बस इतकंच सांगायचंय
.
फ्रीजमधे होते
ते दही
मी खाऊन टाकले -
संपवले
.
बहुधा तू ते
होतेस जपले
विरजणासाठी
उद्याच्या
.
मला माफ कर, ते
मस्त होते
किती मलईदार अन्
किती गार
.
---
हे पुढील कवितेचे रूपांतर आहे :
---
This Is Just To Say
.
I have eaten
the plums
that were in
the icebox
.
and which
you were probably
saving
for breakfast
.
Forgive me
they were delicious
so sweet
and so cold
.
William Carlos Williams (1883-1963)
प्रतिक्रिया
13 Apr 2009 - 7:14 am | आनंदयात्री
धन्यवाद धनंजय.
कवीचे नाव खाली दिल्याने संदर्भ लागणे सोपे झाले. विकीवर वाचल्यावर रोचक माहिती कळाली.
एका नविन साहित्यविश्वात असा चंचुप्रवेश करवुन दिल्याबद्दल अनेक धन्यवाद.
:)
बस इतकंच सांगायचंय
बगझिलात होत्या
त्या बग्ज
मी मार्क केल्या -
रिझॉल्वड
.
बहुधा तू त्या
होत्यास जपल्या
बिलिंगसाठी
उद्याच्या
.
मला माफ कर, त्या
पुरेश्या होत्या
टाईमशीट साठी
९ तास
(फाउंड विडंबक)
केशवटुकार
14 Apr 2009 - 10:25 am | llपुण्याचे पेशवेll
शेअर्ड सर्वरवरची
QC ची लायसन्सेस
मी केली सर्व
इनस्टॉल
.................
बहुधा तू ती
जपली होतीस
प्रोजेक्टसाठी
तुझ्या
.................
माफ कर मला, ती
पुरेशी होती
प्रोजेक्टसाठी
माझ्या
..................
(लेखनसुमार)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
14 Apr 2009 - 11:18 am | आनंदयात्री
हा हा .. सह्ही !!
या कवितांना काय म्हणावे बरे .. फाउंट टेक पोएट्री !!
:)
13 Apr 2009 - 7:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली कविता !
(आनंदयात्रीच्याही भावना पोहचल्या) :)
-दिलीप बिरुटे
13 Apr 2009 - 7:34 am | अवलिया
हेच बोल्तो :)
--अवलिया
13 Apr 2009 - 7:27 am | निखिल देशपांडे
कविता मस्त आहे.... मुळ कविता दिल्या मुळे अजुन चांगल्या प्रकारे संदर्भ लागला!!!!
(केशवटुकारांचे विडंबन सुद्धा मस्त)
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
13 Apr 2009 - 12:26 pm | विसुनाना
या संदर्भामुळे 'अमेरिकन नवतावाद' आणि 'प्रतिमावाद' हा विल्यम कार्लोस विल्यम्सच्या कवितांचा वैचारिक गाभा होता हे समजले. अन्यथा या विषयावर काहीच माहिती नव्हती.
वरील कवितेची वाङ्मयीन वैशिष्ट्ये आणि लिखित गेयता/वाचनीयता आपल्या रुपांतरात उतरली आहेच. शिवाय प्लम्सचे रुपांतर दह्यात केल्याने रूपांतराला अस्सल मराठीची डूब मिळाली आहे. सद्य महाराष्ट्रीय नवरा आणि बायको दोघेही नोकरीत असतात. तेव्हा ही कविता अगदी पुण्यातल्या एखाद्या घरात फ्रीजवर डकवलेल्या पिवळ्या चिकटकागदावर खरडलेली सहजपणे दिसू शकेल.
ही मूळ कविता फार प्रसिद्ध आहे हे निश्चितच. परंतु अजूनही याप्रकारच्या कवितेस मराठी अभिजात वाङ्मयात मानाचे स्थान मिळालेले आहे असे वाटत नाही.अजूनही मराठी मानस रोमँटिक, यमकबद्ध, वृत्तबद्ध, शब्द/अर्थालंकारांच्या कवितांनाच पसंती देते असे दिसते.
मराठीत अशाप्रकारचे नवे काव्यलेखन जाणीवपूर्वक करणारे काही कवी होते आणि आहेत - उदा. दिलीप चित्रे, अरूण कोलटकर आणि आजच्या काळात हेमंत दिवटे, वर्जेश सोलंकी , सचिन केतकर, मंगेश नारायण काळे, संजीव खांडेकर, मन्या जोशी, सलील वाघ इ. इ.
या कवींच्या कवितांना नवतावादोत्तर, नव्वदोत्तर, शतकोत्तर अशी अनेक विशेषणे बहाल झालेली आहेत. अशाप्रकारच्या कविता येथे वाचायला मिळतात. किंबहुना नव्या जाणिवा आणि संकल्पना यांवर आधारित लेखनाचे हे एक व्यासपीठच आहे म्हणाना!
