रव्याचे थालिपिठ...

प्राजु's picture
प्राजु in पाककृती
11 Feb 2008 - 4:55 am

रव्याचे थालिपिठ...

वेळ : ३० मिनिटे
वाढणी : २-३ जण

साहित्य :
१. रवा - १ कप
२. तांदूळ पिठी - २ कप
३. बारिक चिरलेला कांदा - १/२ वाटी
४. कोथिंबिर चिरलेली - मूठभर
५. हिरव्या मिरच्या एकदम बारिक चिरलेल्या - ३-४
६. मीठ, धने-जीरे पावडर.
७. दहि ( आंबट गोड कसलेही) - १ ते १ १/२ वाटी

कृती :
१. प्रथम कांदा, कोथिंबीर, आणि मिरच्या एका बाऊलमध्ये घेऊन त्याला थोडे मीठ हाताने मळल्यासारखे लावून ३-४ मिनिटे ठेवावे.
२. तांदूळपिठी, रवा आणि धने जिरे पावडर एकत्र करून घ्यावे.
३. या मिश्रणात आता मिठ लावून ठेवलेले कांदा-मिरच्या घालावे, पुन्हा चांगले मळावे.
४. आता यात थोडे थोडे दहि घालून मळून घ्यावे. एकदम दही घालू नये. चव पाहून लागत असल्यास आणखी मिठ घालावे.
५. मळून तो गोळा घट्ट झाकणाच्या डब्यात ५-७ मिनिटे ठेवावा.
६. तव्याला तूपाचा हात लावून त्यावर थालिपीठ थापावे आणि झाकून ठेवावे गॅसवर. थालिपिठ तव्यावर लावताना हाताला अधूनमधून पाणी लावून घ्यावे म्हणजे हाताला पिठ चिकटणार नाही आणि थापयला सोपे जाईल.
७. एका बाजूने भाजले गेले की उलटून दुस-या बाजूनेही खमंग भाजून घ्यावे.
८. कैरिचे , लिंबाचे किंवा मिरचीचे लोणचे , शेंगदाण्याची कोरडी चटणी या बरोबर अफलातून लगते.
९. चिवट होत नाही. प्रवासाला सोबत नेण्यासाठी उत्तम.

अधिक माहिती :
भाजणी इथे मिळत नाही.. थालीपिठ करावे वाटले बाकी पिठे मिक्स करूनही करते आणि असेही करते. दूधाची तहान दह्यावर.. :))

- प्राजु

पाकक्रियाआस्वाद

प्रतिक्रिया

धनंजय's picture

11 Feb 2008 - 10:25 am | धनंजय

मी हे थालीपीठ करतो तेव्हा रवा/तांदळाची पिठी/धणे-जिरेपूड मिसळल्यावर तेलावर खमंग भाजून घेतो. त्यामुळे थालीपीठ आणखी हलके होते. बाकी कृती साधारण तुम्ही दिल्यासारखीच.

पीठ मिश्रणात उडदाचे पीठ आणि/किंवा चण्याचे पीठ (भाजून) घातल्यास चव छान येते, आणि थालीपीठ अधिक पौष्टिकही होते. तोही प्रयोग करून तुम्हाला कसा वाटतो ते सांगा (कुठल्याही डाळीचे पीठ, धान्याच्या[=गव्हा-तांदळाच्या पिठाच्या] अर्ध्याच प्रमाणात असावे, त्याहून अधिक प्रमाण घेतल्यास तितके चांगले होत नाही...)

विसोबा खेचर's picture

11 Feb 2008 - 10:58 am | विसोबा खेचर

अमेरिकेचे विमान पकडून लवकरच तुझ्या घरी येतो आहे, थलिपीठ तयार ठेव.. :)

धन्याशेठ, तुला देखील हाच निरोप! :)

आपला,
(हावरट) तात्या.

स्वाती राजेश's picture

11 Feb 2008 - 2:02 pm | स्वाती राजेश

प्राजु मस्त क्रुती आहे.
मुलांना नक्की आवडेल.

मी त्यात गाजर, बटाटा किसून घालून आणि धिरडे करत होते आता अशीही करून पाहीन.

