गमतीशीर देवपुजा

रम्या's picture
रम्या in जनातलं, मनातलं
18 Mar 2009 - 3:52 pm

मी हल्ली आठवड्यातून एक दिवस तरी घरातल्या देवाची पुजा करतो. रोज करायला अजून तरी जमलेलं नाही. देवपुजा झाल्यावर देवाबरोबर आईच्याही पायाला हात लावतो. वाटेतल्या सगळ्याच नाही पण बर्‍याच देवळासमोरून जाता जाता नमस्कार करतो. कधी कधी लांबच्या देवदर्शनाला सुद्धा जातो. पण आजही देवासमोर उभं असताना तो गमतीदार किस्सा आठवतो...

लहान पणी मी नास्तिक, विज्ञाननिष्ठ वगैरे काही तरी होतो. मी कधी देवळात जात नसे, घरातल्या देवाची पुजा करीत नसे. वडील सुद्धा देवभोळे होते असं नव्हे. पण देव, धर्म याचं कधी स्तोम माजवलं नाही. आई मात्र देवपुजा, इतर प्रथा आवर्जून पाळत असे. गिरणीकामगाराच्या घराला साजेसं असं देवालय आमच्या घरात होतं. एक लाकडी फळी भिंतीवर डोक्याच्या उंचीला आडवी मारलेली. त्यावर लाकडी चौकटीतील देव. टिटवाळ्याचा गणपती, महालक्ष्मी, दत्तगुरू आणि एक गोंडस बालकॄष्ण. बालकॄष्णाचा फोटो म्हणजे चक्क कोणतं तरी भेटकार्ड किंवा लग्नाची पत्रिका की असंच काहीतरी होतं. आईला तो बालकॄष्ण फार आवडला म्हणून तिच्या सांगण्यावरून त्याला फ्रेम बनवून देवाच्या फळीवर बसवलेला. अशा सगळ्याच देवाची रोज पुजा होत असे. ज्याला माझ्या लेखी काही अर्थ नव्हता. याविषयावरून माझे इतरांशी बरेच वादंग होत. माझा विज्ञानवाद, वैज्ञानिक दॄष्टिकोन सगळ्यांच्या डोक्यावरून जात होता. आणि त्यांचं उठसुठ प्रत्येक गोष्टीत घुसवलेला धर्म आणि देव माझ्या डोक्यावरून जात होता. माझं प्रत्येक गोष्टीचं वैज्ञानिक पातळीवरून केलेलं विश्लेषण इतरांना नेहमी अतिशहाणपणाचं वाटे, 'हा एवढाच शहाणा आणि जगातले इतर मुर्ख?' असे इतरांना वाटे. आणि इतरांचं 'चमत्कार होऊ शकतात' या विधानाचं पुरावा म्हणून रामायणातल्या रामाने सोडलेला ब्रम्हास्त्राचा दाखला ऐकून माझं टाळकं फिरत असे आणि या वादाचं पर्यवसान नेहमी भांडणात होत असे. पण हे चार पार वर्षापुर्वीचं सांगतोय. म्हणजे मी आता काही खुप पोक्त आणि अस्तिक झालोय असं नाही. पण काम धंद्याच्या निमित्ताने म्हणा किंवा इतर काही कारणास्तव म्हणा माझा वेगवेगळ्या प्रांतातील, धर्मातील लोकांशी संबध आला. आपलं बोलणं दुसर्‍याला घसा फोडून पटवून सांगण्यापेक्षा त्याचं पुरेसं ऐकून त्याच्या मनस्थितीचा अंदाज घेऊन हळूहळू सुचवून सांगण्यात शहाणपणा आहे हे कधीतरी उमगलं. असे बरेच अनुभव ऐकून घेतल्यानंतर देव, धर्म, अस्तिकपणा, नस्तिकपणा या सगळ्यांच्या माझ्या मनात असलेल्या संकल्पना धडाधड ढासळत गेल्या आणि पुर्णपणे विज्ञाननिष्ठ कसोट्यांवर आधारलेली जिवनशैली जगातला कोणताही समाज स्विकारू शकत नाही या निष्कर्शाप्रत मी कधीतरी आलो.

