नशीबानं मांडलेली थट्टा - पिंजरा संजोपराव हे पुस्तक प्रकाशित करत आहेत म्हणून अप्रकाशित. नीलकांत.

सन्जोप राव's picture
सन्जोप राव in जनातलं, मनातलं
29 Feb 2008 - 10:34 am

आसक्ती आणि विरक्ती यांच्यातला संघर्ष निर्मितीक्षम कलाकारांना नेहमीच खुणावत आला आहे. 'आचार्य' आणि 'काकाजी' हे तर सर्वप्रसिद्धच उदाहरण. शांतारामबापूंचा 'पिंजरा' याच कल्पनेवर आधारित आहे. वैराग्याची कवचं घालून शरीर आणि मनाला कडीकुलुपात बंद करुन ठेवलं तरी निसर्गाची सनातन प्रेरणा सतत आतून धडका देत रहाते. वासनेच्या, विकारांच्या मोहातून कोण सुटला आहे? मग अशा विरक्तीचे जेंव्हा क्षणिक मोहात अडकून पतन होते, तेंव्हा त्याच्या ठिकर्‍या ठिकर्‍या उडतात. माणूस जितक्या अधिक उंचीवर पोचला असेल, तितका तो कोसळला, की अधिक जखमी होतो, तसेच.<?xml:namespace prefix = o ns = "urn:schemas-microsoft-com:office:office" />
'पिंजरा' तल्या आदर्शवादी गुरुजींच्या बाबतीत अगदी हेच घडते. आदर्शवादाच्या नशेत - नशाच ती - ते गावात आलेल्या तमाशाच्या फडाला हाकलून लावतात. या अपमानाने अंतर्बाह्य पेटून उठलेली नर्तिका चंद्रकला या मास्तरला नादवण्याचा चंग बांधते. आपले सौंदर्य आणि यौवन यांच्या जाळ्यात पकडून ती मास्तरला बहकावते, पार खुळा करुन टाकते. शिखरावरुन तोल सुटलेला मास्तर मग पुढे कोसळतच जातो. त्याचे अपराधी मन त्याला सारखे खात रहाते - अगदी मरणाने त्याची अपरिहार्य सुटका करेपर्यंत.
चंद्रकलेची शपथ पूर्ण होते, पण ती खया अर्थाने जिंकते का? की सूडाच्या समाधानाने भरुन वाहू लागलेले तिचे पात्र जाणिवेच्या अंतिम क्षणी अगदी रिकामे, रिते रहाते?

असा प्रश्न टाकून संपणारा'पिंजरा'. मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक आणि शांतारामबापूंचा नि:संशय सर्वोत्कृष्ट. खया अर्थाने मराठी मातीतला. मास्तरांचे गाव, मास्तरांबाबत आदर - भक्तीच म्हणाना- ठेवून असलेले गावकरी, गावचे सज्जन पाटील, पाटलांचा बदफैली मुलगा बाजीराव आणि स्वत: मास्तर ही सगळी पात्रे अगदी अस्सल वाटावी अशी. नखरेल, मानी, थोडी गर्विष्ठच, अशी चंद्रकला, तिच्या फडातल्या इतर तमासगारिणी, नाचे आणि चंद्रकलेच्या नादानं घरदार सोडून फरपटत आलेला असाच तिचा एक आशिक या सगळी पात्रेही दाद द्यावीशी अशी.
कलेचे क्षेत्र कोणतेही असो, कलाकाराला आयुष्यात किमान एक संधी अशी मिळते की जिचे तो सोने करुन जातो. 'पिंजरा' ही गीतकार जगदीश खेबुडकर आणि संगीतकार राम कदम यांना मिळालेली अशीच एक संधी. खेबुडकरांच्या सगळ्याच गीतांचे शब्द विलक्षण आशयपूर्ण आहेत, आणि रामभाऊंच्या चाली तर अस्सल मराठमोळ्या ठसक्याच्या आहेत. 'सोंगाढोंगाचा कारभार इथला साळसूद घालतोय आळिमिळी, सार वरपती रस्सा भुरकती घरात पोळी आन भाईर नळी' हे अगदी गदिमांची आठवण करुन देणारं आहे. 'डाळिंबाचं दानं तुझ्या, पिळलं गं व्हट्टावरी, गुलाबाचं फूल तुझ्या, चुरडलं गालावरी' यातला शृंगारही तसाच. 'दे रे कान्हा चोळी लुगडी' मधली 'आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी' ही कल्पना 'पिंजरा' प्रदर्शित झाला तेंव्हा फार नावाजली गेली होती. आणि 'तुम्हावर केली मी मर्जी बहाल' हा तर 'पिंजरा' चा उत्कर्षबिंदूच. 'लाडेलाडे अदबीनं तुम्हा विनवते बाई, पिरतिचा उघडला पिंजरा तुमच्यापायी' काय किंवा 'अशीच रहावी रात साजणा, कधी नं व्हावी सकाळ' काय,प्रतिभेचा जिवंत स्पर्श लाभलेले हे शब्द आणि त्या शब्दांचा आब राखून ताटाभेवती रांगोळी काढावी तशी गुंफलेली साधी पण मोहक सुरावट.
त्या मानाने 'कशी नशिबानं थट्टा आज मांडली' काहीसे बटबटीत वाटते. बाबुजींचा सूर सच्चा हे खरे, पण उच्चारात भाव काहीसे कोंबून बसवण्याच्या हट्टापायी म्हटलेले 'त्याच्या काळजाची तार तिनं छेडली' हे थोडेसे नाटकी वाटते. आणि त्यातले संध्याचे 'न्हाई, न्हाई...' हे तर फारच उथळ वाटते.

