सध्या वाचत असलेली पुस्तके... भाग अमुकतमुक..

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
13 Sep 2009 - 6:05 pm

ही मी सध्या वाचत असलेली पुस्तके...
...
गेल्या महिन्याच्या मध्यात स्वाईन फ्लू उद्रेकामुळे काही काळ धंदा नियंत्रण करून घरी बसलो होतो .. त्या काळात ही ही पुस्तके वाचली...

१.कुमार माझा सखा
२.अवघड अफगाणिस्तान
३.सुलतान ( नाटिक संग्रह)
४. युगान्त ( त्रिनाट्य ... वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी , युगांत))
५.मौनराग
६.काटेसावरी ( नाटक)
७.अग्नि आणि पाऊस ( नाटक)
८.गगनभेदी ( नाटक)
९.प्रेमाची गोष्ट ( नाटक)
१०. कोबाल्ट ब्लू ( कादंबरी)
११. बेकेट ( नाटक)
१२. वाटा आणि मुक्काम
१३. एक शून्य बाजीराव

एकेका पुस्तकावर वेगळा धागा काढण्याइतके लिहायचे नाही ... म्हणून हा एकत्रित लिखाणासाठी धागा...

...

या धाग्यावर हळूहळू प्रतिसादातून एकेका पुस्तकाबद्दल लिहीत जाईन...

वाङ्मयविचारआस्वाद

प्रतिक्रिया

नंदन's picture

13 Sep 2009 - 6:24 pm | नंदन

या 'क्रमशः'ची आतुरतेने वाट पाहतो आहे. खासकरून युगान्त आणि मौनरागबद्दल बोटे मोकळी सोडून लिहिलेत तर फारच उत्तम :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सहज's picture

13 Sep 2009 - 6:41 pm | सहज

क्या बात है! आता डायरेक्ट ओप्रा विन्फ्रे बुक क्लब नंतर मास्तर पुस्तकपरिक्षण मंडळ कि :-)

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Sep 2009 - 7:26 pm | बिपिन कार्यकर्ते

आजपर्यंतचा सगळ्यात जीवघेणा क्रमशः !!! :(

मास्तुरे, अहो अ‍ॅटलीस्ट एका तरी पुस्तकाबद्दल लिहायचं ना?

बिपिन कार्यकर्ते

धनंजय's picture

15 Sep 2009 - 12:44 am | धनंजय

असेच म्हणतो.

रामदास's picture

13 Sep 2009 - 7:54 pm | रामदास

आणि रामदास यांची एक क्रमशा कादंबरी.
लिहायचं विसरलात का हो ?

भडकमकर मास्तर's picture

13 Sep 2009 - 7:58 pm | भडकमकर मास्तर

:)) :))
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

चेष्टा नाही, खरं सांगतो, फावला वेळ अजूनही पुस्तकांच्या सान्निध्यात घालवणारे तुमच्यासारखे लोक पाहिले की मला भरुन वगैरे येते! :)
ह्या भारतवारीत आणलेली पुस्तके आता हळूहळू काढतो आहे पण त्या आधी तुमची पुस्तके परीक्षणातून वाचावीत म्हणतो.
हं करा सुरु! :)

(पुस्तकवेडा)चतुरंग

आशिष सुर्वे's picture

13 Sep 2009 - 8:19 pm | आशिष सुर्वे

पुस्तके.. थेट ह्रुदयाला हात घालणारा विषय!
कच्चा बिंदूच म्हणा ना!!

या विषयावरील आपल्या पुढील धाग्याची वाट पहात आहे..