हा गमतीदार किस्सा माझ्या त्या स्थित्यंतराच्या काळातील आहे.

घराची पुनर्बांधणी झाली आणि त्या लाकडी फळकूटावरचे देव लक्ष्मी, दत्तगुरू, तो आईचा आवडता बालकॄष्ण सगळेच देव खाली उतरवण्यात आले. त्याऐवजी एकच छानसा छोटासा देव्हारा आणि त्या देवार्‍याला साजेशी अशी गणपतीची छोटीशी मुर्ती आणली. आईला नाहीच आवडला तो देव्हारा आणि ती देवाची मुर्ती. पण शेवटी तो देवच ना, असं म्हणून आईने मोठ्या मनाने त्याला स्विकारलं. वीत-दीड वीत उंचीचा देव्हारा आणी दोन तीन इंच उंचीचा गणपती! पहिल्या दिवशी गणरायाला देव्हार्‍यात बसवून आईच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित पुजा केली. सकाळी उठून बघतो तर गणराय उजवी कडे तोंड करून बसलेला. काय चमत्कार झाला काय असं म्हणून पुन्हा त्याला समोर तोंड करून बसवला. दुसर्‍या दिवशी पाहतो तर गणराय डावीकडे तोंड करून बसलेला! तिसर्‍या दिवशी तर गणराय पुर्णपणे पाठ दाखवत देव्हार्‍याच्या एका कोपर्‍यात रूसल्यासारखा बसलेला! नंतर लक्षात आलं शेवटी उंदीर म्हणजे गणरायाचं वाहन. तोच त्या लहान मुर्तीला जाता येता धक्के मारून वाहून नेत होता. बाकी त्या मुर्तीच्या आकाराचा गणपती सहज त्या खर्‍याखुर्‍या उंदरावर बसू शकला असता. शेवटी गणरायाच्या मुर्तिच्या तळाला गोंद लावून त्याला शांत एका जागेवर बसण्याची शिक्षा देण्यात आली!
पहिले काही दिवस व्यवस्थित पुजा झाली. पण परत गणरायाला वाईट दिवस आले. त्यावर धूळ बसू लागली. हार, फुलं सुकू लागली. एके दिवशी आई आमच्यावर चिडली. लगोलग साफसफाई करायला घेतली. देवारा भिंतीवरून उतरवला. देवारा आणि गणराय दोघानांही निरमा डिटर्जंटने चांगली घासून पुसून आंघोळ घातली, लख्ख केले, पंख्याखाली ठेवून वाळवले. देव्हारा पुन्हा भिंतीवर अडकवला. आई चिडलेली असल्याकारणाने ती लक्ष देत नव्हती. तुमचं तुम्ही काय करायचं ते करा म्हणून आई आपल्या कामात मग्न होती. इकडे मी ही मग गंभीरपणे आठवतील तेवढ्या पुजाविधी करत होतो. वर सांगितल्याप्रमाणे माझा स्थित्यंतराचा काळ असल्यामुळे माझं देवपुजेविषयीचं ज्ञान जेमतेमच होतं. आधी गंध लावायचा कि आधी हार घालायचा काही कळत नव्हतं. पणती ठेवायची की उदबत्ती लावायची? का दोन्ही लावायचं? बरं नक्की पणती म्हणायचं कि निरांजन म्हणायची हे अजूनही माहीत नाही. सगळा घोळ झाला होता. कशाचा कशाला पत्ता लागत नव्हता. मुळात काही सामान सापडत नव्हतं. आईला विचारण्याची सोय नव्हती. शेवटी गंध नाहीच सापडला. देव्हार्‍याला हार घातला. मुर्ती लहान असल्याने पुर्ण देव्हार्‍याला हार घालायची पद्धत आमच्या घरात रूढ झाली होती. फुलं देव्हार्‍यात ठेवली. पणती/निरांजन तेवढी आईने तयार करून दिली. ती देव्हार्‍याची ड्रॉव्हरसारखी फळी असते त्यावर ठेवली. सुगंधी अगरबत्ती पेटवून घंटीच्या किणकिणाटात देव्हार्‍यावरून एक-दोनदा फिरवली. हात जोडून नमस्कार केला. 'हे इश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे...' ही प्रार्थना मनातल्या मनात म्हटली. आणि झालं एकदाचं म्हणून टि. व्ही समोर बसलो.