'पिंजरा' चे संवाद हे एक खास वैशिष्ट्य आहे. एकच उदाहरण सांगतो. गावात तमाशा लावायचा तर मास्तरांची परवानगी घ्यावी लागेल असं पाटील (की पाटलाचा पोरगा) तमाशातल्या नाच्याला सांगतो. त्यावर नाच्या गोंधळून म्हणतो, "पर तुमी पाटील असतापैकी...". यातला 'असतापैकी' म्हणजे तुम्ही पाटील असताना इतरांची परवानगी कशाला - हे खास कोल्लापुरी आहे. कोल्हापुरी नव्हे तर अस्सल कोल्लापुरी!
'तुणतुण्याची निंदा करी, तिला वीणा म्हणू नये
नाही ऐकली लावणी, त्याला कान म्हणू नये' हे 'बिना कपाशीनं उले, त्याला बोंड म्हनू नये, हरीनामाविन बोले त्याला तोंड म्हनू नये' या धर्तीवरचं भाष्य फारच 'ग्वाड' वाटतं!
एक दिग्दर्शक म्हणून तंत्राच्या मोहात पडून काही काही वेळा आशय गमावून बसणे ही शांतारामबापूंची मर्यादाच मानावी लागेल. चंद्रकलेचा गोरा उघडा पाय आणि मास्तरांचे विस्फारलेले डोळे यावर आलटून पालटून फिरणारा कॅमेरा, पिंजर्‍यातल्या पोपटाचे प्रतिक ही अशी काही उदाहरणे.पावसाळी रात्री वीजा कडाडत असताना आदर्शवादी मास्तराने चंद्रकलेला मिठीत घेणे आणि त्यावेळी "ब्रम्हचर्य हेच जीवन" ही पाटी पायदळी तुडवली जाणे हे अशाच प्रतिकांच्या हव्यासाचे एक बटबटीत उदाहरण. पण याच चंद्रकलेसाठी उकळत ठेवलेले आमसुलाचे सार घाईघाईने खाली उतरवत असताना हातातला  शिकवणीचा खडू त्या सारात पडणे हा प्रसंग बाकी दाद देण्यासारखा.
श्रीराम लागूंच्या पिंजरामधील अभिनयाविषयी बरेच बोलले जाते. माझ्या मते लागूंच्या अभिनयात ( घाणेकर, पणशीकरांप्रमाणे ) मुळातच एक शैलीबाज कृत्रिमता आहे. कोकणस्थी रंगाचे,डोळ्यांचे लागू आदर्शवादी मास्तर म्हणून शोभतात खरे, पण त्यांच्या अभिनयातील कृत्रिमता लक्षात येते. ('सामना' मध्ये लागूंची व्यक्तीरेखा मुळातच विक्षिप्त, व्यसनी असल्याने त्यांनी 'लावलेला' आवाज हा त्या व्यक्तीरेखेशी सुसंगत असा वाटला होता.) 'पिंजरा' मध्ये चित्रपटाच्या पूर्वार्धात काहीशा अवघडल्यासारख्या वाटणार्‍या लागूंनी उत्तरार्धात चंद्रकलेच्या नादाने होणारी नैतिक घसरण आणि त्यातून येणारे वैफल्य छान दाखवले आहे. तिकीटविक्रीच्या खुर्चीवर बसलेले असताना स्वतःच खुर्चीखाली ठेवलेली दारुची बाटली काढून तोंडाला लावणे आणि चंद्रकलेविषयी अचकट विचकट बोलणाऱ्या प्रेक्षकाला "दारु पिऊन आलाय काय?" असे विचारणे हा मला स्वतःला आवडलेला प्रसंग. 
'पिंजरा' तल्या पात्ररचनेत सर्वाधिक चुकीची निवड संध्याबाईंची. चंद्रकलेच्या व्यक्तीमत्वात जी कामुकता, जो उत्तानपणा, जी वासनेची ज्योत अपेक्षित आहे (थोडीशी 'तीसरी कसम' मधल्या हीराबाईसारखी) ती संध्याबाईंमध्ये आहे असे समजण्यासाठी प्रेक्षकांना बरीच कसरत करावी लागते. 'मदनाची लालडी' अशी ही चंद्रकला आहे. आपली जवानी आणि आपले सौष्ठव याची तिला पुरेपूर जाण आहे आणि ही अस्त्रे वापरुन आपण कुठल्याही पुरुषाला घायाळ करु शकतो असा ताठा - गर्वही. अशा भूमिकेत शिरणे संध्याबाईंना अंमळ कठीणच गेले आहे. जिने आपला दुखावलेला पाय दाखवण्यासाठी आपले लुगडे गुढग्याच्या वर ओढले आणि मास्तरांचा आयुष्यभराचा निग्रह ढासळला अशी चंद्रकला संध्याबाईंमधे मला तरी दिसली नाही.आणि लागूंनी तिच्या नादाने सगळी तपश्चर्या सोडून तमासगीर होणे म्हणजे बलराज सहानीने कल्पना अय्यरच्या नादाने डान्सबारमध्ये वेटरची नोकरी पत्करण्यासारखे आहे. असो.आदर्शाच्या या पुतळ्याला मोहात टाकणारी स्त्री कशी नखरेल, मादक हवी. शांतारामबापू इथं थोडे घसरले आहेत. त्यांचे वैयक्तिक संध्यावेड ध्यानात घेतले तरी चंद्रकलेच्या भूमिकेतली संध्या म्हणजे जी.एं. च्या भाषेत बोलायचे तर जगातील सगळी अंथरुणे जाळून टाकावी असे वाटेल अशी स्त्री.
'पिंजरा' त खरे भाव खाऊन जातात ते निळू फुले. कुत्र्याच्या पंगतीत बसून जेवायचा प्रसंग असो किंवा मास्तरांना 'आता नुसता हसतो मास्तर....' म्हणणे असो, निळूभाऊंनी आपले पान झकास जमवले आहे. ओठाची कुंची करुन, भुवई उंचावत नाटकीपणे बोलण्याच्या बर्‍याच भूमिका करणारे निळूभाऊ इथे एक अस्सल खानदानी पात्र उभे करुन जातात.
तर असा हा 'पिंजरा'. आज पाहिला तर कदाचित थोडा कालविसंगत, क्वचित विनोदीही वाटेल असा. पण मनात आणि शरीरात काही अनाकलनीय पाकळ्या उमलू लागण्याच्या वयात पाहिलेला आणि आज हे सगळे लिहिताना त्या शिरशिरी दिवसांची आठवण करुन देऊन थोडीशी हुरहूर लावणारा.
 
 
 

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

29 Feb 2008 - 10:53 am | बेसनलाडू

तुमच्या लेखणीतून आज हे वाचायला मिळाले आणि भरून पावलो, असे म्हणावेसे वाटले. त्रयस्थ समीक्षकाप्रमाणे वृत्तपत्रीय समीक्षा न लिहिता "आपल्याला स्वतःला" काय वाटले, हे लिहिण्याचे तुमचे कसब प्रशंसनीय वाटते. कदाचित तेच समीक्षेसारख्या रुक्षशा लेखनप्रकारालाही वाचकांच्या बरेच जवळ नेऊन सोडते, असे मला वाटते.
संध्याबाईंच्या चेहर्‍यात मला बरेचदा अंमळ पुरुषी भाव दिसतात. त्यामुळे याच एका मुद्द्यावर 'पिंजरा'मधल्या भूमिकेसाठी त्यांची निवड व्हायला नको होती, असे वाटते. श्रीराम लागूंच्या अभिनयाचे, लावलेला आवाज आणि मॉड्युलेशन हे वैशिष्ट्य पहिल्यापासूनच राहिले आहे. त्यामुळे आज 'पिंजरा' पाहताना त्याचे विशेष कौतुक मला वाटत नाही. निळू फुले साहेब तर जबरदस्त ताकदीचे अभिनेते आहेत. त्यांच्याबद्दल मी काय बोलावे! ज्यांनी त्यांचा अभिनय पाहिलेला नाही, त्या आजच्या पिढीतील युवकांनी नि होतकरू अभिनेत्यांनी नुकत्याच आलेल्या 'पांढर' चित्रपटातील त्यांची भूमिका पाहिली तर उत्तम. दुय्यम, नगण्य कालावधीची ती 'आबा'ची भूमिका इतकी नैसर्गिक आणि ताकदीची केली आहे त्यांनी!
एकच रुखरुख लागून राहिली, ती म्हणजे 'पिंजरा' मधल्या एक से बढकर एक गाण्यांबद्दल तुमचे मत वाचायला न मिळाल्याची. तेही लिहिले असतेत, तर अधिक आनंद वाटला असता. असो.
(आस्वादक)बेसनलाडू

केशवसुमार's picture

29 Feb 2008 - 1:50 pm | केशवसुमार

हेच म्हणतो..
तुमच्या लेखणीतून आज हे वाचायला मिळाले आणि भरून पावलो, असे म्हणावेसे वाटले. त्रयस्थ समीक्षकाप्रमाणे वृत्तपत्रीय समीक्षा न लिहिता "आपल्याला स्वतःला" काय वाटले, हे लिहिण्याचे तुमचे कसब प्रशंसनीय वाटते. कदाचित तेच समीक्षेसारख्या रुक्षशा लेखनप्रकारालाही वाचकांच्या बरेच जवळ नेऊन सोडते, असे मला वाटते. ........एकच रुखरुख लागून राहिली, ती म्हणजे 'पिंजरा' मधल्या एक से बढकर एक गाण्यांबद्दल तुमचे मत वाचायला न मिळाल्याची............
केशवसुमार..
(अवांतरः गाणी लिहिली असती तर कच्चा माल पण मिळाला असता)

