==================================================================
सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन... ०२ : औकानाची बुद्धमूर्ती...
०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी... ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...
०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी... ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...
०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान... ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...
०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)... १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...
११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी... १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...
१३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड... १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...
१५ : याला राष्ट्रीय उद्यान... १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...
१७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो... १८ : कोलंबो... (समाप्त)
==================================================================
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================
गाडी परत पाचूच्या महिरपीतून धावू लागली आणि त्या दोनेक तासांच्या प्रवासात मी सरळ मागच्या आसनावर ऐसपैस बसून कधी बाहेरचे निसर्गसौंदर्य पहा तर कधी मस्त डुलकी घे असा कार्यक्रम चालू ठेवला.
आज सहलीचा दुसरा दिवस उजाडला. दम्मामपासून निघाल्यानंतर झालेल्या गेल्या दीड-दोन दिवसांच्या धावपळीने इतका थकवा आला होता की, पोलोन्नारुवाच्या डियर पार्क रिसॉर्टवर पोहोचल्यावर शॉवर, जेवण आणि बिछाना या पलीकडे काही सुचले नव्हते. रात्री ओंडका का काय म्हणतात तो असल्याइतकी इतकी गाढ झोप लागली होती. पण सकाळी जाग आली तेव्हा नवीन आकर्षणांच्या ओढीने बहुतेक शीण पळाला होता. आजचा दुसरा दिवसही भरगच्च कार्यक्रमाने भरलेला आहे हे आठवून भराभर सकाळचे कार्यक्रम आटपून खोलीबाहेर पडलो... आणि दिसले की, "अरे आपण जंगलातच झोपलो होतो की! ". अर्थातच, कमरेला लावलेले कॅमेरा नावाची बंदूक उपसून, क्लिक्, क्लिक् असा गोळीबार करत, त्या जंगलातून मोठ्या कष्टाने वाट काढत, भोजनगृहापर्यंत पोहोचणे कसेबसे शक्य झाले !...
पोलोन्नारुवामधिल डियर पार्क रिसॉर्ट ०१
.
पोलोन्नारुवामधिल डियर पार्क रिसॉर्ट ०२
.
पोलोन्नारुवामधिल डियर पार्क रिसॉर्ट ०३
कालच्या थकव्यात आणि संध्याकाळच्या अंधुक प्रकाशात या परिसराकडे फारसे लक्ष गेले नव्हते. रिसॉर्ट अगदी जंगलात असल्याचे वाटावे इतक्या घनदाट झाडीत असले तरी खोल्यांतील व्यवस्था आधुनिक होती व मुख्य म्हणजे न्याहारीत विविधता होती... आणि अर्थातच फळांची रेलचेल होती. वेगवेगळ्या पदार्थांनी सजलेले टेबल पाहून पोटाने दिलेल्या जोरदार हाकेला ओ देऊन, न्याहारीवर हल्ला करून तिचा यथेच्छ फन्ना उडवला! सज्जड न्याहरीबरोबर व नेहमीच्या फळांबरोबरच एक दोन अनवट श्रीलंकन फळांचा आस्वाद घेऊन बाहेर पडलो.
*********************************
आजच्या दिवसाचा आराखडा असा होता...
सिंहलव्दीपाची सहल : दुसरा दिवस - पोलोन्नारुवा --> गल विहारा --> कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान --> पोलोन्नारुवा (वस्ती)
(मूळ नकाशा जालावरून साभार)
*********************************
पोलोन्नारुवा (Polonnaruwa)
पोलोन्नारुवा हे प्राचीन श्रीलंकेतील अनुराधपुरानंतरचे सनावळीप्रमाणे आणि आकारमानाप्रमाणेही दुसर्या मोठ्या राजधानीचे ठिकाण आहे. हे एक युनेस्कोप्रणित जागतिक वारसा स्थान आहे.
