माझी मद्रास ची सफर- भाग अंतिम

मस्त कलंदर's picture
मस्त कलंदर in जनातलं, मनातलं
31 May 2009 - 2:32 pm

... भाग १
... भाग २
... भाग ३

तसं बरंचसं लिहून झालंय चेन्नई/मद्रास बद्दल... देवांनी तर सविस्तर लिहिलं आहेच.. नि बरीचशी जनता ही तिकडे राहून आल्यामुळेही अनुभव जवळ्जवळ सारखेच असतील... पण माझ्यामते... आणखी एक-दोन गोष्टींच्या उल्लेखाविना ही सफर नक्कीच अपूर्ण राहिल...

पहिली गोष्ट म्हणजे.. दाक्षिणात्यांचं वागणं!!!
माझं जन्मगांव सोडलं.. तर माझा संबंध फक्त मुंबईशीच आला.. इतर ठिकाणीही असेच होत असेल असा माझा कयास आहे.. तर, बरेचसे मुंबईतले दाक्षिणात्य- जे स्थलांतरीत होऊन इकडे आले, इकडे जन्मले वाढलेले नव्हेत- त्यांना मराठी/हिंदी कळत असूनही कळत नाही असा आव आणतात आणि फक्त इंग्रजी मध्ये बोलल्यासच उत्तर देतात... याला मुंबईत जन्मल्या-वाढलेल्या लोकांचा अपवाद आहे.. अगदी चांगले मराठी बोलणारे खूपसे दाक्षिणात्य परिचयाचे आहेत.... असंच एकदा सगळेजण गप्पा मारत होतो.. गाडी बोलता बोलता.. नेहेमीप्रमाणे.. माझ्या उत्तरभारतीय असण्यावर आली.. एव्हाना याची चांगलीच सवय झाली होती.. मी म्हटलं.. हे तर नेहेमीचे झालं.. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या.. माझ्या पाहण्यातले बरीचशी गुजराती,उत्तर प्रदेशातील कुटुंबे आहेत की ज्यातल्या अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्याना चांगली मराठी नि हिंदी बोलता येते.. जर मराठी बोलता येत नसेल.. तर त्यांना कळते तरी नक्कीच.. माझ्या उत्तरभारतीय मैत्रिणीची मुलगी मराठी पाळणाघरात जाते.. तिच्याशी हिंदी बोलले तरी ती उत्तर मात्र शुद्ध मराठीत देते.. काका-मामा-मावश्या-आत्या-आई-बाबा याना मराठी येतंच... दोन्ही आजी-आजोबाच काय.. पणजोबाही मोडकं तोड़कं का होईना.. तिच्याशी मराठीत बोलतात.. मग हे दाक्षिणात्यच असे का वागतात..?? ज्या ठिकाणी १०-२० वर्षं राहतात.. तिथली भाषा कळत नाही असे का म्हणतात..??
त्यावरचं उत्तर खरंच चपखल आहे.. ते दिलं एका तमिळनाडूमध्ये लहानाचे मोठे झालेल्या एका गुज्जुभाईने.. तर त्यांच्या मते.. "तमिळ माणूस हा स्वतःच्या कोशात राहणारा प्राणी आहे.. त्याच्या मनात काय चालू असेल... कुणीच सांगू नाही शकत.. घरातल्या घरात भावा-भावा मध्ये कोश असतात.. पण जेव्हा प्रसंग दुसर्‍या कुटुंबासोबत येतो.. तेव्हा तो कोश थोडाफार स्वतःच्या कुटंबापुरता विस्तृत होतो.. त्याप्रमाणे जेव्हा आपला प्रदेश सोडून ते बाहेर जातात.. तेव्हा तो कोश आपल्या भाषेपुरताच ठेवतात.. असं म्हणतात की एका ठिकाणी एका मद्राशाला नोकरी द्या.. तो लगेच आपल्या मागे इतरांची रांग लावेल.. तेही या कोश जीवनपद्धतीमुळेच... दुसरी भाषा समजते असं म्हटलं तर त्या कोशात बाहेरचे लोकही येतील असं त्याना वाटतं नि त्यांना ते कोणत्याही परिस्थितीत नको असतं... आता थोडं परिवर्तन येतं आहे.. पण जुनी खोडं बदलणं खरंच अवघड आहे...."
आश्चर्य म्हणजे सगळ्याना हे उत्तर पटलंही.. नि बर्‍याच जणांनी असंही म्हटलं की हे खरं आहे.. पण असं नेमकं शब्दबद्द करणं त्यांना स्वतःलाही जमले नसतं... खरंय!!! आपल्या इथेही दोन पिढितला हा फरक मी खुपदा अनुभवलाय..

