भाग १: http://www.misalpav.com/node/8059
भाग २ : http://www.misalpav.com/node/8085
(उपसंहार : रात्रीच्या महाभयंकर प्रसंगातुन कसाबसा सावरलेला सन्मित्र आप्पाजींना भेटतो आणि आश्वस्त मनाने पुढच्या विधीलिखितास सामोरे जायला तयार होतो. पुढे.......)
गावातल्याच एका छोट्याशा "डिपार्टमेंटल टपरीतुन" पुजेचे सामान विकत घेतले आणि झपाझप पावले उचलत वाड्याकडे निघालो. साडे नऊ वाजुन गेले होते. माणिकरावांच्या येण्याआधी वाड्यावर पोहोचणे जरुरीचे होते. आप्पाजींच्या भेटीबद्दल त्यांना इतक्यात काही कळणे योग्य नव्हते.
मनात आप्पाजींचं वाक्य रुंजी घालत होतं, "यु आर द चोजन वन !"
त्यांना नक्की काय म्हणायचं होतं. या वाड्यातली त्या अमानवी शक्तीच्या विनाशासाठी तर नव्हती माझी निवड? पण मग मीच का? हे काम तर आप्पाजीही करु शकले असते. किंबहुना आप्पाजीच करु शकत होते. मग त्यांना दहा वर्षे वाट पाहात का बसावे लागले? आणि ती तथाकथीत अघोरी शक्ती..., नक्की काय होते ते? त्यासाठी इतके वर्ष आप्पाजी माझी वाट बघत या आडगावात थांबले होते? आणि गंमत म्हणजे माझ्याकडे असं काय होतं की........? मेंदु पोखरल्यासारखा झाला होता. विचाराच्या नादात रानात कधी येवुन पोहोचलो ते कळालेच नाही. वाडा समोर दिसला आणि भानावर आलो.
समोरच तुक्या होता, " दादा, मालक आल्याती, लई कावल्याती , जरा जपुन र्हावा !!!
मी मनाची तयारी करत वाड्यात शिरलो. का कुणास ठाऊक पण मनात भितीचा लवलेशही नव्हता. माझं मलाच आश्चर्य वाटलं. मी आत पाऊल टाकलं आणि माणिकराव सामोरे आले....
"सन्मित्र, तुम्हाला इथे कशासाठी ठेवलेय? आणि तुम्ही पहिल्या दिवसापासुनच गायब! मला हे चालणार नाही सांगुन ठेवतो. कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा मला खपत नाही." म्हातारा भलताच पेटला होता.
पण कसं कोण जाणे, मी शांत होतो. माझं मलाच आश्चर्य वाटलं. कालपर्यंत कोणी या भाषेत बोललं असतं तर मी तिथंच त्याचं हाड ना हाड संगीतमय करुन सोडलं असतं, पण आज मात्र मी कधी नव्हतो इतका शांत होतो.
"माणिकराव, माझ्या माहितीप्रमाणे मला हा वाडा आणि संपुर्ण शेत याच्या देखरेखीसाठी ठेवले आहे. मग मला शेतावर एक नजर टाकावी वाटली तर बिघडलं कुठे? आणि कृपा करुन पुन्हा या भाषेत माझ्याशी बोलु नका? मला नाही आवडत ते !"
म्हातारा बिथरला,"तु माझा नोकर आहेस आता, लक्षात ठेव..माझं अन्न खाल्लं आहेस तु." मी पटदिशी त्यांना सुनावणार होतो की मी तुमच्या अन्नाला स्पर्षही केलेला नाही. पण लगेच त्यातला धोका लक्षात आला आणि गप्प झालो. म्हातारा रागारागात पुढे आला. मला वाटलं आता येतो अंगावर, लगेच नैसर्गिकरित्या मी बचावास सिद्ध झालो. पण माणिकराव हात उगारुन माझ्या जवळ आले एकदम आणि अचानक फुटभर अंतरावर येवुन थांबले. मला काही कळेना.
एकदम सीन चेंज......
" माफ करा सन्मित्र, वय झालंय आता , त्यामुळे राग लवकर येतो आजकाल ! "
"काही हरकत नाही माणिकराव, फ़क्त यापुढे भान ठेवा. " माझे लक्ष सगळे त्यांच्या चेहेर्याकडे होते. त्या काही सेकंदात त्यांच्या चेहेर्यावर एक कसलीशी वेदना चमकुन गेली. त्यानंतर मात्र माणिकराव माझ्यापासुन फुटभर अंतर राखुनच वावरत होते. मी उगाचच आपल्या दंडाच्या बेटकुळ्या तपासुन बघितल्या. म्हातारा घाबरला वाटतं.