महावेली नदीच्या काठावर वसलेले हे नगर अनुराधापुराइतकेच जुने आहे. याच्यापासून जवळच विजिथागामा येथे इ स पूर्व ४०० मध्ये वस्ती असल्याचे पुरातत्त्व संशोधकांचे व लिखित ग्रंथांतले दावे आहेत. सिंहली भाषेत कापसाला पुलुन म्हणतात व मारुवा म्हणजे वस्तुविनिमय (बार्टरींग) यावरून हे शहर कापसाच्या विक्रीचे केंद्र असावे व त्यावरून त्याचे नाव पडले असावे असा एक दावा आहे.
चोल राजा पहिला राजराजन याने इ स १०१७ मध्ये अनुराधापुराचा पाडाव करून राजा पाचवा महिंदा याला बंदी करून भारतात आणले व भारतातच महिंदाचा १०२९ मध्ये मृत्यू झाला. या विजयानंतर चोलांनी राजधानीचे ठिकाण अनुराधापुराहून पोलोन्नारुवाला हलवले, नगराचे नाव जयनाथमंगलम् असे बदलले आणि तेथून श्रीलंकेवर ५२ वर्षे राज्य केले. श्रीलंकेतील चोल राजांचा पराभव केल्यावर सिंहला राजा पहिला विजयबाहूनेही या शहराला आपली राजधानी बनवली आणि तेथून श्रीलंकेत सिंहला राजवंशाचा एकछत्री अंमल स्थापन केला. पोलोन्नारुवा कालखंडातले पहिला पराक्रमबाहू व निस्सानकमला हे दोन बलशाली राजे सोडले तर इतर सिंहला राजे कमकुवत निघाले. राजदरबारातील कलहांवर ताबा न ठेवता आल्याने त्यांनी सत्ता हाती ठेवण्यासाठी दक्षिण भारतातील बलवान राजांशी रोटीबेटी संबंध सुरू केले. काही कालाने याचा परिणाम दक्षिण भारतातून श्रीलंकेवर आक्रमणे होण्यात झाला. भारतीय पांडियन राजघराण्यातील 'पराक्रमा पांडियन' नावाच्या राजाने पोलोन्नारुवा राज्यावर हल्ला करून तेथे १२१२ ते १२१५ या काळात राज्य केले. त्यानंतर आर्यचक्रवर्ती राजघराण्यातला राजा कलिंग माघ याने प्रथम जाफना जिंकून तेथे आपल्या राज्याची स्थापना केली. नंतर त्याने पोलोन्नारुवा काबीज केले व तेथे १२३६ मध्ये पाडाव होईपर्यंत राज्य केले.
अश्या रितीने विविध संस्कृतींच्या राजवंशांच्या राजधानीचे स्थान असल्यामुळे पोलोन्नोरुवाच्या स्थापत्यावर अनेक भारतीय व सिंहला शैलींची छाप आहे. चोल राज्यांच्या कालात हिंदुधर्माचे प्राबल्य होते. त्या काळी शिवमंदिरांची उभारणी झाली व पायर्यांमध्ये वापर केला जाणार्या चंद्रशिलेच्या रचनेतून शिवाचे वाहन असलेल्या बैलाचे चिन्ह काढून टाकले गेले. बौद्ध कालात, पहिला विजयबाहू व पहिला पराक्रमबाहू यांच्या कालखंडांत अनेक नवीन विहारांची रचना व जुन्यांची डागडुजी केली गेली. या दोन्ही कालांत लोकमनात दबदबा निर्माण करणारे महाप्रसाद, रुग्णालये, इत्यादीसारखी बांधकामे व अनेक बागबगीचे बनवले गेले. राजकालांशी संबंधीत धर्मस्थानांना व त्या धर्मांशी निगडित शिक्षणसंस्थांना राजाश्रय मिळून त्यांचा विकास झाला. अर्थातच, या नगरीचे स्थापत्यवैभव व आकारमान १४ व्या शतकापर्यंत उत्तरोत्तर वाढत गेले. इतर काही कारणे असली तरी, मुख्यतः दक्षिण भारतातून होणार्या सतत आक्रमणांमुळे राजधानीचे ठिकाण पोलोन्नारुवाहून कायमस्वरूपी हलवले गेले. यानंतर हे शहर ओस पडले.