असो.. त्या लोकांबद्द्ल खूप झालं.. तुम्हाला माहित आहे.. आपले लोक तिकडे गेले की कसे वागतात???
मी आधीच सांगितलं ना पहिल्या भागात की मला तिथे एक नातेवाईकांकडे जायचं होतं..तर त्यांचा मुलगा बी. एस्सी. च्या प्रथम वर्षात होता.. त्याची माझी ऑर्कुट्वर ओळख झाली.. निरोप्यावर गप्पाही बर्‍यापैकी झाल्या होत्या.. नि त्यामुळेच त्या लोकांना मी तिकडे येणार अशी खबर मिळाली होती.. मी पोचल्यावर त्याला फोन केला.. म्हटलं एवढं मोठं चेन्नई... त्यात मला तमिळ येत नाही.. रिक्षावाल्यंबद्दल पण काही चांगलं ऐकलं नाहिये.. नि २० मिनिटांचंच तर अंतर आहे मोटरसायकल वरून... पण तो बेटा काही यायला तयार नव्हता.. अस्सा राग आला.. कालपर्यंत तर नीट होता.. त्याच्या गावात आले तर याला भाव चढला.. थोड्या घुश्श्यातच कसं यायचं ते विचारलं नि तत्क्षणी आईला फोन करून सांगितलं.. की फक्त तू म्हणतेयस म्हणून जातेय.. पुन्हा जा म्हणून सांगू नकोस..हो म्हणाली बिच्चारी..
बाहेर आल्या-आल्या गेस्टरूमच्या रखवालदाराने सांगितलं की विजेरी वरच्या बसेस दर १५ मिनिटाला येतात.. तिने तुम्हाला मुख्यप्रवेशद्वारापर्यंत जाता येईल..म्हटलं बरं झालं.. नाहीतरी सकाळी ११:३० च्या दरम्यान मी आले होते.. नि त्यावेळी आय आय टी चे आवार म्हणजे एक जंगलच वाटलं होतं.. रस्त्यावर एखदं माणूस कुठेतरी.. नाहीतर.. किर्र झाडी.. मुंबई आय आय टी सारखे सायकलवरून जाणारे विद्यार्थी नाहीत.. एखादी इमारत कुठेतरी.. जाम टरकले होते.. अशा परिस्थितित दुपारी ३-४ वाजता काही वाहन मिळणे कठीण होते.. नशीब या बसेस तरी होत्या..
तर मला जायचं होतं गिंडी स्थानकापासून तिरूमलायै स्थानकापर्यंत.. (हो तेच ते.. तिरूमलायै.. खत्रूड पाटीवालं)!!! आय आय टी च्या मुख्य प्रवेश्द्वारापासून गिंडी पर्यंत रिक्षावाल्याने सांगितल की ४० रू भाडं होईल.. मीटर प्रकरण कुणाच्या गावीही नव्ह्तं.. मी मुंबईकर.. थोडं बारगेन करण्याचा प्रयत्न केला.. कुठलं काय... त्याने भाडं कमी करणं सोडा.. सरळ निघून गेला..!!! त्यानंतर ५०-- ६० अशी चढती भाजणी चालू झाली तेव्हा निमूटपणे ६० रू ठरवले.. नि मंडळी कसचं काय... इथं मुंबईत तेवढ्या अंतराला अवघ्या नऊ रूपड्या मोजतो हो आपण.. (नंतर प्रत्येकवेळी आम्ही तेवढं अंतर चालूनच गेलो!!!) मनात म्हटलं.. अक्कलखाती पडले..!!! रेल्वे दुसर्‍या मजल्यावर येते.. इंडिकेटर मुंबईसारख्या मागास्लेल्या भागात हो.. तिथे सगळे बहुधा विजयकांथ किंवा रजनीकांथ ची दिव्य पॉवर घेऊन येत असावेत.. ट्रेन आली..

