आयुष्यात एकदाही एखादी ही "पैज" लावली नसेल असा मनुष्य प्राणी शोधुनही सापडणार नाही.
काय म्हणता? पटलं नाही? अहो खरंय हे, लावता का पैज ?
तर अशा पैजा लावण्यात काही लोक पटाईत असतात, कोणी जिंकण्यात सातत्य दाखवतात तर कोणी हरण्यात पीएचडी करतात. पण खोड काही जात नाही.
लहानपणी आम्ही मुलं खेळून झाल्यावर एका कट्यावर बसत असू जिथून ३-४ रस्ते जाताना दिसत असत. बरीच माणसं चालत, गाडीवरून वगैरे जाताना दिसायची. मग तो / ती कोणत्या रस्त्याकडे वळेल यावरून आमच्यात पैजा लागायच्या. परीक्षा आली की, "पेपर मध्ये हा प्रश्न येईलच बघ, लावतेस पैज?" किंवा वर्गात ह्या वर्षी कोण प्रथम क्रमांक पटकावते/तो ह्यावर पण पैज लागली जायची. काही मुलांची तर वर्गात दिवस भरात कोणाकडूनही शिक्षा न मिळण्याची पैज लागायची बिचार्यांची पैज पाहून आम्हाला हसू येत असे, आणि आम्ही हसल्यावर आमच्याकडे पाहिल्यामुळे बिचारे पैज हमखास हरत.
त्यावेळी पैज कशाची लावली जायची तर चॉकलेट, पेरू,पेन, पेन्सिल, रबर ह्यांची!!! त्यावेळी तेवढीच औकात होती.
पुढे कॉलेज मध्ये गेल्यावर जरा विचित्र पैजा लावायला लागलो, कोण फास्ट खाते, जास्तीतजास्त खाण्याची, पिण्याची, स्कुटी, बाईक चालविण्याची, फुगे फुगविण्याची अशा अनेक.
एकदा रस्त्यावरून सगळा ग्रुप प्रॅक्टीकल संपवुन चालला होता, मध्ये कोणाला लहर आली काय माहित जो सर्वात जलद चालेल आणि एका ठराविक ठिकाणी पोचेल त्याला "खाईल तितके, जे हवे ते" अशी पैज लागली आणि आमच्या ग्रुप मधली ३-४ मुले गर्दीच्या रस्त्यावर अश्शी भराभरा चालायला लागली आणि त्यांच्या मागे आम्ही मुली निवांत हसत हसत त्यांची गंमत पहात चालत होतो, चालण्याच्या पैजेत मात्र आम्ही मुली शक्यतो भाग घेत नसू.
आमच्या ग्रुपमध्ये आम्ही मैत्रिणींनी आमच्या वर्गातील एका मुलीच्या आणि तिच्या बॉयफ्रेन्डच्या लग्नाबद्दल पैज लावली होती, ती मुलगी खूपच सुंदर होती, आणि त्याच्या विरूध्द तिचा मित्र, आम्हाला वाटले त्यांचे लग्न काही होत नाही पण गुपमधली मुले म्हणाली बघ कॉलेज संपायच्या आधी ते लग्न करतात की नाही आणि तसेच झाले, आम्ही मुली ती पैज हरलो.
काही कपल मध्ये पैज लावून भांडण लावायचो आणि पैज जिंकली की मग त्या कपल मध्ये जाऊन मांडवली करायचो. असे ग्रुप मध्येही करत असू.
कॉलेज मधुन बाहेर पडलो, पुढील शिक्षण, लग्न, नोकरी असे करत ग्रुप मधले एकमेकांपासुन दूर गेले, पैजा लागणे कमी झाले, परंतु पुन्हा नविन ग्रुप जमला आणी परत पैज लावण्यात मजा वाटु लागली पण ह्या पैजे मध्ये खेचाखेची नसायची, आणी पैज हरली तरी पहिल्यासारखे वाईट वाटायचे नाही.
