मला आवडलेले संगीतकार :- १ मदनमोहन
मला आवडलेले संगीतकार :- २ सी रामचंद्र
मला आवडलेले संगीतकार :- ३ अनिल बिश्वास
मला आवडलेले संगीतकार :- ४ सज्जाद हुसैन
मला आवडलेले संगीतकार :- ५ गुलाम मोहम्मद
सबकुछ लुटाया हमने आकर तेरी गलीमें
आपला भारत देश विविध प्रांतांनी एकत्र मिळून बनलेला आहे. प्रत्येक प्रांताची आपापली वेगळी संस्कृती, बोलीभाषा, खानपान, रितीरिवाज आणि संगीत ही. हिंदी चित्रपट संगीतातसुध्दा या विविध प्रांतातून आलेल्या संगीतकारांनी आपापल्या प्रांताच्या संगीताचा ठसा उमटवला आणि त्यात यश ही मिळवले. जेव्हा चित्रपटसंगीतात पंजाबी लोकसंगीताचा विषय येतो तेव्हा प्रामुख्याने डोळ्यासमोर येतात गुलाम हैदर, नौशाद आणि हंसराज बेहल यांचे. “मास्टरजी” या टोपणनावाने प्रसिध्द असलेले हंसराज यांनी हिंदी चित्रपटसंगीताला आपल्या पंजाबी ढंगाच्या संगीताने नुसतेच नटवले नाही तर अनेक अलौकिक देणग्या दिल्या आहेत त्याबद्दल आपण रसिक सदैव त्यांचे ऋणी राहणार आहोत.
19 नोव्हेंबर 1916 रोजी शिकारपूर म्हणजे आताच्या पाकिस्तान मधील पंजाबप्रांत इथे एका जमीनदाराच्या घरी जन्मलेले हे रत्न संगीताच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेईल असे कुणालाही वाटले नसावे. घरी कोणत्याही प्रकारचे संगीताला पोषक वातावरण नसताना फक्त संगीताची ओढ होती म्हणून त्यांनी अंबाला इथे आचार्य चिरंजीवलाल यांच्याकडे संगीताचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले. त्यानंतर काही काळ संगीत शिकवणे, स्टेज प्रोग्राम करणे, काही गाण्यांचे रेकोर्डिंग करणे यामध्ये काही काळ त्यांनी व्यतीत केला. हा सारा अनुभव गाठीशी घेऊन 1944 मध्ये ते मुंबईत आले. तिथे त्यांचे एक नातेवाईक चुन्नीलाल बेहल यांनी त्यांची ओळख पृथ्वीराज कपूर यांच्याशी करून दिली. या ओळखीमुळे मास्टरजींना त्यांचा पहिला स्वतंत्र संगीत दिग्दर्शनासाठी चित्रपट मिळाला. तो म्हणजे दिग्दर्शक ए.बी. इराणी यांचा “पुजारी”. या चित्रपटात बेबी मुमताज हिने गायलेले एक गाणे खूप गाजले ते म्हणजे “भगवान मेरे ग्यान का दीपक जला दे”. पुढे या गाण्याच्या कैक पटीने बेबी मुमताज म्हणजेच मधुबाला गाजली हे वेगळे सांगायला नको.
पुढे 1947 साली “दुनिया इक सराय” या चित्रपटात त्यांनी मीनाकुमारी कडून सुध्दा काही गाणी गाऊन घेतली. त्यातले हे एक “सावन बीत गयो, माई री”. नवोदित गायक गायिका प्रस्थापितांच्या पावलावर पाऊल टाकून चालायचा प्रयत्न करतात. अगदी लता दिदी पण सुरवातीच्या काळात नूरजहाँ यांच्यासारख्या गात. मास्टरजींकडे कडे सुरवातीच्या काळातील काही गाणी जसे “दिल-ए-नौशादको जीने की हसरत हो गई तुमसे” (चुनरिया 1948) गायल्यानंतर मास्टरजींनी लतादिदींना आपल्या मूळ मोकळ्या आवाजात गायचा सल्ला दिला आणि त्यांच्याकडून मेहनतीने तशी गाणी गाऊन घेतली. त्याचा परिणाम “हाये चंदा गये परदेस” (चकोरी 1949) ते “हाये जिया रोये......” (मिलन 1958). पर्यंत दिसून येतो. मिलन चे हे गाणे हाच एक स्वतंत्र लेखाचा विषय बनावा असे आहे. लता दिदींच्या आवाजातील अनेक वैविध्ये इथे एकत्र ऐकता येतात.
