Paths of Glory

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
14 Sep 2010 - 1:52 pm

काही चित्रपट पाहुन झपाटल्यासारखे होते. मंत्रमुग्ध झाल्यासारखे वाटते. आपण नि:शब्द होतो. स्टेनली कुब्रिक दिग्दर्शित पाथ्स ऑफ ग्लोरी हा असाच एक चित्रपट. लोलिता, आइज वाइड शट, क्लोकवर्क ऑरेंज असे एकापेक्षा एक वादग्रस्त आणि भडक चित्रपट बनवणार्‍या कुब्रिकने पाथ्स ऑफ ग्लोरी सारखी दर्जेदार कलाकृती देखील सादर केली आहे.

पाथ्स ऑफ ग्लोरी याच नावाच्या Humphrey Cobb लिखीत कादंबरी वर आधारीत आहे. चित्रपटाला पहिल्या महायुद्धातील जर्मनी आणि फ्रान्स यांच्यामधल्या एका लढाईची पार्श्वभूमी आहे. पण हा युद्धपट मात्र नाही. लढाईमागचे राजकारण हाच या चित्रपटाचा विषय आहे.

युद्ध जिंकण्यासाठी वेळप्रसंगी सामान्य सैनिकांचे कसे बलिदान दिले जाते आणि त्यामागे कसे राजकारण खेळले जाते याचे चित्रपटात अतिशय सुरेख सादरीकरण केलेले आहे.

बराकीत खुराड्यात राहुन जर्मन सेनेपासुन स्वतःचे कसेबसे रक्षण करत उभी असलेली, उमेद खचलेली तरीही जिद्दीने उभी राहिलेली एक फ्रेंच सैनिकांची तुकडी काही अधिकार्‍यांच्या स्वार्थप्रेरीत अति महत्वाकांक्षी योजनेला बळी पडते किंवा पाडली जाते आणि तेथुनच पुढे सुरु होते वैयक्तिक हितसंबंध गोंजारण्यासाठी सुरु केलेली काही मुठभर अधिकार्‍यांची धडपड.

जनरल ब्रुलार्डची नियुक्ती जर्मन सेनेला फ्रान्सच्या हद्दीत पुढे येण्यापासुन रोखण्यासाठी झालेली असते. प्रत्यक्ष जबाबदारी मात्र त्याच्या हाताखालील पण तेवढ्याच तोलामोलाच्या जनरल मिराउ वर असते. जनरल ब्रुलार्डची अ‍ॅण्ट हिल या अतिशय मोक्याच्या ठाण्यावर हल्ला करुन तिथुन जर्मन सेनेला हुसकावुन लावुन तो परत कब्जात घेण्याची महत्वाकांक्षी योजना असते. अर्थात त्याची जबाबदारी जनरल मिराउ ने स्वतःच्या डोक्यावर घ्यावी अशी त्याची इच्छा असते. जनरल मिराउ मात्र ठाम नकार देतो. आपले सैन्य थकले आहे आणि सोपवण्यात आलेली कामगिरी अशक्यप्राय नसुन केवळ अशक्यच आहे अशी त्याच्या खात्री असते. अपुर्‍या सैन्यानिशी आणि सामग्रीनिशी हल्ला करणे, ठाणे बळकावणे आणि ते राखणे केवळ अशक्य आहे हे तो जनरल ब्रुलार्डला तळमळीने सांगतो. मात्र सैन्यात मुरलेला आणि राजकीय डावपेच कोळुन प्यालेला ब्रुलार्ड मिराउला बढतीचे गाजर दाखवतो आणि ही मात्रा अचुक लागु पडते. कामगिरी अशक्यप्राय आहे पण म्हणजे माझे सैन्य ती पार पाडु शकत नाही असे मात्र नाही. माझ्या सैनिकांनी यापुर्वी देखील अशक्यप्राय कामगिरी फत्ते करुन दाखविली आहे हे तो अभिमानाने सांगतो. एका अधिकार्‍याच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी सैन्याची एक आख्खी तुकडी पणाला लावली जाते.