आँ!!!! मी चढायला पुढे सरसावलेले मागे झाले.. कार शेड मध्ये जातेय बहुधा.. शंका नको म्हणून आत डोकावून पाहिलं...

पण तोवर एक दोन मुली चढल्या.. त्यांना विचारलं तर.. एकदा पुण्यात ABC म्हणजे काय हे विचारण्याचा मूर्खपणा केला होता.. तेव्हा उत्तर देताना त्या मुला-मुलींनी "अंगावर झुरळ पडल्याचा"+"शी बाई.. कसली कसली पात्रं येताहेत आजकाल पुण्यात" असा अविर्भाव चेहर्‍यावर आणून "आपा बळवंत चौक" जस्सं सांगितलं होतं ना.. त्याची आठवण आली... :(
असो.. तिथं मात्र स्थानकावर तो न्यायला आला होता.. त्या भागातले सगळे लोक तमिळेतरच वाटत होते.. अतिशय साधा एखाद्या खेड्यात शोभेल असा परिसर.. आत घरे मात्र चांगली आहेत.. मला आमचं नातं नक्की काय आहे तेही ठाऊक नव्हतं.. तिथे गेल्यावर कळालं की ते माझ्या मामीच्या वहिनीचं माहेर आहे.. नि माझ्या मामीनं खूप कौतुक आधीच करून ठेवलेलं.. वर माझी आई किती कडक शिस्तीची.. याचं पण गुणगाण केलं होतं... त्यामुळं गप्पा बर्‍यापैकी औपचारिकच चालू झाल्या.. मी म्हटलं पण त्याना... काही मला तुमच्या मुलीच्या सासरची समजू नका.. आपण पहिल्यांदीच भेटतोय.. मस्त गप्पा मारू ना..!!! पण काका-काकू सतत हातचं राखून बोलत असल्या सारखं मला शेवटपर्यंत वाटत होतं.. नशीब तो मुलगा तरी नीट बोलत होता पण इथे आल्यापासून तोही नेहेमीसारखं बोलत नव्हता..

