फोन मेसेज

धनंजय's picture
धनंजय in जे न देखे रवी...
16 Apr 2009 - 3:23 am

फोन मेसेज
!*****!
अरे हलो -
फोन नाहीस उचलत...
म्हणजे कामात आहेस.
अजून?

उशीर झाला तरी
जेवण गरम कर.
नाहीतर खाशील तसंच
नेहमीसारखा -
खुडबुडीने माझी
झोप मोडेल म्हणून...
!*****!

प्रेमकाव्यकविता

प्रतिक्रिया

प्राजु's picture

16 Apr 2009 - 6:49 am | प्राजु

पण अगदीच राहवलं नाही म्हणून विचारते....यामध्ये कविता कुठे आहे..?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मितालि's picture

16 Apr 2009 - 6:57 am | मितालि

मला पण हाच प्रश्न पडलाय ...यामध्ये कविता कुठे आहे..?
कदाचित मॉडर्न आर्ट सारख काहिसं असेल...

आनंदयात्री's picture

16 Apr 2009 - 7:08 am | आनंदयात्री

प्राजुताई,

ही फाउंड पोएट्री आहे. मराठी नामकरण बराच विचार करुनही करु शकलो नाही
याआधी धनंजयांनी फाउंड पोएट्रीशी थोडीफार ओळख इथे एका प्रसिद्ध फाउंड कवितेच्या भाषांतराद्वारे करवुन दिली आहे. त्याच धाग्यावरील विसुनानांचा हा प्रतिसाद उपयुक्त माहीती देतो.

>>यामध्ये कविता कुठे आहे..?

अम्म .. !! यात छंदाचे, मीटरचे इत्यादी इत्यादी परंपरागत कवितेचे गुणधर्म नाहीत तरीही अल्पाक्षरत्व हा मोठाच आणी कौतुकास्पद असा गुण आहे.
कवितेत अपेक्षित असणार्‍या भावनांबाबत म्हणायचे तर, अल्पाक्षरी असुनही, प्रेमी युगलाच्या सहजीवनातल्या आपल्या प्रिय माणसाला वाटणार्‍या आपल्याच काळजीच्या काउंटर काळजीचे अत्यंत उत्तम आणी मनाला लगेच भावणारे प्रदर्शन इथे झाले आहे असे वाटते.

प्राजु's picture

16 Apr 2009 - 7:11 am | प्राजु

कारण अल्पाक्षरीतल्या शिरवाडकरांच्या अनेक कविता वाचल्या आहेत.
पण तू म्ह्णतोस तसं असेल.. ही फाऊंड पोएट्री मलाही शिकावी लागेल.
ही... अल्पाक्षरी असू शकेल काय?? :?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

आनंदयात्री's picture

16 Apr 2009 - 7:13 am | आनंदयात्री

शुभस्य शीघ्रम !!
येउन जाउदे एखादी फर्मास फाउंड कविता :)

आनंदयात्री's picture

16 Apr 2009 - 6:52 am | आनंदयात्री

:)
सह्ही .. मस्त आहे कविता !!

मुक्तसुनीत's picture

16 Apr 2009 - 7:23 am | मुक्तसुनीत

कविता आवडली.

जर का आपण हायकूचा आस्वाद घेत असू तर या अशा कवितांचाही घ्यायला हरकत नाही. आपल्या आयुष्यातल्या अनेकानेक फ्रॅगमेंट्सपैकी काही ओझरत्या क्षणांमधले सौंदर्य म्हणा , पण काहीतरी अर्थपूर्ण असे टिपण्याचा प्रयत्न - जो केवळ काव्यातच होऊ शकतो.

प्रस्तुत कवितेत कोण कुणासाठी मेसेज ठेवतो/ठेवते ? काही संदर्भ नाहीत. "कुणास्त्व कुणीतरी येरझार्‍या घाली" अशा अर्थाची रेव्हरंड टिळकांची कविता आहे. त्या जातीचा अनुभव.

टिळकांच्या ओळी :

सरोष घन वर्षती, तरुलतांशि वारा झुंजे
विराम नच ठाउका क्षणहि नाचताना विजे;
भयानकचि संचरे, सकल सृष्टि हो घाबरी
कुणास्तव कुणीतरी सभय वाट पाहे घरी !

