माझा धातुकोष. - भाग दुसरा

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
24 Sep 2009 - 2:01 pm

एकूण शिल्लक पस्तीस हजार रुपये.
कर्ज जवळजवळ सत्ताविस लाख रुपये.
घराची किंमत साडेचार लाख रुपये.
देवीलाल शून्य .मांगीलाल बरेच.
शैक्षणीक पात्रता जेमतेम ग्रॅज्युएट.
सरकारी नोकरी जाण्याच्या बेतात.
शारीरीक श्रमाची कुवत मर्यादीत.
सोबती सगळे याच खात्यात.
घरचे बरे होते ते घरी बसले.
माझं घरचं आणि बाहेरचं दोन्ही एकसारखं वाईट.
रोज सकाळी बाहेर पडायचो कारण घरात बसवायचं नाही म्हणून .
मार्केटवाले भेटतील म्हणून मार्केटमध्ये जायचं नाही.
दुसरं काही येत नाही.
कर्ज फेडायचं हे नक्की .
पगार बँकेत जमा झाला की व्याज पोहोचतं करायचं .
खात्यात पाचशे रुपये पण ठेवत नाही म्हणून काउंटरवर बसलेले कारकून ओरडायचे.
सावकार बोटानी थुंकी पैशाला लावत " आता परतफेड कधी "असं विचारायचे.
पहीले दोन महीने ताण जाणवला नाही
मग जून महीना उजाडला:
एकाच महीन्यात दोन महीन्याची फी. रेनकोट,छत्र्या.वह्यापुस्तकं ,पाण्याच्या बाटल्या, आणि नविन दप्तरं.
दोन दिवस मांगीलाल गप्प बसले .
तिसर्‍या दिवशी घरचा फोन सकाळी साडेसात पासून वाजायला लागला.
त्याच्या पुढच्या आठवड्यात बिल भरलं नाही म्हणून फोन बंद.
एक मांगीलाल घरी येऊन गेला.
दुसर्‍याचा अस्वस्थ आत्मा मित्राकडून निरोप पाठवायला लागला.
तिसरा बँकेत जाऊन शिल्लक बघून आला.
जुलै :
जूनचे मांगीलाल गप्प.
जुलैचे अस्वस्थ .
ऑगस्ट महीना :
सगळेच कळवळायला लागले.
मांगीलाल पहील्या स्टेजमध्ये कळवळणार.
दुसर्‍या स्टेजमध्ये अंदाज घ्यायला घरी बोलावणार.
तिसर्‍या स्टेजला आपल्या घरी फेर्‍या मारायला लागणार.
चौथ्या स्टेजमध्ये त्यांच्या आयुष्यात जे काही बरं वाईट होतं आहे त्याचं खापर तुमच्या डोक्यावर फोडणार.
पाचव्या स्टेजला आक्रमक होणार.आक्रमणात वजनदार व्यक्तींना सामील करणार.
नातेवाईकांना भेटून नाचक्की करणार.
आपल्या गैरहजेरीत सपत्नीक घरी येऊन आपल्या बायकोला भेटून असा नादान नवरा कुठे भेटला याची चौकशी करणार.
बायको खमकी असली तर ती त्यांना वाटेला लावणार.
(पण आपल्या बायकोच्या नशीबी
कर्ज फेडण्याचा निर्धार केलेला नवरा आलेला असतो.)
ऑगस्ट,सप्टेंबर ,ऑक्टोबर :
दागीने काढून विकले.
आता घरात दोनच अलंकार .
तिच्या गळ्यात काळी पोत .आणि माझ्या अंगावरचं जानवं.
रोज दिवाळखोरीची उजळणी.
"मुलं लहान आहेत त्याचा फायदा घ्या.घर विकून हैद्राबादला वगैरे जा."काही मित्रांचा सल्ला.
"अंकल चार शिकवण्या घ्याल का ?"शेजार्‍यानी विचारलं .
बायको म्हणाली "घर विकून कर्ज फेडू या .मालकीचं घर काय आणि भाड्यानी घेतलेलं घर काय शेवटी तुम्ही मला आणि तुम्हाला मी "
एक भाबडा युक्तीवाद .
ऑगस्ट,सप्टेंबर ,ऑक्टोबर:सगळे शो आळीपाळीनी री-रन होत होते.
नोव्हेंबर:क्रेडीट कार्डाचे पठाण यायला सुरुवात .
डिसेंबर: कोर्टाच्या नोटीशी यायला सुरुवात .
जानेवारी: क्रेडीट कार्डाचा पठाणाची अरेरावी.
फेब्रुवारी: माझी आणि क्रेडीट कार्डाचा पठाणाची मारामारी .

