मित्र हो, अनेकांना माहीत आहे, तात्याने मनोगत सोडले त्याला आता वर्ष दीड वर्ष उलटले, त्यांच्याबरोबर आम्ही काही मावळ्यांनी तिथून काढता पाय घेतला. एकमेव कारण " लेखन अनुमतीचे धोरण, प्रतिसाद आणि लेखन प्रसिद्ध होण्यासाठी घ्यावी लागणारी संपादकाची अनुमती. " त्यानंतर मग वादावादी झाली. खूप शिव्यागाळ झाली. आणि त्याबाबत संपादकांनी कोणतेही कारण दिले नाही. आम्ही तेव्हा नेहमीप्रमाणे जोरदार भांडण केले नाही. तेव्हा आम्ही प्ले ग्रुप ला होतो आणि बालवाडीच्या उंबरठ्यावर.....!!! नंतर आम्ही सर्वांनी उपक्रम जॉईन केले.
मित्र हो.... हा सर्व इतिहास सांगण्याचे कारण की......तात्या, पुन्हा एकदा मनोगतावर पोहचणार आहे....किंवा पोहचलेला असेल....?
आम्हाला एक तातडीचा व्य. नि. आला....त्यात म्हटले होते की, तात्या आणि वेलणकर यांची ठाण्यात एक बैठक झाली. ''मनो-मिसळ'' नावाचे दोघांच्या संकेतस्थळावरील साहित्य मिळून एक संकेतस्थळ काढायचे ठरले....!!! आम्हाला 'ल' या चर्चेतील तात्याच्या प्रतिसादावरून त्याचा अंदाज आलाच होता आणि नेहमी 'माझे पहिले प्रेम, पहिले प्रेम' असा तात्याला येणारा झटकाही आम्हाला माहीत होताच.
झालं! तात्या मनोगतावर जाणार हा प्रतिसाद आणि निरोप वाचल्यापासून आम्ही अस्वस्थ होतो. आम्ही ताबडतोब त्यांचे आणि आमचे मित्र धोंडोपंताशी संपर्क केला. त्यांचा गूगल टॉक वर संदेश होता. ''ज्योतिषविषयक कष्टमरांशी बोलत असल्यामुळे सध्या संपर्क करू नये!''
च्यायला आता काय करावे बॉ ! तरी हिंमत करून -
"पंत, एक तातडीचे बोलायचे होते. 'तात्या, मनोगतावर जाताहेत, त्यांचा 'ल' वरचा प्रतिसाद वाचला का ? "
त्यांचे उत्तर यायच्या आत आमचे नेटाचे कनेक्शन डिसकनेक्ट झाले.
''बात करने का टैम अन नेटको............ आया म्हणतात ते असे.....!!!
" नाही पण जायचेच होते तर, कशाला काढले हे संस्थळ, बरे होतो तिकडेच......अनुमती तर अनुमती.....नाहीतर उपक्रमावर माहितीची देवाण-घेवाण तरी चांगली चाल्लेली होती. बरं तात्याचं जालावर लेखक म्हणुन नाव आहे, सगळेच स्वागत करतील मनोगतावर......पण आमचे काय ? आम्ही तर 'फसलेला दिवाळी अंक' म्हणुन, घेतली ना अनेकांची दुश्मनी ओढवून .......आमचा कसा निभाव लागणार तिथे !" असा विचार जेवता-जेवता चाललेला होता........... बायको म्हणत होती. "पोळी वाढू का ?"
आम्ही म्हणत होतो
''तात्याचा हाच स्वभाव आवडत नाही आपल्याला!''
एव्हाना काही पात्रांची ओळख तिलाही झालेली होतीच. काहीतरी गडबड आहे, इतकेच तिला उमजले.
जेवण झाल्यावर.. हजर असलेल्या सदस्यात पाहिले प्रियाली,गुंडोपंत,सहज, धनंजय, मुक्तसुनित,ऋषिकेश, आलेले होते. ताबडतोब त्यांच्याशी संपर्क केला. सुरुवातीला प्रियालीला व्य. नि. केला....!!!
''तात्या, मनोगतावर चाल्लाय.........काही कळले का ?"
"सर, तुम्ही नाss काही तरी घेऊन येता बॉ.......चाल्लाय तर जाऊ दे......तुम्हाला काय त्याचा त्रास होतोय......... सध्या अमेरिकेत घराचे बांधकाम सुरू केलंय....त्याचसाठी 'चित्राचे,गेल्या शतकांतील अमेरिकन घरे - ४ - वाचते आहे, तेव्हा सध्या मला वेळ नाही. प्लीज नंतर बोलते.......!!!"
चतुर प्रियालीला सर्व माहीत असते....पण विषय कसा टाळायचा ते शिकावे प्रियालीकडून (स्वगत)
"गुंडोपंत, यार तात्या मनोगतावर चाल्लाय ?"
"सर, काही दिवसापासून मला निराशेने पार वेढलंय.....अन, सांगू का ? मिसळपावची जी रंगसंगती आहे, ना....!!! त्यातला लाल रंग पाहिला की, आम्हाला उलटीची भावना होते........तेव्हा.....तात्याला फोन करतो अन विचारतो.......बाकी,........काय म्हणतंय कॉलेज. !!!"