खुराड्यामध्ये, जर्मन सैन्याच्या सततच्या बॉम्बफेकीमुळे घायाळ होत फ्रेंच सैन्य कसेबसे तग धरुन असते. जिवाच्या आकांताने आपळे ठाणे लावुन धरत असते आणि त्यावेळेस हे दोघे जनरल मात्र स्वतःच्या आलिशान ऑफिसमध्ये बसुन सैन्याचा जीवाचा डाव लावत असतात. अर्थातच युद्ध आलिशान ऑफिसमध्ये बसुन आणि लाळघोट्या समर्थकांवर विसंबुन जिंकता येणार नसते त्यामुळे जनरल मिराउची पुर्ण भिस्त पेशाने वकील असलेल्या पण युद्धकाळात सैन्यात भरती होउन प्रत्यक्ष युद्धक्षेत्रावर मर्दुमकी गाजवुन सैन्याचे मन जिंकुन घेणार्‍या कर्नल डॅक्स वर असते.

मिराउ जेव्हा डॅक्स ला आपली योजना सांगतो तेव्हा मात्र डॅक्स त्याला पुर्ण विरोध करतो. बढती, मान सन्मान, खोटी प्रशंसा या कशालाही बळी न पडणारा डॅक्स अखेर आपल्या तुकडीला सोडुन जाउन विश्रांती घेण्याच्या आज्ञेला बळी पडते. जनरल ब्रुलार्ड प्रमाणेच मिराउदेखील इथे आपले सगळे राजकीय डावपेच खेळतो आणि केवळ आपल्या सैनिकांच्या प्रेमापोटी आणि काळजीपायी डॅक्स ही कामगिरी स्वीकारतो.

प्रत्यक्ष युद्धापुर्वी डॅक्स आपल्या ३ सहकार्‍यांना टेहेळणीसाठी पाठवतो. मात्र मोहिमेचे नेतृत्व करणारा लेफ्टनंट रो़जेट दारुच्या नशेत घाबरुन जाउन मोहीम अर्धवट सोडुन पळुन जाउ लागतो. पळुन जाण्यापुर्वी शत्रु समजुन तो टेहेळणीसाठी पुढे गेलेल्या आपल्याच एका सहकार्‍याला बॉम्बने उडवतो. मोहिमेतील तिसरा सहकारी कोर्पोरेल पॅरीस त्याच्या या गोष्टीसाठी निर्भत्सना करतो. पण रोजेट त्याला पटवुन देतो की त्याने तोंड बंद ठेवणेच त्याच्यासाठी योग्य राहील. रोजेट अखेर खोटा अहवाल डॅक्स ला सादर करुन सर्व खापर मेलेल्या (त्यानेच मारलेल्या) सहकार्‍यावर फोडुन मोकळा होतो.

डॅक्स अखेर प्रत्यक्ष मोहिमेची आखणी करतो आणि सैन्याला युद्धाचा आदेश देतो. मात्र ऐन युद्धाच्या दिवशी मोक्याच्या जागी बसलेले शत्रु सैन्य डॅक्सच्या सैन्याचा पार धुव्वा उडवते. कित्येक मरतात, कित्येक जायबंदी होतात. आणि या सर्व प्रकरणात रोजेटच्या नेतृत्वाखालील जी तुकडी डॅक्स ला कवर देणार असते ती तर चक्क बंकर मधुन बाहेरच पडु शकत नाही. अखेर डॅक्स स्वतः येउन त्या तुकडीला बंकरबाहेर काढायचा प्रयत्न करतो. त्यावेळेसा त्याचाच एक पुढे गेलेला सहकारी त्याच्या अंगावर कोसळतो. आणि बाहेर पडने केवळ अशक्य आहे हे डॅक्स ला कळुन चुकते. या सर्व प्रकारात डॅक्स चे सैन्य जर्मन ठाण्याच्या तारेच्या कुंपणापाशीदेखील पोचुअ शकत नाही. हे पाहुन मिराउ उखडतो आणि आपल्या सैन्याला पुढे जायला प्रवृत्त करण्यासाठी त्यांच्यावरच तोफा डागण्याचे आदेश देतो. मात्र संबंधीत अधिकारी लिखीत स्वरुपात दिल्याशिवाय हा आदेश मानायला नकार देतो. यात सहसैनिकांचे प्राण वाचवायचे हा उदात्त विचार नसुन "युद्धात तुम्ही मेलात तर लिखीत आदेश नसताना मी असे काही केले तर माझे काय होइल" असा प्रतिप्रश्न तो अधिकारी मिराउला विचारतो. या सर्वाची अखेर डॅक्सच्या तुकडीची मानहानीकारक माघार घेण्यात होते.