रवप्रतिरवामुळे बधिर जीव सारे जरी,
निनाद करिते अहा ! श्रवण चाहुलीचा तरी;
उठे दचकुनी तडित दुसरि नर्तनाला करी,
कुणास्तव कुणीतरी कितिक येरझारा करी !

टिळकांची कविता खूप मोठी आहे. आणि अर्थातच खूप जुनी. पण वरील ओळींमधले भाव "फोन मेसेज" च्या भावाशी मिळतेजुळते :-)

विनायक प्रभू's picture

16 Apr 2009 - 7:30 am | विनायक प्रभू

कविता.
नाहीतर आमच्या कडे?
उशिरा आलात तर टेबलवर ठेवले ते गुपचुप गिळा.
उगाच खुड्बुड करुन झोपमोड करु नका.
असा मेसेज असतो की हो.
विंडंबन करावे काय?

मुक्तसुनीत's picture

16 Apr 2009 - 7:32 am | मुक्तसुनीत

बालगंधर्वाना म्हणे , प्रचंड लोकप्रियतेच्या शिखरावर असतानासुद्धा , नाटक उशीरा संपल्यावर असे करावे लागायचे. खरे खोटे देव जाणे.

बाकरवडी's picture

16 Apr 2009 - 7:31 am | बाकरवडी

चष्मा लावावा ज्ञानाचा, चष्मा लावावा दुरदृष्टीचा, योग्य अयोग्य ओळखण्याचा, माणसे पारखण्याचा, जवळच्या माणसांच्या मनातले भाव जाणण्याचा तर कधी आपल्या डोळ्यातले दु:ख लपवण्याचा.

असा चष्मा आपल्याकडे नसल्याने वरील प्रतिसाद वाचायास मिळतील..........

मस्त कविता. काळजला भिडणारी.........

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Apr 2009 - 7:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दोन प्रियजनांची एकमेकांविषयीची आंतरिक प्रेम व्यक्त करणारी छोटीशी सुंदर कविता !
अशा कवितांचे एक वैशिष्टे असे असावे की, सोप्या वाटणार्‍या शब्दातून एक सुंदर-खोलवर आशय व्यक्त व्हावा !

कवी दासू वैद्यांच्या भाषेत म्हणायचे तर-

''कुठेच काही जळत नाहीये
मग हा जळक्या मांसासारखा
वास कसा ? ""

-दिलीप बिरुटे

धनंजय's picture

16 Apr 2009 - 9:18 pm | धनंजय

आनंदयात्रींनी सुचवणी केली की "फाउंड प्रेमकविता येऊ दे", त्यांचे विशेष आभार.

रेव्हरंड टिळक, दासू वैद्यांच्या ओळींचा संदर्भ छानच.

राहिला प्रश्न - या लेखनाचा प्रकार काय आहे? बहुधा गद्य नाही. ओळी नेमक्या त्या-त्या ठिकाणी तोडण्यात काही वैशिष्ट्य वाचकाला जाणवते का? शब्दाचे शब्दकोशातील अर्थ असतात - त्यांच्यापेक्षा अधिक काही भाव, अनुभव लेखनाच्या आकारातून (किंवा ध्वनीतून) पोचवायचा प्रयत्न येथे दिसतो का?

तसा काही भाव पोचावा, म्हणून लेखन "कविता/प्रेमकाव्य" वर्गीकरणाखाली लिहिले आहे. परंतु त्याला "कविता" म्हटलेच पाहिजे याबाबत दुमत असू शकते.

लिखाळ's picture

16 Apr 2009 - 9:42 pm | लिखाळ

फाउंड काव्याबद्दल चाललेला हा प्रकार रोचक आहे.

राहिला प्रश्न - या लेखनाचा प्रकार काय आहे? बहुधा गद्य नाही. ओळी नेमक्या त्या-त्या ठिकाणी तोडण्यात काही वैशिष्ट्य वाचकाला जाणवते का? शब्दाचे शब्दकोशातील अर्थ असतात - त्यांच्यापेक्षा अधिक काही भाव, अनुभव लेखनाच्या आकारातून (किंवा ध्वनीतून) पोचवायचा प्रयत्न येथे दिसतो का?

