अर्ध्या गट्टूची किंमत!

वेदश्री's picture
वेदश्री in जनातलं, मनातलं
12 Aug 2009 - 12:22 am

"अहो मॅडम, ते नेतायत ती गाडी तुमची आहे का?" माझ्यामागून हे विचारणार्‍याचा हात कुठल्याबाजूने निर्देश करतोय तिकडे बघत मी पाहिले तर माझीच अ‍ॅक्टीव्हा होती. मी धावतच त्या अवैध ठिकाणी पार्कींग केल्याबद्दल गाड्या उचलून नेणार्‍या गाडीकडे धावत गेले.
"है मिस्टर, हाऊ यू डेअर्ड टू टच माय अ‍ॅक्टीव्हा?"
"काय रे, हे कालेजातलं पाखरू काय फिसफिस करून र्‍हायलंय इंग्लिसमदी?"
"थोबाड संभाळून बोल बे. जास्त फडफड करू नको. गपगुमान माझी गाडी खाली उतरव नाहीतर..." एव्हाना माझा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. योग्य ठिकाणी गाडी लावूनही ही दमदाटी ऐकून घ्यायला मी काही पोचट नाही.
"न्हाईतर काय?"
"नाहीतर काही खास नाही. माझी अ‍ॅक्टीव्हा तुम्ही चोरलीत अशी पोलिसात तक्रार करेन फक्त. बस्स! " असे म्हणून मी परत गुरूनानक मध्ये जायला लागले.
"गाडी चुकीची लावत्या त्ये लावत्या आन् वर ही शिरजोरी व्हय?"
मी चवताळून वळले. "इथे कोणालाही विचारून घ्या माझी अ‍ॅक्टीव्हा बरोबर लावलेली होती की नाही ते. एकजरी साक्षीदार मिळाला तर तुम्ही म्हणाल तितके पैसे देते शिक्षा म्हणून."
त्याने खरेच एका माणसाला बोलावले.
"काय वो सायेब ही अ‍ॅक्टीव्हा हितं या पेवमेंटच्या हर्द्या गट्टूवर व्हती की नाय?"
"गाडी बरोबर लावलेली होती. हो पण आता गाड्या इतक्या खचाखच भरलेल्या आहेत तर आता तुमचा तो अर्धा गट्टूबिट्टू ते काय माहिती नाही. अर्ध्या गट्टूवर असण्याची शक्यता नाकारता येत नाही पण मी तितके नीट पाहिले नाही त्यामुळे.. "
"बस्स. बस्स. जालं तुमचं काम. जावा तुमी." असे त्या माणसाला म्हणत,"आता बोला म्याडम. काय म्हनत व्हता तुमी? म्होरं बसलेल्या सायेबाकडून घ्यावा जा पावती.."
आता मात्र माझं डोकं जामच सटकलं होतं. याचा साहेब कोण तीसमारखां आहे आणि आणिक काय तारे तोडतो ते पहावे म्हणून गेले.
"सायेब, हे कालेजातलं पाखरू भिरभिरून र्‍हायलं व्हतं नो पार्कींगमध्ये गाडी लावून. मांडवली करायचं म्हनतंय.."
त्या साहेबाची मुक्ताफळे ऐकून मग काय बोलायचे ते ठरवायचे असे ठरवले तरीही गप्प बसायला खूप कष्ट पडले मला.
"किती पैसे आहेत तुझ्याकडे आत्ता?"
"२०० रुपये."
"नो पार्कींगमध्ये गाडी लावायचे ७५० रुपये घेतो आम्ही... लायसन्स दाखवा."
"गाडीच्या डिक्कीत आहे."
"ते माहिती नाही. आत्ता आहे का तुझ्याकडे? नाही. मग त्याचे आणखीन १५० रुपये. गाडीची कागदपत्रं? तीपण नसणारच.. त्याचे आणखीन १५० रुपये."
एव्हाना डोकं तडकलं होतं माझं. माझी अख्खी पर्सच गाडीच्या डिक्कीत होती ज्यात हे सगळे सामान होते. मी फक्त पैशाचे वॉलेट घेऊन साबुदाण्याची खिचडी घ्यायला गुरूनानकमध्ये गेले होते!