मग माझे बंधूराज देवासमोर नतमस्तक झाले. मान वर करून विचित्र नजरेने देव्हार्‍या कडे पाहू लागले. एकदा माझ्याकडे त्याच विचित्र नजरेनं पाहीलं. मग पुन्हा देव्हार्‍यातील फुलं विस्कटली. खात्री झाल्यावर माझ्याकडे वळून मोठ्याने म्हणाले,
"देव कुठे आहे रे ए?"
मी ही मग फुलं विस्कटली. गणपती कुठं सापडतो का पाहीलं. गंध, घंटी सापडत नाही तो पर्यंत ठीक होतं. पण देवपुजा झाल्यावर देवच हरवणे हे काही झेपत नव्हतं. बंधूराज हसत होते आणि मी डोकं खाजवत कुठे बरं गणपती गेला असेल हा विचार करत होतो.
शेवटी गणपती पंख्यासमोर ठेवलेला सापडला. मघाशी गणपतीला आंघोळ घातल्यानंतर सुकण्यासाठी पंख्यासमोर ठेवला होता. हद्द म्हणजे मी तो तिथेच विसरलो आणि चक्क रिकाम्या देव्हार्‍याची पुजा केली होती !!!!!!!
आईने डोक्यावर हात मारला. बंधूराज खो खो हसू लागले. भलताच खजील झालो मी. पण मलाही मग हसू आवरलं नाही. पुन्हा गणरायाला देव्हार्‍यात बसवून पुजा केली.

मग काही दिवसांनी एक नवीन मोठ्ठा देव्हारा घेतला. त्यावर पुर्वीसारखे चौकटीतले देव बसवले, एक सोडून चांगले तीन देव आणले आणि ते देव्हार्‍या बाहेर निघणार नाही याची आवर्जून व्यवस्था केली. कितीही फुलांचा ढीग ठेवला तरी देव दिसतील याची व्यवस्था केली. देवाला गंध लावल्याशिवाय पुढे जायचं नाही असा अलिखित नियम केला.
आता मात्र माझ्याकडून अशा चुका होत नाहीत. प्रत्येक पुजा बरोबर होणार याची शंभर टक्के ग्यारंटीची खात्रीच.

मौजमजाअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

विसुनाना's picture

18 Mar 2009 - 4:17 pm | विसुनाना

अनुभव आवडला.
भल्याभल्यांना जे शक्य होत नाही ते तुमच्या हातून घडले. निर्गुणाची सगुण पूजा केलीत.
शेवटी 'भाव तेथे देव' हेच खरे.
धन्य झालात!

मीनल's picture

18 Mar 2009 - 6:47 pm | मीनल

मजा वाटली वाचून.
एकदा आमच्या घरच्या देवाची एक प्रतिमा निर्माल्यात गेली होती.

माझा मुलगा देवाला नैवेद्य दाखवताना ताटाभोवती तीन वेळा पाणी फिरवतो.
फिरवताना १,२,३,आणि मग `स्टार्ट` असं म्हणतो.

मीनल.

