वॉशिंग्टन - नुकत्याच विकीलीक्सवर गोपनीय कागदपत्रांच्या प्रसिद्धीमुळे अमेरिकेत खळबळ उडालेली आहे. अमेरिकेच्या गृहखात्याने या घटनेचा धिक्कार केलेला असून राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणल्याचा दावा केला आहे. तर विकीलीक्सच्या मते अमेरिकन सरकारने महत्त्वाच्या बातम्या गोपनीयतेची सबब सांगून जनतेपासून लपवून ठेवल्या होत्या. या एकमेकांवरच्या चिखलफेकीच्या वातावरणात त्या कागदपत्रांमधून बाहेर येणाऱ्या सत्यांमुळे अमेरिकन सरकारची परिस्थिती अधिकच बिकट झालेली आहे.
आमच्या वार्ताहराने या कागदपत्रांचा अभ्यास केल्यावर एक सनसनाटी बातमी हाती लागली. ती म्हणजे ३_१४ विक्षिप्त अदिती ऊर्फ श्री. श्री. सौ. सौ. अदितीअम्मादेवी, ऊर्फ अदिती अवखळकर पाटील ऊर्फ जोजोकाकू ऊर्फ आज्जीबाई ऊर्फ दुर्बिटणेताई अशा अनेक 'जाली' नावांनी वावरणाऱ्या अदिती यांना अमेरिकेचा व्हिसा मान्य झालेला आहे, इतकंच नव्हे तर अमेरिकन सरकारने काही कारवाई केली नाही तर या शुक्रवारी त्या अमेरिकेत येऊन ठाकतील देखील.
ही बातमी प्रसिद्ध झाल्यावर जनसामान्यांत एकच गदारोळ उठला. कीप अमेरिका नॉइज पोल्यूशन फ्री डॉट कॉम ने सर्वात मोठा 'आवाज' उठवला आहे. वी लव्ह काम अॅंड क्वाएट डॉट कॉम वरही अशीच बोंब सुरू आहे. 'काहीच वर्षांपूर्वी इंग्लंडमधल्या एका शांत खेड्याचं काय झालं हे सर्वांनाच माहिती आहे. आम्हाला ते इथे व्हायला नको.' 'गो बॅक अदिती' अशा पोस्ट्स तिथे सर्रास दिसू लागल्या आहेत. अदिती यांच्या काड्यालावू कारवाया अमेरिकेत सुरू होऊ नयेत याबद्दल लोकांमध्ये एकमत आहे. अशा व्यक्तीला मुळात व्हिसा मिळतोच कसा असा प्रश्न सर्वजण उपस्थित करत आहेत. अमेरिकन सरकारने मुद्दामच त्यांना आमंत्रण दिलेलं असून हा प्रकार जगजाहीर होऊ नये यासाठी ते गोपनीयतेच्या वेष्टनात गुंडाळून ठेवलं असा एकंदरीत सूर दिसतो. किंबहुना अदिती यांच्या भारतातल्या कारवायांना अमेरिकेतील उच्चपदस्थांचा सक्रीय पाठिंबा होता असाही आरोप होतो आहे. अमेरिकेतील काही उच्चपदस्थांचा अदिती यांच्याशी घनिष्ठ संबंध आहे हीही बाब आता उघड झाली आहे.
या सर्व प्रकरणामुळे अमेरिकन सरकारची चांगलीच भंबेरी उडाली असून प्रकरण राज्यसचिव (गृहमंत्री) हिलरी क्लिंटन यांपर्यंत पोचलेलं आहे. त्यांनी आमच्या वार्ताहराला दिलेल्या मुलाखतीत पुन्हा एकदा विकीलीक्सचा निषेध केला. 'राष्ट्रीय महत्त्वाची गोपनीय कागदपत्रं प्रकाशित केल्याने सुरक्षेला धोका' हा मंत्र म्हणून दाखवला. मात्र राष्ट्रीय सुरक्षेला धोका असलेल्या अशा गोष्टी दडवून का ठेवल्या गेल्या हे विचारल्यावर मात्र त्यांनी सारवासारव केली. 'अदिती यांना कदाचित नजरचुकीने व्हिसा दिला गेला असावा. त्यांनी व्हिसासाठी अर्ज करताना 'संहिता जोशी' या नावाखाली केला. त्यामुळे ही गफलत झाली असावी. सरकार युद्धपातळीवर या घटनेचा मागोवा घेत आहे' असं सांगितलं. अदिती यांना व्हिसा मिळण्यातल्या धोक्याची कल्पना आहे का, असं विचारल्यावर त्या म्हणाल्या 'अर्थातच. अमेरिकन जनतेची शांतताप्रियता मला ठाऊक आहे. किंबहुना बराक ओबामा भारतात गेले होते तेव्हा महिनाभर आधी व त्यानंतरही अदिती हा शब्द असलेल्या मेल्स, फोनसंभाषणं, व चॅट मेसेजेस आम्ही टॅप करत होतो. पण दुर्दैवाने आमचा सर्व्हर तेवढ्यानेच भरून गेला व ओबामांच्या सुरक्षिततेसाठीच्या कारवायांना जागा कमी पडणार की काय अशी भीती वाटली. म्हणून आम्ही काही काळापुरते भारतातले सर्व्हरच बंद पाडून टाकले' (मिपाचा सर्व्हर चारपाच दिवस बंद पडण्यास नक्की जबाबदार कोण यावर आता कदाचित प्रकाश पडेल!)
