अपार्टमेंट <-> डिपार्टमेंट <-> ऍडवायज़र <-> बडवायज़र (१)

बेसनलाडू's picture
बेसनलाडू in जनातलं, मनातलं
12 Feb 2011 - 12:53 pm

ही लेखमाला मी विद्यार्थीदशेत असताना लिहायला चालू केली आणि तिचा शेवटचा (?) भाग बाकी असताना लिहिणे थांबले. माझ्या एकंदर लेखनसंन्यासामुळे कित्येकांचा डोक्यात तिडीक गेल्याचे पाहून राहवले नाही आणि स्वाती दिनेश यांच्यासारख्या ज्येष्ठांकडून नियमित पाठपुरावा केला गेल्याने ही लेखमाला येथे आणून येथेच सुफळ संपूर्ण करण्याचे आश्वासन माझ्याने दिले गेले. त्याला जागून -
==========================================================================

लेखाचे शीर्षक किंवा त्यातील शब्द अमेरिकेत राहणाऱ्यांसाठी तरी नवीन नसावेत. आणि ज्यांना हे शब्द परिचयाचे नाहीत, त्यांची यथावकाश त्यांच्याशी (चांगलीच!) ओळख होईल, याबाबत खात्री बाळगावी. या शीर्षकातील '<->' या चिन्हाकडे "टू अँड फ़्रो" या अर्थाने बघावे; म्हणजे त्यावरून लेखकाच्या व त्याच परिस्थितीत दिवस काढणाऱ्या इतर अनेकांच्या दैनंदिन प्रवासाची (खरे तर परिस्थितीची!) कल्पना येईल. मुंबईकर चाकरमानी घर ते नोकरी, नोकरी ते घर असा प्रवास करतात. पण त्या दैनंदिन प्रवासाची गोडी अनुभवणारे कुणी अपूर्वाई, पूर्वरंग किंवा तत्सम लिहिण्याच्या फंदात पडत नाहीत. इकडे विद्यार्थी(दशेत) जीवन जगणाऱ्या बऱ्याच ज़णांचा प्रवास अपार्टमेंट ते डिपार्टमेंट ते ऍडवायज़र ते बडवायज़र आणि परत असा असतो. त्याच प्रवासवर्णनाचा हा पहिला भाग.

अपार्टमेंट म्हणजे किमान सहा मज़ल्यांची (उत्तुंग?) इमारत ही भारतीय व्याख्या अमेरिकेतील अपार्टमेंट्सनी चुकीची ठरवली. दोन बेडरूम्स विथ ऍटॅच्ड बाथरूम्स, एक हॉल, आणि स्वयंपाकघर (२ बीएचके) च्या सदनिकेस अपार्टमेंट म्हणतात, ही व्याख्या मी अमेरिकेतच येऊन शिकलो. वास्तविक शिक्षण पूर्ण होईपर्यंत दैनंदिन जीवनक्रमात अंग टेकायला मिळणारी धर्मशाळा यापलीकडे अपार्टमेंटचे महत्त्व फारसे काही नाही. त्यातूनही दुर्दैवाची गोष्ट अशी, की धर्मशाळेत निदान फ़ुकटात तरी अंग टाकता येते; अपार्टमेंटमध्ये झोपायला आपल्याला भाडे द्यावे लागते. वर घरमालकांची करडी नज़र असतेच... ए सी नीट आहे ना, कार्पेटची नासधूस केलेली नाही ना, चारपेक्षा जास्त लोक घरात राहत नाहीत ना.....या सगळ्याला सांभाळत दिवस काढायचे. इकडे आलो, तेव्हा बाकीचे घरसोबती (शाळेतले ते शाळासोबती तसे एकाच अपार्टमेंटमध्ये राहणारे घरसोबती) आधीच येऊन त्यांनी एक अपार्टमेंट बुकही करून टाकले होते. त्यामुळे इथल्या कुणा सिनिअरकडे विस्थापितासारखे तात्पुरते राहण्याची पाळीही आली नाही. आणि वसाहतीतील सगळ्यात स्वस्त अपार्टमेंट मिळाले म्हणून सगळेच खूश! बॅगा घेऊन आत पाऊल टाकले न टाकले तोच दोन सोफ़ासेट, दूरदर्शन संच, म्युझिक सिस्टम दृष्टीस पडल्यावर तर डोळ्यांत आनंदाश्रू तरळले! मात्र लवकरच "ये सब वो सुंदर, विक्रांत वगैरे लोगोंका है और यहांसे जानेवाला है" हे कळले, आणि हिरमुसायला झाले. नाही म्हणाला म्युझिक सिस्टम मालकीणबाईंची स्वतःची आहे, आणि ती घरातच राहणार आहे हे कळले, आणि फूल ना फुलाची पाकळीचे समाधान झाले.