लग्ना नंतर नवर्याबरोबर अनेक गोष्टी पैज लावून वसूल केल्या, मग नवराही हुशार झाला. आज जेवण काही न जाळता, करपता, खाण्यालायक तू बनवू शकलीस तर तू सांगशील त्या हॉटेल मध्ये किंवा आठवडाभर नेहमी रात्री जेवून झाल्यावर मस्तानी देईन. पण त्याने पैज जिंकली तरी त्याला हॉटेल मध्ये नेण्याशिवाय पर्याय नाही हे त्याला समजल्या पासून पदार्थ बनवायच्या बद्दलच्या पैजा बंद झाल्या. लग्ना नंतर काही वर्षानी पहिला मुलगा होईल की मुलगी ह्यावर लागलेली पैज हरल्या पासुन नवर्याने माझ्या बरोबर पैज लावणे कमी केले आहे.
पण पैज लावण्यात एक मजा असते की नाही हो? तुम्हीही नक्कीच काही पैजा लावल्या असतील. तर आम्हालाही सांगा तुमच्या "पैज" बद्दलचे काही किस्से. ऐकायला नक्की आवडेल.
प्रतिक्रिया
25 Mar 2009 - 11:00 pm | बिपिन कार्यकर्ते
शितल, हा लेख लोकांना आवडणारच... लावतेस पैज? ;)
बाकी लहानपणी बरीच मस्ती केलेली दिसतेय. आता उगाच पोराच्या नावाने खडे फोडू नकोस.
बिपिन कार्यकर्ते
26 Mar 2009 - 7:49 am | अजय भागवत
:-)
25 Mar 2009 - 11:31 pm | संदीप चित्रे
प्रत्येकवेळी तुझ्याबद्दल नवीनच माहिती मिळते :)
आमच्याही शाळेत 'बेट' लावण्याची (मराठी शाळेतल्या उच्चाराप्रमाणे 'बीट' !) लागणच असायची जणू.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
25 Mar 2009 - 11:51 pm | चतुरंग
एकदम खुसखुशीत लेखन शितल.
आज जेवण काही न जाळता, करपता, खाण्यालायक तू बनवू शकलीस तर तू सांगशील त्या हॉटेल मध्ये किंवा आठवडाभर नेहमी रात्री जेवून झाल्यावर मस्तानी देईन......
हे आवडलं!
लहानपणचा एकदम फेमस प्रकार असतो. कसल्याही पैजा लावल्या जातात आणि पूर्ण केल्या की लय भारी वाटतं!
चौथीत असताना एकदा शाळेची घंटा मधल्या सुट्टीच्या आधीच वाजवायची अशी पैज लागली आणि एकाने वाजवली की!
शिक्षक गोंधळले, वर्गातून मुले बाहेर पडली आणि मुख्याध्यापकांना खरा प्रकार समजल्यावर त्या मुलाच्या कानाखाली त्यांनी घंटा वाजवली! ;)
मी माझ्या मामेभावाशी आणि मावसभावाशी पैज लावून गच्चीवरुन अंगणात उडी मारली! रात्रीच्या अंधारात १५ एक फुटांवरुन उडी मारली आणी पैज जिंकली खरी पण डाव्या टाचेखाली दगड आला आणि टाचेच्या हाडाला हेअरक्रॅक गेली! तेव्हापासून असल्या अघोरी पैजा मारणे बंद झाले!
चतुरंग
26 Mar 2009 - 12:11 am | विनायक पाचलग
सध्या आठवणारी
दोन आठवड्यापुर्वी मी व माझा मित्र याने कोण जास्तीत जास्त ट्रीपल नुडल ( एक शाकाहारी चायनीज पदार्थ) खातो अशी पैज लवलेली
पण जिंकलो मी त्यामुळे आहे लक्षात
When god solves your problem You have faith on his abilities.But when he does not solve your problems,Remember He has faith in YOUR ABILITIES
विनायक पाचलग
26 Mar 2009 - 12:11 am | रेवती
पैज लावणे हा एक आवडता प्रकार आहे.
तू लेखासाठी अगदी भन्नाट विषय कसे काय निवडतेस?
खासकरून शाळेत असताना कोण कश्यावरून पैज लावेल
हे सांगता येत नाही. माझ्या वर्गात दोन मुलींची कायम
कशावरून तरी पैज लागलेलीच असायची. आमचे कान त्यांच्या
हरण्या जिंकण्याकडे लागलेले असत.
