प्रस्तावना:
मिर्जा गालिब!!
एक उत्तुंग व्यक्तिमत्व, एक न सुटलेले कोडे, एक रम्य गुढ.!!
(चित्र जालावरुन साभार)
बाजी चा-ए-अतफाल है दुनिया मेरे आगे |
होता है शब-ओ-रोज तमाशा मेरे आगे ||मत पुछ के क्या हाल है मेरा तेरे पीछे |
तू देख के क्या रंग है तेरा मेरे आगे ||
अशा या वेड्या शायरच्या अनेक गझला आणि रचना अनेकांनी वाचल्या, संकलीत केल्या.
काही जाणकारांनी त्या रचनांचे, गझलांचे अनेक अर्थ मांडले.
ज्याला जसा गालिब समजला तसा त्याने मांडला, पण विशेष म्हणजे प्रत्येकाला तो वेगवेगळा भासला.
माननीय गुलजारसाहेबांनी तर या वेड्या कवीचा जीवनपटच मांडला, एका मालिकेच्या रुपात.
गालिबचा प्रत्येक शेर पार काळजालाच भिडतो. त्याच्या लेखणीत कमालीची जादू आहे. "हाल-ए-दिल" सांगण्याची त्याची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. छोट्या छोट्या द्विपदींतुन बरचं काही सांगून जातो तो. आता हेच बघा
बेखुदी बेसबब नही 'गालिब'
कूछ तो है जिस कि परदादारी है
परदादारी म्हणजे लपवाछपवी. स्वःताच्याच मनाला सांगतोय, हि बेखुदी विनाकारण नाहीये, काहीतरी लपवाछपवी आहे. म्हणजे तो स्वःताच स्वःतापासून काहीतरी लपवतोय आणि स्वःतालाच असे करतांना "रंगे हाथ" पकडतोय. जेव्हा आपण एखादी गोष्ट स्वःतापासूनच लपवत असतो तेव्हा ती गोष्ट एकतर आपल्या जीवाच्या फार जवळ असते किंवा आपण त्यापासून कितीही लांब जात असलो तरीही ते आपल्याला अजिबात जमलेले नसते!
किंवा
नादाँ हो जो कहते हो कि क्यो जिते हो 'गालिब'
क़िस्मत में है मरने कि तमन्ना कोई दिन और
जगण्यातला फोलपणा कळूनही जगणे अनिवार्य असते. कारणे काहीही असली तरी (आणि अगदी व्यवहार्य नसली तरी) त्या क्षणी त्याला जीवनापेक्षा मृत्यु जास्त जवळचा वाटतो आहे. पण त्याला जगावेच लागेल हे ही समजते आहे. त्यातून मग हे असे विषण्ण करणारे शेर येतात. आणि गालिबच्या वैयक्तिक आयुष्यात असे अनेक क्षण आहेत. त्याला झालेल्या सात मुलांपैकी एकही वाचलेला नाही. त्याच्या सख्ख्या लहान भावाला फार तरुण वयात वेड लागले होते. त्या भावाची आणि त्याच्या मुलांची जबाबदारी गालिबवरच होती. असो.
आर्तता हि तर गालिबच्या शायरीची जान. त्याचे कित्येक शेर हे अक्षरशः काळीज पिळवटून टाकतात. उदाहरणच द्यायचे झाले तरः
थी वो एक शख्स के तस्सव्वुर से
अब वो रानाँ-ए-खयाल कहाँ
तस्सव्वुर म्हणजे कल्पनेतील जग, आणि रानाँ-ए-खयाल म्हणजे एखाद्याबद्दलच्या प्रेमाने दाटलेले उद्गार किंवा विचार, आता परत एकदा वाचून पहा त्या ओळी. काय भन्नाट विचार आहे हा. कोण्या एका व्यक्तिच्या अस्तित्वाच्या नुसत्या कल्पनेमुळे जे विचार किंवा ओळी शायरीत उमटत होत्या त्या आता नाही उमटत, हे सांगण्याची पद्धत काय कमाल आहे.
