बोलावणे आले की ... अंतीम भाग

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जनातलं, मनातलं
10 Jun 2009 - 9:52 am

या आधीचे भाग : १-२-३ : http://www.misalpav.com/node/8094

(नुकताच मृत्युची भेट घेवुन परतलेला सन्मित्र आप्पाजींच्या सहाय्याने वाड्यातील पुरातन, अघोरी शक्तीशी अंतिम झुंज देण्याचा मनोमन निर्णय घेतो आणि त्याच वेळी आप्पाजींच्या मृत्युची बातमी तडिताघातासारखी त्याच्यावर कोसळते. पुढे................)

डोळ्यापुढे अंधारी आली होती. मनात नक्की कुठल्या भावना होत्या नाही सांगता येणार. आप्पाजींसारखा खंदा आधार हरपल्याचे दु:ख, अचानक लादल्या गेलेल्या एकटेपणाच्या भावनेने दाटुन आलेली हताशा, भीती ........

भीती, बहुदा भीती सगळ्या भावनांवर भारी पडली होती. आप्पाजींचं जाणं एक जबरद्स्त धक्का देवुन गेलं होतं. खरं सांगु, मी त्यांचं शेवटचं दर्शनही घ्यायला गेलो नाही. कुठल्या तोंडाने जाणार होतो. माझ्या मनात दाटुन आलेली भीती आप्पाजींची, त्यांच्या विश्वासाची हार होती. मी तिथुनच हात जोडले, मनोमन त्यांची क्षमा मागितली.

असं कसं झालं ? इतके दिवस आप्पाजी ज्या कार्यासाठी इथे थांबले होते. ते कार्य सिद्धीस जाण्याची वेळ आली आणि ......?

नक्की काय घडले असेल? तुक्याच्या बोलण्यातुन काही नीट कळाले नव्हते पण आप्पाजींच्या मृतदेहाचे डोळे विस्फारलेले होते. काहीतरी वेगळं, भयानक असं पाहील्यावर माणसाच्या डोळ्यात जी भीती दाटते तसच काहीसं.

भीती...आणि आप्पाजी....? पण कसं शक्य आहे ते?

इथे या महाभयंकर वाड्यातुन त्या सामर्थ्यशाली, विनाशकारी शक्तीच्या हातातुन माझी सुटका करणारे, हनुमंताचे परमभक्त असणारे आप्पाजी त्यांना कशाची भीती वाटु शकते? भीती....., वाटु ...शकते?
वेड लागायची पाळी आली होती. जसजसा विचार करत होतो तसतशी मनातली भीती अजुन वर येत होती, वाढत होती. तुक्याच्या बोलण्यातुन एवढेच कळाले की आप्पाजींचा मृत्यु झाला आणि तासाभरात सज्जनगडावरुन काही भक्तमंडळी येवुन त्यांचे शव घेवुन गेली. म्हणजे आप्पाजींना त्यांचा शेवट कळाला होता का? म्हणुनच ते म्हणत होते की हा तुझा लढा आहे, तुलाच लढायचा आहे.

पण अचानक असे.........

काहीही समजत नव्हते. काहीतरी अघटित घडलं होतं एवढं मात्र नक्की? पण काय ? का यामागे त्या शक्तीचा काही.......

आप्पाजी म्हणाले होते, बोलविता धनी कुणी वेगळाच आहे. तो महाशक्तिशाली आहे. पण त्याच्यापुढे आप्पांजींच्या भक्तीचे सामर्थ्यही कमी पडावे? इतका शक्तिशाली होता तो? मग मी कसा काय लढणार आहे त्याचा बरोबर? माझ्याकडे तर देवाच्या नावाशिवाय दुसरी कुठलीच शक्ती नाही. मी प्रचंड घाबरलो होतो.

तेवढ्यात आपोआप वाड्याचा दरवाजा उघडला गेला आणि दार उघडुन माणिकराव आत आले.

आज माणिकराव काही वेगळेच होते. त्यांच्या डोळ्यात विजयाचा उन्माद काठोकाठ भरलेला होता. आता सगळेच पत्ते उघडे पडलेले असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं औपचारिक सौजन्य त्यांच्या चेहेर्‍यावर दिसत नव्हतं. उलट तिथे एक विलक्षण खुनशी हास्य होतं. जणु काही मला विचारत होते,"आत्ता, आता कोण येणार तुझ्या मदतीला?"

"श्रीयुत सन्मित्र भार्गव, बोला अजुन किती वेळ काढणार तुम्ही ? नाही माहीती? मी सांगतो........

आज रात्री बरोबर १२ वाजता ! खेळ खल्लास !! गेली कित्येक वर्षे मी या दिवसाची, अहं ... रात्रीची वाट पाहतोय. आज रात्री धनी तृप्त झाले की ते मला सगळ्या शक्ती प्रदान करतील. मग मी.....मी....मीच भरुन उरेन सगळीकडे. तुला माहीत नाही सन्मित्र, मी काय काय गमावलय या रात्री साठी. माझं स्वातंत्र्य, माझं सर्वस्व, माझा बाप.

