आरोग्य आणि स्वस्थता
आरोग्य म्हणजे मनुष्याची निरोगी, अविकृत, प्राकृत अवस्था. प्रकृती.
कुपोषण, अतिसेवन, अजीर्ण, जंतूसंसर्ग, विकार, रोग, अपघात ह्यांमुळे आरोग्य धोक्यात येते. हीच विकृत अवस्था. विकृती.
प्रकृती सुदृढ असेल तर स्वस्थता आपसुकच येते. सुदृढ मनुष्य स्वस्थतेच्या निरनिराळ्या स्तरांवर राहू शकतो. निकोप जीवन जगू शकतो.
मात्र असामान्य संकटास सामोरे जाण्याची त्याची प्रतिबंधात्मक आणि निवारणात्मक शक्ती स्वस्थतेवर ठरते. आणि स्वस्थता म्हणजे शारीरिकदृष्ट्या मनुष्याची कर्तबक्षमता, कार्यक्षमता, अन्नाचा ऊर्जेसाठी आणि ऊर्जेचा कामाकरता सक्षम वापर करण्याचे सामर्थ्य.
आरोग्यवान माणूस इष्टताप, इष्टचाप, सुडौल, नियमित-उदर आणि संवेदनक्षम असतो. म्हणजे त्याच्या शरीराचे तापमान इष्ट तेच असते, त्याचा रक्तचाप (रक्तदाब) इष्ट तेवढाच असतो, बांधा डौलदार असतो, उदर नियमित असते आणि परिसरातील चराचरांची योग्य ती दखल घेण्याकरता तो पुरेसा संवेदनाक्षमही असतो. आता या शब्दांचा नेमका अर्थ काय आहे? ते पाहू या.
आरोग्याचे निकष
१. तापमानः सामान्यपणे माणसाचे शरीर ३७ सेल्शिअस किंवा ९८.६ फॅरनहीट तापमानावर असते. ताप जास्त वाढू देऊ नये. १०२ फॅरनहीटच्या वर गेल्यास पट्ट्या ठेवाव्या. १०४ फॅरनहीटच्या वर गेल्यास त्वरित वैद्यकीय मदत मिळवावी.
२. रक्तदाबः सामान्यतः १२०/८० असतो. म्हणजे हृदय शुद्ध रक्त शरीरात ढकलते त्यावेळी जो दाब वापरते तो दाब १२० मिलीमीटर पार्याच्या स्तंभाइतका असतो, तर अशुद्ध रक्त शरीरातून खेचून घेते तेव्हा वापरते ती ओढ ८० मिलीमीटर पार्याच्या स्तंभाइतकी असते.
३. शरीर-वस्तूमान निर्देशांक: माणसाच्या किलोग्रॅममधील वजनास त्याच्या मीटरमध्ये व्यक्त केलेल्या उंचीच्या वर्गाने भागल्यावर येणारे गुणोत्तर. हे सामान्यत: १९ ते २४ असते. त्याहून कमी असल्यास माणूस कुपोषित सदरात मोडेल तर त्याहून जास्त असल्यास माणूस स्थूल स्तरात मोडेल.
४. कमर/नितंब गुणोत्तर: हे सामान्यत: ०.८५ च्या आसपास असते. ते १ हून जास्त असेल तर पोट सुटलेले असल्याचे दर्शवते. हे गुणोत्तर फारच कमी असल्यास कुपोषणाने पोट खपाटीला गेल्याचे दर्शवते.
५. संवेदनाक्षमः कुठल्याही उपाधी, व्याधी, विकार, विकृती, आजार, रोग यांनी संत्रस्त झालेला मनुष्य आजूबाजूच्या चराचराची पुरेशी दखल घेऊ शकत नाही. त्याला जर त्यांची पुरेशी दखल घेता येत असेल तर तो आरोग्यवान असण्याची शक्यता असते.
