गौराई आली माझ्या घरा...

नाटक्या's picture
नाटक्या in जनातलं, मनातलं
8 Sep 2009 - 10:22 am

गौराई कोणाच्या पावलाने आली? 'गौराई सोन्याच्या पावलांनी आली..". गौराई कोणाच्या पावलांनी आली? "गौराई मोतियाच्या पावलांनी आली.." अशा गजरात, चांदीच्या ताटात गौराईचे आमच्या घरात आगमन झाले. गौराई घरी येणार म्हणून आम्ही आरास केली होती. घरात करंज्या/पापड्या करून ठेवले होते. दारात सुबक रांगोळी काढली होती, दाराला तोरण लावलं होतं. दारात लक्ष्मीची पावलं हळदी-कुंकवाने काढली होती. अमेरिकेत घरात सगळीकडे कार्पेट असल्यामुळे घरात मात्र पावलं काढता आली नाहीत.

कुळाचाराप्रमाणे चांदीच्या ताटातून गौरीचे मुखवटे घेऊन सौ. घरात आली. दारात हळदी-कुंकू/अक्षता वाहून ओवाळलं. दुधाने पाद्यपुजा केली, भाकर-तुकडा ओवाळून टाकला. सगळ्या घरभर गौराई सोन्या-मोत्यांच्या, धन-धान्याच्या, लक्ष्मी-सरस्वतीच्या, सौख्य-आरोग्याच्या पावलांनी फिरून आपल्या आसनस्थ झाल्या. सौ. ने गौराईंना सजवले, त्यांची खणा-नारळाने ओटी भरली. त्या दिवशी कुळाचाराप्रमाणे अंबाडीची भाजी, भाकरी आणि चटणीचा नैवेद्य होता.

दुसरा दिवस म्हणजे गौरीपुजनाचा आणि सर्वात महत्त्वाचा. त्या दिवशी ५०-५५ लोकांना आमंत्रण होते. सकाळी ५ वाजता उठून सोवळ्यात स्वयंपाक करायला बसलो. प्रसादाचा आणि सोवळ्यातला स्वयंपाक असल्याने कांदा-लसूण काही न घालता स्वयंपाक करायचा होता. प्रसादासाठी दोन भाज्या, चटणी, कोशिंबीर, लोणचं, पंचामॄत, करंजी, पापड्या, पापड, पोळ्या, पुरण पोळी, वरण, साधा भात, मसाले भात, खीर असा बेत होता. संध्याकाळी सगळे लोकं जमलेत. मिपा-परिवारातर्फे श्री. व सौ. 'एक' आणि सौ. दिपाली (पाटील) यजमांनांसह आले होते. गौराईची आरती झाली. प्रथेप्रमाणे दोन सवाष्णींचई ओटी भरली. एका कुमारिकेचे यथासांग पुजन केले. एक मेहूण पुजले. सगळे लोकं भोजन करून तृप्त झाले आणि आम्ही त्यांच्या अशिर्वादाने तृप्त झालो.

त्या नंतर मैफल जमली. आलेल्या पाहूण्यांपैकी काही गाण्या-बजावण्यातले असल्याने Karaoke वर गाणी म्हटलीत. सौ. 'एक' ने मासूम मधले 'तुझसे नारा़ज नही झिंदगी' हे गाणं अतिशय सुंदर म्हटले. रात्री ११:०० वाजता मैफल संपली आणि दुसर्‍या दिवशी जड अंत:करणाने आम्ही गौराईला निरोप दिला.

भोजनाचे ताट..

सौ. 'एक' गाताना आणि 'एक' तल्लीन होऊन ऐकताना. मांडीवर ज्युनियर 'एक'.

आरती करताना (मध्ये सोनेरी झब्ब्यात नाटक्या, मागे पांढर्‍या झब्ब्यात 'एक'...)

आरती करताना सौ. नाटक्या...

कहाणी सुफळ संपुर्ण...

- नाटक्या

संस्कृतीधर्मअनुभव

प्रतिक्रिया

अनिरुध्द's picture

8 Sep 2009 - 10:34 am | अनिरुध्द

फोटो सहीत कहाणी फारच छान. गणपती, गौरींसारख्या सणात घरात एक प्रकारचा आनंदोत्सव सुरु असतो. नैवेद्याचे ताट बघितल्यावर पोटातले कावळे जागे झाले. असो. हापिसात कुठचं आलंय हे सुग्रास अन्नं. तेव्हा बघूनच पोट भरलं.

वि_जय's picture

8 Sep 2009 - 12:25 pm | वि_जय

अतिशय सुरेख फोटो आहेत शिवाय आपल्या संस्कार व चालीरीतींचा अल्बम तयार केला आहात, खरच मनःपुर्वक अभिनंदन!!

कोकणात गणपतीसोबत एकच गौराई असते, इथे दोन गौराई आहेत. या वेगळ्या प्रथेचा खुलासा केलात तर बरे होईल.

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Sep 2009 - 12:55 pm | बिपिन कार्यकर्ते

नाटकोबा... छान झाला म्हणायचा सोहळा. आरासही आवडली खूप. बरीच मेहनत घेतलेली दिसते आहे.