आज बाईंच्या साडीचा रंग कोणता हा पैजेचा विषय कसा काय होऊ शकतो?;)
रेवती
26 Mar 2009 - 12:17 am | शितल
>>आज बाईंच्या साडीचा रंग कोणता हा पैजेचा विषय कसा काय होऊ शकतो?
=))
26 Mar 2009 - 12:31 am | प्राजु
पैज जबरदस्त असते.
माझ्या मैत्रीणीशी पैज लावली होती मी कॉलेजमध्ये असताना.
समोर एक मुलगा बाईक वर बसून गप्पा करत होता.. तिथे जाऊन त्या बाईक चा आरसा वळवून एका बाजूला फिरवायचा.. अशी पैज लागली.
मी गेले... त्याच्याजवळ गेल्यावर हळूच हसले.. तो ही हसला. मग सावकाश त्या बाइकच्या आरशाला हात लावला आणि एकदम फिरवला आरसा. तो मुलगा एकदम चपापला. मला म्हणाला "ऐसा क्यू किया??" मी म्हणाले.. "मुझे नही मालूम.. वो सामने पिंक ड्रेस मे लडकी है ना उस से जाके पुछो." =)) =))
बिचारा.. काही न करता बाईक काढून निघून गेला. मला मात्र मामाच्या कँटीनमध्ये कटवडा मिळाला. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
26 Mar 2009 - 12:43 am | चतुरंग
नेहेमीप्रमाणेच कॉलेजचे टोळके उभे. एक जाम काळा माणूस रस्त्याने पायी निघालेला.
एक पंटर दुसर्याला म्हणतो "भिडू, माझ्यामागे मोटरसायकल वर बसायचं. त्या माणसाजवळून नेईन. त्याला मोठ्ठ्याने "ए कावळ्या!" अशी हाक मारायची! एक एसपीडीपी मी खिलवणार. बोल घेतोस का पैज?"
भिडू तयार, दोघे गाडीवरुन सुटले.
त्यामाणसाजवळून जाताना भिडू ओरडला "ए कावळ्या!"
थोडी पुढे नेऊन पंटरने गाडी रस्त्यात उभी केली की!! भिडू बोंबलतोय "ए, हे काय? अरे चल की, तो आला आला! अरे चल!!"
शेवटी हा चलत नाही असे बघून भिडू उतरुन एकदम बुंगाट फरार!!
आजूबाजूचं पब्लिक हसून येडं!!! =))
चतुरंग
26 Mar 2009 - 12:48 am | प्राजु
=)) =)) =))
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
26 Mar 2009 - 12:54 am | शितल
=)) =))
प्रसंग डोळ्या समोर तयार झाला.
आमच्या कॉलेज मध्ये दोन मुलांची पैज लागली होती की लेडिज रूम मध्ये जाऊन यायचे, एकजण आला एल्.आर. मधील मुली झुरळ आल्या सारख्या किंचाळल्या मग काय शिपाई धावत एल्.आर कडे आले , ब- बडदले मुलांना, ही गोष्ट थेट प्रिन्सिपलला कळली, दोघांना वाईट मार पडला तो पडला प्लस कॉलेज मधुन हकलपट्टी ही झाली. :(
26 Mar 2009 - 12:26 pm | दशानन
भन्नाट !!!
26 Mar 2009 - 12:52 am | बिपिन कार्यकर्ते
च्यायला!!! पब्लिकच काय... मी पण हसून हसून वेडा झालो...
=)) =)) =))
बिपिन कार्यकर्ते
26 Mar 2009 - 2:50 am | संदीप चित्रे
प्राजुच्या घरी तू हा किस्सा सांगितलेला आठवून पुन्हा हसलो :)
26 Mar 2009 - 1:39 am | भाग्यश्री
सह्ही लिहलंयस गं!!!
पैज वाचून मला "एक आगळी- वेगळी पैज" हे आठवलं! अफलातून आहे तो किस्सा... !
26 Mar 2009 - 2:23 am | योगी९००
मुळ लेख आणि प्रतिक्रिया वाचून जाम हसलो.