आपल्या डोळ्यांदेखत आपल्या बढतीची अशी वाट लागलेली बघुन मिराउचा तिळपापड होतो. आणि तो डॅक्सला त्याच्या सैन्यातील १०० जणाचे कॉर्टमार्शल करुन गोळ्या घालुन देहदंड द्यायचा आदेश देतो. असे केल्यामुळे दहशत बसुन पुढच्या वेळेस सैन्य जीवाची पर्वा न करता पुढे जाइल असे त्याचे म्हणणे असते. जनरल ब्रुलार्डला मिराउच्या अधिकारक्षेत्रात हस्तक्षेप करायचा नसतो. तरीही तो १०० जणांऐवजी ३ जणांनाच देहदंड देण्यासाठी मिराउचे मन वळवतो. मिराउ मात्र निर्लज्जपणे १०० ऐवजी ३ हे खुपच कमी होते आहे असे मत व्यक्त करतो. डॅक्स त्यातुनही कॉर्टमार्शल पुर्वी योग्य ती सुनावणी व्हावी अशी हमी ब्रुलार्ड कडुन मिळवतो.

अखेर प्रत्येक कंपनी कमाडरला स्वत:च्या कंपनी मधुन एक माणुस कॉर्ट मार्शल साठी निवडण्यास सांगण्यात येते. एक कमांडर प्रायवेट फेरोलचे नाव सुचवतो कारण त्याच्यामते फेरोल फारसा लोकांत मिसळणारा नसतो. तर लेफ्टनंट रोजेट कोर्पोरेल पॅरीसचे नाव सांगतो की ज्यायोगे रोजेटेने स्वतःच्या सहकार्‍याला घाबरुन जाउन मारले आहे हे गुपीत कोणालाही कळु नये. तर तिसरे नाव अर्नोल्डचे पुढे येते जो सैन्यातील सर्वात शूर आणि लढवय्या सैनिकांपैकी एक असतो. अर्नोल्ड्चे नाव चिठ्ठ्या टाकून काढले जाते. एकुण अतिमहत्वाकांक्षी आणि अव्यवहार्य अश्या योजनेसाठी ३ सैनिकांना अतिशय निर्दयपणे बळीचा बकरा बनवण्यात येते. डॅक्स जीवाची बाजी लावतो. मिराउने आपल्याच सैनिकांवर हल्ला करण्याचे आदेश दिले होते हे वृत्तपत्रांना कळाले तर तुमची नाचक्की होइल असे सांगुन ब्रुलार्डला ब्लॅकमेल देखील करुन बघतो. पण अखेर त्याचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरतात. चौकशीचा फार्स घडवुन आणुन अखेर मिराउ तिघांना देहदंडाची शिक्षा सुनावतो. व्यथित झालेला डॅक्स मुकाटपणे ती आज्ञा पाळतो. रोजेटने पॅरीसचे नाव का सुचवले हे एव्हाना त्याला कळालेले असते त्यामुळे तो उपरोधिकपणे रोजेटलाच देहदंडाची कार्यवाही पार पाळण्याचे आदेश देतो. काम सोप्पे असते. गोळ्या घातल्यावर तुला फक्त जाउन तिघेही मेले आहेत की नाही हे बघायचे आहे आणि नंतर तिघांच्याही डोक्यात एक एक गोळी मारायची आहे असे त्याला कुत्सितपणे सांगतो.

हे संपुर्ण प्रकरण इतक्या प्रभावीपणे चित्रीत केले आहे की शेवटपर्यंत आपण आशा करत असतो की ऐनवेळेस ब्रुलार्डचे मतपरिवर्तन होइल आणि तो देहदंड माफ करेल. परंतु अखेर तिघांनाही देहदंड होतोच. फेरोल रडतभेकत तर पॅरीस धीरोदात्तपणे मृत्युला सामोरा जातो. अर्नोल्डला तर चक्क बेशुद्धावस्थेतच देहदंड देण्यात येतो. अखेर अधिकार्‍यांच्या राक्षसे महत्वाकांक्षेपायी आणि वैयक्तिक मानापमान आणि हेव्यादाव्यांपोटी ३ शूर शिपाई पळपुटेपणाच्या आरोपाखाली बळी दिले जातात.