माझा बाप......मुर्खच होता बिचारा. सगळ्या विश्वावर राज्य करण्याची संधी मिळत असताना कुठल्या फालतु स्वातंत्र्याची आस धरुन बसला होता. साक्षात धनींशी टक्कर घ्यायला निघाला होता. त्याच्याच मुर्खपणामुळेच तो सज्जनगडावरचा जोगडा इथे आला, नाहीतर खुप पुर्वीच मी सर्वशक्तिमान झालो असतो."

उन्मादाच्या भरात माणिकराव खुप काही बडबडत होते. मी डोळे विस्फारुन त्यांच्याकडे बघत होतो. माणिकरावांच्या अंगात जणु वारं शिरलं होतं. ते पुढे बोलत होते.......

"माणिकराव, तुमचे हे धनी म्हणजे नक्की आहेत कोण? कुठुन आले आहेत? त्यांना काय हवं आहे?" मी हळुच विचारलं.

माणिकरावांनी मान वर करुन माझ्याकडे बघीतलं आणि मग वेड्यासारखे खळखळुन हसले.

"तुला ते सांगायलाच हवं,...... नाही? तु का आणि कुणाला बळी जातोयस ते तुला कळायलाच हवं. ठिक आहे तर ऐक....

"साधारण सातशे ते आठशे वर्षापुर्वी, जेव्हा इथे ’शिलाहार’ राजे राज्य करीत होते तेव्हाच या सगळ्याला सुरुवात झाली. म्हणजे धनी त्या आधीच कित्येक हजार वर्षापासुन या पृथ्वीवर आहेत. पण त्यांच्या सगळ्या शक्ती सुप्तावस्थेत होत्या. शिलाहारकालीन पाचवा आदित्यवर्मन याचा अनौरस पुत्र कपालवर्मन याने राज्य ताब्यात घेण्यासाठी म्हणुन धनींची आराधना सुरु केली. त्याही पुर्वी हजारो वर्षापुर्वी जेव्हा श्रीकृष्णाने सहस्त्रार्जुनाचा वध केला तेव्हा त्याचे हजार हात आधी आपल्या सुदर्शन चक्राने छाटुन टाकले होते. सहस्त्रार्जुनाची सगळ्या जगाचे अधिपत्य मिळवण्याची आसुरी वृत्ती त्याच्या या हातात उतरली होती. कृष्णाने त्याचा वध केला तेव्हा ती आसुरी वृत्ती मुक्त झाली आणि तिने एका विनाषक शक्तीचे रुप घेतले. पण कृष्णाने आपल्या सामर्थ्याने तिला निष्प्रभ करुन बंदिस्त करुन ठेवले. कारण ती एकप्रकारची उर्जाच असल्याने तिला नष्ट करणे सर्वथा अशक्य होते. त्यानंतर कित्येक हजार वर्षे ही शक्ती निद्रावस्थेत होती. पण राजा कपालवर्मनने आपल्या इप्सित प्राप्तीसाठी अनेक बळी आणि आहुत्या देवुन तिला पुन्हा जागृत केले. या वाड्यात जिथे तु आज उभा आहेस तिथे कपालवर्मनाचे साधनास्थळ होते. इथेच कपालवर्मनाने शेकडो पशु आणि मानव बळी देवुन त्या शक्तीला म्हणाजे माझ्या धन्याला जागवले होते. सध्या जेथे प्रतापनगर आहे तिथे पुर्वी राजा आदित्यवर्मनची राजधानी होती. धनी जागे झाले आणि आदित्यवर्मनच्या शेवटास सुरुवात झाली. राजवाड्यात एका मागुन एक अपमृत्यु व्हायला लागले तसा आदित्यवर्मन खचायला लागला. राज्यात कधी नव्हे ते अवर्षणाचे संकट घोंघावु लागले. खरेतर त्याच वेळी धनी या मर्त्य जगावर स्थापीत झाले असते, पण कुठुन तो भटुकडा कडमडला आणि सुत्रे हातातुन निसटत गेली. तो स्वत:ला शिवभक्त म्हणायचा. त्याने काय केले कोणास ठाऊक पण धन्यांना पुन्हा एकदा सुप्तावस्थेत जावे लागले. पण जाताना धन्यांनी कपालवर्मनला वचन दिले होते की मी परत येइन आणि तुला या जगाचा अधिपती करीन. तेव्हापासुन कपालवर्मनची प्रत्येक पिढी धन्यांना पुन्हा जागृत करण्याचा प्रयत्न करते आहे.

