याआधी: ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. २२
जपानच्या मैत्रबनात..
जपान मध्ये बर्याच ठिकाणी स्टेशनच्या बाहेर चौकासारखी मोकळी जागा असते. तेथे वेगवेगळी कलाकार मंडळी आपला रियाज करत बसलेली असतात किवा मग प्रेक्षक जमवून आपली कला सादर करतात. आम्ही राहत असलेल्या सान नो मिया स्टेशनाच्या बाहेरही अशी चौकवजा जागा होती. सान नो मिया! माया पर्वताची सान नो म्हणजे तिसरी डोंगरमाळ! माया पर्वताने एका बाजूने कुशीत घेतले आहे आणि दुसर्या बाजूला प्रशांत महासागराच्या लाटा पायाला गुदगुल्या करत आहेत, असं हे कोबेचा शेजारी असलेलं आमचं सान नो मिया! स्टेशनच्या त्या चौकातच रियाज कम कॉनसर्ट करणारा एक 'कारामानातु' नावाचा पाच जणांचा ग्रुप होता. ती मुलं जेव्हा चौकात दिसत तेव्हा आम्ही हटकून थांबून त्यांच्या बँडचं संगीत ऐकायचो. विशेष म्हणजे त्यांच्यातला प्रत्येक जण एकापेक्षा जास्त वाद्य एका वेळी वाजवत असे. बहुतेकदा लॅटिन अमेरिकन संगीत ते वाजवत असत. ही रस्त्यावरची कॉनसर्ट पहायला भरपूर गर्दी असे. काही काही चक्क नेहमीचे मेंबर आहेत. तिथेच एक ७२ वर्षांची एक फॅशन डिझायनर आजी आमची मैत्रिण झाली. चारपाचदा आम्ही एकत्र ती रस्त्यावरची म्युझिक कॉनसर्ट ऐकली एवढी ओळख पुरली आणि तिचे मोडकेतोडके इंग्रजी, जर्मनचे काही शब्द आणि आमचे बिनाअस्तराचे जपानी एवढ्या भांडवलावर आमच्या गप्पा रंगू लागल्या. अशीच दुसरी मैत्रिण आमची टाक माते वाली.. टाक माते नावाचे एक लहानसे दुकान आमच्या घराजवळ आहे. तेथे आम्ही कधीकधी आइस्क्रिम खायला तर कधी काहीबाही आणायला जात असू. मग येताजाता तीही 'कोन्निचिवा' (हॅलो..) करु लागली आणि मग भाषांची मोडतोड करत आमची मैत्री जुळली.
कारामानातुचे व्हिडिओ- १ ,२ आणि ३
तशीच फुजितासान! ही वास्तविक ती कचेरीच्या कामाची दुभाषी होती पण आमच्या व्यावहारिक अडचणींसाठीही ती धावून यायची. रोजची दूध, भाजी इ. ची खरेदी कुठे करायची हे तिनेच दाखवून दिले तर आमच्या ट्रीपांसाठीही माहिती तिनेच पुरवली. फुजीसानला भेट द्याच हा आग्रह तिचाच आणि ती ट्रीपही तिनेच आखून दिली. दोन तीनदा भारतात जाऊन आलेली असल्याने तिला विशेष आस्था होती. तिला वेळ असला कि ती घरी यायची, भारताविषयी माहिती विचारायची आणि आवडीने भारतीय पदार्थ खायची. आत्ता मागच्यावर्षी दिल्लीच्या विमानतळावर ती अचानक भेटल्यामुळे झालेला आनंद अवर्णनियच आहे! आणि दिनेशचा जपानी सहकारी निशिवाकीसान, हो.. तोच भला माणूस ज्याने प्रदीपचा पास शोधायला मदत केली. आमच्याकडे टीव्ही नाही म्हटल्यावर त्याने आपल्या घरातला मुलांचा टीव्ही सरळ उचलून आणून ठेवला. रोजच्या भाषिक हाणामारीत निशिवाकीसान आणि फुजितासान ह्यांची खूपच मदत होत असे आणि नुसते कर्तव्यबुध्दीने नव्हे तर खरोखरी मनापासून दोघेही सहकार्य करत असत.