सहा शतके दुरवस्थेत गेलेल्या या शहराचे अनेक अवशेष आजही त्या शहराच्या सुवर्णकालाची झलक आपल्याला दाखवतात. चला तर, करूया वैविध्यपूर्ण पोलोन्नारुवा नगरीचा फेरफटका सुरू...
पोलोन्नारुवाचे विहंगम दर्शन (जालावरून साभार)
.
पराक्रमसमुद्र
राजा पहिला पराक्रमबाहू याचा कालखंड पोलोन्नारुवाचा सुवर्णकाल समजला जातो. या काळात व्यापार व कृषीउद्योगांची भरभराट झाली. हा राजा जलनियोजनाबाबत इतका सजग होता की आकाशातून पडणारा एकही थेंब वाया जाता कामा नये असे त्याचे मत होते. अर्थातच, पोलोन्नारुवामधील जलप्रणाल्या अनुराधापुरापेक्षा अधिक विकसित होत्या आणि त्यापैकी बर्याच प्रणाल्या ८-९ शतकांनंतर आजही उन्हाळी भातशेती करण्यासाठी वापरल्या जात आहेत. यातील एक पराक्रमसमुद्र नावाची जलप्रणाली संपूर्ण शहराभोवतीचा खंदक आणि शहराची जीवनवाहिनी असे दुहेरी काम करत असे. ही विशाल जलप्रणाली पाच सरोवरे/धरणे व त्यांना एकमेकांशी जोडणारे रुंद कालवे मिळून बनलेली आहे. ती बर्याच ठिकाणी इतकी रुंदी आहे की एका किनार्यावर उभे राहिल्यावर पलीकडचा किनारा डोळ्यांना दिसत नाही. तिच्या जलसाठ्यांत अनेक छोटी बेटे सुद्धा आहेत आहेत...
...
पराक्रमसमुद्राच्या भव्यतेची कल्पना देणारी दोन प्रकाशचित्रे (जालावरून साभार)
.
राजा पहिला पराक्रमबाहूचा राजवाडा, "विजयंतप्रासाद"
या थक्क करणारे स्थापत्य असलेल्या भव्य सात मजली इमारतीत एक हजार खोल्या होत्या असे म्हणतात. खोल्यांच्या एकूण संख्येबाबत दुमत असले तरी तेथे पराक्रमबाहूच्या नावाला साजेश्या संख्येच्या खोल्या असणार याची खात्री त्याला पाहिल्यावर पटते. उरलेल्या चौथर्यावरून व इतर अवशेषांवरून या इमारतीच्या विशालतेची कल्पना येते...
राजा पहिला पराक्रमबाहूचा राजवाडा, "विजयंतप्रासाद" ०१ : समोरील बाजूने अवलोकन
.
राजा पहिला पराक्रमबाहूचा राजवाडा, "विजयंतप्रासाद" ०२ : मागच्या बाजूने अवलोकन
या इमारतीच्या १ ते ९ मीटर जाडीच्या भिंती जवळून बघितल्यावर खरोखरच छातीवर येतात! भिंतींची इतकी मोठी जाडी बहुतेक इमारतीच्या अनेक मजल्यांचा भार तोलण्यासाठी व महालातल्या जलप्रणालीसाठी असावी. भिंतीतील मोठी छिद्रे बहुदा त्यातून लाकडी तुळया टाकून मजल्यांच्या जमिनी बनविण्यास वापरलेली असावी. ८०० वर्षे उघड्यावर निसर्गाचे आघात सहन करूनही या इमारतीचा गिलावा काही ठिकाणी उरलेला आहे. राजमहालाभोवती राजदरबारातील मंत्री, सैन्याधिकारी व सेवकांच्या घरांचे अवशेष (मुख्यतः घरांचे चौथरे) दिसतात...
