बापू!! (व्यक्तिचित्रण)

प्राजु's picture
प्राजु in जनातलं, मनातलं
16 Jul 2009 - 12:14 am

"अरे बापू, जाऊन जरा नविन शेटच्या शेडवरून आपली बिमं घेऊन ये.."
"बापू, इचलकरंजी सहकारी मधे हा चेक टाकून ये..."
"बापू.. ३ नंबरचा माग बंद का पडलाय बघ जरा.."
एक ना हजार! हा बापू म्हणजे पुलंच्या "नारायण" चं पॉवरलूम मॉडेल असंच म्हणावं लागेल. इचलकरंजीमध्ये माझ्या भावाच्या पॉवरलूमच्या कारखान्यात असलेला हा एक नमुना.
नमुना अशासाठी की, कोणतंही काम करायला हा जसा एका पायावर तयार असतो तसंच कोणताही प्रश्न विचारताना तो लोजिकली बरोबर की चूक हा विचार करणं म्हणजे घोर अपराध केल्यासारखं त्याला वाटतं.
अंगकाठी म्हणाल तर हाफ पॅन्ट घालून आला तर दहावी-बारावीचा विद्यार्थी वाटेल. २ मुली आहेत त्याला. धाकटीवर विशेष जीव आहे याचा.
माझ्या भावाच्या अखंड बरोबर असणारा हा बापू.
माझी त्याच्याशी पहिली ओळख झाली ती मी कारखान्यात दिवाळीत लक्ष्मी पूजेसाठी गेले तेव्हा. खरंतर माझी त्याची काहीच ओळख नव्हती .. पण भावाच्या बोलण्यातून "ताई.. ताई.." असं ऐकून असल्यामुळे असेल कदाचित , भेटल्या भेटल्या "कित्ती दिवसांनी आलात ताई!!! आलात तसं र्‍हावा १-२ दिवस" असं म्हणाला. खरं म्हणजे मी रहायला गेले होते १५ दिवस. पण याचं इतर कामगारांसमोर हे असलं बोलणं एकून नक्की काय प्रतिक्रिया द्यावी मला समजेना. मग माझा भाऊच म्हणाला,"बाप्या... अरे १-२ दिवस काय?? ती १५ दिवस राहणार आहे..." त्यानंतर त्याचा चेहरा गोंधळला आणि त्याच्या लक्षात आलं आपण काहितरी वेगळंच बोलून गेलोय. पण त्याच्या भावना मला समजल्या.
तेव्हा मी पुण्यात रहात होते. हा बापू भावासोबत १-२ वेळा घरीही येऊन गेला पुण्याला. त्याचं माझ्याकडे येणं म्हणजे ,"ताई, काय आणायचं आहे का??" "ताई.. हे करू का? ताई.. ते करू का?" आपण मालकाच्या बहीणीच्या घरी आलोय म्हणजे अखंड काहीतरी काम केलंच पाहिजे अशी काहीशी त्याची समजूत होती.
तो एकदा आला होता पुण्याला त्यावेळी माझ्याकडे आम्ही एक नविन टेबल घेतलं होतं ते लिफ्ट मधून ३ र्‍या मजल्यावर न्यायचं होतं. झालं!! याला भयंकर उत्साह आला. आमचा नेपाळी वॉचमन आणि हा गावठी बापू.. दोघांचा एकमेकाशी चाललेला संवाद अगदी ऐकण्यासारखा होता.
वॉचमन नेपाळी हिंदी बोलत होता आणि बापू गावरान हिंदी बोलत होता. "टेबल को निचे से हात लगाती का? मै उप्पर से उटाता हय!" इति वॉचमन.
बापू आवेशाने म्हणाला, "नको नको.. मी बाहेरून ढकलता है.. तुम आंदरमे ओढो..." हे असले संवाद करत दोघं अगदी मन लावून हिंदी की चिंधी करत होते.
शेवटी टेबल एकदाचं घरात आलं आणि कानावर आदळणारे हिंदी संवाद थांबले. चहा पिता पिता बापूने वॉचमनला विचारले, "नेपाल मे हम्को काम करना है.. तुम देता है क्या?"
वॉचमन म्हणाला," हमको काम नही वहॉ.. इसीवास्ते हाम इदर को आया.." हे ऐकून बापू खट्टू झाला. नेपाळमधे जाऊन राहण्याची स्वप्नं रंगवायला बापूने सुरूवात केलीच होती.

