==================================================================
सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन... ०२ : औकानाची बुद्धमूर्ती...
०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी... ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...
०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी... ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...
०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान... ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...
०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)... १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...
११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी... १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...
१३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड... १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...
१५ : याला राष्ट्रीय उद्यान... १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...
१७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो... १८ : कोलंबो... (समाप्त)
==================================================================
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================
...इथेही अनुराधापुरासारखीच अवस्था झाली. एका आकर्षणापासून दुसर्याकडे धावताना दोन्ही ठिकाणी अजून जास्त वेळ हवा होता असे सारखे वाटत राहते. पण पुढचा कार्यक्रमही एका महत्त्वाच्या आकर्षणाला "गल विहारा" ला भेट देण्याचा होता. त्यामुळे नाईलाजाने पोलोन्नारुवाचा निरोप घ्यावा लागला.
गल विहारा
पोलोन्नारुवाच्या आपण बघितलेल्या अवशेषांपासून जरासे दूर (अंदाजे ५ किमी) असलेले हे स्थान प्राचीन काळी राजधानीचाच भाग होते. बाराव्या शतकात पहिल्या पराक्रमबाहूने बांधलेल्या १०० मंदिरांपैकी महत्त्वाचे असलेले हे मंदिर सुरुवातीच्या काळात उत्तररामा या नावाने ओळखले जात असे. सद्या याला "गल विहार / विहारे / विहाराया" या नावांनी ओळखले जाते.
हे मंदिर म्हणजे ग्रॅनाइटच्या मोठ्या सलग कड्यांत कोरलेल्या चार बुद्धमूर्ती आहेत. कुलवंश ग्रंथाप्रमाणे मुख्य मंदिर त्यातील बुद्धमूर्ती तयार झाल्यावर उरलेल्या कड्यांत राजाने अजून तीन गुहा खोदवून घेतल्या व त्यात अजून प्रत्येकी एक मूर्ती कोरून घेतली. जरी या तीन जागांना गुहा मंदिरे म्हटले जात असले तरी त्यातली केवळ एक सोडून इतरांचे स्वरूप कड्यांत कोरलेल्या मूर्ती व कड्याला जोडून बांधलेल्या दगड्विटांच्या इमारती असेच होते. पूर्वी ही मंदिरे भित्तिचित्रांनी सुशोभित केलेली होती. आता दगडविटांची बांधकामे बहुतांशी नष्ट झाली असून कड्यांत कोरलेली बुध्दशिल्पे उघड्यावर पण बर्याच चांगल्या अवस्थेत शिल्लक उरली आहेत.
या मंदिराने श्रीलंकेतील बौद्धधर्मात फार महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. पहिला पराक्रमबाहू सत्तेवर आला तेव्हा अभयगिरी विहार, जेतवनरामाया स्तूप आणि महाविहार यांच्यात चढाओढ चालू होती. राजाने सर्व पंथांची एकत्र परिषद बोलावून त्यांच्यात समेट घडवून आणला, भ्रष्ट धर्मगुरुंना पदच्युत केले व वरिष्ठ धर्मगुरुंकरवी "आचारसंहिता (code of conduct)" बनवून घेतली. या सर्व घडामोडी गल विहारामध्ये घडल्या आहेत आणि ती आचारसंहिता तेथे शिलालेखाच्या रूपाने कोरून ठेवलेली आहे. अर्थातच श्रीलंकेतील बौद्ध धर्मात या स्थानाचे महत्त्व फार वरचे आहे. त्याच्या सुरुवातीपासून अखेरपर्यंत हे महत्त्वाचे बौध्दधर्मशिक्षणाचे स्थान होते. पोलोन्नारुवाच्या पाडावानंतर उत्तररामा (गल विहारा) अनवस्थेत गेले.