"सन्मित्र, अहो तुमच्या गळ्यात काय आहे ते? असलं कुणीही दिलेलं, काहीही गळ्यात घालत जावु नका. लोकांचा भरवसा देता येत नाही आजकाल."
माझा फुगा फटकन फुटला. म्हणजे ही सारी करामत आप्पाजींनी दिलेल्या त्या गोफाची होती तर...!
"नाही माणिकराव , तो गोफ मला माझ्या गुरुंनी दिला आहे. ती माझी श्रद्धा आहे, माझा आत्मविश्वास आहे, तो मला काढता नाही येणार."
माणिकराव चरफडत होते , ते प्रचंड अस्वस्थ झाले होते.
"सन्मित्र, तुम्ही नक्की शेतातच होतात?"
ते वारंवार माझ्या हातात असलेल्या पिशवीकडे पाहात होते. कपाळावर आलेला घाम पुसत होते. आता त्यांची गोची माझ्या लक्षात आली. मी बिनधास्त पुढे सरकलो.
"तुम्हाला खोटे वाटतेय हे घ्या, या पिशवीत माझे आंघोळीचे कपडे आणि एक पुस्तक आहे. इतका वेळ रानातच वाचत पडलो होतो. नाही..आता तुम्ही पिशवी चेक कराच!"
मी रागावल्याचा आव आणत पिशवी पुढे केली. खरेतर मी खुप मोठी रिस्क घेतली होती. जर माणिकरावांनी खरोखरच पिशवी चेक केली असती, तर सगळे बिंग तिथेच फुटले असते. पण माझ्या अपेक्षेप्रमाणेच पिशवी पुढे करताच माणिकराव एखादा फणा काढलेला नाग बघावा तसे दचकुन मागे सरकले.
"नाही, नाही सन्मित्र, तुमच्यावर विश्वास आहे माझा, अहो..म्हणुन तर तुमच्या हातात माझ्या इस्टेटीची सगळी सुत्रं दिलीत ना."
इथेच माणिकरावांचा या सगळ्या प्रकरणाशी असलेला संबंध सिद्ध होत होता. ते त्या पिशवीला स्पर्षच करु शकत नव्हते ....
पिशवीत "मारुतीरायाची तसबिर आणि पुजेचे सामान होते."
"ती पिशवी तिकडे ठेवुन द्या, या तुम्हाला वाडा दाखवतो, चला. तुक्या, इकडे ये जरा", त्यांनी तुकाला बोलवुन काहीतरी त्याच्या कानात सांगितलं. तो नाही, नाही करत होता. तर त्यांनी डोळे वटारले,
" सांगितले तेवढे कर, नाहीतर......लक्षात आहे ना." तुका घाबरत घाबरत हो म्हणाला.
"काही नाही हो, जेवणाची व्यवस्था इथेच कर म्हणुन सांगितले.तर कुरकुर करत होता म्हणुन दटावलं थोडं. ही आजकालची नोकर मंडळी एवढी उद्दाम झालीत ना.असो, या तुम्हाला घर दाखवतो. "
हॉलमध्ये आल्यावर साहजिकच मी त्या फोटोबद्दल विचारले.
"ते माझे आजोबा आणि आज्जी. इथली जहागीरदारी होती आमच्याकडे. त्यावेळी छोटीशी वस्ती होती, आताचं जे गाव दिसतय ते आमच्या आजोबांनी वसवलं. मोठा रुबाबदार आणि देखणा होता माणुस, नाही?"
"अर्थात", मी मनापासुन अनुमोदन दिलं. "माणिकराव वाड्यावर कुठेही तुमच्या आई वडीलांचा किंवा तुमचा फोटो दिसत नाही." मी पीन मारलीच.
"नाही हो, कधी काढलाच नाही. पंत थोडेसे जुन्या विचाराचे होते. पंत म्हणजे माझे वडील. फोटो काढणे आवडत नसे त्यांना." माझं लक्ष झोपाळ्याकडे गेलं......
"माणिकराव, हा झोपाळा मात्र मला आवडला बरं, मस्तच आहे."