नंदन's picture

29 Feb 2008 - 11:05 am | नंदन

रावसाहेब, परीक्षण आवडले. तात्याची खूप काळापासूनची रिक्वेष्ट तुम्ही तुमच्या नेहमीच्या शैलीत पूर्ण केलीत :). अंतिम क्षणी रिते, रिकामे राहणारे पात्र हा जी. एं.च्या कथांची आठवण करून देणारा वाक्यप्रयोग, 'असतापैकी' आणि निळूभाऊंचे संवाद/शैली यासारख्या अनेक बारीक-सारीक गोष्टींकडे पुरवलेले लक्ष आणि निराळ्या उपमा या तुमच्या परीक्षणातल्या गोष्टी ;है और भी दुनियाँ में सुखनवर बहुत अच्छेकहते हैं कि गालिब का है अन्दाजे बयाँ औरसारखी दाद घेऊन जातात :)नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

राजमुद्रा's picture

29 Feb 2008 - 11:02 am | राजमुद्रा

'मदनाची लालडी' अशी ही चंद्रकला आहे. आपली जवानी आणि आपले सौष्ठव याची तिला पुरेपूर जाण आहे आणि ही अस्त्रे वापरुन आपण कुठल्याही पुरुषाला घायाळ करु शकतो असा ताठा - गर्वही. अशा भूमिकेत शिरणे संध्याबाईंना अंमळ कठीणच गेले आहे.
राजमुद्रा :)

विजुभाऊ's picture

29 Feb 2008 - 11:59 am | विजुभाऊ

झकास्....बर्याच दिवसानी इतके चांगले परिक्शण वाचायला मिळाले

सर्किट's picture

29 Feb 2008 - 12:05 pm | सर्किट (not verified)

वा रावसाहेब !!एकूण एक मुद्द्यांविषयी सहमत ! एक तद्दन बाजारू चित्रपट, आणि लागूंच्या अभिनयकौशल्यावरचा एक काळाधब्बा, असे ह्याचे वर्णन करता येईल. निळूभाऊ मात्र जबरा.- सर्किट

आजानुकर्ण's picture

29 Feb 2008 - 1:32 pm | आजानुकर्ण

चित्रपट आवडला नव्हता. गाणी मस्त होती. पण लेखात म्हटल्याप्रमाणे तो विनोदी वाटला होता. :(
लेख मात्र सुंदर झाला आहे.
(रसिक) आजानुकर्ण

धमाल मुलगा's picture

29 Feb 2008 - 12:16 pm | धमाल मुलगा

च्यायला.... आणि आम्ही मात्र अभिरुचीस॑पन्न (!) जन म्हणतात म्हणून आवडीन॑ हा चित्रपट पाहिला आणि टिपला नसताना तो॑ड फाटेस्तोवर स्तुती केली (एव्हढा काही मनापासून आवडला नसतानाही)..हो, उगाच कोणि आपल्याला चिल्लरमध्ये जमा करायला नको म्हणून!!! बाकी निळूभाऊ आपले येकदम फेवर्‍येट. क॑च्याबी शिणेमात बघा, समोरच्याला पार खाऊन जात्यात. त्ये॑ची बेरकी नजर, तो॑डावरचे हलकट भाव आणि फर्मास आवाज सगळ॑च आपल्याला लै म्ह॑जी लै आवडत॑. पण एकदा त्या॑ना खरोखर भेटलो आणि चाट पडलो. एव्हढा मृदूभाषी, सत्शील माणूस हे असले रोल करू शकतो म्हणजे कम्मालेय बॉ!

"बाकी निळूभाऊ आपले येकदम फेवर्‍येट. क॑च्याबी शिणेमात बघा,"..."च्यायला आपली मते लैच जळतायत बघ, आपले पण लै फेवरीट आहेत निळूभाऊ. आपल्याला लेटेस्ट आठवतं म्हणजे "सात च्या आत घरात " मधला फक्त "४ मिन्टाचा" त्यांचा "ग्रामिण नेतॄत्व असलेला ढोंगे पाटलाचा रोल ". ईन्शाल्ला , काय दम आहे भूमिकेत .... जबरा .....आपण तर पार "फिदा" भाऊ त्याच्यावर ......
छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या http://chhota-don.blogspot.com/ ] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........
अवांतर : "पिंजरा" मधली 'गाणि आणि चित्रपट' दोन्हीही उत्तम ....               आजही आम्ही कार्यालयात "आली ठूमकत नार लचकत् ...." या गाण्याचा मुक्त वापर करतो . [ आतल्या गोटातील गोष्ट म्हणजे, मराठी समजणारे कमी लोक असल्याने 'सापही मर जाता है और लाठी भी नही टूटती ....' ]

धमाल मुलगा's picture

29 Feb 2008 - 3:11 pm | धमाल मुलगा

 शाब्बास रे पठ्ठे !!! काय आठवण करून दिलीस! सातच्या आत...मधले जबरा डायलॉग्स फक्त आणि फक्त निळूभाऊ॑साठीच असावेत अस॑ वाटत पाहताना... "....पोरग॑ तिकड॑ चौकीत जायची येळ आलीय आन हा कारखान्यावर बसून राजकारन ख्येळतोय... डे॑गळ्या..माझ॑ जाकिट घे, जीप काढ.." लै भारी ! काय दम आहे अजून.पोलिस चौकीत..."हा नाहीsss हे ! युवराज त्या॑च॑ नाव! युवराज साहेबराव डोणजे-पाटील "" हे बघा इन्सपेक्टर...(मा॑जरेकर्)...कोकनातले काय? ...(हो)...तरी पन ऐकायच॑............एव्हढ्यासाठी शी. यम.ला फोन लावायला लावू नका..." "पोरान॑ दारू प्यावी, हवालदाराच्या कानफटात द्यावी अन् बापान॑ नायतर आज्ज्यान॑ हे नुसत॑ एका कर॑गळीवर निभावून न्याव॑..खानदानी रीत आहे आमची" एक से बढकर एक... आपण पण  पार "फिदा" भाऊ त्याच्यावर ......आजही आम्ही कार्यालयात "आली ठूमकत नार लचकत् ...." या गाण्याचा मुक्त वापर करतो . हाण तिच्याआयला!!!!

