दोन कोल्ह्यांची (इसापनीतीबाहेरील) सुरस कथा!

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
19 Oct 2009 - 11:18 am

मी सध्या Nuclear Deception हे Adrian Levy-Cathy Scott-Clark लिखित पुस्तक वाचत आहे. सध्या फक्त २० टक्केच वाचून झालेय. पण या भागात जे वाचले त्यावरून दोन गोष्टी ल़क्षात येतात त्या इथं मांडाव्याशा वाटल्या म्हणून हे लिहितोय.
(१) रोनाल्ड रेगन यांची हॉलीवूडमधील एक अभिनेता म्हणूनची कारकीर्द कितीही अयशस्वी झाली असो, पण राष्ट्रपती या भूमिकेत त्यांनी जे आपलं अभिनयकौशल्य दाखविलं ते असामान्यच होतं असे म्हणावं लागेल. चेहरा 'सरळ' ठेवून इतकं धादांत खोटं बोलण्याचं त्यांचं प्राविण्य फारच श्रेष्ठ दर्जाचं होतं यात शंका नाहीं (त्याचा वापर भारताच्या विरुद्ध केला गेला म्हणून "कौतुकास्पद" म्हणवत नाही हे मात्र खरं!). रेगन यांना सोवियेत यूनियन "संपविण्या"चं श्रेय दिलं जातं. ते बरोबर आहे का? त्यात "पैशाचे सोंग आणता न ये" याचा रशियाला आलेल्या अनुभवाचा भाग किती व रेगन यांच्या नेतृत्वाचा भाग किती हा चर्चेचाच विषय ठरेल. तेलाच्या किमती कडाडून "खिशात चार चव्वल" खुळखुळू लागताच पुतीन-मेडवेडेव या द्वयींची भाषा/सूर बदलू लागलाय हे आपण पहातोच आहोत. (अमेरिकास्थित मिपा सभासदांचं या विषयावरील वाचन जास्त सखोल असेल. त्यांनीही या विषयावरील प्रतिसादात भर घालावी ही विनंती. कारण मी कितीही प्रयत्न केले असले तरी माझं वाचन एकतर्फी असण्याची शक्यता नाकारता येत नाहीं. खरं तर मला अमेरिकन लोक खूप आवडतात, पण अमेरिकन लोक आणि अमेरिकन सरकार यांत खूप फरक आहे.)
केवळ अफगाणिस्तानवरील रशियन आक्रमण परस्पर पाकिस्तानी रक्त सांडून परतविण्यासाठी या गृहस्थानं पाकिस्तानचे असामान्य लाड केले, त्या राष्ट्राला अणूबॉंब बनविण्याचे तंत्रज्ञान दिलं, त्यासाठी पाकिस्ताननं अमेरिकन कायद्यांचा भंग करून निषिद्ध "हाय-टेक" वस्तू त्यांच्या निर्यातीचा परवाना नसतानाही आयात केल्या तिकडे केवळ काणाडोळा केला इतकंच नव्हे तर त्यांच्या कस्टम्स् खात्यानं अशी तस्करी करतांना रंगे-हात पकडलेल्या पाकिस्तानी मुलकी व लष्करी चोरांना त्यांच्यावरचे आरोप सौम्य करवून (dilute) त्यांना पाकिस्तानमध्ये परत जाऊ दिलं. एका बाजूने तस्करी करण्याच्या घटनांना सर्रास गुप्त संमती देत असतांनाच अमेरिकन कॉंग्रेसपुढे खोट्या साक्षी द्यायला आपल्या सहकार्‍यांना भाग पाडलं व स्वत:ही लेखी स्वरूपात सही-शिक्क्यानिशी खोटी निवेदनं दिली जेणेकरून अमेरिकेची पाकिस्तानला दिली जाणारी मदत थांबू नये व रशियाविरुद्धचे युद्ध अबाधित विनाखंड चालावं.
या पाकिस्तानची अण्वस्त्रं कधी पाकिस्तानी तालीबानच्या हाती पडतील याचा नेम नाहीं. (अफगाणी तालीबान व पाकिस्तानी तालीबान या एक ध्येय असलेल्या पण दोन अलग संघटना आहेत.) माझ्या मतें आज ना उद्या पडतीलच! आणि ती जेंव्हा त्यांच्या हातात पडतील तेंव्हां ९/११ ला पार झाकोळून टाकेल असा हल्ला अमेरिकेवर होण्याची दाट शक्यता आहे.
