कड्यावरचा तीव्र उभ्या चढाचा पायर्‍यांचा चवथा टप्पा
--> सिंहप्रस्तरमाथा व त्यावरचे राजवाड्याचे अवशेष

.

शिलांनी बनवलेले नैसर्गिक द्वार ओलांडून आत आल्यावर सुरू होणारा दगडी पायर्‍यांचा उभा चढ पर्यटकांची बऱ्यापैकी दमछाक करतो. मात्र जसजसे आपण वर जातो तसे आजूबाजूच्या निसर्गरम्य परिसराचे अधिकाधिक सुंदर दर्शन होत जाते व त्यामुळे आपला जोम वाढायला मदत होते. पायऱ्यांच्या या पहिल्या टप्प्याच्या वरच्या टोकावरून घेतलेली खालील काही चित्रे मी काय म्हणतोय त्याचा थोडासा अंदाज देऊ शकतील.

दूर क्षितिजाजवळ एकामागे एक असलेल्या हिरव्यागार टेकड्यांच्या रांगांची नक्षी, तेथून प्रस्तराच्या पायथ्यापर्यंत पोहोचणारे असंख्य हिरव्या छटांचे घनदाट अरण्य, त्यातून मधूनच डोकावणाऱ्या छोट्या छोट्या वस्त्या आणि जंगलाच्या अनेक मीटर वर उठून दिसणारी एक उभी बुद्धमूर्ती... असा भव्य देखावा आपल्याला काही काळ जागेवरच खिळवून ठेवतो...


सिगिरिया : पायऱ्यांचा पहिला टप्पा चढून आल्यावर दिसणारे जंगलाचे विहंगम दृश्य

तर जरा खाली नजर गेली की प्रस्तराच्या पायथ्याजवळ खंदकाच्या आत असलेल्या दाट झाडीमधील बागांचे अवशेष व त्यांच्यातून धावणाऱ्या पाण्यांच्या ओहोळांची रचना दिसते. पूर्वीही सुंदर वाटलेली ही रचना आता विहंगम दृश्यात तर अजूनच आखीव-रेखीव आणि कलापूर्ण दिसू लागते...


सिगिरिया : पायऱ्यांचा पहिला टप्पा चढून आल्यावर दिसणारे सिगिरियाच्या बागांचे विहंगम दृश्य

.

येथून पुढे सुरू होणारा पायऱ्यांचा दुसरा टप्पा कमी चढ असल्याने आपली दमछाक करत नाही... पण तो वेगळ्याच कारणांनी, तिथल्या आकर्षाणांनी, आपल्याला नकळत श्वास रोखून ठेवायला भाग पाडतो.

******

दर्पणभित्तिका (Mirror wall)

उभ्या पश्चिम कड्याला खेटून असलेल्या या दुसऱ्या टप्प्याच्या मार्गाच्या बाहेरच्या अंगाला सर्व लांबीभर जवळ जवळ पुरुषभर किंवा जास्त उंचीची विटांनी बांधलेली भिंत आहे. मुख्य म्हणजे, पाचव्या शतकात कड्याच्या टोकावर बांधलेल्या व हजारभर वर्षे निसर्गाचे आघात सहन केलेल्या या भिंतीची बहुतांश लांबी अजूनही फारश्या डागडुजीची गरज न पडता मूळ स्वरूपात शिल्लक आहे ! या भिंतीच्या बाहेरील पृष्ठभागावरच्या गिलाव्याला इतकी उत्तम झिलई (पॉलिश) केलेली आहे की सूर्यप्रकाशात ही भिंत आरशासारखी चमकते. वरचे "सिंहप्रस्तरावरच्या चढाईचा मार्ग" हे चित्र पाहिले तर इतर पार्श्वभूमीवर या भिंतीच चकाकी किती उठून दिसते हे ध्यानात येईल. यामुळेच या भिंतीला "दर्पणभित्तिका" असे नाव पडले आहे...