चतूरंगचा वैशाली बाहेरचा भिडूचा किस्सा तर भन्नाटच..
पैज लावणे यावर कोठकोठले चित्रपट आलेत..मला तर खिलाडी हाच फक्त आठवतोय.
खादाडमाऊ
26 Mar 2009 - 12:33 pm | परिकथेतील राजकुमार
लेख तर मस्तच आहे आणी प्रतिक्रीया पण एकदम लाजवाब ;)
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
26 Mar 2009 - 2:46 am | चित्रा
छान उत्स्फूर्त लेखन. आवडले!
करमणूक झाली :)
आम्हीही बेट लावायचो, पण बर्याच लोकांच्या मानाने फारच भोटम असू असे वाटते आहे. :(
26 Mar 2009 - 5:49 am | चित्रा
आत्ताच नवर्याशी बोलताना एक पैज लावण्याची वेळ आली आणि या लेखाची आठवण आली :)
आंब्याच्या (पिकलेल्या) आतल्या कठीण "बी" ला "कोय" म्हणतात की "बाठ"? मी म्हणते बाठ, आणि तो "कोय" म्हणतो. मी कैरीच्या (न पिकलेल्या आंब्याच्या आतल्या ) बीला कोय म्हणते.. नक्की काय खरे?!
26 Mar 2009 - 6:10 am | शितल
मी ही "बाठ"म्हणते. बहुतेक कोकणात बाठ म्हणत असावेत.
26 Mar 2009 - 7:33 am | सहज
बाठ शब्द ऐकला आहे. आंब्याची कोय, कैरीचा बाठ असावा.
मी लावलेल्या पैजा अश्या साध्याच, जनरल नॉलेज संबधीत. वरचे किस्से मात्र अफलातूनच!
लेख, प्रतिसाद वाचायला मजा आली. :-)
26 Mar 2009 - 7:38 am | प्राजु
हो.. कैरीची बाठ.. आंब्याची कोय.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
26 Mar 2009 - 12:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आमच्याकडे आम्ही उलट म्हणतो, कैरीची कोय आणि आंद्याची आंब्याची बाठ! (पहा कसा अनुप्रास पण होतो, कैरीची कोय, आंब्याची बाठ!)
लिहीताना आंबाच लिहायचं होतं, पण चुकून आंद्या लिहिलं गेलं; मग त्याला चिडवायची अंमळ संधी घेतली!
अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
26 Mar 2009 - 12:55 pm | आनंदयात्री
पैज लेख मस्तच जमलाय .. आठवणी काढायला लावणारा. भाग्यश्रीने दिलेला दुवा पण असा जुन्या आठवणी जागवणारा :D
बाकी आम्ही पैजा लाउन बर्याच लोकांच्या अदित्या .. सॉरी सॉरी फजित्या केलेल्या आहेत .. आंतरजालावर अजुनही करतो !!
26 Mar 2009 - 4:34 pm | चतुरंग
त्याने रसाच्या चवीत काय फरक होणारे? माझा मतलब आमरसाच्या वाडग्याशी!
तुमच्या दोघांपैकी मला जे कोणी आमरस देईल त्याप्रमाणे मी म्हणेन, लावा पैज!! ;)
(अवांतर - माझ्या मते हे कोय आणि बाठ दोन्ही शब्द समानार्थी आहेत. बांठा हा शब्द मात्र पिकलेल्या आंब्याच्या कोयीसाठी आहे असा स्पष्ट उल्लेख मोल्सवर्थ शब्दकोषात दिसतो.)
चतुरंग
26 Mar 2009 - 6:46 am | मीनल
लेख आवडला.
पैज हरण्याच्या भितीने रिस्की पैजा मी लावतच नाही.
लावलीच तर घरच्या घरी. सोडून देतील मला बिचारी म्हणून, असं वाटत. :))
कैसा लगा मेरा आयडिया? =D>
26 Mar 2009 - 8:43 am | शिप्रा
लेखाचा विषयच मस्त आहे ग
>>लग्ना नंतर नवर्याबरोबर अनेक गोष्टी पैज लावून वसूल केल्या
हे बेष्ट्च :)
26 Mar 2009 - 12:23 pm | स्वाती दिनेश
शीतल,
पैजा आवडल्या, मस्त लिहिले आहेस.