रेवती's picture

18 Mar 2009 - 7:23 pm | रेवती

फारच मजेदार गोष्टं.
अगदी प्रामाणिकपणे सांगितलेली आहे असे कळते.
वरचे प्रतिसादही आवडले.
आमच्या लहानपणी आधी आजी, आजोबा, पुजा करायचे.
नंतर बाबा पुजा करायचे. अधी गडबडीमुळे त्यांना जमलं नाही तर
आम्ही तिघं मिळून दोन मिनिटात पुजा उरकायचो.
मिनल,
आजी, आजोबा यांचं वय झाल्यावर त्यांना दिसायचं नाही तेंव्हा
आमच्याकडेही कधीकधी देव निर्माल्यात जायचे.
बर्‍याचवेळा आई निर्माल्य तपासायची ते आठवलं.:)

रेवती

क्रान्ति's picture

18 Mar 2009 - 8:56 pm | क्रान्ति

खूप मजा वाटली वाचून. रिकामा देव्हारा आणि गणपतीला फिरवणारा उन्दीर डोळ्यांसमोर उभा केलाय!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

प्राजु's picture

18 Mar 2009 - 8:59 pm | प्राजु

एकदम मजेदार अनुभव.
शैलीही छान आहे. अजूनही आवडेल वाचायला.
माझ्या आजीने बळजबरीने माझा भावाला एकदा पूजा करायला लावली.
त्याने तोपर्यंत कधीही देवघरात पाऊलही ठेवले नव्हते. आजीने रागावून त्याला आज पूजा तूच करायची असं सांगितलं. धुसफुसत काहीशा ना खुशीने त्याने आजीला पूजा कशी करतात हे विचारलं. तीनं सांगितलं.
झालं!!!! हा गेला देवघरात. आणि समोर पाटावर बसून छान पूजा करून बाहेर आला. थोड्यावेळाने आजी पुन्हा त्याला रागावू लागली.
काय झालं म्हणून विचारलं तर, "अगं!!!! कार्ट्यानं निरांजनाची ज्योत बघ कशी मशाली सारखी लावली आहे. इतकी मोठी काढतात का वात?? आणि सगळे देव एकमेकाशी गोल करून गप्पा मारत बसल्यासारखे एकमेकाकडे तोंड करून ठेवले आहेत. असे ठेवतात का? देवांची तोंड आपल्याकडे नकोत का?" असं म्हणून आजीने पुन्हा तिचं रागावणं कंटीन्यू केलं.. ;)
मी मात्र तिच्या भितीने पळत पळत बाहेर आले आणि मगच जोरजोरात हसू लागले. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अनामिक's picture

18 Mar 2009 - 10:05 pm | अनामिक

देवांना दररोज शिस्तीत बसवण्यापेक्षा, एकमेकांकडे तोंड करुन गप्पा मारत बसू देण्याची कल्पना छान आहे :) .

शक्तिमान's picture

18 Mar 2009 - 11:23 pm | शक्तिमान

खरंच गमतीशीर आहे...

भडकमकर मास्तर's picture

19 Mar 2009 - 12:00 am | भडकमकर मास्तर

छान लेख...
आवडला...

अवांतर : हे वाचून अजून तरी कोणी चिडलं नाही, कोणाच्या भावना दुखावल्य नाहीत आणि कोणी शापवाणी उच्चारली नाही हे पाहून खूपच आनंद झाला.
काय आहे, हल्ली काय फास्ट भावना दुखावतात ना..
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

ऍडीजोशी's picture

19 Mar 2009 - 4:42 pm | ऍडीजोशी (not verified)

मास्तर काय बोलावं अशा लोकांपुढे. ह्यांच्या घरी झालेले देवाचे हाल बघून देवाबद्दल सहानुभूती वाटली. इच्छा नाही तर नका आणू मूर्ती घरी. पण आणली की मग तिची व्यवस्थीत पूजा करा. रोज स्वत: ला अंघोळ घालायला वेळ आहे, देवासाठी ५ मिनीटं नाहीत. चांगलं आहे.

शेवटी गणरायाच्या बुडाला फेवीकॉल लावून
अशी भाषा देवाच्या बाबतीत वापरावी ह्याचं दु:ख आहेच. पण बोलून काहिही फायदा नाही.

देवावर पूजा करून आपण उपकार करत नाही हे लक्षात ठेवा.