राजा पहिला पराक्रमबाहूचा राजवाडा, "विजयंतप्रासाद" ०३ : मजल्यांच्या व भिंतींच्या आकारमानाचा अंदाज येण्यासाठी मानवाकृतीबरोबर घेतलेला फोटो
.
...
राजा पहिला पराक्रमबाहूचा राजवाडा, "विजयंतप्रासाद" ०४ व ०५ : भिंतींच्यामधून सांडपाणी वाहून जायची व्यवस्था व ते वाहून नेणारा नलिकामार्ग
.
राजा पहिला पराक्रमबाहूचा राजवाडा, "विजयंतप्रासाद" ०६ : महालाच्या संरक्षक भिंतीच्या पायाचे अवशेष
.
...
राजा पहिला पराक्रमबाहूचा राजवाडा, "विजयंतप्रासाद" ०७ व ०८ : महालाच्या संरक्षक भिंतीच्या पायावरची बाहेरच्या बाजूने दिसणारी नक्षी
.
राजा पहिला पराक्रमबाहूचा राजवाडा, "विजयंतप्रासाद" ०९ : स्नानकुंड
आपण केवळ अवशेष पाहत असलो तरी, स्थापत्यविषारदांनी या प्रासादाचा आराखडा बनवताना व बांधकाम करताना, तो पूर्ण झाल्यावर त्याचे वर्णन करताना "प्रचंड", "विशाल", "महा-" या विशेषणांची गरज वारंवार पडावी असा उद्द्येश डोळ्यासमोर ठेवलेला होता हे मनावर नक्कीच ठसते.
.
या परिसरात अजून बरेच लहानमोठ्या प्रासादांचे अवशेष आहेत...
अजून एका भव्य इमारतीचे (थुपारामा) अवशेष
.
शिवमंदिर
चोल राजांची राजधानी असल्यामुळे व चोलांशी लग्नसंबंध झाल्याने हिंदू असलेल्या राण्यांच्यामुळे पोलोन्नारुवामध्ये अनेक हिंदू मंदिरे होती. ती मुख्यतः शिवमंदिरे होती. मात्र या नगराचा उत्तर काल बौद्ध राजांचा असल्याने त्यातील बहुतेक सर्व नष्ट झाली अथवा केवळ अवशेषरुपात उरलेली आहेत. हे त्यातल्या त्यात बरे असलेले एका हिंदू राणीसाठी बांधलेले शिवमंदिर...
...
एका राणीचे शिवमंदिर व त्यातील पुजारीण
.
पोलोन्नारुवाचे वटदागे किंवा अवशेषमंदिर (Polonnaruwa Vatadage)
वटदागे म्हणजे (बहुतांश वेळा भगवान बुद्धाचे) अवशेष ठेवलेल्या स्तूपांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्याभोवती बांधलेले मंदिर. यांच्या स्थापत्यावर काहीसा भारतीय स्थापत्यशैलीचा प्रभाव असला तरी वटदागे हे केवळ श्रीलंकेत सापडणारे स्थापत्य आहे. वटदागेमध्ये मध्यभागी बुध्दावशेष ठेवलेला किंवा एखाद्या घटनेमुळे पवित्र समजल्या जाणार्या भूमीवर बांधलेला एक छोटा स्तूप असतो. त्याच्याभोवती दगडी खांब व विटांचे बांधकाम असलेली व कोरीवकाम असलेली गोलाकार इमारत असते. या इमारतींचे छप्पर बर्याचदा लाकडी असे.