आजकाल गुंडोच्या आणि आपल्या संवादात फारच कृत्रिमपणा आलाय याची जाणीव झाली............!!!
"देवसाहेब, तात्याचं कळलं का ? "
"काय दिलीपराव? आधी तुमचे ते शुद्धलेखन सुधारा राव !"
असा प्रश्न, कोणाचं बरं वाईट झाल्यावर विचारतात?पण ह्यांचे आपले काहीतरीच.
"सॉरी....देव साहेब, तात्या मनोगतावर चाल्लाय ?"
"लेखन ज्यांचे दर्जेदार आहे, त्यांना माणसाचे, संस्थळाचे बंधन नसते. त्यांनी ते पाळू नये. अहो, तात्या, दिलदार आहे, तसा लहरी आहे, संगीताचं ज्ञान आहे, भाईकाकांचा आशीर्वाद आहे, तेव्हा मोठ्या माणसाला जिथे लिहायचे तिथे लिहू दे ! आणि तो वेलणकरही दिलदार माणूस आहे, त्याने नाही का मिसळपावचे सदस्यत्व घेतले. तेव्हा दिलीपराव त्यांना अडवू नका, जाऊ द्या !!! आणि तुम्हीही तिथे लिहीत चला तुमच्या बालपणच्या आठवणी."
हट! कुठून निरोप केला यार या देव माणसाला.......!!!(स्वगत)
विकासरावांशी संपर्क केल्यावर त्यांनी कमीत कमी दोन हजार शब्दापर्यंतचा प्रतिसाद आमच्यापर्यंत पोहचवला. त्यात पर्यावरण आणि तात्याचे मनोगतावर जाणे याचा तुलनात्मक अभ्यास त्यांनी अनेक संदर्भासहित पटवून दिला होता. त्यांना आम्ही उलट टपाली याचे सारांश लेखन करून पाठवावे अशी विनंती केली. त्यांचा अजून काही प्रतिसाद आलेला नाही.
घाटपांडे साहेब, अजून बिट्टू च्या धक्यातून सावरले नसल्यामुळे त्यांनी फार डिटेल्स मध्ये उत्तर दिले नाही. 'ज्योतिषविषयक लेख पुन्हा वाचावा त्यात त्याचे उत्तर आहे' असे त्यांनी कळवले.
धनंजय, म्हणाले की "लोकमित्रमंडळाचा उद्देशच आहे, की उत्तमातल्या उत्तम लेखनाची जशी ओळख व्हावी, त्याप्रमाणे.......जालावरील लेखकांचेही आदानप्रदान झाले पाहिजे. तात्या, मनोगतावर जाताहेत ही चांगली गोष्ट आहे."
मुक्तसुनित........"तात्याचे जे लेखन आहे, ते वृत्तात बसले पाहिजे, त्यांच्या लेखनाचा पूर्वार्ध हा १२ मात्रांचा तर उत्तरार्ध.......१८ मात्रांचा आहे. सामान्यपणे त्यांचे लेखन आर्या या वृत्ताकडे झुकणारे आहे."
पुढे त्यांचा प्रतिसाद वाचायचा राहून गेला.
"वाचक्नवी, तात्या, मनोगतावर जाणार आहेत त्या बद्दल काय वाटते ?"
"सामान्यपणे, -हस्व आणि दीर्घ असे दोन उच्चार असतात. त्यांना पद्याच्या भाषेत ' लघु-गुरु' असे म्हणतात."
त्यानंतर डोळ्यापुढे अंधारी आल्यासारखे वाटले......पुढे, त्याच निरोपात 'त' हे दंततालव्य' असे काहीसे अस्पष्ट दिसले.........!!!
"बेला, तात्या, मनोगतावर चाल्लाय ?"
"ये तो होनाही था !!! ये तो होनाही था !!!
प्यार तो होनाही था !!!"
प्राजु.........."जाणार होतास तर बोलावलेच कशाला.
मनोगतावर, फुले,पाने, गोड गोड बोला.
मिसळपाववर चारोळी, मायबोलीवर आरोळी,
आकाशवाणी, सुखाचे, दुःखाचे दिवस,पुरण पोळी."
आम्ही ताबडतोब 'फार सुंदर चारोळी, काय सुंदर आशय आहे' असा निरोप पाठवून मोकळे झालो.
ऋषिकेशाचं 'अमेरिकायन' फेमस झाले होते म्हणुन ते खुशीत होते. "येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे.
आपल्याला काही फरक पडत नाही."
स्वाती दिनेश.... " मिसळपाव तात्या बरं चालवत होता. पण काही हरकत नाही. जर्मनीचे बाकीचे भाग तिकडेच टाकू"
स्वाती राजेश ला काही फरक पडणार नव्हता.... पाककृती तिकडे टाकल्यावर, लाजवाब पाककृती असा प्रतिसाद आठवणीने येईल हा त्यांचा ठाम विश्वास होता.
वेगवेगळे डॉनांना विचारल्यावर ते म्हणाले, "आम्ही सगळे मूळ मनोगतीच....इथे फक्त सुरामारी करायला येतो."