मी माणिकराव जमदग्नि, कपालवर्मनचा सध्याचा वंशज, तुझे स्वागत करतोय सन्मित्र, आतापासुन काही काळानंतर तुझा बळी मी धन्यांना देइन आणि खुष होवुन धनी मला अपरंपार शक्ती आणि सिद्धी देतील. मग मी, मी या जगावर राज्य करेन. जगातल्या सर्व सुंदर स्त्रीया माझ्या गुलाम असतील. मी हवे तेव्हा, हवे तसे, हवे त्याला आपल्या इच्छेनुसार वाकवु शकेन. मला अंत नसेल..कोणीही मला हरवु शकणार नाही.
"मी ..... मी माणिकराव जमदग्नि, या जगाचा सम्राट, सर्वसत्ताधीष तुला आज्ञा करतो सन्मित्र, चल मृत्युला तय्यार हो. बरोबर बारा वाजता या वाड्यात असलेल्या तळघरात मी तुला धन्यांच्या चरणी अर्पण करेन.........!"

मला आता माणिकरावांचीच भीती वाटायला लागली. हे इतकी वर्षे या रात्रीची वाट पाहताहेत. त्यांच्याकडे त्यांच्या धन्याचे प्रचंड सामर्थ्य आहे.आणि मी हा असा एकटा, मी काय लढणार यांचाबरोबर ? घशाला कोरड पडली होती. तोंडातुन शब्द फुटेनात. हात पाय थरथर कापायला लागले. मी कसेबसे सगळी शक्ती एकवटुन माणिकरावांना विचारले,

" माणिकराव, गेली कित्येक वर्षे तुम्ही, तुमचे पुर्वज त्या अघोरी शक्तीला बळी देताय. मग आता माझ्यातच असे काय विशेष आहे की मला बळी दिल्याने तुमचा धनी तृप्त होइल, तुम्हाला सगळ्या शक्ती प्रदान करेल? आणि मुळातच तुमच्या धन्यालाच जिथे जगावर अधिपत्य गाजवण्याची इच्छा आहे तेव्हा त्याचे सामर्थ्य जागृत झाल्यावर तो तुम्हाला देखील संपवणार नाही कशावरुन?

मी हळुच एक काडी टाकुन दिली. "आणि आप्पांचं काय झालं, त्यांना कुणी मारलं? की ते पण तुमच्या आसुरी लालसेचाच बळी ठरले?

माणिकरावांनी चमकुन माझ्याकडे पाहीले," नाही, नाही...एकदा दिलेले वचन धनी मोडत नाहीत? त्यांनी वचन दिलय आम्हाला? तो जोगडा मध्ये मध्ये करत होता, त्याला मीच संपवलं. फक्त एका ब्रह्मसंमंधाला सोडावं लागलं त्याच्यावर. मुर्ख जोगडा, म्हणे मी ब्राह्मणावर हात उचलत नाही. एकदा मेल्यावर कोण ब्राह्मण राहतो..?... ते केवळ एक पिशाच्च असतं. त्या ब्रह्मसंमंधाने अगदी सहज संपवलं त्या जोगड्याला. मुर्ख लेकाचा !

मला आप्पाजींबद्दल खुप आदर वाटला. अगदी मृत्य समोर असताना देखील त्यांनी आपली तत्वे सोडली नव्हती.

पण मला आता माणिकरावांची कमजोर नस सापडली होती. जरी अघोरी शक्तीचे उपासक असले तरी तरी माणिकराव होते माणुसच. त्यांच्या मनात फक्त त्यांच्या धन्याबद्दल शंका निर्माण करणे जमले की झाले.

"आणि असं बघा ना, त्यांनी वचन दिलं होतं ते कपालवर्मनला, तुम्हाला नाही. शेकडो वर्षापुर्वी एका सामान्य भटुकड्याने तुमच्या धन्याचा पराभव केला होता. आता तुम्हाला आपल्या सर्व शक्ती देवुन आपला प्रतिस्पर्धी आपणच निर्माण करण्याइतका तुमचा धनी मुर्ख आहे काय?

"नाही, धनी असे करणार नाहीत आणि आता तर माझ्यावर ते प्रचंडच खुष होतील. कारण आजचा जो बळी मी त्यांना देणार आहे तो त्यांच्या सर्वात कट्टर शत्रुचा, ज्याने पुर्वी त्यांना पुन्हा सुप्तावस्थेत जाण्यास भाग पाडले होते त्या "अनिरुद्धशास्त्री भार्गव"चा शेवटचा वंशज आहे....."सन्मित्र भार्गव"!

माणिकराव पुन्हा एकदा विक्षिप्तासारखे हसले. पण यावेळी त्यांच्या बोलण्यात ठामपणा नव्हता.

अच्छा, म्हणुन या कामासाठी माझी निवड झाली होती तर. माझ्याच कुणा शिवभक्त पुर्वजाने पुर्वी या अघोरी शक्तीचा पराभव केला होता. आणि आज शेकडो वर्षानंतर पुन्हा माझ्यावर ती वेळ आली होती.

तेच तिघे, ती अघोरी शक्ती, तो कपालवर्मन (त्याचे वंशज माणिकराव) आणि अनिरुद्धशास्त्री भार्गव (त्यांचा वंशज म्हणाजे मी, सन्मित्र भार्गव) पुन्हा एकदा एकमेकासमोर उभे राहणार होतो. शेवटची, अटीतटीची लढाई लढण्यासाठी. पण परिस्थिती नक्की तीच होती?

