भारलेल्या त्या स्वरांची तान छेडे बासरी
गीत कान्हाचे असे राधे तुझ्या ओठावरी..
पाहताना दर्पणी त्या रंग भासे सावळा
कृष्णबिंबा! तूच की मी?"... हाय ! राधा बावरी..
मोहनाला रेखिते ती लोचनांच्या अंगणी
दृष्ट काढी काजळाने सावळ्या थेंबावरी..
पैलघंटा वाजते ना सांज आली राऊळी
ऐकण्या आतूर राधा माधवाची पावरी..
नीळवर्णी मोरपीशी गुंतलेली राधिका
ती मयूरा कृष्णवेडी नाचते या भूवरी..
सप्तरंगी नाहला वृंदावनीचा श्रीहरी
ल्यायली श्रीरंग राधा त्या तिच्या कायेवरी..
- प्राजु
प्रतिक्रिया
24 Jun 2009 - 9:45 pm | लिखाळ
वा छान कविता.
कृष्णबिंब मस्त :)
श्रीरंग या शब्दातल्या रंगावरती छान श्लेष. (ष की श?)
शंका-
गीत कान्हाचे असे राधे तुझ्या ओठावरी..
या मध्ये कान्हाचे असा शब्द बरोबर की कान्ह्याचे असा शब्द?
दृष्ट काढी काजळाने सावळ्या थेंबावरी..
यातली कल्पना कळाली नाही. थेंबावर दृष्ट काढणे म्हणजे काय?
पैलघंटा वाजते ना सांज आली राऊळी
यातली सुद्धा कल्पना समजली नाही. वाजते ना सांज आली..म्हणजे पैलघंटा वाजते तोच संध्याकाळ झाली का? तसे असेल तर 'ना'च्या ऐवजी 'तो' असे असावे का? की अजून काही?
उपशंका -पैलघंटा म्हणजे नक्की काय? पैलघंटा हा शब्द 'पैल घंटा घुमे राऊळी' या वाक्यात सुद्धा सांज ये गोकुळी मध्ये आहे. पण बहुधा पैल हा शब्द आणि घंटा हा शब्द स्वतंत्र आहे. तसे असेल तर पैलतीरावर असलेल्या देवळातली घंटा असे काही असावे !
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
25 Jun 2009 - 8:41 am | प्राजु
या मध्ये कान्हाचे असा शब्द बरोबर की कान्ह्याचे असा शब्द?
कान्हाचे हाच शब्द बरोबर आहे.
दृष्ट काढी काजळाने सावळ्या थेंबावरी..
अर्थ :
साधारणपणे दृष्ट मीठ मोहरीने काढतात आणि ती मीठ मोहरी वाहत्या पाण्यात / पाण्यावर टाकून देतात. आधीच सावळा असलेल्या कान्हाची दृष्ट राधा तिच्या डोळ्यातल्या काजळाने काढते आणि डोळ्यातल्या (काजळामुळे काळ्या-सावळ्या झालेल्या) पाण्यात ते काजळ सोडून देते किंवा काजळाने दृष्ट काढून ते सोडून दिल्यामुळे तो पाण्याचा थेंब सावळा झाला आहे.
पैलघंटा वाजते ना सांज आली राऊळी..
पैलघंटा म्हणतात पैलतीरी देवळात वाजणारी घंटा. ही घंटा साधारणपणे तिन्ही सांजेला आरतीच्या वेळी वाजते (अशी माझी समजूत आहे). ही घंटा वाजली याचा अर्थ असाही की, तिन्हीसांज झाली आहे. हे दोन्ही झालेले नाही..सांज होण्याआधीच राधा माधवाची पावरी/बासरी ऐकण्यासाठी आतुरलेली आहे.(कोणत्याशा गाण्यात सांजेला कान्हा वाजवी बासरी...असे ऐकले होते. तो संदर्भ घेतला आहे.)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
25 Jun 2009 - 5:57 pm | विजुभाऊ
आधीच सावळा असलेल्या कान्हाची दृष्ट
प्राजु तै या इथे कान्हा हा शब्द चूक आहे तिथे कान्ह्याची दृष्ट असे हवे.
मराठी भाषेचे हे वैशिष्ठ्य आहे की येथे विभक्ती प्रत्यय लागताच शब्दाचे सामान्य रूप बदलते.
उदा : पुणे हा शब्द विभक्ती प्रत्यय लागताच पुण्याला/ पुण्याचा / पुण्यात असा बदलतो
राजा हा शब्द कान्हा सारखाच आकारान्ती
तो मूळात राजा, राज्याला ,राज्याने असा होतो. पण ज चा ज्य असा उच्चार होताना त्यातला य लोप पावतो. ( मराठीत ज चे दोन उचार आहेत)
कान्हा शब्दाचे तसे नाही
देव हा शब्द घ्या. तो देवा देवाचा देवाला देवास अशा सामान्य रूपात भेटतो
पाणी हा शब्द पाण्या असा बदलतो
कान्हा सारखाच घोडा हा शब्द आहे तो घोड्या असा येतो.
विभक्ती प्रत्यय लागताच सामान्यरूप बदलणार्या शब्दाना विकारी शब्द म्हणतात तर तसे सामान्य रूप न बदलणार्या शब्दाना अविकारी शब्द म्हणतात.
हळूहळु / मुळुमुळू ही शब्द अविकारी आहेत
बहुधा क्रीयाविषेषणे अविकारी स्वरुपात येतात
25 Jun 2009 - 7:35 pm | प्राजु
असेल असेही असेल. मला महिती नव्हतं. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
25 Jun 2009 - 10:27 pm | धनंजय
विशेषनामांच्या संदर्भात प्रत्यय समोर असला तरी सामान्य रूप विकल्पाने होते. प्राजु जर "कान्हाला" म्हणत असतील तर ठीकच आहे. त्या "कान्ह्याला" म्हणत असतील तरीही ठीकच आहे.