निशिवाकीसान भारतीय भज्यांवर बेहद्द खूष होता. एकदा तो आणि त्याचे कुटुंबिय खास भजी खायला म्हणून आमच्याकडे आले. येताना फुलांचा सुंदर गुच्छ युमीसानने आणला होता आणि त्या फुलांसारखीच गोड त्यांची मुलं आयासान आणि काजुकीसान! युमीसान लगेच किचनमध्ये येऊन भजी कशी करतात ते पहायला लागली. त्यांचे तेंपुरा आणि आपली भजी म्हणजे चुलतभावंडेच की.. पण भज्यांचा खमंगपणा तेंपुरात कसा येत नाही? हे डाळीच्या पीठाचे रहस्य तिला उलगडले. नंतर मग एकदा आम्हाला त्याने घरी बोलावले होते. जपानी माणूस सहसा कुणाच्या घरी पटकन जात नाही आणि कुणाला बोलावतही नाही. त्याने घरी बोलावले म्हणजे त्याने मैत्रीचा स्वीकार केला, नाते इनफॉर्मल झाले असे समजायचे. युमीसानने खूप खपून वेगवेगळे जपानी पदार्थ तर केले होतेच पण खास आमच्यासाठी समोसे करुन तिने चकितच केले. समोसे तळताना तिने झार्याऐवजी हाशी (चॉपस्टिक्स) वापरलेली पाहून मी चकितच झाले. (खोटे कशाला बोला? इथे हाशीने एक पदार्थ उचलून तोंडात टाकताना मारामार.. त्यात छोटा काजुकीसान सुध्दा ज्या सराइतपणे हाशीने समोसे ,तेंपुरा मटकावत होता ते बघून तर.. त्यावर लगेच त्या मंडळींनी आमचे हाशी वर्कशॉप घेतले.. ) जेवणानंतर त्यांच्या घराजवळच असलेल्या कारावके सेंटर मध्ये आम्हाला नेले.तेथे लहानलहान केबिन्समध्ये टीव्हीस्क्रिन,माइक्स आणि गाण्यांची डिरेक्टरी असते. हवे ते गाणे निवडून लावले की टीव्हीस्क्रिनवर त्या गाण्याचे शब्द आणिसाजेशी दृश्य दिसू लागतात आणि संगीतही सुरु होते. मग ते गाणं गात,नाचत प्रत्येकात दडलेलं लहान मूलं बाहेर येऊन बागडू लागतं.आता कारावकेचे अप्रूप राहिले नाही पण त्यावेळी मात्र ही सारीच नवलाई होती.
फुजीसानने आम्हाला दोन गोड मैत्रिणी दिल्या, आकीसान आणि योशिकोसान! त्यातली आकीसान ही खूप उत्साही, बडबडी! एका रविवारी त्या दोघी त्यांच्या योकोसान नावाच्या आणखी एका मैत्रिणीला घेऊन आमच्याकडे आल्या. ह्या तिघी अगदी जिवाभावाच्या मैतरणी! पण फु़जी ट्रीपच्या वेळी योकोसानचा नृत्याचा कार्यक्रम होता. त्यामुळे ती येऊ शकली नव्हती. ती गेली ५-६ वर्षे ओडिसी नृत्य आणि हिंदी शिकत होती , येताना तिचे हिंदीचे पुस्तकही ती घेऊन आली होती.माझ्याकडे साडी आहे का? हा पहिला प्रश्न , मग ती कशी नेसतात? त्याची उत्सुकता! साडी नेसून ,टिकली लावून आणि पंजाबी ड्रेस घालून त्यांनी फोटो काढून घेतले आणि त्यांचा युकाता त्या बरोबर घेऊन आल्या होत्या. किमोनो म्हणजे जरीकिनखापाचा उत्सवी, शाही पोषाख तर युकाता हा सुती ,उन्हाळी पोषाख!
