शिर्डीतून मराठी हद्दपार? म.टा.तील लेख.

शरुबाबा's picture
शरुबाबा in जनातलं, मनातलं
1 Feb 2008 - 4:59 pm

महाराष्ट्र टाईम्स मध्ये आलेला हा लेख .

शिर्डीतून मराठी हद्दपार?

शिर्डी महाराष्ट्रातच आहे का याची शका यावी अशा तामिळ, इंग्रजी पाट्या येथे बहुसंख्य दुकानांवर दिसतात.
रुम चाहिए ? मंदिर के पासही लॉज है। दर्शन करोगे ? व्ही . आय . पी . पास भी दिलादुँगा ... लक्झरी , व्होल्वो बसका तिकीट चाहिए ? टॅक्सी भी मिलेगी .....' साईबाबांच्या शिर्डी भूमीत पाऊल टाकताच पदोपदी असे ऐकायला मिळतेच ; पण फुलवाल्यापासून हॉटेल , लॉजींगवाल्यापर्यंत सर्वच व्यावसायिकांच्या पाट्यांकडे नजर टाकल्यास मराठीचे कुठेही दर्शन घडत नाही . मात्र इंग्रजी , तेलुगु , गुजराती भाषेतील बोर्ड ठळकपणे दिसतात .

सर्व जातिपंथाचे प्रतिक ' या भावनेने भाविकांची वर्दळ वाढू लागली आणि शिडीर् हे खेडे शहर बनले . चहाची टपरी , स्टार हॉटेले , लॉजिंग , टांगा , रिक्षा , लक्झरी बसेस , ए . सी . कार , वडा व भजेवाले , फुलविक्रेते , कटलरी , प्रसाद अशा सर्वच व्यावसायिकांचा धंदा तेजीत आहे .

संस्थानातल्या धर्मशाळा , पी . आर . ओ ., मंदिर या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या तोंडीही कधी मराठी ऐकायला मिळत नाही . त्यामुळे आपण महाराष्ट्राऐवजी अन्य कुठल्या प्रांतात तर आलो नाही ना , हा विचार मराठी माणसाच्या मनाला नक्कीच भिडतो .

शरद

संस्कृतीबातमी

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Feb 2008 - 8:44 pm | llपुण्याचे पेशवेll

मला वाटते याला कारण मराठी माणूसच आहे. त्या तामिळी दुकान वाल्याना या जागा काय मराठी माणसाच्या मदतीशिवाय मिळाल्या आहेत. आपण इतर प्रांतात जा एकही पाटि तेथील स्थानिक भाषा सोडून हींदी मधे दिसणार नाही. राहीला प्रश्न आपल्या राष्ट्रभाषेचा तर त्या राष्ट्रभाषेमुळे मराठी माणसाचे आणि पर्यायाने मराठी भाषेचे जितके नुकसान केले आहे तितके कदाचित इंग्रजीने देखील केले नसेल. मझ्या भावना मी या लेखामधे व्यक्त करत(हा लेख काथ्याकूट सदराखाली नसतानाही) आहे कारण राहवत नाही.
मुंबई तर गेली मराठी माणसाच्या हातातून.(मुंबई मधे शिवसेनेची सत्ता असली तरी मुंबईची व्यवहारभाषा मराठी नाही हे जाणून घ्यावे.) हल्ली तर मला पुण्यात पुण्याबाहेरची काही अशी मंडळी भेटली की जे अशा गैरसमजात होते की पुण्यात यायचे तर हींदी यावी लागते.(तळपायची आग मस्तकात जाणे म्हणजे काय ते मी तेंव्हा अनुभवले). पु.ल. म्हणत असत की पुण्यात घरातून रस्त्यावर आले तरी असे वाटते की माजघरातून ओसरीवर आलो आहे. अशा पुण्याची ख्याती आपल्या महारष्ट्रातच ही अशी व्हावी या सारखे दु:ख नाही.
त्याच गोष्टीची पुढची पायरी ही उपरोल्लिखित बाब मला वाटते.
आणि या गोष्टींकडे 'कालाय तस्मै नमः' म्हणून दुर्लक्ष करणारे लोक मला आळशी आणि बुळचट वाटतात. त्याना कोणत्याच गोष्टीचा वाईटपणा घेऊन ती गोष्ट करायची नसते. कुठल्याच आपल्या 'मराठी' मित्राला वाईटपणा घेऊन मराठीतच बोल असे आग्रहाने सांगायचे नसते. यामुळेच आपल्या मातृभाषेची अशी अवस्था झाली आहे.
(जाज्वल्य मराठीप्रेमी)
-डॅनी
पुण्याचे पेशवे