दर्पणभित्तिका : जवळून दर्शन

काश्यपाच्या पराभवानंतर सिगिरियाला मठाचे स्वरूप आल्यावर हे स्थान सर्वसामान्यांकरिता खुले झाले. अर्थातच धर्माच्या कारणाने व या अनवट जागेतील आकर्षणे पाहायला येथे देशभरच्या लोकांची गर्दी होऊ लागली. इथल्या भित्तिचित्रांनी प्रेरित होऊन, ६व्या पासून १४व्या शतकापर्यंत भेट दिलेल्या अनेक पर्यटकांनी, भिंतीच्या आतल्या पृष्ठभागावर व काहींनी तर भित्तिचित्रे असलेल्या गुहांत, शेकडो भित्तिलेखने (ग्राफिती) केलेली आहेत. एकंदरीत काय, पर्यटकांची इथे-तिथे काही-बाही खरवडून ठेवण्याची सवय हजारो वर्षे प्राचीन आहे हे नक्की ! मात्र, दुःखात सुख इतकेच की, या कवितांमधून त्या कालखंडातील कलेबद्दलच्या आणि सामाजिक जीवनाबद्दलच्या कल्पनांचा अंदाज करता येतो, हा एक मोठा फायदा होत आहे. आजपर्यंत सुमारे ८५० लेखनांचा अर्थ लावला गेला आहे.

हे लिखाण सिंहला, संस्कृत व तमिळ भाषांत आहे. हे लिखाण प्रेम, इथल्या कलेची स्तुती, असूयेने दिलेले शिव्याशाप, विरह किंवा फक्त भेटीच्या तारखा अश्या विविध विषयांवर आहे. यातले काही लिखाण उत्तम वाङ्गमयात गणले जावे इतके सुंदर आहे असे म्हणतात. आतापर्यंतच्या संशोधनाने येथील ६८५ लेखकांची गणना झाली आहे, त्यात १२ स्त्रिया आहेत. जवळ जवळ निम्म्यांची नावे माहीत झाली आहेत. लेखनावरून काहींचे व्यवसाय व राहण्याचे गावही माहीत झाले आहे. भेट देणाऱ्यांपैकी बहुतेक जण राजघराण्यातील, सरदारघराण्यातील, उच्च व्यावसायिक अथवा धर्मगुरु असले तरी इतर सैनिक, लोहार, इत्यादी वर्गांच्याही काही लोकांनी या जागेला भेट दिलेली आहे.

जालावर एका ठिकाणी ही काही कवितांची इंग्लिश भाषांतरे सापडली, त्यांचा आस्वाद घेऊया...

One reads "Hail! I am Vira-vidura Bato. I wrote this..".
Wet with cool dew drops
fragrant with perfume from the flowers
came the gentle breeze jasmine and water lily
dance in the spring sunshine
side-long glances of the golden hued ladies stab into my thoughts
heaven itself cannot take my mind
as it has been captivated by one lass
among the five hundred I have seen here.
***
Another extols:
The girl with the golden skin enticed the mind and eyes
Ladies like you make men pour out their hearts
And you also have thrilled the body
Making it stiffen with desire.
***
A female visitor wrote:
A deer-eyed maiden of the mountain side arouses anger in my mind.
In her hand she holds a string of pearls,
and in her eyes she assumes rivalry with me..
***
A mention of five hundred frescoes.
The five hundred damsels arrest the progress of him who is going to heaven.
With their gentle smile and the fluttering of their eye-lids, the damsels stood here,
enslaved me who had come to the summit of the cliff..

.

