एका शनिवारी भाच्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सहकुटुंब पुण्याला जायचा योग आला. पुण्याला गेलं की येताना काय खाऊ आणायचा असा प्रश्नच पडत नाही. चितळ्यांची बाकरवडी तर ठरलेली.मस्त कप भर चहा बरोबर १०-१२ बाकरवड्या कधी फस्त होतात तेच कळत नाही. माझी बहिण कोथरूडच्या Happy Colony मध्ये राहते.तिच्या घराजवळच चितळे बंधूंची शाखा आहे. संध्याकाळी ५ वाजता वाढदिवसाची सगळी तयारी झाली होती आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी ६:३० वाजायच्या सुमारास सगळ्या बालगोपाळ मित्र मंडळीना बोलावले होते. संध्याकाळी ५:३० वाजता चितळ्यांच्या दुकानात ताजी बाकरवडी येते अशी ताजी बातमी कानावर पडली आणि दुकाना पर्यंत जायला पाऊले चळवळ करू लागली. अवघ्या ५ मिनिटात मी सपत्नीक चितळे बंधूच्या कोथरूड शाखे समोर येऊन थडकलो. या आधी पण तिथे गेलेलो असल्याने दुकान परिचयाचं होतं. पण त्या दिवशी मात्र बराच फरक/बदल जाणवत होता.
दुकानात शिरण्यासाठी जो दरवाजा होता तिथे बरेच अडथळे ठेवलेले दिसले. किंबहुना फालतू, वेळकाढू किंवा उगीच “चवी पुरत्या” येणाऱ्या गिऱ्हाईकाला मज्जाव करण्यासाठी केलेली ही तरतूद असावी. ते अडथळे पार करून आत शिरणार तितक्यात दुकानाच्या बाजूला असलेल्या बोळकांडी वजा जागेतून आवाज आला ” अहो शुक् शुक्, इकडे या …प्रवेश इथून आहे”. त्यातच दुकानाच्या गल्ल्यावर बसलेल्या माणसाने आपली तर्जनी जमिनीला समांतर धरून वाटेकडे बोट दाखवले. मग लक्षात आलं पूर्वीचा मार्ग जो येण्या जाण्या साठी वापरला जायचा त्याचा आता एकदिशा मार्ग झाला होता. पुण्यातील शिस्तबद्ध वाहतुकीला अजून शिस्त लागावी म्हणून एखादा मार्ग अचानक पणे एकदिशा मार्ग घोषित करतात तेच सूत्र इथे पण लागू झालेले बघून मला जरा आश्चर्यच वाटले. कदाचित उगीच गिऱ्हाईकांची गर्दी वाढली असावी. मग परत त्या अडथळ्यातून बाहेर पडून त्या प्रवेश करण्याच्या जागे पर्यंत गेलो. “मग आधी नाही सांगता येत? जरा एक पाउल अजून पुढे पडले असते तर झालेला अपमान कुणी सहन केला असता? बाकरवडी विकत घ्यायला आलोय बाहेरून बरणीतले लाडू बघण्या साठी नाही” मी जरा तुसडेपणानेच विचारले. “इथे बरणीत लाडू ठेवत नाहीत. बरणीत सुकामेवा आहे” या त्याच्या थंड प्रतिक्रियेने मी सराईत पुणेकर आहे हे भासवण्याचा निरर्थक प्रयत्न फोल ठरला. आणि त्याच्या सकट सगळ्या दुकानाला कळले मी पुणेकर नसून ३/४ विजार घालून आलेला एक मुंबईकर आहे.