-
रवींद्रनाथ टागोरांच्या लिखाणाचा निस्सीम भक्त..
कोकणी फणस

ऋषिकेश's picture

13 Sep 2009 - 9:14 pm | ऋषिकेश

बरेच दिवस मनात असलेले मोकाशींचे पालखी हे पुस्तक एवढ्यातच वाचून संपवले तर आता दुसरी लिस्ट हजर! :)

यातील काटेसावरी आणि कोबाल्ट ब्लू बद्दल ऐकून आहे. त्यावर आधी लिहा ना प्लीज :)

इतरांनीही पुस्तके वाचली असल्यास त्यावर लिहावे (तेवढेच मास्तर त्यावेळेत इतर पुस्तकांवर लिहितील अशी स्वार्थी अपेक्षा ;) )

ऋषिकेश
------------------
रात्रीचे ९ वाजून ११ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "मलाऽ सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं??...."

क्रान्ति's picture

13 Sep 2009 - 10:07 pm | क्रान्ति

वाचायच्या यादीत नवी पुस्तकं! परीक्षण वाचायला नक्कीच आवडेल. चढत्या भाजणीत "कुमार माझा सखा" चा प्रथम क्रमांक!

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

भडकमकर मास्तर's picture

14 Sep 2009 - 12:27 am | भडकमकर मास्तर

लेखक : डॉ.चंद्रशेखर रेळे.
शब्दांकन : सागर दर्शने
राजहंस प्रकाशन: पृष्ठे १५२
आवृत्ती पहिली : मार्च २००९
किंमत १५० रु.

प्रा. बा.र.देवधर ( प्राचार्य : स्कूल ऑफ़ इन्डियन म्यूझिक, स्थापना १९२५ ) यांच्या संगीतशाळेमध्ये (१९३४) लेखकाला पहिल्यांदा कुमार मित्र म्हणून भेटले.आणि पुढे त्यांची सुमारे साडेपाच दशकांची मैत्री यावर छान लिहिले आहे.

कुमार देवधर मास्तरांकडे येण्यापूर्वीच देशात बर्‍याच ठिकाणी मैफ़ल करून आलेले होते, त्यांच्या गाण्याच्या नकला वगैरे फ़ार प्रसिद्ध होत्या परंतु देवधर मास्तरांनी नकला बंद अरण्याची अट घातली होती.
देवधर स्कूलमधल्या आठवणी, तरूण वयातल्या तिथल्या खोड्या , त्या वयात गाजवलेल्या मैफ़ली, देवधर मास्तरांनी दिलेली डबलस्वरांची तान ( यावर अगदी सविस्तर लिहिलेले स्वतंत्र प्रकरण आहे)... या तानेचा कुमारने केलेला रियाज, श्रोत्यांवरील परिणाम, नंतर शिष्यांना ती तान का दिली गेली नाही , देवधर मास्तर हेच कुमारचे एकमेव गुरू हे देखील वाचनीय.

पुढे लग्न, मग लगेचच टीबीचा आजार, देवासला प्रयाण, कठीण आर्थिक स्थिती, गाण्यावर बंदी, ( त्या काळात इन्शुरन्स एजंट म्हणून केलेले काम आणि लोकांचे खूप वाईट अनुभव), "माझ्या गाण्याशिवाय मी कोणीही नाही" हे त्यांचे उद्गार, आजारपणाच्या काळातला आशावादी पत्रव्यवहार आणि आजारपणानंतरची लेखकाकडची पहिली छोटी मैफ़ल, अफ़्रिकेचा असफ़ल परदेश दौरा, १९६० साली पत्नीवियोगाचे दु:ख, द्वितीय विवाह ; कविमनाच्या कुमारांनी स्वतंत्रपणे रचलेल्या बंदिशी ( यावर स्वतंत्र प्रकरण आहे) , हे सारे मित्राच्या नजरेतून उत्तम लिहिले गेले आहे.

पं सी आर व्यास यांच्याशी एका बंदीशीचा गौडमल्हार की नटमल्हार यावरून झालेला वादविवाद आणि त्यातून निर्माण झालेला तीन तासाचा कार्यक्रम गौडमल्हार सुभग दर्शन ; असे काहीसे प्रसंग अगदी वाचनीय. शिवाय विविध प्रयोग..( ऋतुसंगीत, होरी, मालवा की धुने,त्रिवेणी ( भजन), मला उमजलेले बालगंधर्व) या सार्‍या प्रयोगामागचा विचार फ़ार छान मांडलेला आहे....