जेटलॅग्ड अवस्थेतील पहिली झोप काढून दुसऱ्या दिवशी उठलो आणि आळोखेपिळोखे देत दार उघडून बाहेर गेलो. डोळे चोळून पाहिल्यानंतरही जेव्हा टमरेलच दिसेना, तेव्हा आपण चाळीत नसून अपार्टमेंट संस्कृतीमध्ये आहोत, याचा पहिला साक्षात्कार झाला. तसाच घरात येऊन बेडरुमाच्या कोपऱ्यातील विधिगृहातच 'विधी'पूर्वक सगळे करायचे ही समज़ूत पक्की केली आणि बाथरुमात शिरलो. बरे, मुंबईला असताना, उरलीसुरली झोप आत पूर्ण होण्यापूर्वीच बाहेरून गोखले दार ठोठवायचा आणि त्याच्या "चलाऽऽऽ" ला "ह्ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म" असे झोपून उठल्यावर आवाज़ाला जी नैसर्गिक धार येते, तिचे दणदणीत प्रत्युत्तर, आणि ज़ोडीला टमरेलभर पाणी त्याला ऐकू ज़ाईल इतपत वेगाने भस्सकन् ओतणे, अशा दुधारीने प्रत्युत्तर देऊन अस्मादिक बॅक टू घर. इथे तसे काही नाही. टू अँड अ हाफ़ बाथरूम म्हणजे काय हे बाहेरून कुणीच "चलाऽऽऽ" म्हणून ओरडले नाही की समज़ते. कारण आधीच आत कुणी असेल, तर दुसऱ्या बेडरुमातील विधिगृहात ज़ाता येते, किंवा अगदी वर्श्ट केसमध्ये तेही बिझी असेल, तर हॉलमधले अर्धे बाथरूम असतेच. वास्तविक हे जे अर्धे असते, त्याला बाथरूम म्हणणेही शास्त्रीयदृष्ट्या चुकीचे आहे. रोखठोक भाषेत फार फार तर त्याला "जेथे अंघोळ करता येत नाही असा संडास" असे म्हणता येईल आणि बेडरुमांतील विधिगृहांचीही तदनुसार जी करता येईल ती व्याख्या करता येईल. तांब्याभर पाणी मनसोक्त अंगावर घेणे, घसघसून साबण चोळणे आणि पाण्याच्या आवाज़ापेक्षाही मोठ्या आवाज़ात बाहेर ऐकू ज़ाईल इतक्या जोशात गाणे हेच आतापर्यंत अंगवळणी पडलेले. त्यामुळे शावर कर्टन लावलेले नाही, याची ज़ाणीव नाही; तशातच गरम-थंड पाणी कसे वापरायचे याचे ज्ञान नाही. जे दिसले ते रुचेल त्या बाज़ूला वळवले आणि शावर चालू झाला. भारतातून वर्षभरासाठी लागणारा हमामचा साठा आणल्याने शावरजेल कशाला वापरायचे?! अंघोळ उरकून नेहमीच्या सवयीने दोन हातांच्या अंगठ्यांवरून ज़ानवे फ़िरवत मुखाने गणपतीस्तोत्र चालू आणि हॉलमध्ये येरझाऱ्या. त्यातच "अबे साले ये क्या कर दिया यार!!!!!" अशी मित्राची किंकाळी ऐकून वर बेडरूममध्ये धावलो, तर बाथटबाच्या बाहेर माझ्या अंघोळीनंतर तयार झालेले तळे, आणि हातात ओलिचिंब झालेली स्वतःच्या शावरजेलची बाटली घेऊन उभा असलेला माझा बेडरुमी (अपार्टमेंटमध्ये एकत्र राहणारे ते रूमीज़ आणि जे एकच बेडरूम नि ऍटॅच्ड बाथरूम वापरतात, ते बेडरुमीज़) यांचे तसबिरीतल्या लक्ष्मीमातेप्रमाणे अगर सत्यनारायणाप्रमाणे झालेले दर्शन पाहून अमेरिकेतही माझ्या स्तोत्रपठणाचे सार्थक झाल्यासारखे वाटले. मग एका बाज़ूला माझ्या अमेरिकन अंघोळीबद्दलच्या (अ)ज्ञानाचा उद्धार आणि दुसऱ्या बाज़ूला शावर कर्टन्स म्हणजे काय, ते कसे, का वापरायचे, याबद्दलचे ज्ञानदान अशी दुहेरी शिक्षकी भूमिका बेडरुमीने पार पाडली. तळे उपसायचे काम अर्थातच मी केले.