मित्र हो, यानंतर आम्ही थेट विसोबा खेचरांशी संपर्क केला.
ते म्हणाले, "बिरुटेशेठ आम्ही कुठेही जाणार नाही !"
खरं तर त्यांच्या उत्तराने आमचे काही समाधान झालेले नाही. सर्किटरावला अजून विचारले नाही. ते मार्चएन्ड पर्यंत बिझी आहेत. मात्र, पुण्याचा एका प्राध्यापकाने आणि त्यांच्या एक शिष्याने हे सर्व घडवून आणल्याचा आमचा संशय आहे.
राजे, त्यांच्या सफरीचा अंतिम दोनशेवा( अंदाजे) भाग मनोगतावर टाकणार असल्याचे सहजरावांच्या खरडी वाचल्यानंतर आमच्या लक्षात आलंय, त्याचबरोबर ही मंडळी मिसळपावचे एचटीएमएल कोडिंग ढापून निलकांतला देऊन सेम 'मिसळपाव' चालू करण्याच्या विचारात आहेत.
तेव्हा मित्र हो, सध्याच्या या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचवणे हा आमचा उद्देश होता.
मात्र विसोबा खेचरांनी कुठेही जाऊ नये, त्यांनी इथेच समाधी घ्यावी. येणा-या बाल, तरुण, वयस्कांनी हे मिसळपावचे गोकूळ फुलत जावे. मिसळपाव खाता खाता, मिसळपावचे अभंग गावेत, म्हणावेत. आपली साहित्यकला फुलवावी. वाचकांनी भरभरून दाद द्यावी, कोणत्याही मद्याचे दोन थेंब समाधीवर शिंपडावे......अन् विसोबाच्या आठवणीने..... कोणाच्याही डोळ्यांच्या कडा ओल्या व्हाव्यात असे मात्र आम्हांस मनोमन वाटत होते.
सुचना:- वरील लेखन काल्पनिक आहे, तसे वाटण्याची शक्यता अधिक आहे. मात्र वरील लेखात आलेली नावे, त्यांच्या तोंडी असलेली विधाने, काल्पनिक आहेत. ती नावे, विधाने कोणास आपली वाटत असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा !!! :)
प्रतिक्रिया
24 Feb 2008 - 1:19 pm | विसोबा खेचर
च्यायला बिरुटेशेठ!
अत्यंत जोरदार आणि खुसखुशीत लेख... तुम्ही तर सिक्सरच मारलीत तिच्यायला! :))
हार्दिक हार्दिक हार्दिक अभिनंदन........ :)
आत्ता जरा नीलकांतासोबत मिपाच्या मुखपृष्ठाच्या गडबडीत आहे, नंतर सवडीने विस्तृत प्रतिसाद टाकतो...
बाय द वे, मनो-मिसळ हे नांव क्लासच आहे! :)
असो, या आंतरजालीय जगात त्या वेलणकराला माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही आणि मलाही त्याच्याशिवाय दुसरं कुणी नाही हेच बाकी खरं!:)
पण घाबरू नका बिरुटेशेठ. आम्ही कुठंही जात नाही. आता आम्हाला पुन्हा मनोगतावर घेणार नाहीत! आणि घेतलं तरी 'कसा नाक मुठीत धरून परत आला फोकलिचा!' असंच सगळे म्हणतील! :)
आपला,
(मूळचा मनोगतप्रेमी तरीही आता कट्टर मिपाकर!) तात्या.
24 Feb 2008 - 2:17 pm | सुधीर कांदळकर
एक कार्यक्रम होत असे गणेशोत्सवात. त्याची आठवण झाली. त्यात लोकप्रिय व्यक्तींवर विविध आरोप केले जात. त्याची आठवण झाली. खरे म्हणजे मला हा पुर्वेतिहास ठाऊक नाही. पण अंदाज बांधू शकतो. मजा आली.
24 Feb 2008 - 3:10 pm | परीचा परा
येवढे सगळे वाचून शॉकच बसला व्हता...
पण शेवटी दिलेल्या गोष्टीने खुलासा झाला...
सुचना:- वरील लेखन काल्पनिक आहे, तसे वाटण्याची शक्यता अधिक आहे. मात्र वरील लेखात आलेली नावे, त्यांच्या तोंडी असलेली विधाने, काल्पनिक आहेत. ती नावे, विधाने कोणास आपली वाटत असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा !!! :)
नाय तर आम्हाला आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे वाटत होते...
म्हटले आत्ताच आलोय इथे आणि संकेतस्थळ बंद करायच्या भाषा कसल्या चालू झाल्या?
डॉक्टरसाहेब आमच्या तोंडचे पाणीच पळवले होते तुम्ही.... (तात्या गेले तर तर मिसळपावाची तर्रर्रीच गेल्यासारखं वाटलं असतं....)
नाहीतरी संकेतस्थळ काढून सदस्यांचा विश्वासघात करणारे बरेच आहेत बाजारात.... त्याला मिसळपाव १००% अपवाद आहे ह्याची खात्री पटल्यावरच इथला सदस्य झालो ...