(परंतु चारच अंकांनंतर हे अंक ऑनलाईन दिसत नाहीत.तसेच 'अभिधानंतर' हे छापील त्रैमासिक बंद केल्याचे कळते.)
मराठीत अशी कविता सहजपणे समाजमान्यता मिळवू शकत नाही. अशा प्रकारच्या काव्यावर (व्यंग्यपूर्ण) टीका होते आणि या कवींना 'आवॉर्डेच्छू' अशी शेलकी संबोधने मिळतात.
13 Apr 2009 - 8:08 pm | क्रान्ति
मूळ कविता, तिचे मायबोलीतील रुपांतर आणि प्रतिसादातील विडम्बन सगळीच साखळी अप्रतिम!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
13 Apr 2009 - 11:03 pm | लिखाळ
कविता आणि त्यावरील चर्चेमुळे नवीन माहिती समजली.
विसूनानांनी सुचवलेले दुवे उपयुक्त आहेत. दोघांचे आभार.
प्लमसाठी दह्याची योजना फारच कल्पक आणि योग्य !
-- लिखाळ.
14 Apr 2009 - 2:09 am | धनंजय
आस्वाद घेणार्या सर्वांना धन्यवाद.
आनंदयात्रींनी लिहिलेल्या कडव्यांना विडंबन म्हणता येत नाही, तर आणखी एक समर्थ रूपांतरच म्हणावे लागेल. फारतर नैतिक ठेच कोणाची - हे उलटून विडंबन केले आहे. मुळात चूक चिठ्ठी लिहिणार्याची आहे, तर विडंबनात चूक बगझिलामध्ये मुद्दामूनच उद्याच्या बिलिंगसाठी त्रुटी ठेवणार्याची आहे. पण पात्रांची ती उलटपालटही विचार करण्यालायक आहे.
विसुनाना यांनी माहिती आणि दुवेही चांगले पुरवले आहेत. अभिधानंतर मधल्या कविता/लेख वाचनीय आहेत. विल्यम कार्लोस विल्यम्स च्या विकीमध्ये एका रेडियो कार्यक्रमाचा संदर्भ आहे. त्या कार्यक्रमात ही कविता मी पहिल्यांदा ऐकली.
दृश्यकविता (म्हणजे पानावर लिहिलेला आकार कसा दिसतो), आणि त्यातसुद्धा केवळ मूर्त-वर्णन करून भावनागर्भाला वाचकापर्यंत पोचवायचे, हा प्रयत्न मी मागे केला होता. "उन्हाळ्यातले थेंब" हा ९-हायकू-संच मिसळपावावर सापडेल.
14 Apr 2009 - 2:21 am | नंदन
या वेगळ्या प्रकारच्या कवितेची ओळख करून दिल्याबद्दल आभार. विसुनानांचा प्रतिसादही आवडला. प्लमच्या जागी दह्याची योजना करताना कवितेच्या मराठीकरणाव्यतिरिक्त विरजणाचा दुहेरी अर्थ (विरजण पडणे या अर्थाने - जसे मूळ कवितेतले कोल्ड हे विशेषण थंडावलेल्या नात्याबद्दल येते) अभिप्रेत होता का?
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
14 Apr 2009 - 3:00 am | धनंजय
कवितेत "मी" लहरीपणाने फस्त केलेली वस्तू, "तू" सुज्ञपणाने राखून ठेवली होती. कुठलीही खाद्यवस्तू मी निवडली असती, तरी त्याच्या "तथ्यात्मक" वर्णनातून असा संघर्ष बहुधा उघड झालाच असता.
तो बेबनाव या निवडलेल्या दह्याच्या "विरजणाने" थंडच नव्हे तर आंबटही केला आहे. याबाबत तुमच्या निरीक्षणाशी सहमत आहे. (उद्याच्या कॉफीसाठी राखून ठेवलेले दूध संपवले, हे त्या दृष्टीने कमी पडते.)
(लहानपणची आठवण काढत मनातल्या मनात मी जुन्या घरातला फ्रीज उघडला. आई ठेवत असे तो एक-एक पदार्थ मी कल्पनेत बघू लागलो. दही दिसले - विरजणाचे दही चुकून संपले तर आईची उडणारी त्रेधा आठवली. संपल्याचे उपद्रवमूल्य फार, म्हणून दही निवडले.)
14 Apr 2009 - 11:04 am | विसुनाना
'विरजलेल्या' नातेसंबंधांना दह्याची प्रतिमा सहीच आहे.
कदाचित 'विरलेल्या' नातेसंबंधात (त्यांच्या म्हातारपणी) असे असेल -
कपाटात होते
ते सुती पातळ
मी फाडून टाकले -
टरकावले
(मी फाडून बांधले-
लचकलेल्या गुडघ्याला)**
बहुधा तू ते
होतेस जपले
दुपट्यासाठी
नातवंडाच्या
मला माफ कर, ते
मऊ होते
किती तलम अन्
किती उबदार
***
** - माझा बदल.