"हे सर्व असंच्या असं लिहून पावत्या फाडा. मी देते १०५० रुपये. अजून काही सुचत असेल तर तेही जोडून घ्या. नाही.. काय आहे.. काही राहून जायला नको ना.."
"इतकी पावती देत नसतो आम्ही. फक्त ५०ची पावती देऊ. आडनाव सांग तुझं.."
"शेख."
"काय? शेख???!!!"
"आडनावातही प्रश्न आहे का? जोडून घ्या त्याचेही १००-२०० रुपये."
"नाही. तुझ्याकडे बघून वाटत नाही शेख असशील असं.."
"तूर्तास शेखच आहे.. परवातेरवा धर्मांतर करून ज्यू धर्म स्विकारणार आहे मग बदलेन हवेतर. तसा मला कश्मिरी पंडीतांचा धर्मही पटलाय.. झालंच तर.. "
"बस्स बस्स.. अकलेचे तारे तोडणे बस्स झाले. आडनाव सांग काय ते."
"शेख." एकेका अक्षरावर जोर देत मी म्हणाले.
"शेवटचं सांगतोय.. सेन्सिबल बोल.."
"तुम्ही जितकं सेन्सिबल बोलताय तितकंच मीही बोलतेय. पेव्हमेंटच्या अर्ध्या गट्टूवर गाडीचा काही भाग आला म्हणून ७५० रुपये आणि तुम्ही जप्त केलेल्या गाडीच्या डिक्कीत असलेली कागदपत्रं मी तुम्हाला दाखवू शकत नाही म्हणून ३०० रुपये?! तुमच्या या गाडीचा नंबर मी लक्षात ठेवणार आहेच शिवाय तुमचा चेहराही.. हे पाखरू कालेजात फिरायला नाही तर कोर्टात समर्थपणे उडायला जन्मलंय हे तर तुम्ही बघायलाच पाहिजेय साहेब. पावती फाडा... नाव.. मिस. वेदश्री शेख. "
माझी नजर खुनशी झाली होती एव्हाना..
"हे बघा मॅडम, कोर्टाबिर्टाची भाषा काढायची काय जरूर आहे?" अचानक अगंतुगंवरून अहोजाहोवर???.. ह्म्म.. थांब बेट्या..
"पावती फाडताय ना ५०ची? उशीर होतोय तुम्हाला साहेब. ही एक गाडी जी अख्खी पेव्हमेंटवर आहे ती उचलायची बाकी आहे की अजून. एकाच पावतीत इतका वेळ गेला तर... "
"हे बघा मॅडम.. जास्त ताणू नका. पोरांकडून चूक होते कधीकधी. गाडी काहीशी का होईना नो पार्कींगमध्ये होतीच की नाही? मग? चला.. तुमचं नाही माझं नाही.. १५० देऊन टाका. "
"दिडशेची पक्की पावती देणार का?"
"हो. देतो. पब्लिकसमोर पंचनामा करू नका प्लिज."
दिडशे रुपये दिले.
"मॅडम, आतातरी खरे आडनाव सांगा."
"जोशी."
दोन पावत्या फाडून माझ्या हवाली केल्या गेल्या.
"मॅडमची अ‍ॅक्टीव्हा उतरव रे खाली." असे साहेब ओरडले.
अ‍ॅ़क्टीव्हा नीट जागी लावायला मी घेऊन जात होते तर त्या साहेबाचे शब्द ऐकू आले.
"काय रे बेअकलीच्या.. पाखरू पाखरू काय करत होतास? ही कुठल्यातरी राजकारण्याची नातेवाईक असणार नक्कीच. कोणाच्याही गाड्या उचलत जाऊ नको.. कळलं काय रे कावळ्या?"
त्या बेअकलीच्या साहेबाचा झालेला गैरसमज दूर करायच्या भानगडीत मी पडले नाही. हकनाक दिडशे रुपयांचा भुर्दंड पडला असला तरी मला पाखरू म्हणणार्‍याचा कावळा झाल्याबद्दल मात्र अतोनात आनंद झाला होता. अर्ध्या गट्टूची किंमत पुरती कळली मला आता.. १५० रुपये!