आम्ही त्या प्रवेश दरवाज्यातून आत शिरणार तितक्यात या शुक् शुक् गृहस्थांनी परत थांबवले. मला वाटले इथे येणाऱ्या जाणाऱ्या गिऱ्हाईकाची झडती घेत असावेत असं समजून मी त्याच्या जवळ गेलो आणि कवायतीत करतात त्या प्रमाणे खांद्याच्या सरळ रेषेत हात करून उभा राहिलो. ते गृहस्थ तितक्याच थंडपणे म्हणाले “याची काही गरज नाही आणि अजून ही सिस्टीम चालू झालेली नाही” आणि त्याने माझ्या हातात चक्क एक पोस्टकार्डा किंवा शुभेच्छापत्रा पेक्षा थोडं मोठं प्याड वजा आयताकृती प्लायवूडचे फळकुट दिले. त्या वर कसली तरी स्क्रीन होती. तो जेंव्हा हीच अगम्य वस्तू माझ्या पत्नीला द्यायला लागला तेंव्हा मी म्हणालो “एकच पुरे आम्ही एकत्रच आहोत” परत कुणीही प्रतिप्रश्न करायचे धाडस करू नये अश्या ठसक्यात तो गृहस्थ म्हणाला “जो कुणी इथून आत जाईल त्याने हे बरोबर घेऊन जायचे आहे. आणि जाताना काउंटर वर परत द्या. काहीही खरेदी करताना आणि झाल्यावर हे बरोबर लागेल. तुम्हांला काहीही करायचे नाही फक्त मागितल्यावर हे कार्ड द्या”. एका हातात ते फळकुट ज्याला हे कार्ड म्हणतात ते घेऊन आम्ही उभयतांनी चितळे बंधूंच्या दुकानात एकदाचा प्रवेश केला.
आमचा एक हात या फळकुटाने व्यापला होता त्यामुळे उरलेल्या एका हाताने जमेल इतकीच खरेदी करावी लागणार होती. गिऱ्हाईकांना कमीत कमी खरेदी करायला मिळावी, उगाच अनावश्यक वस्तू घेऊन पैश्याचा अपव्यय करू नये असा उदात्त हेतू केवळ पुण्यातच असू शकतो. दुकानात मस्त बाकरवडीचा घमघमाट सुटला होता. आत शिरल्या शिरल्या बाकरवडीच्या काउंटर जवळ गेलो. काउंटर वरचा माणूस एका मोठ्या क्रेट मधील बाकरवड्या पाव पाव किलो मोजून त्याचे हवाबंद पाकीट बनवत होता. मी पाव पाव किलोचे ४ पुडे बनवून देण्यास सांगितले आणि त्याने त्याचं तत्परतेने पुडे भरायला सुरुवात पण केली. मुंबईच्या सवयीने मी त्याला म्हणालो “आत्ता ५:३० ला जी ताजी येते तीच भर” हे वाक्य ऐकताच त्याने हातातले काम थांबवले आणि माझ्याकडे एकच पुणेरी कटाक्ष टाकला. मला वाटलं आता हा मला म्हणणार निघा …बाकरवड्या मिळणार नाहीत आणि वरून काहीतरी उपदेशाचे चार शब्द माझ्यावर फेकणार हे एखाद्या शेंबड्या पुणेकर पोराने देखील सांगितले असते.
सौजन्य सप्ताह चालू आहे, कधी नव्हे ते येणाऱ्या गिऱ्हाईकाचा सन्मान करून त्याला दुर्मुख करू नये असा चेहेऱ्यावर सोज्वळ भाव आणून तो काउंटरवरचा पुणेरी दुकानदार मझी मंजुळवाणीने कानउघाडणी करू लागला “सकाळी आलेली बाकरवडी संध्याकाळी विकत नाही ….कारण ती विकण्यासाठी उरतंच नाही. इथे रोज सकाळ संध्याकाळी ताजा माल येतो. देऊ का? खात्री नसेल तर उद्या संध्याकाळी ५:३० वाजता क्रेट मोजायला या” सकाळच्या का संपतात म्हणजे कमी बनवता की विकल्या जातात असा खोडसाळ प्रश्न विचारण्याचे मुद्दाम टाळले आणि त्याला चार पुडे बांधून देण्याची विनवणी वजा आर्जव केलं. पटापट त्याने ४ पुडे भरले आणि म्हणाला “कार्ड द्या”. प्रवेश करताना दिलेल्या मोठ्या आयताकृती फळकुटाला कार्ड म्हणणं जरा हास्यास्पदच होतं. कार्ड कसलं ते कार्ड बोर्ड होता तो … तुमच्या दरवाज्यावरची पाटी लिहिता येईल इतका मोठा. “तुमच्या हातात आहे तेच कार्ड द्या. त्याच्या वर तुम्ही घेतलेल्या वस्तूंची नोंद होईल आणि पुढे याच कार्डचा उपयोग तुम्ही काय काय वस्तू घेतल्यात त्या प्रमाणे बिल बनवले जाईल. बिला प्रमाणे पैसे द्यावे लागतील.” मी परत एकदा त्या फळकुटाकडे बघितलं आणि ते “कार्ड” त्याला देता देता म्हणालो “अरे वा … एकदम अत्याधुनिक प्रणाली आहे तुमच्या कडे” त्याला बहुदा माझा खोचकपणा देखील कळला नाही किंवा माझं “प्रणाली” वगैरे पण त्याच्या डोक्यावरून गेलं. त्या सद्गृहस्थाने ते कार्ड माझ्याकडून खेचून घेतले आणि त्याच्याकडील मोजणी यंत्रावर ठेवले. त्यावर असलेली काही बटणे दाबून ते कार्ड मला परत दिले.