संग्रहालयात ठेवलेले वटदागेचे प्रारूप (मॉडेल)
श्रीलंकेत सद्या फक्त दहा एकच वटदागे उरलेली आहेत. तीही बर्याचश्या दुरवस्थेत आहेत. पोलोन्नारुवाचे वटदागे या सर्वात उत्तम अवस्थेतले समजले जाते.
पहिल्या पराक्रमबाहूच्या कारकीर्दीत पोलोन्नारुवाचे वटदागे भगवान बुद्धाचा दात ठेवण्यासाठी बांधले गेले. त्यानंतर निस्सांका मल्ल या राजाच्या काळात येथे बुद्धाचे भिक्षापात्र ठेवले गेले.
पोलोन्नारुवाचे वटदागे किंवा अवशेषमंदिर ०१
.
पोलोन्नारुवाचे वटदागे किंवा अवशेषमंदिर ०२
.
कीर्ती विहार
हा पोलोन्नारुवामधील सर्वात मोठा व २४ मीटर उंच विहार पहिल्या पराक्रमबाहूच्या सुबद्रा (सुभद्रा) नावाच्या राणीने बांधला. याचे मूळ नाव रूपवती स्तूप होते. ९०० वर्षे निसर्गाचे आघात सहन करत हा स्तूप अजूनही मूळ रूपात राहिला आहे. याच्या बाजूला वरिष्ठ धर्मगुरु व राजघराण्यातील लोकांच्या मृत देहांवर उभारलेले अनेक छोटे स्तूप आहेत. त्यात राजा व राणीच्या नावे बांधलेले दोन स्तूप आहेत असे मानले जाते.
कीर्ती विहार
.
सतमहाल प्रासादा
पहिल्या पराक्रमबाहूच्या कारकीर्दीत बाराव्या शतकात हे मंदिर बांधले गेले. ही विटांचे बांधकाम असलेली, ९ मीटर (३० फूट) उंचीची, पिरॅमिडच्या आकाराची, कंबोडियन व थाई स्तुपशैलींतली, सात मजली इमारत तिच्या अनवट बनावटीमुळे येथील परिसरात उठून दिसते. तिच्या वास्तुविशारदाबद्दल संभ्रम आहे. हे मंदिर राजाच्या पदरी काम करणार्या कंबोडियन सैनिकांनी त्यांच्या उपासनेसाठी बांधले असावे असे समजले जाते. त्याला चारी बाजूने प्रवेशद्वारे आहेत व मजले चढण्यासाठी जिने आहेत. मात्र, सुरक्षिततेच्या कारणासाठी इमारतीत प्रवेश निषिद्ध आहे.
सतमहाल प्रासादा
.
राजांचे पुतळे
अवशेषांमध्ये बाहेर उघड्यावर हा सुंदर कोरीवकाम असलेला एकाकी पुतळा दिसला. तो एका राजाचा आहे या पलीकडे जास्त माहिती मिळू शकली नाही...
एका राजाचा पुतळा
पहिल्या पराक्रमबाहूचा ३.४ मीटर उंचीचा एकाच शीळेतून कोरलेला पुतळा मुख्य आकर्षणांपासून दूर एकाकी जागेत आहे असे कळले. मात्र म्हणजे तो पराक्रमबाहूचा पुतळा असण्याबाबत मतभेद आहेत. त्यामुळे वेळ वाचविण्यासाठी त्याला भेट दिली नाही. पण, वाचकांच्या सोयीसाठी त्याचे जालावरून घेतलेले चित्र देत आहे...
पहिल्या पराक्रमबाहूचा पुतळा (जालावरून साभार)
.
इथेही अनुराधापुरासारखीच अवस्था झाली. एका आकर्षणापासून दुसर्याकडे धावताना अजून जास्त वेळ हवा होता असे सारखे वाटत राहिले. पण पुढचा कार्यक्रमही एका महत्त्वाच्या आकर्षणाला "गल विहारा" ला भेट देण्याचा होता. त्यामुळे नाईलाजाने पोलोन्नारुवाचा निरोप घ्यावा लागला.