डॉक्टरसाहेब बाँब फोडत जा हो... पण तळटीप सगळ्यात आधी लिहित जावा राव... बरं झालं तात्यांनी पहिलाच प्रतिसाद दिला... नाही तर आम्ही इथला गाशा गुंडाळायचंच ठरवलं होतं.....आमच्यासारखे भडक माथ्याचे लोक तळटीप न वाचताच गोंधळास सुरुवात करतील.... :)
{परीच्या प्रतिक्षेत} परा ....
24 Feb 2008 - 3:22 pm | धोंडोपंत
प्राध्यापक साहेब,
अप्रतिम खुमासदार लेख. क्या बात है!!!!!!
प्रत्येक मिपासदस्याच्या व्यक्तिमत्वाचे पैलू फार सुंदरपणे टिपलेत तुम्ही. वा वा.
लेख फार फार आवडला. अतिशय मस्त भट्टी जमली आहे. ती अशीच धगधगत राहू दे.
आमचा रविवार तुमच्या लेखाने फार आनंदात गेला.
पुढील लेखाच्या प्रतिक्षेत.
आपला,
(स्नेही) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
24 Feb 2008 - 3:57 pm | बिपिन कार्यकर्ते
व्व्व्वा !
मजा आली तिच्यायला... बर्याच दिवसांनी इतके फर्मास आणि चविष्ट लिखाण वाचले. लाजवाब.
प्रा. साहेब लगे रहो. त्वाड्डा जवाब नही.
बिपिन.
24 Feb 2008 - 6:57 pm | प्रियाली
सर, तुम्ही नाss काही तरी घेऊन येता बॉ.......चाल्लाय तर जाऊ दे......तुम्हाला काय त्याचा त्रास होतोय......... सध्या अमेरिकेत घराचे बांधकाम सुरू केलंय....त्याचसाठी 'चित्राचे,गेल्या शतकांतील अमेरिकन घरे - ४ - वाचते आहे, तेव्हा सध्या मला वेळ नाही. प्लीज नंतर बोलते.......!!!"
वरील लेखन काल्पनिक आहे, तसे वाटण्याची शक्यता अधिक आहे. मात्र वरील लेखात आलेली नावे, त्यांच्या तोंडी असलेली विधाने, काल्पनिक आहेत. ती नावे, विधाने कोणास आपली वाटत असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा !!! :)
हे काल्पनिक???? :)))))))) आता हे लेखन काल्पनिक नाही हे सांगायला आमच्या गरीब झोपड्याचा फोटू इथे टाकायला हवा!!
आणि अधोरेखित वाक्य तुम्हाला कुठे कुठे मिळालं? ऑर्कुटावर नक्की ;-) कारण तिथे तुम्ही मला भेट देऊन गेलात आणि माझ्या आणि जयश्री अंबासकरांच्या गप्पा वाचून गेलात हेही नक्की!
पण माझ्यावरही कोणी गस्त ठेवून असतं याची कल्पना नव्हती बॉ!!!
ह. घ्या.
आणि हो, अद्याप मी चित्राचा लेख वाचलेला नाही. वेळ नाही हो! घर पाहावे बांधून..... ;-) म्हणूनच तात्याच्या गजालींकडेही लक्ष देत नाही ;-)
बाकी, लेख वाचून मजा आली.
आपली,
(डिटेक्टीव नं १) प्रियाली
24 Feb 2008 - 7:04 pm | विसोबा खेचर
आणि अधोरेखित वाक्य तुम्हाला कुठे कुठे मिळालं? ऑर्कुटावर नक्की ;-) कारण तिथे तुम्ही मला भेट देऊन गेलात आणि माझ्या आणि जयश्री अंबासकरांच्या गप्पा वाचून गेलात हेही नक्की!
आयला! हा बिरुट्या ऑर्कुटवरही लोकांच्या खरडवह्या वाचत फिरत असतो म्हणायचा! :) मग हा डाक्टरकी आणि प्राध्यापकी तरी केव्हा करतो? :))--(स्वगत!)
बाय द वे प्रियाली, नव्या घरात सत्यनारायण घालशील तेव्हा जेवायला ह्या तात्याभटालाही बोलाव बरं का! :)
असो,
बिरुटेंच्या ऑर्कुट भटकंती करता शुभेच्छा!
प्रियालीच्या नव्या वास्तूबद्दल शुभेच्छा!
आपला,(शुभेच्छुक!) तात्या.
24 Feb 2008 - 7:07 pm | प्रियाली
सत्यनारायण यदाकदाचित घातला तर पूजा घालायलाच बोलावते तुम्हाला :)) आणि नाही घातला तरी आमंत्रणाची विशेष गरज नाही, या कधीही.
आयला! हा बिरुट्या ऑर्कुटवरही लोकांच्या खरडवह्या वाचत फिरत असतो म्हणायचा! :) मग हा डाक्टरकी आणि प्राध्यापकी तरी केव्हा करतो? :))--(स्वगत!)
हाहा!! १००% सहमत.