वरचे प्रतिसादातले किस्सेही हसवून गेले.
स्वाती
26 Mar 2009 - 12:44 pm | विशाल कुलकर्णी
बीटा आमी बी लावायचो. येका टायमाला तोंडात बसतील तेवड्या शिगरेटी ठेवुन वडायची पैज जिकली व्हती, लै म्हागात पडली पगा. बीट धा रुप्याची आन आटवडाभर आमचा मारूती जाला व्हता !!
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
26 Mar 2009 - 2:00 pm | जयवी
शितल.... मस्त तार छेडली आहेस :)
सगळ्यांचेच किस्से जबराट ......मजा आ रहा है..... !!
26 Mar 2009 - 5:04 pm | सुधीर कांदळकर
नांवाचा मित्र शिवाजी पार्कला सेनापति बापटांच्या पुतळ्याजवळ मेन रोडला लागूनच पहिल्या मजल्यावर राहातो. त्याला रस्त्यावरून हाक मारायची एकानें पैज लावली. पैज होती एक कोक. तेव्हा कॉलेजांत अस्तांना कोक ही फार मोठी गोष्ट होती. त्यात काय कोणीहि हाक मारेल असे समजून मी जोरदार हाक मारली. किरण लगेचच गॅलरीत बाहेर आला. ताबडतोब खाली आला. बरोबरचे दोघेतिघे सगळे गायब. काय झाले मला कळेना. मग किरणनें सांगितलें कीं बरोब्बर समोरच्या फुटपाथवरच्या पहिल्याच मजल्यावर एक किरण नावाची मुलगी राहात असे. ती पण बाहेर येत असे. पण तिच्या घरचे पण कोणीतरी बाहेर येऊन हाक मारणार्याला दम देत असे.
अजून एक किस्सा. महापौर बंगलाला लागून समुद्रावर जाणारा रस्ता आहे. त्या रस्त्याच्या नावाची जांभळ्या रंगाची पाटी कोपर्यावर होती. महापौर बंगल्याच्या विरुद्ध बाजूला. त्या पाटीवर जोरानें फटका मारून मोठ्ठा आवाज करायचा अशी पैज एकानें लावली. मी आवाज केला. सगळे पळाले. मीं मूर्खासारखा तिथेच उभा. पहिल्यामजल्यावर गॅलरीत एक मोठ्ठा अल्सेशिअन कुत्रा बांधलेला होता. तो जोरानें भुंकायला लागला आणि आतून एक मध्यमवयीन महिला बाहेर आली व आत्ता कुत्र्याला खाली सोडते म्हणून दम द्यायला लागली.
मी सॉरी म्हणून काढता पाय घेतला.
लेख आणि प्रतिसाद दोन्ही झकास.
सुधीर कांदळकर.
26 Mar 2009 - 5:11 pm | चंद्रशेखर महामुनी
शितल ! लेख छानच...
आणी तुझ्या मुळे तु अनेकांना लिहायला प्रवृत्त पण केलेस !
26 Mar 2009 - 5:27 pm | मि माझी
लेख आणि प्रतिसाद दोन्ही झकास.
सहमत...
मी माझी..
पुणेकर होण्यासाठी तूम्हांला कोणत्यातरी गोष्टीचा जाज्वल्य अभिमान बाळगण आवश्यक आहे..!!