१९९२ साली कुमार स्वर्गवासी झाल्यानंतर लेखकाने कवी वसंत बापटांना सांगितले ( बापट कुमारांना मिस्टिक म्हणाले..) की असे बोलून तुम्ही कुमारच्या परिश्रमांवर अन्याय करत आहात. अशी विशेषणे लावून आपली सुटका आपण करून घेतो. त्याचा गाण्यामागचा विचार,रागविचार आणि पेशकशीचा ढंग आपण समजून घ्यायचा प्रयत्न करायला हवा. ( हा सडेतोडपणा या पुस्तकात पुष्कळ ठिकाणी आहे)

उदा. बर्‍याचदा बेदरकार वागणे आणि कोणाचाही मुलाहिजा न ठेवता बोलणे या काही सवयी आजारपणातल्या कटू अनुभवांनी आल्या असाव्यात असे लेखकाचे निरीक्षण आहे... कुमारशी झालेले लेखकाचे ( तशा किरकोळ कारणावरून झालेले) भांडण आणि बराच काळ असलेला अबोला त्यानंतरची पुन्हा झालेली पूर्वीप्रमाणेच मैत्री यावरही यात लिहिले गेले आहे , हे फ़ार बरे झाले.... शेवटी देवधर मास्तरांनी १९५४ साली मंगरूळकरांना लिहिलेले पत्र आहे , त्यात रास्त कौतुकाबरोबरच ( ४४ सालानंतर तो स्तुतिपाठकांच्या गराड्यात सापडल्याने त्याचा अगदी अवतारच झाला आहे , त्याबद्दल न बोलणेच बरे ... आणि ... त्याचे अंगी विनय अधिक वाढला तर त्याच्या कीर्तीत भर पडेल असेही गुरूंचे निरीक्षण आहे)

शिवाय या पुस्तकात काही इन्ट्रेष्टिंग वादविवादाचे प्रसंग आहेत , त्यासाठी संगीत अधिक समजत असते तर हे लेखन अधिक कळून त्या प्रसंगांची मजा घेता आली असती असे वाटत राहते.
संगीताभ्यासकांसाठी आणि कुमारजींच्या चाहत्यांसाठी त्यांच्या एका मित्राने लिहिलेले हे फ़ार उल्लेखनीय पुस्तक आहे...
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

श्रावण मोडक's picture

14 Sep 2009 - 1:12 am | श्रावण मोडक

ये बात है... क्रमशः असूनही आजच्या आज पहिले परीक्षण. वा. परीक्षणही मोजक्या शब्दांत नेमके दिसते आहे. पुस्तक वाचनाकडे घेऊन जाणारे. धन्यवाद!!!

नंदन's picture

14 Sep 2009 - 1:25 am | नंदन

श्रावण म्हणतात तसे परीक्षण नेटके आणि वाचनाला उद्युक्त करणारे.

बापट कुमारांना मिस्टिक म्हणाले..) की असे बोलून तुम्ही कुमारच्या परिश्रमांवर अन्याय करत आहात. अशी विशेषणे लावून आपली सुटका आपण करून घेतो. त्याचा गाण्यामागचा विचार,रागविचार आणि पेशकशीचा ढंग आपण समजून घ्यायचा प्रयत्न करायला हवा.

- इतर आठवणींपेक्षा/चरित्रात्मक पुस्तकांपेक्षा या बाबतीत इथे हे पुस्तक निराळे ठरत असावे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

टारझन's picture

13 Sep 2009 - 10:36 pm | टारझन

अर्रे वा ... छाणंच की ...