गल विहारातील चार मूर्ती
गल विहारातल्या ग्रॅनाइट मध्ये कोरलेल्या या बुद्धमूर्ती प्राचीन सिंहली शिल्पकलेचे उत्तम उदाहरण समजले जाते. एकाच सलग कड्याचा उपयोग करायचा असल्याने अर्थातच प्रत्येक मूर्तीची उंची ती ज्या ठिकाणी आहे तेथील प्रस्तराच्या उंचीवर अवलंबून आहे. प्राचीन काळी त्यांच्यावर सुवर्णलेप चढवलेला होता, जो आता अर्थातच नष्ट झालेला आहे. या मूर्तींच्या कोरीवकामात अनुराधापुरा शैलीपासून बरीच फारकत घेतली आहे व त्यांच्यावर अमरावती शैलीचा मोठा प्रभाव आहे. उदाहरणार्थ, मूर्तींचे भालप्रदेश जास्त विस्तीर्ण आहेत व वस्त्रांच्या घड्या एकेरी ऐवजी दुहेरी रेखांनी कोरलेल्या आहेत.
चला, आता आपण डावीकडून उजवीकडे एक एक करत बुद्धमूर्ती पहायला सुरुवात करूया...
१. मुख्य आसनस्थ बुद्धमूर्ती
कड्याकडे पाहिले असता सर्वात डावीकडे ४.६३ मीटर (१५ फूट २.५ इंच) उंच ध्यानमुद्रेत कमलासनावर बसलेल्या बुद्धाची मूर्ती आहे. आसनाच्या चौथर्यावर फुले व सिंहांची नक्षी आहे. मूर्ती दगडात कोरल्यावर तिच्या भोवती तयार झालेल्या कक्षाच्या मागील भिंतीवर सुशोभित कोरीव खांब, मूर्तीच्या मस्तकावर मकरतोरण व तोरणाच्या बाजूला मूळ मूर्तीच्याच चार प्रतिमा कोरलेल्या आहेत. ही सगळी चिन्हे प्राचीन सिंहला शैलीत विरळ असून, हा बहुतेक महायान पंथाचा प्रभाव असावा.
१. मुख्य आसनस्थ बुद्धमूर्ती
.
२. विद्याधर गुहेतली आसनस्थ बुद्धमूर्ती
दगडात कोरलेल्या १.४ मीटर खोल विद्याधर नावाच्या गुहेत असलेली ही १.४ मीटर (४ फूट ७ इंच) उंचीची आसनस्थ बुद्धमूर्ती इथली सर्वात छोटी आहे. या मूर्तीचे कमलासन पहिल्या मूर्तीप्रमाणेच कोरीव सिंहांनी सुशोभित केलेले आहे. मागच्या भिंतीवर पहिल्या मूर्तीपेक्षा जास्त बारकाव्यांसह सिंहासन व छत्र कोरलेले आहे. बाजूला चामरे घेतलेले सेवक आहेत. बुद्धाच्या डोक्यामागे प्रभामंडल आहे. त्याच्या प्रत्येक बाजूला एक चतुर्भुज मूर्ती आहे. पुरातत्त्वज्ञ बेल याच्या मते उजवीकडील मूर्ती ब्रह्माची व डावीकडील विष्णूची आहे.
२. विद्याधर गुहेतली आसनस्थ बुद्धमूर्ती
.
३. उभी मूर्ती
ही मूर्ती ६.९३ मीटर (२२ फूट ९ इंच) उंच आहे आणि इतर मूर्तींच्या तुलनेने कमी उंचीच्या कमळाच्या आकाराच्या चौथर्यावर उभी आहे. हाताची घडी केलेली ही मूर्ती काहीशी मागच्या कातळाचा आधार घेऊन उभी आहे.
नेहमीच्या शिरस्त्यांना धरून नसलेली मुद्रा असलेल्या या मूर्तीबाबत तज्ज्ञांत मतभेद आहेत. ते असे :
१. ही बुद्धमूर्ती नाही.
२. मूर्तीच्या चेहर्यावरील दु:खी भाव आणि शेजारील (तिच्या डाव्या बाजूची) बुद्धाची महापरिनिर्वाणावस्थेतील मूर्ती पाहता ही मूर्ती शोक करणार्या भिक्कू आनंदाची आहे. परंतू मध्यभागी असलेल्या कातळाच्या भिंतीचे अवशेष पाहता या दोन मूर्ती एकमेकाशेजारी असल्या तरी वेगवेगळ्या कक्षांत होत्या असे दिसते. त्यामुळे या दाव्याचा जोर बराच कमी होतो.
३. परनविथाना या श्रीलंकन पुरातत्त्वज्ञाच्या मते ही "परदु:खदु:खिता मुद्रा" (दुसर्याच्या दु:खाने दु:खी झालेला बुद्ध) आहे. मात्र ही मुद्रा सिंहली स्थापत्यात फारशी दिसत नसल्याने या दाव्याला फारसा पाठिंबा नाही.