भाग्यश्री's picture

19 Mar 2009 - 12:03 am | भाग्यश्री

उंदराचा किस्सा भारी आहे हो! अगदी मनापासून हसू आलं गणपतीची मूर्ती हलणं वाचून! :)
चांगले लिहीलेत..
मलाही देवपूजा कशी करायची गंध नव्हता..
आई बाबा महीना दिड महीना नव्हते तेव्हा मी पूजा करून करून इतकी पटाईत झाले..
आणि त्याहीपेक्षा मला आवडायला लागलं ते सगळं करणं.. छान मनापासून पूजा केली, देवांना नीट आंघोळ घालून गंध, अष्टगंध लावून, फुलं वाहीली.. उदबत्तीचा वास आला.. आरत्या म्हटल्या शेवटी मंत्रपुष्पांजली म्हटली की काय शांत वाटतं!

देवघर एका विशिष्ट जागी असावं असं म्हणतात.. घराचं इंटेरिअर करताना आर्कीटेक्टने सांगितली होती ती दिशा.. व तसंच अप्रतिम डिझाईन केलं होतं देवघर ! त्याचाही फरक पडला की काय माहीत नाही, नाहीतर काही वर्षांपूर्वी मी देव-बिव मानत नसे..

अनिल हटेला's picture

19 Mar 2009 - 9:47 am | अनिल हटेला

रम्याचा लेख आणी त्यावरच्या प्रतीक्रिया एक से बढकर एक !!

:-D :-) :-D
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

रम्या's picture

19 Mar 2009 - 11:25 am | रम्या

सर्वांच्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद!

बाकी भडकमकर मास्तरांना वाटणारी भिती मला तर पहिल्यापासूनच वाटत होती. पण अजून तरी मी सुदैवीच आहे!!

असो. प्रतिसादांबद्दल पुन्हा एकदा आभार!!

आम्ही येथे पडीक असतो!

ऋचा's picture

19 Mar 2009 - 12:46 pm | ऋचा

मस्त लिहिलाय लेख.
मी पण पुजा करत नसे.पन लग्न झाल्यापासुन जसा वेळ मीळेल तशी आणि जमेल तशी पुजा करते
देवांना राग नाही आला म्हणजे मिळवल ... :)
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Mar 2009 - 2:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आवडला लेख!
मी काही पूजेच्या भानगडीत पडत नाही, डोळा कायम प्रसादावरच (गैरसमज नको, डोळा कायम फुटाणे, बेदाणे आणि पेढ्यांवर)!

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

सहज's picture

19 Mar 2009 - 4:54 pm | सहज

लेख अंमळ मजेशीर आहे. बहुदा लिखाळ यांच्यामते बदलत्या काळातील बदलत्या मुल्यांचे प्रांजळकथन. अश्या लेखाला प्रतिसादातुन फारसा विरोध दिसत नसल्याने कर्मकांडातुन आजचा समाज स्व:ताला किती वेगळा करु पहात आहे याचे प्रत्यंतर येते आहे.

गणपती बाप्पा मोरया!

