प्रास्ताविक - बहुगुणी यांच्या एका लेखावरून मनात आलेले काही स्वैर विचार....
आपल्या लोकसंगीताच्या खाणीतील काही हिरे-माणके हिंदी चित्रपटगीतांत आणून बंगाली संगीतकारांनी दोन गोष्टी केल्या. एक हिंदी सिनेसंगीत अधिक समृद्ध केले आणि दुसरे म्हणजे, ह्या बंगाली खजिन्याची ओळख उर्वरीत देशवासीयांना करून दिली.
ह्यातील दुसर्या गोष्टीचे मला अधिक अपृप वाटते.
रवींद्रनाथांना नोबेल पारितोषिक मिळाले त्याचबरोबर अनेक बंगाली कथा-कादंबर्यांची विविध भारतीय भाषांत रुपांतरेदेखिल झाली. परंतु, संगीताचा प्रभाव हा अधिक असतो, समाजातील सर्व स्तरांत झिरपणारा असतो.
नेमके हेच बंगाली संगीतकारांमुळे घडले. बंगाली ही इतर भारतीयांच्या दृष्टीने कुतुहलाचा विषय बनली. बंगाली शिकणे, गाणी मुखोद्गत करणे हे एका अर्थाने "स्टेटस सिंबॉल" बनले. थोडक्यात, बंगाली ही "अपमार्केट" भाषा बनली!
मराठी संगीतकारांनी संधी असूनही हे केले नाही. वास्तविक मराठी लोकसंगीताचा खजिनादेखिल अपरंपार आहे. "होनाजी बाळा" कार वसंत देसाईंचा लोकसंगीताचा अभ्यासही नक्कीच असावा. तरीही हे घडले नाही याची खंत वाटते. असे घडते तर मराठी माणिकमोत्यांची ओळख देशवासीयांना घडती; ज्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ मराठी भाषेला होता.
अल्पसंख्य अशा अभिजनांची संस्कृती ही संपूर्ण समाजाची संस्कृती असल्याची प्रतिमा निर्माण करण्यात बंगाली यशस्वी ठरले. मराठी अभिजन यात कमी पडले.
रेल्वेप्रमाणेच भाषांतही - काही अप तर काही डाउन!
प्रतिक्रिया
4 Aug 2009 - 12:29 pm | नंदन
विसाव्या शतकाच्या सुरूवातीच्या अभिजन मराठी समाजाच्या डोळ्यांसमोर बंगाली भद्रलोक संस्कृतीचा आदर्श होता, असं प्रतिपादन अरूण टिकेकरांनी (बहुतेक 'तारतम्य' नावाच्या सदरात) केल्याचं आठवतं. अर्थात, त्याला रवींद्रनाथ आणि शरच्चंद्रांसारखे दिग्गज कारणीभूत असावेत. पुलंच्या आजोबांनी (ऋग्वेदी) गीतांजलीचा मराठीत छंदबद्ध अनुवादही केला होता. आपल्या बंगाली शिकण्यामागच्या इच्छेचे ते एक मूळ आहे, हे पुलंनी नमूद केलं आहेच.
अर्थात यानंतरच्या 'अपमार्केट' बनण्यामागे बंगाल्यांचं चिवट भाषा आणि संस्कृतिप्रेमही आहे, तसा थोडासा अहंगंडही. संगीतातलेच उदाहरण द्यायचं झालं तर गुरूदत्तशी न पटल्याने गीता दत्तने आपल्या आयुष्याची व करिअरची राखरांगोळी करून घेतली आणि त्यामुळेच लताबाईंना पुढे यायची संधी मिळाली, असा माझ्या एका बंगाली मित्राचा ग्रह होता. पन्नाशीच्या दशकात (आणि थोडी बरसात सारखी त्याआधीची) वर्षानुक्रमे रिलीज झालेली आणि गाजलेली लताबाईंची गाणी व प्यासाचे बरेच उशीराचे प्रदर्शनवर्ष; सलील चौधरींची एक मुलाखत असे भक्कम पुरावे दिल्यावरच स्वारी नाइलाजाने कबूल झाली.