मी त्या बाकरवडीच्या वासाने इतका अधीर झालो होतो की काउंटर सोडता सोडता मी बाकरवडीची एक पुडी फोडली. आणि त्यातली एक बाकरवडी उचलून तोंडात टाकणार इतक्यात बाकरवडी काउंटरवरचा इसम ओरडला “बिल बनवायच्या आगोदर इथे खाऊ नका.” आणि त्याच्या सुरात माझ्या बायकोने पण सूर मिसळला “तुला काही कळतं की नाही … लहान मुला सारखं इथेच काय पाकीट फोडून खायला सुरुवात केलीस?” दोन बोटांनी पकडलेली बाकरवडी तशीच पुडीत सोडून द्यावी लागली. पुढे लाडू, पेढे, बर्फी यांचा काउंटर होता. काय मस्त मस्त रंगांच्या बर्फ्या ठेवल्या होत्या … अगदी बघता क्षणी एक डिश भर घेऊन तिथेच फस्त कराव्याश्या वाटत होत्या. लाडूंची तर रेलचेल होती. मेथी लाडू, बुंदी लाडू, मोतीचूर लाडू, बेसन लाडू, रवा लाडू झालच तर डिंक लाडू … पण या सगळ्या लाडवांमधून “पौष्टिक” लाडूने माझे लक्ष वेधून घेतले. “हा पौष्टिक लाडू काय प्रकार आहे?” असे विचारताच त्या काउंटर वरील माणसाने पौष्टिक लाडू, त्याचे घटक, पौष्टीकतेचे परिमाण सविस्तर सांगितले. पाव किलो पौष्टीक लाडू घेतले आणि सराईतपणे कार्ड पुढे केले. परत ते कार्ड त्या मोजणी-नोंदणी यंत्रावर ठेवले गेले आणि त्या कार्डावर नोंद करून ते मला परत दिले. अजून बाकी काही चकणा आयटम नको ना असं विचारताच भर चितळ्यांच्या दुकानातच कुणाचाही मुलाहिजा नं ठेवता बायको म्हणाली “नको इथून नको. या पेक्षा चांगले आणि स्वस्त चकणे आपल्या डोंबिवलीला मिळतात तुझ्या त्या गुजराथ्याकडे मिळतात”. ती असं म्हणताच मी इकडे तिकडे बघायला लागलो आणि मेन काउंटर वरचा मालक माझ्या हावभावांकडे बघून मिश्किलपणे हसत होता. … अश्या काही प्रसंगावरून मला नेहेमी वाटतं की माझी बायको पूर्व जन्मीची पुणेकर असावी. ;)
एका हातात सामान आणि दुसऱ्या हातात माझे आणि माझ्या बायकोचे कार्ड घेऊन मी सामानाचे पैसे देण्यासाठी शेवटच्या काउंटरवर आलो. कुठल्याही काउंटर वर गेलं की कार्ड पुढे करायचं हे माहीत झाल्यामुळे मी माझ्या हातातील दोन्ही कार्ड त्याच्या समोर धरली. त्याने त्यातले एक फळकुट घेतले आणि त्याच्या कडील मोजणी यंत्रावर ठेवले. ते बहुतेक बायकोच्या हातातले असल्याने त्या कार्डावर कुठलीही नोंद आढळली नाही. आधी मला वाटले वा …काहीच नोंद नाही म्हणजे काही तरी गल्लत झाली असणार आणि आता हा माल चकटफू मिळणार. “दुसरे कार्ड द्या” या मालकाच्या वाक्याने मी वास्तवात आलो. दुसऱ्या कार्डात सगळ्या नोंदी सापडल्या मालकाच्या चेहेऱ्यावर प्रसन्न भाव बघितले. किती झाले हे विचारायच्या आताच मालकाने त्याची तर्जनी संगणकाच्या पटलावर जिथे मोठ्या अक्षरात