समीरसूर's picture

19 Mar 2009 - 5:47 pm | समीरसूर

आवडला अनुभव. एकेकाळी मी खूप उत्साहाने देवपूजा करायचो. पण फुले नसतील तर मला पूजा करायला कंटाळा येत असे. खूप फुले असतील तर मी अगदी मन लावून पूजा करत असे. ताज्या, रंगीबेरंगी फुलांनी सजलेलं देवघर, चंदनाच्या सहाणीवर तयार केलेले गंध आणि त्याचा मंद दरवळ, शांत तेवत असलेली समई, दोन-तीन उदबत्त्यांचा पसरलेला धूर आणि सुवास आणि नुकत्याच झालेल्या आरतीचे आणि कापराचे तबक...वा, खूप छान आणि प्रसन्न वाटते. असं वाटतं की तो देव सतत आपल्या पाठीशी आहे. आता माझी बायको पूजा करते आणि तितक्याच तन्मयतेने करते. सकाळी ऑफीसला जाण्यासाठी निघतांना एक उदबत्ती लावून मनोभावे नमस्कार करून निघालं की मन प्रफुल्लित होऊन जातं. दोन्ही एकादशी आणि महाशिवरात्रीला मी देव उजळून काढत असे. पितांबरी, चिंच आणि रांगोळी वापरून २-२.५ तास बसून मी देवाची पूजा करत असे. लख्ख झालेले देव प्रसन्न होऊन आशीर्वाद देत असल्याचा भास होत असे. मनोभावे केलेली पूजा मग ती गणपतीची असेल, किंवा मनातल्या मनात निसर्गापुढे नतमस्तक होणे असेल; शेवटी एका चांगल्या शक्तीची श्रद्धेने केलेली उपासना एक वेगळेच बळ देऊन जाते हे खरे! नकळत झालेला नमस्कार ही किती बळ देऊन जातो...चांगले वागण्याची बुद्धी मिळणे म्हणजेच देवाची कृपा आहे असे मला वाटते. यश-अपयश, संपत्ती, सुख, प्रसिद्धी इत्यादी सगळं हा आपल्या प्रयत्नांचा, प्रामाणिक इछाशक्तीचा आणि नशीबाचा भाग आहे.

--समीर

लिखाळ's picture

19 Mar 2009 - 6:08 pm | लिखाळ

शेवटी देव देव म्हणजे तरी काय रे ! अरे आपल्याच मनातल्या चांगल्या विचारांचा, आपल्या आपेक्षांचा आपण बनवलेला एक आकृतीबंध ! (वा ! अकृतीबंध हा शद्ब कुठेतरी पेरावा अशी इच्छा होतीच.. देवा तुझ्या कृपेने संधी मिळाली.) अरे निर्गुणाला गुणच नाहित रे. पण मग त्या निर्गुणाचे आपण रे काय करणार. म्हणून सगुणोपासना बरं. अरे देव चराचरात आहे असे मानले तर मूर्तीच्या डोळ्यांतूनच तो पाहतो असे कसे? अरे तो पाहतो असे तरी कसे म्हणावे मग? तो आहेच जिकडे तिकडे.
ऋषींनी म्हणून ठेवले आहे पाहा, ब्रह्मरुपी आहुती ब्रह्माला अर्पण करु, यज्ञाग्नी ब्रह्म आणि आहुती देणारा सुद्धा ब्रह्मच. म्हणजे आपणच देव, फुलांत देव, वाहतो आहोत देवाला.. वाहवा ! सगुणोपासनेची ही मजा आहे बरं ! सगुणोपासनेत मन रमावे म्हणून कर्मकांड. मन रमले की कसले आले आहे कर्मकांड. देवघराचे खांब सुद्धा देव आणि धक्का देणारा उंदीर सुद्धा त्याचा अंश.

आता प्रवचनाची वेळ संपत आली आहे. पण जाता जाता एक रामायणातली कथा सांगुन मग थांबुया !
राम आणि हनुमानाची भेट होते तेव्हा राम हनुमानाला विचारतो, 'तू कोण आहेस?'
त्यावर हनुमान उत्तरतो, देहबुद्धीने सांगता मी तुझा दास आहे, जीवबुद्धीने पाहता मी तुझा अंश आहे. आत्मबुद्धीने पाहता मी आणि तू वेगळे नाहीच. !
-- लिखाळ.

मनिष's picture

19 Mar 2009 - 6:18 pm | मनिष

__/\__

छोटा डॉन's picture

19 Mar 2009 - 6:23 pm | छोटा डॉन

लिखाळमहाराज आजकाल कौनस्या चक्कीचा आटा खातात ?
असेच आपले भोचकपणाचे महान कार्य म्हणुन विचारतो ...

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

विसुनाना's picture

19 Mar 2009 - 6:56 pm | विसुनाना

ऋषींनी म्हणून ठेवले आहे पाहा, ब्रह्मरुपी आहुती ब्रह्माला अर्पण करु, यज्ञाग्नी ब्रह्म आणि आहुती देणारा सुद्धा ब्रह्मच. म्हणजे आपणच देव, फुलांत देव, वाहतो आहोत देवाला.. वाहवा ! सगुणोपासनेची ही मजा आहे बरं ! सगुणोपासनेत मन रमावे म्हणून कर्मकांड. मन रमले की कसले आले आहे कर्मकांड. देवघराचे खांब सुद्धा देव आणि धक्का देणारा उंदीर सुद्धा त्याचा अंश.