च्यायला वट्टात येवढे सगळे डवायलाक् तुला याद आहेत म्हणजे धन्य आहेस बाबा ....जबरा रोल होता तो ... आख्खा पिक्चर त्या मकरंदने खल्ला होता पण आखरीच्या त्या ४ मिनिटात असा झटका दिला की पूछ मत .....एक आखरी 'डॉयलाग""बर आता येक करायचं, युवराजांच नाव तुमच्या डायरी , एफाराय जिथं कुठ असलं तिथनं खोडायचं .... बाकी पोरीला साडीचोळी .... ह्या आम्ही बघू की ते , अवो घराण्याची रित आहे ती आमच्या ........."छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या http://chhota-don.blogspot.com/ ] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

धमाल मुलगा's picture

29 Feb 2008 - 3:33 pm | धमाल मुलगा

येस्स्स..... साडीचोळीवाल॑ वाक्य तर एकदम खल्लास! निर्लज्ज राजकारणी कसा असावा ह्याच॑ अप्रतिम मार्गदर्शन !!च्यायला वट्टात येवढे सगळे डवायलाक् तुला याद आहेत म्हणजे धन्य आहेस बाबा ....कसच॑ कसच॑.... मला एक दुर्धर रोग आहे..नवा चित्रपट / नाटक पाहिल॑ की त्यातल्यास॑वादा॑ना रोजच्या आयुष्यात जस॑ च्या तस॑ फिट्ट बसवायचा प्रयत्न करणे... हा त्याचाच परिणाम हो..रोज रोज तेच ते बडबड्ल्यावर आणखी काय होणार?

आनंदयात्री's picture

29 Feb 2008 - 4:01 pm | आनंदयात्री

च्यायला....आणि आम्ही मात्र अभिरुचीस॑पन्न (!) जन म्हणतात म्हणून आवडीन॑ हा चित्रपट पाहिला आणि टिपला नसताना तो॑ड फाटेस्तोवर स्तुती केली (एव्हढा काही मनापासून आवडला नसतानाही)..हो, उगाच कोणि आपल्याला चिल्लरमध्ये जमा करायला नको म्हणून!!!
 
अगदी खर बोल्ला रे भो !!

प्रभाकर पेठकर's picture

29 Feb 2008 - 12:29 pm | प्रभाकर पेठकर

एक अतिशय उत्कृष्ट समिक्षा वाचावयास मिळाली.
खया अर्थाने मराठी मातीतला. मास्तरांचे गाव, मास्तरांबाबत आदर - भक्तीच म्हणाना- ठेवून असलेले गावकरी, गावचे सज्जन पाटील, पाटलांचा बदफैली मुलगा बाजीराव आणि स्वत: मास्तर ही सगळी पात्रे अगदी अस्सल वाटावी अशी. नखरेल, मानी, थोडी गर्विष्ठच, अशी चंद्रकला, तिच्या फडातल्या इतर तमासगारिणी, नाचे आणि चंद्रकलेच्या नादानं घरदार सोडून फरपटत आलेला असाच तिचा एक आशिक या सगळी पात्रेही दाद द्यावीशी अशी.
अगदी नेमके लिहिले आहे..
माझ्या मते लागूंच्या अभिनयात ( घाणेकर, पणशीकरांप्रमाणे ) मुळातच एक शैलीबाज कृत्रिमता आहे. कोकणस्थी रंगाचे,डोळ्यांचे लागू आदर्शवादी मास्तर म्हणून शोभतात खरे, पण त्यांच्या अभिनयातील कृत्रिमता लक्षात येते. ('सामना' मध्ये लागूंची व्यक्तीरेखा मुळातच विक्षिप्त, व्यसनी असल्याने त्यांनी 'लावलेला' आवाज हा त्या व्यक्तीरेखेशी सुसंगत असा वाटला होता.) 'पिंजरा' मध्ये चित्रपटाच्या पूर्वार्धात काहीशा अवघडल्यासारख्या वाटणार्‍या लागूंनी उत्तरार्धात चंद्रकलेच्या नादाने होणारी नैतिक घसरण आणि त्यातून येणारे वैफल्य छान दाखवले आहे.सहमत आहे. भूमिकेतील हा आलेख ओळखून प्रत्यक्षात साकारणे हे कुणा ऐर्‍या-गैर्‍याचे काम नोहे.
जिने आपला दुखावलेला पाय दाखवण्यासाठी आपले लुगडे गुढग्याच्या वर ओढले आणि मास्तरांचा आयुष्यभराचा निग्रह ढासळला अशी चंद्रकला संध्याबाईंमधे मला तरी दिसली नाही.आणि लागूंनी तिच्या नादाने सगळी तपश्चर्या सोडून तमासगीर होणे म्हणजे बलराज सहानीने कल्पना अय्यरच्या नादाने डान्सबारमध्ये वेटरची नोकरी पत्करण्यासारखे आहे.हे बरिक पटले नाही. रावसाहेब, आपणच वरती म्हणून ठेवले आहे,  वैराग्याची कवचं घालून शरीर आणि मनाला कडीकुलुपात बंद करुन ठेवलं तरी निसर्गाची सनातन प्रेरणा सतत आतून धडका देत रहाते. वासनेच्या, विकारांच्या मोहातून कोण सुटला आहे? 'त्या' क्षणाला काय 'केमिकल लोच्या' झाला असेल ते एक गुरुजीच जाणोत्. आपण त्या' क्षणा आधीच्या प्रसंगात कितीही एकरुप झालो तरी 'ती' भावना तितक्या उत्कटतेने आपल्या मनात जागृत होत नाही.(कारण ती काही नीळी चित्रफित नाही). तसेच, प्यार आ गया गधीपर तो परी क्या चिज है| ह्या वचनातील वजन जाणण्यासाठी अनुभवच घ्यावा लागतो. त्यातून गुरुजी त्यांच्या त्या मध्यमवयात पोहोचेपर्यंत स्त्री देहा पासून दूरच राहिला आहे. त्यामुळे, त्याची 'विकेट' जाण्यामागील भावना 'अनुभवी' प्रेक्षकांना घिसाडघाईची वाटणं स्वाभाविक आहे.पण गुरूजींच्या भूमिकेतून पाहिल्यास, 'अनंतकाळ उपास घडलेल्या माणसास  पिठलेभातही पंचपक्वांनाच्या वरच्या श्रेणीतील वाटावा' हे नैसर्गिक वाटते. 
तरीपण, समिक्षा उत्कृष्टच.असेच, वेळातवेळ काढून 'वळू' बद्दलही लिहावे ही विनंती.

सन्जोप राव's picture

29 Feb 2008 - 5:28 pm | सन्जोप राव

प्रतिसादाबद्दल (सर्वांचाच) आभारी आहे. 'वळू' विषयी आजानुकर्णाने 'मनोगत' वर सुरेख लिहून ठेवले आहे. मी 'हेच म्हणतो!'
सन्जोप राव

प्रभाकर पेठकर's picture

29 Feb 2008 - 10:22 pm | प्रभाकर पेठकर

म्हणजे आता तेवढ्यासाठी 'मनोगतावर जा' असं म्हणताय काऽऽऽ?