किंमत दिसत होती तिथे ठेवली. आणि त्याचं तर्जनीने बिल छापण्यासाठी असलेले बटन दाबले. छापील बिलाप्रमाणे रक्कम दिल्यावर मालक आदबीने म्हणाला “डोंबिवली मधून आलात का? बघा अजून काही नकोय ना?” मी म्हटलं “हो, डोंबिवलीहून आलोय. नको अजून काही नको” (आणि जरी हवं असेल तरी हा माणूस मला परत प्रवेश द्वारावर जाऊन फळकुट घेऊन यायला सांगेल”) “इथे प्लास्टिकच्या पिशव्या मिळणार नाहीत” अशी हुकुमावरून स्वरातील पाटी ठळकपणे दिसत असताना सुद्धा पिशवी आहे का? असे विचारले असते तर कदाचित त्याने बाकरवड्या काढून घेतल्या असत्या आणि मला रिकाम्या हाताने पाठवले असते या भीतीने मी पिशवी बद्दल विचारले नाही. पण काय आश्चर्य मालकांनी माझ्या कडून समान घेतले ते प्लास्टिकच्या पिशवीत भरले आणि ती पिशवी चेहेऱ्यावर स्मितहास्य ठेवून मला परत केली. मी परत एकदा ‘पिशवीचे किती झाले?’ हे विचारण्याच्या भानगडीत पडलो नाही कारण एकच भीती ….ताज्या बाकरवड्या हातून निसटल्या तर???
प्रतिक्रिया
7 Sep 2012 - 3:37 pm | स्वप्निल घायाळ
बॅटमॅन, जोकर ची शप्पथ बरोबर बोल्लास !!!
7 Sep 2012 - 3:42 pm | बॅटमॅन
अगदी अगदी ;)
7 Sep 2012 - 2:40 pm | स्वप्निल घायाळ
चितळे चा नाद करायचा नाही !!!
7 Sep 2012 - 2:55 pm | ५० फक्त
काय काय ओ त्या चितळेंचं नाव,
तीच ना ती
यमीपेक्षा सहापट गोरी असायची
दुस-या बाकावर बसायची,
दोन वेण्या घालायची,
कधीतरी बोलायची
तीच ना ती
8 Sep 2012 - 6:37 am | किसन शिंदे
१७५ प्रतिसाद होऊनसुध्दा अजूनही या धाग्याचा किस काढला जातोय, कमाल आहे बुवा.
आता काय २०० का??
8 Sep 2012 - 9:20 am | मोदक
वपु काळेंनी "पाणपोई" नावाच्या एका छोटेखानी पुस्तकात चितळेंचा, त्यांच्याबाबतीत घडलेलेला फर्मास किस्सा दिला आहे.
तो देवू का इथे..? मग २५० नक्की. ;-)
8 Sep 2012 - 9:40 am | सूड
दे दे. काय सांगावं, त्या किश्श्याने धागा ३००-३५० सहज गाठेल. ;)
8 Sep 2012 - 9:55 am | इरसाल
मगतर व.पु. काळेंच काही खर दिसत नाही हे लोक त्यांना सोडणार नाहीत.
9 Sep 2012 - 7:38 am | मोदक
नाय वो.. वपु मुंबईकर होते की पुणेकर ते ठरवण्यात लोकं ४० / ५० प्रतिसाद टंकतील. मराठी अंतर्जालाच्या उज्ज्वल परंपरेला अनुसरून नंतर कुणाच्यातरी लक्षात "नक्की मुद्दा काय आहे" ते येईल. मग ते सगळे पुन्हा अभ्यासून "मी वरती मांडलेला मुद्दा कसा बरोबर" यात आणखी २० / २५ प्रतिसाद..
एक आघाडी "वपु बरोबर की चूक आणि चितळे बरोबर की चूक" यात गुंतलेली असेल.
"साहित्यीक कुठे धुतल्या तांदळासारखे असतात की मिठाईवाल्याने तसे रहावे" वगैरे चर्चेत आणखी वेळ जाईल.