जेवणाच्या (म्हणजे जेवायच्या नाही, जेवण तयार करायच्या!) पाळ्या ठरवल्यानंतर माझी पाळी होती, त्यावेळी स्वयंपाकघरात पदार्पण केले. कुकिंग रेंज, हॉटप्लेट वगैरे सगळे प्रकार नवीनच. सुदैवाने ते कसे वापरायचे, कुठले बटण कशासाठी कुठे वळवायचे, ओव्हन कसा वापरायचा, साफ़ करायचा वगैरे सगळ्या सूचना आयत्याच रेंजवरच लिहिलेल्या असल्याने फारशी अडचण आली नाही. तरीसुद्धा दोनवेळा कुकीज़ आणि चिकनचा कोळसा करून झालाच. सुदैवाने हे महापातक माझ्या एकट्याच्याच हातून घडले नसल्याने आम्हां चौघांची एकमेकांना सामुदायिक क्षमा मिळाली. अमेरिकन सरकारचे जनरल ऍम्नेस्टीचे धोरण आम्ही आमच्या अपार्टमेंटापासूनच राबवायला सुरुवात केली, असे म्हटले, तर ते वावगे ठरू नये. कार्पेटवर बसून जेवले, तर खरकटे आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे कार्पेट साफ़ कोण करणार, या भीतीने मांडी ठोकून जेवायची सवय मोडून, डायनिंग टेबलावर जेवायची सवयसुद्धा लावून घेतली. कुछ पाने के लिये (बहोत)कुछ खोना भी पडता है.

दिवसांमागून दिवस ज़ाऊ लागले - अभ्यासालाही आणि स्वयंपाकघरात साठत चाललेल्या कचऱ्यालाही. त्यांचे परस्परांशी असलेले समप्रमाण कचराकुंडीतून बाहेर येऊन फ़्रीज़ज़वळची मोकळी ज़ागा, आणि नंतर घराचा दरवाज़ा उघडून आत शिरल्याशिरल्या जो शू रॅक आहे तो, इथवर सगळीकडे दिसू लागले. पिझ्झा बॉक्सेस, दुधाचे गॅलन्स, टोमॅटो प्युरीचे कॅन्स, अंड्याची टरफ़ले आणि असंख्य कागद नि किचन टिशूज़ यांच्यासाठी नसबंदी योजना असायला हवी होती की काय, असे वाटू लागले. आणि ज़सज़सा अभ्यास वाढत ज़ातो, तसतसे फ़्रीज़मधले खाणेही कमी होत ज़ाते. भाज्या, फळे दिसेनाशी होतात. दुधाचा शेवटचा गॅलन चालू झाला, की दुसऱ्या दिवशी प्यायचे ग्लासभर दूध आदल्या रात्रीच ग्लासात ओतून त्यावर "रिज़र्व्ह्ड" असा अलिखित शिक्का उमटवावा लागतो. ज्याच्या हाती ससा तो पारधी, तसे ज्याच्याकडे ग्लासभर दूध तो सावकार! सिंकमध्ये पडलेली घासायची भांडी आणि नुसता स्वयंपाकघरातलाच नाही तर एकूणाच घरातला कचरा, ही अभ्यास आणि वेळेची कमतरता यांची अनौरस अपत्ये आहेत. त्यांचे पालनपोषण करण्याची ज़बाबदारी आमच्यासारखे "बाळाचे बाप ब्रह्मचारी" मोठ्या आनंदाने पार पाडत असतात. या सत्रात मोज़ून दोन वेळा व्हॅक्यूम क्लीनर बाहेर आला होता. गणपतीबाप्पा आले होते तेव्हा आणि कुठूनशी अवदसा सुचून मालकीण स्वतः घरभाडे वसूल करायला येणार होती तेव्हा. आणि त्या दिवशी चक्क चक्क स्वयंपाकघरातल्या कचऱ्याचीही योग्य ती सोय करण्यात आली होती, असे समज़ले. ("असे समज़ते", असे म्हणायचे कारण म्हणजे तशी सोय लावण्यात माझा सहभाग़ नव्हता आणि त्या संध्याकाळी घरात पाऊल टाकल्यावर मला शू ऱॅकज़वळचे दुधाचे गॅलन्स दिसले नव्हते)