नाही, परिस्थिती निश्चितच खुप बदलली होती. त्या संघर्षाच्या वेळी "अनिरुद्धशास्त्री भार्गवांसोबत" त्यांच्या शिवभक्तीचं बळ होतं आणि माझ्याबरोबर माझं मृत्युचा भीतीने गलितगात्र झालेलं मन. त्याउलट शत्रु गेल्या शेकडो वर्षात खुप शक्तीशाली झालेला होता. खुपच .... खुपच विषम संघर्ष होता हा !!!

पण मला लढणे भाग होते. अनिरुद्धशास्त्रींना तर मी ओळखत नव्हतो, पण आप्पाजी.....
त्यांनी माझ्यासाठी, किंबहुना या पवित्र कार्यासाठी आपले प्राण अर्पण केले होते. त्यांचे बलिदान मी असे वाया जावु देणार होतो? या क्षुद्र, स्वार्थी माणिकरावांच्या हातुन मृत्यु येण्याइतके क्षुद्र नक्कीच नव्हते आप्पाजी! नाही मला लढायलाच हवे........

आता मृत्यु येवु दे अन्यथा काही होवु दे आता मी थांबणार नाही. आज बोलावणे निश्चित येइल........मृत्युचे...अंताचे....विनाषाचे.

त्याला एकतर मी ओ देइन किंवा माणिकरावांचा तो बोलविता धनी ...... तो तरी नष्ट होईल.

माझ्या मनातली भीती आता एक वेगळेच रुप घेत होती. तिला एक वेगळीच धार चढली होती. मनाची द्विधा परिस्थिती संपली आणि त्याच क्षणी एका जिद्दीने, ध्येयाने माझ्या मनात जन्म घेतला. मनातली भीती आता आत्मविश्वासात रुपांतरीत झाली होती. आता तिच्याबरोबर माझ्या मनातील आप्पाजींवर, जगातल्या सुष्ट शक्तीवर असलेल्या विश्वासाचे, श्रद्धेचे पाठबळ होते. "सन्मित्र भार्गव" त्याच्या आयुष्यातल्या अखेरच्या युद्धाला तयार झाला होता. माझ्या मनातली आंदोलने चेहेर्‍यावर उमटणार नाहीत याची काळजी घेत प्रकटपणे मात्र अगदी निराश अवस्थेत माणिकरावांना म्हणालो.....

"ठिक आहे, माणिकराव ! शेवटी तुम्ही जिंकलात. माझी सगळी मदार आप्पाजींवर होती. तुम्ही त्यांनाही संपवलंत. चला मी तयार आहे. निदान एक विनंती आहे, माझा शेवट तर निश्चित आहे, निदान शेवटी तरी तुमच्या धन्याचं दास्यत्व पत्करण्याची मला संधी द्या.कदाचीत तेच मला एखादी संधी देतील."

"जरुर, जरुर माणिकराव, खुशीत होते. धनी खुप दयाळु आहेत, एकदा का तु तुझं हे शरीर सोडलंस की तुझ्या आत्म्याला ते आपल्या सेवकांमध्ये समाविष्ट करुन घेतील अशी मी तुला ग्वाही देतो. चल आता तळघराकडे, वेळ झालीय!"

मी मनोमन मारुतीरायांचे स्मरण केले, आप्पाजींना, त्या कधीही न पाहिलेल्या माझ्या पुण्यवान पुर्वजाला मनोमन वंदन केले आणि माणिकरावांच्या मागे निघालो.

आता मनातला सगळा संघर्ष संपला होता. कदाचित ती भीतीसुद्धा. मला आठवलं बोलता बोलता एकदा आप्पाजी म्हणाले होते....

"सन्मित्र, प्रत्येकाच्या अंगी एक मुलभुत सामर्थ्य असतं, एक शक्ती असते. ती जागृत होण्यासाठी, उफाळुन बाहेर येण्यासाठी एका प्रचंड धक्क्याची गरज असते. बंदुकीची गोळी झाडण्यासाठी जसा तीचा घोडा दाबावा लागतो, तसंच मनाचंही असतं. पण मनाचा घोडा दाबणं इतकं सोपं नसतं. माणसाच्या मनात दडलेली शक्ती बाहेर काढण्यासाठी त्याला एका जबरदस्त धक्क्याची, आजच्या भाषेत बोलायचं तर ट्रिगरची आवश्यकता असते. माणसाची आंतरिक शक्ती फ़क्त तेव्हाच बाहेर येते जेव्हा त्याच्यापुढचे सर्व मार्ग संपतात. जेव्हा त्याला जाणिव होते की आता तो सर्वस्वी एकटा आहे. आता त्याची मदत फक्त तोच करु शकतो. तो पुर्णपणे एकाकी आहे. बाहेरची रसद पुर्णपणे तुटलेली आहे. त्या एकाकी परिस्थितीतुन निर्माण होणारी भीती, ती वैफल्याची भावना त्याच्यातल्या तळात जावुन बसलेल्या उर्जेला जागृत करते. फक्त तो क्षण त्याला पकडता आला पाहीजे. तो क्षण त्याने पकडला की मग त्याला काहीच अशक्य राहत नाही. मग त्याला अडवण्याचे सामर्थ्य कळिकाळातही नसते."