**आकारांत पुंल्लिगी विशेषनामे आजकाल फारशी प्रचलित नाहीत. पण जुने "संभा" नाव घ्या -
महाराज म्हणाले "त्या संभाला येथे घेऊन या!"
("त्या संभ्याला येथे घेऊन या!" - हेसुद्धा चालेल पण तितके बरे वाटत नाही.)
.
हल्लीची पटणारी उदाहरणे म्हणून स्त्रीलिंगी नावे घेऊया -
सामान्य नाम - शाळा
हा आपल्या शाळेचा बहुमान आहे. (विकल्प नाही.)
पण विशेषनाम - उमा
हा आपल्या उमाचा बहुमान आहे. किंवा -
हा आपल्या उमेचा बहुमान आहे.**
26 Jun 2009 - 2:19 am | लिखाळ
प्राजु, उत्तराबद्दल आभार.
धनंजय, संभाचे उदाहरण पटण्यासारखे आहे. बहुधा कान्ह्याला असे म्हणणे सवयीचे असल्याने मला ते खटकले असावे. आभार.
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
24 Jun 2009 - 9:48 pm | क्रान्ति
पाहताना दर्पणी त्या रंग भासे सावळा
कृष्णबिंबा! तूच की मी?"... हाय ! राधा बावरी..
सप्तरंगी नाहला वृंदावनीचा श्रीहरी
ल्यायली श्रीरंग राधा त्या तिच्या कायेवरी..
मस्त! सुरेख! कृष्णबिंबा शब्द खूप खूप आवडला!
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
24 Jun 2009 - 10:09 pm | संदीप चित्रे
आवडली.
संदीप खरेची 'राधे तुझा रंग, कशानं रापला' ही कविता आठवली.
----
लिखाळ म्हणाल्याप्रमाणे 'कान्ह्याचे' हा शब्द योग्य आहे.
24 Jun 2009 - 10:20 pm | शाल्मली
वा छान!
आवडली.
या ओळी वाचून मलाही सांज ये गोकुळी या गीताची आठवण झाली.
--शाल्मली.
24 Jun 2009 - 11:10 pm | जागु
सुंदर.
25 Jun 2009 - 12:14 am | बिपिन कार्यकर्ते
कविता आवडली. विशेषतः
यामधील दुसर्या ओळीतली कल्पना मस्तच.
बिपिन कार्यकर्ते
25 Jun 2009 - 12:21 am | अनामिक
प्राजु तै कडून अजून एक सुंदर कविता!
वरच्या ओळी विशेष आवडल्या.
-अनामिक
25 Jun 2009 - 1:51 am | बेसनलाडू
दृष्ट काढते काजळाने... उत्तम!
(वाचक)बेसनलाडू
25 Jun 2009 - 9:41 am | मनीषा
सुरेख कविता !
25 Jun 2009 - 9:58 am | दत्ता काळे
मोहनाला रेखिते ती लोचनांच्या अंगणी
दृष्ट काढी काजळाने सावळ्या थेंबावरी..
पाहताना दर्पणी त्या रंग भासे सावळा
कृष्णबिंबा! तूच की मी?"... हाय ! राधा बावरी..
सगळी कडवी सुंदरच, पण वरची दोन कडवी अतीव सुंदर
25 Jun 2009 - 11:01 am | समिधा
सुंदर कविता ... :)
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
25 Jun 2009 - 5:38 pm | तर्री
ही कवीता स्वतन्त्र आसली तरी ....पण आधारित वाटते.
शब्दान्चे एक सूरेख जोडकाम .
कान्ह्याचे हा शब्द ऊचित असावा.कोणी वैयाकरणी ?
25 Jun 2009 - 6:24 pm | पाषाणभेद
छान कविता आहे. कलर्स वरील "क्रिष्णा" ची आठवण झाली.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
25 Jun 2009 - 6:51 pm | अवलिया
वा! मस्त !!
सगळी कडवी सुंदर !!
--अवलिया
25 Jun 2009 - 10:16 pm | धनंजय
आरशातही तिला कृष्णाचा भास होतो.
कल्पना आवडली.
प्राजु यांची वृत्तावरची पकड तर नेहमीसारखीच अचूक आहे.
25 Jun 2009 - 11:10 pm | राघव
सगळीच कविता छान! त्यातही -
भारलेल्या त्या स्वरांची तान छेडे बासरी
गीत कान्हाचे असे राधे तुझ्या ओठावरी..
पाहताना दर्पणी त्या रंग भासे सावळा
कृष्णबिंबा! तूच की मी?"... हाय ! राधा बावरी..
मोहनाला रेखिते ती लोचनांच्या अंगणी
दृष्ट काढी काजळाने सावळ्या थेंबावरी..
पैलघंटा वाजते ना सांज आली राऊळी
ऐकण्या आतूर राधा माधवाची पावरी..
ही ४ कडवी अगदी खास!
दर्पणाची कल्पना अगदी वैशिष्ट्यपूर्ण!!
खूप आवडली कविता.
राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )
26 Jun 2009 - 12:11 pm | विसोबा खेचर
कविता ठीक वाटली...
तात्या.
27 Jun 2009 - 8:27 am | चन्द्रशेखर गोखले
कविता नेहमी प्रमाणेच लाघवी आणि लोभसवाणी आहे !