26 Mar 2009 - 6:15 pm | शितल
"पैज" वाचकांचे ती आवडल्याचे कळविणा-यांचे मनापासुन आभार. :)
प्रतिसादात ही मस्त किस्से आहेत. :)
26 Mar 2009 - 8:21 pm | क्रान्ति
मस्त लेख आणि मस्त प्रतिसाद! आज मीच खूप उशिरा आलेय मिसळपाव खायला! मी मात्र कधी पैजेचे विडे उचलल्याचे फारसी आठवत नाही. पण सगळ्यांचे किस्से वाचून मजा आली.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
27 Mar 2009 - 1:00 am | वाहीदा
कॉलेज मध्ये असताना आमचा एल सी आर (लेडीज common रुम ) पहील्या मजल्यावर होता अन तिथून कॉलेज चा मेन सभाग्रुह दिसायचे अन प्लेग्रांउन्ड ही... वर्गात किंवा नाट्य स्पर्धेत आमची ज्या ज्या मुलांवर सगळ्यात जास्त खुन्नस असेल त्या त्या मुलांवर कसा हल्ला बोल करायचा याची आम्ही मुली "पैज" लावायचो. जास्त करून रंगपंचमी च्या आद्ल्या दिवशी आम्ही ह्या आमच्या बकरे लोकांवर तिकष्न नजर ठेवायचो अन मग फुगे मारुन मारून हैराण करायचो .. कधी कधी समोरून अचानक घोळक्याने जाऊन त्यांच्यावर कारण नसताना फिदी फिदी हसायचो... त्यांच्या बाईक ची हवा काढ्ण्यात मी पटाईत होते..
पैज जिकण्याची खुशी वेगळी होती मग आम्ही सगळया ईराण्याच्या होटेलात जाऊन चहा प्यायचो आता ती होटेल्स फार कमी झाली आहेत अन तो चहा तर अजून ही रेंगाळ्तो आहे .... Lingering taste of Toghetherness !!
एकदा मी, माझा ग्रुप अन माझ्या एका मैत्रीणी (शबनम) ने एका अरबाला लुट्ले होते तो अरब (अली ) तिच्या वर्गात होता. तो होता तिच्या प्रेमात. तिला त्याने बाहेर जेवायला बोलावले मग काय शब्बी ने हे सर्वांना सांगीतले मग आमचा सर्व ग्रुपने ठर विले महागडे होटेल फि़क्स केले ..आधी शब्बी जाईल मग आम्ही हळू हळू तिथे जमू असे करून आम्ही १३ जण जमलो अन त्या सर्वांचे बिल त्या अली ला द्यायला लावले. ईतके खाल्ले त्या दिवशी बापरे अन त्या अली शी ईतक्या गप्पा मारल्या त्याला जेवायलाच दिले नाही ! तो वेडा प्रेमात होता ना... नाही जेवला नीट :-)
गेले ते दिवस :-( पण काय मज्जा केली :D
27 Mar 2009 - 1:17 am | विसोबा खेचर
शीतल मॅडम, मस्तच लेख! :)
बाकी आमचं तर आयुष्यच साला पैजा मारण्यात आणि त्या हारण्यातच ;) गेलं!
आपला,
(पैजबाज) तात्या.
27 Mar 2009 - 1:33 am | विसोबा खेचर
मिपाचे संपादक कुणालाही कसलेही उत्तर देणे लागत नाहीत हे कबूल. परंतु येथील बिपिनरावांचा प्रतिसाद का संपादित केला गेला याचं कारण कळल्यास बरे होईल!
सदर विषय हा पैजेशी निगडीत आहे आणि 'मिपाचा जन्मदेखील पैजेतूनच झाला' इतकंच बिपिनरावांनी लिहिलं होतं जे १०० नव्हे १००० टक्के खरं आहे!
बिपिनरावांचा सदर प्रतिसाद पुन:प्रकाशित करण्याचे अधिकार आम्ही राखतो परंतु आम्ही तसे करणार नाही! आम्ही संपादकांच्या मर्जीबाहेर नाही..
आपला,
(उदास!) तात्या.
27 Mar 2009 - 1:35 am | प्राजु
हाच एकमेव हेतू आहे. आणि बिपिनदाशी चर्चा करूनच अप्रकाशित करण्यात आला आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
27 Mar 2009 - 1:37 am | बिपिन कार्यकर्ते
प्राजुने मला संपर्क केला आणि मला तीचा मुद्दा निर्विवादपणे पटला. म्हणून मी स्वत:च म्हणले की उगाच अवांतर / विषयांतर नको, प्रतिसाद उडवला तरी चालेल, किंबहुना उडवच.
माझी काहीही तक्रार नाही. :)
बिपिन कार्यकर्ते
27 Mar 2009 - 9:16 am | यशोधरा
मस्तच लिहिलं आहेस गं शीतल!