वाण्याकडून सामान यायला उशीर व्हायला लागला.तक्रार करायला गेलो तर वाण्याचा बाप गल्ल्यावर बसला होता.
"क्या करेगा सेठ .लेट तो होयगा ना.रोकडे वालोंको पयला सर्वीस देना पडता है.
आप भी सोचो आप भी तो धंदेवाला है क्या बोलता मै .."
थोडक्यात उधारीनी मुर्वतीची पातळी ओलांडली .
मार्च :वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमधून निमंत्रण.धमक्या.
फेब्रुवारी -मार्च: पोलीसांशी वाटाघाटी.
एप्रील : मुलांच्या शाळेतून निरोप .उरलेली फी भरल्याशिवाय रिझल्ट मिळणार नाही.
धाकट्याला वाचता येत नव्हतं पण मोठीला वाचता येत होतं .
तिचा चेहेरा कावराबावरा झाला होता.
फी भरायला सात आठ दिवस बाकी.
हातातली बाकी साडेसातशे रुपये.
घरातून नेहेमीप्रमाणे आज करतो व्यवस्था काहीतरी असं म्हणून बाहेर पडलो.
रात्री घरी गेलो.
"बाबा ,आणले पैसे .?"
"उद्या मिळणार हां बेटा "
"बाबा उद्या नक्की आणा ."
दुसर्‍या दिवशी तेच.
तिसर्‍या दिवशी तेच.
"बाबा ,परवाचा दिवस शेवटचा."
"उद्या नक्की आणतो."
उद्या उजाडला.
पैसे येणारच नव्हते.
"बाबा,आज रात्री आणणार ना पैसे.?"
"येस. प्रॉमीस .""
"बाबा आज गॉड प्रॉमीस "
मुलं शाळेत गेली
कपाट उघडलं .
हाजलब्लाड्चा कॅमेरा घेतला.विकला.
फी भरली.
घरी एकटाच बसलो होतो.
हा महीना एप्रील .पुढच्या महीन्यात काय विकायचं ?
मे मध्ये टीव्ही.
जून महीन्यात वॉशींग मशीन.
येईल मग जुलै.
काय विकणार ?
किडनी...?
काय करावं काही सुचेना .
रात्री एकटाच टिव्ही बघत बसायचं.
रात्री कोणीतरी पैसे मागायला येईल म्हणून हॉलमध्ये एकटंच झोपायचं .
डोळ्यासमोर मागचा सिनेमा सतत चालू रहायाचा.
एका रात्री बहुबेगम बघत होतो.
कव्वाली सुरु झाली .
वाक़िफ़ हूँ खूब इश्क़ के तर्ज़-ए-बयाँ से मैं
कह दूँगा दिल की बात नज़र की ज़ुबाँ से मैं -
ठेक्यावर पाय हलायला लागले.
घराच्या भिंती जवळ जवळ यायला लागल्या .श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला.
ज़मीं हम्दर्द है मेरी न हमदम आसमां मेरा
तेरा दर छूट गया तो फिर ठिकाना है कहाँ मेरा
उद्याच्या दिवशी कशाला सामोरं जायचं आहे याची यादी डोळ्यासमोर फिरायला लागली.
गाण्याची एकेक ओळ एकेका जखमेला उघडी करत होती.
यही है इम्तहाँ तेरा, यही है इम्तहां मेरा
यही है इम्तहाँ तेरा, यही है इम्तहां मेरा
पोटातलं पित्त डुचमळून घशाशी आलं .
कडवट चव जीभेवर आली .
आता इम्तहाँ बाकी आहे.
डोळ्यासमोर सगळं काही धूसर दिसायला लागलं .
हैराँ खड़ी हुई है दोराहे पे ज़िंदगी
नाकाम हसरतों का जनाज़ा लिये हुए
मी ढसढसा रडायला लागलो.
नाकाम हसरतों का जनाज़ा लिये हुए
गरगरायला लागलं .
अब ऐसे में तुझ को ढूँढ कर लाऊँ कहाँ से मैं
माझं हरवलेलं नशीब आता कुठून शोधून आणणार होतो मी.
टिव्ही बंद करायला हात उचलेना.
बसल्या जागी मी भडाभडा ओकलो.
नाकातोंडात जाळ जाळ .
मला आठवत नाही मी किती वेळ तसाच पडून होतो.
जागा झालो तेव्हा पहाट झाली होती.
अचानक तरतरीत वाटत होतं .
तडक आंघोळीला गेलो.सकाळी साडेनऊ वाजता घर सोडलं ते एकाच विचारानी .
काल रात्री माझ्यातलं विष बाहेर पडलं आहे .
आज वाट फुटेल तसा चालत जाईन पण आज मी उद्याला बदलणार आहे.
माझ्या स्कूटरच्या समोर बस होती .ती डावीकडे वळली मी डावीकडे गेलो.
नंतर एक ट्र्क आला.उजवीकडे वळला.मी उजवीकडे गेलो.
आजूबाजूला न बघता चालवत होतो.
ट्रक थांबला .मी पण थांबलो.
कोठारी कंपाउंड असा बोर्ड वाचला.
परत ट्रकच्या मागे गेलो.
महाराष्ट्र वेअरहाउसींग कार्पोरेशनचा बोर्ड आला.
पेट्रोल संपल. स्कूटर बंद पडली.समोर मोठमोठी गोडाऊन होती.
ट्रकांच्या रांगा लागल्या होत्या. हमाल पोती भरत होते.
मी बाजूला उभा राहीलो.एक माणूस आला .
"शेठ आप ऑक्ट्रॉयवाला है क्या ?"
मी नकारार्थी मान हलवली .
"फिर हमार पिच्छे कायको आ रहा था ?"ट्रक ड्रायव्हर असावा.
"ऐसेही."
"ऐसेही ?"त्याच्या चेहेर्‍यावर काय येडं आहे असा भाव दिसला .
पाच दहा मिनीटानी एक साहेब दिसणारा माणूस त्याच्या सोबत आला.
"सर ,धिस इज कस्टम बाँडेड वेअरहाऊस ."
मी काहीच बोललो नाही .
"इफ यू डोंट हॅव एनी वर्क प्लिज लिव्ह द प्रीमायसेस."
मी त्यांच्याकडे बघून हसलो.
तो माणूसही हसला .
"आप क्या करते है."
मोठा कठीण प्रश्न होता.
घरी बसलो आहे हे काय सांगायचं .
"हाउसकिपींग "
त्या माणसाच्या चेहेर्‍यावर देव दिसल्याचा आनंद मला दिसला.
"आय अ‍ॅम शेट्टी.कस्टोडीअन ."
"सर आप कोनसा एरीआमे काम करते है ?"
आता काय सांगायचं .
ज़मीं हम्दर्द है मेरी न हमदम आसमां मेरा
तेरा दर छूट गया तो फिर ठिकाना है कहाँ मेरा