डिसेंबरमध्ये सत्रसमाप्ती असते, त्यावेळी तसेच त्याआधीच्या नोव्हेंबरात हॉलमध्ये पुस्तके, आईस्क्रीमच्या न घासलेल्या वाट्या, बुरसटलेली पिझ्झा स्लाइस आणि मॅगीचे रिकामे पाकीट, कोकाकोलाचा चिकट ग्लास, आणि चार दिवस बाउलमध्येच तळाशी राहून दगड झालेली दालफ़्राय, सहासात चमचे, चहाचे दोन कप, मोबाईल फ़ोन्सचे चार्जर्स, लॅपटॉप्स, म्युझिक सिस्टम यांच्या एकांत एक गुंतलेल्या अनेक वायरी, दप्तरं आणि लेक्चर नोट्स, पंधरा दिवस धुवायच्या राहिलेल्या जीन्स नि चार-एक अंडरवेअर्स, कोणाचा कोणता हे ओळखू न येणारे स्वेटर्स नि सोबत कधीकाळी पांढरे असलेले बनियन्स, यांपैकी काहीही किंवा सगळेच दिसत असते. फक्त रूमीज़ दिसत नाहीत. कोण कधी घरात असते, कोण कधी येतो, कधी ज़ातो, कधी झोपतो, काही पत्ता नसतो. घरी आल्यावर दहा पायऱ्या चढून बेडरुममध्ये ज़ाणेही जिवावर आलेले असते. मग कार्पेटवर किंवा सोफ़्यावरच ताणून द्यायची. बाहेर वज़ा एक आहे की वज़ा दोन अंश सेल्सिअस तापमान आहे, याचा झोपेवर परिणाम होऊ द्यायचा नसतो; तर झोपायला मिळते आहे, यातच सुख मानायचे असते. बऱ्याचदा तर आज़ूबाज़ूचे मित्रमैत्रिणी त्यांच्या कचऱ्यासकट येऊन अभ्यास करताना दिसतात. आतापर्यंत पार्ट्या, टाइमपास नि धांगडधिंग्यांसाठी फिरकणाऱी ही मंडळीच अपार्टमेंटमधले भाडेकरू असल्यासारखे वाटू लागतात. बहुदा याची ज़ाणीव त्यांनाही असावी म्हणूनच की काय, पण त्यांच्यातल्याच एकाने या महिन्याचे घरभाडे शेअर करण्याचीही तयारी दर्शवली. त्यातून आम्ही या वर्षी सिनिअर झाल्याने आमचे अपार्टमेंट म्हणजे वसाहतीतील सांस्कृतिक केंद्र, शिक्षण व व्यवसाय मार्गदर्शन केंद्र, भारतीय विद्यार्थी समाजकल्याण केंद्र वगैरे बरीच केंद्रे झाले आहे. त्यामुळे या सुविधांचा विनाशुल्क लाभ घेणाऱ्या विद्यार्थीजनांसाठी आमचे अपार्टमेंट हाच दिवसाचा शेवटचा मुक्काम असतो....... दुसऱ्या दिवशी डिपार्टमेंटला ज़ाण्यापूर्वी.

मांडणीवावरसमाजजीवनमानराहणीप्रवासभूगोलदेशांतरराहती जागाशिक्षणमौजमजाप्रकटनविचारप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

पिवळा डांबिस's picture

12 Feb 2011 - 1:28 pm | पिवळा डांबिस

अगदी खरं!!
काय काय एकेक नमुने असतात बॅचलर अपार्टमेंटसमध्ये...
आम्ही युनिव्हर्सिटीत असतांना सहकुटूंब असल्यामुळे फॅमिली हाउसिंग या जरा बर्‍या वसाहतीत राहीलो....
"तुम्ही साले तिथे पाली हिलवर रहाताय भडव्यो! तुम्हाला आमचे हाल काय माहीती? निदान जरा पोटभर जेवायला तरी वाढा!!!" - इती आमचे बॅचलर मित्र!!)
याच मित्राने त्याच्या अपार्टमेंटला असलेल्या छताला एक भोक पाडलं होतं....
का? तर म्हणे वरच्या मजल्यावर रहाणार्‍या मुलीनी ह्यांच्या गलिच्छ रहाण्याबद्दल मॅनेजमेंटकडे तक्रार केली होती. आणि यांना ओरडा बसला होता.....
"अरे पण सिलींगला भोक कशासाठी?", माझा अज्ञ प्रश्न....
"त्याचं काय आहे माहितीये का?", मित्राचं उत्तर, "त्या **नी आमच्या विरुद्ध तक्रार केली ना, म्हणून आम्ही रात्र होईपर्यंत थांबतो आणि मग निजानीज झाल्यावर टेबलावर उभे राहून त्या भोकातून त्यांच्या अपार्टमेंटमध्ये सिगारेटचा धूर सोडतो. त्यांना कळत नाही की वास कुठनं येतोय ते!!! हॅ हॅ हॅ!!!!!!"
"अरे पण तू तर सिगरेट सुद्धा ओढत नाहीस ना?", पुन्हा मी अडाणी
"सो व्हॉट? रिव्हेन्ज इज रिव्हेन्ज!!!", पुन्हा ग्रेट मित्र...
"मी गाढव आहे, गाढव आहे, गाढव आहे!!!!!!", मी
"मग आता या रविवारी जेवायला बोलाव! आणि नुसतं डाळभातावर भागवू नकोस! वहिनीला सांग जरा चांगली सुरमई वगैरे कर म्हणून!!!"
:)
असा हा माझा मित्र आता एका कॉलेजचा डीन आहे.....
आणि तो इलिनॉयमध्ये कुठल्याही युनिव्हर्सिटी/ कॉलेजमध्ये माझं लेक्चर ठरवण्यासाठी मला सारखा आग्रह करत असतो!
फक्त त्याचं स्वत:चं कॉलेज सोडून!!!!!
:)