असं म्हणत मी झोपाळ्याजवळ गेलो आणि झोपाळ्यावर बसणार तितक्यात माणिकरावांनी मला थांबवलं.
"सन्मित्र, खुप दिवसात स्वच्छ केलेला नाही, तुक्याकडुन स्वच्छ करुन घेतो मग हवा तितका वापर करा झोपाळ्याचा. चला आता निघतो मी."
............ झोपाळा लख्ख होता, पण "ठिक आहे" म्हणुन मी मागे वळलो आणि त्या क्षणीच....
"कर्रर्रर्र .... कर्रर्रर्र.......जोरात आवाज झाला आणि माणिकरावांनी मला जवळजवळ खेचलंच आणि ते जोरात ओरडले," नाही, आत्ताच नाही !"
मी बाहेर पडता पडता मागे वळुन पाहीलं, इतका वेळ स्थीर असलेला झोपाळा चक्क कुणीतरी झोका द्यावा तसा मागेपुढे हालत होता. अंगभर भीतीची लाट सळसळत गेली. म्हणजे ते दिवसा देखील कार्यक्षम होते. पण मग माणिकरावांनी त्यांना का अडवलं? मी माणिकरावांना कुठलेही स्पष्टीकरण देण्याच्या किंवा मागायच्या फ़ंदात पडलो नाही. म्हणालं ही पिडा जातेय तर जावुदे. कारण आप्पाजी येणार होते. माणिकराव बाहेर पडले, पडताना त्यांनी मागे वळुन पाहीले, त्यांची नजर वरच्या हॉलवर होती.
मी ही चोरुन तिकडे नजर टाकली.....
क्षणभर त्या खिडकीच्या काचेवर कसलीशी सावली दिसली. कोणीतरी होतं तिथं....!
अचानक.....
तो आवाज कानी आला आणि सगळ्या अंगावरचे केस ताठ झाले माझ्या. हातात आलेली शिकार निसटुन गेल्यावर प्रचंड संतापलेल्या वनराजाने डरकाळी फोडावी तसा काहीसा हुंकार होता तो. माणिकराव मात्र निर्विकार पणे निघुन गेले.
आता मात्र उशीर करुन चालणार नव्हता. आता मला सर्वात आधी योग्य जागा शोधुन मारुतीरायाची प्रतिष्ठापना करायची होती. मी पिशवी काढली ....
आणि.....
आतली भगवंताची तसवीर गायब होती......
मघाशी माणिकरावांनी तुक्याला काय काम सांगितले होते ते आत्ता माझ्या लक्षात आलं . माझी हवा टाईट......
विचार करा, इतका वेळ मी जीच्या जोरावर गमजा करत होतो ती मारुतीरायाची तसबीरच गायब होती. नुकतेच नवा शोध लागलेला की ते दिवसादेखील कार्यक्षम आहेत. संपुर्ण वाडा झपाटलेला, वाड्यात मी पुर्णपणे एकटा आणि ज्याच्या विश्वासावर होतो..तो मारुतीराया गायब. अशी तंतरली म्हणता .....
क्षणभर विचार केला आणि मग ठरवले आता वाड्यात राहणे धोक्याचे आहे. आप्पा येतो म्हणाले होते, त्यांचाही पत्ता नव्हता. मी झर्रकन दाराकडे आलो .........
..............................
................................
पुढचा क्षण प्रचंड धक्का देवुन गेला मला.
अरे, वाड्याचा दरवाजा कुठे गेला? दाराच्या जागी एकसंध दगडी भिंत उभी होती, जणु काही तिथे कधी दरवाजा नव्हताच. आता मात्र उरलंसुरलं धैर्य संपुष्टात आलं...........
मनोमन पुन्हा देवाचा धावा सुरु झाला....
आणि अचानक.....
"दादा, वाचवा दादा, म्या संपलो..." ......हा तुक्याचाच आवाज होता नक्की. पण बाहेर जाणार कसा? दरवाजाच दिसत नव्हता. एकदम लक्षात आलं कि हा आवाज वाड्याच्या आतुन येतोय, किंबहुना वाड्याच्या वरच्या मजल्यावरुन.
मी वर पाहीलं, क्षणभर खिडकी उघडली गेली..खिडकीत तुक्याचा चेहरा डोकावला .....
क्षणभरच आणि कुणीतरी जोरात खेचावं तसा तुक्या खिडकीवरुन नाहीसा झाला.....