तर अशा या उत्तुंग प्रतिभेच्या भन्नाट गझला आणि शायरीने मला पुरते पछाडले. जसा अनेकांसाठी गालिब हा एक प्रेरणास्त्रोत होता/आहे तसाच माझ्यासाठीही. जस-जसा उर्दु लहेजा आणि त्या भाषेचा गोडवा समजायला लागला तस-तसा गालिब अजुन निट लक्षात यायला लागला. मग गालिबचे व्यसनच लागले. मला खुप काही समजायला लागले आहे असा मूर्ख समज माझा अजुन झालेला नाही, हे माझे नशीब!
पण त्यातूनच ही कल्पना जन्माला आली. अर्थात ही काही अगदी अभिनव कल्पना आहे असा माझा दावा मुळीच नाही. ह्या प्रकारचे लेखन या आधी कुणीतरी केले असण्याची शक्यता नाकारता येतच नाही. पण तरीही माझ्या किडूक-मिडूक प्रतिभेला झेपेल तसा गालिबच्या काही शेरांची ही अनुभुती मराठीतून व्यक्त करण्याचा हा एक वेडा प्रयत्न. गालिबसमोर तो अगदीच तोकडा वाटण्याचीच शक्यता जास्त आहे, पण.. प्रयत्न करतो कि, काय हरकत आहे?
मला ना अनुवाद करायचा आहे, ना भावानुवाद, ही गालिबच्या रचनांची मला झालेली अनुभुती आहे. एखादा शेर नजरेसमोर घेऊन तो शेर अस्तिवात का आला असेल, अशी काय परीस्थिती उद्भवली की तो शेर गालिबच्या अत्यंत संवेदनशील हृदयातून उमटला असेल, असा काहीतरी विचार करुन तो प्रसंग डोळ्यांसमोर उभा करण्याचा हा प्रयास आहे. अर्थात याला गालिबच्या जीवनातील प्रसंगांची पार्श्वभूमी असेलच, असे काही नाही. फक्त मी तो शेर प्रातिनिधीक स्वरुपात वापरलेला आहे.
नमनालाच १०-१२ घडे संपविल्यावर कां होईना पण, करुया सुरवात?
"उफ्फ... ये गालिब!" या मालिकेतील हि पहिली रचना:
१.
एकही संध्याकाळ मोकळी जात नाही आजकाल
स्मरणांचे वादळ घोंगावते
एक एक आठवण आदळते
शिड तुटलेल्या होडीवर
इतःस्तत पसरतात तुकडे
गोळा करता करता रात्र सरुन जाते
.
फक्त प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न!
उत्तर ना माझ्याकडे ना तिच्याकडे...
.
तिकडे टेबलावर एकटाच पहुडलेला टेपरेकॉरडर
आपले आपल्यासाठीच वाजत राहतो
त्याच्याकडे लक्ष गेले तर ऐकू येते
.
जब की तुझ बिन नही कोई मौजुद
फिर ये हंगामा ऐ खुदा क्या है?
.
उफ्फ... ये गालिब!
(क्रमश:)
प्रतिक्रिया
30 Jan 2012 - 7:18 pm | प्रास
बहुत खूब!!
मिकाभाऊ, तुम्ही तर एकदम रंगतच आणलीत की!
गालिब असाच अनेकांना छळतो, पछाडतो आणि खुळावतो सुद्धा!
तुमचा हा लेखन प्रकार आवडला आपल्याला.
पुलेप्र
30 Jan 2012 - 7:21 pm | विजुभाऊ
व्वा...... बरेच दिवसांपासूनची इच्छा होती गालीबवर वाचायची
30 Jan 2012 - 9:58 pm | बिपिन कार्यकर्ते
अप्रतिम कल्पना! आता पुढे काय काय वाचायला मिळणार या कल्पनेनेच थरारून गेलो आहे. प्लीज, ही मालिका नेटाने आणि दोन भागात फार विलंब न ठेवता पुढे नेत रहा.