४. अजून एक मतप्रवाह असे मानतो की ही मूर्ती ज्ञानप्राप्ती झाल्याच्या दुसर्या आठवड्यातील बुद्धाची आहे व बुद्ध बोधी वृक्षाकडे निवारा दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहे.
५. कुलवंश ग्रंथात इतर तीन मूर्तींचा उल्लेख आहे पण हिचा उल्लेख नाही. त्यामुळे ही मूर्ती वेगळ्या (अगोदरच्या) कालखंडात कोरली गेली असावी.
इतिहासाच्या बाबतीत मतभेद असले तरी गल विहारातील ही सर्वात उंच मूर्ती तिच्या आकारमानाने व कोरीवकामाच्या कौशल्याने आपल्या मनात भरते...
३. उभी मूर्ती
.
४. महानिर्वाणमुद्रेतील बुद्धमूर्ती
ही १४.१२ मीटर (४६ फूट ४ इंच) लांबीची महानिर्वाणमुद्रेतील बुद्धमूर्ती गल विहारातील सर्वात मोठी मूर्ती आहे. बुद्ध उजव्या कुशीवर झोपलेला असून उजवा हात डोके व डोक्याखालच्या लोडामध्ये ठेवलेला आहे. हा लोड इतका कौशल्याने कोरला आहे की कापसाने भरलेल्या लोडाचा डोक्याच्या भाराने बदललेला आकार स्पष्ट दिसतो. डावा हात शरीरावर डाव्या मांडीपर्यंत सरळ ठेवलेला आहे. उजव्या हाताच्या व पायाच्या तळव्यांवर कमलचिन्ह आहे. डाव्या पायाचा अंगठा उजव्या पायाच्या अंगठ्याच्या तुलनेने मागच्या बाजूला आहे... हे महापरिनिर्वाणचिन्ह आहे. (निद्रावस्थेत असलेल्या बुद्धाच्या पायाचे अंगठे पुढेमागे नसतात, उभ्या रेषेत बरोबर एकमेकावर असतात.) सर्वसाधारण बुद्धमूर्तीप्रमाणे या मूर्तीचा पाया कमलासनाचा नसून केवळ तासलेल्या समतल खडकाचा आहे. प्रस्तरात आजूबाजूला कोरलेल्या खांबांचे व खाचांचे अवशेष पाहता या मंदिरावर पूर्वी लाकडी छत असावे असा कयास आहे.
४. महानिर्वाणमुद्रेतील बुद्धमूर्ती
.
गल विहाराकडून तिवांका प्रतिमागृह या पुढच्या आकर्षणाकडे जाताना मार्गदर्शकाने वाटेत थांबून एक छोटेसे स्नानकुंड दाखवले. आकाराने फार मोठे नसले तरी हे कमलकुंड त्याच्या प्रमाणशीर आकाराच्या व उत्तम तासलेल्या कमळांच्या पाकळ्यांच्या आकाराच्या पायर्यांमुळे श्रीलंकेतील प्राचीन स्थापत्यकारांच्या कौशल्याचे उदाहरण समजले जाते...
कमलकुंड
.
तिवांका पिलिमागे / तिवांका प्रतिमागृह (Tivanka Pilimage / Image House)
पोलोन्नारुवातील जेतवनरामा स्तूपाच्या आधिपत्याखालील ४०.५३ X २०.४२ मीटर (१३३ X ६७ फूट) आकाराचे हे प्रतिमागृह १२ व्या शतकात पहिल्या पराक्रमबाहूने बांधले. त्याच्या भिंतींची रुंदी २ ते ३.६ मीटर (७ ते १२ फूट) असल्याने मंदिराच्या अंतर्भागाचा आकार बराच कमी झाला आहे.
मंदिरामधील बुद्धाच्या ६.४ मीटर (२१ फूट) उंचीच्या मूर्तीत त्याच्या अंगाला असलेल्या तीन ठिकाणच्या (खांदे, कंबर व गुडघा) वक्रतेमुळे या मंदिराचे तिवांका हे नाव पडले आहे. ही मूर्ती विटांमध्ये बनवली गेली व नंतर गिलावा देऊन तिला रंग दिला गेला. मूर्तीला बरीच हानी पोहोचलेली आहे. मी भेट दिली तेव्हा या मूर्तीसकट संपूर्ण मंदिराचा जीर्णोद्धार चालू होता...