24 Feb 2008 - 7:17 pm | विसोबा खेचर
सत्यनारायण यदाकदाचित घातला तर पूजा घालायलाच बोलावते तुम्हाला :))
चालेल! तुझ्या घरच्या सत्यनारायणाला जर हा मच्छीखाऊ भट चालणार असेल तर आपली काय पण हरकत नाय! आपण नक्की येऊ आणि आलटून पालटून अथर्वशीर्ष म्हणू! कारण त्याशिवाय आपल्याला संस्कृतातले दुसरे कोणतेच शिलोक येत नायत! :)
आपला,(संस्कृत 'ढ'!) तात्या.
24 Feb 2008 - 7:04 pm | विकास
एकदम मस्त लेख सर! ह. ह. पु. वा.
अजून येउद्यात!
फक्त त्यात माझे नाव दिसले तर ४००० शद्बांचा संदर्भ हीन व्य.नि. आपल्याला येइल)आणि तो योगायोग नसेल!
24 Feb 2008 - 7:48 pm | चित्रा
टपल्या चांगल्या जमल्या आहेत! प्रियालीताईंच्या घराला शुभेच्छा!
24 Feb 2008 - 7:54 pm | स्वाती दिनेश
डॉ.साहेब,एकदम धमाल लेख! मजा आली वाचताना...स्वाती
24 Feb 2008 - 8:20 pm | सन्जोप राव
जबरदस्त लिखाण! प्राध्यापक डॉक्टरसाहेब, आपला हा पैलू आम्हाला माहीतच नव्हता! 'मनोगत' वरील संमेलनाची आणि 'उपक्रम' च्या पहिल्या वाढदिवसाची आठवण झाली (ही नावे घेतली नाहीत तर प्रतिक्रिया गंभीरपणे घेतली जात नाही म्हणे!)मात्र, पुण्याचा एका प्राध्यापकाने आणि त्यांच्या एक शिष्याने हे सर्व घडवून आणल्याचा आमचा संशय आहे. हे मत तुमचे की सर्किटरावांचे? आणि कोण हो हे प्राध्यापक? जरा त्यांना भेटावे म्हणतो!
सन्जोप राव
24 Feb 2008 - 10:40 pm | विसोबा खेचर
'मनोगत' वरील संमेलनाची आणि 'उपक्रम' च्या पहिल्या वाढदिवसाची आठवण झाली
हेच म्हणतो!
चला, या निमित्ताने संजोप रावांनी आपली लेखणी पुन्हा मिसळपावर उमटवली याचा आम्हाला आनंद वाटतो! आता इथून पुढे कुठलेही कडू-गोड अनुभव विसरून जाऊन संजोप रावांनी पुन्हा नव्याने मिपावर नियमित लेखन करावे अशी आमची इच्छा आहे!
आम्ही आत्तापर्यंत संजोप रावांना किमान दहा वेळा तरी पिंजरा या चित्रपटावर मिसळपाववर काहीतरी जोरदार लिहा अशी विनंती केली आहे. त्यातील नऊ विनंत्यांचा अवमान आम्हाला मान्य आहे परंतु दहाव्यांदा तरी संजोप रावांनी आमचा शब्द ठेवावा असे वाटते!
त्यांनी आम्हाला खास कोल्हापुरी साजाची एक चंची सप्रेम भेट म्हणून दिली आहे. जो पर्यंत संजोप राव मिसळपाववर लिहीत नाहीत तो पर्यंत आम्हीही ती चंची वापरणार नाही अशी शपथ खाल्ली आहे. सध्या तरी ती चंची नुसतीच धूळ खात पडून आहे. तरी आम्हाला ती चंची लवकरात लवकर वापरायला मिळावी हीच इच्छा आहे!
पुढे मर्जी संजोपरावांची!
असो..
आपला,(चंचीप्रेमी) तात्या.
24 Feb 2008 - 8:27 pm | धनंजय
धनंजय, म्हणाले की "लोकमित्रमंडळाचा उद्देशच आहे, की उत्तमातल्या उत्तम
लेखनाची जशी ओळख व्हावी, त्याप्रमाणे.......जालावरील लेखकांचेही
आदानप्रदान झाले पाहिजे. " हे बहुधा काल्पनिक नाही. माझे तुमच्याशी बोलण्यात हे वाक्य नक्की येऊन गेले आहे!तात्या, मनोगतावर जाताहेत ही चांगली गोष्ट आहे.त्यामुळे हा विचारही त्या विचाराला जोडून...येणा-या बाल, तरुण, वयस्कांनी हे मिसळपावचे गोकूळ फुलत जावे. मिसळपाव खाता
खाता, मिसळपावचे अभंग गावेत, म्हणावेत. आपली साहित्यकला फुलवावी. वाचकांनी
भरभरून दाद द्यावी, कोणत्याही मद्याचे दोन थेंब समाधीवर शिंपडावे......+१
24 Feb 2008 - 8:35 pm | संजय अभ्यंकर
प्रा. डॉ. आल्फ्रेड बिरुटे ( किंवा प्रा.डॉ. दिलीप हिचकॉक)...
डॉ. साहेब....
आपले धक्कातंत्र पाहून हिचकॉक साहेब आठवले!
संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
24 Feb 2008 - 9:45 pm | प्राजु
केवळ लेखनावरून व्यक्तीचित्रण छान जमलं आहे.