देहदंड दिला गेल्यानंतर ब्रुलार्ड पद्धतशीरपणे आपल्याच सैन्यावर हल्ला करण्याचा अमानवी आदेश दिल्याबद्दल मिराउला चौकशीला सामोरे जावे लागेल असे सांगतो. चौकशी केवळ नावापुरती असेल अशी पुस्तीदेखील जोडतो. पण मिराउला देखील समजुन चुकते की आता त्याचा सुद्धा बळी जाणार. ब्रुलार्ड मिराउची जागा डॅक्स ला देउ करतो. आणि तु पद्धतशीरपणे नाहीतरी त्याच्यासाठी प्रयत्न करतच होतास असेही त्याला ऐकवतो. पळपुटेपणासाठी तिघांची शिक्षा रोखली नाही तसेच मिराउला बाजुला करुन त्याची जागा मी तुला देउ करतो आहे यातुन माझी न्यायी वृत्तीच दिसते आहे अशी मखलाशीही करतो. हे सगळे करुन डॅक्स तिघांना गैरप्रकारे देहदंड दिल्याबद्दल वरपर्यंत जाउन त्याची तक्रार करणार नाही हे तो जाणुन असतो. डॅक्स मात्र या सगळ्या प्रकाराने व्यथित झालेला असतो. तुला न्याय कळलाच नाही हे सांगुन तो ब्रुलार्डची योजना नाकारतो.

व्यथित होउन परतत असताना त्याचे सैनिक पकडुन आणलेल्या एका जर्मन तरुणीची हुर्यो उडवत असलेली पाहुन डॅक्स अजुन व्यथित होतो. त्या तरुणीचे भविष्य अखेर त्याला कळुन चुकलेले असते. आपल्या ३ मित्रांची हत्या ते सैनिक विसरलेले देखील असतात. युद्धामुळे जणु त्यांच्या संवेदना जणु बधीर झालेल्या असतात मृत झालेल्या असतात. उरलेली असते फक्त वासना. त्याचे सैनिक त्या तरुणीला अखेर गायला लावतात. केवळ मजा म्हणुन. पुढची "कामगिरी" सुरु करण्यापुर्वीचा केवळ एक खेळ. मात्र तिचे गाणे सुरु होते आणि त्या आवाजाने त्यातील आर्ततेने वंश, भाषा, देश या सर्वांची बंधने गळुन पडतात. सगळे सैनिक तिच्याबरोबर गाउ लागतात. युद्धाच्या आणि त्यातील राजकाराणाच्या काळ्या पार्श्वभूमीला सैनिकांच्या सहृदयतेची एक रुपेरी किनार असते. चित्रपट येथेच संपतो.

किर्क डग्लस आणि अ‍ॅडोल्फ मेन्जु या जुन्या काळच्या अभिनेत्यांनी चित्रपटात कर्नल डॅक्स आणि जनरल ब्रुलार्ड यांच्या व्यक्तिरेखा अतिशय प्रभावीपणे सादर केल्या आहेत. अ‍ॅण्टी वॉर प्रकारात मोडणारा हा चित्रपट कुब्रिकने अतिशय प्रभावीपणे सादर केलेला आहे. युद्धाची निष्फळता आणि प्रत्येकासाठी युद्ध करण्याचे असलेले वेगवेगळे कारण आणी त्यामगचे राजकारन कुब्रिकने अतिशय प्रभावीपणे सादर केले आहे. त्यामुळेच असेल कदाचित बरीच वर्षे हा चित्रपट प्रसारित करण्यासाठी बर्‍याचा युरोपीय देशात बंदी होती. ती आताआता उठली.

प्रत्येकाने जरुर पहावा असा चित्रपट एवढेच म्हणेने

कलाइतिहाससमाजराजकारणचित्रपटप्रकटनविचारलेखअनुभवआस्वादसमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Sep 2010 - 2:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

उत्तम चित्रपटओळख!

कुब्रिकचाच Dr. Strangelove or: How I Learned to Stop Worrying and Love the Bomb हा चित्रपट बघितला नसशील तर जरूर पहा. हा चित्रपट त्या काळी वादग्रस्त असू शकेल पण भडक नक्कीच नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

14 Sep 2010 - 2:28 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त ओळख रे मृत्युंजया.
वॉर मुव्ही बिलकुल आवडत नाहीत. पण तु येवढे प्रभावी लिहिले आहेस की एकदा नक्की बघिन हा चित्रपट.