अर्थव्यवहारराजकारणअनुभव

प्रतिक्रिया

प्राजु's picture

12 Aug 2009 - 12:28 am | प्राजु

वेलडन!!!
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विशाल कुलकर्णी's picture

12 Aug 2009 - 9:57 am | विशाल कुलकर्णी

क्या बात है.... वेलडन !

थ्री चिअर्स फॉर वेदाताई...!! :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
वंदे मातरम .....!

यशोधरा's picture

12 Aug 2009 - 12:30 am | यशोधरा

सही पोपट- सॉरी कावळे केलेस गं! मस्त! =))

अनामिक's picture

12 Aug 2009 - 12:43 am | अनामिक

सह्ही जमलाय लेख!

अवांतर : डोनट होल्स मिळतात ना छोट्या लाडवाच्या आकाराचे... त्याला गट्टू हे नाव ठेवलं होतं आम्ही रूममेट्सनी, त्याची आठवण झाली.

-अनामिक

श्रावण मोडक's picture

12 Aug 2009 - 12:48 am | श्रावण मोडक

बेस्ट. असंच खमकं वागावं लागतं या लोकांशी.

संदीप चित्रे's picture

12 Aug 2009 - 2:20 am | संदीप चित्रे

>> तुमच्या या गाडीचा नंबर मी लक्षात ठेवणार आहेच शिवाय तुमचा चेहराही.. हे पाखरू कालेजात फिरायला नाही तर कोर्टात समर्थपणे उडायला जन्मलंय हे तर तुम्ही बघायलाच पाहिजेय साहेब. पावती फाडा... नाव.. मिस. वेदश्री शेख. "

>> हकनाक दिडशे रुपयांचा भुर्दंड पडला असला तरी मला पाखरू म्हणणार्‍याचा कावळा झाल्याबद्दल मात्र अतोनात आनंद झाला होता.

क्या बात है !!! =D> =D>

स्वाती२'s picture

12 Aug 2009 - 2:26 am | स्वाती२

जियो वेदश्री! लेखही छान जमलाय.

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Aug 2009 - 5:11 am | llपुण्याचे पेशवेll

जियो.. जोरदारच. बाकी हा 'अर्धा गट्टू' काय भानगड असते?
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

छोटा डॉन's picture

12 Aug 2009 - 7:00 am | छोटा डॉन

मस्त किस्सा आहे, चांगलीच चेपलीत त्य माजुरड्या कंत्राटी गाड्या उचलणार्‍या फोलिसांची ...
माजलेत साले फुक्कटचा पैसा खायला ...

बाकी "शेख" हे आडनाव वापरण्याची आयडिया आवडली, लै लै लै भारी ...
अनुभवकथन आवडले, असेच ( म्हणजे असेच रोचक आणि इंटरेस्टिंग ) लिखाण येऊद्यात ...
पुलेशु.
------
छोटा डॉन

शाहरुख's picture

12 Aug 2009 - 7:10 am | शाहरुख

चिरीमिरी देऊन सुटका करून न घेतल्याबद्दल आपल्यासाठी =D> =D>

मध्यंतरी हे गाडया उचलणारे कंत्राटदार स्वतःला पोलिस म्हणवतात आणि (म्हणून ?) माज करतात यावरून बर्‍यापैकी विरोध झाला होता. त्यांना नंतर स्वतःच्या गाडीवर 'पोलिस' असे लिहिण्यास बंदी केली होती.

बाकी 'शेख' हे आडनाव वापरण्याची आयडिया नाही समजली.

योगी९००'s picture

12 Aug 2009 - 12:25 pm | योगी९००

असेच म्हणतो.

चिरीमिरी देऊन सुटका करून न घेतल्याबद्दल आपले अभिनंदन..

बाकी 'शेख' हे आडनाव वापरण्याची आयडिया नाही समजली.