मी तो क्षण पकडला होता का? की मुद्दाम मला त्या पराकोटीच्या अनुभवातुन जावे लागावे म्हणुनच आप्पाजींनी आपलं अस्तित्व संपवलं होतं? आप्पाजी, तुम्ही केवढं मोठं दिव्य केलय. खरच, ’जगाच्या कल्याणा संताच्या विभुती’ या आपल्या ब्रिदाला जागले होते आप्पाजी. माणिकरावांचा हात धरुन ते जे काही गलिच्छ, विषारी या जगात येवु पाहत होतं, त्याला थांबवण्यासाठी त्या महापुरुषाने आपल्या प्राणांची आहुती दिली होती. आता हळु हळु लक्षात येवु लागलं होतं सारं.

मुळात अनिरुद्धशास्त्री भार्गव, माझे पुर्वज यात गुंतलेले असल्याने त्या क्षणी त्यांचा प्रतिनिधी म्हणुन मी, कपालवर्मनाचा वंशज म्हणुन माणिकराव आम्हा दोघांचे त्या ठिकाणी असणे अपरिहार्यच होते. म्हणजे याचा एक अर्थ असाही होती की लढाई आर या पार अशी असणार होती. इथे लढा जीवनमृत्युचा होता. सुष्ट आणि दुष्ट , प्रकाश आणि अंधार, धर्म विरुद्ध अधर्म !

म्हणजेच मी एकटा नव्हतो. त्यांचं सामर्थ्य, त्यांचं पुण्य , त्यांची समग्र शक्ती माझ्या पाठीशी होती. किंबहुना तेच सर्व काही करणार होते , मी केवळ निमित्तमात्र होतो. एक माध्यम होतो. मी एकटा नाही या कल्पनेनेच सगळं औदासिन्य कुठल्या कुठे पळुन गेलं आणि मी एका नव्या विश्वासाने, श्रद्धेने त्याला सामोरे जायला तयार झालो. आणि त्याच क्षणी ......

कानात कुठुन तरी मंदीरातल्या घंटाचा नाद ऐकु येवु लागला. कानावर मंत्रघोष ऐकु येवु लागले. त्या मंत्रघोषांच्या गजरातच मी माणिकरावांच्या त्या तथाकथीत तळघरात पोहोचलो. बापरे, वरुन काहीच अंदाज येत नव्हता. हे तळघर जवळपास एक ते दिड एकराच्या परिसरात पसरलेले असावे. मधोमध एक मोठी दालनवजा गुफा होती. त्या गुफेतच ते होतं. त्याला नक्की कसला आकार होता नाही सांगता येणार. पण एका एकसंध शिळेतुन कोरलेलं ते शिल्प, पाहताक्षणीच मनात धडकी भरत होती. खरंतर त्याला चेहराही नव्ह्ता आणि हात पाय तत्सम काही अवयवही नव्हते. पण तरीही त्या काळ्याशार दगडाला पाहिल्या पाहिल्या अंगावर काटा उभा राहत होता. मी सगळं धाडस एकवटुन उभा होतो. माणिकरावांनी त्यांचे विधी सुरु केले. त्याचं वर्णन करण्यात मी वेळ नाही घालवणार, कुठलाही अघोरी कापालिक आपल्या दैवताला जागृत करण्यासाठी जे करतो तेच प्रकार होते.

सगळीकडे एक घाणेरडा दर्प पसरला होता. सडलेल्या मासाचा तो दर्प जीव नकोसा करत होता. मी कसाबसा नाक मुठीत धरुन उभा होतो. माणिकराव मात्र व्यवस्थितपणे कसलाही अडथळा न येता समोरच्या धुनीत कसकसल्या आहुत्या देत होते. आजुबाजुच्या कुबट हवेत आता पुन्हा ते भयानक आवाज जाणवायला लागले होते. त्यांचे ते हुंकार वाढत चालले होते. बहुदा पिलावळ जागी होत होती. हवेतला दुर्गंध वाढत चालला होता. अचानक कसलासा प्रचंड आवाज झाला, एखादा कडा कोसळल्यावर किंवा वीज कोसळल्यावर होतो तसा. मी चमकुन पुढे पाहीले. त्या काळ्याशार दगडी शिल्पाला तडा गेला होता, त्यातुन काहीतरी बाहेर येवु पाहत होतं. काहीतरी हिरवट, काळसर रंगाचं, अगदी लिबलिबीत, किळसवाणं असं अस्तित्व आता त्यातुन बाहेर पडत होतं. माणिकराव डोळे मिटुन भराभर मंत्र म्हणत होते.

एकदम......

माझ्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला.....

...........................................................

मी दचकलो, अंगावर साप पडावा तसा तो हात मी झटकला आणि गर्रकन वळुन मागे पाहीलं.....

आश्चर्याचा आणखी एक धक्का...