थोड्या वेळानं निघायची वेळ झाली.. तशी त्या काकांनी मुलाला खोपच्यात नेऊन काहीतरी समजावलेलं दिसलं...मुलगा आता मला बाईकवरून सोडायला तयार झाला होता.. झाल्या प्रकारानं माझ्या मनात मात्र आल्या मार्गानं जायचं होतं.. त्या लोकांच्या आग्रहापुढे काही चालेना तेव्हा शेवटी झाले तयार बाईकवरून जायला.. त्याने मुख्य रस्त्यावरून गाडी घेण्याऐवजी चोळा-बोळांच्या रस्त्याने घेतली... नि शोधक नजरेने सतत तो इकडे तिकडे पाहत होता.. आता मात्र सटकलं होतं जाम... माझ्या मनात नाही नाही ते विचार.. ते सिनेमात दाखवतात तसं.. सगळेजण गूढ बोलतात.. मग त्या हिरॉइनला संमोहीत करतात.. सगळ्या पाहिल्या न पाहिलेल्या रामसेंच्या चित्रपटाची विचित्र काँबिनेशन्स सुचायला लागली... :((
आता मात्र राहावेना... त्याला विचारलं.. काय चाललंय.. मला एकंदरीत खूप विचित्र वाटतंय..
तर एकंदरीत लफडं असं होतं.. की आतापावेतो आम्ही निरोप्यावर गप्पा मारल्या होत्या.. त्या इंग्रजीत.. घरी सगळेजण मराठी बोलत होते.. त्याची मराठी काय हो.. घरी ऐकलेली ग्राम्य मराठी... गावी गेल्यावर बहुतेक नातेवाईक खेड्यातले.. त्यामुळे तेही तसेच बोलणारे.. माझं मराठी ऐकून तो बोलायचा गप्प झाला होता.. (चला पहिली शंका फिटली)
तिथे राहणार्‍या मराठी लोकांचा मोठ्ठा गट आहे.. सगळे सण - समारंभ ते मिळून मिसळून साजरे करतात.. त्या गटात कुणी जात-पात मानत नाही..(ते सगळं इकडे.. देशावर आल्यावर) आपण मराठी ही एकच भावना.. आता म्हणाल.. यात लफडं ते काय? चांगलंच आहे न... हो पण तरूणांचं काय? ते शिकतात ती शाळा-महविद्यालये तर मराठी नाहीयेत ना... नि प्रेम कुणी कुणावर करावं हे कुणी नियमात बसतंय की नाही ते पाहून ठरवत नाही ना... मग ती मुलं-मुली तिथल्या तमिळ मुली-मुलांशी लग्न करतात.. मग तो गट अशा घराला बहिष्कृत करतो.. आणि जसे सगळीकडे असतात तसे लोक इथेही असतात.. "आम्हाला माहीत होतं आधीच.. पण उगाच वाईट्पणा नको म्हणून सांगितलं नाही... तुम्हाला नाही का कळालं.. आपला मुलगा/मुलगी काय गुण उधळतायत ते??" असे म्हणणारे..
आता आधीच तमिळ माणूस जवळ येऊ देत नाही म्हणूनही.. अन भाषेमुळेही आधी त्यांच्याशी दुरावा असतो.. त्यात जे कुणी इथले सगे-सोयरे असतात की जे संकटकाळी मदत करू शकतात... त्यांनीही संबंध तोडले की त्या कुटुंबाची अवस्था खूप वाईट होते.. मग आता त्या लोकांनी त्यावर तोडगा शोधून काढलाय.. हे जे वरती शहाणपणा सांगतात ना.. घटना घडून गेल्यावर बोलणारे.. त्यांनाच प्रतिप्रश्न केला.. "माहित होतं ना तुम्हाला??? मग काय मुलं पळून जाण्याची वाट बघत होतात का मला येऊन सांगायला???" बरेच जण यातून गेल्यामुळे प्रत्येक्जण मराठी मुला-मुलींवर नजर ठेऊन असतो.. बाईकवर नवी मुलगी दिसली.. किंवा मुलगी कुणाच्या बाईकवर दिसली, नि हे एकाने जरी पाहिले, तरी बोभाटा होतो... या मुलाच्या वर्गातल्या एका मुलीचा पाय मुरगळला होता.. त्याच्या घरापासून जवळच रहते ती.. त्याने घरी फोन करून दहादा परवनगी घेतली तिला घरी सोडायला... बाबांनी सांगितलं.. "आजचा एकच दिवस सोडायचं.. नंतर तिचा पाय तुटला तरी तिला लिफ्ट द्यायची नाही.." त्याने ऑर्कुट्वर माझा फोटो पाहिला होता.. आईबाबांना दाखवला होता.. त्यामुळे सगळ्यानी आधी ठरवलं होतं के त्याने मला न्यायला यायचं नाही.. घरी गेल्यावर कसं ते माहित नाही त्यांचं मतपरिवर्तन झालं होतं. मात्र त्याला गाडी कमी रहदारीच्या रस्त्यावरून शक्यतो कुणाच्या नजरेस पडणार नाही याची काळजी घेऊन जायला सांगितलं होतं... घरी माहित होतं हो.. तो कुणाला फिरवतोय.. पण ती गोष्ट घरा पर्यंत पोचून बाबांनी स्पष्टीकरण देईपावेतो कुणाकुणापर्यंत बातमी पोचली असती.. नि याचं नाव काळ्या यादीत गेलं असतं..
तिथं मराठी मुलांची-तमिळ मुलीशी मैत्री वा थोडं उलट.. मराठी मुलीची-तमिळ मुलाशी मैत्रीच काय, मुला-मुलांची किंवा मुली-मुलींच्या मैत्रिवर पण आक्षेप आहे.. आयांची सक्त ताकिद असते.. घरात तुमचे मित्र-मैत्रीणी आल्यावर यंडुगंडु करायचं नाही.. बहुतेक जणी पूर्णवेळ गृहमंत्री.. त्यामुळे इंग्रजी/तमिळचा गंध त्याना नाही.. नि तमिळ माणूस हिंदी बोलत नाही..आहे की नाही पंचाईत!!!! मग ही मुलं मित्र-मैत्रीणीना घरी बोलावतच नाहीत... नि वाण नाही पण गुण लागतोय.. या लोकांनी पण यांच्या मराठीसमाजापुरता कोश विणून घेतलाय.. त्यामुळे इतरांशी बोलताना मोजूनमापून बोलतात.. यात मुला-मुलींचे हाल होतात हे मात्र खरं.. [ हूश्श!!! आता सगळ्या शंका फिटल्या...]
आजूबाजूला काय घडतंय.. बर्‍याचदा आपल्याला ठाऊक नसतं ते असं...