हम्म, खरेच आहे.

भडकमकर मास्तर's picture

20 Mar 2009 - 12:08 am | भडकमकर मास्तर

मनीषशी सहमत ..
लिखाळमहाराज की जय...
...
हे प्रवचन पुन्हा पुन्हा म्हणूनही पाहिले... मजा आली...
माझ्या पुढल्या प्रवचनात काही ओळी वापरेन म्हणतो

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

प्रकाश घाटपांडे's picture

19 Mar 2009 - 7:29 pm | प्रकाश घाटपांडे

आजोबा व वडिल यांची तासभर चालणारी देवपुजा पहाणे हा माझा छंद होता. सुरवातीच्या काळात मी बदली कामगार तत्वावर पुजा करीत असे. त्यावेळी कद नेसण्यात होणारी तारांबळ होई. स्टँडर्ड कद हा प्रौढ माणसाच्या साईझला डिझाईन असल्याने मी नेसला कि तो पायात अडकत असे. देवघरातुन पुजा करुन झाले की आमच्याच रामाच्या देवळात पुजा करायला जावे लागे. हातात तांब्या, भांडे ,पळी व तबक सावरत चालताना मधल्या वाटेत ते वारंवार पायत अडके. कधी पडायला होत असे. मग वडिलांनी मला सोवळ्याची अर्धी चड्डी शिवुन घेतली. त्याची नाडी बांधली की झाले. तेव्हा विलॅस्टीक ची आयडिया मला सुचली नव्हती. रम्या जी आपल्या गमतीदार देवपुजा आवडली.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

रम्या's picture

19 Mar 2009 - 7:47 pm | रम्या

>>रम्या जी आपल्या गमतीदार देवपुजा आवडली<<
धन्यवाद!

रम्या जी वगैरे काही म्हणु नका हो. कॉलेज सोडून फक्त सात वर्ष झालीत!! लगीन व्हायचं आहे अजून.
आम्ही येथे पडीक असतो!

श्रावण मोडक's picture

20 Mar 2009 - 12:40 am | श्रावण मोडक

इथंसुद्धा? याला 'शास्त्रापुरते' कॉश्च्यूम म्हणावे का?

प्रकाश घाटपांडे's picture

20 Mar 2009 - 9:49 am | प्रकाश घाटपांडे

एखादा धार्मिक विधी जर शास्त्रवत करायचा झाल्यास त्यात सहसामुग्री ते नियम पालन यात अनेक व्यावहारिक अडचणी यायच्या. खेडेगावात ग्रामजोशी पूजा घालताना रेशीम वस्त्र, अत्तर, चंदन, बदाम अशी मागणी सर्वसामान्य शेतकऱ्याकडे करु लागला तर कसे जमायचे? कारभारणीला जर मम, आत्मना, स्मृतीश्रुती, पुरोणोक्त, फलप्राप्त्यर्थम् असे जर म्हणायला सांगितले तर ते परिस्थितीशी कसे बर सुसंगत होईल? मग ''काका! घ्या चालतं करुन!`` साहजिकच त्यावर तोडगे निघाले. सुपारी कारभारनीचं काम करु लागली. धूतलेलं कापडं सोवळ्याच / पीतांबराच काम करू लागला. खारीक खोबर चालायला लागलं. असे धूप दीप नैवेद्यांना विविध पर्याय निघाले. कायद्यात जर "पळवाटा " सापडतात तर धर्मशास्त्रात का बरं "तोडगे "निघू नये? कालपरत्वे तोडगेच अधिक सामर्थ्यशाली व्हायला लागले.
लग्नपत्रिका द्यायला एखादा माणुस घरी आला तर "शास्त्रापुरती"टोपी डोक्यावर घालावी लागते. मगच ती पत्रिका अक्षदा त्यावर ठेउन दिली जाते. तर अस हे तोडग्याच शास्त्र आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

श्रावण मोडक's picture

20 Mar 2009 - 9:59 am | श्रावण मोडक

छप्परतोड स्पष्टीकरण!!!