तसा काही भाव पोचावा, म्हणून लेखन "कविता/प्रेमकाव्य" वर्गीकरणाखाली लिहिले आहे. परंतु त्याला "कविता" म्हटलेच पाहिजे याबाबत दुमत असू शकते.

वरील रचनेत, (याला कविता का म्हणायचे? आणि का नाही? या वादात पडण्यापेक्षा रचना म्हणणे सोपे ;) ) कमी शब्दांत काही निरोप दिला आहे. (त्यामुळे तो स्त्रीने पुरुषाला दिला नसावा :) किंवा स्त्री फारच मितभाषी असल्याने वरील रचना अनन्य साधारण होते :) ह्.घ्या.) मागल्या कवितेतली चर्चा वाचल्यामुळे रचना दिसते कशी, काय भाव व्यक्त होतो याकडे लक्ष गेले आणि खरे सांगायचे तर कवितेतल्या प्रसंगापेक्षा रचना डोळ्याला ज्याप्रकारे दिसली त्या प्रकारानेच थोडे बहुत बरे वाटले. (माझे मत चर्चेसाठी म्हणून मांडत आहे. चर्चा थांबवण्यासाठी नाही.)

पुढे लिहिलेले, अल्पाक्षरी रचनेचे उदाहरण होऊ शकेल का?

माझे तुझ्यावर प्रेम आहे.
या अल्पाक्षरी रचनेत मला प्रेम, तारुण्याचा बहर, मनाचा हिय्या असे अनेक पैलू दिसतात.
माझे
तुझ्यावर
प्रेम
आहे.

इतकाच बदल केवळ डोळ्यांना आकर्षक असल्याने बरा वाटतो.

माझे वरील काव्य प्रकाराबाबत काहीच अनुकुल-प्रतिकुल मत अजून बनले नाहिये. अश्या अजून रचना वाचायला, विचार करायला मिळाल्या तर काही मत बनेल असे वाटते.

नव्या प्रकाराची ओळख करुन दिल्याबद्दल धनंजयांचे आभार.
-- लिखाळ.

भावना रचनाकाराकडून ग्रहण करणार्‍याकडे पोचणे हे महत्त्वाचे. मग त्यासाठी विधिनिषेध नाही.

माझे तुझ्यावर प्रेम आहे.
ऐवजी
माझे
तुझ्यावर
प्रेम
आहे.
अशा आकृतीमुळे मनात प्रेम, तारुण्याचा बहर, मनाचा हिय्या असे अनेक पैलू दिसतात, असे तुमच्यासारख्या उत्कृष्ट रसिकाने सांगितले, तर त्या भावना या रचनेच्या आकारातून ग्रहण करायचा मी जरूर प्रयत्न करेन.

पण मला ग्रहण करता येणे हा निकष नाही. अशा आकारात ते चिरंतन प्रेमवाक्य लिहिल्यामुळे अगदी एकासुद्धा रसिकाच्या मनात पूर्वीपेक्षा वेगळी सुंदर अनुभूती झाली, तर तुमच्याकडून ते वाक्य तशा आकारात लिहिण्याचे सार्थक झाले. (आणि ही एक व्यक्ती तुमची खास प्रियव्यक्ती असली तर... आणखी कोणाचेही मत त्या व्यक्तीच्या तोडीचे नाही!)

लिखाळ's picture

17 Apr 2009 - 4:17 pm | लिखाळ

धनंजय,
आपण केलेली कविता आणि त्यातील नेमकेपणा वेगळा आहे. दृष्यरुपात ती कशी दिसते याबद्द्ल आपण केलेला विचार या एकाच पैलूकडे पाहून मी वरील उदाहरण योजले खरे पण ते तुटपुंजे आहे असे आता लक्षात येते आहे. ते उदाहरण योग्य नाही असे वाटते.

फाउंड कविता या मला नव्या असलेल्या प्रकाराबद्दल या ठिकाणी झालेली चर्चा फार छान आहे.
-- लिखाळ.