तिवांका प्रतिमागृह ०१ : मंदिरातील उभी बुद्धमूर्ती
मूळ मंदिराचे छप्पर विटांनी बांधलेले व घुमटाकार होते. त्याला गण आणि बटूंच्या आधार देणार्या मूर्ती होत्या. त्याचा फक्त काही भागच उरलेला होता. त्यातील विटा व शिल्पांचा ढीग इमारतीशेजारी पडलेला होता. मंदिराचा काही भागच पर्यटकांसाठी खुला होता. मंदिराच्या सर्वच भिंतींवर जातक कथांमधले व बुद्धाच्या जीवनाशी संबंधीत इतर प्रसंग रंगवलेले आहेत. ही चित्रे पोलोन्नारुवा कालखंडातील भित्तिचित्रांचा उत्तम नमुना समजली जातात. चित्रांमध्ये प्रामुख्याने विटकरी तांबडा, पिवळा व हिरवा रंग वापरलेला आहे. अनेक शतके दुरवस्थेत असूनही ही चित्रे चित्रकारांच्या कौशल्याची झलक दाखवतातच.
त्यातली ही काही चित्रे...
तिवांका प्रतिमागृह ०२
.
तिवांका प्रतिमागृह ०३
.
तिवांका प्रतिमागृह ०४
.
तिवांका प्रतिमागृह ०५
.
तिवांका प्रतिमागृह ०६
मंदिरातल्या अपुर्या उजेडामुळे व चित्रांच्या बरेच जवळ उभे राहून फोटो घ्यावे लागत असल्याने चित्रांची प्रत तेवढी चांगली नाही यासाठी क्षमस्व.
विटकामाने बनवलेले सुशोभित खांब, खिडक्या, विविध शिल्पे व इतर कलाकुसरीने मंदिराच्या बाहेरच्या भिंती सजवलेल्या आहेत. या कलाकुसरीवर पल्लव शैलीची छाप आहे. भितींना बरीच हानी पोहोचलेली असली तरी त्यांच्या अवशेषांवरून त्यांच्या गतवैभवाची कल्पना येते...
तिवांका प्रतिमागृह ०७
.
तिवांका प्रतिमागृह ०८
.
तिवांका प्रतिमागृह ०९
.
तिवांका प्रतिमागृह हे ठिकाण मूळ आराखड्यात असले तरी त्याच्याबाबत मला फारशी माहिती नव्हती. अचानक समोर आलेला हा कलेचा खजिना सुखद आश्चर्य देऊन गेला. त्यामुळे खूश होऊन, श्रीलंकेचे प्राणीवैभव पाहण्यासाठी कौडुल्ला राष्ट्रीय उद्यानाच्या दिशेने, पुन्हा एकदा हिरवाईने भरलेल्या रस्त्यावरून प्रवास सुरू केला.
(क्रमश : )
==================================================================
सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन... ०२ : औकानाची बुद्धमूर्ती...
०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी... ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...
०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी... ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...
०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान... ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...
०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)... १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...
११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी... १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...
१३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड... १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...
१५ : याला राष्ट्रीय उद्यान... १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...
१७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो... १८ : कोलंबो... (समाप्त)
==================================================================
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================
प्रतिक्रिया
6 Dec 2015 - 10:44 pm | इशा१२३
हा भागहि आवडला.केवढय भव्य बुद्धमुर्ति आहेत.रेखिव अगदि.
7 Dec 2015 - 4:40 am | रेवती
सर्व मूर्तींचे वर्णन आवडले.
7 Dec 2015 - 7:48 am | अजया
तिवांकामधील चित्र अजिंठ्याच्या चित्रांसारखीच वाटली.विशेषतः प्रतिमागृह चित्र ५.
पुभाप्र
7 Dec 2015 - 9:31 am | प्रचेतस
अजिंठा शैलीतील नाही वाटत. मात्र उत्तर अजिंठा शैलीतील नक्कीच वाटते.
वेरूळच्या जैन लेणीतील चित्रांशी ह्या चित्रांचे बरेच साधर्म्य वाटते.