१९४१ मधल्या खजांची ह्या चित्रपटापासून हिंदी चित्रपटसृष्टीचा आधीचा पारशी-मराठी मिश्र तोंडवळा बदलला आणि पंजाबी वर्चस्व सुरू झाले, ते मधला बंगाली संगीतकारांचा प्रभाव वगळता अजून टिकून आहे, असं म्हणतात. (स्मरणातून दिलेली माहिती. चूभूदेघे). मराठी संगीताबद्दल असं घडलं नाही, त्याला आपल्याच कलांविषयीचा न्यूनगंड कारणीभूत असावा का? याबद्दल जाणकारांनी लिहिल्यास अधिक उत्तम.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
4 Aug 2009 - 6:28 pm | भोचक
सुनील धागा छान. नंदनच्या प्रतिसादाशी सहमत. बंगाली भाषेचा प्रभाव फार मोठा आहे. इंग्रज बंगालमध्ये फार लवकर आल्याने पाश्चात्य जगतातल्या सुधारणावादी विचारांच्या ते फार लवकर संपर्कात आले. आधुनिक शिक्षणही तिकडे लवकर पसरले गेले. त्यामुळे नवा चष्मा त्यांना मिळाला. त्यातून इंग्रजांचे अनुसरण करणारे आणि विरोध करणारे अशा दोन प्रकारचे लोक अस्तित्वात आले. पण त्यामुळे भाषेचे मात्र भलेच झाले. चांगले साहित्य या भाषेत लिहिले गेले. सकसपणा असल्याने त्याचा प्रसारही झाला. हिंदीत बंगालीसारखी वैचारिक परंपरा नसल्याने त्याचा तितका प्रभाव पडला नाही. मराठीत ही परंपरा उशिरा आली. शिवाय आपले साहित्य इतर भाषांत जावे यासाठी आपल्याकडूनही आपण फारसे प्रयत्न केले नाहीत.
रवींद्रनाथांचे सोडून देऊया. पण तस्लिमा नसरीन या लेखिकेने बंगालीत लिहिले नि ते जगभर पोहोचले. विषय वादग्रस्त असला तरीही अशा पद्धतीचे कादंबरीमय आणि वैचारिकही (हुसेन दलवाई) लिखाण मराठीतही झाले. पण ते इतरत्र पोहोचले गेले नाही. बंगालीत लिहिल्यानंतरही त्याला भाषक मार्केट मिळते, हे त्या भाषेची महत्ता स्पष्ट करणारे आहे हे नक्कीच.
बंगाली लोकांमध्ये अहंगंडही बराच आहे या नंदनच्या मताशीही संपूर्णतः सहमत आहे. माझ्याबरोबर काम करणार्या बंगाल्यांवरूनही त्याची प्रचिती येते. इंदूरमध्ये एक बंगाली क्लब आहे. माझ्या मित्राबरोबर तिथे एकदा दुर्गापुजेनिमित्त गेलो होतो. तिथे या समाजतले सगळे 'भद्रलोक' आले होते. त्यात एक जण खांडव्याचा होता. मराठी संस्कृतीच्या जवळपास राहिलेल्या या माणसाला मराठी नाटकांविषयी बरेच प्रेम आहे. त्याने बरीच नाटकं पाहिलेली आहेत. त्याचा संबंध व्यावसायिक नाटकांशी आला असला तरी तेवढ्यावरूनही तो खूपच प्रभावित झालेला दिसला. त्यानेच एक मुद्दा सांगितला, तो म्हणाला, ''आमच्या बंगाल्यांमध्ये साहित्यासह वैचारिक क्षेत्रात आम्हीच श्रेष्ठ असा अहंगंड आढळतो. मी त्यांना सांगतो, आता तसं नाही. रवींद्रनाथ आणि शरदचंद्रांनंतर त्यांच्या तोडीचे कोणते साहित्यिक बंगालीत झाले? शिवाय इतर भाषांत काय चालते हे माहिती आहे काय? मी त्यांना मराठी नाटकांविषयी माहिती देतो, तेव्हा त्यांना खूप आश्चर्याचं वाटतं.''