विसोबा खेचर's picture

16 Apr 2009 - 10:02 pm | विसोबा खेचर

ए धन्या, ही कविता काही कळली नाय बुवा! असो, तरीही तुझ्या प्रतिभेवर माझा विश्वास आहे! :)

(फ्यॅन) तात्या.

दशानन's picture

16 Apr 2009 - 10:41 pm | दशानन
संदीप चित्रे's picture

16 Apr 2009 - 10:34 pm | संदीप चित्रे

आवडला ...
विशेषत: 'नेहमीसारखा -- खुडबुडीने माझी झोप मोडेल म्हणून' या ओळी

ऋषिकेश's picture

16 Apr 2009 - 11:25 pm | ऋषिकेश

रचना प्रचंड आवडली.. उगाच ३-४दा वाचली.. खरंतर पुन्हा पुन्हा वाचाविशी वाटली..
साधा भाव अगदी अलगद टिपला आहे..

या प्रकारच्या अधिक रचना वाचायला आवडतील

जाता जाता: शिर्षकामधे "मेसेज" शब्द खटकला.. 'निरोप' का टाळला? काहि विषेश कारण?

ऋषिकेश

धनंजय's picture

16 Apr 2009 - 11:39 pm | धनंजय

आस्वादाबद्दल धन्यवाद!

हा शब्द मी वापरायचा विचार केला. पण मला "फोन्निरोप" हा ध्वनी आवडला नाही. आणखी हे की फोनवरील मेसेजसाठी मी निरोप शब्द सहज वापरत नाही. त्यातल्या त्यात सहज वापरातले शब्द घेतले आहेत.

कवितेच्या पहिल्या खर्ड्यात अधिक इंग्रजी शब्द होते. पण त्यांच्या बदली आता दिसणार्‍या मराठी शब्दांत, माझ्या तोंडात "फाउंड" म्हणून सापडतील असे शब्दच घेतले आहेत. "मेसेज"ऐवजी कोणाच्या घरी "निरोप" असे म्हणतही असतील. तशा व्यक्तीकडून साहजिकच "निरोप" असे लिहिले जाईल. तशा रचनाकाराकडून तो शब्दच योग्य असेल.

(बिगर-ललित लेखांमध्ये मी शक्यतोवर धोरण म्हणून मराठी शब्द वापरतो. ललित लेखनामध्येही प्रयत्न करतो, पण हे मराठी-रुळावा-धोरण लालित्य-विषयक निवडीच्या मानाने गौण असते.)

नंदन's picture

16 Apr 2009 - 11:58 pm | नंदन

एखादा विचार कमी शब्दांत, पण प्रभावीपणे मांडणार्‍या लेखाला/प्रकटनाला आपण जसे स्फुट म्हणतो, त्याप्रमाणे या फाऊंड पोएट्रीला 'स्फुटिका' म्हणावेसे वाटले. :)

रचना आवडली, अशा स्वरूपाच्या अधिक कविता वाचायला आवडतील.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

बेसनलाडू's picture

17 Apr 2009 - 12:35 am | बेसनलाडू

स्फुटिका हा शब्द आवडला. मला स्वतःला कविता म्हणून हा प्रकार सध्या तरी विशेष रुचत/रुचलेला नाही. वृत्त/छंदबद्धेतर काव्यप्रकारांत मला यापेक्षा छंदमुक्त कविता अधिक भावते/भावल्या. हायकू, त्रिवेणी यापेक्षा अधिक भावतात/भावले.
पण धनंजयांची प्रतिभा आणि प्रयोगशीलताच इतकी प्रशंसनीय आहे, की या प्रयत्नातूनही कौतुकास पात्र ठरते.
मला स्वतःला अशा प्रकारच्या रचनांमधून सरळसोट, रोखठोक अर्थापेक्षा गूढार्थ नि संवाद साधण्यासाठी रूपकांचा वापर झाला तर जास्त आवडेल.
(समीक्षक)बेसनलाडू

चतुरंग's picture

17 Apr 2009 - 1:19 am | चतुरंग

अतिशय थोडक्या शब्दात अर्थपूर्ण रचना हे वैशिष्ठ्य जाणवते.
आपल्या माणसाबद्दल वाटणारी काळजी कोणताही काळजी दर्शवणारा शब्द न वापरतासुद्धा व्यक्त होणे हीच ह्यातली खरी गंमत आहे!
मस्त, धनंजय तुझ्या अशा प्रयोगांनी मजा येते आहे. अजून येऊदेत.