7 Dec 2015 - 9:37 am | प्रचेतस
हा भागही खूप आवडला.
इथल्या विहारावर अजिंठ्यातील महायान काळातील शैलीच अखूपच प्रभाव दिसतोय. अधूनमधून गांधारी शैलीचे अगदी पुसटसे दर्शनही होतेय.
वरील शिल्पांत आहे तशा हातांच्या घड्या घातलेल्या काही मूर्ती वेरूळात आहेत. (बौद्ध लेणी क्र. १२ -तीन ताल, रामेश्वर लेणे)
तेथील मुर्ती आयुधपुरुष स्वरूपाच्या असून मुकुटात वज्र कोरलेले आहे.
7 Dec 2015 - 12:34 pm | डॉ सुहास म्हात्रे
सहमत.
हे स्थान एकमेकाशी भांडणार्या सर्व बौद्धपंथांना एकत्र आणण्यासाठी बांधले व वापरले गेले. या पार्श्वभूमीमुळे येथे सर्वच पंथाचा काही ना काही प्रभाव आहेच, व दुसर्या मुर्तीच्याभोवतीच्या कारागिरीत काहीसा हिंदू प्रभावही आहे.
7 Dec 2015 - 10:26 am | विलासराव
वाचतोय.
एक मित्र जातोय श्रीलंकेला पुढील आठवड्यात.
त्याला या लिक दिल्यात वाचायला.
आमचा योग २०१६ मधे दिसतोय.
7 Dec 2015 - 12:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
सर्व प्रतिसादकांना व वाचकांना धन्यवाद !
7 Dec 2015 - 3:19 pm | पद्मावति
पाचूचे बेट! श्रीलंका म्हणजे फक्त सुंदर बीचेस या माझ्या कल्पनेच्या कितीतरी वेगळा असलेला हा देश, त्याची फार सुंदर ओळख करून देताय.
7 Dec 2015 - 4:41 pm | सूड
सुंदर!!
7 Dec 2015 - 4:49 pm | बॅटमॅन
दगडी वैभव आहे राव लंका म्हणजे!!!!
रच्याकने, तुमच्या पोलोन्नारुवा सफरीत तुम्हांला "गल पोथा" नामक प्रकार कुठे दिसला / ऐकण्यात आला काय?
हा दगडावर कोरलेला एक मोठ्ठा शिलालेख आहे.
https://www.google.co.in/?gfe_rd=cr&ei=yWJlVszkK63v8weuka_IBQ#q=gal+potha
7 Dec 2015 - 8:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
हा शिलालेख खरेच आजपर्यंत माहित नव्हता ! आमच्या मार्गदर्शकानेही तो दाखवला नाही. धन्यवाद त्याच्याकडे लक्ष वेधल्याबद्दल ! आता गुगलून पाहिले तर खरंच बघणेबल गोष्ट होती असे दिसते...
राजा निस्सांका मल्ल याने या ८.२ मी लांब व १.४ मी रूंद शिळेवर स्वतःबद्दलची आणि त्याच्या राज्याबद्दलची माहिती कोरून तिला लक्ष्मी, हत्ती व हंसाच्या कोरलेल्या चित्रांनी सजवले आहे. मुख्य म्हणजे ही ७२ ओळीतली ४३,००० अक्षरे उठावदार दिसण्यासाठी ते कोरीवकाम वितळवलेले धातू ओतून भरलेले होते... अर्थात आता धातू निघून गेले असणार. पण, ही शिलालेख बनवण्याची जरा वेगळीच प्रक्रिया झाली !
.
(दोन्ही चित्रे जालावरून साभार)
पोलोन्नरुवातले अवशेष दहा एक किमी त्रिज्येत विखुरलेले आहेत. त्यामुळे एखादे आड जागेतले आकर्षण टाळण्याकडे मार्गदर्शकांचा कल असतो असे दिसते :(
8 Dec 2015 - 12:09 pm | बॅटमॅन
धन्यवाद, ती अक्षरे अगोदर धातूने भरलेली होती हे माहिती नव्हते. बाकी बडे बडे अवशेषों में ऐसी छोटी छोटी बाते होती रहती हैं. :)
7 Dec 2015 - 6:22 pm | अत्रुप्त आत्मा
मस्त..सूंदर..!