रेगन यांचं चित्र असलेल्या नोटा छापायला निघालेल्या अमेरिकन सरकारनं जरा गंभीरपणानं विचार करावा अशीच सत्यपरिस्थिती आहे. ("उत्तम कथा"च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या माझ्या लेखात याबद्दल कांहीं माहिती आहे, पण या पुस्तकात ती जास्त प्रगल्भ स्वरूपात वाचायला मिळते.)
(२) जनरल झिया हा पाकिस्तानच्या आजवरच्या सर्व नेत्यांत सर्वात धूर्त नेता होता यात शंका नाहीं. त्यांनं अमेरिकेला असं कांहीं आपल्या जाळ्यात गुंतवलं होतं कीं अमेरिकेपुढचे सर्व पर्यायच संपवून टाकले. अयूब खान, भुत्तो यांच्या नेतृत्वाच्या काळात दिल्या गेलेल्या मदतीत अमेरिकेचा वरचष्मा होता, पण झियाच्या काळात तो पूर्णपणे पाकिस्तानच्या हातात गेला व तेंव्हापासून तो पाकिस्तानच्याच हातात आहे. झिया काळाच्या पडद्याआड गेला (गेला कसला? अमेरिकी राजदूतासह त्याला पडद्याआड धाडला गेला!) असला तरी पाकिस्तानी वरचष्मा चालूच आहे. मुशर्रफनेही त्याच्या कारकीर्दीत असाच अरेरावीयुक्त धुमाकूळ घातला होता.
दुसरी एक अदूरदर्शी गोष्ट झियानं केली ती म्हणजे पाकिस्तानचं इस्लामीकरण त्यानंच सुरू केलं, मुल्ला-मौलवींना फाजील भाव दिला व शारिया कायदा लागू करण्याचाही घाट घातला. त्याचाच एक भाग म्हणून अतिरेक्यांना प्रशिक्षण द्यायची केंद्रं त्यानं सुरू केली. (तोपर्यंत अशी केंद्रं सरकारी आश्रयाखाली चालू नव्हती). या प्रशिक्षणकेंद्रांत जन्मलेल्या भस्मासुरानं आपल्याला (भारताला) तर छळलेच, पण आता त्यानं आपला मोर्चा स्वतःच्या जन्मदात्याकडे वळवला आहे व पाकिस्तानी पोलीसखात्यावर व लष्करावर आपला नेम धरला आहे. हळू-हळू त्याचे डोळे इराणकडेही वळू लागले आहेत. या भस्मासुराने झियाला तर यमसदनी पाठवलंच पण लाल मशीदीचा ताबा घेऊन त्यांच्यावर हल्ला करायला मुशर्रफला भाग पाडून त्याचीही 'विकेट' काढली.
दूरदृष्टीचा संपूर्ण अभाव असलेल्या या दोघांच्या (रेगन व झिया) धोरणानं आज पाकिस्तानमध्ये अराजक पसरत आहे व त्याचा त्रास आपल्यालाही भोगायला लागणार आहे यात शंका नाहीं. यापासून आपला कसा बचाव करायचा याचं "राष्ट्रीय" धोरण पक्षातीत विचार करून एकमतानं आखणं ही आजची खास गरज आहे. एवढी प्रगल्भता आपल्या आजच्या बुळ्या नेतृत्वात आहे कां?
याचं उत्तर देणं खूप अवघड आहे.
या आधी मी "The fall of House of Bush" हे Craig Ungher लिखित पुस्तक वाचले, त्यात बुश-४३ नं (किंवा त्याचा "बोलविता धनी" किंवा "असली बादशाह" डिक चेनीनं) रेगनचंच अदूरदर्शी धोरण पुढं चालवून खोट्या-नाट्या प्रचारानं अमेरिकेला इराकच्या युद्धात कसं लोटलं याचा खूप विस्तृतपणे उहापोह केलेला आहे. (Craig Ungher चेच House of Bush, House of Saud" हे पुस्तकही वाचनीय आहे. या पुस्तकावर आधारलेला Fahrenheit 9/11 हा चित्रपट बर्‍याच लोकांनी पाहिला असेल.)
Nuclear Deception हे पुस्तक वाचून संपल्यावर या दोन्ही पुस्तकांवर आधारित एक जास्त सविस्तर लेख लिहिण्याचा विचार मात्र पक्का आहे.