ऋषिकेश's picture

1 Feb 2008 - 10:51 pm | ऋषिकेश

कुठल्याच आपल्या 'मराठी' मित्राला वाईटपणा घेऊन मराठीतच बोल असे आग्रहाने सांगायचे नसते.
१०१% सहमत

साईबाबा उगाच अमराठी लोकांना भक्तीचा प्रत्यय का देतात? मग ही भक्त लोकं मराठी शिकायचा काही प्रयत्न न करता धावत-धावत शिर्डीला येतात. आणि शिर्डीतले दुकानदार या अमराठी तथाकथित भक्तांची सोय का बघतात कोणास ठाऊक. अहो, ज्या गावची भाषा आपण बोलत नाहीत त्या गावच्या देवाची किंवा साईबाबांची भक्ती करायची तर मराठी नीट बोलायला-वाचायला शिकायला काय झाले.

काही वर्षांपूर्वी उडिया न शिकता मी पुरीच्या जगन्नाथाच्या देवस्थानाला गेलो होतो. बिगर-उडिया भाषेतले काही बोर्ड वाचून माझी पुरेशी सोय झाली. पण माझी अशी सोय केल्यामुळे ओरिसा राज्याचे वाटोळे झाल्याशिवाय राहाणार नाही असे पदोपदी जाणवले. उगाच नाही "ओरिसानाथ" ऐवजी त्या देवाचा "जगन्नाथ" झाला! किती भयंकर!

अशी दुर्गती शिर्डीची होऊ नये. साईबाबांचे वचन "सबका मालिक एक" बदलून "फक्त मराठी [आणि वाटल्यास हिंदी] बोलणार्‍यांचा मालिक एक" असे असते तर किती बरे झाले असते, नाही का?

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Feb 2008 - 12:54 am | llपुण्याचे पेशवेll

सर,
आपण जगन्नाथांच्या दर्शनाला गेलात तर तिथे सर्वच पाट्या आपण जी भाषा जाणता त्यात होत्या? का काही काही तेथील स्थानिक भाषेतही होत्या?
रुम चाहिए ? मंदिर के पासही लॉज है। दर्शन करोगे ? व्ही . आय . पी . पास भी दिलादुँगा ... लक्झरी , व्होल्वो बसका तिकीट चाहिए ? टॅक्सी भी मिलेगी .....' साईबाबांच्या शिर्डी भूमीत पाऊल टाकताच पदोपदी असे ऐकायला मिळतेच ; पण फुलवाल्यापासून हॉटेल , लॉजींगवाल्यापर्यंत सर्वच व्यावसायिकांच्या पाट्यांकडे नजर टाकल्यास मराठीचे कुठेही दर्शन घडत नाही . मात्र इंग्रजी , तेलुगु , गुजराती भाषेतील बोर्ड ठळकपणे दिसतात .

यात एक तरी पाटी मराठीत असल्याचा उल्लेख आहे का? ...कारण मराठी माणसाला हींदी चालते. त्याला मराठी अस्मिता नाही. (जरी मराठी अस्मिता फक्त भाषेशीच निगडीत आहे असे नाही. पण भाषा हा महत्वाचा दुवा नक्की आहे.)