स्वस्थतेचे निकष
१. विश्रांत अवस्थेतला हृदयस्पंदनदर: आरामात विश्रांत अवस्थेत असतानाचा हृदयस्पंदनदर कमीतकमी असावा. पुरूषांत ७२ तर स्त्रियांत ८४ स्पंदने प्रतिमिनिट असा दर सामान्यत: असतो. विश्रांत अवस्थेतला हृदयस्पंदनदर कमीतकमी असणे चांगले.
२. कष्टानंतर ते थांबवताच लवकरात लवकर विश्रांत अवस्थेतला हृदयस्पंदनदर गाठण्याची क्षमता: काम केल्यावर अथवा व्यायामानंतर हृदयस्पंदनदर वाढतो. काम करणे थांबवताच अथवा व्यायाम बंद करताच तो पूर्वपदावरही येऊ लागतो. काम वा व्यायामाची तीव्रता, वेग अथवा ते करत राहण्याचा वेळ वाढतो तसतसा, जास्तीत जास्त हृदयस्पंदनदर गाठला जातो. (२२५-तुमचे वय)= अंतिम हृदयस्पंदनदर. काम वा व्यायामाची तीव्रता, गती वा अवधी एवढाच वाढवावा ज्यामुळे तुमचा हृदयस्पंदनदर, तुमच्या अंतिम हृदयस्पंदनदराच्या ९० टक्क्यांहून जास्त वाढणार नाही. मात्र त्या काम वा व्यायामादरम्यानचा सर्वोच्च हृदयस्पंदनदर गाठल्यावर, काम वा व्यायाम थांबवताच, कमीत कमी किती काळात तुमचा हृदयस्पंदनदर आरामात विश्रांत अवस्थेत असतानाच्या हृदयस्पंदनदरापर्यंत परततो, तो काळ. तो कमी असावा. तो काळ जेवढा कमी तेवढेच तुम्ही जास्त स्वस्थ. म्हणजेच, कष्टानंतर ते थांबवताच लवकरात लवकर विश्रांत अवस्थेतला हृदयस्पंदनदर गाठण्याची क्षमता.
३. अंतिम हृदयस्पंदनदरावर पोहोचेपर्यंत करू शकाल ते जास्तीत जास्त काम: जास्त तीव्रतेचे, जास्तीत जास्त वेगाने, जास्तीत जास्त वेळ केलेले सोसेल तेवढे काम वा व्यायाम. ते जास्त असावेत. जेवढे तीव्र, गतीमान आणि दीर्घकाळ काम करू शकत असाल तेवढीच तुमची स्वस्थता चांगली. म्हणजेच, अंतिम हृदयस्पंदनदरावर पोहोचेपर्यंत करू शकाल ते जास्तीत जास्त तीव्रतेचे, जास्तीत जास्त गतीमान व जास्तीत जास्त काळ केलेले काम.
४. श्वसनक्षमता: पूर्ण श्वास छातीत भरून घेऊन स्तनाग्रांपाशी मोजलेला छातीचा घेर, उणा त्याच जागी मोजलेला संपूर्ण निश्वसनाचे वेळी छाती रिकामी असता मोजलेला घेर हा फरक, रिकाम्या छातीच्या घेराच्या टक्केवारीत व्यक्त केल्यास मिळणार आकडा म्हणजे श्वसनक्षमता. ही ऑलिंपिक्सपटूंसाठी १५ टक्के पर्यंत असते. तर हृदयरुग्णांची ती २.५ टक्क्यांपर्यंत खालावलेली असते. सामान्य माणसाची श्वसनक्षमता ५ ते १० टक्के असू शकते. प्राणायामाने, योगासने केल्याने वा व्यायामानेही ती वाढते. हे सारे करतांना त्याचा उद्देश श्वसनक्षमता वाढवण्याचाच असावा. थोड्या थोड्या कालावधीनंतर पुन्हा मोजून प्रगतीची खात्री करून घ्यावी.