कानावर अजुनही त्याचा करुण आवाज येतच होता.....काही सुचेना, भीती तर प्रचंड वाटत होती. पण एकीकडे तुक्याची मदत करण्याची इच्छादेखील प्रबळ होती. काय करु? मी एकटा कसा काय लढणार त्यांचाशी ? ....
एक दुर्बळ , सामान्य माणुस आणि एक महाशक्तिशाली अमानवी शक्ती......अगदीच विषम संघर्ष होता.
शेवटी मनाने निर्णय घेतला. माझ्यातल्या कृतज्ञ माणसाने मनातल्या भीतीवर विजय मिळवला आणि पुढच्या क्षणी मी वरच्या मजल्यावर होतो.
मनातलं द्वंद्व संपलं होतं. मृत्युची भीती संपली होती तिची जागा तुक्याबद्दलच्या आपुलकीने, कृतज्ञतेने घेतली होती. वरच्या हॉलचा दरवाजा बंदच होता. मी मारुतीरायाचे नाव घेतले....
आणि बंद दरवाजावर एक लाथ घातली. तसं दार उघडले गेले.....
जे काही समोर होतं ते खरंच अविश्वसनीय होतं. हॉलच्या मधोमध असलेल्या टेबलावर कुठल्यातरी अदृश्य शक्तीने जखडल्यासारखा तुक्या असहाय अवस्थेत पडलेला होतां, अंगावरच्या कपड्याच्या चिंध्या झाल्या होत्या. मला पाहताच त्याच्या डॊळ्यात एक चमक आली, तोंडातुन आवाज आला, " मस्नी म्हायीत व्ह्तं दादा, तुमी मस्नी वाचवाया येशीला म्हुन! हेच्यातनं वाचवा, मस्नी सोडवा दादा."
.............आवाज कुठुनतरी, खुप दुरुन आल्यासारखा येत होता. मी थबकलो, पण क्षणभरच, एका बेसावध क्षणी भावनेने बुद्धीवर मात केली आणि मी पुढे सरकलो. जरा पुढे गेलो आणि....
............................
..................................
तुका चक्क माझ्या डोळ्यासमोर विरघळुन गेला. ते बघितल्यावर मात्र मीच काय तो पघळुन जायचा बाकी राहीलो. आतुन, मनातुन एक आवाज आला,
"पळ, बेट्या...नाहीतर संपलं सगळं.!" क्षणात गर्रकन मागे वळलो आणि दरवाजा गाठला.
दरवाजा ?
हा पण विरघळला कि काय? अरे देवा पुन्हा तेच, तिथे एकसंध दगडी भिंत उभी होती. आणि पुन्हा तो आवाज कानात घुमला, पण यावेळी मघासारखा फक्त हुंकार नव्हता. कोणीतरी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतं. खरंतर कानाला काहीच ऐकु नव्हतं, तो आवाज थेट मनाच्या पातळीवर घुमत होता.....
"तुक्याच्या मदतीने वाचला होतास ना काल? आज तुक्यामुळेच अडकलास." आणि त्यानंतर कानी आलं ते एक विचित्र हास्य!
काय नव्हतं त्या हास्यात?....... घृणा, तिरस्कार, उपहास, संताप, स्वतःच्या अमर्याद सामर्थ्याचा अहंकार ... ; सगळे विकार शिगोशीग भरले होते त्या हास्यात. माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं. तोंडातुन शब्द फुटत नव्हता. मेंदुच जणु ब्लॉक झाला. एकच विचार मनात आला....
"सन्मित्र, संपलं सगळं ! आप्पाजी माफ करा, तुमचं गेली दहा वर्षे वाट पाहणं वाया गेलं. समोर पाहीलं......
टेबलापाशी काहीतरी उभं होतं. त्याला काहीच आकार नव्हता. नुसता धुक्याचा पुंजकाच जणु. एक विलक्षण दुर्गंधी सगळीकडे पसरली होती. ते भयावह हुंकार वाढत चालले होते. जणु काही ते एकटं नव्हतं. त्याच्यासारख्या अनेकांचा तो समुदाय असावा. त्या हुंकारांमधुन त्यांची घाई, त्यांची भुक जाणवत होती.
बहुतेक मृत्युचं बोलावणं आलं होतं. मृत्यु ? पण मला खरोखर मृत्यु येणार होता?
.....की मी देखील त्यांच्यात सामावला जाणार होतो? त्यांच्यातलाच होणार होतो?