साईनाथ विश्वात्मक संत आहेत, पण आपण नाही आहोत ना मग आपण आपल्या पातळीरून विचार करावा. त्यासाठी साईबाबांच्या तत्वज्ञानामागे आपण लपणे मला रुचणार नाही. म्हणूनच मी वरील प्रतिक्रिया प्रकाशित केली.
आज आपण महाराष्ट्रात गेलात तर मुंबई आणि शिर्डी ही २ ज्ञात उदाहरणे आहेत की जिथे मराठी हद्दपार होत चालली आहेत. पुण्यात परीस्थिती काही भिन्न नाही. पण कामगार आयुक्त ल.रा.शिंदे यांच्या प्रयत्नामुळे काही प्रमाणात का होईना मराठीत पाट्या दिसत आहेत.
असो. जशी बुद्धी साईबाबा देतील तसा प्रत्येक माणूस विचार करतो.
साईभक्त
डॅनी.
पुण्याचे पेशवे
ता.क. वरील विधानांमुळे कोणी दुखावले असेल तर जाहीर माफी मागतो.

धनंजय's picture

2 Feb 2008 - 3:05 am | धनंजय

इथे आपल्या पातळीवरूनही मी विचार केला आहे. मला भारतात अनेक ठिकाणी प्रवास करायला आवडतो, आणि यात मला अभिमानही वाटतो. पण भारतातल्या सर्व भाषा शिकण्याइतपत ग्रहणशक्ती माझ्यापाशी राहिलेली नाही. (बाळपणी नवीन भाषा शिकता येई, पण आता ते दिवस गेले.) त्यामुळे अन्यभाषक भागांत माझी सोय झाली तर त्या गावातील पर्यटनसेवांचे मी मनापासून आभार मानतो. अशा ठिकाणी मी माझे पैसे खर्च करतो, म्हणजे तिथल्या लोकांचाही काही फायदा होतोच - म्हणजे माझे आभार नुसते "बोलाचा भात बोलाची कढी" नाहीत.

आता अध्यात्माच्या पातळीवर नाही, तर व्यवहाराच्या पातळीवर बोलूया. लोक येतील तर त्यांची राहाण्याखाण्याची सोय होण्याची मागणी बाजारात होईलच. अन्यभाषक भक्त ज्या प्रमाणात येतील त्या प्रमाणात अन्य भाषांत त्या सेवांची जाहिरात होईल हे तर अपेक्षितच आहे - त्यात बाजाराच्या दृष्टीने आक्षेपार्ह काहीच नाही. उलट "अशी जाहिरात करू नका" असे दुकानदाराला सांगितले, तर "आपल्यापाशी माल आहे असे समोरच्या गिर्‍हाइकाला सांगू नका" अशा प्रकारची मुस्कटदाबी होईल.

आता वैयक्तिक पातळीवरून "हे अन्यभाषक लोक इथे का येतात" या प्रश्नाचा विचार माझ्या तरी मनाला लवकर उमगत नाही - कारण अर्थातच मी "अन्यभाषक" नाही. फारतर "मी अन्यभाषक प्रांतांत का जातो" हे उत्तर देता येईल - वर दिले आहे. त्यामुळे नेमका हा प्रकार समजायचा असेल, तर अन्यभाषकांना शिर्डीचे आकर्षण का आहे ते त्यांच्या दृष्टिकोनातूनच समजावे लागेल. म्हणून अन्यभाषक भक्त का येतात, हे कळण्यासाठी "ते विश्वात्मक संत आहेत" या तत्त्वाचा आधार घ्यावा लागतो. (अवश्य घ्यावा लागतो - हे त्या तत्त्वाच्या आड दडणे नव्हे.) अन्यभाषक गिर्‍हाइके शिर्डीच्या बाजारात या मोठ्या प्रमाणात नसावीत असे तुमचे मत त्यानंतरही असेल, तर त्यांची साईबाबांवरील भक्ती (मराठी शिकल्याशिवाय) अयोग्य का आहे, हे तुम्हाला अन्यभाषकांना समजावून सांगावे लागेल. अन्यभाषकांचा असा अनुनय तुम्हाला पटत नसेल, तर मराठी हिसका दाखवून त्यांना येण्यापासून परावृत्त करण्याची तयारी पाहिजे. (पण त्यामुळे मराठी भाविकांविरुद्ध अन्य प्रांतांत असा हिसका दाखवला जाऊ शकेल.)