(क्रमश : )
==================================================================
सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन... ०२ : औकानाची बुद्धमूर्ती...
०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी... ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...
०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी... ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...
०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान... ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...
०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)... १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...
११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी... १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...
१३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड... १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...
१५ : याला राष्ट्रीय उद्यान... १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...
१७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो... १८ : कोलंबो... (समाप्त)
==================================================================
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================
प्रतिक्रिया
3 Dec 2015 - 4:39 pm | दिपक.कुवेत
सहिच चालली आहे सफर....आवडला हा हि भाग.
3 Dec 2015 - 5:06 pm | पद्मावति
अतिशय सुंदर झालाय हा भागसुद्धा.
इतिहास, स्थापत्य, निसर्गाची रेलचेल असलेल्या श्रीलंकेचे अप्रतिम दर्शन तुम्ही करून देताय.
शतश: आभार तुमचे.
3 Dec 2015 - 5:28 pm | एस
वाचतोय. फारच धावतपळत सफर झाली असावी असे वाचताना वाटते आहे.
3 Dec 2015 - 7:07 pm | विलासराव
झक्कास !!!!
3 Dec 2015 - 7:29 pm | खटपट्या
जबरी !!!
3 Dec 2015 - 7:33 pm | अत्रुप्त आत्मा
प्ल्स वण!
3 Dec 2015 - 9:20 pm | अजया
वाचतेय.ही नावं नेहमीच्या श्रीलंका टुरमध्ये नाही वाचली.तुम्ही अॅरेंज कशी करता टूर? स्वतःची प्रवासयोजना आखून का?
3 Dec 2015 - 10:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
आब्यास, आब्यास कर्तो अदुगर ! मग टूर कंपन्यांना लै सतावतो. माझे म्हण्णे मान्य नाय केले तर टूरच नाय कर्णार म्हंतो. मग ते बिचारे मान्य कर्तात... बिचार्यांच्या ब्रेड-बटर (आणि जॅमचाही) प्रश्न असतो ना ! मग त्यातले काही जमेल तेवढ्या शेंड्या लावायचा प्रयत्न करतातच, पण आपण आपला गड लढवत ठेवायचा, बाजारात जास्त ब्येष्ट प्लॅन आहे म्हणायचे ;) पण एकंदरीत आपल्याला काय बघायचे आहे ते सगळे बघायला मिळाले की आम्ही खूष, बाकी सगळे अक्कलखाती जमा ! :)
जरा गंभीरपणे सांगायचे झाले तर, मला कारण माहित नाही पण मला मानववंशशास्त्राची ओढ आहे. मी त्यातला तज्ञ अजिबात नाही, पण त्याबाबत प्रचंड कुतुहल आहे. त्यामुळे जेथे जातो तेथे दर ठिकाणी माणसाने काय काय सांस्कृतिक-सामाजिक-राजकिय उपद्व्याप करून ठेवले आहेत व करत आहे हे बघण्यात आणि त्याच्या कारणपरंपरेत मला प्रचंड रस असतो. मी टूर बुक करण्याआधी ऑपरेटर्सना मला "सन अँड सँड" मध्ये अजिबात रस नाही, त्याऐवजी मला त्या देशाची वैशिष्ठ्ये दिसतील असे काही दाखव असे सांगतो. मग मी निवडलेल्या दोन ते चार कंपन्यांतील एखाद्या कंपनीचा मला जास्तीत जास्त आवडलेला आराखडा (इटिनिररी) घेऊन त्यात योग्य ते बदल करून कस्टमाईझ्ड आराखडा बनतो. या फरकांमुळे खिश्याला थोडीशी खार लागण्याचा संभव असतो म्हणा... पण तो नेसेसरी इव्हिल आहे असे समजून खूष राहतो.