भित्तिचित्रे (Frescoes)

भित्तिचित्रे हे सिगिरियाचे सर्वात मोठे आकर्षण समजले जाते. सिंहप्रस्तराच्या पश्चिमकड्यामध्ये अनेक मजल्यांच्या कमीजास्त खोलीच्या गुहांमध्ये ही भित्तिचित्रे आहेत. दर्पणभित्तिकेच्या वरच्या स्तरांवर असलेल्या या गुहांत जाण्यासाठी आता धातूच्या गोल शिड्या लावल्या आहेत. पूर्वी ही चित्रे १४० मी X ४० मी इतक्या मोठ्या पृष्ठभागावरच्या जगातील सर्वात मोठ्या चित्रप्रदर्शनाच्या रूपात होती. पंधराशे वर्षे नैसर्गिक आघात व अनवस्था यामुळे गुहांची बरीच पडझड झाली आहे व दोन गुहांतच काही मोजकी चित्रे उरली आहेत. इतर ठिकाणीही चित्रे होती हे तेथील गिलावा व रंगांच्या अवशेषांवरून समजते. दर्पणभित्तिकेवरील काव्यांतील वर्णनांत चित्रांसंबंधी केलेले उल्लेख, चित्रांचे केलेले रसग्रहण आणि या चित्रांची इतर ठिकाणी (विशेषतः दांबुला येथील गुंफामंदिर, ज्याला आपण पुढे भेट देणार आहोत) केली गेलेली नक्कल यावरून मूळ कारागिरीसंबंधी काही अंदाज बांधता येतात.

या चित्रांचा मुख्य विषय "आभूषणे व फुलांनी सजलेल्या स्त्रिया" हा आहे. या स्त्रिया कोण आहेत याबाबत अनेक अंदाज वर्तवले जातात... नटून सजून देवदर्शनाला जाण्यार्‍या स्त्रिया; (कुबेराची राजधानी अलकनंदेतील) विद्युल्लताकुमारी (विज्जुकुमारी, लाईटनिंग प्रिन्सेस) व मेघलता (क्लाऊड डॅमसेल); देवलोकातील (राजसभेतील) अप्सरा, इत्यादी. हे अंदाज किंवा इतर काही खरे असले तरी या चित्रांनी काश्यपाचा प्रबळ, धनवान व कलासक्त राजा असा लौकिक होण्यासाठी नक्कीच मदत केली असणार.

ही श्रीलंकेतली सर्वात जुनी चित्रे आहेत. ती मुख्यतः मध्यभारतिय अजंता शैलीत असली तरी त्यांच्यावर दक्षिण भारतिय बाग आणि सित्तनवसल या शैलींचाही प्रभाव आहे. मात्र येथील चित्रकारांनी भारतीयांच्या पेक्षा जास्त ठळक रेषांचा व भडक रंगांचा उपयोग केल्याचे दिसते. या चित्रांवरून बनवलेल्या अनेक पूर्णाकृती व लघुप्रतिकृति (मिनिएचर) शिल्पांचे अवशेष सिगिरियाच्या बागांमध्ये सापडले आहेत.

सिगिरियातील काही भित्तिचित्रे...


सिगिरिया भित्तिचित्रे ०१

.


सिगिरिया भित्तिचित्रे ०२

.

 ...
सिगिरिया भित्तिचित्रे ०३ व ०४

.

 ...
सिगिरिया भित्तिचित्रे ०५ व ०६

.

 ...
सिगिरिया भित्तिचित्रे ०७ व ०८

.

 ...
सिगिरिया भित्तिचित्रे ०९ व १०

.

आपल्या मागून येणार्‍या पर्यटाकांचा रेटा नसता तर अजून बराच वेळ तेथे अडकून पडलो असतो असे वाटावे असेच हे आकर्षण आहे.

"सिंहप्रस्तराची अर्धीच उंची गाठली आहे आणि अजून बरेच काही पाहायचे बाकी आहे" याची जाणीव मार्गदर्शक करून देतो आणि गुहांतून खाली उतरून आपण दर्पणभित्तिकेच्या संरक्षणात पुढचे मार्गक्रमण सुरू करतो.

(क्रमश : )

==================================================================

सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...   ०२ : औकानाची बुद्धमूर्ती...
    ०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी...   ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...
    ०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी...    ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...
   
०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान...                                       ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...
    ०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)...       १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...
    ११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी...   १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...
   