आता मी खुद्द शिर्डीला जाऊन दहाएक वर्षे झाली आहेत (मी तिथे मराठीतच बोललो), पण माझे कोणी ना कोणीतरी मराठीभाषक नातेवाईक दरवर्षी शिर्डीयात्रा करतातच. मला मराठी बोलल्यामुळे तेव्हा कोणी परकेपणा दाखवला नाही, आणि माझ्या कुठल्या नातेवाइकांनी मराठी असून आपली कुठली गैरसोय झाल्याचे सांगितले नाही. मराठी माणसालाही जर उत्तम सेवा मिळत असेल, तर "मराठी हद्दपार झाली" हे कुठल्या अर्थाने हे माहीत नाही.

मुंबई आणि शिर्डी अर्थकारणाच्या दृष्टीने वेगळ्या जागा आहेत. त्यामुळे त्या दोन्ही ठिकाणबद्दलच्या चर्चेत बरेच वेगळे मुद्दे येतील. जसे - तुम्ही जर म्हणालात की बॉलिवूडमधून मराठी सिनेमे हद्दपार झाले आहेत तर मी लगेच पूर्ण सहमती देईन.

सुनील's picture

2 Feb 2008 - 9:09 am | सुनील

हे वाचा.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2750101.cms

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Feb 2008 - 12:29 pm | llपुण्याचे पेशवेll

कारवाई करणार्‍या सर्व सरकारी अधिकार्‍यांचे अभिनंदन.
सरकारी कारवाईमुळे प्रसन्न झालेला.
डॅनी.
पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर's picture

2 Feb 2008 - 2:38 pm | विसोबा खेचर

तूर्तास तरी नगरच्या जिल्हाधिकार्‍यांचे आम्ही अभिनंदन करतो..

परंतु प्रत्यक्षात त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी होऊन जेव्हा सर्व दुकानांच्या पाट्या मराठीत झळकू लागतील तो दिवस खरा!

आपला,
(अजूनही विश्वास नसलेला) साईभक्त तात्या.

तात्या,

मुंबई येथील शेअरबाजारात जाण्याचे माझे भाग्य नाही. त्यामुळे "येथे रांगेत उभे राहा" वगैरे पाट्या मराठीत असल्यास मला माहीत नाही. पण दलालबाजारातले जे काही फोटो बघितले आहेत, त्यांतले फलक मराठी नसलेल्या एका भाषेतच दिसतात. शेअरच्या किमती असलेले हे फलक "प्रसाधनाची वाट" पेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत, यात शंका नाही. याचा तुम्ही निषेध करत नाहीत, याची अनेक कारणे असू शकतील.
१. (माझे प्रथम कारण) तुम्ही सुज्ञ आहात.
२. अन्यत्र अशा वागणुकीला तुम्ही नेभळट म्हटले आहे, पण तुम्ही नेभळट नाहीत, हे मिपाचा झणझणीतपणा सिद्धच करतो. हे कारण बाद.
३. आपल्या कर्मभूमीकडे चुकून तुमचे दुर्लक्ष झाले; तुम्ही नगरच्या जिल्हाधिकार्‍याकडे अधिक लक्ष देता. तुमचे निरीक्षण तीक्ष्ण आहे हे तुमच्या लिखाणातून दिसते, त्यामुळे हे कारण मला पटत नाही.
४, ५, इ. इ. सर्व न पटण्यासारखी कारणे.