दरम्यान भारतात या बातमीमुळे आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. विशेषतः पुण्यात तर जल्लोष सुरू झालेला आहे. 'अदिती गावकुसाबाहेर राहतील अशी व्यवस्था केली होती, पण तरीही त्या पूर्णपणे दूर जाणार हे ऐकून सुटकेचा निश्वासच टाकते' अशी प्रतिक्रिया मिळाली. कुठच्याशा पूज्य व्यक्तिमत्वाबद्दल हीन लेखन करण्यास एका पाश्चात्य लेखकाला पुणे युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीची मदत झाली होती त्याबद्दल शिक्षा म्हणून कुठच्याशा सेनेने त्यांना युनिव्हर्सिटीमध्ये नोकरी द्यायला लावली होती, असं आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून समजतं. 'खरं तर आम्ही त्यावेळी - यापेक्षा युनिव्हर्सिटीची थोडी तोडफोड वगैरे करा - असं म्हणत होतो' पुणे युनिव्हर्सिटीचे कुलगुरु नाव जाहीर न करण्याच्या अटीवर म्हणाले. 'पण हरकत नाही. हा काळा काळ संपला एकदाचा. यावर्षी नव्या वर्षाचं स्वागत समारंभ ३ डिसेंबरलाच सुरू होईल. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना व स्टाफला आठवड्याची सुटी जाहीर करण्यात आलेली आहे.' सर्वसामान्य लोकांनीही गावभर दिवाळीचे उरलेले - सचिनचं पन्नासावं शतक होईल तेव्हा वापरायचे म्हणून ठेवलेले - फटाके वाजवायला सुरूवात केली आहे. 'आदर्श घोटाळा, टु जी घोटाळा वगैरे छप्पन्न घोटाळे या चांगल्या बातमीवर कुर्बान' असंही काहींनी म्हणून दाखवलं - अर्थातच नाव जाहीर न करण्याच्या अटीवर.
आम्हाला आतल्या गोटातून मिळालेल्या बातमीनुसार अदिती यांचं भावी अमेरिकागमन हे मुळीच गुप्त नव्हतं. किंबहुना अदिती यांनीच मी जाणार, जाणार असा धोषा लावला होता. आपलं व्हिसा प्रोसेसिंग कसं चालू आहे याबद्दलच्या बित्तंबातम्या काहीशा अनाहुतपणेच त्या आसपासच्या लोकांकडे जाहीर करत होत्या. तो अर्थातच 'आपणही अमेरिकेला चाललो हे दाखवून देण्याचा क्षीण प्रयत्न' होता याबद्दल कोणाला शंका नाही. पण इतकं उघड गुपित अमेरिकन सरकारला ठाऊक नसावं हे विश्वासार्ह वाटत नाही.
एकंदरीत अमेरिकन सरकारचं - काड्याघालू कारवाया करणाऱ्यांचा जाहीरपणे धिक्कार करायचा पण प्रत्यक्षात त्यांना मदतच करायची - असं दुटप्पी धोरण पुन्हा उघडकीला आलं आहे यात वाद नाही. यामुळे गोपनीयता व सरकारची लबाडी याबद्दलचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. इतक्या उच्चपदस्थांचे हितसंबंध गुंतले गेले असल्यामुळे आम्हाला सरकार काहीही कारवाई करणार नाही व अदिती अमेरिकेत येऊन पोचणार याबद्दल काडीमात्र शंका नाही. तेव्हा आम्हीही त्यांचं आगाऊ(पणे) अभिनंदनच करतो. पण या राजकीय साठमारीत सामान्य हिरवं गवत भरडलं जावं तशी हिरवी जनता भरडली जाते. पण ते तर कायमच होत आलं आहे. कालाय तस्मै नमः - आणखीन काय लिहिणार?
तुम्हाला व्यक्तिशः या घटनेविषयी काय वाटतं ते जरूर लिहा.
प्रतिक्रिया
1 Dec 2010 - 10:18 pm | धनंजय
उगवतीच्या राज्यांमध्ये "गोल"माल होण्याची अपेक्षा की अस्तांचलात? का हिरव्या देशाच्या लालेलाल काळजावरच घाव घालण्याचा बेत आहे?