अशा तर्हेने आणखी एक आठवडा धुळवड सुरू राहिल.. त्यानंतर गणेशचतुर्थी निमीत्त कुणालातरी खव्याचे मोदक खावेसे वाटतील. त्यासाठी चितळेंना पर्याय नाही असा सूर निघेल..
पुन्हा दिवाळी आहेच.. इथे मात्र चितळेंचा कंटाळा आला तर लोकं ग्राहक पेठेकडे वळतील.. आणि इंचाइंचाने हे असेच सुरू र्हाईल... ;-)
8 Sep 2012 - 11:36 am | मृत्युन्जय
8 Sep 2012 - 4:44 pm | सूड
तुमचं घड्याळ चार वाजताना छान दिसतं .
8 Sep 2012 - 5:25 pm | इरसाल
8 Sep 2012 - 5:09 pm | स्वप्निल घायाळ
बहुतेक चितळे ब्रायन लारा चा ४०० चा रेकॉर्ड मोड्णार !!!
9 Sep 2012 - 12:38 am | बॅटमॅन
द्विशतकानंतर कळेल की इट्स नॉट वर्थ इट. अर्थात लोकप्रिय लोकभ्रमांत अडकून पडणारे जोपर्यंत आहेत तोपर्यंत माझ्या म्हणण्याची शाश्वती देता येत नाहीच.
जौंदे. एका मस्त हलक्याफुलक्या धाग्याची लावलेली वाट बघून मात्र वाईट वाटतं. तितका सीजन्ड नाहीये झालो अजून. काय करणार :(
10 Sep 2012 - 9:47 am | इरसाल
कृपया हा धागा अजुन ५/६ रन होईपर्यंत वाचनमात्र किन्वा पुसु नये.
न जाणो युवराज "आनंद भातखंडे" सिंग षटकार मारुन द्विशतक पुर्ण करु शकतात.
10 Sep 2012 - 10:58 am | आनंद भातखंडे
चला मी जर असा षटकार मारून द्विशतक पूर्ण केले आणि त्यानंतर जर हा लेख वाचनमात्र राहिला किंवा पुसला जाणार असेल तर हे काम आनंदाने करीन ;). .... निदान कुणी अजून पीठ तरी पडणार नाही ;) (पीठ हा शब्द आधीच प्रतिक्रियांमध्ये वापरला गेला आहे .... नाही तर किस पाडणे हा वापरला असता पण कदाचित या शब्दामुळे २५० रन पूर्ण होण्याची भीती असल्याने टंकला नाही ;))
10 Sep 2012 - 2:21 pm | कवितानागेश
१९७
10 Sep 2012 - 2:38 pm | sagarpdy
हल्लीच चितळ्यांच्या दुकानातील अनारसे खाल्ले. विशेष नसतात. अन्य कुठे चांगले मिळत असतील अथवा घरी करता येत असतील तर दुकानापर्यंत जाण्याचे कष्ट करू नयेत.
(प्रयोजन : १९८ , अजून २ टाका फक्त!)
10 Sep 2012 - 2:47 pm | तर्री
स्थळ : मद्रास केफे.
वेळ : दुपारी चार वाजता.
प्रसंग : भली मोठी रांग ,४ वाजले , शटर वर झाले, खादाड कंपनी टेबले "झिपायला" धावली.
आठवण : हा धागा व ४ वाजणे !
अनुमान : लाईन लावणे हा प्रकार फक्त पुण्यात नाही , मुंबईत ही आहे.
प्रयोजन : १९९.
10 Sep 2012 - 2:51 pm | गवि
एग्जॅक्टली हाच्च प्रकार लाडू डेपो : कबुतरखान्यानजीक, दादर प. या ठिकाणी अनेकदा पाहिला आहे.
10 Sep 2012 - 3:12 pm | प्रदीप
तुम्हाला भाऊ दाजी रोडच्या कोपर्यावरील 'कॅफे मद्रास' म्हणायचं आहे का?
('मद्रास कॅफे' वेगळे व हे वेगळे, म्हणून विचारतो आहे).
10 Sep 2012 - 5:56 pm | तर्री
यु आर करेक्ट !कामतांचे "कॅफे मद्रास" !!
10 Sep 2012 - 5:53 pm | मोहनराव
टीआरपी वाढीवणे म्हंजे हेच का भाऊ?
द्वीशतकी धागा!!