उरले कारण १. तुम्ही सुज्ञ आहात. महाराष्ट्रातल्या एका महत्त्वाच्या बाजारात महत्त्वाचे फलक मराठी नसलेल्या एका भाषेत असावेत यास काही उत्तम कारण तुम्हाला ठाऊक आहे. ते सांगावे.
शेअरबाजारातले किंमतफलक काय माहिती देतात? अमुक समभाग येथे अमुक किमतीला विक्रीस आहे. शिवाय अशा फलकांवर बाजारात वावर करण्यास उपयुक्त माहिती दिसते.
शिर्डीच्या बाजारपेठेतले फलक काय माहिती देतात? अमुक हॉटेलातली खोली किफायतशीर किमतीला भाड्याला देणे आहे, इ. इ.
मग मुंबईत दलालबाजाराला लागू असलेले कारण शिर्डीच्या बाजारपेठेत का लागू नाही, तेही समजावून द्यावे. (शिर्डीत "येथे रांगेत उभे राहा" प्रकारच्या पाट्या मराठीतही आहेत, ते वेगळे सांगावे काय?)

डिसेंबर २२, २००७ (म्हणजे हल्लीच) आंध्र सरकारने निर्णय घेतला की दुकानाच्या पाट्या तेलुगूत असल्याच पाहिजे (दुसरी ओळ वेगळ्या भाषेत असल्यास चालेल).

http://www.andhranews.net/state/2007/December/22-Displaying-shop-names-T...

त्यांचेही अभिनंदन.

काही प्रश्न :
१. हा प्रकार संसर्गजन्य आहे काय?
२. हा हुकूम आंध्र सरकारने तिरुपती येथे लागू करून दाखवल्यास त्यांचे पुन्हा विस्मयचकित अभिनंदन करीन. कारण "देवभक्ती विरुद्ध प्रादिशिक अस्मिता" चढाओढीत बहुधा देवभक्ती जिंकते. "बाजार विरुद्ध कुठलीही अस्मिता" चढाओढीत बहुधा बाजार जिंकतो (भारतातल्या/अमेरिकेतल्या महाग वस्तूऐवजी भारतीय/अमेरिकन गिर्‍हाईक स्वस्त चिनी वस्तू घेतो). शाहाणा भारतीय उद्योजक बाजाराविरुद्ध लढण्याऐवजी आपला माल बाजारात उठेल अशी समेट करतो, अस्मिता आणि बाजार दोन्हीही खुश! तेलुगू अस्मिता देवभक्ती आणि बाजार दोघांशी समेट करण्याऐवजी दोघांविरुद्ध लढेल का? जिंकेल का? हे माझे मोठे कुतूहल आहे.

आम्ही स्वतःला सोशिक आणि सूज्ञ याच कारणामुळे म्हणवतो 'कारण भाषेचा आग्रह कुठे धरायचा आणि दुराग्रह कुठे धरायचा नाही हे कळते म्हणून'.

शिर्डीच्या बाजारपेठेतले फलक काय माहिती देतात? अमुक हॉटेलातली खोली किफायतशीर किमतीला भाड्याला देणे आहे, इ. इ.
"मग मुंबईत दलालबाजाराला लागू असलेले कारण शिर्डीच्या बाजारपेठेत का लागू नाही, तेही समजावून द्यावे."
आता शिर्डीचा बाजार आणि शेअर बाजार यातला फरक आपणही जाणता आणि आपण आम्हाला(तात्यांना) सूज्ञही म्हणता तर सूज्ञ माणूस शेअर बाजारावर मराठीत फलक लावायला तोपर्यंत सांगणार नाही जो पर्यंत मराठी माणसाचे ६०% वर्चस्व तिथे प्रस्थापित होत नाही.(एक दिवस तो ही नक्कीच उजाडेल यात शंकाच नाही).