राजकारणप्रकटनसमीक्षा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

19 Oct 2009 - 11:29 am | अवलिया

या दोन्ही पुस्तकांवर आधारित एक जास्त सविस्तर लेख लिहिण्याचा विचार मात्र पक्का आहे.

जरुर लिहा.

अमेरिकन लोक आणि अमेरिकन सरकार यांत खूप फरक आहे

हॅ हॅ हॅ... जमायला लागलं तुम्हाला विनोदी लिहिणं :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

हेरंब's picture

19 Oct 2009 - 1:43 pm | हेरंब

अमेरिकन लोक आणि अमेरिकन सरकार यांत खूप फरक आहे

हॅ हॅ हॅ... जमायला लागलं तुम्हाला विनोदी लिहिणं

हे वाक्य मला तरी विनोदी नाही वाटत. स्वानुभवावरुन ते वास्तवाच्या जवळ आहे असे वाटते. तसा सामान्य पाकिस्तानी माणूसही चांगला आहे असे तिथे जाऊन आलेल्या(क्रिकेटच्या सीरीजवेळी) अनेकांनी त्यावेळेला लिहिले आहे.

सुधीर काळे's picture

19 Oct 2009 - 2:10 pm | सुधीर काळे

लिहायचा विचार तर आहे! "भट्टी" जमली तर एकाद्या मराठी मासिकात प्रकाशनासाठी द्यायचाही विचारही आहे. पण त्या आधी "मिपा"वर चढवेन कारण इथले वेगवेगळे शेरे वाचल्यावर त्यातल्या सकारात्मक शेर्‍यांचा वापर करून लेखात जरूर त्या सुधारणा मी नेहमीच करत आलेलो आहे.
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

तेन्नालीराम's picture

19 Oct 2009 - 3:22 pm | तेन्नालीराम

लय भारी म्हाइती कळली! लिवा अजून!!
ते.रा.

पारंबीचा भापू's picture

19 Oct 2009 - 3:30 pm | पारंबीचा भापू

सुधीरभाऊ,
बरीच नवीन माहिती कळली या लेखावरून! तुमच्या पुढच्या लेखाची वाट पहातो, पण फार वेळ नका लावू हां!
भापू

अमोल खरे's picture

19 Oct 2009 - 7:45 pm | अमोल खरे

पुढील लेख वाचण्यास उत्सुक.

प्रशान्त पुरकर's picture

19 Oct 2009 - 7:49 pm | प्रशान्त पुरकर

काळे साहेब्..........अजुन एक अभास्यपुर्ण लेख्....खुपच छान !

मदनबाण's picture

19 Oct 2009 - 9:58 pm | मदनबाण

हे पुस्तक वाचून संपल्यावर या दोन्ही पुस्तकांवर आधारित एक जास्त सविस्तर लेख लिहिण्याचा विचार मात्र पक्का आहे.

वाचायला नक्कीच आवडेल...

मदनबाण.....

सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |

आजच्या टाइम्समधे आलेली ही बातमी वाचून मी सुन्न झालो! "Opium, organized crime & Pakistan intelligence feed Taliban's war chest"
"म्हणजे आंधळं (अमेरिका/ओबामा) दळतंय आणि कुत्रं (तालीबान/मुल्ला ओमार) पीठ खातंय" अशातलीच गत! "आपलं काय जातंय?" असं म्हणायचीही सोय नाही! कारण आज जे पाकिस्तानात होतंय ते उद्या आपल्यालाच भोवणार आहे.
हे जे ISI प्रकरण आहे त्याची व्याप्ती पहाता मला तर वाटतं कीं प्रत्येक लफड्याच्या दोन्ही बाजूस ही संघटना उभी असते! त्यांचं कर्तृत्व परमेश्वराच्याही पेक्षा जास्त असावे असं मला कधी-कधी वाटतं - अगदी omnipresent आणि omnipotent! पाकिस्तानात कोण राज्य करतो - त्यांचं सरकार की ISI - असाही प्रश्नही वारंवार पडतो!
सुधीर
------------------------
हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

पारंबीचा भापू's picture

25 Oct 2009 - 9:18 pm | पारंबीचा भापू

सुधीरभाऊ,
असे काही वाचले कीं असे वाटते की अमेरिकन सरकारला इतके साधे गणीत कसे समजत नाही.
असे काही वाचले की वाटते की हे पाकडे तर दोन्ही बाजूनी लोणी ओरपत असतात पण ओबामासारख्या जरा समजूतदार वाटणार्‍यालाही हे कसे समजत नाही?
का तोही CIA, STATE Deptt किंवा Pentagon सारख्या 'हम करेसो कायदा' छाप संघटनाना शरण जातो? सरकार या सघटनाच चालवतात कीं निवडून आलेले सरकारच चालविते? व या संघटना देशाचे हित वगैरे न पहाता त्यांच्या लॉबीमास्टर सांगेल तसे बोलतात!
मग ते जुनं गाणं आठवतं: "कुणी सांगा या येड्याला"
भापू

सुधीर काळे's picture

25 Oct 2009 - 8:34 pm | सुधीर काळे

धन्यवाद
सुधीर
------------------------
गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|

सुधीर काळे's picture

26 Oct 2009 - 9:26 am | सुधीर काळे

कधी-कधी मला आश्चर्य वाटतं कीं वॉटरगेट प्रकरणी (प्रत्यक्ष कांहींही गुन्हा केलेला नसूनही) केवळ आपल्या मदतनिसांना वाचविण्याच्या प्रयत्नात खोटे बोलण्याबद्दल महाभियोगाचा (impeachment) बळी होऊ घातलेला व शेवटी अख्ख्या अमेरिकन इतिहासात राजीनामा देण्याचा 'सन्मान' मिळवणारा एकुलता एक राष्ट्राध्यक्ष निक्सन व मोनिका लेविन्स्कीप्रकरणी खोटे बोलण्याच्या आरोपाबद्दल महाभियोगाला सामोरा जाता-जाता जेमतेम वाचलेला पण एरवी अशक्य वाटणारी आर्थिक तूट आपल्या आठ वर्षात भरून काढण्याचे उत्तुंग कर्तृत्व दाखविलेला क्लिंटन हे दोघे एका बाजूला व "पाकिस्तानकडे अण्वस्त्रे नाहींत व ते अशी अण्वस्त्रे बनवू पहात आहेत असा कुठलाही पुरावा सरकारकडे नाहीं" असे वर्षानुवर्षें काँग्रेस व सिनेटपुढे धादांत खोटे बोलणाराच नव्हे तर लेखी प्रतिपादन करणारा रेगन दुसर्‍या बाजूला पाहिला कीं अमेरिकन लोकशाही प्रथांमध्ये किती तृटी आहेत याची व तिथले लोक "काय भुललासी वरलिया रंगा" या चोखामेळाच्या अभंगाची आठवण करून देणार्‍या दिखाऊपणाला कसे भुलणारे आहेत याची तीव्रतेने जाणीव होते.