माझ्याबरोबर माध्यमांत काम करणार्या माझ्या बंगाली मित्राला खरोखरच आपल्या व्यतिरिक्त इतर भाषांत काय चालले आहे, याची कल्पना नसते. त्यांना मराठी लोकांविषयी आदर असल्याचे जाणवते. साहित्य, संस्कृती, वैचारिकता आणि देशप्रेम या बाबतीत मराठी लोक 'कुठेतरी' आपल्या आसपास आहे असे त्यांना वाटते. पण मराठी लोकांचे वेगळेपण काय? तिथल्या साहित्यातले, संगीतातले प्रवाह काय याची त्यांना फारशी जाण नसते. बंगाली साहित्य मराठीत बर्याच प्रमाणात अनुवादित झाले आहे, हे सांगितले की त्यांना आश्चर्य वाटते. पण मराठीतले बंगालीत किती गेले हे विचारल्यावर त्यांच्याकडे उत्तर नसते. विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी मराठी लोकांमध्ये असलेली उत्सुकता त्यांना चक्रावून टाकते. बोस यांच्यावर मराठीत चांगली चरित्रमय कादंबरी लिहिली गेली. तिचे खुद्द ज्येष्ठ साहित्यिक सुनीलकुमार गांगुली यांनी कौतुक केले आणि आता बंगालीत नव्याने बोस यांचे चरित्र लिहिण्याची गरज नसल्याचे सांगितले. हे त्या मित्राला सांगितल्यावर त्यालाही आश्चर्य वाटले. त्याचवेळी लोकमान्य टिळक, सावरकर या स्वातंत्र्यचळवळीतल्या मंडळींविषयी यांच्याविषयी तिकडे तेवढी जागरूकता नसल्याचेही जाणवले. (बाकी ठाकरे घराण्याविषयी त्यांच्यात जबरदस्त कुतूहल जाणवले.)
बंगाल्यांच्या हिंदीविषयी बोंब असते. त्यांना हिंदी भाषेविषयी चक्क दुस्वास वाटतो. हिंदी बोलणे त्यांना कमीपणाचे वाटते. तिला राष्ट्रभाषा म्हणायला त्यांची जीभ रेटत नाही. साहित्यिकदृष्टया ती भाषा दरिद्री असल्याचा या माझ्या बंगाली मित्रांचे म्हणणे आहे. त्यातल्या अनेकाना हिंदी वाचताही येत नाही. तसा प्रयत्नही ते करत नाही. आमच्याकडे फक्त बंगाली आणि इंग्रजीतून शिक्षण आहे, असे ते म्हणतात. अनुवादित साहित्यही आमच्याकडे नसल्याचे सांगतात. इंग्रजी कादंबर्या आमच्याकडे थेट इंग्रजीतून वाचल्या जातात, हे सांगून ते आपल्या इंग्लिशप्रेमाचा गंड कुरवाळतात.
बाय द वे. बंगाल्यांच्या भाषाप्रेमाविषयी एका पत्रकाराचा हा लेख आवर्जून वाचावा.
http://marathi.webdunia.com/miscellaneous/special08/mumbai/0805/10/10805...
4 Aug 2009 - 10:39 pm | प्रमोद देव
पण तस्लिमा नसरीन या लेखिकेने बंगालीत लिहिले नि ते जगभर पोहोचले. विषय वादग्रस्त असला तरीही अशा पद्धतीचे कादंबरीमय आणि वैचारिकही (हुसेन दलवाई) लिखाण मराठीतही झाले
आपल्याला हमीद दलवाई तर म्हणायचे नाही ना?ते मुस्लिम सत्यशोधक समाजाचे संस्थापक होते.
हुसेन दलवाई हे एक काँग्रेसचे महाराष्ट्रातले स्थानिक नेते आहेत आणि त्यांची वैचारिक दिवाळखोरी जगजाहिर आहे.
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
6 Aug 2009 - 1:25 pm | भोचक
प्रमोदजी,
हा नक्कीच शब्द 'प्रमाद' घडलाय. हुसेन नव्हे हमीद दलवाई असेच म्हणायचे होते. चुकून हुसेन टंकले गेले.
(भोचक)
6 Aug 2009 - 1:43 pm | प्रदीप
हमीद दलवाई अभिप्रेत होते. त्यांचे श्रेय हुसेन दलवाईंना दिल्याबद्दल एकदा माफी. आणि एका काँग्रेस पुढार्याला वैचारिक असे विशेषण लावल्याच्या प्रमादाबद्दल त्याचीही माफी!!
4 Aug 2009 - 9:07 pm | प्रदीप
सुंदर चर्चाप्रस्ताव आणि त्याला आलेले नंदन व भोचक ह्यांचे मर्मग्राही प्रतिसाद आवडले.