राहीला प्रश्न शिर्डीच्या बाजाराचा तर तिथे प्रश्न आहे भाषिक स्वाभिमानाचा. दुकानाच्या पाट्या या इतर भाषेत लिहील्या जातात(मुख्यत्वे 'हींदीत') यास कारण म्हणजे मराठी माणूस 'हींदी'ला राष्ट्रभाषा मानतो म्हणून. म्हणून या राष्ट्रीय गुणाचा गैरफायदा घेऊन मराठीवर उठणारे हात थोपवायला नकोत का?
'संस्थानातल्या धर्मशाळा , पी . आर . ओ ., मंदिर या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या तोंडीही कधी मराठी ऐकायला मिळत नाही ' हे कशाचे द्योतक आहे??? मराठी माणूस मराठीचा आग्रही अभिमानी नाही याचेच. जेव्हा हे घडेल तेव्हा शिर्डीतल्या पाट्या आपोआपच येतील मराठीत. पण सध्या तरी सरकारी अधिकाराचा वापर करून सक्तीने अंमलवजावणी करणे हे योग्य.

आणि शिर्डीच्या बाबतीत मी खात्रीने सांगू शकतो की ५०-६० % भक्त मराठीच असतात.

(तात्यांवरील आरोप स्वत:वर घेणारा..आणि प्रतिक्रीया देणारा)
डॅनी
पुण्याचे पेशवे

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Feb 2008 - 10:18 pm | llपुण्याचे पेशवेll

चूकून २ दा टिचकी मारली.

चतुरंग's picture

4 Feb 2008 - 10:20 pm | चतुरंग

कधी कधी अतिरेकी होतो .
कारण एखादे स्थळ जेव्हा पर्यटन स्थळ होते त्यावेळी वेगवेगळ्या प्रांतातून लोक तिथे येणार, त्यांच्यामुळे तिथे व्यवसाय निर्माण होणार. त्यांची सोय पहाणे हा व्यवहार आहे. अशा स्थळी समोर आलेला माणूस कोणती भाषा जाणतो हे त्याच्याकडे बघून कळत नाही त्यामुळे साहजिकच राष्ट्रभाषेचा आधार प्रथम घेतला जाणार. तुम्ही मराठीतून बोलायला सुरुवात केलीत तर तिथले दुकानदार मराठीतूनच बोलतात हा माझा अनुभव आहे.
आणखी एक मुद्दा - महाराष्ट्रातूनच तिथे मुक्कामाला कितीसे लोक येत असतील फारच थोडे - बहुसंख्येने गुजराथ, मध्यप्रदेश, आंध्रातून लोक येतात. त्यामुळे ठसठशीत पणे त्या त्या भाषांमधून पाट्या दिसणार.

एक उदाहरण - लंडनजवळ "साऊथहॉल" नावाचे एक स्टेशन आहे तिथे मोठ्या प्रमाणावर पंजाबी/शीख लोकांची वस्ती आहे. तिथे सगळीकडे इंग्लिशसोबत"गुरुमुखी" लिपीतल्याही पाट्या मला दिसल्या. माझी भाषा पंजाबी नसूनही मला फार बरे वाटले. आपली भाषा दिसली तर
लोकांना आपुलकी वाटते. हा व्यवसायाचा मंत्र आहे. न्यूयॉर्क लाही बसचे वेळापत्रक इंल्गिश आणि गुजराथी भाषेतून बघितल्याचे स्मरते.

तसेच धनंजयने मांडलेला शेयर बाजाराचा मुद्दा पटणारा आहे.

तेव्हा, वरील सर्व चर्चा बघून मला असे वाटते की, शिर्डीमधे पाट्या मराठीतून असल्याच पाहिजेत पण गरजेप्रमाणे इतर भाषातही असायला हरकत नसावी.
लगेच लाठ्या- काठ्या घेऊन धावण्याची गरज नाही!

चतुरंग