असो.. चेन्नईला जायचं.. नि रेशमी साड्याबद्दल बोलायचं नाही... असं कधी झालंय का राव? मी "The vantage point" च्या शनिवारीच माझी खरेदी उरकून घेतली होती... कांजिवरम साड्या जिथे बनतात.. ते कांचीपुरम दोन-तीन तासांच्याच अंतरावर होतं.. तिथले काही सहाध्यायीही होते की ज्यानी आम्हाला खरेदीला मदत करू असं आश्वासन दिलं होतं... फसवणूकीचे प्रकार तिथेही चालतात.. पण तिकडे जाऊ की नाही नक्की नव्ह्तं.... एक चार-पाच जणांचा गट तरी हवा होता.. नि नल्ली तसं विश्वासार्ह.. त्यामुळे मी एक आईला, एक बहिणीला नि मला एक कांजिवरम अशी खरेदी करून टाकली होती.. आपण इकडे पाहतो तो एकच पॅटर्न.. तिकडे खूप वैविध्य होतं... ही खरेदी पाहून त्या संध्याकाळी आराम केलेल्या पुरूष सहकार्‍यानी त्याना खरेदीला मदत करण्याची विनंती केली.. मला काय... आणखी एकदा विन्डो शॉपींग... एकदा जाऊन आल्याने शहाणपणा दाखवण्याची संधी कुणी सोडेल काय??? बस क्रमांक माहीत होते.. थेट बस नाही मिळाली तर कुठून पुढची बस मिळेल.. सगळं माहीत होतं... नल्लीपासून बस स्थानकापर्यंत चालत आल्यानं चेन्नई सिल्क कुठं आहे तेही माहित होतं... आधी तिथं गेलो...

तिथला विक्रेता एक एक साडी काढून पुढ्यात टाकत होता.. नि माझी नजर मात्र समोरच्या साड्या सोडून कपाटात रचलेल्या साड्यांकडे.. शोकेस मधल्या साड्यांकडे...स्त्री स्वभाव हो... विवाहीत लोकांना लगेच पटेल... जशी देखणी बायको दुसर्‍याची.. तशीच देखणी साडी दुसरीकडची :) (अवांतरः तसा मला एक साडी पसंत करायला दहा मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागत नाही.. विक्रेत्याला मला नक्की काय हवंय हे कळत नाहिये हे लक्षात आलं की मी काढता पाय घेते.. उगाच खोळंबा नको.. त्याचाहे नि माझाही.. त्यामुळे मिपावरच वाचलेला साडी प्रसंग माझ्याबाबतीत तरी घडायचा नाही..) पाहिलं तर शोकेसमध्ये ती साडी होती... आतापर्यंत बर्‍याचदा ढकलपत्रातून आलेली..

खाली प्रशस्तिपत्रक आहे.. साडीच्या किंमतीचं 3,931,627 रू. फक्त... गिनिज बुकात नोंद झाल्याचं.. साडीवर राजा रवी वर्म्यानं काढलेले चित्र आहे... तो दागिने बरहुकुम रेखाटण्यासाठी प्रसिद्ध होता... या लोकांनी अस्सल मोती, हिरे, माणकं जडवलीयेत.. जर पण सोन्याची आहे..

हे ते मूळ चित्र...

व्यवस्थापक महोदयाना खूपच अभिमान आहे या साडीचा.. आमचा मोर्चा तिकडे वळताच ते स्वतःहून तिची माहिती द्यायला आले.. आश्चर्य म्हणजे साडी पूर्ण हातमागावर विणलीय... या प्रकारच्या...