तिथे आप्पाजी उभे होते, मी काही बोलायच्या आत त्यांनी त्यांच्या हातातली तलवार माझ्या हातात दिली आणि माणिकरावाकडे बोट केलं......

" घाव असा घालायचा की मस्तक थेट समोरच्या धुनीत पडले पाहीजे. लक्षात ठेव तुझ्या मस्तकाऐवजी ते अपवित्र मस्तक, अपवित्र रक्त जर धुनीत पडले तर हा यज्ञ भ्रष्ट होईल आणि ती शक्ती कधीच मुक्त होवु शकणार नाही आणि परत लपुही शकणार नाही, नष्ट होवुन जाईल. ही शेवटचीच संधी आहे.
जय जय रघुवीर समर्थ ! " आप्पाजी माझ्या कानात कुजबुजले.

मी तलवार घेतली आणि माणिकरावांकडे वळलो, पण आमचा हेतु बहुदा त्या शक्तीच्या लक्षात आला असावा. ते लिबलिबीत काळंबेंद्रं आता पुर्णपणे बाहेर आलं होतं, बाहेर येताच त्याने थेट माझ्याकडे झेप घेतली. अगदी हवेतुन उडत यावं तसं, अतिषय वेगाने ते माझ्यापर्यंत येवुन पोहोचलं. कुठल्याही क्षणी ते मला विळखा घालणार तेवढ्यात.....

अचानक सगळीकडे एक लख्ख प्रकाश पसरला, अचानक घंटानाद सुरु झाला, बहुदा जगात येवु पाहणार्‍या त्या अमंगलाला विरोध करण्यासाठी या जगातलं मांगल्य आपल्या सर्व शक्तीनिशी त्या अमंगलासमोर उभे ठाकले होते. आणि आप्पाजींच्या खणखणीत आवाजातले शब्द कानी आले ,

" जा सन्मित्र, वेळ दवडु नकोस!"

मी तलवार सरसावली, जगात जे जे काही पवित्र आहे, मंगल आहे त्याचं स्मरण केलं आणि त्वेषाने माणिकरावांवर धावुन गेलो, त्यांना कसलीही संधी न देता तलवार फिरवली....एका घावातच ते अपवित्र, अमंगल मस्तक समोरच्या धुनीत होतं. त्या रक्ताचा धुनीला स्पर्ष झाला मात्र तो भयानक आकार प्रचंड वेगाने त्या शिळेकडे परत झेपावला. पण तो आकार शिळेपर्यंत पोहोचायच्या आतच एका प्रचंड स्फोटासह त्या शिळेचे तुकडे तुकडे झाले. त्याचा परतीचा मार्गच आम्ही उध्वस्त केला होता. तसं ते प्रचंड संतापाने माझ्याकडे वळलं, वेगाने माझ्या अंगावर चालुन आलं. आता मात्र इतका वेळ सावरुन धरलेलं माझं त्राण, माझा धीर संपला. माझी शुद्ध हरपत होती. शुध्द हरपताना मी एवढंच पाहीलं की तो काळा आकार माझ्या पर्यंत पोहोचुच शकला नव्हता. त्याला चारी बाजुनी एका तेजस्वी प्रकाशाने घेरा घातला होता. आता त्याच्या त्या गर्जनांचं रुपांतर करुण किंकाळ्यात झालं होतं. त्या तेजस्वी प्रकाशात तो अमंगल अंधार विरघळुन गेला आणि माझी शुद्ध हरपली.

शुद्धीवर आलो तेव्हा आप्पाजी समोर होते. मी आश्चर्याने एकदम उठायला गेलो तशी पाठीतुन एकदम कळ आली. मी पुन्हा बिछान्यावर पडलो. "आप्पाजी..तुम्ही तर......!"

"तु फार उतावळा आहेस सन्मित्र, असो...ऐक... मी तुला सांगितलं होतं ना एकदा, तुला जोपर्यंत पुर्णपणे एकटेपणाची जाणीव होते नाही, जोपर्यंत मनात टोकाची भीती निर्माण होत नाही, तोपर्यंत तुझ्यात दडलेलं ते धैर्य बाहेर येणार नाही. खरेतर तुला त्या धैर्याचीच आवश्यकता होती, कारण तिथे तळघरात जे काही घडणार होतं ते पाहण्यासाठी, पेलण्यासाठी तुझं मन तेवढं कणखर, तेवढं सक्षम बनणं आवश्यक होतं. नाहीतर कचकड्याच्या बाहुलीसारखा मोडुन पडला असतास तु. त्या धैर्याला बाहेर काढण्यासाठी, तुझं स्वत्व जागृत करण्यासाठी तुझा एकमेव आधार काढुन घेण्याशिवाय मला पर्याय नव्हता, म्हणुन माझे गुरुबंधु कल्याण आणि दिपांजन यांच्या साह्याने मी हे नाटक रचलं. माणिकरावाने जेव्हा त्या ब्रह्मसमंधाला माझ्यावर सोडलं होतं तेव्हा त्याला नष्ट करणं मारुतीरायाला काहीच कठिण नव्हतं, पण मी ती संधी घ्यायची ठरवलं. वर्षानुवर्षे माणिकरावांच्या गुलामीत सडणार्‍या त्या आत्म्यासाठी मुक्तीचं आमीष त्याला माझ्या बोटावर नाचवण्यासाठी पुरेसं होतं. ते परत गेलं आणि माणिकराव समजले की मी संपलो.