मी कधीचंच चेतन भगतचं 'द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ' आणुन ठेवलंय .. आउंदा पुस्तक पावसाळी वातावरणामुळे सादळलंय :(

असो , चालु द्या.
उगाचंच मला ह्या प्रतिक्रियेची आठवण झाली ... आणि उमगलं .. किती मस्त होते ते दिवस ... आता कशाचं काय न कशाचं काय :) बापमेल्यागततोडंकरुनबसायचं !

(पुस्तकप्रेमी) टारोबा रिडर

नीलकांत's picture

14 Sep 2009 - 12:13 am | नीलकांत

पुस्तके वाचने हा माझा सुध्दा आवडता उद्योग आहे. मी सध्या 'ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी' हे पुस्तक वाचतोय. तुम्ही वर दिलेल्या पुस्तकांबद्दल वाचायला आवडेल.
वरीलपैकी निळू दामलेंचे अवघड अफगाणीस्तान तेवढे वाचलेले आहे. लवकर हे क्रमशः सुरू करा मास्तर :) आम्ही वाट बघतोय.

- नीलकांत

अभिज्ञ's picture

14 Sep 2009 - 1:21 am | अभिज्ञ

क्या बात है,
मी देखिल आजच मोठी पुस्तकखरेदी केलीय.
असो,
मास्तर उपक्रम आवडला.
आता परिक्षणे येउ द्यात.

अभिज्ञ.

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

मास्तर - लिहीत रहा, आतुरतेने वाट पहातो आहे.

मास्तर - लिहीत रहा, आतुरतेने वाट पहातो आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Sep 2009 - 10:32 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

कोबाल्ट ब्लूबद्दल मागे मेघना भुस्कुटे आणि मी लिहीलं होतं, तेच प्रतिसाद चिकटवत आहे:

नावः कोबाल्ट ब्लू, लेखकः सचिन कुंडलकर ('रेस्टॉरंट' या चित्रपटाचा दिग्दर्शक)

पुस्तक सुरू होतं ते 'तनय'च्या कथनातून, आणि तो मुख्यतः लिहित असतो त्यांच्याकडे पूर्वी असणाय्रा एका पेइंग-गेस्टबद्दल! "तो" येण्याच्या आधीच तनयला तो नकोसा झाला असतो, पण त्यांच्यातले संबंध प्रथमभेटीतच कडू रहात नाहीच. "तो" आणि तनय यांची मैत्री होते आणि मग ते नातं मैत्रीच्याही पुढे जातं. तनयला यापुढे दुसय्रा कोणाशीही शरीर-संबंध ठेवायचे नाही आहेत आणि "त्या"च्यामधेच तो संपूर्ण गुंतलेला आहे. मधेमधे येत रहातात ते 'अनुजा'चे, तनयच्या बहिणीचे उल्लेख, जी सध्या "त्या"च्याबरोबर पळून गेली आहे. घरच्यांना वाटत रहातं अनुजाचं घरातून जाणं तनयनी सर्वात जास्त मनावर घेतलं आहे. अनुजा एकदम बिनधास्त मुलगी आहे, घरात सांगून ही मुलगी चार-चार दिवस एकटीच गड-किल्ल्यांवर फिरणारी, अंगावर दागिने घालून मिरवण्यापेक्षा चेहरा-हातावरचा तांबूस टॅन आवडणारी! तिच्या अपरोक्ष तनय आणि"त्या"चं नातं फुलत जातं. एक दिवस अनुजा परत येते, विमनस्क मनःस्थितीत, आणि तरीही अर्थातच तनय उद्विग्नच राहतो, आपल्या प्रेमाच्या आणि प्रेमिकाच्या विरहात!
अर्ध्यात सुरू होते अनुजाची डायरी, ती घरी परत आल्यानंतरची! तिला सायकियाट्रीस्ट सुचवते तुला जे वाटतं ते लिहीत जा आणि या त्रिकोणी नात्याचा दुसरा कोन मोजता येतो. "तो" कलाशाखेचा विद्यार्थी असल्यामुळे त्याला आणि त्याच्या मित्रांना मॉडेल हवी असते चित्र काढायला. त्यामुळेच अनुजाला जाणीव होते आपल्या सुडौल शरीराची! या वेळी वाटणारं 'प्रेम' अनुजाला समजतं आणि तनयच्या अपरोक्ष "त्या"ची एकाच घरातली दुसरी कहाणी सुरू होते. आणि एक दिवस अनुजाच्या म्हणाण्यावरून अनुजा "त्या"च्या बरोबर घर सोडते (मुद्दामूनच पळून जाते असं मी इथे लिहिलं नाहीये).
आता अनुजा ठीक होत आहे, ती अजूनही "त्या"चा विचार करतच रहाते, "काय चुकलं, कुठे बिनसलं, काही क्लूजकडे दुर्लक्ष झालं का?". पण तिला घरात राहून स्वतःवर आणखी बंधनं नको आहेत, ती वेगळी रहायला लागते; तनयही घरातून बाहेर पडतो, अनुजाप्रमाणेच स्वतःच्या पायावर उभा रहायला! आणि आपण विचार करत रहातो, का असं वागला असेल "तो"? त्याच्या लहानपणच्या अनुभवांमुळे तो असा झाला असेल का काही लोकं 'अशीच' असतात, उभयलिंगी संबंधात रस असणारी?