मी विचारलं.. असंच काहीतरी वेगळं करायचं म्हणून ही साडी बनवली गेली.. की कुणी गिर्‍हाईक पण मिळालं.. त्यांनी सांगितलं.. की अशी त्यांनी पहिली साडी बनवली.. ती एका बंगळुरूच्या व्यक्तीला आवडली.. त्यांनी लगेच ती खरेदी केली व आणखी एका तशाच साडीची ऑर्डर दिली.. म्हणजे अशा एकूण तीन साड्या आजवर बनवल्या.... आता जी दुकानात दिसतेय.. ती तिसरी अन दोन विकल्या गेल्या..
आता.. ज्यानी खरेदी केली.. एकाच घरात दोन साड्या.. जवळ्जवळ ४० लाख प्रत्येकी.. त्यानी घरच्या शोकेसमध्ये ठेवायला तर नक्कीच घेतल्या नसाव्यात... नि यच्चयावत स्त्री जमातीला.. आपण स्वतः कोणत्या समारंभात काय कपडे-दागिणे घातले होते हे तर सोडाच.. पण जमलेल्या मुख्य पाहुण्यांनी.. नि "प्रेक्षणीय स्थळांनी" काय काय कपडे-दागिणे घातले होते हे झोपेत देखील स्वच्छ लक्षात असतं.. त्यामुळे एकच पोषाख्/साडी दुसर्‍यांदा वापरायची असेल.. तर आधिच्या ठिकाणचे कमीत कमी लोक (म्हण्जे जवळ जवळ शून्य) उपस्थित असतील.. तरच नेसली जाते.. जर सामान्यांची ही कथा... तर अशा वेळेला.. जर या कुटुंबातल्या बाईनं ही चाळीस लाखांची साडी घालायची म्हटलं.. तर एवढी किंमती साडी म्हणून थोडं वावरताना अवघडलेपण तर होच.. पण कौतुकापेक्षा.." काय मेलं ते ४० लाखाच्या साडीचं कौतुक.... पहावं तेव्हा एकच साडी नेसते" असे टोमणे जास्त मिळायचे.. जाऊ द्या.. शेवटी ज्याची त्याची आवड!!!!

बाकी या १५ दिवसांच्या सफरीनं बरंच काही दिलं.. नवीन मित्र मैत्रिणी मिळाल्या.. एक आयुष्यभराचा अनुभव.... टिफ्फ्नी या उपहारगृहात हिंदी गाण्याच्या ओळी कानावर पडताच कोलंबसाला अमेरिका मिळाल्यावर झालेला तसा आनंद.... मिपाला.. चार लेख.. :) अन बरंच काही!!!

या सहलीतली काही छायाचित्रे... महाबलीपुरम (त्यांच्या लेखी-- मामल्लापुरम) ला सहलीला गेलो होतो.. मेन्यूकार्डावर उत्तर भारतीय थाळी दिसली.. अरे व्वा.. खूप दिवसांनी भात-रसम सोडून काही मिळेल या आशेवर मागवली.. पण त्यासाठी एक तास लागेल असं सांगितलं.. नि इतका वेळ सर्वांना थांबवणं तर इष्ट नव्हतंच.. म्हणून सर्वांसोबत पुन्हा एकदा दक्षिणी थाळी... केळीच्या पानावरची...

माझ्या खोलीबाहेरचं आय आय टी तारामणी अतिथीगृहाचं आवार..

आय आय टी मध्ये बिन्धास्त फिरणारे.. नि कुठेही दिसणारे प्राणी..

महाबलीपुरमच्या दीपस्तंभापासून दिसत असलेला समुद्र...

हा महाबलीपुरमचा प्रचंड दगड!!!! हे फोटोत दगडाच्यावरती जे काही पांढरं प्रकरण दिसतंय ना.. ते मी आहे.. फोटो काढून होता-होता माझ्या मागच्या बाई स्नेक म्हणून ओरडल्या.. मला आधी वाटलं गंमत करताहेत.. पण निरखून पाहिलं तर तो पायाजवळच एक जाडजूड साप खालच्या दगडाचा चपखल रंग घेऊन पडला होता... भीतीनं काय करावं हे न सुचून मी फक्त (!) बोंब ठोकली होती... नंतर सापाच्या भीतीने दगड टाळून यायचं म्हटलं तर तेही शक्य नव्ह्तं.. कारण सगळीकडेच दगड... माती खूप कमी होती...

तिथलं प्रसिध्द गजेंद्र सर्कल....

तिथलं घनदाट जंगल..... आय आय टी जंगलात आहे.. की जंगल आय आय टी मध्ये आहे असा प्रश्न पडावा...