अर्थात हा सगळा बनाव मी तुझ्या विश्वासावरच रचला होता. सगळे मार्ग संपलेत म्हणल्यावर, विशेषत: माझाही मृत्यु झालाय हे समजल्यावर तु आधी भीतीने आणि मग त्वेषाने पेटुन ऊठशील याची खात्री होती मला. तु जर उलट वागला असतास आणि पळुन गेला असतास तर मात्र सगळंच मुसळ केरात गेलं असतं. असो. आता वादळ ओसरलय. गेली कित्येक शतके प्रतापनगरात थैमान मांडणारं वादळ आता कायमचं शमलय. तु आराम कर काही दिवस. एकदा का नीट बरा झालास की आमच्याबरोबर राहुन असंच समाजोपयोगी काम करीत राहायचं की पुढच्या मार्गाने निघुन जायचं, निर्णय तुझा असेल.

मला माझ्या आयुष्याची दिशा सापडली होती.

"जय जय रघुवीर समर्थ !"

समाप्त.

कथा

प्रतिक्रिया

प्रशु's picture

10 Jun 2009 - 10:12 am | प्रशु

एकदम मस्त...

पण एक सुचना करावीशी वाटते. ती खालील प्रमाणे.

श्रीकृष्णाने सहस्त्रार्जुनाचा वध केला

सहस्त्रार्जुनाचा वध परशुरामाने केला....

विशाल कुलकर्णी's picture

10 Jun 2009 - 10:48 am | विशाल कुलकर्णी

धन्यवाद सगळ्यांचे!
तुमचे म्हणणे बरोबर असावे. बहुदा कृष्णाने सहस्त्रार्जुनाचे सहस्त्र हात कापुन त्याला असहाय केले होते फक्त. बाकी मिपावरची व्यासंगी मंडळी सांगतीलच, तेव्हा अपेक्षित बदल काही काळापुरता होल्डवर ठेवु. :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... अंतीम : http://www.misalpav.com/node/8120

अंतु बर्वा's picture

10 Jun 2009 - 10:13 am | अंतु बर्वा

काय वेग मेंटेन केला आहे विशाल तू....
झोपायला निघालो होतो... पण शेवट्चा भाग शिर्षक पाहिलं आणी अधाशासारखं वाचून काढल... खूपच उत्कंठावर्धक कथा... फार आवड्ली...

अनंता's picture

10 Jun 2009 - 10:16 am | अनंता

:)

विवाहित पुरूषांसाठी मौनव्रतासारखे दुसरे व्रत नाही . ;)

सगळे भाग आवडले,,,, सुरेख

नेहा

Nile's picture

10 Jun 2009 - 10:39 am | Nile

आवड्या. शेवट थोडासा ढीला वाटला (नाटक वगैरे) पण आवडली कल्पना!

अवलिया's picture

10 Jun 2009 - 10:54 am | अवलिया

वा! मस्त छान जमले आहे !!

जियो विशालशेट जियो !!!

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

अश्विनि३३७९'s picture

10 Jun 2009 - 11:38 am | अश्विनि३३७९

सगळे भाग पटापट वाचायला मिळाले त्या मुळे मजा आली ..
मस्त थरार ..

मराठमोळा हॅरी पॉटर मिपावर भेटला... आवडला..
आता हॅरीच्या... आपलं ...सन्मित्रच्या पुढील साहसांची वर्णने येउदे...
मिश्टर आप्पा डंबलडोअरला रामराम... ;)

----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

मराठमोळा's picture

10 Jun 2009 - 12:28 pm | मराठमोळा

=D> =D> =D> =D>

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

स्मिता श्रीपाद's picture

10 Jun 2009 - 1:10 pm | स्मिता श्रीपाद

सगळे भाग वाचल्यावरच प्रतिसाद द्यायचा असे ठरवले होते...
अप्रतिम कथा...
अजुन येउदेत....
=D> =D> =D> =D>

स्मिता

विशाल कुलकर्णी's picture

10 Jun 2009 - 2:06 pm | विशाल कुलकर्णी

ठांकु बर्का !

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... अंतीम : http://www.misalpav.com/node/8120

विशाल कुलकर्णी's picture

10 Jun 2009 - 5:40 pm | विशाल कुलकर्णी

अरे हे काय? २७३ वाचनात फक्त १३ प्रतिसाद. असो हे १३च खुप महत्वाचे आहेत माझ्यासारख्या नवोदित लेखकासाठी. सगळ्यांचे मनापासुन आभार.