माझी स्कूटी विकायची होती. भावाचा फोन आला बापू घेणार आहे. मी ती कोल्हापूरला पाठवून दिली. बापूने लग्गेच पैसे पाठवून दिले. त्यानंतर अशीच एकदा पुन्हा इचलकरंजीला गेले होते कारखान्यात तेव्हा बापू भेटायला आला.
"कशा हाय ताई?" बापू
"मस्त. तू कसा आहेस? आणि स्कूटी कशी आहे?" मी काहीतरी विषय काढायचा म्हणून विचारलं.
"स्कूटी एकदम मस्त! परवा नविन सीट कव्हर घातल्यापासून अ‍ॅव्हरेज एकदम वाढलंय बघा.." - बापू.
हे ऐकून नक्की हसावं का रडावं हेच मला कळेना. एकतर जोरात हसू येत होतं ... पण त्याच्या निरागस चेहर्‍याकडे बघून मी हसू दाबण्याचा इतका प्रयत्न केला... पण नाही जमलं. माझ्या भावाला बहुतेक ते लक्षात आलं असावं..." बाप्या.. लेका काहिही काय बोलतोस.. जा आत जा .." असं म्हणून त्याने त्याला आत पिटाळला आणि मग मात्र आम्ही दोघं भरपूर हसलो.
गेल्या वर्षी भारतवारीमध्ये कोकणात गेलो होतो सगळे. गणपतीपुळे, मार्लेश्वर रत्नागिरी अशी ट्रीप करायला. बापू होताच. हरकाम्यासारखा.. अखंड काहीना काही करतच होता. गणपतीपुळ्याला जाताना वाटेत काही आंब्याची झाडं होती. अर्थातच हापूसच्या कैर्‍या होत्या त्या.. कलमी!! तिथेच जवळ पोलिसांची एक टपरी वजा चौकी होती. आम्हाला २-३ कैर्‍या काढायची हुक्की आली. गाडी थांबवली. उतरलो आणि बापूला सांगितलं पोलिसाला जाऊन विचार की यातल्या १-२ कैर्‍या तोडून घेतल्या तर हरकत नाही ना? कारण कोणाच्या बागेतल्या कैर्‍या तोडल्या म्हणून नंतर उगाच लफडं नको.. बापू गेला. तिथे टपरी बाहेर एका खुर्चित एक हवालदार बसला होता.
त्याला त्याने विचारलं.. "का हो भाऊ.. २-३ कैर्‍या घेऊ का तोडून आम्ही?"
हवालदार निर्विकार पणे म्हणाला,"मला काय विचारता? हव्या तर घ्या..."
बापू म्हणाला," बाग कुणाची हाय ही?"
हवालदार : " मला काय माहिती?"
बापू : " घेतल्या १-२ कैर्‍या तर काही प्रॉब्लेम न्हाइ नव्हं.?"
हवालदार थोडा चिडला," मला काय विचारता? माझी नव्हे बाग."
बापू : " मग कुणाला विचारू?"
हवालदारः " बागेचा राखनदार असेल ना .. त्याला विचारा की.."
बापू : " मग तुमी हितं काय करताय?"
झालं.. ! हवालदार चिडला. उठून उभा राहिला तसा बापू पळून आला. कैर्‍या राहिल्याच शेवटी!
हा नक्की कोणासमोर काय बोलेल याचा काही नेम नाही.
गणपतीपुळ्याच्या त्या दुकानातून मी त्याचा मुलींसाठी मोत्यांच्या २ माळा आणि कानातल्याचे जोड घेऊन दिले. त्याला त्याचं इतकं कौतुक वाटलं.. तिथे जवळच असलेल्या बूथ वरून त्याने त्याच्या भावाच्या मोबाईलवर फोन केला आणि घरी कळवलं,"ताईनी दोघिंसाठी गळ्यातलं आनि कानातलं घेऊन दिलंय.."
मलाही थोडं बरं वाटलं.
याच्याशी खूप अशा गप्पा कधी झाल्या नाहित.. पण भावाकडून अधून मधून असेच किस्से ऐकायला मिळत असतात.
एक मात्र असतं, की बापू बरोबर असला की कोणतीही अडचण वाटत नाही. अगदी मुलांची सुद्धा!!

- प्राजु

साहित्यिकप्रकटनआस्वाद

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

16 Jul 2009 - 1:11 am | विसोबा खेचर

बापू आवडला..:)

प्राजू, येऊ देत अजूनही काही व्यक्तिचित्र...

आपला,
(व्यक्तिचित्र प्रेमी) तात्या.

llपुण्याचे पेशवेll's picture

16 Jul 2009 - 1:13 am | llपुण्याचे पेशवेll

+१ .. हेच म्हणतो. बापू आवडला.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

विशाल कुलकर्णी's picture

16 Jul 2009 - 10:08 am | विशाल कुलकर्णी

सहमत, सुरेख!!
बापु खुप आवडला, अजुन येवु देत प्राजु!