हळुहळु धुकं वाढत होतं. थोड्याच वेळात धुकं पुर्ण हॉलमध्ये पसरलं. आता आजुबाजुच्या भिंतीदेखील दिसत नव्हत्या. मी शांतपणे डोळे मिटुन घेतले. मनातल्या मनात हनुमानस्तोत्र म्हणायला सुरुवात केली. आता मी मृत्यु किंवा ते जे काही प्राक्तनात आहे ते स्विकारायला तयार होतो. कधीतरी शुद्ध हरपली. शुद्ध हरपण्यापुर्वी शेवटची जाणिव होती ती म्हणजे........
अचानक त्या दुर्गंधीत एक वेगळाच, प्रसन्न...आल्हाददायक असा सुगंध दरवळला. कानावर शब्द आले.........
"जय जय रघुवीर समर्थ !"
मी मागे वळुन पाहीलं......
मला दिसलं की हॉलचा दरवाजा पुन्हा आपल्या जागेवर आला होता. हे केवळ संमोहन होतं की आधी दाराचं गायब होणं संमोहन होतं. तिथे दारात मी शुभ्र, तेजस्वी आकृती पाहीली. बहुदा आप्पाजी माझ्या मदतीला धावुन आले होते. अचानक सगळीकडे शुभ्र प्रकाश पसरला आणि माझी शुद्ध हरपण्यापुर्वी फक्त एवढेच जाणवले की कुणाच्यातरी मजबुत बाहुंनी मला आधार दिला होता.
किती काळ बेशुद्ध होतो कुणास ठाउक, पण शुद्धीवर आलो तेव्हा वाड्यात नव्हतो एवढं नक्की. डोळे उघडले आणि समोर दिसले ते प्रेमळ नजरेने माझ्याकडे पाहणारे आप्पाजी.
"आत्ता कसं वाटतंय सन्मित्रा, बरा आहेस ना? आणि मग स्वत:च खळखळुन हसले.
"एवढ्या भयानक प्रसंगातुन गेल्यावर बरा कसा असशील म्हणा."
मी कसनुसा होत हसलो.
माफ कर सन्मित्र, पण तुला त्या वाड्यातल्या शक्तीची, त्याच्या भयानकतेची जाणिव होणं आवश्यक होतं. कारण शेवटी तुझा लढा आहे तो, तुलाच लढायचाय. मी फक्त रिंगणाच्या बाहेर उभे राहुन मदत करु शकतो. असो, तुझी शुद्ध हरपल्यानंतर मी जवळजवळ दोन तास त्या वाड्यात होतो. माझ्यापरीने शोध घेण्याचा प्रयत्न केला.
सन्मित्र, तिथे जे काही आहे ते भयानक तर आहेच. पण खुप जुनाट आहे. गेली कित्येक शे वर्षे ते तिथं सुखेनैव नांदतय. गेल्या काही वर्षापासुन मी या सगळ्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करतोय. साधारणत: दिडेकशे वर्षापुर्वी इथे पहीला बळी गेला होता, म्हणजे उघडकीस आलेला, तसे किती गेलेत हनुमंतच जाणे. एक धनगर आणि त्याची बायको रात्रीच्या मुक्कामाला इथे थांबले होते. त्यावेळेस इथे हा वाडा नव्हता. मोकळा माळ होता. पण रात्रीत बहुदा तो धनगर धुक्यात विरघळुन गेला, ते बघुन त्याची बायको वेडी झाली. त्यानंतर अधुनमधुन या अशा घटना घडतच गेल्या.
कधी माणसे, कधी जनावरे ... त्यांना काहीच वर्ज्य नाही. ते आधी तुम्हाला मदत करुन आपल्या ऋणात बांधुन घेतात, एकदा तुम्ही
त्यांची मदत घेतली की की तुम्ही त्यांचे गुलाम बनता. असेच कुठल्याशा बेसावध क्षणी माणिकरावांचे कुणी पुर्वज , कदाचित त्यांचे आजोबा त्या शक्तीच्या कह्यात गेले असावेत. त्यानंतर पुढच्या पिढ्या त्यांच्या ताब्यात गेल्या. माणिकरावांच्या वडीलांनी विरोध करण्याचा तोकडा प्रयास केला होता पण ते अचानक गायब झाले, अशा तर्हेने की जणु कधी अस्तित्वातच नव्हते.
सन्मित्र, आता तुझ्या मनातल्या शंका...... मीच का ?