8 Dec 2015 - 12:49 am | Jack_Bauer
लंका म्हणजे रावण एवढंच डोक्यात येत. रामायणाशी निगडीत काही गोष्टी तिथे आहेत का ?
9 Dec 2015 - 8:58 pm | डॉ सुहास म्हात्रे
पुढच्या काही भागांत याचा उल्लेख येईल.
9 Dec 2015 - 9:03 pm | खटपट्या
खूप सुंदर...
10 Dec 2015 - 10:08 pm | मदनबाण
मस्त... उभी मूर्ती पाहुन मला क्षणभर ती उभ्या उभ्या झोपलेल्या "ममी" ची मूर्ती वाटली ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-'Hegemony of Western media has to end' - Arnab Goswami at RT conference
11 Dec 2015 - 1:40 pm | सुमीत भातखंडे
.
15 Dec 2015 - 2:17 pm | कपिलमुनी
लेख आवडला ! खुपच माहितीपूर्ण !
आणि हेवनवासी बॅट्याने दिलेला शिलालेख पण भारी आहे
24 Dec 2015 - 2:31 pm | पैसा
सर्वच फोटो अतिशय आवडले. बुद्धमूर्तींवर काही प्रमाणात गांधार शैलीचा प्रभाव जाणवला. चित्रेही फार सुरेख वाटली. विटांच्या भिंतींवर शिल्पे कशी आणली याबद्दल कुतुहल आहे. की बांधकामाचा काही भाग दगडात आणि काही विटांमधे असे आहे?
24 Dec 2015 - 5:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
विटांचे ठोकळे / जाड भिंती बांधून त्यावर कोरीवकाम करून नंतर गिलावा व रंग देणे; असे त्या प्रक्रियेचे साधारण स्वरूप असावे असेच त्या मूर्तींवरून दिसते. उत्तम भाजलेल्या मातीच्या विटा अनेक हजार वर्षे टिकतात इथल्या व दक्षिणपूर्व अशियातल्या बांधकामांत बरेचदा दिसले आहे. मोहेंजोदरो येथिल उत्खननात इ स पूर्व ३००० ते १५०० वर्षांपूर्वीच्या भाजलेल्या मातीच्या (टेरॅकोट्टा) वस्तू मिळाल्या आहेत.
अवांतर :
यामुळेच, उत्तर भारतात वापरले जाणारे चहाचे मातीचे भांडे पर्यावरणसंरक्षक असते असे म्हणणे चूक आहे. त्यांच्यापेक्षा कागदी कप बरा... पण ते बनवायला वृक्षतोड करावी लागते. त्यापेक्षा परत परत वापरण्याजोगा काचेचा किंवा धातूचा कप/पेला बरा... पण तो नीट धुतल्याची खात्री नसली तर आरोग्यविषयक समस्या होऊ शकतात ! केले ना पुरेसे कनफूस ? ठरवा आता, बाहेर फिरताना कश्यात चहा प्यायचा ते =)) =))
विविध पदार्थांना निसर्गात नष्ट (बायोडिग्रेडेशन) व्हायला लागणारे कालखंड साधारणपणे असे आहेत :
१. भाजलेल्या मातीच्या वस्तू : > १००० ते ६००० वर्षे किंवा जास्त
२. सामान्य वापरातले प्लास्टिक : > ४५० ते १००० वर्षे किंवा जास्त
३. Polyethylene Terephthalate (PET or PETE) प्लास्टिक : नैसर्गिकपणे कधीच नष्ट होत नाही.
४. इतर नेहमीच्या वापरातिल गोष्टी...
Paper Towel - 2-4 weeks
Banana Peel - 3-4 weeks
Paper Bag - 1 month
Newspaper - 1.5 months
Apple Core - 2 months
Cardboard - 2 months
Cotton Glove - 3 months
Orange peels - 6 months
Plywood - 1-3 years
Wool Sock - 1-5 years
Milk Cartons - 5 years
Cigarette Butts - 10-12 years
Leather shoes - 25-40 years
Tinned Steel Can - 50 years
Foamed Plastic Cups - 50 years
Rubber-Boot Sole - 50-80 years
Plastic containers - 50-80 years
Aluminum Can - 200-500 years
Plastic Bottles - 450 years
Disposable Diapers - 550 years
Monofilament Fishing Line - 600 years
Plastic Bags - 200-1000 years