या सगळ्यात दोन गोष्टी मात्र राहून गेल्या.. एक म्हणजे.. कांचिपुरम पहाणं.. तिथे म्हणे १०१ की १२१ निरनिराळ्या शिल्पकला असलेली मंदिरं आहेत.. नि दुसरं म्हणजे पाँडिचेरी.. चेरी म्हणजे आपल्याकडे असते तशी वाडी.. वेलीचेरी.. पाँडिचेरी अशा खूपशा वाड्या आहेत.. दोन्ही ठिकाणं काही अधिक दूर नव्हती.. पण सगळ्यांना परतीचे वेध लागले होते.. नि अजून खूप आयुष्य बाकी आहे.. आता नाही तर पुन्हा कधीतरी नक्कीच जाता येईल या विचाराने निघाले.. मुंबईत विमानतळावर रिक्षावाल्याला कुठे जायचे हे सांगितल्यावर त्याने मीटर फिरवले.. तो आवाज खूप कर्णमधुर असतो.. हा शोध मला तेव्हा लागला...

संस्कृतीप्रकटनप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

क्रान्ति's picture

31 May 2009 - 3:15 pm | क्रान्ति

जमलाय हा पण लेख. अगदी मनापासून आवडला. फोटोही खूप खास! [तुझ्या या लेखामुळे गिनीज बुकात नोंद झालेल्या ४० लाखांच्या साडीचा फोटो तरी पहायला मिळाला! ] अजून असंच लिहित रहा.
:)
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा

स्वामि's picture

1 Jun 2009 - 12:31 am | स्वामि

लेखनाची ओघवती शैली नजर खिळवुन ठेवते.

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Jun 2009 - 12:41 am | बिपिन कार्यकर्ते

कलंदरबाई, छान लिहिता हो. ओघवती आहे शैली. एकदा वाचायला सुरूवात केली तर शेवटपर्यंत वाचावेसे वाटते.

काही निरिक्षणांशी पूर्ण सहमत मात्र नाही. काही काही गोष्टी वैश्विक असतात. केवळ एखाद्याच समूहाला लागू नाही पडत.

अवांतर: आता पुढचा लेख कधी? कशावर?

बिपिन कार्यकर्ते

मस्त कलंदर's picture

1 Jun 2009 - 7:52 am | मस्त कलंदर

>>काही काही गोष्टी वैश्विक असतात. केवळ एखाद्याच समूहाला लागू नाही पडत.
मान्य करते.. तिथल्या मराठी/तमिळ लोकांचं राहाणीमान/जीवनपद्धती कशी असतं हे तरी नक्कीच माहित नव्हतं.... शेवटी मी जे ऐकलं ते फक्त शब्द्बबद्द केलं... हे माझं स्वतःचं मत नाही...

बाकी हा मराठी समाज म्हणजे.. पांढरपेशा समाज नव्हे.. तर सोन्या-चांदीची दुकाने चालवणारे की ज्याना गलाईवाले (सोने गाळणारे नि गाळता गाळता मारणारे) म्हणतात, असे लोक आहेत.. हे दागिने बनवत नाहीत.. सबब सोनार नव्हे... मराठा समाजाचं अशा "दुकानला" (त्यासाठी प्रचलित शब्द)असण्याचं प्रस्थ अधिक आहे.... सांगली जिल्हयातल्या बर्‍याचशा लोकांची अशी दक्षिण व उत्तर भारतात दुकाने आहेत.. इतर ठिकाणच्या लोकांचीही असतील तर मला माहीत नाही... इथल्या विटा या तालुक्याच्या गावातले ७०% हून अधिक लोक या व्यवसायात आहेत....
शिकलेल्या नि नोकरी करणार्‍या लोकांचं जीवनमान नक्कीच वेगळं असावं..
पुढचा लेख यापेक्षा खूप वेगळा असेल.. कथा/कविता वगैरे काही माझा प्रांत नाही.. आणखी एक अनुभव.. पण अगदी हटके... :)

अवांतरः ख्वाहिश या चित्रपटात खुर्जुवेकर आडनावाची मल्लिका या विट्याची असल्याचं दाखवलं होतं

अतिअवांतरः चित्रपट तर नाही पाहिला पण केबलवर लागला तेव्हा एक लग्नातलं एक दृष्य पाह्यलं होतं.. जमिनीवर बसून पत्रावळीवर जेवणार्‍या पंगतीचं.. काही प्रमाणात खरं असलं तरी मला मात्र ते ज्या प्रकारे प्रोजेक्ट केलं होतं ते नव्हतं आवडलं..