बंगाल्यांचा अहंगंड कला, भाषा, राजकारण ह्या सर्वच क्षेत्रात आढळून येतो हे खरे आहे. आणि त्यांनी त्यांच्या ह्या वर्चस्वाचा प्रचार व प्रसार खुबीने केलेला आहे. आपण ह्या बाबतीत बरेच कमी पडलो. चित्रपट संगीताच्या बाबतीत सांगायचे झाले तर सी. रामचंद्र व लक्षीकांत हे दोन गुणी व भरपूर यशस्वी संगीतकार मराठी होते. ह्या दोघांनी मराठी लोकसंगीताचा, मराठी वाद्यांचा विशेष वापर केल्याचे आठवत नाही. साधे ढोलकीचे उदाहरण घेऊया. लक्षीकांत-प्यारेलालच्या एकाद- दुसर्या गाण्यात हे ढंगदार वाद्य वाजले असेल, नसेल (व तेही गाणे म्हणजे उघड, उघड एखादी लावणी आहे म्हणूनच). सी. रामचंद्रांनी त्याचा वापर केल्याचे मलातरी कुठे जाणवले नाही. ह्याउलट, १९५६-५७ च्या सुमारास लालाभाऊ गंगावनेंकडून शंकर- जयकिशन ह्यांनी अनेक गाण्यांना बहारदार ढोलकी वाजवून घेतली आहे.
हे असे का व्हावे? आपले लोकसंगीत, बंगाली बाऊल गीती, नुझरुल गीती, माझीची गीते इ. च्या तुलनेत खरोखरीच निकृष्ट आहेत का?हिंदी चित्रपट संगीताच्या संदर्भात नंदन ह्यांनी एक मुद्दा मांडला आहे, तोही ह्या पिछेहाटीस कारणीभूत झाला असावा. ४० च्या दशकात पंजाबी व बंगाली चित्रपट निर्माते व दिग्दर्शक ह्यांनी हिंदी चित्रपटसृष्टिवर जोरदार पकड बसवली. बंगाल्यांच्या न्यू थिएटर्स, बॉम्बे टॉकिज इ. स्टुडियोजनी सुरूवातीस जमाना गाजवला, त्यात तत्कालिन व्यापार- तंत्रानुसार संगीताचा प्रमुख हातभार होता. हे संगीत देण्यासाठी त्यांनी बंगालातूनच संगीतकार आणले, व रूजवले. गायक गायिकाही तेथल्याच असत. पुढेही बिमल रॉय, शशिधर मुखर्जी, प्रमोद चक्रवर्ती इ. बंगाली निर्माते आघाडीवर होते. त्यांच्यासमोर आमचे एकमेव आघाडीचे निर्माते तेव्हा होते ते शांतारामबापू. ते एकटे मराठीचा डंका पिटून किती पिटणार?
ह्याव्यतिरिक्त आपल्याच जनांचे पाय खेचण्याचे काम आपण निष्ठेने नेहमी करत रहातोच. साहित्य अकादमीचे मराठीला मिळणारे पहिले पारितोषिक कुण्या मराठी तत्वज्ञाने काही तांत्रिक खुसपट दर्शवून घालवले होते, त्याची आठवण येथे होते.
4 Aug 2009 - 9:40 pm | लिखाळ
छान चर्चाविषय आणि प्रतिसाद. पुढे वाचण्यास उत्सुक.
मराठी लोकांचा न्यूनगंड अनेक बाबींना करणीभूत असावा असे वाटते. (जाणकारांचे मत ऐकण्यास उत्सुक). 'बॉलीवुड' मराठी मुलखात असूनही मराठी संस्कृतीचा पगडा त्यातील चित्रपटांवर किती कमी आहे. भारतीय घर-कुटूंब-लग्न वगैरे म्हणजे पंजाबी ! असेच वातावरण त्यांनी निर्माण केले आहे. आणि घरातल्या नोकरांशी बोलणे फक्त मराठी मध्ये इतकीच किंमत त्यांनी ठेवली आहे.
-- लिखाळ.
आपण खूप बोलतो याचा अर्थ आपण बरोबर बोलतो असे नाही !