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

टारझन's picture

16 Jul 2009 - 1:24 am | टारझन

"स्कूटी एकदम मस्त! परवा नविन सीट कव्हर घातल्यापासून अ‍ॅव्हरेज एकदम वाढलंय बघा.." - बापू.

=)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =))
अचानक दाताखाली मनुका आल्यासारखं झालं !! लय भारी !!
छोटं लिहील्याबद्दल णिशेद !

आणि हो, बापु हृदयात शिरले...

-(प्राजुचा फॅन) टारझन
टार्‍या म्हणे आता, आय.डी.घे संत एकनाथाचा,
नको करू कुटाळक्या, धरा पंथ हाय्,हॅलोचा

सुबक ठेंगणी's picture

16 Jul 2009 - 11:54 am | सुबक ठेंगणी

ह. ह. पु. वा.
माझ्या शेजारच्या बाईंनी का हसतेस विचारल्यावर बापूसारखीच जपानीची चिंधी करत सांगितलं तिला पण! :D
लढ बापू!

दिपाली पाटिल's picture

16 Jul 2009 - 1:53 am | दिपाली पाटिल

छान आहे व्यक्तिचित्रण :)

दिपाली :)

स्वाती२'s picture

16 Jul 2009 - 2:26 am | स्वाती२

बापू आवडले.

रेवती's picture

16 Jul 2009 - 3:49 am | रेवती

बापू म्हणजे वरकामाचा सर्वेसर्वा दिसतोय.
अशी माणसं (विश्वासू व कामसू ) मिळणं कठिण.
गाडीचं वाढलेलं अ‍ॅव्हरेज मात्रं चकित करून गेलं. ;)
प्राजु, तुला बस त्रास देते हे माहितीये पण स्कूटीही अ‍ॅव्हरेजला त्रासच देत होती हे किती नंतर कळलं! ;)

रेवती

अनामिक's picture

16 Jul 2009 - 4:11 am | अनामिक

बापुची ओळख छानच! मला आमचा बाबुलाल दादा आठवला... खरंतर शेतावरचा गडी, पण लग्नकार्यात काम करायला सगळ्यात पुढे असतो तो.

-अनामिक

चतुरंग's picture

16 Jul 2009 - 4:36 am | चतुरंग

(व्यक्तिचित्र एकदम आवरतं घेतल्यासारखं वाटलं, जरा अजून फुलवायला हवं होतं असं वाटतं)

चतुरंग

सहज's picture

16 Jul 2009 - 10:21 am | सहज

भारी पण थोडक्यात आटपलं. असे वाटले.

अवलिया's picture

16 Jul 2009 - 12:46 pm | अवलिया

भारी पण थोडक्यात आटपलं. असे वाटले.

--अवलिया
=============================
रामायण महाभारत घडायला स्त्रीची गरज आहे असे नाही, आजकाल सही ते काम करते. ;)

स्वाती दिनेश's picture

16 Jul 2009 - 11:25 am | स्वाती दिनेश

छान लिहिलं आहेस प्राजु.
स्वाती

ऍडीजोशी's picture

16 Jul 2009 - 11:28 am | ऍडीजोशी (not verified)

बापू एकदम नजरे समोर उभा राहिला

दिपक's picture

16 Jul 2009 - 11:34 am | दिपक

खरचं छान व्यक्तिचित्रण. तुमच्या लिखाणातुन बापू भावला. :)

आनंदयात्री's picture

16 Jul 2009 - 12:52 pm | आनंदयात्री

>>वॉचमन म्हणाला," हमको काम नही वहॉ.. इसीवास्ते हाम इदर को आया.." हे ऐकून बापू खट्टू झाला. नेपाळमधे जाऊन राहण्याची स्वप्नं रंगवायला बापूने सुरूवात केलीच होती.

=)) =))
साधा सरळ बिचारा.

योगी९००'s picture

16 Jul 2009 - 1:02 pm | योगी९००

खरचं छान व्यक्तिचित्रण...पण थोडक्यात आटोपले.

असे बापू प्रत्येकाच्या जीवनात कोणी ना कोणी असतातच..कदाचित कोणासाठी आपणही बापू असू.