"काम मिलेगा वैसा काम करता हूं."
मग शेट्टीनी मला विचारलं "आमचं एक काम थकलं आहे ते कराल का ?"
आता माझी पंचाईत झाली.थातूरमातूर उत्तर अंगाशी आलं होतं.
मी हळूच विचारलं काय काम आहे.
शेट्टी म्हणाले"चला दाखवतो"
शिपायाला बोलावलं सी-३ सी-४ वगैरे काहीतरी म्हणाले.
गोडाऊनची शटर वर गेली मला आत काहीही दिसेना .पायाखाली मातीचा थर जाणवत होता.
"ही गोडाउन झाडून साफ करून हवी आहेत. हे कुठलं तरी ओअर आलं होतं.त्याची डिलीव्हरी झाली पण साफसफाई करायची राहीली आहे."
"पण तुमच्या कडे लेबर आहे की."मी म्हटलं.
झक मारली आणि खोटं बोललो असं झालं होतं.
"ते आहे हो पण ते आहे बोर्डाचं (माथाडी)लेबर.त्यांचा रेट आम्हाला नाही परवडत ."
(नविन माल साठवण्यापूर्वी साफसफाई करणं बोर्डाची जबाबदारी असते)
दोनशे गाड्या मसूर चार पाच दिवसानी येणार होता.
त्या घाणेरड्या काळ्या मातीत मसूराची पोती ठेवून पार्टीचं नुकसान झालं असतं.
मी पाच मिनीटं विचार केला.काय रेट देणार?
शेट्टी म्हणाले "सरकारचा रेट पासष्ठ रुपयांचा आहे. मी पार्टीशी बोलतो ते आणखी काही वाढवून देतील."
तासाभराच्या बोलण्यानंतर मी एका गोडाउनच्या साफसफाईचे सहा हजार सांगीतले.शेट्टीनी पार्टीला फोन केला .
पार्टीनी दुजोरा दिला .
मी म्हटलं "ठीक आहे .उद्या लेबर सकाळी घेउन येतो.पहीलाच दिवस आहे.थोडा उशीर होईल .परवापासून वेगानी काम सुरु होईल."
फोन नंबरची देवाण घेवाण झाली.
मला जरा आत्मविश्वास वाढल्यासारखं वाटलं .
---------------------------------------------------------------------
सकाळी उठून नाक्यावर गेलो.लेबर सकाळी नाक्यावर मिळतं असं रात्री आमच्या सोसायटीच्या वॉचमननी सांगीतलं होत.नाका माणसांनी फुलून गेला होता. घोळका करून माणसं उभी होती.अर्ध्याहून अधीक माणसं मला न कळणार्‍या भाषेत बोलत होती. पांढरी पँट आणि पांढरा शर्ट घातलेली माणसं त्यांच्या अंगावर ओरडत होती. मग दहा मिनीटानी एक घोळका दूर व्हायचा.त्या माणसाच्या मागे चालायला लागायचा. काही माणसं नळाच्या पायपाचा तुकडा हातात धरून फिरत होती.बाया एका घोळक्यात उभ्या होत्या.सुतार वेगळे ओळखता आले त्यांच्या हातातल्या लाकडी पेटी आणि त्यातून डोकावणार्‍या करवतीच्या टोकामुळे.रंगारी सुकलेले ब्रश आणि रंगाचे रिकामे डबे घेऊन फिरत होते ते पण ओळखता आले.पण मला पाहीजे असलेलं लेबर ते नेमकं कुठलं हे मला ओळखता येईना.नाक्यावरच्या मारवाडी चहावाल्याच्या दुकानात सफारी आणि पांढरे कपडे घातलेली माणसं जरा जास्तच दिसली .पंधरा मिनीटात एक नक्की कळलं होतं की ही माणसं लेबर नाहीत पण काँट्रॅक्टर असावीत.
"मी एका माणसाला विचारलं मला लेबर मिळेल का ?"
त्या माणसाच्या चेहेर्‍यावरून मला कळलं की फार बावळट प्रश्न त्याला विचारला आहे की ज्याचं उत्तर देण्यासाठी पान थूंकणं त्याला नामंजूर होतं.
त्यानी हातवारे करून गल्ल्यावरच्या मारवाड्याचं लक्ष माझ्याकडे वेधून घेतलं .
मी पुन्हा एकदा तोच प्रश्न त्याला विचारला.
माझा मध्यम वर्गीय चेहेरा वाचून त्यानी मला मराठीतच विचारलं ?
"साहेब ,लेबर काय पायजे? काय काम हाय ?"
मी सांगीतलं "साफसफाई साठी माणसं पाहीजेत ."
नाक्यावरचं लेबर घर साफ करायला मोंघ पडेल असं म्हणून "ते पेक्षा तुमी आणि बायडी करेल तर सस्ता पडेल" असा सल्लाही दिला.
मारवाड्याला मी सांगीतलं की गोडाऊन सफाईला माणसं पाहीजे आहेत.
एव्हढ्यात त्याचं आणि माझं बोलणं ऐकणारा माणूस समोर आला. त्यानी पण सफारी घातला होता.
"हिकडे या साहेब ."
एकदा परत प्रश्नोत्तराची उजळणी झाली .चर्चा झाली.
मला समजलं ते इतकंच की मला बायाच या कामाला घ्याव्या लागतील त्या सुध्दा नाक्याची वे़ळ संपल्यानंतर मिळल्यातर.
बांधकामाच्या लेबरचे रेट मला परवडणार नाहीत.
यांची हजेरी बाप्यांपेक्षा कमी असते. पण त्या ओळखीच्या मुकादमाच्या बरोबरच जातात.
थोडक्यात हजेरी देतो म्हटल्यावर बाया मिळतीलच असं नाही.
आता माझी पंचाईत वाढत चालली होती.
दहा मिनीटाच्या या चर्चेत मलाही कळलं होतं की एलप्पा लेबर काँट्रॅक्टर होता.
त्याला नाक्यावर फारसं कोणी विचारत नव्हतं.
साहजीकच होतं.त्यानी चहा प्यायला नकार दिला होता आणि सकाळी साडेनऊ वाजता तो बोलताना दारुचा वास येत होता.
सकाळच्या काही मिलीची व्यवस्था होईल का इतकाच अंदाज तो माझ्याशी बोलताना घेत होता.
मला पण आता धीर नव्हता.मी तडक विषयाला हात घातला.कामाचा अंदाज दिला.हातात पन्नास रुपये टेकवले.