अतिशय सुंदर आणि तरीही सोप्या शब्दात, अतिशय वेगात तनय, "तो" आणि अनुजा आपल्याला भेटून जातात. तनय या नावातच शरीराला जास्त प्राधान्य आहे, आणि अनुजा त्याचीच धाकटी बहीण! शरीर आणि मनाचे खेळ, जे रोज दिसतीलच असं नाही ते इथे दिसतात. आई, बाबा, अनुभव, दादा, रश्मी, वगैरे मंडळी वेगवेगळ्या प्रसंगांमधून येतात आणि बाकीचं जग "नॉर्मल" आहे याची जाणीव करून देत रहातात. आणि पुस्तक एका बैठकीत संपवल्यावर डोक्यात काही विचित्र विचार मनात येत रहातात, त्यासाठी मला अजूनतरी शब्द सापडले नाही आहेत.

मेघना लिहीते:
या पुस्तकातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे - 'तो' किंवा त्याचे उभयलिंगी संबंध नाही विशेष धक्कादायक वाटत. पण बाईचं शरीर असो वा पुरुषाचं. आपल्याला किती लहानपणापासून शरीर दडवून ठेवायला, त्याच्या गरजांवर सामाजिक बंधनांची चौकट घट्ट बसवायला, चार लोकांसारखं'च' वागायला शिकवलं जातं - ते लक्षात येतं. आणि अशा चौकटीत धाडस न करू शकणार्‍या किती माणसांना आपलं वेगळेपण दडपून जगावं लागत असेल त्याचं भान येतं. ते चूक की बरोबर हा तर पूर्ण वेगळाच मुद्दा.
कसलेही अश्लील उल्लेख टाळून साध्या-सरळ भाषेत लिहिलंय हे पुस्तक. काही काही ठिकाणी काही परिच्छेद, काही ओळी परत परत येतात. पण त्या खटकत नाहीत. त्यानं या गोष्टीला एक छानसा फील येतो - दर कडव्यानंतर पुनरावृत्त होणार्‍या धृपदाचा.
महान पुस्तक आहे असं नाही, पण वेगळं नक्कीच आहे.

अदिती

पुस्तकाबद्दल बरंच वाचलेलं होतं..
गेल्या वर्षी एका धाग्यात वर दिलेली चर्चा इन्ट्रेष्टिंग होती.
पुस्तक वाचायचा योग आता आला.
( या लॉटमधलं पहिलं पुस्तक मी वाचलं ते कोबाल्ट ब्लू ... पण पुस्तक आवडायची अपेक्षा नव्हती. ... प्रायोगिक नाटकासारखे न समजणारे उतारेच्या उतारे वाचायची तयारी ठेवली होती... तसलं काहीच निघालं नाही यात . उलट कादंबरी आवडली ;) )...
तथाकथित कॉन्ट्रोव्हर्शियल गोष्टी इतक्या प्रामाणिक आणि साध्या सोप्या पद्धतीने येतात , की सवय होऊन जाते नंतर....