जी कथा लतादिदींची तीच मोहम्मद रफी साहेबांची सुध्दा. दर्दभरी गाणी गाताना रफीसाहेब आपल्या आवाजात भरलेल्या गळ्याचा फील आणत असत. त्यामुळे ते गाणे परिणामकारक होई. उदाहरण द्यायचे झाले तर “इक दिल के तुकडे हजार हुए, कोई यहां गिरा कोई वहां गिरा” (प्यार की जीत 1948, संगीतकार हुस्नलाल-भगतराम) . पण जेव्हा रफी साहेब मास्टरजींकडे गायले तेव्हा त्यांनी रफी साहेबांना मोकळ्या आवाजातच गायला लावले. “सबकुछ लुटाया हमने आकर तेरी गली में” (चुनरिया 1948) ते “मोहब्बत जिंदा रहती है, मोहब्बत मर नही सकती” (चंगेझ खान 1957) पर्यंतचा रफी साहेबांचा प्रवास अन त्यांना चित्रपटसृष्टीत मिळालेले यश हा इतिहास बनला.
मास्टरजींनी अनेक नवनवीन लोकांना संधी दिली. त्यात एक नाव आहे मधुबाला झवेरी. “दिल मेरा तेरा दिवाना”,“प्यार की रुत दोरंगी साजन” (फिल्म – अपनी इज्जत 1952). तसेच गीतकार वर्मा मलिक आणि गीतकार नक्श लायल्पुरी यांना सुध्दा मास्टरजींनी पहिली संधी दिली. पण मास्टरजींची सर्वात मोठी फाईंड म्हणजे आशा भोसले. मास्टरजींच्याच “चुनरिया” चित्रपटातील एका कोरस मध्ये गाणाऱ्या आशाजींचा आवाज मास्टरजींनी बरोबर हेरला. आणि आपल्या पुढच्या चित्रपटात (रात की रानी - 1949) मध्ये त्यांना गायची संधी दिली. त्यांचे पहिले गाणे “है मौजमें अपने बेगने, दो चार इधर दो चार उधर”. त्यानंतर आशाजींना आपल्या चित्रपटात गाऊन घेण्यासाठी चढाओढ सुरु झाली. पुढे आशाजींनी आपले स्वतंत्र स्थान चित्रपट सृष्टीत निर्माण केले.
हंसराज बेहल यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कलेची, संगीताची निस्सीम सेवा केली. आपल्या भावासोबत त्यांनी एन. सी. फिल्म नावाची एक कंपनी बनवून काही चित्रपटांची निर्मिती सुध्दा केली. “लाल परी” 1954, “मस्त कलंदर” 1955, “राजधानी” 1956, “चंगेज खान” 1957 यासारखे काही चित्रपट त्यांनी बनवले. संगीताचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. “जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, वो भारत देस है मेरा”(सिकंदर-ए-आजम 1965) या गाण्यासाठी त्यांना सर्वोच्च राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. पण सार्वजनिक जीवनात मात्र त्यांची नेहमीच उपेक्षा झाली. पण त्यांनी कधी त्याबद्दल तक्रार केली नाही. 20 मे 1984 रोजी आपले 68 वर्षांचे आयुष्य जगून त्यांनी जगाचा निरोप घेतला. पण त्यांनी दिलेली अवीट गोडीची गाणी आपला कधीच निरोप घेणार नाहीत.
हंसराज बहेल यांच्याबद्दल आणखी एक माहिती जाता जाता..........
आपल्या कामाबद्दल आणि शांत मनमिळाऊ स्वभावाने अगदी लाखात एक असे गणले जाणारे हंसराजजी आणखी एका बाबतीत लाखात एक होते. म्हणजेच त्यांचे हृद्य हे शरीराच्या उजव्या बाजूला होते. सर्वसाधारणपणे माणसाचे हृद्य हे डाव्या बाजूला असते पण उजव्या बाजूला हृद्य असणे हे लाखात एकाचेच असते. अर्थात ही गोष्ट त्यांच्या डॉ. कडून कळलेली आहे. (चेंबुरचे डॉ. रवी साठे).
प्रतिक्रिया
25 Jun 2015 - 10:31 pm | जुइ
या निमित्त्याने बर्याच जुन्या गाण्याना उजाळा मिळत आहे. असेच एक गीत जे फारसे ऐकायला मिळत नाही:- संगीत हंसराज बेहेल यांचे:-