एलप्पा विचारात पडला.मला थांबायची खूण करत तो नाक्याच्या गर्दीत घुसला. बाया त्याला बघीतलं की दूर व्हायच्या .बाप्ये त्याच्याशी बोलायला पण कबूल नव्हते.
दहा वाजायला आले.एलप्पाचं काही मला खरं वाटेना.मग एलप्पा एका पोरसवद्या मुलाला घेऊन माझ्याकडे येताना दिसला.त्याच्या बहीणीचा मुलगा अशी त्यानी ओळख करून दिली.जर मी हजेरीची जबाबदारी घेत असेन तर बाया घेऊन यायला तो तयार होता.मी एलप्पाच्याचेहेर्‍आकडे बघीतलं .त्याला सौदा फारसा मंजूर दिसत नव्हता.
मग मीच तोडगा सुचवला.त्या दोघांनी माझ्यासोबत यावं आणि काम बघावं .एलप्पाला मी मुकादम म्हणून हजेरी देईन.संध्याकाळी बाकीचं पेमेंट त्या पोराकडे मी देईन.
गोडाऊन मध्ये लेबर घेऊन येईपर्यंत दुपारचे बारा वाजले होते.
बायांनी काम करायला सुरुवात केली आणि काळ्या मातीचा धुरळ्यात मला काही उभं राहवेना.
एलप्पा पन्नासची दुसरी नोट घेऊन गायब झाला होता.
मी जेवायला घरी आलो.
-----------------------------------------------------------------------
दुपारी चार वाजता पोहचलो तर सगळ्या बाया गोडाऊनच्या बाहेर. काही झाडाखाली झोपलेल्या तर काही नळावर हातपाय धूत होत्या.
गोडाऊनमध्ये चार पाच ठिकाणी मातीचे ढिग तयार होते. खराटे आणि घमेली तशीच टाकून मंडळी आराम करत होती.
बाहेर आलो तर शेट्टी आणि एलप्पा हातवारे करून बोलताना दिसले.मी आल्याचं पाहील्यावर एलप्पा माझ्याकडे आला.
"काम नही होंगा .आजका हजेरी दे दो ."
मी शेट्टींकडे बघीतलं .ते खांदे उडवून ऑफीसकडे निघून गेले.
मला कळेना काय झालंय ते .
मी एलप्पाला विचारलं तर त्याचं एकच.
"आज का हजेरी देव.मैने काम नही करनेका."
बायांशी बोलायचा प्रयत्न केला तर त्यांचं बोलणं मला कळेना.सगळ्या बायका एकाच वेळी बोलायच्या .
एलप्पा काहीतरी बोलायचा .मग नवा गदारोळ.तोपर्यंत सकाळचा पोरगा मोटरसायकलवरून येताना दिसला.माझ्या जीवात जीव आला.
पुढचा अर्धा तास बाया ,एलप्पा आणि तो पोरगा यांची बाचाबाची चालली होती.
त्यांच्या बोलण्यात फक्त आशीट आशीट वारण्वार ऐकायला आलं .
मग तो पोरगा माझ्याकडे आला .
"सेठ,ये लोगाका हजेरी दे दो."
मी म्हटलं अरे बाबा हजेरी देतो पण काम का बंद केलं ते तर सांग .
"आपका मिट्टीमे आशीट है ."
चार वेळा आशीट म्हतल्यावर मला कळलं की तो अ‍ॅसीड म्हणतोय.
मी कपाळाला हात लावला.
आता हळूहळू मला कळत होतं की शेट्टीना लेबर का मिळत नव्हतं ते.
तो पोरगा आता बायांशी बोलत होता आणि त्या बोलल्या की मला सांगत होता.एलप्पा गप्प बसून ऐकत होता.
थोड्या वेळात मला समस्या कळली ती अशी की या मातीत अ‍ॅसीड आहे. माती नाका तोंडात गेली तर चक्कर येते आहे.आणि सगळ्यात महत्वाचं माती खराट्यानी लोटली जात नाही इतकी जड आहे.मी सगळ्यांसाठी चहा मागवला. एलप्पाला घेऊन गोडाऊनमध्ये गेलो.ओंजळीत माती घेतली .वास घेतला . ओंजळभर माती हातात घेतल्यावर हात भरून आले होते.
मनात एका क्षणात काहीतरी विचार आला आणि मी एलप्पाला घेऊन बाहेर आलो.
पोरगा आता गप्प बसून माझी वाट बघत होता. मी खिशातून पैसे काढल्यावर बायांचा कलकलाट थांबला. मी पैसे परत खिशात ठेवले.पोराला खूण केली .एलप्पाला गप्प बसून रहायची खूण केली.
त्या पोराला मी सांगीतलं हे बघ बाबा मी आता काम घेतलं आहे ते काही सोडणार नाही.हजेरी दुप्पट घे पण काम कर.
"लेकीन शेट चक्कर मारता है उसका क्या ?"
"फडका बांधो और काम करो."
"झाडू नया लाव. हजेरी डबल करो.अ‍ॅशीट लगेगा तो सोडा पिओ."
चर्चेचा एक नवा राउंड.
काही बाया तयार झाल्या .त्यांच्याकडे बघून बाकीच्या तयार झाल्या.
मी सगळ्यांची हजेरी वाटली.चहापाण्यासाठी जास्तीचे पैसे दिले.
एका प्लॅस्टीकच्या थैलीत माती गोळा करून मी शेट्टींच्या ऑफीसात गेलो.
मला बघीतल्यावर त्यांचा चेहेरा पडला.
ते म्हणाले "सॉरी बॉस मी तुम्हाला सांगणार होतो पण भायानी शेठ...."
मी हातानीच जाऊ दे अशी खूण केली.
मी त्यांना म्हटलं "साहेब हे कस्टम बाँडेड वेअरहाउअस आहे ना ?"
शेट्टीनी मान डोलावली.
"मला बिल ऑफ लेडींगची कॉपी द्याल का ?"
फाईल समोर आली.
इंडीअन लेड कंपनीनी मागवलेला माल होता.
डिस्क्रीप्शन : ग्राउंड बॅटरी स्क्रॅप.
मला सगळा उलगडा झाला होता.
दुसर्‍या दिवशी एलप्पा आणि बायांची वाट न बघता पहाटेच मी पालघरला रवाना झालो.
-----------------------------------------------------------------------