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Feb 2008 - 10:27 pm | llपुण्याचे पेशवेll

'त्या' क्षणाला काय 'केमिकल लोच्या' झाला असेल ते एक गुरुजीच जाणोत्. आपण त्या' क्षणा आधीच्या प्रसंगात कितीही एकरुप झालो तरी 'ती' भावना तितक्या उत्कटतेने आपल्या मनात जागृत होत नाही.(कारण ती काही नीळी चित्रफित नाही). तसेच, प्यार आ गया गधीपर तो परी क्या चिज है| ह्या वचनातील वजन जाणण्यासाठी अनुभवच घ्यावा लागतो. त्यातून गुरुजी त्यांच्या त्या मध्यमवयात पोहोचेपर्यंत स्त्री देहा पासून दूरच राहिला आहे. त्यामुळे, त्याची 'विकेट' जाण्यामागील भावना 'अनुभवी' प्रेक्षकांना घिसाडघाईची वाटणं स्वाभाविक आहे.पण गुरूजींच्या भूमिकेतून पाहिल्यास, 'अनंतकाळ उपास घडलेल्या माणसास  पिठलेभातही पंचपक्वांनाच्या वरच्या श्रेणीतील वाटावा' हे नैसर्गिक वाटते. 
हेच मी म्हणतो. पूर्वी म्हणे नुसते पदर ढळणे म्हणजे सुद्धा फार मादक समजले जाई. अहो साधे बघाना सिनेमा मधे कमी कपड्यात वावरणार्‍या कुमारीका बघून काही वाटत नाही हो. पण त्याऐवजी एखादी हापिसातली कुमारी जर थोडेसे कमी कपडे घालून आली तर काय कठीण अवस्था होते काय सांगू तुम्हाला?
आणि आपल्याला तर बुवा 'कशी नशिबाने थट्टा आज मांडली' हे गाणे फार आवडते. 
बाकी परीक्षण उत्तम वाटले.
पुण्याचे पेशवे

लिखाळ's picture

29 Feb 2008 - 5:35 pm | लिखाळ

वा ..  फार छान लेख.
पावसाळी रात्री वीजा कडाडत असताना आदर्शवादी मास्तराने चंद्रकलेला मिठीत घेणे आणि त्यावेळी "ब्रम्हचर्य हेच जीवन" ही पाटी पायदळी तुडवली जाणे हे अशाच प्रतिकांच्या हव्यासाचे एक बटबटीत उदाहरण.
अगदी असेच वाटते. 'डायरेकशन'च्या नादात 'रसिक' लोकांची वाहवा मिळवण्यासाठी !
त्यातले संध्याचे 'न्हाई, न्हाई...' हे तर फारच उथळ वाटते.हे तर फार मजेदार. त्यात तिचे ते कसनुसा चेहरा करुन पलित्या सारखे हात हालवणे तर फार विनोदी !
चंद्रकलेच्या भूमिकेतली संध्या म्हणजे जी.एं. च्या भाषेत बोलायचे तर जगातील सगळी अंथरुणे जाळून टाकावी असे वाटेल अशी स्त्री.
जोरात वाक्यं.
लेख सुंदर.
--लिखाळ.
'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

लिखाळ's picture

1 Mar 2008 - 6:39 pm | लिखाळ

रावसाहेब, माझा वरिल प्रतिसाद नीट दिसत नसल्याच्या आपल्या सुचनेमुळे तो परत टंकित आहे.

वा ... फार छान लेख.

पावसाळी रात्री वीजा कडाडत असताना आदर्शवादी मास्तराने चंद्रकलेला मिठीत घेणे आणि त्यावेळी "ब्रम्हचर्य हेच जीवन" ही पाटी पायदळी तुडवली जाणे हे अशाच प्रतिकांच्या हव्यासाचे एक बटबटीत उदाहरण.
अगदी असेच वाटते. 'डायरेक्शन' च्या नादात 'रसिक' प्रेक्षकांची वाहवा मिळवण्यासाठी.

त्यातले संध्याचे 'न्हाई, न्हाई...' हे तर फारच उथळ वाटते.
हे तर फार मजेदार. त्यात तिचे कसनूसा चेहरा करुन पलित्यासारखे हात हलवणे फार विनोदी.

चंद्रकलेच्या भूमिकेतली संध्या म्हणजे जी.एं. च्या भाषेत बोलायचे तर जगातील सगळी अंथरुणे जाळून टाकावी असे वाटेल अशी स्त्री.
जोरात वाक्य !

लेख सुंदर.
--लिखाळ.
'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

सन्जोप राव's picture

2 Mar 2008 - 6:47 am | सन्जोप राव

हा प्रतिसाद परत टंकल्याबद्दल मी आपला आभारी आहे. 'पलित्यासारखे हात' हे अगदी हुबेहूब आहे.
सन्जोप राव

सुवर्णमयी's picture

29 Feb 2008 - 6:26 pm | सुवर्णमयी

संजोपराव,
पिंजरा बद्दल तुमची मते आवडली. त्यामधले तुम्हाला काय आवडले का आणि का नाही ते उत्तम उतरले आहे.
 

नीलकांत's picture

29 Feb 2008 - 6:52 pm | नीलकांत

रावसर, खुप छान लिहीलं आहे. ह्या चित्रपटातील गाणे तर झकास आहेतच. 'तुम्हावरी..' आमचं आवडतं. मस्तच बाकी.नीलकांत

मीनल's picture

29 Feb 2008 - 6:56 pm | मीनल

किती छान लिहिले आहे!
खर तर पहिल्यावेळी   आणि नंतर ही  तो सिनेमा पाहताना एवढा विचार केला नव्हता.पण तुम्ही लिहिलेले विचार आपलेच आहे असे प्रत्येक वेळी वाटले.
त्या जुना चित्रपटात काहीतरी नक्किच आहे ज्यामुळे त्यातील प्रसंग तुमचे परीक्षण वाचताना आठवावे लागत नाही. मला म्हणायच आहे की ते विसरले गेलेले नाहित.
अजून लिहा नविन सिनेमा बद्दल.
`मला कभी अलविदा ना कहेना` हा सिनेमा आवडला. भारतिय समाजाच्या रुढीला अमान्य असलेली कथा आहे .पचनी पडायला कठिण वाटते.तुम्हाला काय वाटते त्या बद्दल?

 

विसोबा खेचर's picture

29 Feb 2008 - 7:29 pm | विसोबा खेचर

रावशेठ,
अतिशय सुंदर लेखन.. सगळे बारकावे अगदी छान टिपले आहेत! अण्णा वणकुद्रेंचे पिंजरा आणि कुंकू हे माझे अतिशय आवडते चित्रपट!पिंजरावर तुम्ही अतिशय छान लिहाल याची खात्रीच होती आणि ते वाचायची बर्‍याच दिवसांपासूनची इच्छा होती ती आज पुरी झाली!
अवांतर -
रावसाहेब जोवर मिसळपाववर पिंजरावर लिहीत नाहीत तोपर्यंत त्यांनी दिलेली चंची वापरायची नाही अशी मी शपथ खाल्ली होती. चला आता बरं झाल! आजपासून आम्हाला रावसाहेबांनी प्रेमाने भेट म्हणून दिलेली खास कोल्हापुरी साजाची चंची वापरायला मिळणार! :)
असो! रावसाहेब, आज पिंजर्‍याच्या निमित्ताने तुमचे मिपावर अगदी जोरदार पुनरागमन झाले आहे याचा खूप आनंद वाटतो!
तवा आता र्‍हावा इथ्थंच आणि लिवा निवांतपणे! आता पुन्यांदा काय मनबिन उडून जाऊ दिऊ नका! चार म्हर्‍हाटी मानसं येकत्र आली की भाडनं ही व्हायचीच बगा! तवा त्याचं काय बी फारसं मनाला लावून घिऊ नका! वयनीसायबास्नी आमचा दंडवत सांगा. तात्या लौकरच पुन्यात येणारे म्हनावं, तवा वांग्याचं भरीत अन् भाकरी तैयात ठेवा! :)
असो, तुमच्या पिंजर्‍याला पुन्हा एकदा मनापासून दाद देऊन प्रतिसाद संपवतो!
आपला,(चंचीमित्र) तात्या.