तु लहानपणी हिरण्यकश्यपुची गोष्ट ऐकली असशील, किंबहुना कुठल्याही बलशाली दानवाची गोष्ट घे, असं आढळतं की कुठल्याना कुठल्या वरदानामुळे म्हणा किंवा अन्य काही कारणाने असेल पण ते देवांनाही अजिंक्य ठरले होते. मग देवाने मानवरुपात येवुन त्यांचा संहार केला. कदाचित अशीच काही यामागचीही कारणमिमांसा असेल. ती मलाही अज्ञात आहे. मला स्वामींनी सांगितलं होतं एक तरुण येइल आणि या सर्व शक्तीच्या विनाशास कारणीभुत ठरेल.
आणि त्यांनी सांगितलेलं वर्णन तुझ्याशी जुळतय......
सन्मित्र, उद्या रात्री अमावस्या आहे. अमावस्येला त्यांची ताकद प्रचंड वाढते. पण त्यांना त्यांच्या पुर्ण ताकतीसह संपवायचे असेल तर उद्याच्...नाहीतर कधीच नाही. उद्या त्यांना तुझा बळी मिळाला की ते प्रचंड शक्तीशाली बनतील. तुला कल्पना नाही पण तुझ्या पुर्वजांची पुण्याई म्हण किंवा तुझं पुर्वसुकृत म्हण, तुझ्यात एक विलक्षण सामर्थ्य आहे. वेळ आली की तुला त्याची जाणिव होईलच.
सद्ध्या त्यांची शक्ती, त्यांचा वावर वाड्यापुरताच मर्यादीत आहे, पण उद्या जर त्यांना बळी मिळाला... तुझा..! तर मात्र त्यांच्या शक्तीला कसलीच सीमा राहणार नाही. मग बाहेरच्या, म्हणजे आपल्या या जगात प्रलय येइल. प्रचंड उलथापालथ होइल.
आणखी काही शंका....
"आप्पाजी, तसं असेल तर मी माणिकरावांकडुन घेतलेले दहा हजार रुपये वापरलेत. त्यायोगे माझ्यावर देखील त्यांची सत्ता चालायला हवी. मग मी त्यांच्याशी कसा काय लढणार ?
हे युद्धाचे डावपेच आहेत सन्मित्र. प्रत्यक्ष लढत देण्यापुर्वी शत्रुला गाफील करावे लागते. त्यांची बलस्थानं, त्याची कमजोरी जाणुन घ्यावी लागते. वाडा हे त्यांचं बलस्थान आहे. तुझ्या पाठीशी असलेल्या सुष्ट शक्ती हे तुझं बलस्थान. त्यांना आपल्या सामर्थ्याबद्दल प्रचंड आत्मविश्वास आहे, अहंकार म्हण हवं तर. त्यांना असं वाटतय की तु सहजासहजी त्यांच्या जाळ्यात सापडलाहेस. बाकी सगळं तुझ्या मनः शक्तीवर, तुझ्या आत्मविश्वासावर अवलंबुन आहे. मी असेनच पण रिंगणाच्या बाहेरुन, आत मला प्रवेष नाही. काल रात्री जे पाहीलंस ते त्याचे हस्तक होते. जरी मी आलो नसतो तरी तुला काहीही झालं नसतं. पण मग आयताच तु त्यांच्या ताब्यात सापडला असतास. त्यांच्याशी लढायची हिंमत तुझ्यात जागृत करणं, इथे जे काही चाललय ते तुला कळणं आवश्यक होतं म्हणुन मला यावं लागलं.
"खरेतर मी काहीच केलेलं नाही ती ताकद समर्थांच्या नावाची होती, प्रभुच्या नामस्मरणाची होती. तिच तुझ्या उपयोगी पडेल संकटसमयी. लक्षात ठेव तो नेहेमी आपल्याजवळच असतो, फक्त पुर्ण श्रद्धेने, विश्वासाने त्याला साद घालावी लागते, तो ऐकतोच."
असो, आता तु आराम कर, उद्या सकाळी तुला पुन्हा वाड्यावर जायचय. सावध राहा, शिकार निसटल्याने ते पिसाळलेले आहेत. ते तुला काहीही करु शकणार नाहीत, कारण तु त्यांच्या मालकाचा बळी आहेस, पण तुला त्रास निश्चीतच देतील. घाबरु नकोस, रात्री मी परत वाड्यावर येइनच तुझ्या मदतीला.