प्राजु.........."जाणार होतास तर बोलावलेच कशाला.मनोगतावर, फुले,पाने, गोड गोड बोला.मिसळपाववर चारोळी, मायबोलीवर आरोळी,आकाशवाणी, सुखाचे, दुःखाचे दिवस,पुरण पोळी."
काय पण भारी आशय आहे हो या चारोळीत. बाय द वे.. तात्या मनोगतावर जाणे म्हणजे मुंग्यानी मेरू पर्वत तर गिळला नाही ना.. या प्रकारचे आहे? आणि तात्या जर मनोगतवर गेलेच तर.. आमचा मिसळपाव ला राम राम..!कळ्ळलं का हो तात्या..?
- (१००% मिसळप्रेमी) प्राजु
24 Feb 2008 - 10:16 pm | पिवळा डांबिस
तात्या जर मनोगतवर गेलेच तर.. आमचा मिसळपाव ला राम राम..!कळ्ळलं का हो तात्या..?
प्राजुशी १००% सहमत!!
-डांबसकाका
24 Feb 2008 - 9:46 pm | ऋषिकेश
हा हा हा :)) आज सकाळी सकाळीच हा लेख वाचून मजा आली :) मस्त धक्कातंत्र ;) बर्याचशा खर्या, काहिश्या काल्पनिक प्रसंगांची उत्तम गुंफण :) खूप सह्ही!!!!
सर, एकदम सहि रे सहि!! :)
-ऋषिकेश
25 Feb 2008 - 12:55 am | बेसनलाडू
धमाल लेखन. रविवारची दणदणीत सुरुवात झाली.
फक्त खाजगीतील बोलणी, संवाद सार्वजनिक व्हायला हरकत. रावसाहेबांच्या कल्पनाविलासात ही तक्रार करण्याची वेळ कधी आली नव्हती. असो.
(वाचक)बेसनलाडू
25 Feb 2008 - 12:58 am | प्रियाली
फक्त खाजगीतील बोलणी, संवाद सार्वजनिक व्हायला हरकत
सहमत आहे. :-) ती टाळूनही लेखन खुमासदारच राहीले असते.
25 Feb 2008 - 2:07 am | कोलबेर
फक्त खाजगीतील बोलणी, संवाद सार्वजनिक व्हायला हरकत. रावसाहेबांच्या कल्पनाविलासात ही तक्रार करण्याची वेळ कधी आली नव्हती. असो.
ऑर्कुटवरील खरडींविषयी ही टिप्पणी असेल तर असहमत. ऑर्कुट मधील खरडी खासगी ठेवायच्या की सार्वजनिक हे सभासदावर अवलंबून असते. प्रियाली ताईंनी त्यांच्या खरडी सार्वजनिक ठेवल्या आहेत. तेव्हा प्रा.डॉ नी खाजगीतील बोलणी सार्वजनिक केली असे वाटत नाहीत.
25 Feb 2008 - 2:09 am | बेसनलाडू
टिप्पणी ऑर्कुटेतर खाजगी बोलणीबाबत आहे
(ऑर्कुटर)बेसनलाडू
25 Feb 2008 - 2:11 am | कोलबेर
लै भारी लेख सर. आमचा अतिशय आवडता लेखन प्रकार तुम्ही मस्त हाताळला आहे
घाटपांडे साहेब, अजून बिट्टू च्या धक्यातून सावरले नसल्यामुळे त्यांनी फार डिटेल्स मध्ये उत्तर दिले नाही. 'ज्योतिषविषयक लेख पुन्हा वाचावा त्यात त्याचे उत्तर आहे' असे त्यांनी कळवले.
हे तर सहीच...
25 Feb 2008 - 2:52 am | नंदन
धमाल लेख. शेवटचे धक्कातंत्रही मस्त :)
नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
25 Feb 2008 - 11:01 am | आनंदयात्री
मान गये गुरु !!
25 Feb 2008 - 9:30 pm | चतुरंग
तर्रीचा जोरदार भुरका मारला आणि ठसकाच लागला!!
आपली धक्कादायक धक्काबुक्की आवडली!
आपले विद्यार्थी किती धकाधकीचं जिणं जगत असतील ह्याची कल्पना आली (असा कल्पक मास्तर मिळणे विरळाच असते हो! :) (ह्.घ्या);}
चतुरंग
25 Feb 2008 - 10:12 pm | प्रमोद देव
खूपच मार्मिक निरीक्षण आणि तितक्याच ताकदीने ते शब्दात मांडणे ह्या दोन्ही कला आपल्याला अवगत आहेत हे सिद्ध केलेत.असेच लिहिते रहा! मजा आली.
28 Feb 2008 - 12:53 pm | प्रभाकर पेठकर
श्री. डॉ. प्रा. दिलीप बिरूटे,
लेख मस्त जमवला आहे.सुरुवातीला मीही गोंधळात पडलो होतो. पण लवकरच सत्य ओळखले आणि रंगत वाढत गेली.
मस्त लिहीले आहे.
29 Feb 2008 - 10:22 am | सहज
अप्रतिम कल्पनाविलास.
वाचनखुणामधे साठवला आहे, परत परत वाचायला. :-)
जबरी!!!!