_/\_ !!!
30 Jan 2012 - 10:37 pm | सानिकास्वप्निल
खरचं अप्रतिम :)
30 Jan 2012 - 10:37 pm | केओस
गालिबचा एक अजुन शेर आथवतो आहे.
कहते है, जिते है उमिद पे लोग
हमको जिने कि भि,उम्मिद नहि
लवकर नविन लेख द्या
30 Jan 2012 - 10:39 pm | जाई.
अरे वा
छानच. पुढचे भाग पटापटा टाका
30 Jan 2012 - 11:04 pm | गवि
खास रे मिका..
30 Jan 2012 - 11:14 pm | शुचि
कविता फारच आवडली.
31 Jan 2012 - 6:43 am | सुहास झेले
जबरा... एकदम आवडत्या विषयावर लिहायला घेतलंय.
पुढल्या भागाच्या प्रतीक्षेत :) :)
31 Jan 2012 - 10:46 am | पियुशा
मस्त्,मस्त्,मस्त :)
31 Jan 2012 - 10:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त रे...! गालिब एक जादुच आहे.
'ये ना हमारी किस्मत कि विसाले-यार होता, हजारो ख्वाहिशे...., घर जब बना लिया तेरे दर पर कहे बिगर, हर एक बात पे कहते हो तु कि , तू क्या है..... हे आणि अशा किती तरी लोकप्रिय शायरीची अधुन -मधुन कोणी तरी आठवण काढत असतेच.
अर्थात मराठीत ते किती दमदारपणे उतरेल यात शंका असली तरी
आपल्या उपक्रमाचं स्वागत आहे, वाचणार आहेच.
काल पेप्रात मला एक शेर स्पर्श करुन गेला. कोणाचा आहे, काही माहिती नाही, पण आवडला. आपली परवानगी न घेता अनामिक शायरचा शेर पेश करतो-
न तेरा खुदा कोई और है
न मेरा खुदा कोई और है
ये जो रास्ते जुदा जुदा है
ये मामला कोई और है
जर्रे जर्रे मे अगर तु है तो फिर
जमींपर मंदिर मस्जिद क्यो है.
-दिलीप बिरुटे
31 Jan 2012 - 10:53 am | स्पा
मिका रॉक्स
झकास रे... पुढेचे भाग लवकर टाक
(मिर्झा गालिब -स्पा )
31 Jan 2012 - 11:54 am | DTPS२००८
खरचं अप्रतिम....खूपच मस्त.......
31 Jan 2012 - 12:14 pm | मी-सौरभ
आज शांतपणे वाचलं...
मस्त जमलयं....
31 Jan 2012 - 12:38 pm | रामदास
लेख सुंदर आहेच. गालीबच्या रचना गाण्यांमधून बरीच वर्षे ऐकत होतो. पण किती कठीण विषय आहे हा ? येऊ द्या पुढचे लेख.
31 Jan 2012 - 12:49 pm | गणपा
सुभान अल्लाह !
पुढील लेखाची वाट पहातोय.
31 Jan 2012 - 12:52 pm | सुहास..
रामदास कांकाशी सहमत , गालिब आणि शेक्सपियर यांच्या विषयी जरा महाकठीण बोलणे
आता हा शेर बघ . ..
मूफलिस हुवे तो यार भी अगयार हो गये,
दामन में जितने फुल थे, सब खार हो गये ,
और क्या गिराएगी दुनिया अपनी निगाह से,
इतने जलील हुवे के 'खुद्दार' हो गये .