१३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड...                              १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...
    १५ : याला राष्ट्रीय उद्यान...                                           १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...
    १७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो...                            १८ : कोलंबो... (समाप्त)

==================================================================
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================

प्रतिक्रिया

दिपक.कुवेत's picture

14 Dec 2015 - 2:49 pm | दिपक.कुवेत

फोटो पाहूनच छाती दडपली. सफर फारच अभ्यासपुर्ण होत चालली आहे. मस्तच.

पद्मावति's picture

14 Dec 2015 - 3:25 pm | पद्मावति

मस्तं!
आत्ता उठून श्रीलंकेला जावंसं वाटतंय...

अत्रुप्त आत्मा's picture

15 Dec 2015 - 2:46 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११

चांदणे संदीप's picture

14 Dec 2015 - 3:31 pm | चांदणे संदीप

"रम्य ही स्वर्गाहुनी लंका!" हेच पटते ही चित्रे पाहून आणि इथले वर्णन वाचून!
मस्तच आहे सफर म्हात्रेकाका! :)

वाचतोय, पुभाप्र!
Sandy

निव्वळ अद्भूत आहे सिंहगिरी.
भित्तिचित्रे पण फार आवडली. अजिंठा चित्रशैलीशी फारच मिळतीजुळती.

कपिलमुनी's picture

15 Dec 2015 - 2:23 pm | कपिलमुनी

अशा सुंदर जागा ( सिगिरिया ,खजुराहो, अंकोरवट) ओसाड पडतात आणि शेकडो वर्ष तशाच रहातात याचे आश्चर्य वाटते

काय अद्भुतरम्य नगरी आहे ही.ही जेव्हा वापरात असेल तेव्हा तिचे देखणेपण काय असेल.
या एका नगरीसाठी श्रीलंकेला जावेच्च लागणार!

रेवती's picture

15 Dec 2015 - 7:59 pm | रेवती

वर्णन व फोटू पाहून त्याकाळातील राहणीमान डोळ्यासमोर आले.
चित्रकाराने वापरलेले रंग उच्चप्रतीचे असणार.
पॉलिश्ड भिंत आवडली. प्रस्तरावर बांधकाम करताना त्याकाळी किती अडचणींना सामना करावा लागला असेल हे एक त्यांनाच माहित!
हत्ती सफरीच्या फोटूमध्ये तो काळजीवाहक बिचार्‍या हत्तीला इजा करतोय की काय असे वाटतेय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Dec 2015 - 8:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

हत्ती सफरीच्या फोटूमध्ये तो काळजीवाहक बिचार्‍या हत्तीला इजा करतोय की काय असे वाटतेय.

नाय हो !

हत्तीही लई गुणाचा होता. अख्ख्या सफारीत माहुताला हत्तीला बोटही लावायची गरज पडली नाही. पण फोटो काढतो म्हटल्यावर माहुताने लगेच पोज घेतली =))

रेवती's picture

15 Dec 2015 - 9:17 pm | रेवती

ओक्के.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Dec 2015 - 8:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व प्रतिसादकांसाठी आणि वाचकांसाठी धन्यवाद !

बाबा योगिराज's picture

15 Dec 2015 - 8:30 pm | बाबा योगिराज

मस्तच लिहिलय. फोटो तर एकदम झक्कास. एकदम मज्जा येतेय वाचायला. पुलेशु. पुभाप्र.

स्रुजा's picture

15 Dec 2015 - 9:03 pm | स्रुजा

अरे वाह ! सफर रंगत चाललीये. श्रीलंका एवढं सुंदर असेल असं वाटलं नव्हतं. माझ्या डोळ्यासमोर श्रीलंकेचं सौंदर्य म्हणजे समुद्रकिनारेच असायचे फकत.

सुमीत भातखंडे's picture

16 Dec 2015 - 12:32 pm | सुमीत भातखंडे

वर्णन आणि चित्र दोन्ही अप्रतिम!

सुंदर श्रीलंका आणी तितकेच सुंदर फोटो!मस्तच!
भित्तिचित्रे उच्च आहेत.
पुभाप्र.

कपिलमुनी's picture

17 Dec 2015 - 5:52 pm | कपिलमुनी

प्रतीक्षेत !