असे कस्टमाईझ्ड आराखडे करण्याचा भारतीय कंपन्यांना फारसा अनुभव नाही. एकदोन वाईट अनुभवांची झळ सोसल्यावर मी त्यांचा नाद सोडला. शक्यतो स्थानिक (त्या देशातील) कंपनी निवडतो. आंतरजालामुळे ते हल्ली खूप सोपे झाले आहे.
गेल्या दोन वर्षांत काही भारतीय कंपन्या अशी सेवा देतात असे ऐकले आहे, पण मला त्यांचा प्रत्यक्ष अनुभव नाही.
5 Dec 2015 - 9:20 pm | इशा१२३
म्हणजे खरच भरपुर अभ्यास करता कि!आणि हे माणसाचे उपद्व्याप पहायचा छंद मलाहि आहे.अशाच सहली करायला हव्यात.
हा हि भाग मस्तच!वाचतेय...
5 Dec 2015 - 10:04 pm | डॉ सुहास म्हात्रे
आपण पाहत असलेल्या आकर्षणांची अगोदर माहिती असल्याने बरेच फायदे होतात :
१. मुख्य म्हणजे आपल्याला काय पहायचे आहे / नाही हे माहित असल्यास काही कंपन्या जी नकोशी भरताड इटीनेररीत करतात ती टाळता येते. उदा. काही कंपन्या अक्षरशः काही दिवस खरेदीसाठी ठेवतात, मला याच्यात शून्य रस असतो. एकतर मी तो दिवस टाळता येतो का हे पाहतो, नाहीतर कमीत कमी त्याऐवजी जवळचे एखादे आकर्षण असल्यास ते पाहण्याची व्यवस्था मागतो.
२. अगोदर माहिती असल्यास ते आकर्षण पाहताना त्याचे बारकावे नीट समजल्याने जास्त मजा येते. आणि हो, कधी कधी मार्गदर्शकाने मारलेल्या थापा त्याच्या गळ्यात घालून त्याला/तिला तसे परत करण्यापासून परावृत्त करता येते :)
३. विशेषतः चीनमध्ये जवळ जवळ सर्वच शहरांत असलेल्या संध्याकाळच्या करमणूकीच्या कार्यक्रमांची माहिती स्वतंत्रपणे जालावरून काढून नंतर आंतरजाल अथवा स्थानिक मार्गदर्शकाकरवी त्यांची तिकीटे काढली होती. ते कार्यक्रम माझा त्या सहलीतला एक अविस्मरणिय अनुभव होता... चीनमध्ये असे एकूण १४ कार्यक्रम मी पाहिले. त्यातला एकातही दुसर्या कोणात्या कार्यक्रमाची पुनरावृत्ती नव्हती !
इत्यादी.
7 Dec 2015 - 4:12 am | स्रुजा
अजया ताई सारखाच प्रश्न विचारायला आले होते. आशिया मध्ये सहल प्लान करताना नेहमी हा प्रश्न पडतोच कारण कुठल्या तरी टुर कंपनी ची गरज असतेच. सविस्तर प्रतिसादा बद्दल धन्यवाद. नेहमीसारखाच या ही तुमच्या लेखमालेमधला शेवटचा भाग वाखु म्हणुन साठवणार.
7 Dec 2015 - 2:20 pm | डॉ सुहास म्हात्रे
आंतरजालावर शोधल्यास प्रत्येक आशियायी देशात उत्तम टूर कंपन्या व त्यांचे विविध ग्राहकांसाठी सोईचे आराखडे सापडतील. त्यातला तुमच्या आवडीशी जुळणारा निवडू शकता. स्थानिक संस्था असल्याने समस्या आल्यास त्यांच्याशी ताबडतोप संवाद करून सुधारणा करून घेता येते. चीनसारख्या अगडबंब देशात तर स्थानिक कंपनीने मला १०० युवानचे कार्ड असलेला देशभर चालणारा मोबाईल फोन सर्व सहलभर वापरण्यास दिला होता व त्याचा खूप उपयोग झाला.