29 Feb 2008 - 11:16 am | दिगम्भा
छान लेख, बेहद्द आवडला. रावसाहेबांच्या मसालेदार मालिकेत चमचमीत भर टाकलीत.- दिगम्भा
29 Feb 2008 - 12:11 pm | सर्किट (not verified)
जमलं ! जमलं !!!थोडक्यात काय, तर छानच झालंय !!(ह्या साहित्यप्रकारातली रावसाहेबांची मोनॉपोली निकालात काढलीत. आता चित्रपट परीक्षण लिहा बघू..)चालू द्या !! आम्ही वाचतोच आहोत !- सर्किट
1 Mar 2008 - 6:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखात उल्लेख झालेल्या सर्वच मित्रांनी या लेखास हलकेच घेतले, त्याबद्दल सर्वांचे आभार, जे कोणी रागावले असेल,दुखावले असेल त्याबद्दल दिलगीरी व्यकत करतो. या लेखनावर शुद्धलेखनाचे सर्व संस्कार करुन इथे लेखन टाकण्याचा आग्रह धरला त्याबद्दल एका ' अनामिकाचेही ' विशेष आभार. अनेक मित्रांच्या प्रतिसादाला उपप्रतिसाद लिहायचा होता, पण आता वेळ खूप पुढे गेलेली आहे. तेव्हा लेखनावर प्रेम करणा-या वाचकांचे, प्रतिसाद देणार्यांचे सर्वांचे आभार मानतो !!! आपण सर्व आमच्या तोडक्या-मोडक्या लेखनाबद्दल आमची कौतुकाने पाठ थोपटता, म्हणुन आम्हाला लिहिण्याचे बळ येते !!! धन्यवाद !!!
अवांतर :- तांत्रिक अडचणी दूर केल्याबद्दल सरपंचाचे विशेष आभार !!!
1 Mar 2008 - 7:12 pm | विसोबा खेचर
अवांतर :- तांत्रिक अडचणी दूर केल्याबद्दल सरपंचाचे विशेष आभार !!!
बिरुटेशेठ, सध्या गमभनची पुन्हा जुनीच आवृत्ती जोडली आहे. त्याने काही फरक पडतो का ते पाहू. अजूनही काही चाचण्याही सुरू आहेत. एखाद्या संस्थळाच्या उभारणीमध्ये अधनंमधनं अश्या काही तांत्रिक अडचणी येतात परंतु त्यातूनच सुधारणा होत असतात/होतात. कृपया सांभाळून घ्या.
आपलाच,
तात्या.
1 Mar 2008 - 7:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एखाद्या संस्थळाच्या उभारणीमध्ये अधनंमधनं अश्या काही तांत्रिक अडचणी येतात परंतु त्यातूनच सुधारणा होत असतात/होतात. कृपया सांभाळून घ्या.
आम्ही त्याबद्दल कधी तक्रार केली ? हे तुमचे संस्थळ आहे तसे आम्हालाही आमचे वाटते, आणि संस्थळाच्या उभारणीसाठी, वेगवेगळ्या बदलांसाठी आमच्या शुभेच्छा आहेतच !!!!
आज ब-याच दिवसानंतर प्रतिसाद लिहिता आला म्हणुन सरपंचाचे विशेष आभार असे म्हणालो, त्यातून काही अर्थाचा,अनर्थ निघाला असेल तर त्याबद्दल क्षमस्व !!!
-दिलीप बिरुटे
1 Mar 2008 - 7:49 pm | सरपंच
हे तुमचे संस्थळ आहे तसे आम्हालाही आमचे वाटते,
तुमचेच आहे! :)
आम्ही फक्त ट्रस्टी आहोत! :)
त्यातून काही अर्थाचा,अनर्थ निघाला असेल तर त्याबद्दल क्षमस्व !!!
अहो त्यात क्षमा कसली? कुठलाही अनर्थ निघालेला नाही. आम्ही या आयडीवरून कुणाला प्रतिसाद देत नाही, तो आज पेश्शल तुम्हाला देत आहोत यातच काय ते समजा! :)
आपला,
तात्या सरपंच.
28 May 2014 - 9:26 am | विजुभाऊ
अरेच्चा हा लेख पाहिलाच नव्हता.
ही इतिहासातील एक अज्ञात बखर आहे.
28 May 2014 - 9:40 am | llपुण्याचे पेशवेll
सध्या तात्या आहे कुठे? बरेच जुने जालकरी हल्ली फक्त चेपुवरच आढळतात.
28 May 2014 - 12:46 pm | प्रभाकर पेठकर
तात्यांच्या कुठल्याही पोस्टवर 'व्वा तात्या, तुसी छा गये, तुम्ही नशिबवान आहात तात्या,' वगैरे वगैरे शाब्दिक चौर्या ढाळणारे अनेक जणं फेसबुकावर तात्यांना सापडले आहेत. तिथे त्यांचे अगदी व्यवस्थित आणि सुखनैव चालू आहे. आणि मिपावर प्रकट होणे त्यांच्यासाठी 'सोयिस्कर' राहिले नसावे.
