"उद्या सकाळी सकाळी उठुन सात वाजता मी मतदान करुन येणार". मी बायकोपाशी जाहीर करुन टाकले. आज इ-मेल आली होती. कंपनी इज कमिटेड टु एनेबलिंग इट्स एम्प्लॉइज टु कास्ट देअर वोट. थँक यु फॉर एक्सरसाईजींग युवर राईट टु वोट. कंपनीने मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर केली होती. 'राईट टु वोट', हक्क ..हम्म.. मी मनाशी म्हटले. आपला हक्क आपण बजावलाच पाहीजे. 'परिस्थीती वाईट आहे' असे म्हणुन आपण नेहेमी शिव्या घालत असतो. आपले काम आपण कधी करणार. लेट मी कंप्लीट माय टास्क. त्या विचारातच घरी आलो होतो.
बरेच वर्षात सुट्टी असताना घड्याळात सकाळचे सात वाजलेले बघितले नव्हते. आज बघितले. मतदानाला जायचे आहे, मनात घोळत होते. "पण मत कोणाला देणार ?" बायकोने विचारले. मी ब्लँक. "घ्या, हे आहे ज्ञान तुमचे" मी स्वत:लाच म्हटले. लॅपटोप उघडला. मायनेता.इन्फो साईट उघडली. "वा..वा.. आधी बघायला काय झाले होते." पुन्हा एकदा स्वतःशीच बोललो.
"अरे बरेच लोक उभे आहेत की. चॉईस आहे आपल्याला मतदानासाठी. अरे वा..." मी म्हटले. "सध्याच्या सरकारने परिस्थीती वाईट करुन टाकली आहे. दुसरे ऑप्शन्स बघु. ". बाकीच्यांची माहिती बघितली. बरेचसे दहावी पास फक्त. काहींवर क्रिमिनल केसेस तर काहींवर गुन्हे दाखल.
मतदान करण्याचा उत्साह एकदम थंडावला. यांना मत देऊन काही होईल का भले देशाचे ? हा निवडुन आला काय किंवा तो, काय फरक पडतो ? पुन्हा मी मतदान केल्याने कसा फरक पडणार? सरकार बदलुन देशाने बघितलेच आहे की. काही फरक पडला का ? मुळातच चांगले लोक उभे राहतील निवडणुकीला असे का बघत नाही निवडणुक आयोग ?
जरा चार लोकांशी बोलुन बघु म्हणुन नऊ,दहा वाजेपर्यंत मित्र ऑनलाईन येण्याची वाट बघितली. त्याना प्रश्न विचारले. कोणाला मत देणार? प्रत्येकाची वेगवेगळी उत्तरे. परंतु 'परिस्थिती बदलेल' असा आत्मविश्वास कोणालाही नव्हता. बर्याच जणांनी गुन्हे असलेले उमेदवार उभे असणे हे अॅक्सेप्ट केले होते. "त्याकडे लक्ष देउ नकोस. सगळे गुन्हेगारच असतात, त्यातल्या त्यात बरा निवड". आता त्यातल्या त्यात बरा म्हणजे नक्की काय आणि तो नक्की कसा निवडायचा हे कोणीतरी मला नक्की सांगा. म्हणजे, विमानातुन उडी टाकण्यापेक्षा, इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी टाकणे त्यातल्या त्यात बरे दिसत असले, तरी एन्ड रिझल्ट एकच आहे हे कसे समजत नाही लोकांना ?
"करु का कॅन्सल मतदान करणे?" पुन्हा एकदा मनाशी संवाद. मोबाईल वाजला. मित्राचा फोन. पुन्हा एकदा 'हक्क' वगैरेचे डिस्कशन. जाउदे, दुपारनंतर जाउ आता, गर्दी झाली असेल असे म्हणुन थोडे पुढे ढकलले. दुपारी चार वाजेपर्यंत निर्णय झाला नव्हता. मतदान करायचे का? करायचे तर कोणाला ?. शेवटी, निघालो एकदाचा आणि लोक'शाई' बोटाला लावुन परतलो. मतदानाचा हक्क बजावला. कसला हक्क? कोणाचा? आपला मतदान करायचा हक्क असतो की जे उमेदवार उभे आहेत निवडणुकीला, त्यांचा हक्क असतो आपल्याकडुन मत घ्यायचा. प्रश्न पडले होते.
असो. मतदान करत रहायचे. 'त्यातल्या त्यात बरा' निवडुन. आणि परिस्थिती सुधारेल. देशाची प्रगती होईल. अशी भाबडी स्वप्ने बघायची. हो. स्वप्न बघायचा हक्क मात्र आपण बजावायचा.