खादाडमाऊ

भिंगरि's picture

12 Aug 2009 - 7:16 am | भिंगरि

घाबरुन न जाता प्रसंगावधान दाखवल्याबद्दल,
कुठलहि बेकायदेशिर कृत्य करण्यास न बधल्याबद्दल,
आचरट लोकांचा माज उतरवल्याबद्दल
.
.
.
.
मनापासुन अभिनंदन! :)

सहज's picture

12 Aug 2009 - 7:19 am | सहज

घाबरुन न जाता प्रसंगावधान दाखवल्याबद्दल,

अभिनंदन! एट्यीट्युड आवडली.

दशानन's picture

12 Aug 2009 - 8:36 am | दशानन

अभिनंदन! एट्यीट्युड आवडला !

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Aug 2009 - 7:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्वा ! चांगले झापले. खरं तर पाखरु म्हणाल्याबरोबर अजून शंभर रुपये देऊन त्याची माय-बहिण काढायला पाहिजे होती. असो,

लेखनशैली चांगली. पुलेशु !

-दिलीप बिरुटे

सुधीर काळे's picture

12 Aug 2009 - 7:54 am | सुधीर काळे

झकास, मनू तांबे (aka झाशीची राणी!)
सुरेख लेख. मनापासून अभिनंदन.
सुधीर काळे
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Aug 2009 - 10:08 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

वेल डन! उगाच आवाज करणार्‍यांना असाच धडा शिकवला पाहिजे.

अदिती

मस्त कलंदर's picture

12 Aug 2009 - 10:11 am | मस्त कलंदर

असंच वागलं पाहिजे अशा लोकांशी.... वेल डन...!!!

पण पाखरू म्हटल्याबद्दल जरा फैलावर घ्यायला हवं होतं.....

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

अवलिया's picture

12 Aug 2009 - 10:17 am | अवलिया

वेलडन !

--अवलिया

ज्ञानेश...'s picture

12 Aug 2009 - 12:07 pm | ज्ञानेश...

खमकेपणा दाखवल्याबद्दल! =D>

'अर्धा गट्टू' मलाही समजला नाही. पण तुम्ही नियम मोडला नसेल तर दीडशे रुपयेही द्यायची गरज नव्हती.

"Great Power Comes With Great Responsibilities"

एकलव्य's picture

14 Aug 2009 - 5:29 am | एकलव्य

अभिनंदन खमकेपणा दाखवल्याबद्दल!

'अर्धा गट्टू' मलाही समजला नाही. पण तुम्ही नियम मोडला नसेल तर दीडशे रुपयेही द्यायची गरज नव्हती.

लेखनशैली आवडली वेदश्रीताई!

अभिज्ञ's picture

12 Aug 2009 - 12:11 pm | अभिज्ञ

उच्च अनुभव.

अभिज्ञ.

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

समंजस's picture

12 Aug 2009 - 12:35 pm | समंजस

जबरदस्त!!!

आशिष सुर्वे's picture

12 Aug 2009 - 12:41 pm | आशिष सुर्वे

वा शेख!!
फार सुंदर लेख!!
-
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

प्रसन्न केसकर's picture

12 Aug 2009 - 2:03 pm | प्रसन्न केसकर

म्हणजे गाडी जरी नो पार्किंगमधे अर्धीच असली तरी दंड मात्र पुर्ण झाला की. २४ जुन १९९६ रोजी गृहखात्याने काढलेल्या आदेशानुसार (जी आर नं. MVA-0593/1708/CR-29/TRA-2) नो पार्किंगकरता १०० रुपये तडजोड रक्कम (त्याला तडजोड रक्कमच म्हणतात दंड नव्हे. दंड फक्त कोर्टाला करता येतो.) आहे आणि दुचाकी वाहन उचलुन नेण्यापोटी ५० रुपये घेता येतात. पण पोलिसांचा वरकमाई करण्याचा डाव तुम्ही उधळुन लावलात हे खूप महत्वाचे आहे.
---

Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

वेदश्री's picture

12 Aug 2009 - 2:42 pm | वेदश्री

सर्वच प्रतिसादकर्त्यांचे मनापासून आभार.

अनामिक,
>अवांतर : डोनट होल्स मिळतात ना छोट्या लाडवाच्या आकाराचे... त्याला गट्टू हे नाव ठेवलं होतं आम्ही रूममेट्सनी, त्याची आठवण झाली.