पुढे नंतरच्या एका रविवारी आम्ही त्या तिघींबरोबर सुमा बीच वर एकत्र सहलीला जायचे ठरवले. त्यांनी जपानी जेवणाचे डबे आणायचे तर आम्ही पुरीभाजी असा बेत करुन दिवसभर तेथे बागडलो. खूप गप्पागोष्टी केल्या. आकीसान दोनदा भारतात येऊन गेली आहे इतकेच नव्हे तर जुहूबीचवर तिने भेळ आणि पान सुध्दा खाल्ले असल्याचे सांगितले. गप्पांमध्ये संध्याकाळ कधी झाली समजले नाही. सूर्य कलू लागला होता आणि आम्हालाही आता निघणे भाग होते. कोणाचाच पाय निघत नव्हता कारण आता आकीसान ट्रेनिंगसाठी ६ महिने तोक्योला जाणार होती आणि त्याआधीच मी भारतात परत येणार होते, म्हणजे माझी आणि आकीसानची परत भेट कधी? ह्या प्रश्नाचं उत्तर दोघींकडेही नव्हतं. डोळ्यातलं पाणी थांबवत ती आणि मी एकमेकींचे हात घट्ट धरुन बसलो होतो.
असेच काही दिवस गेल्यानंतर जपानला सायोनारा करण्याचा दिवस जवळ आला होता, नव्हे अगदी उद्यावरच येऊन ठेपला होता.आदल्या दिवशी दाइ याइ, टाक माटे, को ऑप,मोतोमाची सारे परत एकदा फिरुन आले. संध्याकाळी कारामानातु ग्रुपची गाणी ऐकायला गेले. आज गाणी ऐकण्यात मन लागत नव्हते. त्या सर्वांना, तेथे नेहमी येणार्या परंतु नावेही माहित नसलेल्या सगळ्यांना परत परत पाहत होते. जणू त्यांचा निरोपच घेत होते, कदाचित कायमचा! विमानात बसताना जड अंतःकरणाने जपानचा निरोप घेताना मनातच म्हटले, गुड बाय ! सायोनारा!!!
-------------------------------------------------------------------------------------
सायोनारा..
जपानने मला काय आणि किती दिले, मला किती अनुभवश्रीमंत आणि समृध्द केले ते शब्दांपलिकडले आहे. तेथे जाऊन १० वर्षे होऊन गेली पण तरीही स्मृतीत ते सारे ताजे आहे. तेथे असताना घरात इंटरनेट नव्हते, बाहेर असलेले सगळेच इंटरनेट कॅफे इंग्रजी ओएस वाले नसत. २ किमी वर असणारा एक इंग्लिशकॅफे आम्ही शोधून काढला होता पण तेथे कायम जाता येणे शक्य नव्हते. टीव्हीवरही फक्त जपानीच चॅनेले असत. त्यामुळे करमणूक म्हणजे रेड्डीआंटींकडच्या कॅसेटा आणि जोपर्यंत सुप्रिया, लेखा आणि मुले होती तोपर्यंत त्यांच्याबरोबर भटकणे, पत्ते खेळणे इ.. पण ती सर्व मंडळीही जेव्हा भारतात परत गेली तेव्हा मग दिवसभर मी एकटी आतापर्यंत चांगल्याच परिचित झालेल्या रस्त्यांवरुन, मॉलमधून भटकत असे आणि कधीकधी कॅसेटांवर सिनेमे पाहत असे. दिनेश वर्तमानपत्रांचे प्रिंटआउट काढून आणत असे ते वाचत असे. जेव्हा आम्ही फिरायला, जापान पहायला जात असू तेव्हा तेथील माहितीपत्रके ,नकाशे आवर्जून बरोबर आणत असू. एकदा आवराआवरी करताना ते सारे बाड हाती लागले म्हणून चाळू लागले.त्यातूनच मग डायरीत नोंदी करत गेले. त्याचेच मूर्तस्वरुप म्हणजे ही लेखमाला !
प्रतिक्रिया
19 Jul 2012 - 11:59 pm | रेवती
अप्रतिम लेखमाला.
मनाच्या जवळ जाणारी लेखनशैली असल्याने ही मालिका अशीच चालू राहणार असे गृहित धरले गेले.
जपान फिरवून आणल्याबद्दल स्वातीताईचे आभार.
चित्रफिती दिसल्या आणि आवडल्या.
20 Jul 2012 - 1:22 am | जयनीत
खुपच सुंदर लिहिलत, पहिल्यांदा वाचलं, खुप खुप आवडलं, जुन्या लि़ंक्स शोधुन पूर्ण लेख मालिका नक्कीच वाचणार.