दुसर्या दिवशी सकाळी परत वाड्यावर. आप्पांजींनी आधार दिला होता तरीही भीती कमी झाली नव्हती. मनात एकच आशा होती की ते मदतीला येणार आहेत. तो दिवस प्रचंड तणावाखालीच गेला. सतत ते धुक्याचे पुंजके आजुबाजुला वावरत होते. त्यांच्या अस्तित्वाची जाणिव करुन देत होते. त्यांचे मनाच्या पटलावर वेगाने आदळणारे हुंकार, त्यांचा संताप, त्यांचा तिरस्कार जणु मला स्पर्षुन जात होता. मनातल्या मनात देवाचे नामस्मरण करत मी वेळ ढकलत होतो.
रात्रीचे आठ वाजले असावेत. एकदम कोणीतरी दरवाजा ठोठावला. "दादा, दार उघडा, आक्रीत झालय दादा, दार उघडा !"
मी दार उघडले, समोर तुका उभा होता......
दाराबाहेरुनच धापा टाकत त्याने सांगितले ,
" लई वंगाळ झालय दादा, आक्रीत झालय.........! आप्पाजी गेले. मारुतीच्या देवळात त्यांचं प्रेत सापडलय. त्यो गुरवाचा जन्या गेलता पाया पडाय, तर आप्पा देवासमोर पडलेलं दिसलं. हाकंला ओ दिनात म्हुन हात लावुन पगितलं तर समदं संपल्यालं व्हतं ! चला बिगी, बिगी !"
मी मटकन खालीच बसलो. माझी शेवटची आशा लुप्त झाली होती. आता फक्त देवाचा आणि नशीबाचा हवाला. आप्पाजींना ऐनवेळी "तिथुन बोलावणं आलं होतं."
माझा लढा आता मलाच लढायचा होता. मला पहिल्यांदाच माझ्या एकटेपणाची जाणीव झाली. मनात , कुठल्यातरी कोपर्यात दबुन गेलेली भीती पुन्हा उसळी मारुन वर आली. पायातलं बळच सरलं होतं.
क्रमश:
(त.टि.: क्षमस्व, खरंतर या भागात संपवायचं होतं, पण नाही जमलं. पुढचा भाग मात्र नक्की शेवटचा असेल.....विशाल.......)
प्रतिक्रिया
8 Jun 2009 - 7:10 pm | हर्षद आनंदी
आणि तो पण वाड्याच्या बाहेर?
विशालभौ .... नका ताणू !! लवकर टंका शेवट
9 Jun 2009 - 12:01 pm | विशाल कुलकर्णी
यालाच संमोहन असेही म्हणतात. प्रतिसादाबद्दल आभार.
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... भाग ३: http://www.misalpav.com/node/8094
8 Jun 2009 - 7:14 pm | धमाल मुलगा
तुक्या तर गुलाम होता, कधीही मारता आलं असतं की. अप्पांना का आणि कसं मारलं? तेही मारुतीरायाच्या देवळापाशीच?
आता नेमका क्लायमेक्सच लटकवला विशालनं...ए भौ, वाट पाहतोय रे :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
9 Jun 2009 - 4:06 am | Nile
वा! च्यायला मजा आली!
तुक्याची गंमत थोडी डोसक्यात शिरली आहे असं वाटतयं, पण स्पॉयलर्स नकोत.
लवकर आणा राव!
8 Jun 2009 - 7:20 pm | श्री
डोक्याचा पार चुथडा करुन सर्वात शेवटी क्रमश:
हे बरोबर नाही........ निषेध,निषेध,निषेध........
तमसो मा ज्योर्तिगमय
8 Jun 2009 - 7:35 pm | मस्त कलंदर
आता आणखी उत्कंठा नका ताणू.. लवकर येऊ द्या पुढचा भाग.. म्हणजे आपलं येत्या तासा-दोन तासात.. कसं???
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
8 Jun 2009 - 8:57 pm | क्रान्ति
शैली आहे! दुसरा आणि तिसरा दोन्ही भाग अगदी समोर घडत असल्यासारखे वाटतात! पुढे लवकर येऊ दे!
@) क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
8 Jun 2009 - 9:03 pm | लिखाळ
मस्त :)
पुढचा भाग टाका लवकर...
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
8 Jun 2009 - 9:36 pm | ऍडीजोशी (not verified)
ओ कुलकर्णी, का त्रास देताय? आधीच टांगून ठेवलंय आम्हाला, आता संपवा की लवकर.