कॉलेजमध्ये असताना वर्गातल्या प्रश्नांना एकजण नेहमी पुस्तकी भाषेत उत्तरे द्यायचा म्हणून आम्ही काहीजणांनी त्याला गटणे उर्फ गट्टू संबोधायला सुरूवात केली होती. :)

पुण्याचे पेशवे आणि ज्ञानेश,

आजकाल रस्त्याच्या कडेला पायी चालणार्‍यांसाठी दुतर्फा रस्ते बनवताना जे सिमेंटचे ठोकळे वापरतात (कधी ते षटकोनी असतात तर कधी दोन त्रिकोण जोडलेले असल्यासारखे ) त्यांना गट्टू असे म्हणतात.

शाहरुख आणि खादाडमाऊ,

लहानपणापासूनच मला वेषांतर करून जवळपासच्या भागात फिरण्याची आणि नवनवे अनुभव गोळा करून लोकांची खरी मानसिकता समजून घेण्याची खूप हौस आहे. अशा गोळा केलेल्या अनुभवांमधूनच कळलेय की मुस्लिम स्त्री (तेही बर्‍यापैकी कट्टर मुस्लिम घरातली असावी अशी ) टीशर्ट-पँट घालून पण बुरखा न घालता फिरलेली भारतातही बहुतांशी पुरूषांना खटकते. याच मानसिकतेचा फायदा घेतला मी.. बाकी काही नाही.

महालक्ष्मीच्या देवळात बुरखा घालून आणि हाजी अली दर्गामध्ये टीशर्ट-पँट घालून गेल्यावर आलेले अनुभव... सुभानल्लाह!

प्रा.डॉ.दिलीप बिरूटे आणि मस्त कलंदर,

पाखरू म्हटल्याबद्दल फैलावर न घेता त्यांची लायकी त्यांना उमगायला लावून त्यांचीच जीभ त्यांच्याच घशात कोंबायला जास्त भावते मला. :)

ज्ञानेश,

नियम तोडलेला नसल्याने १५० रुपये देताना मलाही काही आनंद झाला नव्हताच पण माझ्या गाडीने अर्धा गट्टू व्यापल्याची शिक्षा मोजली त्यामुळे आता परत तेवढादेखील नियम तोडणार नाही मी. :(

पुनेरी,

हो ना हो. पूर्ण दंड वसूल केला त्यांनी माझ्याकडून. पावतीवरून कळले की दंड वसूल करणारा तो माणूस स्वतः मुसलमान होता (अर्थात हे मला त्याच्या चेहर्‍यावरून कळायला काहीच मार्ग नव्हता म्हणा )! :)

पुनश्च सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनापासून धन्यवाद.

निखिल देशपांडे's picture

12 Aug 2009 - 2:44 pm | निखिल देशपांडे

लेख मस्तच लिहिला आहे...

महालक्ष्मीच्या देवळात बुरखा घालून आणि हाजी अली दर्गामध्ये टीशर्ट-पँट घालून गेल्यावर आलेले अनुभव... सुभानल्लाह!

ह्याबद्दल कधी लिहिता आहात.....

निखिल
================================

मदनबाण's picture

12 Aug 2009 - 3:01 pm | मदनबाण

देशपांड्याशी सहमत...
नक्कीच आवडेल वाचायला...

(वाचक)
मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

बाकी तुमचा अनुभव खुपच जबरा आहे.पुढचे अनुभव लिखाण वाचण्यास उत्सुक आहे. वेषातंराची कल्पना प्रमोद नवलकरांकडुन घेतली कि काय? :D
वेताळ

हर्षद आनंदी's picture

12 Aug 2009 - 3:24 pm | हर्षद आनंदी

पाखरू म्हणायला काय, त्याच्या बापाचे खाता काय? चांगल्या २ वाजवायच्या.

आणि पैसे दिलेतच का? तुमचा एकंदरीत रोख बघुन गाडी तशीच सुटली असती, सुटायलाच हवी होती !!
जरा अजुन आवाज चढवुन बोलायला हवे होते.