29 May 2014 - 7:20 am | राजेश घासकडवी
जे सोडून गेलेले आहेत त्यांची नावं घेऊन उगाच कढ का काढावे? (असं मी नाही, प्रा. डॉ. बिरुटेच म्हणतात) लेखात नावं घेतलेल्यांपैकी तात्या, प्रियाली, गुंडोपंत, सहज, धनंजय, मुक्तसुनीत, वाचक्नवी, बेला, राजे, धोंडोपंत ही मंडळी लिहितात का सध्या मिपावर?
30 May 2014 - 6:13 pm | टवाळ कार्टा
टारझन का गेला त्याची स्टोरी कोणी लिहिल का? :)
30 May 2014 - 10:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
टारझन का गेला, सर्किट का गेला, आमचे धोंडोपंत का गेले, गुंडोपंत का गेले. परा का गेला, प्रमोद देव का गेले, अमुक का गेला आणि धमुक का गेला. अहो, हे येणं जाणंच चालूच असणार आहे. आयडींनी काय लेखन केलं. लेखनाचा किती आनंद मिळाला. आपले आ.जालावर सुखाचे क्षण किती गेले हे महत्त्वाचे. अनेकांना वाटलं आम्ही मिपावरुन गेलो की जगबुडी होऊन जाईल. अनेक थोर थोर आयडी माझ्या पाहण्यात होते. अनेक थोर थोर आयडींनी किरकोळ कारणावरुन स्वसंपादनाचा फायदा घेत लेखन काढून टाकलेत, प्रतिसाद काढून टाकलेत. मिपाचा रंगमंच ओस पडेल असं अनेकांना वाटलं. पण तसं कधीच झालं नाही आणि होणारही नाही. आयडी येतील आणि जातील. प्रत्येक आयडीची एक स्टोरी असेल किंवा नसेल. नवे येतील आणि जसे जमेल ते लिहितील आणि जुन्यांप्रमाणे जातीलही. नव्या-जुन्या लेखनाचा आनंद वाचक घेतील. वाचक वाचतील आणि विसरुनही जातील. कोणताच क्षण कोणासाठी थांबत नाही, तो क्षण येतो आणि जातो. आपणही आज आहोत उद्या नसु.... आपण संकेतस्थळ किती इंजॉय केलं हे महत्वाचं. बाकी, प्रश्न मला तरी कधीच महत्वाचे वाटले नाहीत. मिपा एक चालता बोलता रंगमंच आहे, अनेक आयडी येतील जातील. आज आपण आठवणीत आहोत उद्या लोक विसरुनही जातील.....The Show Must Go On
-दिलीप बिरुटे
30 May 2014 - 10:40 pm | मुक्त विहारि
+ १
31 May 2014 - 3:16 pm | आत्मशून्य
बिरुटे साहेब फार महत्वाचे बोलून गेलेत. ध्यानात राहुद्या.
30 May 2014 - 11:01 pm | सुहास झेले
व्वा बिरुटेसर :)
31 May 2014 - 12:39 am | तुमचा अभिषेक
आवडेश :)
31 May 2014 - 2:22 pm | संजय क्षीरसागर
ऐशी ची तैशी करुन टाकली.
31 May 2014 - 5:34 pm | आत्मशून्य
पण प्रश्न इतका सोपा असता तर राहुल का नाही पंतप्रधान बनला ? मान्य विचार अवांतर भासेल पण शो चालु राहणे प्रमाणेच कोण चालवतो याला रसिकांच्या दृष्टीने
फार महत्व असते हे एक रसिक म्हणुन आपण णाकारनार काय ....?
30 May 2014 - 10:22 pm | पैसा
तो गेला नाही. असभ्य वागण्यासाठी तो आणि गोगोल या दोघांना बरोबरच शिक्षा दिली होती.
31 May 2014 - 3:10 pm | इरसाल
सभ्य सभासद मिपा हेच पुर्ण जग या समजातुन मी इथे जिंकलो की सगळ जग जिंकल या अविर्भावात असतात. या नादात कहीतरी करुन बसतात, मग कधी कधी हे* मिळतंया मग हितुन जाव लागतयां.
4 Jun 2014 - 2:52 pm | बॅटमॅन
आणि काही अन्य लोकही तसेच करतात, पण त्यांना कधी नारळ मिळाल्याचे पाहण्यात नाही. सम आर मोर ईक्वल, हेच खरे.....
4 Jun 2014 - 3:14 pm | हाडक्या
याच्याशी फुल्टू बाडिस.. हा जगातला सर्वसामान्य नियम आहे.. :)
4 Jun 2014 - 4:11 pm | दिनेश सायगल
तुम्हीही त्यापैकीच एक असावेत असे दिसते आहे!
4 Jun 2014 - 4:13 pm | बॅटमॅन
आम्ही?
नै बॉ. इतकं आमचं भाग्य कुठलं?
5 Jun 2014 - 1:08 pm | प्यारे१
असं प्रत्येकालाच वाटतं हे आणखी एक मह्त्त्वाचं ;)
- स्पेशल-आपलं- सोशल ;) प्यारे
31 May 2014 - 5:35 pm | गंगाधर मुटे
मस्त माहिती मिळाली.
वाचनातील मजा निघून जाऊ नये म्हणून मी तळटीप वाचलीच नाही. ;)
5 Jun 2014 - 1:43 pm | शैलेन्द्र
वा वा... लै लै जुनं आठवलं...