बिपिन कार्यकर्ते

दिपक's picture

8 Sep 2009 - 1:01 pm | दिपक

वाह फोटु पाहुन मंगलमय सोहळा अनुभवल्यासारखा वाटला. :)

छोटा डॉन's picture

8 Sep 2009 - 2:02 pm | छोटा डॉन

नाटक्याशेठ, फारच सुंदर हो आपला गौरीचा सण.
एकदम प्रसन्न वाटले बघा वर्णन वाचुन आणि फोटो पाहुन. धन्यवाद ...!!!

मी जर चुकत नसेन तर आपण "चैत्रागौरीची आरास" सुद्धा अशीच मिपावर दिल्याचे आठवते, ते ही सुरेखच.

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

नम्रता राणे's picture

8 Sep 2009 - 2:08 pm | नम्रता राणे

आरती करतांना वहीनींच्या नाकात नथ दिसली असती तर आणखीन एक छान गौरी दिसली असती.
सुरेख... कोकणातल्या माहेरच्या सोहळ्याची आठवण आली.
धन्यवाद!!!!

विसोबा खेचर's picture

8 Sep 2009 - 2:27 pm | विसोबा खेचर

सचित्र कहाणी आवडली...

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Sep 2009 - 10:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सचित्र कहाणी आवडली...

भाग्यश्री कुलकर्णी's picture

8 Sep 2009 - 2:27 pm | भाग्यश्री कुलकर्णी

सातासमुद्रापार पर्यंत पोहोचलेली आपली गौराई आम्हाला इथेही पहायला मिळाली.पुरणावरणाचा नैवैद्य,सगळ्यांचे तुमच्या घरी जमणे,सजावट त्यामागची तुमची मेहनत्,बघुन फार छान वाट्ले.तुमच्या सौ.न च्या मेहनतीसाठी त्यांचेही अभिनंदन.

मीनल's picture

8 Sep 2009 - 5:55 pm | मीनल

छान डेकोरेशन आहे. मागची संपूर्ण भिंतच व्यापली आहे पडद्यांनी. मस्त दिसत आहेत गौरी. जेवण सुध्दा.

मीनल.

क्रान्ति's picture

8 Sep 2009 - 6:18 pm | क्रान्ति

काय मस्त आरास केलीय! खूप खूप आवडल्या सातासमुद्रापल्याडच्या गौराई! वर्णन पण सुंदर केलंय. :)

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

अवलिया's picture

8 Sep 2009 - 6:28 pm | अवलिया

सुरेख ! :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

रेवती's picture

8 Sep 2009 - 6:43 pm | रेवती

कहाणी सुफळसंपूर्ण होण्यामागची मेहनत जाणवली.
गौरी छान सजवल्या आहेत.

रेवती

प्राजु's picture

8 Sep 2009 - 7:38 pm | प्राजु

फोटो आवडले.
मस्तच!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

आशिष सुर्वे's picture

8 Sep 2009 - 8:24 pm | आशिष सुर्वे

अप्रतिम!!
मन प्रसन्न झाले!!

-
कोकणी फणस

एक's picture

9 Sep 2009 - 10:11 pm | एक

गौरीपूजन उत्तमच झालं. पुरणपोळी खाऊन (हाणून ;)) चेहर्‍यावर आलेली तृप्तता फोटोमधेपण दिसत आहे.

सुंदर कार्यक्रम.. कराओकेची आयडिया मस्तच.

चतुरंग's picture

9 Sep 2009 - 10:15 pm | चतुरंग

एकदम मस्त मेजवानी दिलीत की! फोटो पाहून समाधान झाले. तुम्ही उभयतांनी घेतलेली मेहेनत दिसतेच आहे. आम्हाला सहभागी करुन घेतल्याबद्दल धन्यवाद! :)

चतुरंग

भडकमकर मास्तर's picture

9 Sep 2009 - 11:17 pm | भडकमकर मास्तर

कराओकेची मैफलही छान रंगली असणार..
छान वर्णन..
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

दिपाली पाटिल's picture

10 Sep 2009 - 3:46 am | दिपाली पाटिल

सुंदर आलेयत फोटो...आम्ही सौ.एक चं गाणं मिस केलं...सजावट आणि भोजन अतिशय सुंदर होतं..

श्री. व सौ नाटक्या यांना खुप खुप धन्यवाद...मी पाहिल्यांदाच पाहीली गौराई.

दिपाली :)

चित्रादेव's picture

10 Sep 2009 - 4:16 am | चित्रादेव

छान आहेत फोटो. मेनु सुरेख दिसतोय. एक शंका ,ते चपातीवर तळलेले काय ठेवलेय?

(जळी तळी मासे दिसणारी सारस्वताला माश्याची तुकडी दिसतेय..)

पण करंजी असावी असा अंदाज आहे ;)
(सारस्वत)बेसनलाडू

चित्रादेव's picture

10 Sep 2009 - 4:23 am | चित्रादेव

हो नंतर नीट बघितले तेव्हा ती करंजीच असावी.

(मासेखाऊ) चित्रा देव. :)