खादाडमाऊ

धमाल मुलगा's picture

16 Jul 2009 - 3:45 pm | धमाल मुलगा

काय बोल्लात भाऊ :)

हम्म.. प्राजुताई बापू भारीच क्यारेक्टर आहे की :)

आमच्या गावाकडच्या रानातही असाच एक हरकाम्या होता शिदबा नावाचा...फरक इतकाच की तो सतत काडीनं दात कोरत बसलेला असायचा आणी काहीही काम सांगितलं की 'च्च्यॅक्क..! न्हाई ओ जमायचं दादा' असं म्हणायचा :)

----------------------------------------------------------------------------------------
एक गदारोळ प्रसवे ती स्वाक्षरी | गदारोळाचे कारण ते एक स्वाक्षरी ||
रे मना ऐसा खेळ ना करी | ज्या योगे वितंड मुळ धरी ||
ऐश्या कारणे रे धमु ना करावी स्वाक्षरी || सच्चिदानंद ! सच्चिदानंद !!

दिपाली पाटिल's picture

17 Jul 2009 - 4:35 am | दिपाली पाटिल

>>फरक इतकाच की तो सतत काडीनं दात कोरत बसलेला असायचा आणी काहीही काम सांगितलं की 'च्च्यॅक्क..! न्हाई ओ जमायचं दादा' असं म्हणायचा..

हे वाचुन तर काय जोरात हसलेय सांगु... =))

दिपाली :)

शाल्मली's picture

16 Jul 2009 - 2:40 pm | शाल्मली

छान लिहिले आहेस व्यक्तिचित्र!
अजूनही लिही..

--शाल्मली.

छोटा डॉन's picture

16 Jul 2009 - 4:07 pm | छोटा डॉन

>>छान लिहिले आहेस व्यक्तिचित्र! अजूनही लिही..
+१, असेच म्हणतो ...

थोडा अजुन विस्तार आणि व्यक्तीवर्णन आवडले असते.
पुलेशु ...
------
छोटा डॉन
आम्ही आमच्या आंतरजालीय दुश्मनांना काही वेळा क्षमाही करतो, मात्र त्यांचे नाव आणि आयपी अ‍ॅड्रेस कधीही विसरत नाही .. ;)

विनायक प्रभू's picture

16 Jul 2009 - 2:44 pm | विनायक प्रभू

विस्तार आवडला असता.
पण जे वाचले ते लय भारी.
हे द्व्यर्थक मंजे काय हो?

निखिल देशपांडे's picture

16 Jul 2009 - 2:58 pm | निखिल देशपांडे

प्राजुतै...
बापु च छान व्य्कतिचित्रण आहे.... पण वर म्हणाल्या प्रमाणे थोडक्यात आटोपले

"स्कूटी एकदम मस्त! परवा नविन सीट कव्हर घातल्यापासून अ‍ॅव्हरेज एकदम वाढलंय बघा.." - बापू.
=))

==निखिल

एकदम बढिया प्राजूताई.

अतिशय आवडलं.

मॅन्ड्रेक's picture

16 Jul 2009 - 8:08 pm | मॅन्ड्रेक

प्रतिक्रियेमधे काहि नाव आलि आहेत ,

उदा. आमच्या गावाकडच्या रानातही असाच एक हरकाम्या होता शिदबा नावाचा...फरक इतकाच की तो सतत काडीनं दात कोरत बसलेला असायचा आणी काहीही काम सांगितलं की 'च्च्यॅक्क..! न्हाई ओ जमायचं दादा' असं म्हणायचा

बापुची ओळख छानच! मला आमचा बाबुलाल दादा आठवला... खरंतर शेतावरचा गडी, पण लग्नकार्यात काम करायला सगळ्यात पुढे असतो तो.

अशिच व्यक्तिचित्र येउ देत.
at and post : janadu.

अनिरुध्द's picture

16 Jul 2009 - 8:54 pm | अनिरुध्द

एकदम झकास व्यक्तिचित्रण रेखाटलंय. अजूनही येऊद्यात.

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Jul 2009 - 8:59 pm | बिपिन कार्यकर्ते

आवडला बापू. लिहिलंय पण नेहमीसारखं मस्तच. अजून चाललं असतं की पण.

बिपिन कार्यकर्ते

प्राजु's picture

17 Jul 2009 - 9:00 am | प्राजु

सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल मनापासून आभार. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

दशानन's picture

19 Jul 2009 - 10:39 am | दशानन

>>छान लिहिले आहेस व्यक्तिचित्र! अजूनही लिही..

१००% सहमत.

छान ! आवडले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jul 2009 - 11:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बापू आवडला !

-दिलीप बिरुटे

प्रकाश घाटपांडे's picture

22 Jul 2009 - 11:11 am | प्रकाश घाटपांडे

आवडल बर्का प्राऽजु ताई. व्यक्तिचित्रातला निरागसपणा भावला.असच लिहित रहा.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.