... 'तो' / त्याची व्यक्तिरेखा अगदी इन्ट्रेष्टिंग... आपण ज्या घरात पेयिंग गेस्ट म्हणून राहतो तिथल्या मुलग्याशी प्रेमसंबंध आणि त्याच वेळी त्याच्या बहिणीशीही प्रेमसंबंध.. हम्म्म्म्म..... सही जा रहे हो... :)... याचा दोघांना पत्ता नाही..... नंतर त्यातल्या बहिणीबरोबर कुठे पाँडिचेरीला निघून जाणं.... त्या तनयला न सांगता ... ( मग तो विरहात दु:खी) .. मग तिला टाकून तिकडून अजून कुठेतरी जाणं.. मग दु:खात ती परत येते....

( आदितीनं लिहिलंय तसं वेडंवाकडं पुष्कळ विचार करायला होतं.... पूर्ण कादंबरीभर उभयलिंगी संबंधांचं उदात्तीकरण आहे काय, असं वाटून जातं... मग वाटतं , आपल्याला असं वाटतंय म्हणजे आपणच मागासलेल्या विचारांचे असणार... उभयलिंगी जाउदेत पण तो एक व्यक्ती म्हणून फसवाफसवी करणारा तरी आहे , यावर झडझडून दोघे शिव्यासुद्धा घालत नाहीत, याबद्दल थोडं फील होतं........ )

ते असो,
मात्र अनुजा परत आल्यानंतरची डायरी मला जाम आवडली..... तिचं डिप्रेशनमधून बाहेर येणं, पुन्हा आयुष्य सुरू करणं, हे फार म्हणजे फारच मस्त आहे..... ( तनय मात्र पुढे आपले आयुष्य विचित्रपणा करत वाया घालवेल असे ( उगीचच ) वाटत राहतं....
___________
या कादंबरीची ठराविक गोष्ट सांगण्यासारखी नाही... तनयला आपला प्रियकर बहिणीबरोबर पळून गेला, हा धक्का बसतो तोही फिल्मी पद्धतीने गोंजारलेला नाही.... एकदम म्याटर ऑफ फॅक्टली येतं सारं... शिवाय अनुजाला आपल्या भावाचे आपल्या प्रियकराशी संबंध होते हे जाणवतच नाही... (की सटली तिला ते जाणवतं? कोणास ठाऊक/ परत वाचायला पाहिजे... )पण ती तिच्या डिप्रेशन आणि पुनरुत्थानात गढलेली आहे, तिला भावाच्या प्रेमभंगाबद्दल कळतच नाही.... ते तिला नीटपणे कळालं असतं तर गोष्ट बदलली असती का?
... तिचं डिप्रेशन अधिक वाढलं असतं का? तो उभयलिंगी आहे , हे तिला समजतं का?

की २५ वर्षांनी हे तिघे एका पार्टीत भेटतात अशी एक अजून कादंबरी लिहावी? मज्जाच आहे च्यायला .. डोकं भंजाळलं..... :)