भन्नाटच आहे कथा. मजा येतेय सॉलीड. पटापट टाका पुढचा भाग.
9 Jun 2009 - 9:03 am | विसोबा खेचर
जोश्यांशी सहमत..
विशालकाका, जियो..!
तात्या.
8 Jun 2009 - 9:43 pm | छोटा डॉन
जबरदस्त लिहतो आहेस रे बाबा, पहिल्यापासुन वाचतो आहे.
शेवटच्या भागालाच द्यायची म्हणुन प्रतिक्रिया राखुन ठेवली होती, मात्र ह्या भागात सांभाळलेला तोल पाहुन रहावले नाही ...
खुप सुरेख लिखाण आहे, अगदी मुरलेल्या लेखकासारखे.
पुढचा भाग येऊ देत लवकर, उत्कंठा जास्त ताणु नये कॄपया.
वाट पहातो आहे शेवटच्या भागाची ...
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
8 Jun 2009 - 11:36 pm | अनामिक
अगदी हेच म्हणतो...पुढचा भाग लवकर येऊ देत..
-अनामिक
8 Jun 2009 - 9:44 pm | टुकुल
जहबरा लिहिल आहे.... लवकर लिहा.. तुक्याचा जिव तुमच्या हातात आहे :-).
झपाटलेला,
टुकुल
8 Jun 2009 - 11:48 pm | रेवती
हा भाग भीती वाटल्याने मी तीन भागात वाचला. पुढचा भाग लवकर टाका हो भौ! मला तर वाटतय हा तुक्याच काहीतरी प्रॉब्लेम करणार....
रेवती
9 Jun 2009 - 6:32 am | घाटावरचे भट
लिहिलंय छान. पण हॅरी पॉटरचा प्रभाव जाणवला. सन्मित्रचं 'चोजन वन' असणं, तुक्याचा भक्ष्यासारखा वापर करून सन्मित्रला वरच्या मजल्यावर बोलावलं जाणं (सिरियस ब्लॅक आणि डिपार्टमेंट ऑफ मिस्टरीज), ऐन वेळी अप्पाजींचा मृत्यू आणि एकूणातच अप्पाजींचं शक्तीशाली व्यक्तीमत्व (आल्बस डंबलडोअर सारखं) वगैरे.
9 Jun 2009 - 7:05 am | अवलिया
वा! मस्त !!
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
9 Jun 2009 - 9:33 am | शार्दुल
खुप सुरेख लिखाण आहे,,,,अरे विशाल लवकर टाक रे शेवट्चा भाग,,,, सगळा वाडा डोळ्यासमोर उभा आहे,,,,,,,
नेहा
9 Jun 2009 - 9:57 am | मराठमोळा
कथेचा वेग कुठेच मंदावला नाही विशालराव. अप्रतिम..
अभिनंदन!! :)
पुढचा भाग लवकर येऊ द्या म्हणजे झालं.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
9 Jun 2009 - 10:07 am | सुमीत
अप्रतीम, हा भाग पण खूप आवडला. आता आप्पा नाहीत, कसले जबरी वळण दिले आहेस कथेला.
9 Jun 2009 - 11:51 am | विशाल कुलकर्णी
धन्यवाद मंडळी.
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... भाग १: http://www.misalpav.com/node/8059
भाग २: http://www.misalpav.com/node/8085
9 Jun 2009 - 3:18 pm | हर्षद बर्वे
अप्रतिम लेखन आणि लेखनावर जबरदस्त पकड...
लवकर अंतिम भाग टाका विशालराव....वाचकांना टांगुन चक्का करू नका...
एच.बी.
9 Jun 2009 - 6:15 pm | प्रणित
अंतिम भागाची आतुरतेने वाट पाहतोय.
9 Jun 2009 - 6:21 pm | तिमा
लेखन उत्तमच आहे पण कथेतील काही शंका आहेत .पण त्या सगळे भाग पूर्ण झाल्यावरच विचारीन.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
10 Jun 2009 - 1:17 am | Nile
अरे यांना बोलावणे धाडा कुणीतरी, केव्हाची वाट पहातोय अंतीम भागाची!!!
10 Jun 2009 - 2:55 am | रेवती
तेच तर....
मीही सक्काळपासून मिपावर दहादा येऊन बघून गेले अंतिम भागासाठी....छे बुवा! किती वाट बघायची?
रेवती