चतुरंग

शितल's picture

17 Apr 2009 - 1:25 am | शितल

कवितेतील भावार्थ एकदम सह्ही आहे. :)

चित्रा's picture

17 Apr 2009 - 4:33 am | चित्रा

मलाही कविता म्हणायची का नाही, ते कळले नव्हते, पण अर्थात कमी शब्दांत एवढे सगळे व्यक्त करता येणे कठीणच. एकच प्रसंग नाही, तर नाते कसे असेल याचीही कल्पना करता येऊ शकते.

(तरी, धनंजय या व्यक्तीने ही कविता न लिहीता अन्य कोणी लिहीली असती तर मी ती इतक्या गंभीरपणे वाचली असती का, असा मनापासून प्रश्न पडला - पण 'परिचया' मुळे रसग्रहणाचे स्वरूप बदलते. असे होऊ नये, खरे तर. पण, कविता आवडली. ).

भडकमकर मास्तर's picture

17 Apr 2009 - 7:52 am | भडकमकर मास्तर

तरी, धनंजय या व्यक्तीने ही कविता न लिहीता अन्य कोणी लिहीली असती तर मी ती इतक्या गंभीरपणे वाचली असती का, असा मनापासून प्रश्न पडला - पण 'परिचया' मुळे रसग्रहणाचे स्वरूप बदलते. असे होऊ नये, खरे तर. पण, कविता आवडली. ).
शब्दाशब्दाला सहमत...
असाच प्रतिसाद लिहिणार होतो.
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मुक्तसुनीत's picture

17 Apr 2009 - 7:56 am | मुक्तसुनीत

मला धनंजय यांच्या कित्येक कविता आवडलेल्या नाहीत. आणि मी तसे स्पष्ट म्हण्टलेले आहे. ही कविता आवडली. ती का आवडली ते लिहिले आहे.

मला कुणाशी व्यर्थ भांडायचे म्हणून असे लिहिलेले नाही ; तर हे सांगायला लिहिले आहे की अगदी धनंजय झाला तरी त्याचे सगळेच आवडेल असे नाही...

धनंजय's picture

17 Apr 2009 - 10:48 am | धनंजय

ओळखीमुळे संधी कधीकधी मिळते, असाच आपला सामान्य अनुभव आहे.

शेजारच्या ताईंनी "फोडणीची काकडी" केली तर आपण चव घेऊन बघायला तयार असतो. हॉटेलात ती वस्तू आपणहून चाखणार नाही.

या ठिकाणी ओळखीमुळे माझ्या या पाकृला चान्स मिळतो आहे :-)

चित्रा's picture

17 Apr 2009 - 3:11 pm | चित्रा

या ठिकाणी ओळखीमुळे माझ्या या पाकृला चान्स मिळतो आहे.

हेच म्हणायचे होते!

ही मलाच जाणवलेली माझीच मर्यादा आहे, कवीची नाही.

विसोबा खेचर's picture

18 Apr 2009 - 12:06 am | विसोबा खेचर

शेजारच्या ताईंनी "फोडणीची काकडी" केली तर आपण चव घेऊन बघायला तयार असतो.

ऑ? तुला रे धन्या बर्‍या भेटतात फोडणीची काकडी खाऊ घालणार्‍या शेजारणी! ;)

तात्या.

रामदास's picture

18 Apr 2009 - 7:01 am | रामदास

शेजारणीची काकडी खाऊ.

