मुक्ती
कुंडीमुक्त लगेच जाहले
कचरामुक्त कधी होणार?
पदपथावरी अनंत वस्तू
कुठल्या नियमाने हरणार?
फुले
काटे मजला गुलाब तिजला
कितीक वर्षे असेल चाले
आता अमुची मुलेच देती
बाईंना शाळेत फुले॥
परी
दिसलीस तू, हसलीस तू
रूसलीस तू, रडलीस तू
रागावलीस, फसलीस तू
माझी परी झालीस तू॥
पट्टी
मी पट्टीचा ठार आंधळा
बांधून तू पट्टी डोळ्यावर
पातिव्रत्याचे हे फळ का?
जन्म दिला कौरवांस शंभर॥
संभ्रम
झाडामागून बाण मारुनी
वाली वधिला, कुठे पराक्रम?
रघुकुलरित अशी का असते
न्यायनीतीला पडला संभ्रम॥
सिंधू
"एकच प्याला" मधली सिंधू
कशी भाळली सुधाकरावर
उचंबळे जवळी शशि येता
वेडा सिंधू तयाचे उत्तर॥
दिगंबर
सभेत सारे बहिरे श्रोते
वक्त्याने त्या काय करावे?
दिगंबरांच्या गावामधे
धोब्यांनी त्या कसे जगावे?
उलटापालट
उलटा करता 'सरस' शब्द हा
'सरस' राहतो पुन्हा बिलंदर
'साक्षरा'स परी उलटे करिता
'राक्षसा'स निर्मितो कलंदर॥
शिक्षा
वस्त्रे पळवी गोपींची
शिक्षा जाहली श्रीहरीस
वस्त्रहरण प्रसंगी
वस्त्र पुरवी द्रौपदीस॥
अजब
द्रौपदीचे पाच पती
खरे खोटे जाणे कुंती
धन्य जगी पतिव्रता
अजब ही न्यायनीती॥
(मो)बाईलवेडे
मोबाईल वेडे आता
रस्तोरस्ती गल्लोगल्ली
शहाण्या पोरींस कळेना
कोण व्यक्ती कोण वल्ली॥
हद्दपार
पटेल नेहरूच का
फाळणीचे गुन्हेगार
जिना झाले सेक्यूलर
जसवंत झाले हद्दपार॥
आशा
गळू लागल्या कमळपाकळ्या
धनुष्यदोरी ढिली जाहली
घड्याळात बाराच वाजले
पंजाची आशा पालवली॥
लैला?
तिने केसात माळले
लाल गुलाबाचे फूल
कमरेला लटकले
लाखमोलाचे पिस्तूल॥
नको छेडखानी करू
तीच शिटी वाजवेल
अरे महिला पोलिस
कशी लैला बनेल?
मोकळे केस
समोरच्या सज्जामधूनी
केस मोकळे सोडून कुरळे
उभी पाठमोरीच नेहमी
राहतसे का कधीच नकळे॥
परी एकदा भाग्य उजळले
कसेबसे वळुनिया बघितले
होते सरदारजी उन्हामधि
वाळवीत ते केस आपुले॥
टिकली
लांब आडवे भाळावरचे, कुंकू गेले आली टिकली
फिरताफिरता ती ही पडली, खिशामधे मी जपून ठेवली
नावावरती डकवून तिजला प्रेमपत्र पाठविले सुंदर
तुकडे तुकडे करुन टाकले, टिकली घेऊन हसली क्षणभर॥
काहूर
एकलव्याचा अंगठा
आणि शंबूकाचे शीर
अजून रक्त वाहते
उठे उरात काहूर॥
अटळ
मूर्ती फोडून अमूर्ता
नाही जमणार बघणे
स्वरांनाही जाहले अटळ
कृष्णवेणूत लपणे॥
प्रतिक्रिया
11 Sep 2009 - 12:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अशोक गोडबोल्यांची 'दिगंबर' चारोळी वाचून (खरंतर ऐकून) भलतीच हसले ... आणि रामदास काकांच्या गोष्टीतल्या पात्राचीही आठवण झाली.
तसंच एक लैला, महिला पोलीसना भेटले होते ... अगदी चपखल वर्णन.
(काल संध्याकाळी बोलताना अनेक गोष्टी बोलायच्या राहून गेल्या, त्या आता लिहून दाखवते.)
(टंकनिका) अदिती
11 Sep 2009 - 12:28 pm | श्रावण मोडक
काहूर आणि अटळ या आवडल्या. बाकी ठीक.
11 Sep 2009 - 1:01 pm | अजिंक्य
छान चारोळ्या आहेत. 'दिगंबर' आणि 'उलटापालट' आवडल्या.
-अजिंक्य.
11 Sep 2009 - 3:50 pm | फ्रॅक्चर बंड्या
दिगंबर चारोळी आवडली
11 Sep 2009 - 5:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दिगंबर आणि हद्दपार चारोळी आवडली.
अजून येऊ द्या... अशाच चारोळ्या...!
-दिलीप बिरुटे
11 Sep 2009 - 5:59 pm | दशानन
खल्ल्लास !
दिसलीस तू, हसलीस तू
रूसलीस तू, रडलीस तू
रागावलीस, फसलीस तू
माझी परी झालीस तू॥
लै भारी !
परवानगी देत आहात असे समजून तुमची ही चारोळी आम्ही आमच्या जीटॉकवर चिटकवत आहोत.. :)
11 Sep 2009 - 7:32 pm | प्राजु
दिगंबर, शिक्षा, अजब, हद्दपार, उलटापालट.. या आवडल्या.
मस्तच!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
11 Sep 2009 - 7:40 pm | धनंजय
छान संग्रह
11 Sep 2009 - 9:27 pm | क्रान्ति
संभ्रम, उलटापालट, काहूर, अटळ खूप आवडल्या.
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
12 Sep 2009 - 7:41 am | केशवराव
अशोक राव, फार दिवसांनी भेट झाली ; छान वाटले.
चारोळ्यां मजेशीर !