कोठारी मेटल्स पालघर.
झवेरचंद कोठारीनी एकदा काळजीपूर्वक माझ्याकडे बघीतलं .
"आपको मेरा अ‍ॅड्रेस किसने दिया."
मी खांदे उडवले.त्याचा चेहेरा त्रासदायक झाला.
"सँपल लाया है ?"
मी प्लॅस्टीकची पिशवी समोर ठेवली.
बेल दाबल्यावर एक माणूस आला.
"ये लॅब वालेको देव जल्दी.गलाके देख लो."
झवेरचंदनी आता परत प्रश्न विचारायला सुरुवात केली.
"ओरीजीन क्या है ?मालूम है ?"
नकारार्थी मान डोलावली.
हॅझार्डस मटेरीयलका लायसन है ?
मी आणलेलं मटेरीयल हॅझार्डस आहे ही मला बातमी होती.
"पोलुसन का लायसन ? वो भी नही होगा."
त्यानी कपाळाला हात लावला.
अर्धा तास त्याच्याशी बोलल्यावर त्यांना माझा नवखेपणा कळला आणि माझ्या गाढवचूका कळल्या.
मी आणलेलं सँपल भारी म्हणजे शिशाचं जास्त प्रमाण असलेला बॅटरीचा भुगा आहे.
मी घेतलेलं काम फक्त लेबर लायसन असलेला माणूस करू शकतो.मटेरीअल हॅझार्डस आहे.
सतत काम केलं तर लेबरला पॉयझनींग होऊ शकतं.
मी आधीच्या प्लॅन प्रमाणे भरावात माती उचलून फेकली असती तर चार वर्षाची सक्तमजूरीसाठी मी लायक उमेदवार होतो.
तेव्ह्ढ्यात लॅब रीपोर्ट आला.
६५% लेड कंटेंट.
"देखो आप जैसा पढालिखा आदमी .लेबरको चक्कर आयेगा नही तो क्या होगा."
माझ्या पोटात चारपाच गोळे आतापर्यंत आले होते.
"अब क्या करे .?"
(माझ्या डोळ्यासमोर माती झाडणार्‍या बायका चक्कर येऊन पटापट जमीनीवर पडतायत असा सीन उभा होता .)
"काम छोडके भाग जाव."
माझ्या डोळ्यात पाणी उभं राहीलं .
झवेरचंदनी बेल दाबली .पाणी मागवलं .चहा मागवला.
"मै आपका नुकसान नही करेगा.मै ये मट्टी उठा लेता हूं."
"एक टन का आठ हजार .लोडींग ,लेबर ,लायसन सब मेरा."
"आप शेट्टीसाहेबसे डिलीव्हरी चलान ले लो.हां एक बात और फिरसे ये काम नही लेना .
मंजूर है ?"
मी काय म्हणणार" मंजूर है."
आठ दिवसात अडुसष्ठ टन माती पालघरला पोहचली.
खर्चवेज जाता पन्नास हजार हातात शिल्लक राहीले.
माती विकून पन्नासहजार मी मनाशीच हसलो.
धातुकोषाचा पुढचा अध्याय आयुष्यात सुरु झाला होता.
-----------------------------------------------------------------------