शितल's picture

20 Mar 2009 - 2:49 am | शितल

देवपुजा खरोखरच गमतीदार आहे. त्यावेळी तुमच्या घरातल्यांना किती हसु आले असेल तुमचा हा पराक्रम पाहुन ह्याची कल्पना येऊ शकते. :)
माझ्या सासरी मोठा देवारा आहे, देवांची गर्दी आहे देवार्‍यात, दारात फुले, तुळस, बेल असल्याने नेहमी सर्व देवांना इतकी फुले वाहतात की देव त्या फुलांमध्ये गुदमरतो कि काय असे वाटते. :)

सुधीर कांदळकर's picture

20 Mar 2009 - 1:31 pm | सुधीर कांदळकर

लांकडी देव्हारा होता. कर्नाटकांत मिळणारा. भिंतीला ब्रॅकेट ठोकून त्यावर ठेवलेला. चि. प्राथमिक शाळेंत असतांना सौ. घरात नसतांनां आम्हीं घरांत देखील चेंडूफळी खेळत असूं. एकदां त्यानें जोरदार फटका लगावला आणि देवघर सुटे होऊन त्याचे सुटे भाग आणि सगळे देव इतस्तत: पडले होते. सुदैवानें सौ. परत यायच्या आंत त्वरित व्यवस्थित लावून होतें तसें व्यवस्थित करून ठेवलें. देवादिकांची टिंगल करण्याचा हेतु नाहीं. पण घरांत खेळणारीं मुलें असल्यास घडीचा देव्हारा ठेवूं नये हे तात्पर्य.

नंतर अर्थातच घरांत खेळलों नाहीं. आतां देव्हारा तोच आहे. पण चि. मोठा झाला.

सुधीर कांदळकर.

स्वाती दिनेश's picture

20 Mar 2009 - 2:12 pm | स्वाती दिनेश

मजेशीर किस्सा, आवडला.
स्वाती

प्रमोद देव's picture

20 Mar 2009 - 4:02 pm | प्रमोद देव

रम्या,आवडली तुझी देवपुजा. तुझी नर्मविनोदी भाषाही आवडली. असल्या भाषेने देखिल कुणाच्या भावना दुखावल्या जात असतील तर त्यांच्याकडे दूर्लक्ष कर.
आपल्या शरीरात पाच चक्र असतात असे योगात म्हटलंय. ह्या पाच चक्रांत त्या त्या चक्रांच्या स्वामीचे स्थान असते असे म्हणतात. त्यातले सर्वात पहिले चक्र म्हणजे मुलाधार चक्र जे आहे आपल्या गुदद्वारात म्हणजे जिथून आपण मलोत्सर्जन करतो. ह्या मुलाधार चक्राचा स्वामी आहे गणपती. आता गंमत पाहा आपल्या शरीरातील अत्यंत घाणेरड्या(आपण समजतो म्हणून) भागातच गणपतीचे स्थान योजणारे जे कुणी असतील त्यांना आजपर्यंत ना गणपतीने जाब विचारला ना इतर कुणी. ह्या अशा गोष्टीनेही कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या नाहीत की जातही नाहीत. आणि तू म्हटलेस की 'गणपतीच्या बुडाला फेविकॉल लावला' तर लगेच इथे काही लोकांच्या भावना दुखावल्या,श्रद्धेला तडे गेले. छ्या! ही कसली श्रद्धा? इतक्या क्षुल्लक गोष्टीने जी दुखावली जाते वा तिला तडे जातात म्हणजे ह्या लोकांची श्रद्धाच मुळी डळमळीत असते..आधीपासून.
अशा महाभागांना दूर्लक्ष करूनच मारावे. उगाच भाव देऊ नये.

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)