- शशांक.
प्रतिक्रिया
13 Oct 2009 - 6:42 pm | सूहास (not verified)
छान लेख...
महाराष्ट्रात केवळ ४५ % मतदान झाले असा प्राथमिक अंदाज,५५% लोकांची आवड न समजणारी...
मॅटर खतम
१७६० लेख , ६१६२ वाचने , ० प्रतिसाद..
सू हा स...
13 Oct 2009 - 6:43 pm | सूहास (not verified)
छान लेख...
महाराष्ट्रात केवळ ४५ % मतदान झाले असा प्राथमिक अंदाज,५५% लोकांची आवड न समजणारी...
मॅटर खतम
१७६० लेख , ६१६२ वाचने , ० प्रतिसाद..
सू हा स...
13 Oct 2009 - 7:04 pm | छोटा डॉन
महाराष्ट्रात फक्त ४५% मतदान ???
छे, फारच गहाळ आणि मुर्ख माणसं आहेत बॉ ज्यांना शक्य असुनही त्यांनी मतदान केले नाहीत ते ...
बाय द वे, आता ५ वर्षे ह्या महाभागांना सरकार, सिस्टिम आणि नेते ह्यांना काहीही अवाक्षर बोलायचा हक्क नाही हे लवकर समजुन घेतले तर बरे होईल ...
असो. "माणसे ज्याला लायक असतात तसेच सरकार आणि नेते त्यांना मिळतात" असे कुठेतरी वाचले होते, आता मतदान ४५%, काय बोलणार ...
बाकी लेख मस्तच.
मतदान केल्याबद्दल आपले अभिनंदन ....!!!
------
(संतप्त)छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
14 Oct 2009 - 1:49 pm | ताल भास्कर
>>>> "माणसे ज्याला लायक असतात तसेच सरकार आणि नेते त्यांना मिळतात" असे कुठेतरी वाचले होते, आता मतदान ४५%, काय बोलणार ...
अगदी बरोबर. हा quote मुळचा George Bernard Shaw यांचा आहे.
"Democracy is a device that insures we shall be governed no better than we deserve." - George Bernard Shaw
13 Oct 2009 - 7:30 pm | प्रमोद देव
शशांक,मस्त लिहितोस की. तुझे मनोगत आवडलं.
ही कला इतके दिवस का लपवून ठेवली होतीस? आता नियमितपणे लिहीत जा.
विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
14 Oct 2009 - 10:39 am | सूर्य
धन्यवाद प्रमोदकाका. उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल. मिपावर लिखाणात 'डॉन' मंडळी बरीच आहेत. मी सुरुवातच करतोय. खरे तर अनुदिनी बनविली आहे (कधीची). परंतु लिहायचे विषय क्वचितच सुचतात. त्यासाठी प्रतिभा लागते हेच खरे. असे प्रतिसाद मिळाल्यावर लिहीण्याचा उत्साह वाढतो आणि तो वाढलाय. त्यामुळे प्रमोदकाका, पुन्हा लिहीतो लवकरच.
- सूर्य.
14 Oct 2009 - 9:52 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मतदान केल्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन. प्रकटन आवडलंच, आपल्यासारख्या अनेकांच्या मनात येणारे विचार असेच, पण कृती?
अदिती
14 Oct 2009 - 9:57 am | सहज
मतदान केल्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन!
खरं म्हणलं तर अभिनंदन करायची गरज आहे का? नाही. पण जेव्हा बहुसंख्य लोक करत नाही तेव्हा तुमचे हे कर्तव्यपालन नक्कीच अभिनंदनास पात्र!
पुढील लेखनास शुभेच्छा!
14 Oct 2009 - 12:34 pm | विसोबा खेचर
छानच लिहिलं आहेस रे सूर्या!
निवडणुकीचा दिवस धरून एकूण तीन दिवस ड्राय डे लादला गेल्यामुळे त्याचा निषेध म्हणून मी आणि मद्यविक्री व्यवसायातील माझ्या बर्याचश्या सहकार्यांनी (जे माझे अशील आहेत) मतदान केले नाही..
तात्या.
14 Oct 2009 - 8:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त लिहिलं रे भावा !
>>स्वप्न बघायचा हक्क मात्र आपण बजावायचा.
सही रे सही...!!!
पुढील लेखनास शुभेच्छा...!!!
-दिलीप बिरुटे