5 Aug 2009 - 2:06 am | llपुण्याचे पेशवेll
लिखाळरावाशी सहमत आहे. आणि मराठी बद्दल मराठी माणसाचीच उदासीनता इतकी आहे की विचारू नका.
उदा.१ आमच्या हापिसात एक बंगालीण आहे तिचे नाव आहे सौमिता बंगाली उच्चार 'शॉमिता'. इंग्रजी स्पेलिंग आहे 'Saumita'. सर्व बंगाली लोक हटकून उच्चार शॉमिता असा करतात.
उदा.२ आमच्या हापिसात एक मराठी मुलगी आहे तिचे नाव आहे कांचन. मराठीच आहे. इंग्रजी स्पेलिंग 'Kanchan'. या स्पेलिंगमुळे अमेरीकन लोक उच्चार करतात 'कॅन्चन'. उत्तर भारतीय लोक उच्चार करतात 'कंचन' आणि म्हणून मराठी लोकही उच्चार करतात 'कंचन'. उच्चार नीट करा सांगितले तर जास्त राग मराठी लोकानाच जास्त येतो.
>>आणि घरातल्या नोकरांशी बोलणे फक्त मराठी मध्ये इतकीच किंमत त्यांनी ठेवली आहे.
ही किंमत त्यानी ठेवली आहे म्हणण्यापेक्षा ती मराठी माणसाने स्वतःच्या हाताने तितकी करून घेतली आहे असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. याबद्दल पुलंच्या लेखनातील पंजाबी आईची मराठी मुलगी आठवली(म्हणजे जिची आई पंजाबी आणि वडील मराठी होते). जी आडनावाने चांगली मराठी असून कायम हिंदी बोलायची. यावर तिला विचारले असता ती म्हणाली मराठी ही नोकरमाणसांची भाषा वाटते. त्यावर तिला पुलंनी विचारले म्हणजे तुझ्या आईने नोकराशी लग्न केले असे आहे की काय?
तेच मराठीच्या जाहीर वापराच्या बाबतीत. आमच्या मुख्यमंत्र्यांपासून ते खेळाडू, अभिजनाना सगळ्याना असेच वाटत असावे.. चूकून कधी मराठीत बोलले तर त्यात ५०% शब्द इंग्रजी असतात.
असो. हल्ली अशा विषयांवर जास्त विचार करून स्वतःला त्रास देणे सोडून दिले आहे. समाज हा अनुकरणप्रिय असतो हे जाणून स्वत: आधी मोठे व्हावे आणि आपले मराठीप्रेम जपावे असे वाटते. म्हणजे काही अनुकरणप्रिय लोकही तसे करतील असे वाटते.
असो, हा प्रतिसाद अवांतर वाटला तर जरून उडवून लावावा.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
5 Aug 2009 - 9:51 am | पाषाणभेद
असेच एका छायाप्रती काढणार्या दुकानदाराला मी "५ प्रती काढून द्या" म्हटल्यावर "काय प्रती प्रती लावले आहे" असे (दु)उत्तर आले. नंतर मी त्याची चांगलीच तासली तो भाग निराळा. पण असले लोक असतात मराठी बोलणारे.
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
5 Aug 2009 - 3:47 am | विकास
विषय आणि प्रतिसाद आवडले. (अप - डाऊन म्हणजे काय रे भाऊ? ;) )
वर दिलेल्या कारणातील एक महत्वाचे कारण म्हणजे मराठी माणसाचा एकमेकांशी असलेला "घालीन आडवी टांग, पाडीन उताणा, असाच अमुचा मराठी बाणा" हा स्वभाव.
आपल्या भाषेला, धर्माला, देशाला त्या संदर्भात परक्यांसमोर सार्थ योग्यता दाखवण्यात आपल्याला कमी पणा वाटतो. (अपवाद जातीचा, जात आली की मात्र परजातीसमोर पण अभिमान दाखवायला कमीपणा वाटत नाही). थोडक्यात आपण स्वत:तील चांगल्या गोष्टींचे मार्केटींग करत नाही आणि दुर्गुणांना मात्र येथेच्छ झोडपत उगाळतो.
आता वरील प्रस्ताव/प्रतिसादात सांगितलेल्या व्यतिरीक्त बंगाल्यांच्या बाजूने काय असावे?