CIA कडे असे भरपूर पुरावे होते, पण रेगनकडून तिकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करण्यात आले. ज्या लोकांनी ते उघडपणे जाहीर करण्याचे पाप केले त्यांना वाळीत तरी टाकण्यात आले किंवा रिच बार्लोसारख्या तरुणाला नोकरी व बायको गमावून एकाद्या फकीरासारखे आयुष्य कंठायला लावले गेले. अशा खोटारड्या राष्ट्राध्यक्षाचे चित्र असलेल्या डॉलर-नोटा काढायचा घाट अमेरिकन सरकार कसा काय घालू शकते व असा घाट अमेरिकन लोक कसा काय स्वीकारतात हे एक आश्चर्यच आहे.

ज्या निक्सनने चीनबरोबरच्या दोस्तीचे धाडसाचे पाऊल टाकून सोव्हिएट रशियाचे "evil empire" नष्ट करण्याची श्रेष्ठ भूमिका बजावली त्याला लाजिरवण्या परिस्थितीत घालवायचे व "आयत्या बिळात नागोबा" या नात्याने सोव्हिएट रशियाला भूगोलाच्या नकाशावरून पुसून टाकल्याचे (चुकीचे) श्रेय बळकावणार्‍या खोटारड्या राष्ट्राध्यक्षाचा उदो-उदो करायचा हे सगळे अमेरिकन सरकारच्या विक्षिप्तपणाचे बीभत्स प्रदर्शनच आहे!

आपल्या मिपा सभासदांत अनेक भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत. त्यांचे वाचन माझ्याहून प्रगल्भ व जास्त विस्तृत असेल. त्यांना या गोष्टीबद्दल काय वाटते हे जाणून घ्यायची मला खूप इच्छा आहे. तरी त्यांनीही या दुव्यात भार घालावी ही विनंती.

माझ्या लिखाणात कांही मूलभूत चुका असतील तर त्या जरूर माझ्या ध्यानात आणून देण्याची कृपा करावी व त्या दरम्यान "चूक-भूल द्यावी-घ्यावी"!

सुधीर
------------------------
गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|

सायबा's picture

26 Oct 2009 - 7:34 pm | सायबा

मूळ लेख व प्रतिसाद चांगले आहेत.
आभार

जसजसे मी Nuclear Deception हे पुस्तक वाचतोय तसतशी माझ्या मनातली पाकिस्तानची व अमेरिकेची प्रतिमा डागाळू लागली आहे. काल जो भाग वाचला त्यात बेनझीरबाईंच्या पहिल्या टर्ममध्ये गुलाम इशाक खान, ज. बेग व ज. हमीद गुल यांनी त्यांना कसं एकाद्या बाहुलीसारखं वागवलं याचं भायनक चित्रण आहे. त्यांना काहीही माहिती मिळू द्यायची नाही, खास करून अण्वस्त्रांच्या प्रगतीबद्दल, असा त्यांनी चंगच बांधला होता. त्या अमेरिकेत बुशना भेटायला गेल्या तर बुशनी त्याबद्दल सांगितलेली पाकिस्तानबद्दलची माहिती बेनझीरबाईंना नव्हती!
शिवाय नवाझ शरीफ हा एके काळी तरी लष्कराच्या सहाय्याने वर आला होता व त्याचा अतिरेक्यांशीही संबंध होता अशी माहितीही त्यात वाचली. नंतर लष्कराशी दोन हात करायला गेला व परिणामी अनेक वर्षें त्याला सौदी अरेबियात अज्ञातवासात काढावे लागले हे आपण जाणतोच.
जरदारी काय, नवाझ काय व बेनझीरबाईं काय, लष्करापुढे कुणाचंही काहींही चालत नाहीं असंच लक्षात येतं.
अमेरिकेला रेगन, बुश-४१ व बुश-४३ यांच्या कारकीर्दीत केलेली पापे फेडावी लागतीलच असंच वाटतंय!
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें
खुदा याद आया सवेरे सवेरे!