वाङ्मयप्रकटन

प्रतिक्रिया

अवलिया's picture

24 Sep 2009 - 2:11 pm | अवलिया

जबरा !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

टारझन's picture

24 Sep 2009 - 10:00 pm | टारझन

अप्रतिम्स !!

सुनील's picture

24 Sep 2009 - 2:23 pm | सुनील

भन्नाट!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

निखिल देशपांडे's picture

24 Sep 2009 - 2:26 pm | निखिल देशपांडे

काका मस्तच हो...
धातुकोषाचा पुढचा अध्याय आयुष्यात सुरु झाला होता.

वाचायला उत्सुक आहोत..
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

झकासराव's picture

24 Sep 2009 - 2:36 pm | झकासराव

तरी बरा माणूस भेटला की तो.
मला वाटल आणि काय लफड्यात अडकाताय की काय?
वाचतोय. :)
मागच्या भागांची लिन्क नवीन भागात दिलीत तर जास्त बर होइल.

धमाल मुलगा's picture

24 Sep 2009 - 2:48 pm | धमाल मुलगा

रामदासकाका,
हॅट्स ऑफ!!!

प्रतिसादात बोलण्यासारखं फार काही शिल्लकच नाहीय्ये!
एकच म्हणेन....यु आर डॅम ग्रेट पर्सन :)

तुम्ही 'अशक्य' आहात रामदास !
तुमची धडाडी खरंच थोर आहे.

(अवांतरः 'पालघर' म्हणजे आमच्या जिव्हाळ्याचं गाव)

सहज's picture

24 Sep 2009 - 3:35 pm | सहज

लेखन लेखन म्हणजे हेच!

वाचकांना एका वेगळ्याच विश्वात फिरवुन आणता व शेवटी असे खिळवुन ठेवता की तोंडातुन साजेसा प्रतिसाद देखील पुरेसा उमटू नये? तुमचे शब्दवैभव पाहुन आमच्या दारिद्राची होणारी जाणीव केवळ भीषण!

रामदाससर तुमचे तीनशे लेख वाचायला मिळाले तर ते खरे आयुष्य!

टुकुल's picture

24 Sep 2009 - 10:10 pm | टुकुल

रामदाससर.. तुमच लेखन म्हणजे एकदम जबरदस्त !!
मानल तुम्हाला

--टुकुल.

समंजस's picture

24 Sep 2009 - 2:53 pm | समंजस

वा! काय कथा आहे! कथेतील वेग आणि घटना या मुळे अगांवर एकदम रोमांच उभे राहीलेत!!
पुढील भागांची वाट बघतोय!!