मला वाटते त्याला काही ऐतिहासीक आणि राजकीय कारणे आहेत. बंगालचे नाव कधीपासून जास्त गाजू लागले? साधारण १९व्या शतकापासून. तसे का असावे? अर्थात कलकत्ता ही सुरवातीस ब्रिटीशांची राजधानी झाली. त्याचा प्रत्यक्ष फायदा (शिक्षण आणि अधुनिकता) तेथील आधीच सुशिक्षित असलेल्या वर्गाने त्वरीत घेतला. त्याचा (चांगला) परीणाम म्हणून राजा राममोहन रॉय सारखे सुधारणावादी तेथे त्वरीत झाले. त्याच्या जरासे आधी, मराठे सरदार आणि पेशव्यांनी पुर्व आणि उत्तर भारतभर आपले नाव केले होते... त्याचे म्हणून चांगले आणि वाईट परीणाम हे मराठी म्हणल्यावर भोगणे प्राप्त होते. इतके की, रविन्द्रनाथांना नोबेल पारीतोषिक मिळाल्यावर टिळकांनी त्यांना तत्कालीन रू. ५०,००० देऊ केले आणि "तुमच्या सारख्या व्यक्तीने जग फिरून येऊन आपल्या माणसांना, स्वतःच्या बाहेर काय चालले आहे ते साहीत्यिकाच्या दृष्टीतून सांगा" असे सांगितले. रविंद्रनाथांनी मात्र सभ्यतेच्या मर्यादा पाळत ते पैसे घेतले नाहीत. (Thanks, but no thanks!). अर्थात हे सांगत असतानाच, टिळकांच्या काँग्रेसाध्यक्षपदाला पाठींबा देण्यात जसे पंजाबचे लाला लजपतराय होते तसेच बंगालचे बिपिनचंद्र पाल होते हे ही लक्षात ठेवले पाहीजे. (आणि अर्थात गोखल्यांच्या बाजूने सुरेन्द्रनाथ बॅनर्जी!)
शिवाजी आणि मराठ्यांचा इतिहास तपासताना आजही आपले लोकं बंगाली इतिहासकार वापरतात.
दुसरा भाग अर्थातच त्यांच्यात आलेला मार्क्सवाद! त्याचे कारण हे परत त्यांच्या भावनाविवश स्वभावात आहे असे कुठेतरी वाटते. मात्र तसे होत असताना इतरांना चूक ठरवणे आणि कमी लेखणे वाढत गेले. पण हे मराठी लोकांच्यासंदर्भातच नाही तर इतर कुणाच्याही...
एकंदरीत ब्रिटीश पारतंत्र्याच्या गर्द काळोखात भारतात अनेक तारे चमकत होते. ते जसे पश्चिमेकडे महाराष्ट्रात होते तसेच बंगालमधेही होते. पण अचानक, टागोर, बॅनर्जी, बंडोपाध्याय, पाल्स, रॉय, बोस, दत्त, चॅटर्जी, अर्थातच विवेकानंद, रामकृष्ण परमहंस आणि अरबिंदो असे एकसे बढकर एक दिग्गज झाले, तेच संगीतात आणि कलेत... परीणामी आता एकदम उर्जापात झाल्यासारखी अवस्था आली आहे. माझा एक मित्र म्हणायचा, "जबसे बंडोपाध्याय का बॅनर्जी हुआ और चट्टोपाध्याय का चॅतर्जी हुआ तबसे बंगाल का एनर्जी गया!"
-------------
5 Aug 2009 - 4:10 am | एकलव्य
आवडले!
5 Aug 2009 - 8:05 am | विसोबा खेचर
वाचनीय धागा...
तात्या.
5 Aug 2009 - 9:13 pm | मुक्तसुनीत
मुद्दा १ : तरीही, एकंदर बंगाली समाजच "एलीट" असावा अशी , आपल्या समाजाची प्रतिमा रूढ करण्यात बंगाली लोकांना यश आले असे हे प्रतिपादन दिसते.
जो कर्क याना मान्य आहे.
मुद्दा २ : आपल्या लोकसंगीताच्या खाणीतील काही हिरे-माणके बंगाली संगीतकारांनी हिंदी चित्रपटगीतांत आणली.
आता हा मुद्दा २ मुद्दा १ शी विसंगत नक्की कसा ? ही दोन निरनिराळी वर्तने आहेत जी एकमेकांना छेद जात नाहीत. असो.