५. श्वसनगतीः श्वास आणि उच्छवास यांचे एक आवर्तन असते. एका आवर्तनास लागणारा वेळ श्वसनगती ठरवतो. श्वसनगती वेगवती असणे अस्वस्थतेचे निदर्शक असते. सामान्य माणूस मिनिटास १० ते १५ आवर्तने या गतीने श्वासोच्छवास करतो. तर ऋषीमुनी मिनिटास ५-६ आवर्तने या गतीने श्वासोच्छवास करत असतात. जर आयुष्याचे श्वास पूर्वनिर्धारित असतील तर दीर्घ श्वसन/ मंद श्वसन दीर्घायुष्याप्रत नेत असणार ह्यात काय संशय!
मिसळपाव हॉटेलातल्या लोकांना ह्याची गरजच काय? असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडू शकेल.
त्यावर मी आचार्य अत्र्यांच्या शब्दांत असे म्हणेन की:
झेंडूची रसिका फुले मिळवुनी देतो तुझ्या ही करी |
घे प्रेमे अथवा पदी तुडव जा, जे वाटते ते करी ||
रागाने चुरगाळलीस जरी का, पुष्पे कधी त्वां बरे |
केव्हाही विसरू नकोस तळीचे खाण्या परी खोबरे ||
प्रतिक्रिया
6 Apr 2009 - 5:04 pm | विसोबा खेचर
४. कमर/नितंब गुणोत्तर: हे सामान्यत: ०.८५ च्या आसपास असते. ते १ हून जास्त असेल तर पोट सुटलेले असल्याचे दर्शवते.
आयला!
गोळेकाका, अहो वस्तुस्थिती किंवा फॅक्ट्स अश्या चारचौघात उघडपणे सांगितल्याच पाहिजेत का? :)
असो,
आजपर्यंत मन जे चाहेल ते यथासांग खाल्लं. तूर्तास तरी काही त्रास नाही. उद्याचं माहीत नाही! जे होईल ते भोगायची अर्थातच तयारी आहे. 'योगापेक्षा भोग खूप खूप मोठे असतात!' यावर माझा पूर्ण विश्वास आहे!
आपला,
(खाण्यापिण्याच्या बाबतीत वाट्टेल तशी मनमानी करणारा!) तात्या.
6 Apr 2009 - 8:52 pm | नरेंद्र गोळे
नमस्कार तात्या,
गोळेकाका, अहो वस्तुस्थिती किंवा फॅक्ट्स अश्या चारचौघात उघडपणे सांगितल्याच पाहिजेत का? >>
तात्या, तुमच्या बाबतीत तरी नक्कीच नाही!
कट्ट्यावर माधवराव म्हणाले होते की, "मग, तुम्ही काढा ना 'जनोगत' एखादे!"
त्यानंतर तुमच्याव्यतिरिक्त आणखी कुणीही 'जनोगत' काढल्याचे अजून तरी ऐकिवात नाही.
त्यामुळे वस्तुस्थिती सांगायचीच झाली तर मी, ही सांगेन की ,
"तात्यांनी चालवलेले मिसळपाव हॉटेल हेच एकमेव स्वदेशी बनावटीचे, स्वतंत्र बाण्याचे मराठी संकेतस्थळ आहे!"
7 Apr 2009 - 7:42 am | विसोबा खेचर
त्यामुळे वस्तुस्थिती सांगायचीच झाली तर मी, ही सांगेन की ,
"तात्यांनी चालवलेले मिसळपाव हॉटेल हेच एकमेव स्वदेशी बनावटीचे, स्वतंत्र बाण्याचे मराठी संकेतस्थळ आहे!"
धन्यवाद! असाच लोभ असू द्यावा..
आपले आरोग्यविषयक, आहारविषयक अजूनही काही लेखन मिपावर यावे..
तात्या.