श्रावण मोडक's picture

24 Sep 2009 - 3:06 pm | श्रावण मोडक

जबरदस्त. पुढे लिहा. पुढच्यात वाचकाचा इंटरेस्ट संपतो वगैरे समजू नका. इथं इतक्या खंडानंतर आला आहात तरी हा इंटरेस्ट कायम आहे. आम्ही वाट पाहतोय.

मेघना भुस्कुटे's picture

24 Sep 2009 - 3:08 pm | मेघना भुस्कुटे

साष्टांग.
पुढचं लवकर लिहावं म्हणून कुठे काही नवस असेल तर सांगा, बोलून येते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Sep 2009 - 3:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काका, नमस्कार. त्यापुढे फार काही नाही, पण धातुकोषाचा पुढचा भाग आणि गोडबोल्यांच्या गोष्टीचाही पुढचा भाग टाका ना लवकर.

अदिती

नंदन's picture

24 Sep 2009 - 3:18 pm | नंदन
विसोबा खेचर's picture

24 Sep 2009 - 4:23 pm | विसोबा खेचर

नंदूबाबाशी सहमत..

रामदासभाऊ, जियो..

जबरा लेखन..

तात्या.

दिपक's picture

24 Sep 2009 - 3:26 pm | दिपक

रामदासांचे ले़ख वाचायला मिळणे म्हणजे सोन्याचा दिवस असतो. ग्रेट.

विंजिनेर's picture

24 Sep 2009 - 4:14 pm | विंजिनेर

साला काय एकेक अनुभव आणि काय डोकं....

झकास हो... मस्त...

गणपा's picture

24 Sep 2009 - 4:38 pm | गणपा

भन्नाट वेग आहे.
पुढचे भाग वाचायला उत्सुक आहे.

मदनबाण's picture

24 Sep 2009 - 5:14 pm | मदनबाण

जबरदस्त !!!
पुढच्या भागाची वाट पाहतोय...

मदनबाण.....

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

अनामिक's picture

24 Sep 2009 - 6:50 pm | अनामिक

हेच म्हणतो...
जबरदस्त अनुभव आणि तुमची जिद्द!

-अनामिक

स्वाती२'s picture

24 Sep 2009 - 5:53 pm | स्वाती२

आईशप्पत! काय भन्नाट अनुभव. पुढील भागाची वाट पाहातेय.

भोचक's picture

24 Sep 2009 - 6:09 pm | भोचक

क्लास. ग्रेट अनुभव नि जिद्द. बाकी लेखनशैली पकड घेणारी आहेच.

(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?

हा आहे आमचा स्वभाव

चित्रा's picture

24 Sep 2009 - 6:55 pm | चित्रा

कथा आवडली. पुढच्या भागांची वाट पाहत आहे.

अजय भागवत's picture

24 Sep 2009 - 7:14 pm | अजय भागवत

"ओल्ड क्लासिक" हिंदी (आनंद)/ मराठी (पिंजरा) / हॉलिवूड (व्हेअर इगल्स डेअर) सिनेमे बघतांना जो आनंद मिळतो तसा ही गोष्ट वाचून मिळाला. खिळवून ठेवलेत.

रेवती's picture

24 Sep 2009 - 7:16 pm | रेवती

दुसर्‍या भागात वेगळाच धातुकोष समोर आला आणि चकित झाले.
लेखन ग्रेट आहे.

रेवती

चतुरंग's picture

24 Sep 2009 - 7:54 pm | चतुरंग

काय जादू आहे समजत नाही ह्यांच्या शब्दांत पण एकदा वाचायला लागलो की खिळून रहातो; आयुष्याशी थेट दोन हात केलेल्या माणसाचे इतके टोकदार अनुभव असल्यानेच असेल कदाचित.
(आता लेडमध्ये नेऊन टाकले आहेत तर पुढला भाग लवकर नाहीतर पॉइझनिंग सुरु होईल!)

(थक्क)चतुरंग

विनायक प्रभू's picture

24 Sep 2009 - 8:04 pm | विनायक प्रभू

आणखी एक माणिक रामदास भौ

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Sep 2009 - 8:31 pm | बिपिन कार्यकर्ते

खुप काही शिकावं असं लेखन. वाचतोय... शिकतोय...

बिपिन कार्यकर्ते

ऋषिकेश's picture

24 Sep 2009 - 11:20 pm | ऋषिकेश

भयंकर ताकदीचं लेखन.. पुढील भागाची वाट पाहतोय

ऋषिकेश
------------------
रात्रीचे ११ वाजून १८ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "आयुष्य हे चूलीवरल्याऽऽ कढईतले कांदेप्पोहेऽऽ...."

धनंजय's picture

25 Sep 2009 - 12:56 am | धनंजय

(झक मारून वाचायला आलोच शेवटी.)

प्राजु's picture

25 Sep 2009 - 1:06 am | प्राजु

काय म्हणायचं तुम्हाला????
____/\____
बस्स!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

पाषाणभेद's picture

25 Sep 2009 - 2:29 am | पाषाणभेद

मानल तुम्हाला.
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.

- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

लवंगी's picture

25 Sep 2009 - 2:46 am | लवंगी

काका खिळवून टाकता वाचताना तुम्ही.. जबरदस्त ताकद आहे तुमच्या लेखणीत.. अस दर्जेदार लेखन कि परत परत वाचावस वाटत.
काका लिहित रहा असेच. पुढच्या लेखाची वाट पाहते.

शाहरुख's picture

25 Sep 2009 - 3:24 am | शाहरुख

जबरदस्त !!

मयुरा गुप्ते's picture

25 Sep 2009 - 3:36 am | मयुरा गुप्ते

काका मानलं तुम्हाला. खरचं नुसतं खिळवून नाही तर वाचताना काटा आला. शेवटच्या शब्दानंतर दीर्घ श्वास घेतला.
--मयुरा

पिवळा डांबिस's picture

25 Sep 2009 - 4:11 am | पिवळा डांबिस

रामदासबुवा पावले!!
नेहमीप्रमाणेच मस्त लिखाण!!!
पण हा तुमचा स्वानुभव नसो ही प्रार्थना...

अरुण मनोहर's picture

25 Sep 2009 - 6:49 am | अरुण मनोहर

केवळ झकास. इतके दिवस थांबल्यानंतर अशी माणके पहायला मिळाली. आणखी हिरे मोती केव्हा देणार?

अनिला's picture

25 Sep 2009 - 8:37 am | अनिला

वा! काय कथा आहे! कथेतील वेग आणि घटना या मुळे अगांवर एकदम रोमांच उभे राहीलेत!!
पुढील भागांची वाट बघतोय!! पहिले मला कविताच वाटली.

दशानन's picture

25 Sep 2009 - 9:34 am | दशानन

माय गॉड !

काय जबरा लिहलं आहे साहेब !

खुप सुंदर.. !

***
राज दरबार.....

विजुभाऊ's picture

25 Sep 2009 - 10:10 am | विजुभाऊ

मस्त श्टाईल......
भाऊ पाध्येंची आठवण झाली

यशोधरा's picture

25 Sep 2009 - 11:43 am | यशोधरा

ज ब र द स्त!

स्वाती दिनेश's picture

25 Sep 2009 - 4:49 pm | स्वाती दिनेश

ज ब र द स्त!
यशोसारखेच म्हणते,
स्वाती

सूहास's picture

25 Sep 2009 - 5:31 pm | सूहास (not verified)

थक्क...चकित आणी निशब्द...

सू हा स...

कपिलमुनी's picture

21 Aug 2013 - 10:18 am | कपिलमुनी

अदभूत !

अभय भावे's picture

21 Aug 2013 - 11:45 am | अभय भावे

रामदास
अप्रतिम
पूढील लेखाची वाट पहात आहे

अभय भावे's picture

21 Aug 2013 - 11:45 am | अभय भावे

रामदास
अप्रतिम
पूढील लेखाची वाट पहात आहे

तर्राट जोकर's picture

28 Mar 2016 - 1:46 am | तर्राट जोकर

रामदासकाका, __/\__

धातुकोष आणखी एक भाग वर आणत आहे.

अनेक वेळा वाचल्यावर आज मला एक प्रश्न पडला:

बायका कामाला लावून झाडूकाम करून जी पायाखाली थर रुपात उरलेली माती दूर करणं अपेक्षित होतं ती अदुसष्ट टन इतकी होती?

हा प्रश्न या विषयाच्या अज्ञानातून आलेला आहे अर्थातच.

मिसळपाव's picture

25 Mar 2019 - 8:11 am | मिसळपाव

लेड खूप जड असतं. पाण्यापेक्षा ११.३४ पट एव्हढं जड. मातीत ६५% लेड होतं असा रीपोर्ट होता. (प्रद्युम्नचा!!) म्हणून खराट्याने लोटलं जात नव्हतं.

हो हो. ते लक्षात आलं, पण पायाखाली केर या रुपात उरलेला मातीचा थर, जो बायका कामाला लावून झाडूनेही लोटून साफ करता येईल असं प्रथमदर्शनी गृहीत धरलं होतं तो केर सदुसष्ठ टन निघाला हे वाचून तसं विचारलं होतं.

शिवाय शंका दूर करायला का होईना पण रामदासकाका पायधूळ झाडतील अशा आशेनेही. ;-)

मिसळपाव's picture

25 Mar 2019 - 2:34 pm | मिसळपाव

शिवाय शंका दूर करायला का होईना पण रामदासकाका पायधूळ झाडतील अशा आशेनेही. ;-)

नवी पाहुणी आलेल्या वाडीतल्या घरात 'चुकून म्हणून' आपली वही विसरून यावी आणि आपल्या दारात पाउल टाकता टाकताच धाकट्या भावाने 'ही बघ राहीली होती तिथे' म्हणून आपल्यासमोर धरावी तसला प्रकार झाला हा :-)) सॉरी हां !!!

सविता००१'s picture

24 Mar 2019 - 8:39 pm | सविता००१

दंडवत घ्या. केवळ भारी