सुधीर कांदळकर's picture

29 Feb 2008 - 8:25 pm | सुधीर कांदळकर

गांभीर्याने पाहिला तरी आपली सुरेख समीक्षा मात्र मनापासून वाचली. झकास.
 त्यांचे वैयक्तिक संध्यावेड ध्यानात घेतले तरी चंद्रकलेच्या भूमिकेतली संध्या म्हणजे जी.एं. च्या भाषेत बोलायचे तर जगातील सगळी अंथरुणे जाळून टाकावी असे वाटेल अशी स्त्री
हे एकदम चपखल. प्रना संतांच्या भाषेत 'तंतोतंत.' वाचनाने अपार आनंद मिळाला. समीक्षा कशी असावी याचा वस्तुपाठच.
धन्यवाद.

सन्जोप राव's picture

2 Mar 2008 - 6:49 am | सन्जोप राव

प्रतिक्रियेबद्दल आभार. 'तंतोतंत' हे संतांच्या आधीपासून नेमाडेंचे आहे असे वाटते.
सन्जोप राव

स्वाती दिनेश's picture

29 Feb 2008 - 8:57 pm | स्वाती दिनेश

खास तुमच्या शैलीतले 'पिंजरा'चे परीक्षण फार आवडले.स्वाती

मुक्तसुनीत's picture

29 Feb 2008 - 9:14 pm | मुक्तसुनीत

"फुरसद हुई है यार को मेहमां किये हुए" असे समस्त मिसळपावकर्‍याना संजोपरावांबद्दल कितीतरी दिवसांपासून वाटत होते. आज त्याची भरपाई झाल्यासारखी वाटते आहे.
जवळजवळ प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याच्या विषय असणार्‍या या चित्रपटावर त्याच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे, मार्मिक टिप्पणी करणारे हे लिखाण.  लेखकाने म्हण्टल्याप्रमाणे, या चित्रपटाचा संस्कार एका अतिशय संस्कारक्षम, संवेदनाक्षम अशा काळात झाल्यानंतर , अनेक वर्षे मुरलेल्या मद्याप्रमाणे , या चित्रपटाला आपल्या अबोध मनात मुरवून , त्याच्यातील श्रेयस-प्रेयसाचा सांगोपांग आढावा घेऊन हे लिखाण वर आलेले आहे.  या परिस्थितीत एका सिद्धहस्त लेखकाच्या हातून इतके सुंदर लिहून झाले नसते, तरच आश्चर्य.
अनेक लोकानी याआधीच या लिखाणाचा उत्तम रसास्वाद नोंदलाय. (आमचे थोडे वरातीमागून आलेले घोडेच म्हणायचे ! ;-) )  नंदनने जीएसदृष्य प्रतिमेवर अगदी मार्मिकपणे बोट ठेवलेय. जियो नंदन !  
काही प्रश्न मनात उरतात.
संजोपरावानी "आसक्ती आणि विरक्ती यांच्यातला संघर्ष" असा जो या पटाचा बोधस्वर वर्णिला आहे तो योग्यच. या व्यतिरिक्त , मला वाटते , ही एक शोकांतिका आहे. आणि तिला अनेक पदर आहेत. मास्तर आणि चंद्रकला एका नात्यात अडकलेले आहेत. पण या नात्यात ते भावनिकदृष्ट्या एका अक्षांश-रेखांशावर असतात ते केवळ त्यांच्या शरीरांच्या मीलनाच्या क्षणी. एरवी त्यांचा प्रवास विरुद्ध दिशानी होत रहातो. चंद्रकला पराकोटीचा द्वेष, ईर्षा, अहंकार, शारीर आकर्षण हे टप्पे पार करत करत मास्तरांवर प्रेम करायला लागते. त्या प्रेमाची परिणती अर्थातच विफलतेमधे होते. मास्तर त्या बाईला कःपदार्थ, हीन शीलाची समजणे, तिच्याबद्दल कुतूहल, तिच्याबद्द्लच्या शारीरीक आकर्षणाने  घायाळ होणे, आणि मग अपमान, उपेक्षा यांच्या आगीत जळणे, आणि शेवटी , आपली एक महात्मा ही ओळख कायम ठेवत फासावर जाणे या प्रवासाने जातात. त्यांच्या या सुट्या सुट्या प्रवासात एकच स्टेशन एकत्र लागते : शरीराचे, त्यांच्या मीलनाचे...
माझ्या मते नाट्याचा परमोत्कर्षाचा बिंदू म्हणजे ....कोर्टामधे खरी कहाणी सांगायच्या प्रसंगी चंद्रकलेची वाचा जाणे. मला वाटते, शांताराम बापूनी, आणि संध्याबाईनी "अखेर जिंकली" ती या प्रसंगात. 
संजोपरावानी येथे येत रहावे , लिहीत रहावे , अशी मनोमन इच्छा वाटते.
 
 

'पिंजरा'चे मार्मिक रसग्रहण आवडले. सगळ्यात पटणारे काय असेल तर तुम्हाला जे वाटले ते प्रामाणिकपणे आणि तरीही एक आब राखून लिहिले आहेत. त्याबद्दल तुमचे कौतुक वाटते आणि म्हणून अभिनंदन!वैयक्तिकरीत्या मी लागूंच्या 'अभिनयाचा' चाहता नाही. अतिशय कृत्रिम अशी संवादफेक आणि जाणूनबुजून लावलेल्या आवाजामुळे ते भूमिकेतून कायमच एका ठराविक अंतरावरुन जात असलेले जाणवतात, तिच्यात मिसळून जात नाहीत.
निळूभाऊंबद्दल काय बोलावे? अतिशय नैसर्गिक, वाचिक आणि कायिक अभिनयाची जबरदस्त देणगी असलेला कलावंत! चेहरा, डोळे आणि संपूर्ण शरीर ह्याचा यथोचित वापर करुन ते जे काही साधतात त्यातून भल्याभल्यांना शिकण्यासारखे आहे (अवांतर - 'कूली' मधे अमिताभसमोर ते कसे काम करतात हे बघावे म्हणून मी तो सिनेमा बघितला आणि त्यांचे सफाईदार हिंदी उच्चार ऐकून आणि ताकदवान अभिनय बघून त्यांच्या पायावर मनोमन डोके ठेवले! एकाही संवादात असे पुसटही वाटत नाही की हा कलाकार मूळचा मराठी आहे, क्या बात है!!)'पिंजरा' मधल्या मला सर्वात आवडलेल्या गोष्टी म्हणजे जगदीश खेबूडकरांची अप्रतिम गाणी (अगदी तुम्ही म्हणता तशी गदिमांच्या शब्दाशी सलगी करणारी गीतं) आणि रामभाऊंचं गावरान ठसकेबाज संगीत, जणूकाही कृष्णेकाठच्या हिरव्या वांग्यांची भाजी आणि भाकरीची मेजवानीच! मी स्वतः रामभाऊंना भेटलो आहे, त्यांच्याशी बोललो आहे, मातीतल्या एका सच्चा सुरांच्या त्या आठवणी जाग्या झाल्या!
तुमचे असेच लेखन अधिकाधिक वाचायला मिळो ही इच्छा.
चतुरंग

प्रकाश घाटपांडे's picture

1 Mar 2008 - 3:29 pm | प्रकाश घाटपांडे

"आरं बजरंगा नकोस घालू पिंगा हे वागनं बर नव्हं." अशी यल पी लागली कि मंग आमच याड पळायचं आदुगरच तमाशाचं गांव . बाजारच्या दिवशी तमाशा. पंचक्रोशीतल्या गावांची वाड्यातोड्यांची मेजवानीच.मुक्ताबाईच्या जत्रेला श्रावणी मंगळवार असला कि प्रत्येक आळीचा तमाशा. त्रिपुरी पौर्णीमेला बी तमाशा. बहिरोबाच्या जत्रेला तमाशा. बेल्हेश्वराच्या जत्रेला तमाशा. आमाला घरचे पघु द्यायचे नाई. आमचे देव गुरुजी सांगायचे कि आरे या तमाशातल्या बायांची सकाळी त्वांड बघा. वकायला येइन. चाल्ले तमाशाला.
हायस्कुलच्या इमारत निधिला शाळेनच तमाशा ठेवला मंग काय करनार?
प्रकाश घाटपांडे

झकासराव's picture

1 Mar 2008 - 8:45 pm | झकासराव

आपल्या लेखणीचा मी फॅन बनलो काही लेख वाचुन मनोगतावर.
इकडे कधी फारसे लिहिले नाहीत. पण हा षटकार होता. :)
लिहित रहा आम्ही वाचत राहु :)

प्रमोद देव's picture

1 Mar 2008 - 8:56 pm | प्रमोद देव

पण एका गोष्टीत मतभिन्नता आहे.