केशवसुमार's picture

11 Feb 2008 - 2:23 pm | केशवसुमार

मी हे थालीपीठ जरा वेगळे करतो..
दह्यामधे १ वाटी रवा, १वाटी ओले खोबर, १इच आले खिसलेले, दोन टेबल चम्चे लोणी, हिरव्या मिरच्या(झेपेल तेव्हड्या), कोथिंबीर, मीठ, जीरे पुड चवीला आणि बेकिंग सोडा एकत्र मिसळून १ तास ठेवतो. मग तव्याला लोणी लावून त्यावर थालीपीठ लावतो, त्याच्या वर झकण ठेवून तवा गॅसवर ठेवतो.. ५-७ मिनिटात एकदम खमंग खूसखुशीत थलीपीठ तयार..
भाजी, पोळी करायचा कंटाळा आला की हमखास हे किंवा भाजणीचे थालीपीठ बनवतो( आठवड्यातून २-३ दा तरी कंटाळा येतोच)
(सुगरण्)केशवसुमार

ऋषिकेश's picture

13 Feb 2008 - 6:00 am | ऋषिकेश

मी हि असेच थालीपिठ करतो. :) फक्त घरच्या लोण्याऐवजी बाजारातील बटर वापरावे लागते :(

-ऋषिकेश

वरदा's picture

11 Feb 2008 - 5:35 pm | वरदा

मी अशीच रव्याची धिरडी करते..पण रवा ३-४ तास भिजवून ठेवते दह्यात्...मग लसूण मिरची मीठ घालून टाकते धिरडं..पटकन होतं. हे थालीपीठ मस्त वाट्टंय करुन पाहेन...

पुष्कर's picture

11 Feb 2008 - 7:47 pm | पुष्कर

हा पदार्थ मी एकदाच खाल्ला आहे. (आम्हाला कृती जमत नाही. दाद द्यायला जमते. पण दाद देणारा कोणी नसला, सगळेच 'कृती' करायला लागले, तर करायचं कोणासाठी? त्यामुळे आमचंही महत्त्व आहेच...). खूप छान लागतं हे थालिपीठ.

ह्यावरून मला वर्तमानपत्र/साप्ताहिकांमध्ये येणारी 'हे करून पहा, ते करून पहा' सारखी सदरं आठवली. काय वाट्टेल ते करतात लोक! काय तर म्हणे पेरूचा उपमा! मुळ्याचे अनारसे! चिक्कूची चटणी! कलिंगडाचे सांडगे! अरे किती अत्याचार कराल त्या बिचार्‍या मुळा-फळांवर!!! नुसती फळं काय वाईट होती?

ते असो. तुझा हा पदार्थ चांगला आहे. कधितरी करून बघीन म्हणतो.

-पुष्कर

प्राजु's picture

11 Feb 2008 - 8:17 pm | प्राजु

धनंजय,
आपण सांगितल्याप्रमाणे नक्की करून बघेन.

तात्या,
निघा लगेच... पुढची फ्लाईट केव्हा आहे ते बघा आणि निघा. विनंती : स्वखर्चाने यावे :))

स्वाती,
मी रवा डोसा करत होते ताकात रवा भिजवून. पण ही थालिपिठे घरात सगळ्यांना आवडतात. मुलासाठी करताना मिरची नाही घालत मी.

केशव, माझ्याकडेही असेच होते. पोळ्या लाटायचा कंटाळा आला कि थालिपिठ होते.

वरदा, धिरडे म्हणजे रवा डोसाच ना...

पुष्कर , नक्की करून बघा. आवडेल तुम्हाला. धनंजय यांनी सांगितलेले प्रयोगही मस्त होतील.

- आपली सर्वांची आभारी,
प्राजु

वरदा's picture

13 Feb 2008 - 4:57 am | वरदा

डोसा करताना जनरली आपण लसूण मिरची नाही घालत त्यामुळे धिरडं थोडं वेगळं आणि चमचमीत लागतं...

सर्किट's picture

13 Feb 2008 - 8:46 am | सर्किट (not verified)

इथले सगळे इन्ग्रेडियण्ट्स सोडून (म्हणजे रवा वगैरे) आंट जेमिमाज प्यानकेक मिक्स घ्यावे, बारीक काळ्या मिरच्य टाकाव्या, वरून तिखट, आणि मीठ.. बस..

- सर्किट

वरदा's picture

14 Feb 2008 - 1:01 am | वरदा

प्यानकेक मिक्स मधे कांदा मिरची घालून असं थालीपीठ करायचं?

सुधीर कांदळकर's picture

15 Feb 2008 - 7:59 pm | सुधीर कांदळकर

आता तोंडाला पाणी सुटले. आमची सौ. तांदळाच्या रव्याचे थालीपीठ बनवते. ही कारवारची स्पेशालिटी. तसेच मक्याच्या पिठाचे, ज्वारीच्या पिठाचे, बाजरीच्या पिठाचे देखील. कांदा, कोथिंबीर, मिरची, मसाल्याचे प्रमाण थोड्याफार फरकाने तसेच.

उपासासाठी साबुदाण्याचे. माझ्यासाठी कांदा लसूण घालून व उपासवाल्यांसाठी वजा करून.