उमेश कोठीकर's picture

17 Apr 2009 - 6:20 pm | उमेश कोठीकर

काही वर्षांपूर्वी वाचलेल्या कविता दशकाची या कवितासंग्रहात अशा प्रकारचे प्रयोग असलेल्या काही कवींच्या कविता होत्या.त्यात एक कवी कोण ते नाव नक्क्की आठवत नाही पण जोशी बहुतेक यांची अशीच प्रयोगशील कविता होती
तुझं

माझं

काही

नाही
अशा प्रकारे खूप लांब अंतरावर शब्द लिहुन वेगळा परिणाम साधता येतो असे त्यांचे मत होते.तसेच एक कविता चक्क दोन शब्द एकमेकांत घुसवून केलेली होती. अर्थात हे प्रकार डोक्यावरून गेले होते. आता हे फाऊंड पोएट्री काय आहे हे अजून काही अशी उदाहरणे आल्यशिवाय कळणे आणि आवडणे तर शक्य नाही.

रामदास's picture

17 Apr 2009 - 6:54 pm | रामदास

हा कवितेचा प्रकार मला नविन आहे तरी पण अशा छोट्या कविता लिहून त्यात पुरेसे डायनामाईट गच्च भरणारे कवि धन्य होत.

रामदास's picture

17 Apr 2009 - 6:59 pm | रामदास

पण एक प्रयत्न करून पाहतो.

****
बोलावून
येत नाहीत.
आलेले
जात नाहीत.
भिंतीची उंची
वाढवा कशाला
कब्रस्तानाच्या.
*****

चतुरंग's picture

17 Apr 2009 - 7:13 pm | चतुरंग

रामदास, अगदी चपखल!

आमचाही एक प्रयत्न लगेहाथ, ऑफकोर्स विडंबनातून, आपला धर्म आहे तो ;)

बोलावून
येत नाहीत.
आलेले
जायला बघतात.
भिंतीची उंची
वाढवा लगोलग
कारागृहाच्या.

चतुरंग

धनंजय's picture

17 Apr 2009 - 7:41 pm | धनंजय

पण रामदास, अशी इथे प्रतिसादात लपवू नका :-)

एक गंमत म्हणून मल्लिनाथी -
ही "फाउंड" (उगीच कुठे सापडली) अशी वाटायला त्यातला गच्च भरलेला अर्थ लपवला पाहिजे. वरवर वाचनात "हे तर नेहमीचेच आपले" असा भास व्हायला पाहिजे. (अल्पाक्षरापेक्षा हे महत्त्वाचे.) हीच बाब खालील पाडगांवकरांच्या उदाहरणाबद्दल.

तुमचे वरील उदाहरण "फाउंड" वाटले नाही, तरी त्यातला रामदास टच उच्च!

रामदास's picture

17 Apr 2009 - 7:17 pm | रामदास

प्रयत्न केल्यावर ही कविता आठवली.

मनात नाही
माझ्या काही
फक्त
वाजते आहे
पाउल.
नितळ ओल्या थेंबाचे.
पाडगावकरांची ही कविता स्मरणशक्तीच्या आधारे लिहीली आहे.चूभूद्याघ्या.

सुवर्णमयी's picture

17 Apr 2009 - 11:37 pm | सुवर्णमयी

धनंजय, रचना अतिशय आवडली. क्या बात है! मोजक्या ओळीत काय सांगायचे ते आहे ते नेमके आणि रोखठोक!
सोनाली

नाना बेरके's picture

19 Apr 2009 - 11:19 am | नाना बेरके

छोट्या कवितेला, मेंदूचा किस पाडून, लायनी भरभरून मिळालेल्या मोठ्या प्रतिसादांबद्द्ल आश्चर्य वाटले.

फक्त मनात प्रश्न निर्माण झाला कि,

हिच कविता शरदिनी ह्यांनी केली असती तर, . . . . .?

कदाचित, ह्याच्यापेक्षा जास्त प्रतिसाद आणि विडंबने पाडली गेली असती.

मिसळभोक्ता's picture

19 Apr 2009 - 2:05 pm | मिसळभोक्ता

अरे हलो,
फोन उचलत नाहीस
म्हणजे तिच्याकडेच आहेस अजून.
नाहीतर येशील,
अजूनही अतृप्त,
आणि स्पर्श,
इकडे तिकडे.
आधीच सांगून ठेवते
आज तारीख १९,
अजून चार दिवस
जमायचे नाय.

-- मिसळभोक्ता