त्या मानाने 'कशी नशिबानं थट्टा आज मांडली' काहीसे बटबटीत वाटते. बाबुजींचा सूर सच्चा हे खरे, पण उच्चारात भाव काहीसे कोंबून बसवण्याच्या हट्टापायी म्हटलेले 'त्याच्या काळजाची तार तिनं छेडली' हे थोडेसे नाटकी वाटते. आणि त्यातले संध्याचे 'न्हाई, न्हाई...' हे तर फारच उथळ वाटते.

माझ्या मते हे गाणे म्हणजे ह्या चित्रपटाचे सार आहे (आणि 'कळस'ही). चालही उत्तम आहे,बाबुजींनीही तितकेच उतम आणि समरसून गायलंय. हे गाणे वजा केले तर चित्रपटातली मजाच निघून जाईल.

बाकी इतर बाबतीत रावसाहेबांशी सहमत आहे.

भडकमकर मास्तर's picture

2 Mar 2008 - 3:46 am | भडकमकर मास्तर

मस्त परीक्षण....
.......... संध्याबाईंची अभिनयाची पद्धत आम्हाला खूप खोटी खोटी आणि नाटकी वाटते...आणि ते उथळ न्हाई न्हाई, अगदी विनोदी....

धनंजय's picture

2 Mar 2008 - 4:55 am | धनंजय

सुंदर गाणी, चांगली कथा, जरा भडक दिग्दर्शन, आणि संध्याबाईंचे काम विसरायची मनापासून इच्छा, या गोष्टी पिंजर्‍याबद्दल लक्षात राहातात.

फारा दिवसांनी तुमचे लेखन वाचायला मिळत आहे. परीक्षणाबद्दल धन्यवाद.

विकास's picture

2 Mar 2008 - 8:15 am | विकास

सुंदर गाणी, चांगली कथा, जरा भडक दिग्दर्शन, आणि संध्याबाईंचे काम विसरायची मनापासून इच्छा, या गोष्टी पिंजर्‍याबद्दल लक्षात राहातात.

अचूक वर्णन जरी दोन अडीच तासाच्या सवयीने संध्याचे काम आवडायला लागले असे वाटते.. :) यातील पथेटीक पर्सनॅलीटी म्हणून निळू फुलेंचे काम लक्षात रहाणारे आहे. तसेच आवडते गाणे हे उषाने म्हणलेले "तुम्हावरं केली मी मरर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल" हे आहे. (फक्त त्यातील पहील्या कडव्यात "जवळ यावं मला पुसावं.." असे ऐकल्यावर आमच्या वेळची पोर फिदीफिदी हसली होती...)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Mar 2008 - 8:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रावसाहेब,

'पिंजरा' चित्रपट आम्हाला आवडतो, शोकांतिका म्हणावी तसे गुण या चित्रपटात. त्यातली गाणीही आम्हाला तितकीच आवडतात. बाकी आपल्या चित्रपटाच्या परिक्षणाने आम्हाला या चित्रपटात असलेल्या बारकाव्यांकडे पाहण्याची एक दृष्टीही दिली, म्हणजे पिंजरा चित्रपटातल्या अनेक गोष्टी पाहण्याच्या राहिल्या असे आम्हाला वाटले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉ.प्रसाद दाढे's picture

9 Mar 2008 - 11:24 pm | डॉ.प्रसाद दाढे

'ग..साजणी' हे पि॑जरा चित्रपटातील उत्कृष्ट गीत माझ्या माहितीनुसार (कै) 'वाघ्या' नामक एका 'फोक' गायकाने म्हटले आहे. ते गाणे ज्या ठसक्यात म्हटले आहे तसे आजतागायत इतर कुणालाही म्हणता आलेले नाही असे आमचे मत आहे.

भडकमकर मास्तर's picture

10 Mar 2008 - 12:02 am | भडकमकर मास्तर

फोक गायक म्हणजे बहुतेक फोकसंगीत सिंग करणारा.. :))

धनंजय's picture

10 Mar 2008 - 12:34 am | धनंजय

अथवा ...लीचा गायक अशा आणखी दोन व्युत्पत्ती शक्य आहेत.

सिंगर या मराठी शब्दाचा अर्थ आहे शिवणाचे यंत्र. "फोक सिंगर" म्हणजे छडीने डागडुजी केलेले शिवणयंत्र (फोक = छडी). फोक सिंग करणे म्हणजे एखादी खोटी कथा (फोक) सरदारजीचा विनोद म्हणून खपवणे.

गंभीर चर्चेत डॉ.साहेबांनी चांगली माहिती मांडली, थट्टेचे नशीब तिच्या वाटेला आले पण आमच्याकडून, हे दुर्दैव.

शुचि's picture

27 Feb 2013 - 8:05 pm | शुचि

परीक्षण खूप आवडले.

प्राध्यापक's picture

27 Feb 2013 - 8:48 pm | प्राध्यापक

अप्रतिम परीक्षण, खूप आवडले.
चित्रपटातील पाटलाच्या पात्राचा अभिनय ही छान,{त्या जेष्ठ कलाकाराचे नाव माहीत नाही}.

सन्जोप राव's picture

28 Feb 2013 - 5:36 am | सन्जोप राव

बहुदा बर्चीबहाद्दर.
धन्यवाद.

हुप्प्या's picture

28 Feb 2013 - 1:35 am | हुप्प्या

ह्यातील आवडलेल्या गोष्टी म्हणजे गाणी, गाणी आणि निळू फुले. बस्स. त्यातही आली ठुमकत नार आणि तुम्हावर केली मी मर्जी ही बेष्ट! ते दे रे कान्हा चोळी लुगडी गाणेही नको वाटते. उगाच अध्यात्म वगैरे घुसडायचा केविलवाणा प्रयत्न वाटतो.
बाकी बटबटीतपणा अतीच आहे. परीक्षणात ह्या वर्मावर बोट ठेवले आहे. सिम्बॉलिजमचा अतिरेक हास्यास्पद होतो. व्ही शांताराम ह्यांना असल्या सिम्बॉलिक गोष्टींचा हव्यास आहे हे बाकी सिनेमातही दिसते.
मुळात तो मास्तर लग्न बिग्न भानगडीपासून इतका फटकून का असतो आणि संध्यासारख्या भुताच्या प्रेमात का पडतो हे आजिबात पटत नाही. आणि त्या मास्तराच्या हत्येकरता त्यालाच फाशी देणे तर अचाट आणि आचरट वाटते.
संध्या हे चित्रपटसृष्टीला पडलेले दु:स्वप्न आहे (माझ्या मते)!

