मी , १५ आणि १६ ऑगस्ट, २००६ ह्या दिवशी 'कोथळीचा भैरवगड आणि हरिश्चंद्र्गड" हा सलग ट्रेक केला, त्यावेळी मला भावलेला निसर्ग शब्दबध्द करावासा वाटला.
* * * *
अनंत हिरव्या रंगछटांनी
सजला डोंगरमाथा
बेलागकड्यांच्या मधून फिरती
दुर्गम पाऊलवाटा
डोंगरझाडीमधुनी खुलते
रंग फुलोरी नक्षी
हिरव्या पानांआडूनी दिसतो
लाल-सावळा पक्षी
कडे कपारीवरुनी उतरे
वेगाने जलभार
कोसळूनी ओढ्यात उधळतो
फेनल, शुभ्र तुषार
खळाळ जल ओढ्यात पसरते
घेऊन तांबूस माती
भिजवीत काठावरची सारी
हिरवी लव्हाळ पाती
धुंद, गार वार्यावर डुलते
गवतफुलांची काया
हळूच उतरे गिरी माथ्यावर
मेघ सावळी छाया
प्रतिक्रिया
6 May 2009 - 8:23 pm | अवलिया
वा ! मस्त !!
एखाद दुसरा फोटो पण दिला असता तर अजुनच छान वाटले असते !!
असेल तर टाका एखादा ! :)
--अवलिया
6 May 2009 - 8:59 pm | प्राजु
अतिशय गोड शब्द आणि एकदम.. तरल कविता. खूपच सुंदर
बालकवींची आठवण झाली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
6 May 2009 - 9:30 pm | जृंभणश्वान
छान आहे कविता
6 May 2009 - 9:35 pm | चतुरंग
बालकवींची आठवण करुन देणारी चित्रदर्शी निसर्गकविता! :)
(एखाद्या हिरव्याकंच वनराईच्या प्रकाशचित्राने अजून बहार येईल)
चतुरंग
6 May 2009 - 9:50 pm | स्वाती दिनेश
चित्रदर्शी निसर्गकविता!
(एखाद्या हिरव्याकंच वनराईच्या प्रकाशचित्राने अजून बहार येईल)
चतुरंगांशी सहमत,
स्वाती
6 May 2009 - 10:36 pm | क्रान्ति
अप्रतिम निसर्गवर्णन ! कविता खूप आवडली.
क्रान्ति
{तापलो रामराया!}
अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो!
www.mauntujhe.blogspot.com
9 May 2009 - 8:53 am | मनीषा
कविता !!!
धुंद, गार वार्यावर डुलते
गवतफुलांची काया
हळूच उतरे गिरी माथ्यावर
मेघ सावळी छाया ... ...
देखणे निसर्ग चित्र ..
9 May 2009 - 9:46 am | कपिल काळे
सुंदर!!
हिरवे हिरवे गार गालिचे ची आठवण करुन देणारी कविता,
9 May 2009 - 10:23 am | चन्द्रशेखर गोखले
हि कविता वाचतांना मला बालकविंची आठवण झाली !!
9 May 2009 - 10:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
औदुंबराची आठवण झाली !
सुंदर कविता...!
-दिलीप बिरुटे
12 May 2009 - 4:33 am | धनंजय
कविता आवडली.