एक क्षण असा येतो नैराश्ये चा की मनुष्य सर्व दुनीये ला फाट्यावर मारतो ..( हे माझं मत . अर्थात गालिब सांगताना म्हणतात ना .....कोई बताये के हम बताये के गालिब कौन था ;) )
आणि शेक्सपियर विषयी तर ....आपल्या मित्राला लिहुन दिलेल्या पत्रात शेक्सपियर काय म्हणतो.
It was my rare good fortune, that I saw you yesterday in XYZ's party , Although it was felitious moment, the impression of your charming personality, indelibly stamped upon my mind and heart.
हे माझ सुदैव होते की , काल एका पार्टीत मी तुला पाहिले, ते दर्शन जरी ओझरते असले तरी, त्या तुझ्या चार्मिंग ( मराठीत हसतमुख का ? ) व्यक्तीमत्वाची प्रतिमा, माझ्या मनावर आणि हृद्यावर , न मिटवता येण्यासारखी ठसली गेली.
_/\_
सलाम दोघांनाही
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत ...
31 Jan 2012 - 1:38 pm | किसन शिंदे
छानच!
परवा हरीहरनची एक गझल ऎकताना एका उर्दू शब्दावर येऊन अडकलो होतो, त्याचा अर्थ आता तुम्हास विचारावा काय??
31 Jan 2012 - 2:26 pm | कवितानागेश
:) मस्तच लिहिलंय.
आवडता विषय आहे. वाचतेय.........
31 Jan 2012 - 2:58 pm | मोहनराव
वा वा!! छान!! वाचत आहे.
गालीबची ओळख छान झाली आहे. पुलेप्र!!
31 Jan 2012 - 3:02 pm | फिझा
वा वा !!! खरच छान !!! तुमचे कविता सन्ग्रह लवकरच प्राकशित होवोत ....यासाठि ..खुप खुप शुभेछ्हा!!! असेच लिहित राहा !!! उफ्फ ये गलिब चे १०० भाग अपेक्शित अहेत !!! म्हणुन शुभेछा !!!
31 Jan 2012 - 4:44 pm | नि३सोलपुरकर
सुभान अल्लाह ! बहोत खुब.....
गालिब म्हणजे क्लास.
कालच वर्तमान पत्रात वाचले की "भारत रत्न्"साठी गालिबचा विचार व्हावा..
पण यार गालिब इन सबसे परे है.
@ मिका : थॅक्स.
31 Jan 2012 - 7:53 pm | वपाडाव
मित्रा, सगळं काही अतिशय सुरेख झालंय....
गालिब - नाव खरंच मोहुन टाकणारं आहे... अन तु सुरुवातही मस्त केलिये...
लौकरच पुढील भाग प्रकाशित कर....
पण एक विनंती आहे.... तुझ्याकडुन "स्वःता / निट / इतःस्तत" असल्या चुका अपेक्षित नाहीत...
हा लेख अकुकाका, नगरकर जिलेबीवाले किंवा स्वैंपाकघर यांजकडुन आला असता तर सर्व चुका क्षम्य आहेत...
पण "गालिब" सारख्या गुणवंत माणसाची जेव्हा ओळख घडत आहे तेव्हा प्लीज अश्या चुका होणे नव्हे... पुढील वेळेस ध्यानात ठेव...
कारण हा लेख (सिरिज) मिपावर दुरपर्यंत वास्तव्य करेल असे वाटते... बाहेरील लोकही याचा संदर्भ घेतील....
असो, लहान तोंडी मोठा घास घेतला आहे मी... चु.भु.दे.घे. ...पण जे वाटले ते सांगितले...
31 Jan 2012 - 9:06 pm | रघु सावंत
असा " आसामी "पुन्हा होणे नाही .
बरं झाले तू अर्थ सांगितलास ते नाहीतर माझी पंचाईत झाली असती.
मिका सायबा धन्यवाद
3 Feb 2012 - 10:47 am | अज्ञातकुल
फारच छान. ही लिंक पाठविल्याबद्दल मनःपूर्वक आभार. :)