हा लेख वर आणल्याबद्दल आभारी आहे. आधी वाचला नव्हता.

अर्धवटराव's picture

28 Feb 2013 - 2:41 am | अर्धवटराव

>>मुळात तो मास्तर लग्न बिग्न भानगडीपासून इतका फटकून का असतो आणि संध्यासारख्या भुताच्या प्रेमात का पडतो हे आजिबात पटत नाही.
-- मास्तर लग्न बिग्न करत नाहि म्हणुनच कदाचीत भुतीण बाईच्या मागे लागला असावा ;)

अर्धवटराव

मन१'s picture

28 Feb 2013 - 6:24 pm | मन१

चित्रपट माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे.

तिमा's picture

4 Mar 2013 - 6:52 pm | तिमा

चित्रपट बर्‍याच ठिकाणी बटबटीत वाटला होता आणि तरीही साधारण आवडला होता. पण रावांचं हे परीक्षण जास्त आवडले. संध्या , या नटीविषयी काय वाटायचे ते इतक्या नेमक्या शब्दात कधी सुचले नव्हते. धागा वर आणणार्‍यांचे आभार.

आबा's picture

4 Mar 2013 - 7:24 pm | आबा

परिक्षण आवडले

अवांतर: मध्यंतरी "डेर ब्लाउ अ‍ॅन्गेल" नावाचा चित्रपट पाहण्यात आला होता पिंजरा आणि त्याचं कथानक सारखंच असल्याच लक्षात आलं. हा चित्रपट यूट्यूब वर उपलब्ध आहे !

अग्निकोल्हा's picture

5 Mar 2013 - 8:34 pm | अग्निकोल्हा

चित्रपट सहन होणे नाही.

हुप्प्या's picture

28 Mar 2013 - 8:17 am | हुप्प्या

http://www.saamana.com/2013/March/28/Link/Mumbai2.htm
लवकरच ह्या सिनेमाला ४१ वर्षे होतील. इथेही म्हटले आहे की हा सिनेमा ब्लू एंजल ह्या चित्रपटावर आधारित आहे.
हा श्रीराम लागूंचा पहिलाच सिनेमा म्हणे. हे मला माहित नव्हते.

लई भारी's picture

4 Jun 2015 - 11:57 pm | लई भारी

परिक्षण एकदम आवडले. 'कोल्लापुरी' भाषेचा प्रभाव सहज जाणवतो.
एक बारिक मुद्दा -
>>>आणि चंद्रकलेच्या नादानं घरदार सोडून फरपटत आलेला असाच तिचा एक आशिक
हे वर्णन निळु भाउं साठी असेल तर माझ्या मते ते 'अक्का' च्या नादाने घरदार सोडून आलेले असतात, चंद्रकलाच्या नाही.
बाकी भाउंच्या भूमिकेला तोड नाही हे खरेच.
'ग साजणे' परत शोधून ऐकले :)

सिरुसेरि's picture

5 Jun 2015 - 12:54 pm | सिरुसेरि

पिंजराचे कथा , संवाद कोणी लिहिले ते समजुन घ्यायला आवडेल . संध्या यांना हा रोल चुकीच्या वयात मिळाला असे वाटते. बाकी त्यांचे 'झनक झनक पायल बाजे' , नवरंग , सेहरा अशा अनेक गाजलेल्या हिन्दी चित्रपटातील काम उत्क्रुष्ट होते . तसेच 'नैन से नैन नाही मिलाओ' , 'अरे जारे जारे नटखट', आधा है चंद्रमा' , 'पंख होते तो उड आती रे' अशा अनेक गीतांवरचे अवघड न्रुत्यही खुप चांगल्या प्रकारे सादर केले .

गणेशा's picture

5 Jun 2015 - 1:28 pm | गणेशा

अप्रतिम

तिमा's picture

6 Jun 2015 - 2:43 pm | तिमा

बाकी त्यांचे 'झनक झनक पायल बाजे' , नवरंग , सेहरा अशा अनेक गाजलेल्या हिन्दी चित्रपटातील काम उत्क्रुष्ट होते . तसेच 'नैन से नैन नाही मिलाओ' , 'अरे जारे जारे नटखट', आधा है चंद्रमा' , 'पंख होते तो उड आती रे' अशा अनेक गीतांवरचे अवघड न्रुत्यही खुप चांगल्या प्रकारे सादर केले .

ही वाक्ये वाचून फारच हंसू आले. स्वतःच्या मानेची अनावश्य्क अति हालचाल आणि सदैव ते कमरेवर हात ठेवून डोळे मटकावत बोलणे, ह्या अभिनयाला आम्ही तरी अतिकृत्रिम समजत होतो.

सिरुसेरि's picture

10 Jun 2015 - 12:42 pm | सिरुसेरि

"ही वाक्ये वाचून फारच हंसू आले. स्वतःच्या मानेची अनावश्य्क अति हालचाल आणि सदैव ते कमरेवर हात ठेवून डोळे मटकावत बोलणे, ह्या अभिनयाला आम्ही तरी अतिकृत्रिम समजत होतो."
या प्रकारच्या अतिकृत्रिम लकबी तर वैजयंतीमाला ,हेमा मालिनी, आशा पारेख , साधना या सुद्धा करायच्या . पण त्या अमराठी त्यामुळे त्यांना सगळे माफ . घर की मुर्गी दाल बराबर .

पिलीयन रायडर's picture

10 Jun 2015 - 2:05 pm | पिलीयन रायडर

नाही हो.. वैजयंतीमाला ,हेमा मालिनी, आशा पारेख , साधना ह्यांच्या लकबीत नाजुकपणा, अदाकारी असं काहीतरी होतं.
संध्या ह्यांच्या लकबींना हिसके देणं म्हणता येईल. काहीतरी विचित्रच स्टाईल होती त्यांची.

सिरुसेरि's picture

10 Jun 2015 - 3:17 pm | सिरुसेरि

एखादी मराठमोळी अभिनेत्री , अमराठी वैजयंतीमाला ,हेमा मालिनी, आशा पारेख , साधना यांच्या गर्दीत नायिका म्हणुन उभी राहते . शांताराम बापुंच्या थोड्या वेगळ्या पठडीतल्या / कथानकांच्या सिनेमांमध्ये नायिकेचा रोल निभावते . ('झनक झनक पायल बाजे' , नवरंग , सेहरा ) . दिग्दर्शक , न्रुत्य दिग्दर्शक यांचा विश्वास सार्थ ठरविते . शांताराम बापुंच्या सिनेमांमध्ये त्याकाळचे टॉपचे नायक - जसे की देव , दिलिप , राज नसतानाही त्या मानाने कमी परिचित नायकांबरोबर (गोपिक्रिष्न , महिपाल ) आपली भुमिका चोख बजावते . व सिनेमाच्या यशामध्ये आपलेही योगदान देते. हे कर्तुत्व टाळता येणार नाही. कितीही जड वाटले तरी. 'झनक झनक पायल बाजे' , नवरंग , पिंजरा असे अनेक चित्रपट भारतात सर्वत्र व भारताबाहेरही लोकप्रिय व आर्थिक द्रुष्ट्याही यशस्वि झाले . व यश हे नेहमीच सांघिक कामगिरिमुळे साध्य होते.