10 Dec 2015 - 3:15 am | स्रुजा
क्या बात हे ! हो तिथल्या तिथे ऑफिसेस असणं महत्त्वाचं ठरतं. स्मार्ट सल्ला.. :)
7 Dec 2015 - 7:27 am | अजया
नोटेड!
3 Dec 2015 - 9:32 pm | स्वाती दिनेश
लंकेची सफर छान चालली आहे. वाचते आहेच,
स्वाती
3 Dec 2015 - 10:04 pm | प्रचेतस
खूपच सुंदर.
ह्या शहराबद्दल, येथील अवशेषांबद्दल, येथील इतिहासाबद्दल कधीही ऐकलेले नव्हते.
अतिशय धन्यवाद ह्या सफ़रीबद्दल.
3 Dec 2015 - 10:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
सर्व प्रतिसादकांसाठी आणि वाचकांसाठी धन्यवाद !
3 Dec 2015 - 11:19 pm | रेवती
सर्वप्रथम तुम्ही राहिलात ते हॉटेल फारच आवडले असल्याचे सांगते.
विजयंतप्रासादाचे अवशेषही ग्रेट आहेत तर त्याकाळी हे सर्व किती सुंदर दिसत असेल असे वाटत होते. बांधकामातील विटा पाहून त्यांना लंकेतील विटा असे म्हणायला हरकत नाही. ;) मागील भागापर्यंत दागोबे दिसत होते तर या भागात वटदागे दिसतायत. एकूणच मनुष्याला श्रद्धास्थाने बांधायला फार आवडते. देश कोणताही असो!
4 Dec 2015 - 12:29 am | मदनबाण
वाह्ह... नेहमी प्रमाणेच एक्का काकांचा स्पेशल पोझ मधला फोटू आवडला. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हमने जब देखा की हम अंधों की नगरी में आ गये है,तो हमनें आइने बेचने का धंदा ही बंद कर दिया. ;) :- इति :- जेके फ्रॉम शेहेनशाह
4 Dec 2015 - 10:10 am | जातवेद
वाचतोय.
4 Dec 2015 - 10:59 am | सस्नेह
बारकाईने लिहिलेले तपशील आणि खास फोटो !
तुमच्या अभ्यासामुळे लेख अत्यंत वाचनीय असतात.
4 Dec 2015 - 11:19 am | मालोजीराव
तुम्ही जी ठिकाणे पाहता आणि आम्हाला दाखवता :) ती टूर कंपन्यांच्या नेहमीच्या ठिकाणापेक्षा नवीन, स्थानिक संकृती आणि इतिहास दर्शवणारी असतात.
डियर पार्क रिसॉर्ट एकदम आवडेश
7 Dec 2015 - 2:06 pm | पियुशा
जबराट !
7 Dec 2015 - 2:27 pm | बॅटमॅन
आई शप्पथ....रावणाची लंका कशी असेल ती असो पण तिथे लै जब्राट बांधकाम होते या समजाला पुष्टी देणारेच फटू आहेत राव हे. काय स्केल ए का चेष्टा..... उगा युरोपआम्रिकेत जाण्याअगोदर हे पाहिलं पाहिजे भेंडी.
प्रतिसादांतूनही खूप माहिती मिळते आहे. त्यासाठी एक्का काकांचे पेश्शल धन्यवाद!!!!! _/\_
10 Dec 2015 - 10:59 pm | पैसा
अतिशय सुंदर लिखाण होते आहे. फोटो लाजवाब!
11 Dec 2015 - 1:01 pm | सुमीत भातखंडे
देखणं आहे सगळं.
हजार एक वर्षांपूर्वी काय असेल हे शहर!! सिंपली ग्रेट.
15 Dec 2015 - 2:15 pm | कपिलमुनी
त्या काळी रोम ट्रॉय सारखा असेल हे शहर