अब् क's picture

14 Sep 2010 - 2:52 pm | अब् क

मस्तच!!!!!!मस्तच!!!!!!मस्तच!!!!!!मस्तच!!!!!!मस्तच!!!!!!मस्तच!!!!!!

रमताराम's picture

14 Sep 2010 - 4:26 pm | रमताराम

प्रत्ययकारी ओळख.
अवांतरः कुब्रिकचीच प्रसिद्ध ओडिसी विसरलात काय भाऊ?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Sep 2010 - 5:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अरे बाप रे 'ओडीसी'!
तो पिच्चर पहाताना तीन विकेट्स गेल्या होत्या ... मी आणि पिच्चर पहाणारे इतर दोन महाभाग जागच्या जागी झोपलो!! पंधरा मिनीटातच पावर न्याप पूर्ण झाल्यामुळे पुढचा पिच्चर बंद केला आणि पुन्हा एकदा डॉ. स्ट्रेंजलव्ह पाहिला.

मृत्युन्जय's picture

14 Sep 2010 - 5:21 pm | मृत्युन्जय

हीहीहीही. मग कुब्रिकची प्रसिद्ध ओडीसी असे म्हणण्याऐवजी कुप्रसिद्ध ओडीसी असे म्हणले पाहिजे.

मी पाहिलेला नसल्यामुळे माझा पास. मी त्यचे ४च चित्रपट पाहिले. खराखुरा आवडलेला हा एकमेव. खराखुरा हा शब्द ठळक का केला याबद्दल कृपया प्रश्न विचारु नयेत.

रमताराम's picture

14 Sep 2010 - 5:40 pm | रमताराम

आमचीही तीच अवस्था होती पहिल्या वेळी पाहिला तेव्हा. पण वर जो दुवा दिला आहे तो पहा नि मग चित्रपट पुन्हा एकवार पहा, कदाचित आवडेल. (शेवट आम्हाला बिलकुल आवडला नाही, पण ते असो.)

गणेशा's picture

14 Sep 2010 - 5:53 pm | गणेशा

त्यामुळे चित्रपट नक्कीच पाहिन

-

सुनील's picture

14 Sep 2010 - 9:24 pm | सुनील

फार सुंदर ओळख करून दिली आहे.

विलासराव's picture

14 Sep 2010 - 11:09 pm | विलासराव

बघेन म्हणतो.

पुष्करिणी's picture

14 Sep 2010 - 11:48 pm | पुष्करिणी

सुंदर ओळख .

इन्द्र्राज पवार's picture

15 Sep 2010 - 12:47 am | इन्द्र्राज पवार

"युद्धाच्या आणि त्यातील राजकाराणाच्या काळ्या पार्श्वभूमीला सैनिकांच्या सहृदयतेची एक रुपेरी किनार असते."

~~ श्री.मृत्युंजय यांच्या विलक्षण प्रभावी सादरीकरणाने हा चित्रपट पाहाण्याची उर्मी जागृत तर झालीच पण एखादा कल्पक दिग्दर्शक देशादेशातील युद्धे आणि युद्धातील विफलता दाखविताना पात्रांच्या स्वभावाचे जे पैलू समोर आणतो ते कसे अनुभवन्यासारखेच असतात, ही बाबदेखील समजली. वरील वाक्य कुब्रिकचे यश तर अधोरेखीत करतेच पण त्याचबरोबर त्या निमित्ताने हायर आणि लोअर लेव्हलला खेळले जात असलेले तिडीक आणणारे राजकारण आणि त्याचे खोलवर उमटणारे परिणाम प्रकर्षाने दाखविते. ऑलिव्हर स्टोनच्या "प्लटून" मध्ये याच्यापेक्षा जास्त वेगळे काय होते? तर युद्धादरम्यानची सैनिकातील 'सहृदयता' दाखविण्यासाठी स्टीव्हन स्पिअलबर्गने 'सेव्हिंग प्रायव्हेट रायन' मध्ये काही प्रमाणात क्युब्रिकच्या याच चित्रपटाची प्रेरणा घेतली होती. [स्पिअलबर्गने 'पाथस ऑफ ग्लोरी' हा त्याला सर्वात आवडलेला क्युब्रिकचा चित्रपट असा उल्लेख केला आहे.]