6 Apr 2009 - 5:15 pm | नरेश_
छान लेख आहे, आपण वैद्य / योग शिक्षक आहात काय?
जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)
6 Apr 2009 - 8:54 pm | नरेंद्र गोळे
धन्यवाद!
नाही हो. मी एक सामान्य चाकरमानी आहे.
6 Apr 2009 - 8:14 pm | लिखाळ
लेख छान आहे. पूर्वी मनोगतावरसुद्धा आपण जी आरोग्याविषयी लेखमाला लिहिली होती ती वाचली होती.
शेवटची कविता-संदेश मस्त
फुल जपतो. सुगंधी आहे. :)
-- लिखाळ.
6 Apr 2009 - 8:56 pm | नरेंद्र गोळे
लिखाळ, अहो जपतात ती बकुळीची फुले! ही तर झेंडूची आहेत!!
प्रतिसादाखतर धन्यवाद!
6 Apr 2009 - 8:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अतिशय उपयुक्त माहिती देणारा लेख. जिव्हाळ्याच्या विषयावरची माहिती नीट समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद.
अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
6 Apr 2009 - 9:05 pm | नरेंद्र गोळे
विक्षिप्त लोकांना 'उपयुक्त' वाटणे बरे की वाईट? हे मला उमगत नाही.
मात्र मी जे काही लिहीले आहे त्याचा कुणाला तरी उपयोग आहे, हे वाचून आनंद झाला.
जिव्हाळ्याचा विषयही समजला. मलाही तो जिव्हाळ्याचाच आहे. सांख्य शोधले की सापडते.
6 Apr 2009 - 9:11 pm | धनंजय
असेच म्हणतो.
6 Apr 2009 - 9:14 pm | प्राजु
अतिशय चांगला विषय हाताळला आहे.
धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
6 Apr 2009 - 10:14 pm | क्रान्ति
अत्यंत उपयुक्त माहिती आहे. धन्यवाद.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
6 Apr 2009 - 10:33 pm | चतुरंग
साध्या शब्दात अतिशय चांगली माहीती दिलीत गोळेकाका, धन्यवाद!
हृदयाच्या क्षमतेवरुन आठवले - महान टेनीसपटू बीयॉन बोर्ग ह्याचा रेस्टिंग हार्ट रेट साधारण ५० ठोके प्रतिमिनिट असा आहे.
अतिशय सशक्त हृदयाचं ते निदर्शक मानलं जातं. त्यामुळेच तो कित्येक तास चालणारे सामने लीलया खेळू शकत असे! :)
चतुरंग
7 Apr 2009 - 12:15 pm | नरेंद्र गोळे
चतुरंग, यावरून मी इथे हे नमूद करू इच्छितो की
डोंबिवलीत एक 'प्रकाश वेलणकर' नावाचे गृहस्थ आहेत.
एकदा पोटाच्या दुखण्याकरता त्यांना सायन हॉस्पिटलमधे भरती होण्याची पाळी आली होती.
तेव्हा त्यांचा हृदयस्पंदनदर मिनिटाला ३२ ठोके असा आढळून आला.
त्यापायी त्यांच्या अनेक तपासण्या होऊन पुढे तो निसर्गत:च तसा असून,
त्यात काहीही वावगे नसल्याचे सिद्ध झाले.
ती सारीच कहाणी त्यांनी "३२ हार्ट बीटस्" या त्यांच्या पुस्तकात नोंदवून ठेवलेली आहे.
ते पुस्तकही वाचनीय असून आपण ते मुळातच, अवश्य वाचावे.
7 Apr 2009 - 10:44 am | सुनील
उत्तम माहिती.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
7 Apr 2009 - 12:18 pm | नरेंद्र गोळे
सर्व वाचकांस, प्रतिसादकांस आणि उपयोगकर्त्यांस
'अखंडारोग्यालंकृत सर्वोच्च स्वस्थता' लाभो हीच प्रार्थना!