असुर's picture

12 Feb 2011 - 2:25 pm | असुर

आयायायाया... ब्याचलर लोकांच्या सगळ्या न सांगण्याजोग्या सवयी बेला बाहेर आणतायेत की! इतके दिवस आम्ही समजत होतो की गुप्ततेच्या अ‍ॅक्टान्वये या गोष्टी चार भिंतींबाहेर बोलायला परवानगी नाही!

सिंकमध्ये पडलेली घासायची भांडी आणि नुसता स्वयंपाकघरातलाच नाही तर एकूणाच घरातला कचरा, ही अभ्यास आणि वेळेची कमतरता यांची अनौरस अपत्ये आहेत
पटलंच! म्हणजे न पटून सांगतो कुणाला, माझ्याघरी ही दोन बाळं आत्तासुद्धा त्यांच्या जागी जायला किंवा थोडा वेळ तरी एकाच जागी स्वस्थ बसायला नकार देतायेत, अतिशय हट्टी हो!!! जितका आवरायचा प्रयत्न(?) करावा तितका कचरा वाढतो, आणि सिंकातली भांडीदेखील!

बेसनलाडू, खतरनाक!!!

--ब्याचलर-ए-असुर

शुचि's picture

13 Feb 2011 - 2:11 am | शुचि

शीSSSSSSSSS आम्ही बायका अशा रहात नाही. आम्ही खरच टापटीप असतो. तुम्ही पुरुष इतके अव्यवस्थित खरच रहाता?
गुरमित आणि मी शनिवारी सकाळी पोहे/उपमा काहीतरी चहाबरोबर करून , घर स्वच्छ करून, टापटीप करून (त्यात मग व्हॅक्युम, शॉवर कर्टन्स धुणे, बाथरूमची साफसफाई, ओटा, शेल्फ सगळं आलं) मग उंडारायला (पक्षी शॉपींगला) बाहेर पडायचो. संध्याकाळी आपापल्या खोलीत प्रार्थना. जर कोणी प्रसाद केला तर ती दुसरीच्या देवाला ही नेवैद्य दाखवणार. शॉपींगमध्येही "डीलस" शोधायचो आणि एकमेकींकरता आवर्जून लक्षपूर्वक कपडे खरेदी करायचो, अर्थात संमतीनेच. खूप वळण होतं आयुष्याला.
रविवार मात्र प्रायव्हेट दिवस. दोघी आपापल्या खोलीत अथवा कामात असायचो. मात्र खाणं एकमेकींकरता जरूर बनवायचो.

पैसा's picture

13 Feb 2011 - 1:04 pm | पैसा

शुचि, फक्त मुलेच असं वागतात असं नाही काही! माझ्या ओळखीची एक बाई पुण्याला नोकरीसाठी गेलेल्या तिच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलीकडे पहिल्यांदा गेली. त्या फ्लॅटमधे ही मुलगी आणि तिघी जणी मुली रहात होत्या.

कचरा काढायला कोणी तयार नाही म्हणून सबंध फ्लॅटभर केसांचे गुंतवळ पडल्याचं 'प्रेक्षणीय' चित्र या बाईने ऐकवलं! सिंकमधली भांडी आणि अस्ताव्यस्त कपडे याबद्दल तर काही बोलूच नको म्हणाली!

मुलूखावेगळी's picture

13 Feb 2011 - 10:47 pm | मुलूखावेगळी

शुची,
प्लीज माझ्या रुमवर येना बघायला. १ डाव