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

यशोधरा's picture

1 Jun 2009 - 9:05 am | यशोधरा

मस्त! आवडलं.

सहज's picture

1 Jun 2009 - 9:29 am | सहज

बिपिनदांशी सहमत आहे.

अजुन येउ दे.

प्रमोद देव's picture

1 Jun 2009 - 9:44 am | प्रमोद देव

सगळेच भाग मस्त झालेत.

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

योगी९००'s picture

1 Jun 2009 - 11:43 am | योगी९००

मस्त वर्णन..

मी ३ वर्ष चेन्नाईला राहिलो. असेच अनुभव आले. कंपनीत कामानिमित्त कोठल्या मुलीशी बोलायचा संबंध आला की ती मुलगी आणि आजुबाजूचे सर्वजण बावचळून बघायचे. मुळ कारण म्हणजे मी त्यांच्या द्रुष्टीने उत्तर भारतीय...जणू काही कोठल्या तामिळ मुलीला पळवणारच होतो.

एकदा असेच गिंडीहुन लोकलने एगमोरला चाललो होतो. लोकल थोडी भरलेली होती. समोरासमोरच्या खुर्च्यांवर एक जोडपे बसले होते. त्या पुरूषाशेजारी कोणी बसले होते म्हणून मी त्या बाईशेजारी (थोडी जागा सोडून) बसलो. त्यानंतर अरे बापरे..असे काही रामायण घडले ...तो पुरूष आणि बाजूवालेतर चेकाळलेच. काय वाट्टेल ते बोलायला लागले. पहिल्यांदा तर ते काय सांगतात तेच कळत नव्हते. नंतर आमची भाषेची अडचण समजल्यावर एका सभ्य (?) ग्रुहस्थाने मला थोडे दटावूनच सांगितले की बाईच्या शेजारी कशाला बसला. मी साधा सरळ प्रश्न केला की जर त्या पुरूषाला आपल्या बायकोशेजारी कोणी बसलेले खपत नव्हते तर तो तिच्या शेजारी का नाही बसला? हे म्हणजे उघड्याने हिंडायचे आणि मग सर्व बघतात म्हणून बोंबलायचे.

एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की सगळी तामीळ माणसे त्यांच्या चित्रपटात असणारा बिभत्सपणा कसा काय खपवून घेतात?

त्यांच्या स्वभावामुळे मी तामिळ भाषा पुर्ण शिकू शकलो नाही. काही बोलायचा प्रयत्न केला की माझ्या होणार्‍या चुकांवर हसायचे आणि मला अतिउपदेश करायचे की तामिळ कसे शिकावे. आमच्या कंपनीत मिटिंग्ज पण तामिळ मध्ये व्हायच्या. एकदा असेच तामिळ बोलायचा प्रयत्न करत असताना एका वरिष्ठाने मला "Do'nt **** our language."
असे सांगितले. त्यानंतर त्या रागात तामिळ शिकणे बंद केले आणि सरळ कंपनीत तक्रार केली. त्यानंतर मी असलो की मिटिंग्ज इंग्रजीत होऊ लागल्या.

खादाडमाऊ

मस्त कलंदर's picture

1 Jun 2009 - 12:56 pm | मस्त कलंदर

खरंतर मला आधी वाटलं होतं की पंधरवड्याच्या वास्तव्यात असं मत बनवण बरं नाही.. नि कदाचित जास्त दिवस्/महिने तिकडे राहिले असते तर त्या लोकांच्या स्वभावाची दुसरी चांगली बाजूही समजली असती.. पण तीन वर्षांनंतरही जर तुमचा हा अनुभव असेल... तर आता वाटतंय की १५ दिवस पुष्कळ झाले...

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

परिकथेतील राजकुमार's picture

1 Jun 2009 - 11:54 am | परिकथेतील राजकुमार

एकदम कलंदर लेख हो, आणी त्याला फोटोंची मस्त चरचरीत फोडणी ;)
ज ह ब र्‍या च !

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

स्वाती दिनेश's picture

1 Jun 2009 - 12:14 pm | स्वाती दिनेश

हा भागही आवडला, साडीचा फोटो मस्तच..
आय आय टी त बागडणारी हरणे बघून 'नारा'ची आठवण झाली.
स्वाती

छान सफर! चारही भाग फार आवडले..