याच फ्रान्सने १९४३-४४ च्या सुमारास अल्जीअर्स आणि मोरोक्कोच्या तरूणांना 'फ्रान्सला वाचविले तर तुम्हाला किती उज्ज्वल भविष्य आहे...' याचे त्या दोन देशात जावून उद्याचे गाजर दाखविले. द गॉल या सेनानीला मानणारे या दोन देशातील हजारो सैनिक घरदार, पारंपारिक शेतीची कामे सोडून फ्रेंच सैन्यात भरती झाले...त्यांच्या खांद्याला खांदा लावून जर्मनांच्याबरोबर कडा मुकाबला केला....युद्ध जिंकण्यात मोलाचा वाटाही उचलला...पण शेवटी या शूर सैनिकांच्या वाट्याला जी उपेक्षा आली ती केवळ दुर्दैवी अशीच म्हणावी लागेल. युद्ध समाप्तीनंतर लबाड फ्रेंच वरिष्ठ अधिकार्‍यांनी अल्जिअर्स आणि मोरोक्कोंच्या कोणत्याही सैनिकाला 'प्रमोशन' दिलेच नाही, पण द गॉलच्या निधनानंतर सत्तेवर आलेल्या सरकारने या हजारो सैनिकांच्या पेन्शनीही बंद करून टाकल्या. अगदी इ.स.२००० पर्यंत हलाखीत आयुष्य काढणारे जराजर्जर वृद्ध त्या सरकारकडे न्यायाची भीक मागत होते.

"अ‍ॅण्टी वॉर प्रकारात मोडणारा हा चित्रपट कुब्रिकने अतिशय प्रभावीपणे सादर केलेला आहे."
असे जे वाक्य वरील लेखनात आहे, त्याला कारण स्वतः क्युब्रिकलादेखील युद्धसमाप्तीनंतर खेळल्या गेलेल्या राजकारणाची जाणीव होतीच.

असो...एका प्रभावी लिखाणाबद्दल श्री.मृत्युंजय यांचे आभार !

इन्द्रा

मृत्युन्जय's picture

15 Sep 2010 - 9:53 am | मृत्युन्जय

धन्यवाद. मला तर माझ्या लेखापेक्षा तुमचा प्रतिसादच जास्त आवडला :)

इन्द्र्राज पवार's picture

15 Sep 2010 - 10:41 am | इन्द्र्राज पवार

".....प्रतिसादच जास्त आवडला."

~~ अहो असे अजिबात म्हणू नका. मी तर म्हणेन तुम्ही ज्या उत्कटतेने त्या चित्रपटाबद्दल लिहून तवा तापता केला त्यावर मी आयती भाकरी भाजली. बस्स, इतपतच. शेवटी 'कला' महत्वाची, 'कुसर' नव्हे.

इन्द्रा

दिपक's picture

15 Sep 2010 - 9:30 am | दिपक

मस्त लिहिले आहे. परत एकदा वॉर मुव्हीज चे भुत मानगुटीवर बसेल बहुतेक. स्टेनली कुब्रिक चा ’फुल मेटल जॅकेट’ आणि ’द शाईनींग’ आवडला होता.

आनंदयात्री's picture

15 Sep 2010 - 11:04 am | आनंदयात्री

मस्त रे मृत्युंजया. चित्रपट नक्की बघेन.

प्रमोद्_पुणे's picture

15 Sep 2010 - 3:07 pm | प्रमोद्_पुणे

लिहिले आहेस रे.. सी डी असेल तर दे मला..

भ ट क्या खे ड वा ला's picture

2 Sep 2017 - 9:27 am | भ ट क्या खे ड वा ला

इंग्रजी चित्रपट फारसे पाहिलेले नाहीत .. पण असे छान लेख वाचले कि माहीती मिळते व बघावेसे वाटतात ..
काय काय करायचं .. राहुन जातय बरचं काही

diggi12's picture

2 Sep 2024 - 7:41 pm | diggi12

The Siege of Jadotville. मध्ये पण राजकीय खेळ्या मुळे सैनिकांची होणारी परिस्थिती दिसून येते.