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... अंतीम : http://www.misalpav.com/node/8120

रेवती's picture

10 Jun 2009 - 6:46 pm | रेवती

आला बुवा एकदाचा अंतिम भाग!
तीनही भाग खूपच उत्कंठावर्धक झाले होते त्यामानाने शेवट खूपच साधा सोपा वाटला. तुक्याचं पुढे काय झालं?

रेवती

श्रीयुत संतोष जोशी's picture

10 Jun 2009 - 7:28 pm | श्रीयुत संतोष जोशी

लै म्हंजे लैच भारी.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

क्रान्ति's picture

10 Jun 2009 - 7:37 pm | क्रान्ति

कथा. थरार अगदी शेवटपर्यंत टिकून राहिला. मस्त!

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

तिमा's picture

10 Jun 2009 - 8:02 pm | तिमा

तुमची गोष्ट खिळवून ठेवणारी होती.
पण काही शंका:
त्या शक्तीचा आवाका फक्त वाड्याच्या उंबर्‍यापर्यंतच होता तर सन्मित्र पहिल्या रात्री वाड्याबाहेर झोपला असता बाहेरुन अप्पांचे रुप घेऊन ती शक्ति कशी येऊ शकली ?
माणिकराव माणूसच होते तर ते देवाच्या तसबिरीला हात का लावू शकत नव्हते?
शेवटचा प्रसंग आधीच्या लिखाणाच्या तोलाचा नाही वाटला.
तरीसुध्दा, मनःपूर्वक अभिनंदन, कारण तुमच्यात एका यशस्वी लेखकाचे गुण नक्कीच आहेत.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

विशाल कुलकर्णी's picture

11 Jun 2009 - 10:04 am | विशाल कुलकर्णी

धन्यवाद.. आता तुमच्या प्रश्नांची उत्तरे..
१. <<पाहतो तर वाड्याच्या दारातच आप्पाजी उभे होते. मी चकीतच झालो, आप्पाजी एवढ्या रात्री......."नाही, नाही मी बाहेर नाही येणार आता, तुच लवकर आत ये! चल नाहीतर ते पिशाच्च जवळ येतय बघ. ">> ते वाड्याच्या दारातच उभं होतं...वाड्याच्या बाहेर नाही. आतुनच आलेलं आणि म्हणुनच बाहेर यायला तयार नाही.

२. माणिकराव, जन्माने माणुस असले तरी आता ते त्याचे गुलाम होते. एक कठपुतळी... जिवंत प्रेत म्हणु हवं तर आपण. त्यामुळे कुठल्याशी सुष्ट शक्तीची त्यांना भिती असणे साहजिकच आहे.

चुभुदेघे... धन्यवाद.

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... अंतीम : http://www.misalpav.com/node/8120

मयुरा गुप्ते's picture

10 Jun 2009 - 8:22 pm | मयुरा गुप्ते

अहो विशालराव, सकाळ पासुन डोकं सुन्न्..आता काय कराव बरं ऑफीस मध्ये कामाचं?
खुपच वेगवान कथा.
पुलेशु.

लिखाळ's picture

10 Jun 2009 - 8:25 pm | लिखाळ

छान कथा :)
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

अनामिक's picture

10 Jun 2009 - 8:32 pm | अनामिक

काय भारी लिहिली आहेस ही कथा. चारही भाग, कथेचा वेग, कथानक सगळं मस्तं जमलंय. असेच लेखन अजून येऊ देत.

-अनामिक

वर्षा's picture

10 Jun 2009 - 11:07 pm | वर्षा

मस्त. त्या तुक्याचं काय झालं नंतर?

दिपाली पाटिल's picture

10 Jun 2009 - 11:17 pm | दिपाली पाटिल

मी ही मालिका मी अधाशासारखी वाचुन काढली...पण तुक्या कुठे गेला तोच विचार करत होती मी पण आणि त्याला होणार्‍या आजारां चे काय झाले??
दिपाली :)

विशाल कुलकर्णी's picture

11 Jun 2009 - 10:19 am | विशाल कुलकर्णी

तुक्याला मुळात काही झालंच नव्हतं. मी मागेही याचं उत्तर दिलं होतं की यालाच संमोहन म्हणतात. तुक्याने सन्मित्रवर केलेल्या उपकाराबद्दलची कृतज्ञता म्हणुन सन्मित्र त्याच्या मदतीला नक्की धावुन येणार हे ओळखुन त्या शक्तीने तुक्याचा मुखवटा फक्त वापरला, जसा आप्पाजींचा वापरला होता तसाच. पुढे तुक्याच्या आजाराचं काय झालं ते सन्मित्रच्या पुढच्या कथेत येइलच ना ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... अंतीम : http://www.misalpav.com/node/8120

दिपक's picture

11 Jun 2009 - 3:21 pm | दिपक

वेगवान कथानक विशालभाऊ. सगळे भाग एका दमात वाचले.

विशाल कुलकर्णी's picture

11 Jun 2009 - 5:42 pm | विशाल कुलकर्णी

धन्यवाद मित्रहो...
पुढची कथा सामाजिक असेल.

सस्नेह
(कुठलाही शिक्का नको असलेला)
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... अंतीम : http://www.misalpav.com/node/8120