_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

मस्त. आवडत्या विषयावर धागा. इंदूरमध्ये आत्ताच एकामागोमाग दोन पुस्तक मेळे भरले. त्यात बर्‍यापैकी खरेदी केली. आंग्ल भाषेशी सलगी करण्याचा नि राष्ट्रभाषेच्या गळ्यात गळे घालण्याचा प्रामुख्याने यत्न होता. त्यात बर्‍याच दिवसांपासून घ्यायचे घ्यायचे म्हणून चाललेला समग्र शेरलॉक होम्स अखेर घेतला. शिवाय ओ हेन्रीच्या सिलेक्टिव्ह १०० स्टोरीजही घेतल्या. त्याव्यतिरिक्त मग राष्ट्रभाषेतले साहित्य वाचण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात हिंदी हास्य-व्यंग कथा (संपादित) हा कथासंग्रह वाचतोय. मस्त आहे. शिवाय फणिश्वरनाथ रेणुंचे 'सर्वश्रेष्ठ कहानियॉं' आणल्या आहेत. प्रेमचंदचं गबन आणून ठेवलंय. पण वाचलेलं नाही. पण हरिशंकर परसाईंचं एक हास्य-व्यंग कहानियांचं पुस्तक वाचलं. ते भन्नाटच आहे. शिवाय हिंदीतील कालंजयी कहानियॉं म्हणून एक पुस्तकही काही दिवसांपूर्वीच वाचनात आलं. त्यातल्या कथाही फार छान आहे. हिंदीतल्या दिग्गजांच्या कथांचा त्यात समावेश आहे.

बाकी नुकतंच एक छान मराठी पुस्तक वाचलं. 'नर्मदा परिक्रमा- एक अंतर्यात्रा'. भारती ठाकूर यांचं हे पुस्तक नर्मदेविषयीच्या अनुभव सांगणारं आहे. त्यात चमत्कार वगैरै नाहीत. नर्मदेभोवतालचं जीवन, निसर्ग आणि अध्यात्मिकता त्यांनी छान टिपलीय. लेखन प्रवाही असल्याने वाचायलाही छान वाटतं.

थोडं अवांतर...
हिंदीत बर्‍याच विषयांवर पुस्तकं निघतात हे या पुस्तक मेळ्यातून जाणवलं. वैचारिक पुस्तकांची संख्या कमी दिसली तरी अगदीच नाही, असे काही वाटले नाही. उत्तर प्रदेशच्या हिंदी संस्थानने तर अनेक विषयांवरची पुस्तकं काढली आहेत. त्यातली अनेक संग्रही ठेवावी अशी आहेत.बाकी प्रदर्शनात क्लासिक साहित्यातली पुस्तकं विपुल होती. मुख्य म्हणजे नॅशनल बुक ट्रस्ट, किताबघर यांच्यासह अनेक प्रकाशन संस्थांनी चांगली पुस्तकं अतिशय स्वस्तात काढली आहेत. राजकमल वगैरे प्रकाशनसंस्ता जायंट म्हणाव्यात अशा आहेत. मी घेतलेलं रेणुंच्या कथांचा संग्रह अवघ्या पन्नास रूपयांत मिळाला. त्यात त्यांच्या पंधराएक कथा आहेत. अशा प्रत्येक बड्या लेखकांच्या नावाचा एक कथासंग्रह तिथे होता. स्वस्तात पुस्तकाच्या या फंड्याचा मराठी प्रकाशकांनी याचा विचार करायला हवा.

(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?
ही आहे आमची वृत्ती

नंदन's picture

14 Sep 2009 - 3:54 pm | नंदन

स्वस्तात पुस्तकाच्या या फंड्याचा मराठी प्रकाशकांनी याचा विचार करायला हवा.

- सहमत आहे. कलकत्त्यातला बोईमेळ्यातही पुस्तकं फार कमी किंमतीत मिळतात. छपाईच्या दर्जाबाबत ती मौज, राजहंसच्या जवळपासही फिरकत नसली तरी ती कमी किंमतीमुळे बर्‍याच मोठ्या वर्गाला वाचनासाठी ती उपलब्ध होतात.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

डॉ. अजित जोशी यांचे आग्र्याहून सूटका हे पूस्तक वाचनीय आहे

सोनम's picture

14 Sep 2009 - 4:11 pm | सोनम

हे पुस्तक वाचण्याची खूप इच्छा आहे. पण अजून कुठे मिळाले नाही.
युगान्त ह्या विषयी काही माहिती असल्यास जरुर लिहावे.

"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"