असो. हे ही नसे थोडके...

शेख म्हणण्याचे कारण : हा गोरख धंदा बर्‍याच प्रमाणात **च्या हातात आहे.

वेदश्री's picture

12 Aug 2009 - 4:05 pm | वेदश्री

नव-प्रतिसादकर्त्यांचे आभार.

निखिल देशपांडे आणि मदनबाण,

लिहीन वेषांतराच्या अनुभवांबद्दलही कधी. :)

वेताळ,

राजा राज्याची पाहणी करायला वेषांतर करून जायचा, हे गोष्टीच्या पुस्तकांमधून वाचून वाचून तसेच करून पहायची कल्पना लहानपणीच सुचली होती. लहानपणचा खेळ होता तो एक.

हर्षद आनंदी,

शेख हे आडनाव जरी मी माझ्या अनुभवातून शिकलेल्या ज्ञानाने सुचवल्याप्रमाणे वापरले असले तरी मला चांगल्या स्वभावाच्या मुसलमान लोकांबद्दल अत्यंत आदर आहे.

मिसळभोक्ता's picture

13 Aug 2009 - 11:54 am | मिसळभोक्ता

तरी मला चांगल्या स्वभावाच्या मुसलमान लोकांबद्दल अत्यंत आदर आहे.

द्या टाळी !

मलाही चांगल्या सुस्वभावी हिंदूंबद्दल आदर आहे.

उद्यापासून पोलिसांनी पकडले तर मी जोशी आडनाव सांगणार !

बघू, किती पैशात कटवतो ते..

-- मिसळभोक्ता

शाहरुख's picture

13 Aug 2009 - 11:07 pm | शाहरुख

असो..

सूहास's picture

12 Aug 2009 - 4:07 pm | सूहास (not verified)

सू हा स...

नाना बेरके's picture

12 Aug 2009 - 4:35 pm | नाना बेरके

त्याने तुम्हाला पाखरू म्हटल्यावर तुम्ही पोलिसांकडे ( खाकीवाल्या ) जाण्याची भाषा करायला हवी होती. त्यांना तुम्ही एवढं जरी म्हणाला असतात कि, "एका स्रीची छेडछाड काढणे आणि तिच्याशी असभ्य भाषेत बोलणे ह्या गुन्ह्याची तुमच्याविरुध्द मी पोलिसांत नोंद करणार आहे". असं म्हणून त्याचं नांव जरी विचारलं असतं, तरी तुमचे आख्खे पैसे वाचले असते.

लिखाळ's picture

12 Aug 2009 - 5:25 pm | लिखाळ

छान लेख..अनुभव..
खमकेपणाने त्या उद्धटांशी वागल्याबद्दल अभिनंदन.
वेषांतराचे अनुभवसुद्धा लिहा की !
पु ले शु

-- लिखाळ.
दहशतवाद-भौगोलिक-जैविक-कोणतीही आपत्ती येऊ दे ! आमचे सरकार तत्काळ खंबीर निर्णय घेणार नाही आणि त्वरित कृती करणार नाही अशी खात्री आहे. आपत्तीचे प्रकार बदलतात पण राज्यकर्त्यांचा स्वभाव बदलत नाही.

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Aug 2009 - 1:09 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्तच किस्सा. जमल्यास एखाददोन फोटोही काढायचे असते त्या 'सायबांचे' आणि 'कावळ्यांचे'... 'बिफोर' आणि 'आफ्टर'. धमाल आली असती.

लिखाळपंतांशी सहमत आहे. इतर धमाल अनुभवही लिहा की.

बिपिन कार्यकर्ते

भाग्यश्री कुलकर्णी's picture

13 Aug 2009 - 1:16 pm | भाग्यश्री कुलकर्णी

फारच छान लिहलाय अनुभव्.वाचतानाही त्या उध्धटाच्या दोन खेचायची इच्छा होतेय.

क्रान्ति's picture

13 Aug 2009 - 9:29 pm | क्रान्ति

अगदी चांगला धडा शिकवला. अभिनंदन!

क्रान्ति
सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा
अग्निसखा
रूह की शायरी