20 Jul 2012 - 7:09 am | सहज
मिपावरच्या काही संग्रहणीय मालीकांपैकी एक!!!
अरिगातो.
20 Jul 2012 - 8:38 am | ५० फक्त
लई भारी झाली मालिका, धन्यवाद.
20 Jul 2012 - 9:40 am | अर्धवटराव
तुमचे जपानी अनुभव आणि ते आमच्याशी शेअर करण्याची स्टाईल... खुपच सुंदर.
तुम्ही जपानला जी भावनीक सिघ्नता अनुभवली ती एकदम सही सही आमच्यापर्यंत पोचली.
धन्यवाद.
अर्धवटराव
20 Jul 2012 - 10:44 am | ऋषिकेश
अरेरे लेखमाला संपली! :(
20 Jul 2012 - 8:54 pm | बहुगुणी
अरेच्चा!....संपली?
(असो, आता पुस्तकाचं मनावर घ्या, हे लेखन मिसळपाव वाचकांच्या पलिकडेही जायला हवं असं वाटतं.)
20 Jul 2012 - 6:38 pm | सुनील
संपूर्ण मालिका वाचनीय.
20 Jul 2012 - 7:44 pm | पैसा
मालिका का संपली अशी हुरहूर लागून राहिली आहे.
20 Jul 2012 - 7:55 pm | स्मिता.
लेखमाला संपली? खूप छान चालली होती.
घरात इंटरनेट नसतांना संपूर्ण वेगपरदेशात, संस्कृती असलेल्या परदेशात राहणं मानसिक बाजूने अतिशय अवघड! अश्या परिस्थितीत तुम्हाला छान मित्रमंडळ लाभले ही खरोखर आनंदाची बाब.
मी ही लेखमाला अर्धवटच वाचलीये... आता जुने दुवे शोधून पुन्हा पहिल्यापासून वाचेन.
20 Jul 2012 - 10:20 pm | सर्वसाक्षी
अगदी सरळ साध्या शब्दात केलेले हे प्रांजळ कथन खुप भावले!
आपण चांगले तर जग चांगले हे तुझ्या आणि दिनेशच्या बाबतीत खरे ठरले. तुम्हाला चांगली माणसे भटली. ही लेखमाला वाचताना प्रकर्षाने जाणवले ते प्रत्येक लेखातले तु केलेले कुणाचे ना कुणाचे कौतुक.
लेखन आवडले हे वेगळे सांगायलाच नको, तरीही सांगतो. मस्त!
11 Oct 2015 - 12:49 am | डॉ सुहास म्हात्रे
अप्रतिम लेखमाला ! वाचताना स्व:ताच जपानमध्ये असल्याचा आभास होत होता !
जपान, जपानी आणि मी! ....भाग १ या लेखातल्या प्रतिसादात संदर्भ मिळाला म्हणून एक लेख वाचला. मग मात्र सर्व लेखांचे उत्खनन करून ते वाचल्याशिवाय राहवले नाही ! आताच सर्व लेखमाला सलग वाचून संपविली आहे !
11 Oct 2015 - 4:10 pm | एस
आभार!
या शेवटच्या भागात आधीव्या सर्व बावीस भागांचे दुवे एकत्रित करून दिल्यास वाचकांना सोयीचे जाईल.
25 Mar 2016 - 1:00 pm | स्वाती दिनेश
सूचनेचे स्वागत- आता ह्या भागातच मागचे सर्व दुवे देते.
स्वाती
11 Oct 2015 - 5:34 am | कंजूस
अरे वा आता सर्व वाचायला पाहिजे पहिल्यापासून.
11 Oct 2015 - 12:06 pm | पद्मावति
वाह, मस्तं खजीनाच आहे हा. वाचते जरा निवांतपणे.
25 Mar 2016 - 1:14 pm | स्वाती दिनेश
मागच्या भागाचे दुवे-
भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ५अ, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९, भाग १०, भाग ११, भाग १२, भाग १३, भाग १४, भाग १५, भाग १६, भाग १७, भाग १८, भाग १९, भाग २०, भाग २१, भाग २२, भाग २३
6 Apr 2016 - 12:16 pm | लालगरूड
सर्व भाग वाचले. छान लिहले आहे ......